Saturday, October 20, 2012

Non-NRI Madhuri

नॉन-एनआरआय माधुरी माधुरी मुंबईला परत गेली. दहा कि पंधरा वर्ष डेनव्हर, कोलोराडो मध्ये राहून आता परत....वापस भारतात. मिडीयाला सांगितलं कि मुलांवर आपले भारतीय संस्कार व्हावेत म्हणून आम्ही परत आलो. ते ठीक आहे...मिडीयाला कशाला खरं कारण सांगायला पाहिजे...कि डेनव्हर मध्ये मी जाम बोअर झाले होते. अगदी वेड लागायची पाळी आली होती. तिकडे कोणी माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हतं. शॉपिंग मॉल मध्ये जा नाहीतर मुलांना शाळेत सोडायला जा लोक असे बघायचे कि जणू काही हजारो देशी प्रोग्रामर्सच्या बायका अमेरिकेच्या गावा-गावातून विखुरल्यात त्यातलीच मी एक. मी केवढी मोठ्ठी चित्रतारका आहे...लाख्खो-कोट्टयांनी लोकांच्या हृदयावर मी राज्य केलय, अजूनही करतेय हे तिकडे कोणाच्या गावीही नव्हतं...त्याउलट मुंबईत मात्र अजूनही लोक मला विसरलेले नाहीत. कधीही जा पहिल्यासारखच पूढे पूढे करतात.. म्हणून परत आले... अर्थातच हे सगळ मिडीयाला सांगत बसायची काहीच जरुरी नाही. 

मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुली माधुरीला आपली रोल मॉडेल मानतात कि नाही कुणास ठाऊक पण जाणून-बुजून असो किंवा नसो, स्वेच्छेनं असो किंवा नसो ती त्याचं प्रतिनिधित्व नक्कीच करते. ८०-९०च्या दशकात वयात आलेल्या, शहरात राहणाऱ्या, उच्चशिक्षित महाराष्ट्रीयन मुलींचं एकच स्वप्न असायचं - लग्न करून अमेरिकेला जायचं. अर्थात हे स्वप्न त्यांच्या आई-वडिलांच्या पूर्ण संमतीनच बघीतेलेल असायचं... जो देश आपण स्वतः कधी पाहिला नाही, ज्या देशात आपल्या बाप-जाद्यानी कधी पाऊल ठेवलं नाही, त्या देशात आपल्या मुलांनी जाऊन कायमच स्थायिक व्हावं असं स्वप्न त्या मुला-मुलींचे आई-वडीलही भारतात बसून बघायचे. आश्चर्य म्हणजे माधुरी सारख्या अमाप पैसा आणि कीर्ती मिळवलेल्या, आपलं सगळं करिअर मुंबईत असलेल्या, करीअरीस्ट मुलीनही एका सर्वसामान्य मुली सारखं परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं स्वप्न बघितलं. 

माधुरीची भावंडं म्हणे अमेरिकेत रहातात. लग्नाआधी सुट्टीत ती नेहमी त्यांच्याकडे जायची. म्हणजे अमेरिका काही तिला नवीन/अनोळखी नव्हती. ह्या देशात तिच्या करिअरला काही वाव नाही ह्याची तिला पूर्ण कल्पना असणार. तरीही तिनं इथे येऊन राहायचा निर्णय घेतला. कदाचित भारतात तिला मनासारखा नवरा मिळाला नसेल. किंवा इतकी वर्ष सिनेमात काम केल्यावर, फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटाचा, चाहत्यांच्या ससेमीऱ्याचा कंटाळा आल असेल. त्यापासून काही वर्ष ब्रेक घ्यावा- लांब कुठेतरी जाऊन राहावं, जिथे आपल्यला कोणी ओळखणार नाही, आपण एक निनावी, अनोनिमस गृहिणी, आई म्हणून जगू शकू- असहि कदाचित तिला वाटलं असेल...

कारण काही असो आजवरच्या माधुरीच्या सगळ्या निर्णयांकडे पाहताना उठून दिसतात ती तिची महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय मूल्य आणि जरूर तिथे कोम्प्रमाईज करायची तयारी. आणि तेच कदाचित तिच्या यशाचं गमक असेल. तिच्या समकालीन काही तारकांप्रमाणे ती कुणा विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली नाही किंवा मनासारखा नवरा मिळाला नाही म्हणून अविवाहितहि राहिली नाही. आपल्या व्यवसायाच्या अत्युच्च शिखरावर असताना तिनं एका नवशिक्या डॉक्टर बरोबर लग्न केल, ज्याचा तेंव्हा त्याच्या प्रक्टीसमध्ये जमही बसला नव्हता. पुढली काही वर्ष ती त्याच्या नोकरीच्या गावी त्याच्याबरोबर राहिली. आणि जेंव्हा भारतात नवीन संधी खुणावू लागल्या तेंव्हा त्याला बरोबर घेऊनच परत गेली. तोहि स्वतःची नोकरी -व्यवसाय सोडून गेला हे विशेष. पण त्याला त्याचा इथला कामधंदा सोडून आपल्या बरोबर जायला तयार करण्यातही कदाचित माधुरीचीच चतुराई असेल.

