योगायोगाने मागे मी दोन पुस्तकं साधारण एकाच वेळी वाचली. पुस्तकांचे विषय तसे अगदी वेगवेगळे होते. तरीही त्यांच्यात काही बाबतीत साम्य आहे असं मला वाटलं.
त्यातलं एक पुस्तक होतं, My Journey हे डॉना कॅरनच आत्मकथन आणि दुसरं म्हणजे ग्लोरिया स्टायनमच My Life on the Road.
पुस्तकांत पहिली सारखी गोष्ट म्हणजे दोघीही स्त्रिया न्यूयॉर्कच्या आहेत. डॉना कॅरन मूळच्या न्यूयॉर्कच्या. त्यांचा जन्म, बालपण क्वीन्स आणि लॉंग आयलंड मधलं आणि फॅशन डिझाईनर झाल्या नंतरच सगळं आयुष्य आणि काम न्यूयॉर्क सिटी मध्ये. ग्लोरिया स्टायनम मूळच्या न्यूयॉर्कच्या नसल्या तरी गेली कित्येक वर्ष त्या इथे रहातात.
दुसरं म्हणजे दोन्ही स्त्रिया आपापल्या क्षेत्रात उच्चतम पदावर पोहोचल्या. ग्लोरिया स्टायनम यांनी केवळ अमेरिकेतल्याच नाही तर जगभरच्या स्त्रीयांच्या जागृतीचं - महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचं आणि ते हक्क मिळवायला मदत करण्याचं काम केलं आणि अजूनही करतायत.
तर सुंदर दिसणं हा हि स्त्री चा एक मूलभूत हक्क आहे या प्रेरणेतून कि काय बायकांच्या नैसर्गिक शरीरयष्टीला उठाव मिळेल असे कपडे डिझाईन करत डॉना कॅरन यशस्वी फॅशन डिझाईनर झाल्या.
दोघीहि स्त्रीया अतिशय भाग्यवान. त्यांना अगदी तरुण वयात आपला मार्ग गवसला आणि त्या मार्गावर आयुष्यभर प्रवास करण्याचं सुखही लाभलं. त्या भाग्यवान म्हणून त्यांना हे सुख लाभलं का त्यांनी आपलं भाग्य स्वतः घडवलं म्हणून?
माय जर्नी मध्ये डॉना कॅरन म्हणतात,
Later that night, Richard said, "Donna, today was the perfect metaphor for how you live your life. You gun it without knowing where the fxxx you're going and hope for the best."
He's right. Nothing turns me on like a leap of faith. When I get an idea into my head, I go for it. I put menswear on a runway without a business to support it. I tried crazy designs that were successful and many that flopped, including my now -iconic cold shoulder. If I'd stopped and thought about half the things I wanted to do, they never would have happened.
तिसरी आणि मला खूप महत्वाची वाटली ती सामाईक गोष्ट म्हणजे दोघीही आपल्या पुस्तकात म्हणतात कि त्यांनी आयुष्यात जे काम केलं त्याचं मूळ त्यांच्या वडिलांनी जे केलं त्यात होतं.
डॉना कॅरनचे वडील त्या तीन वर्षांच्या असताना वारले. त्यांचा पुरुषांचे सूट शिवायचा व्यवसाय होता. कॅरन लिहितात,
I became a tailor, just like my father. He was an amazing one. I like to think he passed that baton, that talent, that gene on to me, because that's where I feel the most connected to him.
तर ग्लोरिया स्टायनम ह्यांचे वडील भटक्या आणि विमुक्त समजाचे सभासद होते असं म्हणता येईल. ते कधीच एका गावात फार काळ राहू शकेल नाहीत. उन्हाळ्यात काही महिने ते कुटुंबासह ग्रामिण मिशिगन मधल्या त्यांच्या लहानशा घरात रहायचे आणि उन्हाळा संपायला आला कि विचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन - ट्रेलर मध्ये घालून - पत्नी आणि दोन मुलींसह गावोगाव फिरायचे. दहा वर्षांच्या होईपर्यंत स्टायनम नियमित शाळेतही गेल्या नाहीत आणि गेल्या चाळीस वर्षात वीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी प्रवासात व्यतित केलाय.
