Wednesday, December 2, 2020

Oprah's Mantra 1

























    


Web version मध्ये व्हिडिओ दिसतात. 



Monday, November 30, 2020

प्रश्न तुमचे उत्तरं आमची (२)



प्रश्न तुमचे उत्तरं आमची
 या सदरातील प्रश्न जास्त करून महिलांनी विचारलेले असतात पण यावेळी पुरुषांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या जास्त होती.  

पहिला प्रश्न bullying विषयी होता. बुल्लीईंग हि जगभर एक गंभीर समस्या आहे. बुल्लीईंगच्या त्रासाला कंटाळून मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. कधीकधी लहानपणी मुलांना शाळेतली मुलं bully करतात- हे त्याचं प्रचलित रूप सर्वांनां माहित आहे. सायबर बुल्लीईंग विषयीही आता जनजागृती निर्माण होत आहे. पण घरात बुल्लीईंग होऊ शकतं याविषयी जास्त बोललं जात नाही. प नी ते बोलण्याचं घरिष्टय दाखवलं.  

त्याचा प्रश्न होता: मी चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. वयातील अंतरामुळे माझी मोठी भावंडं मला नेहमी bully करतात. मी लहान असल्यापासुन सुरु झालेलं बुल्लीईंग आता मी वयानी मोठा झालो असलो तरी थांबलेलं नाही. त्याचं स्वरूप बदललं आहे -एवढच. माझ्या वडिलांना या बुल्लीईंगची कल्पना होती. त्यांनी भावंडांपासुन माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण वडील गेल्यावर बुल्लीईंग जास्तच वाढलंय. मी काय करू?  

सवाल जवाबदार यांचं उत्तर: प, वडीलांची जागा घे आणि स्वतःच संरक्षण करायला शिक. भावंडांकडून होणाऱ्या bullying च मूळ समजुन घेतलस तरच त्यावर कायमचा उपाय शोधू शकशील. तु सर्वात लहान असल्याने लहानपणी मोठ्या भावंडांनी सांगायचं, तु ऐकायचं आणि ते सांगतील तसं वागायचं असं घडलं असण्याची शक्यता आहे. त्याची त्यांना सवय लागली असवी. आजही ते तुझ्याकडुन तीच अपेक्षा ठेवत असतील. पण आता सहाजिकच तुला त्याचा त्रास होतो आहे. थोडा विचार केलास तर लक्षात येईल कि हे बुल्लीईंग थांबवणं वाटतं तितकं कठीण नाही. नियमित ध्यान करत जा. भावंडांकडुन होणारं बुल्लीईंग कायमचं कसं थांबवायचं ह्याचा मार्ग तुला ध्यानात सापडेल. 

न चा प्रश्न : काही वर्षांपूर्वी माझ्या आईचं माझ्या बहिणीच्या घरी निधन झालं. त्यावेळी मी पत्नीसह सहलीला गेलो होतो. मी आईच्या अंत्यविधींना हजर राहू शकलो नाही. ती सल मला आजही बोचते. ती सल कमी करण्यासाठी मी माझ्या पत्नीच्या आईला माझी आई मानून तिची काळजी करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या सासूचा मुलगा असं म्हणतो की मी त्याच्या घरात लुडबुड करतो. तुम्हांला काय वाटतं? 

सवाल जवाबदार: न, सासुची काळजी केल्याने तुझी आई विषयीची खंत कमी होणार नाही. ती खंत कमी करण्यासाठी तु तुझ्या आई बरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठव. त्या आठवणींना महत्व दे. सासु मध्ये आईला शोधण्याच्या फ़ंदात पडू नकोस. ती तिथे सापडणार नाही  - विशेष करून सासुला स्वतःचा मुलगा असेल तर. पूर्वी जावयाने आपला मान ठेऊन रहाणे हि एक संकल्पना अस्तित्वात होती. सीमारेषांचं उल्लंघन झालं की संघर्ष अटळ असतो. तु पत्रात म्हंटलं आहेस कि तु सासुची काळजी करतोस, काळजी घेतोस असं म्हंटलेलं नाही. त्याचा अर्थ मला नीटसा समजला नाही. पण सासुचा मुलगा आपल्या आईची काळजी घेण्यास सक्षम असेल तर तू तुझ्या सीमारेषा पाळून रहा. 

श चा प्रश्न: काही वर्षांपूर्वी माझ्या वडीलांचं आणि त्यांच्या आईचं  - माझ्या आज्जीचं निधन झालं. माझी आई त्यांच्या शेवटच्या दिवसात त्या दोघांच्याही जवळ नव्हती. आता मी माझ्या आईला स्वखुशीनं स्वतःच्या वयस्कर आईची सोबत करताना बघतो तेंव्हा मला माझ्या वडिलांबद्दल खूप वाईट वाटतं आणि आईचा रागही येतो. मी आईशी या विषयी बोलू का ? 

सवाल जवाबदार: श, तुझ्या भावना मी समजु शकतो. पण तुझ्या वडिलांपासुन आणि त्यांच्या कुटुंबियां पासुन लांब रहाण्याचा निर्णय तुझ्या आईचा होता. त्या बाबतीत तू आता काही करू शकत नाहीस. नवराबायको मध्ये आपसात बेबनाव असु शकतो. आई नाही तरी तु शेवटच्या काळात वडिलांचा सांभाळ केला असशील अशी मी आशा करतो. आईबद्दल राग वाटत असला तरी वडिलांच्या पश्चात आईच्या जोडीने तुही कुटुंब प्रमुख आहेस तेंव्हा तुझी जबाबदारी टाळू नकोस. आईला आधार दे.  

