Wednesday, April 29, 2015

आम्ही नाही तर कोण?

आम्ही नाही तर कोण?


आम्ही नाही तर कोण?
तिची काळजी घेणार
आम्ही नाही तर कोण?
तिच्या वतीनं बोलणार
आम्ही नाही तर कोण?
तिच्या नेत्यांना समजावणार
फोडा, तोडा, झोडा. गाडा
हे शब्द आता वापरू नका
एकविसाव्या शतकात
आमच्या सुसंस्कृत शहरात
आमच्या मुलांनी तसली भाषा ऐकावी
असं आम्हाला वाटत नाही 

                                                                                  
सारखे भडकता कशाला
सारखे इशारे का देता
शहर तुमच आहे म्हणता
मग आपल्याच गावात तुम्ही
सारखं रडगाणं का गाता?
चाळीस वर्षांपूर्वी तुम्ही भडकलेले होता
चाळीस वर्षांनंतरही भडकलेलेच आहात?

                                          

कोणी आमचं हे घेतलं
कोणी आमचं ते घेतलं
कोणी आमच्या जागा घेतल्या 
कोणी आमच्या नोकऱ्या घेतल्या
आम्ही पाट्यांवरची नावं बदलत होतो
तेवढयात कोणीतरी येउन
शहरातली सगळी श्रीमंतीच काबीज केली
सारख्या तक्रारी करायचा
आता कंटाळा नाही आला?

                                               

गर्जना पुष्कळ वर्ष केल्या
डरकाळ्या हि बऱ्याच मारल्या
त्यांनी काही फरक पडला नसेल
तर आता कार्यप्रणाली बदला
नेतृत्व करायचं असेल तर
वक्तृत्व सुधारा


कोणाला गाडू नका झोडू नका
काही फोडू नका तोडू नका 
सोन्यासारखं गाव
धुळीला मिळवू नका
उमदया तरुणाईवर 
नवे नेते शोधायची 
पाळी आणू नका 
आम्ही नाही तर कोण?
तुम्हांला हे सांगणार. 


आजवर तुमचं सगळं ऐकलं  
गर्जना, इशारे, तक्रारींचं जाहिरात तंत्र
चाळीस वर्ष आपलं मानलं 
पण पदरात काय पडलं?
शहरात आलेली नवी श्रीमंती
मराठी माणसांच्यात 
किती उतरली ?
का नाही उतरली?
आम्ही नाही तर कोण?
तुम्हांला हे विचारणार 


चाळीस वर्षात
जग बदललं 
शहर बदललं 
मराठी माणसांच्या
इच्छा आकांक्षाही 
बदलल्या असणार
तुम्हीही आपलं तंत्र बदला 
आम्ही नाहीतर कोण?
तुम्हांला हे समजावणार. 
No comments:

Post a Comment