माय लाईफ ऑन द रोड मध्ये त्यांनी लिहिलंय:
...Until that moment, I would have sworn that I had rebelled against my father's way of life. I created a home that I love and can retreat to, though he wanted no home at all. I've never borrowed a penny, though he was constantly in debt. I take planes and trains to group adventures, though he would spend a week driving cross- country alone rather than board a plane. Yet in the way that we rebel, only to find ourselves in the midst of the familiar, I realized there was a reason why the road felt like home. It had been exactly that for the evocative first decade of my life. I was my father's daughter...
***
हि दोन पुस्तकं वाचल्यापासून मलाही आशा वाटायला लागली कि माझ्या वडिलांचे काही गुण - त्यांची कामातली सचोटी, मेहनती स्वभाव आणि सरळमार्गी वृत्ती - काही प्रमाणात तरी माझ्यात उतरले असतील.
माझ्या वडिलांचं सगळं आयुष्य म्हणजे त्यांचं काम होतं. त्यामुळे माझ्यावर त्यांचा प्रभाव पडला असेल तर तो त्यांच्या कामातूनच.
सिडकोनी जेंव्हा नवी मुंबई बांधायला सुरवात केली तेंव्हा माझे वडील सिडकोचे चीफ इंजिनियर होते. सहाजिकच त्यांचा कॉन्ट्रॅक्टर लोकांशी संबंध यायचा.
एकदा आज्जीच्या ओळखीचे एक कॉन्ट्रॅक्टर घरी आले आणि तीला म्हणाले, "अहो, मी कामासाठी तुमच्या मुलाला भेटायला गेलो तर त्यांनी माझं काही ऐकून न घेता नाझी फाईल माझ्या अंगावर भिरकावली आणि मला ऑफिसच्या बाहेर काढलं."
यावर आज्जी काय बोलणार. तिनं सारवासारव केली, "त्याच्यावर कामाचा ताण असेल म्हणून झालं असेलं तसं."
तुम्ही अवैध मार्गानी काम मागायला गेलात म्हणून माझ्या मुलाचं रक्त खवळून उठलं असेल - हे ती मनातून जाणत असली तरी ते पाहुण्यांना कसं सांगणार.
शहरांमध्ये, शहरांच्या रचनेत, बांधणीत - टाऊन प्लॅनिंग - मध्ये मला रस वाटतो तो वडिलांच्या नवी मुंबईतील कामामुळे असेल कदाचित. मध्य पूर्वेतील देश, तिथे घडणाऱ्या घडामोडीं बद्दल मला जिव्हाळा वाटतो तो त्यांनी त्या भागात काही वर्ष इन्फ्रास्ट्रक्चर बांधणीचं काम केलं म्हणून असेल. आणि सचोटीनं न वागणं तर मला जमतच नाही. ते हि बाळकडू त्यांच्या कडूनच आलं असावं.
वडिलांनी माझ्यावर कधी हात उगारला नाही. लहानपणी त्यांनी कधी मला मारल्याचं आठवत नाही. तरीही आम्हांला त्यांचा धाक वाटायचा. रागावले तर नाराजी दाखवायला ते फक्त डोळे मोठे करायचे आणि तेवढं पुरेसं असायचं.
खूप वर्षांपूर्वी नात्यातल्या एका साखरपुड्याला कि हळदीला मी नवऱ्या मुलीच्या आईशी बोलत होते. चंदेरी साडीचा पदर डोक्यावरुन सारखा करत बाई मला आपल्या चिरंजीवांचं कौतुक (?) सांगत होत्या.
"पूण्याहून सकाळी निघालो. भाड्याची गाडी केली. राजानं सुरवातीलाच ड्रायव्हरला सांगितलं, " गाडी मी चालवणार. तू शेजारी बसायचं."
ड्रायव्हर नको म्हणत होता पण राजानं अजिबात ऐकलं नाही.
हायवेवर त्यानं गाडीचा स्पीड एकदम वाढवला. ८० -१०० पर्यंत नेला.
ड्रायव्हर घाबरला. गयावया करु लागला. नका साहेब, इतक्या जोरात गाडी चालवू नका. अपघात झाला तर माझी नोकरी जाईल. साहेब, वेग कमी करा.
शेवटी राजानं गाडी थांबवली. ड्रायव्हरला म्हणाला, "ह्यापुढे तोंडातून एक शब्द जरी काढलास तर मी तिथल्या तिथे तुला गाडीतून खाली उतरवून टाकीन. अजिबात आवाज करायचा नाही. तोंड एकदम बंद."