म चा प्रश्न: माझी वयस्कर आई गावी असते. तिला काही दिवसांसाठी माझ्या घरी रहायला आणावं अशी माझी फार ईच्छा आहे. समस्या हि आहे कि माझी नोकरी घरापासुन काही तासांच्या अंतरावर आहे. मी आठवडाभर नोकरीच्या गावी रहातो आणि शनिवार -रविवार घरी येतो. मी नोकरीच्या गावी असताना माझ्या आईला घरात ठेऊन घ्यायला माझ्या पत्नीने नकार दिला आहे. ती म्हणते की मी आईला माझ्याबरोबर नोकरीच्या जागी घेऊन जावं. परंतु मी कामावर गेल्यावर आई एकटी कशी राहील याची मला काळजी वाटते. यावर काही उपाय सुचवाल का?   

सवाल जवाबदार: म, शक्य असेल तर नोकरीच्या गावी कामाला बाई ठेव जी तु कामावर गेल्यावर तुझ्या आईच्या सोबत राहू शकेल. तुझ्या पत्नीला जर तुझी आई तुझ्या गैरहजेरीत घरात नको असेल तर तोच एक मार्ग आहे . 

हि प्रश्नोत्तरे वाचल्यावर लक्षात येतं कि घरगुती प्रश्न फक्त महिलांनाच असतात असं नाही तर पुरुषांनाही असु शकतात. सामंजस्यपूर्ण उत्तर मिळेल असा विश्वास वाटला तर ते मनमोकळेपणानी विचारलेही जातात. 





Saturday, October 17, 2020

You can fool some of the people all the time


                                            
                            You can fool all the people some of the time 
                                      and some of the people all the time, 
                           but you cannot fool all the people all the time.


वरील उदगार अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्रॅहम लिंकन यांचे आहेत...  (किंवा नाहीत)...  असं म्हणतात. पण उदगार कोणाचेही असले तरी त्यांचा अर्थ बदलत नाही : म्हणजे कि तुम्ही सरसकट सर्व  लोकांना कायम मूर्ख बनवू शकत नाही पण सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता आणि काही लोकांना कायम मूर्खावस्थेत ( मूर्ख + अवस्था) ठेवू शकता. 

सुशांत सिंगच्या जाण्याने जे वादळ उठलं ते पुढे कित्येक दिवस घोंघावत राहिलं. त्याच्या जाण्याबद्दल अनेक लोकांना जबाबदार धरण्यात आलं. त्यांच्यावर आरोप झाले. सुरवातीला दोन नावं ठळक पुढे आली. त्यातलं एक नाव करण जोहरचं होतं. सुशांत सिंगच्या जाण्याशी त्याचा संबंध असो किंवा नसो त्याची स्क्रुटिनी झाली हे सहाजिक आहे कारण तो सगळ्या माध्यमांमध्ये आहे. तो सिनेमात आहे. तो टीव्ही वर असतो. तो डिजिटल माध्यमां मध्येही दिसतो. 

जोहर सारखे बॉलिवूड मध्ये फॉर्म्युला फिल्म बनवणारे लोक हे dream merchants  - सपनोंके सौदागर आहेत. सर्वसामान्य लोकांना नाचगाण्यांनी भरलेल्या काल्पनिक आयुष्याची झगमगीत स्वप्न दाखवायची आणि आपण श्रीमंत व्हायचं हा त्यांचा व्यवसाय आहे. कदाचित हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सूत्र त्याच्या इशाऱ्यावर हलत असतील म्हणून त्याचं नाव पुढे आलं असेल. 

दुसऱ्या एका नावाची सुरवातीच्या दिवसात चर्चा झाली ते सलमान खानचं होतं. त्याचं कारण त्यानं आजवर केलेली कुकर्म हे असेल. मागे वन्य प्राण्यांची शिकार केली म्हणून त्याला कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. नंतर त्याच्या गाडीनी फुटपाथवर झोपलेल्या लोकांना उडवलं म्हणून त्याला कोर्टात जावं लागलं होतं. एवढं करूनही त्याची प्रतिमा कायम "हिरो"चीच राहीली आहे - त्याच्या स्वतःच्या नजरेत आणि त्याच्या चाहत्यांच्या नजरेतही. 

त्याचा नविन सिनेमा मुंबईत लागतो तेंव्हा शहरातल्या एकाही चित्रपटगृहात दुसरा कुठलाही सिनेमा काही दिवस दाखवला जात नाही. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात दर्शक त्याविरुद्ध ब्र ही काढत नाहीत. कोणी असं म्हणत नाही कि आम्हांला दुसरे सिनेमा बघण्याचं ऑप्शन मिळायला हवं. (ते हि समजण्यासारखं आहे: जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, मंदिर विरुद्ध मशिद, असे अनेक ज्वलंत मुद्दे पेटून उठण्यासाठी हाताशी असताना सिनेमाचे ऑप्शन न मिळणे हा मुद्दा फारच नगण्य ठरतो.) 

एक हिंदी वाक्प्रचार सलमान खानला फिट बसतो -  दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. किंवा वरील इंग्रजी वाक्य  - you can fool some of the people all the time. तुम्ही काही लोकांना कायम मुर्ख बनवु शकता - ज्याचं तंत्र बहुतेक त्याला आता चांगलं अवगत झालंय. बॉलीवूडच्या दुटप्पीपणाचं सलमान हे एक उदाहरण आहे. 

