Friday, October 12, 2012

Rajesh khanna is gone...Amitabh is 70...

राजेश खन्ना गेला, अमिताभनि सत्तरी गाठली, रेखा ५८ वर्षांची झाली...

त्या दिवशी बहिणीनं फेसबुकवर लावलेला रेखाचा फोटो बघून एक जुनी आठवण जागी झाली. उमराव जान सिनेमा रिलीज होणार होता तेंव्हा कॅडल रोडवरच्या एका बिल बोर्डवर त्याच भलं मोठ्ठ पोस्टर लावलं होतं. बरेच दिवस/ महिने ते तिथे होतं. रात्री घरी परत येतान मी रोज ते बघायची. त्यावर रेखाच्या सुंदर फोटो खाली त्या सिनेमातल्या गाण्याची हि ओळ होती...उम्र का लंबा सफर तय किया तनहा हमने... 

कदाचित त्या पोस्टर मध्ये तसं विशेष काही नसेलही. पण माझ्या मनाला ते स्पर्शून गेलं हे नक्की. विशेषतः रेखाचा गूढ, उदास चेहरा आणि त्या खालची ती गाण्याची ओळ. कॅडल रोड तेंव्हा आजच्या इतका गजबजलेला नव्हता. त्या रस्त्यावर माणसांची वर्दळ  नेहमीच कमी असायची. त्यावेळी आई-वडील माझं लग्न जमवायच्या मागे होते. मनासारखं स्थळ मिळालं नाही तर आपल्याही आयुष्याचा प्रवास "तनहा " होईल कि काय अशी धाकधुक कदाचित तेंव्हा माझ्या मनात असावी. म्हणून कि काय कोण जाणे पण आज पंचवीस वर्षांनंतरही मला तो पिवळे अंधुक दिवे असलेला कॅडल रोड आठवतो. उंचावर पांढऱ्या प्रकाश झोतात न्हालेलं ते ब्राऊन रंगाच मोठ्ठ पोस्टर डोळ्यासमोर दिसतं आणि रात्रीच्या वेळी बसमधून उतरून घरी जाताना ते पोस्टर बघताना होणारी माझ्या मनातली चलबीचलही आठवते. 

माझ्या आईवडिलांना सिनेमाची फारशी आवड नव्हती. हिंदी सिनेमा म्हणजे थिल्लर, छचोर, त्यात काम करणारे सगळे नीतिभ्रष्ट अशी त्यांची धारणा होती. खरंतर मम्मीच्या माहेरी मालवणला त्यांचं स्वतःच सिनेमाच थिएटर होतं. पण फिल्मफेअर, स्टारडस्ट सारखी मासिक घरात आणायला मला मज्जाव होता. हिंदी सिनेमा बघणं तर लांबच राहिलं. 

पण हिंदी सिनेमा बद्दल त्यांचं मत जितक वाईट होतं तितक इंग्लिश सिनेमाबद्दल नसावं. वडिलांनी आम्हाला इंग्लीश सिनेमा पुष्कळ दाखवले. लॉरेल हार्डी चे विनोदी एपिसोड्स (हे आमच्या आवडीचे, आम्ही त्यांना जाड्या-रड्या म्हणायचो), बॉर्न फ्री, लिव्हिंग फ्री हे अफ्रिकेतल्या सिंहिणीच्या आयुष्यावरचे सिनेमा, टारझन, व्हेअर इगल्स डेअर, माकेनाज गोल्ड सारखे त्याकाळी गाजलेले चित्रपट. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ठाण्याला स्टेशन जवळ अशोक नावाचं एक थिएटर होतं. आता आहे कि नाही माहित नाही. तिथे रविवारी मटिनी शो ला इंग्लिश सिनेमा दाखवायचे. बऱ्याचदा रविवारी सकाळी वडील आम्हाला तिथे सिनेमा बघायला घेऊन जायचे. आणि सिनेमा संपला कि मग शेजारच्या कॅन कॅन हॉटेल मध्ये जेवण असा ठरलेला प्रोग्रॅम असायचा. जेवायला सुरी-काटे देणारं कॅन कॅन हे तेंव्हा ठाण्यातलं एकमेव रेस्टोरांत असावं. कॅन कॅन मधल्या जेवणाची मजा अशी कि तिकडे गेल्यावर मी नेहमी आम्लेट- ब्रेड मागवायची. वडील चिडायचे. ते म्हणायचे कि आम्लेट- ब्रेड तर तुला घरीही खायला मिळतं. तू दुसरं काहीतरी मागव- जे आपण घरी नेहमी करत नाही. शेवटी कंटाळून त्यांनी मम्मीला सांगितलं कि घराबाहेर पडायच्या आधी हिला आम्लेट -ब्रेड करून खायला घालं. मग तरी दुसरं काही मागवते का बघूया...