त्यानंतर मग ड्रायव्हर गप्प बसला. राजानं इतकं फास्ट आणलं आम्हाला. "
मी अवाक होऊन ऐकत होते. तसलं आचरट बोलणं त्यापूर्वी मी कधी ऐकलं नव्हतं. त्या बाईचा मुलगा ड्रायव्हरशी उद्दामपणे वागला आणि ते ती मला कौतुकानं सांगत होती. एकदा वाटलं तिला सांगावं, आम्ही जर तिच्या मुलासारखे वागलो असतो तर आमच्या आईवडिलांनी काय केलं असतं ते. पण उगीच लहान तोंडी मोठा घास नको म्हणून गप्प बसले.
आता कळतंय, गप्प बसलं कि चुकीच्या लोकांना वाव मिळतो आणि त्याचे दुष्परिणाम मग सगळ्यांना भोगावे लागतात.
आमच्या घरातले संस्कार ह्यापेक्षा किती वेगळे होते!
एकतर आम्ही कोणाशीही - लहान असो कि मोठा, गरीब असो कि श्रीमंत - असे मुर्खासारखे उद्धट कधी वागलोच नसतो. आमच्या घरातली शिकवणच तशी होती. पण समजा कधी बालिशपणामुळे चुकून असं काही आमच्या कडून घडलं असतं तर आमच्या वडिलांनी तिथल्या तिथे त्या ड्रायव्हरच्या समोर आमच्यावर डोळे वटारले असते.
हात तर त्यांनी आमच्यावर कधी उगारला नाही. ते आमच्यावर कधी ओरडलेही नाहीत. पण कष्ट करून पोट भरणाऱ्या माणसाशी - मग तो कितीही गरीब, साधा असो - आम्ही उद्धट, उर्मटपणे वागलो असतो तर ते त्यांनी कधीच सहन केलं नसतं. त्याची गाडी आम्हाला चालवू देण्याचा तर प्रश्नच उदभवला नसता.
***
माय जर्नी मध्ये फॅशन व्यवसायाबद्दल बरीच पडद्या मागची माहिती आहे.
डॉना कॅरन ह्यांचं अख्ख आयुष्य न्यूयॉर्क परिसरात गेलं असल्यामुळे पुस्तकात उल्लेख असलेल्या सगळ्या जागा - क्यू गार्डन -क्वीन्स, लॉंग आयलंड पासून ते मॅनहॅटन मधील घर, वर्क शॉप, शो रूम - ओळखीच्या वाटतात. काही ठिकाणी त्यांच्या खाजगी आयुष्याचं वर्णन माझ्या भारतीय - म्हणजे मध्यम वर्गीय महाराष्ट्रीय मनाला थिल्लर वाटलं. पण ते सोडलं तर पुस्तकात जाणवते ती त्यांची सकारात्मक वृत्ती आणि त्यांची ऊर्जा- एनर्जी.
आयुष्यातील कठीण प्रसंगांकडेही त्या नकारात्मक दृष्टीने बघत नाहीत. मागे वळून बघतांना त्यांच्या सुरात कुठल्याच प्रकारचं नैराश्य किंवा संदेह नाही. आणि त्यांनी त्यांच्या कामाबद्दल - त्यांची डिझाईनींगची प्रॉसेस, फॅशन शोजच्या तयारी साठी रात्रं- दिवस करावी लागणारी मेहनत आणि फॅशनच्या दुनियेत त्यांनी निर्माण केलेलं स्वतःच स्थान ह्याबद्दल जे लिहिलंय त्यात अर्थातच कसलाच थिल्लरपणा नाही.
माय लाईफ ऑन द रोड मध्ये Talking Circles नावाच्या दुसऱ्या प्रकरणात स्टायनम यांनी भारतातील दोन वर्षांच्या वास्तव्याचा त्यांच्या पुढील आयुष्यातील कामावर कसा परिणाम झाला त्याच वर्णन केलंय.
कॉलेजच शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच त्या भारतात गेल्या. तिथे काही दिवस त्या विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सहभागी झाल्या. जमिनदारांनी आपल्या जमिनीचा काही हिस्सा गरिब, जमिन नसलेल्या लोंकांना द्यावा ह्यासाठी विनोबा आणि त्यांचे अनुयायी खेडोपाड्यातून पायी फिरून प्रचार करीत असत.