नव्वद कि दोन हजारच्या पहिल्या दशकात शायनी अहुजा नावाचा एक नट होता. काही सिनेमात त्यानं चांगलं काम केलं होतं. एक दिवस त्याच्या कामवालीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्याचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं. आज त्याचं नावही बॉलिवूडच्या आत किंवा बाहेर कोणाला आठवत नाही. पण गंभीर आरोप होऊनही सलमान खान आणि संजय दत्त सारख्या नटांच हिंदी सिनेसृष्टीतलं आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनातलं स्थान अढळ आहे. त्या स्थानाला कोणी धक्का लावू शकलेल नाही. हि काय जादू आहे? भरपूर पैसे खर्च करून डॅमेज कंट्रोल करणं- स्वतःविषयी चांगल्या बातम्या छापून आणणं त्यांना शक्य आहे म्हणून? 

काही वर्षांपूर्वी सुलतान नावाचा सिनेमा आला होता. तो बघताना असं वाटलं कि जसं वय वाढतंय तस सलमान खानच स्वतः वरचं प्रेमही वाढतंय. सुलतान मध्ये तो सुलतान नावाच्या पैलवानाच्या भूमिकेत दिसतो. पैलवान सुलतान जेंव्हा कुस्तीची लढत खेळण्यासाठी स्टेडियम मध्ये शिरतो  -  कमावलेल शरीर, अंगात शर्ट नाही, चेहऱ्यावर रुबाब  - तेंव्हा अख्ख स्टेडियम "सुलतान.. सुलतान" असा त्याच्या नावाचा जयघोष करत असतं. ते दृश्य बघताना थेटरातुन उठून जावंसं वाटत होत. असं वाटलं कि पडद्यावरच्या सुलतानच्या रूपात सलमान खान आपलं स्वप्न पूर्ण करून घेतोय - आपल्या कमावलेल्या दणकट शरीराच उघडं प्रदर्शन मांडत स्टेडियम मध्ये शिरण्याचं - अख्ख स्टेडियम "सलमान सलमान" असा त्याच्या नावाचा ऊदोऊदो करीत असताना. सलमान खान सारखे "हिरो" आणि कपिल शर्मा सारखे शो हि हिंदी सिनेसृष्टीनी जन्माला घातलेली आणि पोसलेली बाळं आहेत. त्यांची लोकप्रियता हा खरतर काळजीचा विषय व्हायला हवा. 

सलमाननं त्याच्या चॅरिटीला - being human असं नाव दिलंय. हे नाव देऊन त्यानं जणू जगजाहीर करून टाकलाय कि  I am just being human . माणसाच्या हातुन चुका होत असतात. "ह्युमन" असल्यामुळे चुका करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावत रहाणार. कित्येक लोक त्याच्या चॅरिटीचे कपडे विकत घेऊन ते नाव आपल्या छातीवर, पाठीवर मिरवतात. 

सुरवातीला या दोन नावांची चर्चा झाली. मग चर्चेनं आपली दिशा बदलली आणि ती वेगळ्याच मार्गानी जाऊ लागली. पण ज्या मार्गाने जावी असं वाटत होतं त्या मार्गानी गेली नाही. त्या सुमारास चित्रपट सृष्टीशी संबंधित सुशांत सिंग खेरीज आणखी दोन जण गेले. त्यामागे त्यांना आलेलं नैराश्य कारणीभूत होतं असं म्हंटलं गेलं. पण नैराश्याविषयी किंवा त्या वरील उपचारां विषयी फारशी चर्चा झाली नाही.  

एकदा एका मॉम्ज नाईट आउटला  - एका वर्गातल्या मुलांच्या आया एकत्र जेवायला बाहेर जातात तसं - एक आई आपल्या धूम्रपान सोडण्याच्या प्रयत्नांविषयी सांगत होती. धूम्रपान सोडणं सोप्प जावं म्हणून ती डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार औषध घेत होती. त्या औषधाचं नाव ऐकल्यावर दुसरी एक आई कळकळीनं तिला काय म्हणाली कि, " ते औषध घेऊ नकोस. ताबडतोब थांबव. माझ्या नवऱ्याला त्या औषधा विषयी बरीच माहिती आहे. त्या औषधानी आत्महत्येचे विचार मनात येतात. युरोप मध्ये तशा केसेस घडल्यावर तिथे त्या औषधावर बंदी घालण्यात आली आहे." 

आधुनिक औषधांच्या अघोरी साईड इफेक्ट्स बद्दल त्या औषधांच्या जाहिरातीं मध्येही सांगितलं जातं. मागे एक पापण्यांचे केस दाट करणाऱ्या औषधाची जाहीरात लागायची. त्यात इशाऱ्या दाखल असं म्हंटल जायचं की हे औषध घेतल्याने अंधत्व येण्याची शक्यता आहे. कॅन्सर, किडनी खराब होणे, डिप्रेशन आणि इतरही अनेक गंभीर साईड इफेक्ट्स कित्येक औषधांच्या जाहिरातीं मध्ये स्पष्ट नमूद केलेले असतात. एकदा औषधांचे दोन - तीन ऑप्शन्स सांगताना डॉकटर एका औषधा विषयी मला म्हणाली होती, " या औषधाच्या उंदरांवरील प्रयोगामध्ये उंदरांना घशाचा कर्करोग झाल्याचं आढळलं आहे."

