Saturday, August 2, 2014

पुलं, गीत रामायण आणि दादरच घर

शेवटी एकदाचं कोणीतरी संपूर्ण गीत रामायण यू ट्यूबवर चढवलं. बरेच दिवस मी शोधत होते पण सापडत नव्हतं. खूप शोधल्यावर एक गाणं सापडलं होतं पण ते सुद्धा ओरिजिनल नाही. १९८०च्या दशकात काही वर्ष अशी होती कि किर्ती कॉलेज जवळच्या माझ्या आईच्या घरात रोज सकाळी कॅसेट प्लेअरवर एकतर गीत रामायण तरी चालू असायचं नाहीतर पुलंच बटाट्याची चाळ. सकाळच्या वेळी सगळे शाळा -कॉलेज -ऑफिसला जायच्या गडबडीत असायचे; कोणी टोस्ट- बटर खात असायचे तर कोणी उसळ -चपाती. आई मधूनच स्वयंपाकाच्या मामींना काहीतरी सूचना कर, मधूनच डायनिंग टेबलाशी बसलेल्या माझ्या वडिलांच्या ताटात गरम चपाती वाढ अशी आतबाहेर करत असायची आणि पार्श्वभूमीवर एकतर पुलं खदखदून हसवत असायचे नाहीतर फडके- माडगुळकर द्वयी आपल्या शब्द -स्वरांनी घरात  गंगाजलाचा शिडकाव करत असायची.

ऑफीसला निघालेले माझे कर्तुत्ववान, कार्यव्यस्त वडील दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसून बूट -मोजे घालताना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ऐकत मान डोलावून दाद देतायत ह्याचा एक सुंदर फोटो माझ्याजवळ आहे.  त्यांच्या शब्दात सांगायचं तर मजजवळ आहे. कुठल्याही कॅमेऱ्यांनी ती छबी टिपलेली नाही. माझ्या कम्प्युटरवरच्या स्लाईड शो मध्ये अर्थातच ती नाही. पण डोळ्यांच्या वाईड अन्गलनी लेन्सनी रेकॉर्ड केलेली ती व्हिडीओ क्लिप मी जेंव्हा माझ्या आठवणीत लॉग इन करून मनाच्या स्क्रीनसमोर आणते - अगदी पूर्वेकडच्या बाल्कनीतून खोलीत शिरलेल्या उन्हाच्या कवडशा सकट - तेंव्हा काळ -प्रवास करून पट्कन भूतकाळात जावं आणि आयुष्य त्याक्षणा पर्यंत रीवाइंड करावं असं पुष्कळदा वाटतं.

त्याच घरात मी एकदा मीनल गावस्करांच पुत्र व्हावा ऐसा पुस्तक वाचनालयातून आणून वाचलं होतं. त्यात त्यांनी लिहीलं होतं कि सुनीलच्या वेळी गरोदर असताना त्यांनी राम, शिवाजी अशा ऐतिहासिक आणि पौराणिक थोर पुरुषांची चरित्र वाचली होति. काही आधुनिक आया बाळ  पोटात असताना आपल्या पोटाला हेड फोन्स लावून त्याला शास्त्रीय संगीत ऐकवतात. हे दोन्ही मी करायला विसरले. परंतु मुलगा जसा मोठा व्हायला लागला तस त्याच्यावर काय संस्कार करावेत आणि कसे ह्याबद्दल अनेक प्रश्न मला सतावायला लागले: अभ्यासात प्राविण्य मिळव, खेळात कसून मेहनत घे, संगीताचा सराव- पाश्चात्य संगीताचा असला तरी चालेल- थोड्या प्रमाणात का होईना चालू ठेव, वाचनाची गोडी लावून घे - हे सगळ त्याच्याकडून करवून घेणं त्याच आयुष्य समृध्द करायला, त्याला चागलं वळण लावायला पुरेसं आहे का हि सगळी केवळ वरवरची मेहनत आहे आणि ह्यापलीकडे काही खोल संस्कार त्याच्यावर व्हायला हवेत?