भूदान चळवळीतील कार्यकर्त्यांबरोबर गावोगाव फिरताना आलेल्या अनुभवाविषयी स्टायनम लिहितात:
It was the first time I witnessed the ancient and modern magic of groups in which anyone may speak in turn, everyone must listen, and consensus is more important than time. I had no idea that such talking circles had been a common form of governance for most of human history...
I certainly didn't guess that, a decade later, I would see consciousness-raising groups, women's talking circle, giving birth to the feminist movement. All I knew was that some deep part of me was being nourished and transformed right along with the villagers.
I could see that, because the Gandhians listened, they were listened to. Because they depended on generosity, they created generosity. Because they walked a nonviolent path, they made one seem possible. This was the practical organizing wisdom they taught me:
If you want people to listen to you, you have to listen to them.
If you hope people will change how they live, you have to know how they live.
If you want people to see you, you have to sit down with them eye-to -eye.
I certainly didn't know that a decade or so after I returned home, on- the- road organizing would take up most of my life.
तसं आपल्याला अधून मधून कोणतरी भेटतं - मग ती शाळेतल्या एखादया मुलाची आईहि असु शकते. न्यूयॉर्कमध्ये मला दोघीजणी भेटल्यात ज्यांनी सांगितलं कि हायस्कुल संपल्यावर त्यांनी काही दिवस कलकत्त्यात मदर टिरीसांच्या आश्रमात काम केलं होतं. (तो काळ भारतासाठी फारसा अभिमानास्पद नव्हता, म्हणून त्यांनी ते कौतुकानी सांगितलं असलं तरी ते ऐकताना मला भयंकर लाज वाटली. दोन्ही वेळा मी ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यांचे तिथले अनुभव जाणून घेतले नाहीत. ती चूक झाली असं आता वाटतं) .
पण स्टीव्ह जॉब्ज आणि ग्लोरिया स्टायनम ह्या दोघांनीही आपल्या कारकिर्दीची सुरवात करण्या आधी भारतात भ्रमंती केली हे वाचल्यावर वाटतं -- त्यांच्या अमेरिकन व्यक्तिमत्वावर तरुण वयात भारतीय विचारांचा प्रभाव पडल्यानंतर अशी काय रासायनिक प्रक्रिया त्यांच्यात घडली - कि ज्याच्यामुळे त्यांच्या हातून पुढील आयुष्यात इतकं भरघोस, प्रभावशाली काम घडलं ज्याचा संपूर्ण जगाला फायदा झाला.
***
माझ्या वडिलांच्या स्वभावातला आणखी एक विशेष मला आत्ता जाणवतो तो म्हणजे त्यांचा sense of responsibility. कुटुंबातील कर्ता, मोठा मुलगा असल्यामुळे कि काय त्यांच्यात जबाबदारीची जाणीव खूप होती - मग ती त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकां विषयी असो, त्यांच्या मित्रांच्याबाबतीत किंवा घरातल्यां विषयी.
वडिलांच्या त्या गुणानं माझ्यात बहुतेक जरा वेगळं रूप धारण केलंय. काही गोष्टी उगीचच, कारण नसताना किंवा कुठल्या ना कुठल्या तरी कारणांनी - माझी जबाबदारी आहेत असं मला वाटतं. उदाहरणार्थ: मुंबईला जगातील एक सुंदर शहर बनविण्यासाठी सरकारला उत्तेजन देण; मुंबई आणि न्यूयॉर्क मधल्या व्हर्च्युअल पूलाच्या बांधकामात खारीचा वाटा उचलणं; मुंबईत रहाणाऱ्या तमाम रहिवाशांना मराठी बोलायला शिकवणं वगैरे.
ह्या तीन मूळ जबाबदाऱ्यात आता चवथ्या जबादारीची भर पडलीय.
अलीकडेच यू ट्यूबवर बघितलेल्या एका मुलाखतीत रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नरना जेंव्हा भारतातील भ्रष्टाचाराविषयी प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा आपल्या उत्तरात ते पुन्हा पुन्हा म्हणातात कि आपण काही स्कँडनेव्हिया नाही. आपल्या परिस्थिती नुसार भ्रष्टाचार निर्मूलन आपल्याला करावं लागेल.