सत्तरच्या दशकात असा समज होता कि जो गहू अमेरिकन लोक खात नाहीत तो भारतात पाठवला जातो. जी औषधं कडक स्थानिक नियमांमुळे युरोप - अमेरिकेत विकता येत नाहीत ती भारतासारख्या - कुछ भी चलता है टाईप देशात विकली जात आहेत कि काय यावर चर्चा व्हायला हवी होती पण तशी झाली नाही. नैराश्य हा इतका दुर्धर असाध्य आजार कसा काय झाला कि तज्ञांचे उपचार चालू असतानाही रुग्ण त्यातुन बरे होत नाहीत यावरही चर्चा झाली नाही. चर्चेला वेगळंच वळण लागलं. 

त्यात महिलांच्या एकदोन आभूषणांनी आपले हात धुऊन घेतले. पाटली घरंगळत कुठंतरी चाललीय. पैंजण जोरजोरात छुनछुन करतायत. शहरात फार अराजकता माजली आहे असं वाटतय. तरी मी मागेच म्हंटल होतं कि बॉलिवूडला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर हलवायची वेळ आली आहे. बाकी काही नाही तरी निव्वळ शहरातली गर्दी कमी करण्यासाठी. गर्दी कशी कमी करायची ह्याचा विचार इतर राज्यातुन मुंबईत आलेले लोक करू शकणार नाही. तो विचार मराठी माणसांनाच करावा लागेल.

बॉलिवूडला मुंबई बाहेर हलवण्याचं दुसरं कारण म्हणजे तिथली मंडळी फारशी शांतताप्रिय आहेत असं वाटत नाही. सत्तरच्या दशकात तेथील चित्रपट निर्मित माध्ये स्मगलर्सचा पैसा गुंतलेला असायचा असं म्हंटल जातं . ऐंशीच्या दशकात त्यांची जागा गॅंगस्टर्सनी घेतली. नव्वदच्या दशकाच्या शेवटी - नविन सहस्रकाच्या सुरवातीला असं म्हंटलं गेलं कि बॉलिवुड आता सुधारतय. तिथे कॉर्पोरेट कल्चर येऊ लागलंय. तिथली शिस्तबद्धता वाढली आहे. पण कॉर्पोरेट कल्चरची शिस्तबद्धता बॉलिवूडकरांना फारशी झेपलेली दिसत नाही. बाहेरचे गुंड कमी झाले म्हणून कि काय त्यांनी आता आपलीच इन -हाऊस गुंडगिरी सुरु केलेली दिसते. त्याला साजेसं फिल्मी नाव दिलं गेलंय - बॉलिवूड माफिया. हिंदी भाषिक प्रदेशातून बेशिस्त आणि गुंडगिरी वृत्ती शहरात आणि राज्यात पसरत आहे का यावर विचारही मराठी माणसांनाच करावा लागेल. दुसरं कोण करणार?

तिसरं कारण म्हणजे बऱ्याच मराठी लोकांना हिंदी सिनेसृष्टीचं, तिथल्या नटनट्यांचं फारसं कौतुक नसतं. ते मराठी सिरीयल, मराठी गाण्यांचे कार्यक्रम, मराठी बातम्या यातच जास्त रमतात. मग हिंदी सिनेसृष्टी मुंबईत असण्याचं प्रयोजन काय?  - याला अपवाद बहुतेक श्रीदेवीचा असेल. ज्याअर्थी महाराष्ट्र सरकारने तिला स्टेट फ्युनरल देऊ केली त्याअर्थी ती राज्यात प्रचंड लोकप्रिय असावी (?).  

जया बच्चननी संसदेत सादर केलेली आकडेवारी अधिकृत आहे कि नाही माहीत नाही पण ती अचूक आहे असं धरून चाललं तर पाच लाख डायरेक्ट नोकऱ्या आणि पन्नास लाख इन्डायरेकट नोकऱ्या बॉलिवूड मुळे लोकांना मिळतात. आणि त्याच्याशी निगडित जे उत्पन्न शहराला कि राज्याला मिळत असेल ते. एवढ्या नोकऱ्या राज्याबाहेर गेल्या तर इथल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल कि काय याची काळजी वाटण स्वाभाविक आहे. सुरवातीला बॉलिवूडपासुन मिळणाऱ्या उत्पन्नाशिवाय राज्याच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करण अशक्यप्राय वाटण्याचीही शक्यता आहे. 

परंतु कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधी तीची कल्पना करणं आवश्यक असतं. राईट बंधूं कल्पना करु शकले म्हणून विमानं प्रत्यक्षात उतरू लागली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली तेंव्हा कुठे ते स्थापन झालं. महाराजांचं नाव  घेत आपण जर परदेशातुन बुलेट ट्रेन राज्यात आणण्याची स्वप्न बघत राहिलो तर ती येईलही पण त्यामुळे मुंबईतली गर्दी कमी होईल का?  

उत्तर प्रदेश जर हिंदी सिनेसृष्टीला आपल्याकडे नेऊ इच्छित असेल तर त्यात एवढं घाबरण्यसारखं काय आहे? ते हि देशातील एक राज्य आहे. त्याची प्रगती हि देशाची प्रगती आहे. मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी आणि बॉलिवूडला उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी या दोन राज्यांनी आपसात सहकार्य केलं तर त्यात सर्वसामान्य लोकांचं एवढं काय बिघडेल? हिंदी सिनेमा सृष्टीतुन मिळणाऱ्या उत्पन्ना शिवाय आपण राज्य आणि शहर चालवू  शकतो -  किमान एवढा आत्मविश्वास तरी शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवून घेणाऱ्यांच्यात असायला हवा. शिवाय आजच्या झुमच्या जमान्यात, आणि हवाई प्रवास दररोजचा झालेला असताना किती लोकांना हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी प्रत्यक्ष उत्तर प्रदेशात जाऊन रहावं लागेल हा हि एक मुद्दा आहे. 