पुढे वडील त्यांच्या कामात खूप बिझी झाले आणि रविवारच्या सिनेमाच्या कार्यक्रमात खंड पडला. तसं प्राथमिक शाळेत असताना एक -दोन हिंदी सिनेमाही त्यांनी मला दाखवले होते. पण ते स्ट्रीक्टली लहान मुलांसाठी योग्य असतील असे. मी पाहिलेला सर्वात पहिला हिंदी सिनेमा घर घर कि कहानी असावा. बलराज सहानी आणि निरूपा रॉयचा. त्यात इतकी रडारड होती कि बघताना आम्ही सगळेच कंटाळलो. नंतर परिचय आला आणि हाथी मेरे साथी. एकात लहान मुलं तर दुसऱ्यात हत्ती. त्यामुळे ते दोन्ही सिनेमे आमच्या साठी योग्य असतील असं ठरवून आम्हाला दाखवण्यात आले. पण जेम्स बॉण्डचा एक सिनेमा तिकिटं काढलेली असूनही आम्हाला बघता आला नाही. वडीलांना जेम्स बॉण्डचे सिनेमा आवडायचे. त्यांची खूप इच्छा होती तो सिनेमा बघायची आणि आम्हाला दाखवायची. म्हणून सगळ्यांची तिकीटं काढली. तेव्हा अडव्हांस बुकिंग करायला लागायचं. पण तो पिक्चर बहुदा अठरा वर्षांवरील मुलांसाठी असावा. दारातच डोअरकीपरनी माझं वय विचारलं. मी तेंव्हा दहा-बारा वर्षांची असेन. वडिलांनी थोड वाढवून चौदा सांगितलं. अर्थातच डोअरकीपरनी आम्हाला आत सोडलं नाही. 

मैत्रिणीन बरोबर सिनेमाला जायची परवानगी मला खूप उशिरा मिळाली. जवळ जवळ कॉलेजमध्ये गेल्यावर. तेंव्हा मग रांगेत उभ राहून, फर्स्ट डे फर्स्ट शोचं अडव्हान्स बुकिंग करूनहि काही सिनेमे बघितले. जे बघायला नको ते सुद्धा. उदा. मोहन चोटीचा धोती, लोटा और चौपाटी.. कशाला बघितला कुणास ठाऊक. खरंतर नुसतं नाव ऐकूनच त्याच्या पासून लांब राहायला हवं होतं. असो... 

नवीन घरात राहायला गेल्यावर नवीन गुजराथी शेजाऱ्यांच्या संगतीत सिनेमा बघायचं प्रमाण थोडं वाढलं. पण सत्तरच दशक संपलं आणि हिंदी सिनेमाला उतरती कळा लागली. आमच्या सारख्या बसू चटर्जी, ह्रीषिकेश मुखर्जी ह्यांचे हसरे, खेळकर कौटुंबिक सिनेमा (छोटीसी बात, रजनीगंधा, चुपके चुपके, गोलमाल, चित्तचोर) बघितलेल्या लोकांना थीएटरकडे खेचू शकतील असे सिनेमे येणं बंद झालं. पण तोपर्यंत व्हीडीओ घराघरात पोहोचले होते आणि थीएटरात जाऊन सिनेमा बघावा असं वाटलं नाही तरी आवडलेले जुने सिनेमा घरबसल्या पुन्हा-पुन्हा बघायची सोय झाली होती. मग अमिताभचे झंजीर आणि दिवार पाच-दहा वेळा तरी बघितले असतील.