लग्न करून अमेरिकेला येताना तिनं त्यावेळी तिच्या वयाच्या भारतीय मुलींमध्ये प्रचलित असलेला ट्रेंड फॉलो केला  होता. आता भारतात परत जातानाहि ती सध्या एनआरआय मंडळीत चालू असलेला ट्रेंड फोलो करतेय. अलीकडच्या काळात रिव्हर्स ब्रेन ड्रेनवर बरंच काही वाचायला मिळतंय. अमेरिकेत आणि यूरोपात आलेल्या आर्थिक मंदीमुळे दहा- पंधरा वर्षांपूर्वी नोकरी धंद्या निमित्त देश सोडलेले भारतीय आता भारतात उपलब्ध होत असलेल्या संधींचा फायदा घेण्यासाठी आपल्या मातृभूमीकडे परतायत.

पेपरमधल्या बातम्या आणी वेगवेगळ्या कार्यक्रमातले तिचे नटलेले- सजलेले फोटो बघितले कि वाटतं माधुरीला मुंबईत परत जम बसवायला वेळ लागला नाही. जणू काही ती कधी कुठे गेलीच नव्हती अशा तऱ्हेनं फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनी तिला आपलंसं केलं.  त्यातही तिचं कौशल्य दिसून येतं. तीनं आपल्या व्यवसायातले आपले कॉन्टक्टस मधल्या दहा- पंधरा वर्षांच्या काळात लांब राहूनही कायम ठेवले. परतीचि वाट कायम उघडी ठेवली.

स्वतःची चांगली नोकरी सोडून, लग्न करून नावऱ्याच्या मागे परदेशी जाणाऱ्या मुली बहुतेक विसाव्या शतकाबरोबरच संपल्या असाव्यात. आजकाल मुली सहजा-सहजी आपली नोकरी सोडून नवऱ्याच्या नोकरीच्या गावी जाऊन राहत नाहीत असं मी ऐकलय. नवऱ्याला घेऊन मुंबईला जाताना माधुरी एकविसाव्या शतकात सुरु झालेल्या नवीन प्रवाहाच प्रतिनिधित्व करतेय. गेल्या शतकात बहुतेक करून नवऱ्याच करिअर जास्त महत्वाच मानलं जायचं. त्याची नोकरी जिथे असेल तिथे बायको-मुलांना त्याच्याबरोबर जावं लागायचं. आता एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला कधी कधी असही बघायला मिळतंय कि जिथे बायकोची नोकरी असेल तिथे नवरा आणि मुलं तिच्या बरोबर जाऊन रहातात. हा कदाचित सर्वस्वी आर्थिक दृष्टीकोनातून घेतलेला निर्णय असेल- ज्याची मिळकत जास्त त्याची नोकरी जास्त महत्वाची. किंवा हा बदल नवऱ्याच्या/ पुरुषांच्या आणि एकंदर समाजाच्या विचारसरणीत घडलेल्या परिवर्तनाच द्योतक असेल.

माधुरीच्या करीअरची दुसरी इनिंग आता सुरु झालीय. ते हि सगळ्यांना जमतं असं नाही - पहिल्या करिअर मघ्ये भरपूर यश संपादन करायचं...मघ्ये थोडा ब्रेक घ्यायचा आणि पुन्हा बदलेल्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेऊन नवीन दुसऱ्या करिअरला सुरुवात करायची. हि दुसरी इनिंग तिला कुठे घेऊन जाईल ते आपल्याला बघायला मिळेलच. परदेश सोडून भारतात परतलेले काही लोकं, जिथे होतो तेच बरं होतं म्हणत परदेशात परत जातात तशी तीहि काही वर्षांनी अमेरिकेला परत जाईल (ती शक्यता मला फार कमी वाटतेय), कि आणखी दहा-पंधरा वर्षांनी मागे वळून पहाताना म्हणेल - भारतात परत यायचा निर्णय हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय होता.
  
No comments:

Post a Comment