ज्या सिनेसृष्टीनी पन्नास पेक्षा जास्त वर्ष स्थानिक भाषा, स्थानिक संस्कृती, स्थानिक लोक यांचा मान ठेवला नाही; या शहरात स्वतःच एक स्वतंत्र जग निर्माण केलं ज्यात प्रवेश करण्याचा व्हिसा आपल्याला कधी मिळु शकणार नाही अशी मराठी कलाकारांची भावना झाली; मराठी माणसांची घाटी, पांडू हवालदार अशी अवहेलना केली गेली ज्यामुळे आपल्याला आपल्या भाषेविषयी आणि स्वतः विषयी इतका न्यूनगंड निर्माण झाला कि मुंबईत लोक मराठी बोलेनासे झाले; हिंदी सिनेसृष्टीतील एखादी व्यक्ती दोन मोडके तोडके मराठी शब्द बोलली तर त्यात आपण धन्यता मानू लागलो; मराठी लोकांना हिंदी नीट बोलता येत नाही म्हणून हिंदी सिनेमात प्रवेश मिळेना पण हिंदी सिनेमात चुकून कधी एखाद दुसरी मराठी व्यक्तिरेखा असली तरी ती ही अस्खलित मराठी बोलत नाही याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं  -  अशा सिनेसृष्टीला कवटाळून बसण्याचा अट्टाहास का? 

हे बदलायचं असेल तर बॉलिवूड -विरहित मुंबईची (मुंबई sans बॉलिवूड) कल्पना करण्याचं धैर्य आधी दाखवावं लागेल तर कदाचित कधीतरी ते प्रत्यक्षात उतरु शकेल. नाहीतर राजकीय नेते सत्तेसाठी लोकांना मुर्ख बनवत रहातील आणि मुंबईला आता कोणी वाली उरलेला नाही असं म्हणत मुंबईकर हळहळत बसतील. 










Saturday, September 5, 2020

क्लास वॉर्स


सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर पारितोषिक गेल्या वर्षी पॅरासाईट या कोरिअन सिनेमाला मिळालं. परदेशी भाषेतील चित्रपट असुनही इंग्रजी सिनेमांच्या श्रेणीत बक्षिस मिळवणारा ऑस्करच्या इतिहासातील तो पहिला चित्रपट ठरला. 

पॅरासाईट या शब्दाच अर्थ परोपजीवी (पर+ उपजिवी). दुसऱ्यांच्या जीवावर उपजीविका करणारे /जगणारे प्राणी आणि वनस्पती. इंग्रजी शब्दकोशात या शब्दाचा आणखीही एक अर्थ आढळतो तो म्हणजे श्रीमंतांची स्तुती करून त्यांच्या पाहुणचाराचा गैरफायदा घेणारे लोक. चित्रपटात एक गरीब कुटुंब एका श्रीमंत कुटुंबाच्या जीवावर कसं जगु पहातं आणि पुढे त्याच पर्यवसन कशात होतं ते दाखवलं आहे. 

सुरवातीला दोन्ही कुटुंब आपापल्या जगात जगत असतात. श्रीमंत पार्क कुटुंब त्यांच्या मोठया घरात - जे शहराच्या वरच्या भागात असतं. तिथे पोहोचण्यासाठी थोडी चढण चढावी लागते. ते घर एका प्रसिद्ध वास्तुशात्रज्ञांनी डिझाईन केलेलं असतं आणि आधुनिक मोजक्या पद्धतीनं सजवलेल असतं. 

गरीब किम कुटुंबाची खोली त्याच शहराच्या दुसऱ्या भागात रस्त्याच्या खालच्या पातळीवर असते. त्यात गच्चं भरलेल्या सामानाचा पसारा असतो. छोटाश्या खिडकीतून त्यांना रस्त्याचा थोडा भाग दिसतो. दोन्ही परिवारात चार सदस्य असतात - आई, वडील, एक मुलगा आणि एक मुलगी. पार्क आईवडील तरुण असतात. त्यांची मुलं लहान असतात. किम आईवडील मध्यमवयीन असतात. त्यांची मुलं कॉलेज मध्ये शिकणारी, नोकरीच्या शोधात असलेली असतात. 

दिवसभर खोलीत बसुन पिझ्झा डिलिव्हरीची खोकी जुळवण्याचं काम करायचं आणि ते करताना टीव्हीवर डेली सोप्स बघायचे हा किम कुटुंबाचा दिनक्रम असतो. रस्त्याखालच्या खोलीत एक प्रकारचा कुबट वास असतो जो त्या घरात रहाणाऱ्या लोकांच्या अंगाला चिकटतो. त्यांना तो जाणवत नाही पण पुढे जेंव्हा त्यांचा पार्क परिवाराशी संबंध येतो तेंव्हा श्रीमंत नाकांना तो वास लगेच झोंबतो. सिनेमात त्याला तळघराचा, जुन्या झालेल्या मुळ्या सारखा वास म्हंटलंय. 