८०च दशक संपलं तसं माझं मुंबईतलं वास्तव्यहि संपलं आणि हिंदी सिनेमाशी संपर्क सुटला. न्युयोर्क, न्यू जर्सीत व्हीडीओच्या लायब्ररी होत्या. त्यात जुने सिनेमा मिळायचे. किंवा नवीन सिनेमाच्या पायरेटेड नाहीतर कॅमेरा प्रिंट. देशी लोकवस्ती जास्त असेल त्या भागात जुन्या पुराण्या एखाद्या थीएटर मध्ये जुने झालेले नवीन सिनेमा लागायचे. नवीन लागलेले सिनेमा तेंव्हा आजच्या इतके तात्काळ अमेरिकेला येत नसत. एका रविवारी देशी चानल वरच्या छायागीत सारख्या कार्यक्रमात एक, दो, तीन, चार, पांच, छे, सात, हे गाणं पाहिलं तेंव्हा त्या गाण्यात नाचणाऱ्या नटीचं नावही मला माहित नव्हतं (ना त्या गाण्याचे बोल आवडले, ना तो नाच आणि ना त्यातली तिची केश/वेशभूषा. पण ती एक चांगली नर्तकी असावी असं मात्र वाटलं) आणि शाहरुख खानची ओळख ९६ च्या भारत- भेटीत सिटीलाईटला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे बघितला तेंव्हा झाली. 

त्या काळात थोडेफार अमेरिकन सिनेमाही बघितले. पण जितके चित्रपट बघितले त्यापेक्षाही जास्त सिनेमाबद्दल वाचलं. परीक्षणं वाचली- केवळ हॉलीवूडच्या फिल्म्सची नाही तर नुयोर्कमध्ये लागलेल्या चीनी- इराणी- फ्रेंच चित्रपटांचीहि. अभिनेत्यांच्या/नेत्रींच्या मुलाखती वाचल्या आणि दिग्दर्शकांवर लिहिलेले अभ्यासपूर्ण लेखही. हळू हळू बाहेरच जग (म्हणजे आमच्या घराच्या बाहेरच जग) चित्रपटांकडे कुठल्या दृष्टीकोनातून बघतं ते उमजायला लागलं. तोपर्यंत सिनेमा म्हणजे आम जनतेसाठी असलेलं सवंग मनोरंजनाच साधन म्हणून त्याकडे बघायची सवय झाली होती. पण बाहेरच्या देशात त्याला कलाविष्काराचा प्रतिष्ठित दर्जा आहे हे लक्षात आलं. चित्रकला, लेखन हि जशी अभिव्यक्तीची माध्यमं तसच चित्रपट हे हि एक माध्यम समजलं जातं. चित्रकारांमध्ये हुसेन, लेखकांमध्ये नायपोल, रश्दी ह्यांचा ज्या मानानं उल्लेख होतो त्याच अदबीनं कोणा एका अकिरा कुरोसावा बद्दलही लिहिलं जातं हे मला नवीन होतं. नंतर नंतर मला असं वाटायला लागलं कि दर आठवड्याला कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या, हजारो - लाखो लोकांना रोजगार मिळवून देणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीला आपल्या मराठी मनानं कमी लेखलं असेल पण बाकीचं जग कसं दुर्लक्षित करू शकेल. 