भारतातली गोष्ट वेगळी. तिथल्या हवेतच रामायण, महाभारत, शिवचरीत्र असतं. मुलांच्यात ते कुठून तरी उतरतच.  पण न्यूयॉर्कच्या काचेच्या मनोऱ्यामध्ये रहाताना मुलांमध्ये काय उतरणार -  डॉलरायण?  मिलियन आणि बिलियन डॉलर्स कोणी कसे कमावले आणि कसे खर्च केले त्याच्या वदंता? असं नाही कि इथे सगळेच स्वार्थी आणि केवळ पैशाच्या मागे आहेत. बिलकुल नाही. उलट स्वतः पलीकडे जाऊन सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचा इथे बिलकुल तुटवडा नाही. घराजवळच्या सूप किचन मध्ये जाऊन निराधार लोकांना खायला घालण्यापासून ते हेटी मधल्या भूकंपग्रस्तांना प्रत्यक्ष तिथे जाऊन सर्वतोपरीनं सहाय्य करणाऱ्यात सेलेब्रिटीज पासून सर्वसामान्यान पर्यत सगळे असतात.

काही पालक आपल्या मुलांना अमेरिकेच्या इतिहासाची माहिती दयायला धडपडतात तर काही त्यांना सुट्टीत युरोपला नेऊन युरोपियन इतिहासाशी त्यांची ओळख करून देतात. पण सामाजिक जाणीव मुलांच्यात बिंबवण आणि पाचशे - हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाशी त्यांची ओळख करून देणं पुरेसं आहे कि कुठेतरी अनादी काळाशी त्यांची नाळ जोडली जायला हवी? आई -वडिलांच्या निस्वार्थी, निरपेक्ष प्रेमातून मिळालेली ताकद त्याला पुरेशी होईल कि काका, मामा, आज्जी, आजोबा ह्यांच्या पलीकडे प्राचीन काळा पासून चालत आलेल्या पिढ्यान पिढ्याच्या साखळीतला तो एक दुवा आहे ह्याची जाणीव त्याला होणं महत्वाचं आहे. ती जाणीव त्याला आपोआप होईल कि त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील? प्रश्नच प्रश्न.

आठवणींचा चित्रपट रीवाईंड करून पुन्हा तुकड्या- तुकड्यांनी रिप्ले केला तर काही फ्रेम्स मला ठळक दिसतात. एक म्हणजे मी श्रीमान योगी वाचावं म्हणून वडिलांनी केलेली धडपड. रणजीत देसाईंच्या श्रीमान योगीचा पहिला खंड अपेक्षेपलीकडे यशस्वी झाला आणि हातोहात खपला. आता नक्की आठवत नाही पण दुसऱ्या खंडासाठी मला वाटत प्रतीक्षा यादीत नाव नोंदणी करावी लागली किंवा असच काहीतरी होतं. वाचक अधीरतेनं त्याची वाट पहात होते.  माझे वडील तरी नक्कीच होते. स्वतः साठी नाही तर मी वाचावं म्हणून. दुसरा खंड त्यांच्या हातात पडला तेंव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मालवणला आज्जोळी गेले होते. खरतर लवकरच परत येणार होते, तरीही त्यांनी तो जाडजूड ग्रंथ मला पोस्टानी मालवणला पाठवला होता. ब्राऊन पेपर आणि प्लास्टिक मध्ये गुंडाळलेल्या त्या बाडाचा फोटोही अर्थातच त्यांच्या गीत रामायण ऐकतानाच्या फोटोसारखा आजही मजजवळ आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आझाद मैदानात मोठ्ठ प्रदर्शन भरलं होतं. बरेच महिने ते चालू होतं. एका रविवारी वडील आम्हाला ते प्रदर्शन बघायला घेऊन गेले. बाबासाहेब पुरंदरेंच चैतन्यपूर्ण निवेदन आणि लताबाईंनी म्हंटलेल्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा सारख्या जोशपूर्ण गाण्यांनी तिथल वातावरण खूप भारलेलं होतं. खूप गर्दी होती. ते प्रदर्शन मला आठवत नाही. पण त्या सोहोळ्याचा आणि तिथल्या वातावरणाचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झालाय असं वाटतं. त्या निवेदनाच्या आणि गाण्यांच्या कॅसेट्स मी नंतर खूप वेळा ऐकल्या. वडिलांनी शिवाजी महाराजांची महती कधी स्वतःच्या शब्दात मला सांगितली नाही पण त्यांनी मला महाराष्ट्रभर फिरवल -सुरवातीला बसनी नंतर कारनी. महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि भूमीशी त्यामुळेच कि काय माझं खूप घट्ट नातं विणलं गेलं.

अमेरिकेत सगळ्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या मोठ्ठ्या लायब्ररीज आहेत. त्याला प्रेसिडेन्शियल लायब्ररी म्हणत असले तरी , खरंतर ते राष्ट्रीय संग्रहालय/ मोठ्ठ उद्यान असं सगळं ऑल इन वन असतं. इथल्या सगळ्याच गोष्टींप्रमाणे भव्य, दिव्य, आणि परिणामकारक. मुंबई -पुण्यात केवळ शिवाजी महाराजांना वाहिलेलं मोठ्ठ संग्रहालय तर तेंव्हा नव्हतं पण त्याची उणीव काही प्रमाणात का होईना त्या त्रिशताब्दी सोहोळ्यानी भरून काढली.

