Sunday, April 7, 2013

सांगत्ये ऐका

करण जोहरला थोडंसुध्दा मराठी समजत नाही? त्याला 'सांगत्ये ऐका' ह्या शब्दांचा अर्थ माहिती नाही? मुंबईत रहाणाऱ्या, अख्ख आयुष्य मुंबईत गेलेल्या माणसाला ह्या दोन सोप्प्या, साध्या मराठी शब्दांचा अर्थ समजू नये?

आपल्या वडिलांच्यापासून मुंबईतल्या चित्रपटसृष्टीत वावर असलेल्या, स्वतः तरूण वयात अनेक यशस्वी सिनेमांची निर्मिती केलेल्या या निर्माता/दिग्दर्शकानं मराठी भाषेतल्या ह्या नावाजलेल्या पुस्तकाचं नावही ऐकलेलं असू नये?

जुन्या जमान्यातील मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री हंसा वाडकरच्या सांगत्ये ऐका ह्या गाजलेल्या, आत्मचरित्रपर पुस्तकावरून शाम बेनेगलनी १९७७ साली भूमिका हा हिंदी सिनेमा बनवला. त्यात स्मिता पाटील, अमोल पालेकर, अनंत नाग ह्यांनी काम केलय. त्या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. अनेक अंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवात त्याचा गौरव झाला. गिरीश कर्नाड, सत्यदेव दुबे, गोविंद निहलानी, नसिरुद्दीन शाह अशा मातब्बर मंडळींची नावं ह्या चित्रपटाशी जोडलेली आहेत आणि तरीही आपल्या कॉफी विथ करण ह्या कार्यक्रमात जेंव्हा त्यानं शबाना आझमीला विचारलं कि तू जेंव्हा आत्मचरित्र लिहिशील तेंव्हा त्याला काय नाव देशील आणि ती उत्तरली, "सांगत्ये ऐका" तेंव्हा ते शब्द पुसटसेहि कधी कानावर पडून गेल्याच त्याला वाटलं नाही. त्यानं ओशाळल्यासारखं दाखवत आझमीला त्यांचा अर्थ विचारला (तिनही तो चुकिचा सांगितला हा भाग वेगळा; सांगत्ये ऐकाचा अर्थ केह्ती हुं, सुनो किंवा बताती, हुं सुनो होतो ना तर ती म्हणाली बोलती हुं, सुनो…असो ). तर back to  करण- आणि त्याच कार्यक्रमात एका विसरण्या-योग्य हिंदी सिनेमाचं नाव आणि त्या सिनेमाच्या संगीत दिग्दर्शकाच नाव मात्र जावेद अख्तरनि नुसती एका गाण्याची पहिली ओळ सांगितल्यावर तात्काळ त्याला आठवलं.

करण आणि त्याच्यासारख्या- पिढ्यान-पिढ्या मुंबईत/महाराष्ट्रात वास्तव्य केलेल्या, पनवेल - अलिबाग सारख्या ठिकाणी फार्म हाऊसेस असलेल्या अनेकांना मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणखी काय काय माहिती नाही हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे.

मला असं मनापासून वाटत कि मुंबईत रहाणाऱ्या प्रत्येकाला चांगलं मराठी बोलता आलं पाहिजे. माझा मुलगा एका अंतरराष्ट्रीय शाळेत जातो. त्याच्या वर्गातल्या एका मुलाची आई वर्ल्ड बँकेत काम करते. ती एकदा मला सांगत होती कि वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये काम करणारे बरेच लोक चार-पाच परकीय भाषा अगदी सहज अस्खलितपणे बोलू शकतात. तिला असं म्हणायचं होतं कि मनात आणलं तर एक- दोन भाषां पेक्षा जास्त भाषा शिकण माणसाला अवघड नसतं. मग मुंबईत रहाणाऱ्या जनतेला आपल्या मातृभाषेबरोबरच मराठीचा सराव करण का कठीण जावं.

परवा यु ट्यूबवर कॉफी विथ करणच्या जुन्या क्लिप्स बघताना मला ह्या माझ्या पेट पिव्जची परत एकदा प्रकर्षाने आठवण झाली. मुंबईत राहून मराठी बोलायचं नाही; मुंबईला मंबाय म्हणायचं; पेकिंगला बेजिंग म्हणायचं पण मुंबईला मात्र मुंबई हे अतिशय सुंदर नाव सोडून बॉम्बेच म्हणत राहायचं- हे सगळं कधी थांबणार! जोहर मराठीची शिकवणी कधी लावणार? किंवा आपण ज्या व्यवसायात आहोत त्याचा अभ्यास म्हणून तरी दादा कोंडकेंचे सिनेमा (जर अजूनपर्यंत बघितले नसतील तर), श्यामची आई कधी बघणार?


No comments:

Post a Comment