त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल कि स्कँडनेव्हियन देशांइतकया स्वच्छ, साफ सुथऱ्या कारभाराची भारतात अपेक्षा करणं बरोबर नाही.
परंतु ती मुलाखत ऐकल्यापासून मला उगीचच वाटायला लागलंय कि संपूर्ण भारताचा नाही तरी निदान मुंबईसह महाराष्ट्राचा तरी स्कँडेनेव्हीया करणं हि आता माझी जबाबदारी आहे .
***
माझ्या पिढीनं दोन राष्ट्रव्यापी सरकारी प्रचार यशस्वी झालेले पहिले आणि एक प्रकारे ते यशस्वी करायला हातभारही लावला.
एक म्हणजे हम दो हमारे दो आणि दुसरा म्हणजे एक चूल एक मूल - ज्याची कल्पना बहुतेक चीन वरून आयात करण्यात आली. दोन्ही ऐच्छिक होते. त्यांनी लोकसंख्या वाढीला कितपत आळा बसला माहित नाही. पण माझ्या आईवडिलां सकट त्यांच्या पिढीतील कित्येक जोडप्यांना - मग ती पूण्या -मुंबई सारख्या शहरात रहाणारी असोत किंवा छोट्या गावात - दोनच मुलं आहेत असं दिसतं आणि माझ्या पिढीत कितीतरी जोडप्यांना एकच मूल आहे. म्हणजे काही प्रमाणात तरी हे दोन्ही प्रचार देशभर नक्कीच यशस्वी झाले.
आशा हि कि एखादा भ्रष्टाचार विरोधी प्रचारही असाच यशस्वी होईल.
आणखी एक अविस्मरणिय सरकारी प्रचार आठवतो तो राष्ट्रीय एकात्मतेचा - सुरात सूर मिळवण्याचा.
ती सकाळ मला आजही चांगली आठवते. त्यादिवशी सुट्टी होती ते आठवत होतं पण नक्की कसली सुट्टी होती ती माहिती विकिपीडिया मध्ये सापडली.
१५ ऑगस्ट १९८८ ला पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरचं भाषण संपल्यानंतर दूरदर्शननी हे गाणं पहिल्यांदा दाखवलं. सुरवात भीमसेन बुवांनी आपल्या धीरगंभीर आवाजात केली. मग ताजमहालच्या पार्श्वभूमीवर श्वेतवस्त्र परिधान केलेली शबाना आझमी आली. मग मोठ्ठ कुंकू लावलेली गुर्जर कन्या मल्लिका साराभाई. तिच्या नंतर मराठमोळ्या कोळणींच्या पुढे चालणारी बिन बाह्यांचं पोलकं घातलेली तनुजा मराठीत म्हणाली:
तुमच्या माझ्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
(बिन बाह्यांच्या पोलक्याचा मुद्दाम उल्लेख करायचं कारण कि एकेकाळी मराठमोळ्या स्त्रियांच्या मध्ये स्लिव्हलेस ब्लाऊज घालणं आणि लिपस्टिक - ओठांना लाली लावणं म्हणजे फारच फ्याशनेबल असल्याचं चिन्ह - अर्थात फक्त दिल्लीवाल्या स्त्रियांची मक्तेदारी मानलं जायचं. नूतन आणि तनुजा - दोघी बहिणी नेहमीच खूप आधुनिक पोशाख करायच्या पण त्या मराठी असल्या तरी सिनेमातल्या. महाराष्ट्रीय मंडळींना सिनेमातल्या लोकांचं फारसं कौतुक नसतं. कोणी नटनट्या राज्यातुन कधी निवडणूक लढवत नाहीत त्याच हे एक कारण असेल बहुतेक... हे थोडं विषयांतर झालं).
मिले सुर मेरा तुम्हारा जेंव्हा पहिल्यांदा रिलीज झालं तेंव्हा टीव्ही वर आजच्या सारखा आवाजाचा गदारोळ नव्हता. एकच दृश्य दहा वेळा दणादण स्क्रीन वर आपटणाऱ्या मालिका नव्हत्या. त्या काळाला साजेश्या शांत पद्धतीनं तेरा प्रमुख भारतीय भाषांमध्ये गायलेल्या एकाच अर्थाच्या दोन ओळींच्या ह्या गाण्यानं तेंव्हा मनात जे घर केलं ते आजही कायम आहे.
yesheeandmommy@gmail.com |