वडिलांनी शिवाजी महाराजांकडे माझं लक्ष वेधलं तर आईमुळे गीत रामायणाची गोडी लागली. आम्ही तेंव्हा ठाण्याला रहात होतो. ठाण्याचं गडकरी रंगायतन होण्याच्या थोड्या आधीची हि गोष्ट आहे. नाटक -संगीताचे सगळे कार्यक्रम तेंव्हा मो. ह. विद्यालयाच्या पटांगणात होत असत. सुधा करमरकरांची बालनाट्य - खाक्या राक्षस, वेताळ वगैरे, हृदयनाथ मंगेशकर आपल्या बहिणींबरोबर करायचे तो भावसरगम नावाचा मराठी भावगीतांचा कार्यक्रम त्या पटांगणात बघितल्याचं आठवतय. आणि अर्थातच गीत रामायण. ते मला वाटत तेंव्हा काही भागांमध्ये व्हायचं. आणि बाबुजींचा घसा खराब झाला तर कार्यक्रम आयत्या वेळी रद्द व्हायचा. एकदोनदा आम्ही तिथे जाऊन कायर्क्रम रद्द झाल्यामुळे परत आल्याच अंधुकस आठवतय.

मध्ये काही वर्ष गेली आणि कॅसेट प्लेअर सगळ्या घरात प्रचलित झाल्यावर गीत रामायणातली गीतं लक्ष देऊन पुन्हा ऐकायला मिळाली. तोपर्यंत आम्ही दादरला रहायला आलो होतो. गीत रामायण पुन्हा पुन्हा ऐकताना जाणवलं कि गदिमांनी जे लिहिलय ते महाकाव्यच आहे. आणि बाबुजींनी ते गाताना त्यातल्या सगळ्या प्रसंगांचे आणि भावनांचे चढ-उतार ऐकणाऱ्यापर्यंत हुब्बेहूब पोहोचावेत ह्याची काळजी घेतलीय. स्वयंवर झाले सीतेचे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, मोडू नका वचनास  ह्या गाण्यांची अवीट गोडी वर्णन करू शकेन इतकं शब्द सामर्थ्य मजजवळ नाही.

स्वयंवर झाले सीतेचे जेंव्हा मी आता त्यातल्या शब्दांकडे लक्ष देऊन ऐकते तेंव्हा असं वाटत कि राम- सीता विवाह सोहोळ्याच अत्यंत रोमांटिक वर्णन माडगुळकरांनी नुसत्या शब्दांनी त्यात इतक्या समर्थपणे  केलय कि यश चोप्रा, करण जोहर हे बॉलीवूड मध्ये किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखले जाणारे निर्माते -दिग्दर्शक कोट्यांनी रुपये खर्च करूनहि तेवढा रोमान्स अजून पर्यंत कधीच पडद्यावरच्या कुठल्या विवाह सोहोळ्यात दाखवू शकलेले नाहीत. तशी माझी आई अमेरिकन लोकांच्या भाषेत सांगायचं तर होपलेस रोमांटिकच होती. आणि माझे वडील तिचे हिरो होते.  तिनं आवर्जून आम्हाला हे सगळे कार्यक्रम दाखवले आणि ऐकायला लावले ह्यात नवल नाही.

आपल्याकडे हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळे असेल कदाचित पण हिरो हा शब्द आपण खूप सर्वसामान्य अर्थानी वापरतो. व्हिलन बरोबरच्या ठीशॉ ठीशॉ मध्ये जो जिंकतो तो हिरो किंवा चित्रपटाच्या शेवटी नायिका ज्याला मिळते तो हिरो. सुदैवानी माझ्या वडिलांवर हिंदी सिनेमाचा प्रभाव बिलकुल नव्हता. त्यामुळे त्यांनी जी हिरोची किंवा नायकाची संकल्पना आमच्या समोर ठेवायचा प्रयत्न केला - राम म्हणा किंवा शिवाजी म्हणा हे खूप व्यापक अर्थानी हिरो होते. समाजाचे नायक होते.

