Friday, October 28, 2011

मालवणची मीना


सकाळी उठल्यावर मिड डे मध्ये वाचलं- भारतातलं पहिलं सी वर्ल्ड मालवणला उभारणार.... तोंडवळी गावात. 
आई मालवणची. मालवणात जन्मली. तिथल्याच कन्याशाळेत शिकली. लहानपणीच्या खुप गोष्टी ती सांगायची. त्यांचं एकत्र कुटूंब. घरात मुलीं जास्त. बारा- तेरा मुलींमध्ये तीनच भाऊ. त्यांच्या घरात पंधरा दिवस गणेशोत्सव चालायचा . गणपतीत कोकणात पाऊस खुप. ती आणि तिच्या मैत्रिणी-बहिणी मिळून रानात फुलं वेचायला जायच्या. जेंव्हा तिला समजलं कि तिच्या भाचीला- चुलत भावाच्या मुलीला झाडा- पानांची अलर्जी आहे त्यामुळे ती फुलं वेचायला जाऊ शकत नाही - तिला इतकं आश्चर्य वाटलं. मला म्हणाली, "लहान असताना आम्ही कित्ती फुलं वेचून आणायचो. त्यांचे गौरी- गणपतीला हार-गजरे करायचो." गणपती उत्सवाचं वर्णन ती अगदी रंगवून करायची. घरात सगळेच मासे खाणारे. त्यामुळे पहिले एक-दोन दिवस गोडाचा स्वयंपाक चालायचा. पण नंतर मात्र मागल्या दारांनी मासे घरात आणले जायचे. गणपतीला वास यायला नको म्हणून.
आईला मालवणचा, तिच्या कुटुंबाचा खुप अभिमान होता. आज ती असती तर सी वर्ल्डची हि बातमी तिला नक्कीच सुखावून गेली असती. त्यांचं मालवणच घरही खुप छान होतं. म्हणजे अजूनही असेल. पण मीच आता कितीतरी वर्षात तिथे गेलेली नाही. दोन वर्षांपूर्वी ओक्टोबर मध्येच मम्मी गेली...

बुधवार ७ मार्च, होळी पौर्णिमा

मम्मी पुरण पोळ्या खूप छान करायची. होळी आणि माझा वाढदिवस ह्या दोन दिवशी आमच्याकडे हमखास पुरण पोळया असायच्या. मम्मीच्या पोळ्यात सुंठ आणि जायफळाच अचूक प्रमाण असायचं. तिचं पुरणहि  नेहमी ओलसर व्हायचं - कोरड कधीच नाही. ते पुरण ती पोळीत एकदम ठासून भरायची. पोळी लाटल्यावर कणकेचा अगदी नाजूकसा थर पुराणावर असायचा. पण तिच्या पोळ्या कधी बिघडल्या नाहीत. किंवा मऊ कणकेत ठासून पुरण भरल्या मुळे पोळ्या फुटतायत किंवा लाटायला त्रास होतोय असही कधी झालं नाही. तिच्या पोळ्यांबरोबर दुध किंवा तूप खायची जरुरही घरात कधी कोणाला वाटली नाही. 

मम्मीचे  मोदक खूप छान व्हायचे. ओल्या नारळाचे, उकडीचे मोदक. खसखस आणि वेलची घालून केलेले. अहाहा, घरात काय सुंदर सुवास दरवळायचा. नाग पंचमी, नारळी पौर्णिमा, गणेश चतुर्थीला आमच्याकडे मोदक असायचे. पांढऱ्या स्वच्छ तांदळाच्या पिठीच्या पातळ पातीत ठासून सारण भरलेले. जशा मम्मीच्या पुरण पोळया कधी बिघडल्या नाहीत तसेच तिचे मोदकही कधी बिघडले नाहीत. नेहमी एकसारखे एक नाजूक चुण्या असलेले.  धारधार नाकाचे मोदक. आणि त्यात मोदक-भावांना बहिण हवी म्हणून एखाद-दुसरी करंजी. ती नेहमी न चुकता मोदकांच्या बरोबर एक तरी करंजी करायचीच.


मम्मीला नेहमीच्या स्वयंपाकाची फारशी आवड नव्हती. ते काम तिनं स्वयंपाकाच्या बाईंवर सोपवलं होतं. पण बाईंकडून आपल्या पद्धतीनं स्वयंपाक करून घ्यायलाहि कौशल्य लागतं. ते तिच्यात होतं. आपल्या पद्धतीचे वेगवेगळे मसाले- तळलेल्या माशांसाठी वेगळा मासला- कालवणासाठी वेगळा - मटणाच्या रश्श्यासाठी वेगळा हे सगळं तिनं स्वयंपाकाच्या बाईंना दाखवून ठेवलं होतं. त्यामुळे घरचा स्वयंपाक नेहमी चविष्ट व्हायचा. तिचा जावई नेहमी तिच्या  चवदार जेवणाची आठवण काढत असतो.

ज्या आत्मविश्वासानं मम्मी पुरण पोळ्या - मोदक- मटण- मासे करायची तो आत्मविश्वास तिला दिवाळीचा फराळ करताना वाटायचा नाही. म्हणजे तिच्या पुडाच्या करंज्या आणि तळलेल्या पोह्यांचा चिवडा नेहमीच उत्कृष्ट असायचा. पण रव्याच्या लाडवांची तिला भीती होती. ते तिनं घरात सगळ्यांना आवडत असूनही कधी केले नाहीत. त्यामनान बेसनाचे लाडू तिला सोप्पे वाटायचे. पण चकल्या करतान तिला टेन्शन यायचं. 

संक्रांतीला भोगीची भाजी आणि तीळ घातलेली बाजरीची भाकरी, पावसाळ्यात येणाऱ्या जंगली भाज्यांची मिश्र  भाजी, भरलेली श्रावण भेंडी ती आवर्जून करायची/ करून घ्यायची. नाहीतर एरवी भाज्यांची तिला अलर्जी (!!) होती.  कोबी, भेंडी ह्या भाज्या तर तिला नावालाही नको असायच्या. बांगड्यांच, तारलीच आंबट -तिखट रोज खायचीही तिची तयारी होती. ताकाची कढी, कांद्या बरोबर परतलेल्या बटाट्याच्या काचऱ्या अशा ठराविक  गोष्टी सोडल्या तर शाकाहारी जेवणाचं तिला फारसं कौतुक नव्हतं.

तिच्या हातच्या पुरण पोळ्या आता परत कधीच खायला मिळणार नाहीत.
No comments:

Post a Comment