असं म्हणतात कि a picture is worth a thousand words...पानच्या पानं लिहूनही जो प्रभाव साधता येत नाही तो परिणाम कधी कधी एका फोटोतून साधता येतो. मग चित्रपटा सारख्या द्र्क-श्राव्य माध्यमाच्या प्रभावाची तर कल्पनाच केलेली बरी. न्यूयॉर्कमध्ये अचानक एखादा टकसी ड्रायव्हर भेटतो - अफ्रिका किंवा पूर्व युरोपातून आलेला...तुम्ही इंडियन का असं विचारतो आणि आपण बघितलेल्या हिंदी सिनेमांची उत्साहानं नावं सांगतो. त्यानं त्याच्या पद्धतीनं उच्चारलेली ती नावं समजायला जरा वेळ लागतो. कधीकधी तर तो कुठल्या सिनेमाबद्दल बोलतोय ते लक्षातहि येत नाही. पण हिंदी सिनेमा जगाच्या कानाकोपर्यात बघितले जातात हे तर कळतं. 

हिंदी सिनेमाची खरीखुरी आवड असणाऱ्या लोकांच मला कौतुक वाटतं. त्यांना सगळेच सिनेमा आवडतात असं नाही. उलट मला वाटतं सारखे- सारखे सिनेमे बघितल्या मुळे त्यांना पिक्चर चांगला कि वाईट हे माझ्या सारखी पेक्षा जास्त चटकन- पहिल्या दहा-पंधरा मिनिटातच समजत असावं. फरक इतकाच कि पिक्चर कितीही रटाळ- बेकार असो तीन तास बसून तो मोकळ्या मनानं बघायची आणि एन्जॉय करायची त्यांची तयारी असते. तेवढा पेशन्स आता माझ्याकडे नाही.   

दोन हजार नंतर माझ्या मुंबईच्या फेऱ्या वाढल्या आणि हिंदी सिनेमाशी पुन:परिचय झाला. मुंबईत रिलीज होणारे चित्रपट त्याच दिवशी न्यूयॉर्क मध्ये रिलीज व्हायला लागले. असं नाही की मी जास्त पिक्चर बघायला लागले. किंबहुना आयटेम साँग हे आजकाल सगळ्या पिक्चर मधून बोकाळलेलं नवीन प्रकरण माझ्या बिलकुल पचनी पडलं नाही. आणि मुन्नी बदनाम हुई नि शिलाकी जवानी सारखी अश्लील नृत्य घरा-घरातुन आईवडील आपल्या मुलांना सर्रास बघू देतात हे पाहुन मला त्या मुलांच्या बद्दल फार वाईट वाटलं.
                                
पण बॉलीवूड पासून बचाव करण आता फार कठीण झालय! टीव्ही वरचे सगळे कार्यक्रम बॉलिवूडनी व्यापलेत. कुठल्याही देशी पेपरचा वेब साईट उघडला कि शाहरुख खान सध्या कुठल्या सिनेमाच शुटींग करतोय किंवा अमिताभ किती दिवस हॉस्पिटलमध्ये मध्ये राहून घरी परततोय हे विनाकारण मला न्यूयॉर्क मध्ये घर बसल्या समजतं. आज आई असती तर मी रोज नट -नट्यांच गॉसिप वाचते ते तिला बिलकुल आवडलं नसतं. मला सिनेमात अजिबात रस नाही ह्याचा तिला खूप अभिमान होता. पण करणार काय? जवळ जवळ सगळा भारतच बॉलीवूडमय झालाय. कदाचित ते चांगल्यासाठीच असेल. सध्याच्या काळाची ती गरज असेल. वेगवेगळे धर्म आणि भाषांनी भरलेल्या आपल्या प्रचंड देशात सगळ्या जनतेला एकत्र जोडण्याच- त्यांची आपसातली भांडणं कंट्रोल मध्ये ठेवायचं काम कदाचित हिंदी सिनेमा मुळेच साध्य होत असेल!
     

       

No comments:

Post a Comment