गरीब म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं रहातं तशी ही गरिबी नाही. हे दक्षिण कोरिआतील - एका विकसित देशातील गरीब आहेत. भारतासारखी रोजी एक डॉलर पेक्षाही कमी उत्पन्नावर भागवावं लागणारी ही गरिबी नाही. ती सापेक्ष - रिलेटिव्ह आहे. हे जरी खरं असलं तरी त्यांच्याकडे the haves आणि the have nots  - ज्यांच्याकडे आहे ते लोक आणि ज्यांच्याकडे नाही ते लोक यामधली दरी अस्तित्वात नाही असं नाही. ती तफावत जगात खूप ठिकाणी आहे. त्यातून झालेला संघर्ष सिनेमात दाखवला आहे. नोकरी न मिळाल्यामुळे निराश झालेल्या बेरोजगार तरुणांनी भारी किंमतीच्या गाड्यांच्या शोरुमची नासधूस करावी तशा प्रकारचं हे रस्त्यातलं क्लास वॉर नाही. हे जास्त पर्सनल आहे. 

एकदा अनपेक्षितपणे किम कुटुंबातील मुलाला श्रीमंत घरात नोकरीची संधी मिळते. त्याचा मित्र शिक्षणासाठी अमेरिकेला चाललेला असतो. तो आपली शिकवणीची नोकरी त्याला देऊ करतो. पार्क कुटुंबातील मुलीला इंग्रजी शिकवण्यासाठी कुमार किम त्यांच्या घरात प्रवेश करतो. थोड्याच दिवसात कट कारस्थान करून अख्ख किम कुटुंब पार्क घरात शिरत. मराठीत एक म्हण आहे  - भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. तसच घडतं. 

म्हणी आता फारशा वापरल्या जात नसल्या तरी मला आवडतात. थोड्या शब्दात त्या बरच काही सांगुन जातात. न्यूयॉर्कमध्ये मला दुसरी एक म्हण किंवा खरतर वाक्प्रचार वारंवार आठवतो. बस किंवा ट्रेन मध्ये एखादी व्यक्ती जोरजोरात फोनवर बोलत असते. बहुतांश लोक तिकडे दुर्लक्ष करतात. कानात ईअर प्लग्ज घालुन आपल्या फोनमध्ये डोकं खुपसून बसतात. पण तिच्या मागच्या/पुढच्या सीटवर बसलेल्या ज्येष्ठ महिलेला नेमकं त्याचवेळी पेपर वाचन करायचं असतं. ती एकदोनदा फोनवर बोलणारीकडे रागात बघते. फोनवालीच लक्ष नसतं. शेवटी ज्येष्ठ वाचिका वैतागून मोठ्याने तिला म्हणते, "आता बस् कर की. आम्हांला कशाला तुझ्या घरातलं -बाहेरच सगळं ऐकवतेस." फोनवाली ते ऐकून तिकडे दुर्लक्ष करते. मुद्दामहुन संभाषण लांबवते. 

तू कोण मला सांगणार? मी मला जे हवं ते करणार मग दुसऱ्यांना माझ्या वागण्याचा कितीही त्रास झाला तरी मला त्याची पर्वा नाही - अशी वृत्ती फार बोकाळलेली दिसते. तेंव्हा मला -  शहाण्याला शब्दाचा मार किंवा त्याचं हिंदी भाषांतर समझनेवाले को ईशारा काफी है - आठवतं. आजकाल हा वाक्प्रचार आठवण्या सारखे प्रसंग वाढत चाललेत .  

श्रीमंत घरात घुसण्यासाठी किम कुटुंब बिनधास्तपणे कारस्थानं करत. खोटंनाट बोलून कुमारी किम पार्क घरातील लहान मुलाला चित्रकला शिकवण्याची नोकरी पटकवते. एकदा पार्क कुटुंबाचा तरुण ड्रायव्हर शिकवणी संपल्यावर तिला घरी सोडायला जातो. वाटेत कामापुरतं संभाषण करून तो तिला ती सांगते त्या ठिकाणी सोडतो. गाडीतुन उतरायच्या आधी मागच्या सीटवर बसलेली कु. किम हळुच आपली पॅंटी काढुन सीटच्या खाली टाकते. नंतर बॉस गाडीत बसतो तेंव्हा त्याला ती दिसते. त्याला ड्रायव्हरचा संशय येतो. गाडीत असले उद्योग करणारा ड्रायव्हर नको म्हणून त्याला सुट्टीवर पाठवण्यात येतं. त्याच्या जागी वडील किम ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागतात. 

पार्क परिवाराच्या हाऊसकीपरला विशिष्ट फळांची ऍलर्जी असते. ते समजताच किम मंडळी त्या प्रकारची पुष्कळ फळं आणून स्वयंपाकघरात ठेवतात. हाऊसकीपर सारखी खोकु लागते. टिश्यू पेपरवर लाल रंगाचे डाग पाडून किम वडील ते कागद कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. मालकिणीला ते कागद दाखवून हाऊसकीपर सारखी खोकतेय आणि त्यातून रक्त पडतंय म्हणजे तिला टी बी झाला असावा असा संशय तिच्या मनात पेरतात. हाऊसकीपरची नोकरी जाते. तिच्या जागी आई किम हाऊसकीपर म्हणून येते. 