लहानपणी रोज गीत रामायण ऐकल्यामुळे माझे आचार -विचार जरा अतिच शुध्द झाले असावेत अशी मला शंका आहे. पण अशुध्द पेक्षा अति-शुद्ध बरं म्हणून मुलालाही ते ऐकवावं असं फार दिवसांपासून मनात येतं होतं. जून - जुलै मध्ये त्याच्या शाळेला सुट्टी असताना आणि सॉकर वर्ल्ड कप आणि विम्बल्डन सुरु झाल्यावर मी एका स्क्रीन वर गीत रामायण वाजवत राहिले. गाडीत मी माझी गाणी लावली तर तो कुरकुरतो आणि थोड्यावेळानी स्टेशन बदलून एफ एम लावायला लावतो. पण घरात टेनिस, सॉकर, बास्केट बॉल बघताना पाठीमागे काय म्युझिक चालू आहे ह्याची त्याला फारशी पर्वा दिसली नाही. फक्त एकदाच एक अत्यंत स्लो, दुःख्खी गाणं सुरु झाल्यावर तो, "मॉम, धिस इज सो आउट ऑफ ट्यून" एवढं म्हणाला. पण तरीही त्यानं ते बंद नाही केलं.

माझ्या आशा पल्लवित होतील अशी आणखी एक गोष्ट घडली. रात्री झोपताना मी आय-फोनवर मनाचे श्लोक ऐकते. अनुराधा पौडवालच्या गोड आवाजातले ते श्लोक माझ्यासाठी अंगाई गीताचं काम करतात. मुलालाही ते आवडतात. त्यांचा अर्थ बिल्कुल समजत नसला तरी. काही दिवसांपूर्वी तो मला म्हणाला, "मॉम, आज कॅम्प मध्ये खूप दमायला झालं. मला झोप लागत नाहीय. मनाचे श्लोक लावतेस?"…मग थोडं थांबला आणि म्हणाला, " नाहीतर असं कर तुझ ते गीत रामायणच लावं". गदिमा झिंदाबाद! बाबूजी झिंदाबाद! (मी मनात म्हंटल)

पुलंच्या निर्मळ, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचाही माझ्या पिढीवर किती प्रभाव पडलाय! त्यांना दूरदर्शन वर खूप बघायला मिळालं. त्याची सगळी पुस्तकं, प्रवास वर्णनं, विनोदाला कारुण्याची झालर असलेली व्यक्तिचित्रण- सगळच अनेकदा वाचल.  आठवतं? एकदा सकाळी पेपर उघडला तर अनपेक्षितपणे त्यांचा एक लेख वाचायला मिळाला - अंतुले तुम्हारा चुक्याच. शालिनीताईनि अंतुलेंच आसन हलकेच काढून घेतल त्यावर लिहिलेला. रविवार होता का तो? कुणास ठाऊक. पण दिवसाची सुरुवात त्यामुळे छान झाली.

खूप इच्छा असूनही मुलाची पुलंशी ओळख करून देण कठीण जातय. भाषेचा मोठ्ठा अडसर आहेच. त्यांच एक इंग्रजी पत्र मला नेट वर सापडलं. त्यांनी त्यांच्या वरळीला रहाणाऱ्या भाचीला बम्बय्या इंग्रजीत लिहिलेलं. त्यातील पुलंचे मास्तर आणि आजोबा ह्यांच्या मधिल संभाषणाच वर्णन आणि गणिताच्या पेपरातल्या ९ टक्के मार्कांचे पुलं नि  ९० टक्के कसे केले ते वर्णन वाचून आमची दोघांची हसून हसून मुरकुंडी वळली. पण शाळेचा अभ्यास, खेळाचं कोचिंग, संगीताची शिकवणी ह्यातच इतका वेळ जातो कि दुर्दैवाने मराठी बोलण्याकडे दुर्लक्ष होतय मग वाचायची गोष्टच सोडा.  त्याला आपल्या जेवणाची गोडी लावायला मला काही त्रास पडला नाही. चक दे, थ्री इडियट्स, झिन्दगी न मिलेगी दोबारा सारखे सिनेमा सब टायटल्स शिवाय पुन्हा पुन्हा बघताना त्याला भाषा आड येत नाही. मग पुलंच साहित्य जर  आजच्या मुलांच्या पचनी पडेल अशा तऱ्हेनं सादर केलं तर मला नाही वाटत ते त्यांच्या पर्यंत पोहोचवायला काही त्रास पडेल. नाहीतर भारतातल्या मुलांची एक आख्खी पिढी बिच्चारी डान्स इंडिया डान्स आणि ड्रामे बाझ इंडिया बघत मोठी झाली तर ते त्यांच्या आणि देशाच्या दृष्टीनं किती दुर्दैवाच होईल!

No comments:

Post a Comment