पार्क घरातील सगळ्या कामांचा भार  - गाडी चालवणे, घरकाम, मुलांचं संगोपन - किम कुटुंबाकडे सुपूर्द होतो. अशा रितीने पार्क कुटुंबही एक प्रकारे किम परिवाराच्या जीवावर जगू लागतं. आपला नविन ड्रायव्हर, नविन हाऊसकीपर, मुलांचे नविन टीचर्स यांचं आपसात काही नातं आहे याचा त्यांना पत्ता नसतो. नोकरी देण्याआधी त्या लोकांची पार्श्वभूमी तपासून बघण्याच्या फंदात पार्क पती - पत्नी पडत नाहीत. 

शेवटी पार्क आणि किम - श्रीमंत आणि गरीब दोन्ही कुटुंबांच्या लक्षात आलं कि आपल्याला एकमेकांमुळे खूप फायदा होतोय. मग ते एकमेकांना मदत करत कायम गुण्यागोविंदाने राहिले - असा सिनेमाचा सुखांत होत नाही. ... and they lived happily ever after असा शेवट व्हायला ही काही परिकथा -fairytale नाही. हे तर त्रिकालाबघीत सत्य आहे कीं सीमारेखांचं उल्लंघन झालं की युद्ध अटळ असतं. सिनेमात शेवटी द्वंद्व होतं. फक्त गरीब विरुद्ध श्रीमंत नाही तर गरीब विरुद्ध गरीब असंही.  

आपल्या लहान मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्क कुटुंब नदीकाठी सहलीला जातं. ती संधी साधून जुनी हाऊसकीपर घरी येते. तेंव्हा किम चौकडी अनायसे रिकाम्या मिळालेल्या श्रीमंत घरात पार्टी करत असते. त्यांनी दार उघडताच जुनी हाऊसकीपर लगबगीनं घरात शिरून एका कपाटाच्या मागे दडलेला गुप्त दरवाजा उघडते आणि धावतपळत खालच्या तळघरात उतरते. तिथे तिचा नवरा रहात असतो. त्याची नोकरी गेल्या पासून तो पार्क कुटुंबाच्या नकळत त्यांच्या तळघरात येऊन राहिलेला असतो. नोकरी गेल्यामुळे हाऊसकीपरला अचानक घर सोडावं लागतं पण तेंव्हा ती नवऱ्याला तळघरातुन बाहेर काढु शकत नाही.

गरीब विरुद्ध गरीब द्वंद्व होतं ते दोन हाऊसकीपरच्या कुटुंबांमध्ये - तळघराचा ताबा मिळवण्यासाठी. ते पडद्यावर इतकं ब्रूटल, इतकं क्रूर दाखवलंय, इतकं ताणलेलं आहे कि हे संपणार तरी कधी असं वाटतं. दोन्ही कुटुंब तळघरात एकमेकांना मारतात, झोडपतात, खेचतात, ढकलतात, ओरबाडतात, पाडतात, तुडवतात, रक्तबंबाळ करतात, बेशुद्ध पाडतात  - आपल्या शरीराचा प्रत्यके अवयव दुसऱ्यावर मात करण्यासाठी वापरतात. 

त्याच्या तुलनेत गरीब विरुद्ध श्रीमंत द्वंद्व सुंदर सेटिंग मध्ये होतं आणि थोडक्यात आटपत. या द्वंद्वात सगळी पात्र लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तयार होऊन आलेली असतात. घराबाहेरचं लॉन पार्टीसाठी सजवलेलं असतं. टेबलं मांडलेली असतात. मुलाची हौस म्हणून पार्टीत खोटी लढाई खेळण्यात येते - खऱ्या तलवारी वापरून. या द्वंद्वात गरीब आणि श्रीमंत शरीरं एकमेकांना स्पर्श करत नाहीत. शस्त्रांचा वापर होतो. 

द्वंद्वात कोणाचाच विजय होत नाही. गरीब घरातील मुलीचा आणि श्रीमंत परिवारातील वडीलांचा त्यात अंत होतो. तळघरातल्या मारामारीत जुन्या हाऊसकीपरचा आणि तिच्या नवऱ्याचा जीव जातो. एका वेगळ्या अर्थाने तळघर गरीब वडिलांच्या ताब्यात येतं. पार्क आई मुलांना घेऊन दुसरीकडे रहायला जाते. घर विकायला काढलं जातं. तरीही घराचं तळधर किम वडिलांच्या ताब्यात रहातं. त्यांच्या रूपात किम परिवाराचा जीव त्या घरात अडकून पडतो. कुमार किम ते घर विकत घेऊन तळघरातून वडिलांना बाहेर काढायची स्वप्न बघतो.  

एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरते जेंव्हा ती भौगोलिक सीमारेषांच्या पलीकडे जाते. या चित्रपटाची कथा जगातील कुठल्याही शहरात घडू शकते. कुठलीही भाषा बोलणाऱ्या लोकांना ती लागू होऊ शकते. या चित्रपटाला केवळ परदेशी सिनेमा नाही तर जनरल सिनेमाच्या कॅटेगरीत पहिलं बक्षीस देताना ऑस्कर्सच्या निवड समितीनं कदाचित तोच विचार केला असेल. 








Wednesday, July 1, 2020

भाईंच शेवटच आजारपण


भाई या चित्रपटात भक्ती बर्वेचा प्रवेश सिनेमाच्या अगदी शेवटी होतो. तिच्या आधी बाळ ठाकरे पुलंना पहायला येतात. पु.ल. हॉस्पिटलच्या बेडवर निपचित व्हेंटिलेटर लावलेल्या अवस्थते पडलेले असतात. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कोण आपल्याला पहायला येतंय त्यांना काही समजत नसतं. ठाकरे जायला निघतात तेंव्हा भक्ती येते.

भक्तीला सिनेमात बघितल्यावर मी प्रथम गोंधळले. दोन्ही तारखा चेक केल्या. ह्या दोन्ही घटना -पुलंचा शेवट आणि  मुंबई -पुणे हायवेवर अपघातात झालेला भक्ती बर्वेच मृत्यू - मी भारता बाहेर असताना घडल्या. त्यांचा अनुक्रम माझ्या आठवणीत उलट- सुलट बसला होती. लांब रहात असताना संदर्भ- विरहित फक्त ठळक बातम्या समजल्या कि असं होतं.  पु.ल. अगदी अलिकडे गेले आणि भक्ती बर्वे त्यांच्या खूप आधी गेली असं वाटत होतं. पण नाही. ह्या सहस्त्रकाच्या सुरवातीला जून २००० मध्ये पु. ल. गेले आणि त्यानंतर सात -आठ महिन्यात फेब्रुवारी २००१ मध्ये भक्ती बर्वे गेली. चित्रपटात भक्तीला बघतना मन उदास होतं. पु. ल. ८० च्या वर वय झाल्यावर गेले. भक्ती लवकर गेली.

भक्ती बर्वे पुलंना पहायला हॉस्पिटल मध्ये येते आणि त्या अनुषंगाने ती फुलराणी या त्यांच्या नाटकाच्या तालमीची दृश्य दाखवली जातात. संपूर्ण सिनेमात तोच फॉरमॅट वापरलेला आहे. जे कोणी पुलंना पहायला हॉस्पिटल मध्ये येतात  -  त्यांचे भाऊ, मित्र, संगीत आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती किंवा त्यांच्या पुस्तकातील व्यक्तिरेखा  - त्या अनुषंगाने त्यांच्या बरोबरचे पुलंच्या आयुष्यातील प्रसंग दृश्यस्वरूपात दाखवले जातात. पुलंच्या निकटच्या मित्र वर्तुळातील दोघे -  वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व - खूप आधी देवाघरी गेले होते. अर्थातच ते पुलंना पहायला इस्पितळात आलेत असं दाखवता आलं नसतं. त्या दोघांबरोबरचे प्रसंग सिनेमात अधून मधून विखुरलेले आहेत. वसंतराव देशपांडे तर अगदी सुरवाती पासुन - पुलंच्या कॉलेजच्या दिवसांपासून त्यांच्याबरोबर दिसतात.







चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे आनंदवनातील दृश्य वगळता सिनेमातील सर्व सेट्स चांगले आहेत - खास करून सर्व घरांचे सेट्स. महिलांची केश -वेशभूषा काळानुरुप साजेशी वाटते. बहुतेक सर्व कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. एक अपवाद वगळता: सुनील बर्वेंच्या जब्बार पटेलांची छाप पडत नाही. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शकाची बॉडी लँग्वेज बरोबर साकारण्यात आली आहे असं वाटत नाही. जब्बार पटेल यांच्या बऱ्याच मुलाखती मी दूरदर्शनवर प्रतिभा आणि प्रतिमा सारख्या कार्यक्रमातुन पूर्वी बघितल्या होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाला सिनेमात न्याय मिळाला अस दिसत नाही.

दुसरी एक भूमिका खटकते ती म्हणजे बेळगावच्या रावसाहेबांची. सिनेमात ती व्यक्तिरेखा बघताना - पु.ल. लिहायला बसलेले असताना उगीचच मध्ये मध्ये लुडबुड करून व्यत्यय आणणारी एक व्यक्ती अशी वाटते. पुलंच्या व्यक्तिचत्रणात रावसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे इतर अनेक पैलू दिसतात. व्यक्ती आणि वल्ली मधल्या ज्या व्यक्तिरेखा चित्रपटात धुसडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो यशस्वी झाला आहे असं वाटत नाही. त्यात रावसाहेब एकटेच आपल्या मूळ नावानिशी येतात. बाकी दोघे - अट्टाहासाने अतिशुद्ध मराठी बोलणारा सखाराम गटणे चित्रपटात रहाटे झालाय आणि जुन्या झालेल्या खोबऱ्या प्रमाणे खवट असलेला अंतू बर्वे कर्वे झाला आहे.

प्रॉब्लेम हा आहे की ज्यांनी व्यक्ती आणि वल्ली वाचलंय त्यांना या व्यक्तिरेखा पडद्यावर बघून काही समाधान मिळणार नाही कारण पुस्तकाच्या पानात त्या कितीतरी जास्त जिंवत होऊन आलेल्या आहेत. ज्यांनी व्यक्ती आणि वल्ली वाचेललं नाही त्यांना ह्या व्यक्ती त्या पुस्तकातून आलेल्या आहेत हे समजणार नाही. ज्यांना पुलंबद्दल काही माहित नाही त्यांना हा चित्रपट बघून असं वाटेल कि ते एक मराठी मध्यम वर्गीय सदगृहस्थ होते: पेटी चांगली वाजवायचे... नाटक - सिनेमाच्या क्षेत्रात त्यांनी थोडंफार काम केलं होतं...हसतमुख होते...कायम आनंदी असायचे...थोडे वेंधळे होते... थोरा-मोठ्यांच्या बरोबर त्यांची ऊठबस होती - आपल्या सामाजिक बांधिलकी बद्दल जागरूक होते - बस इतकंच. त्या पलिकडे जास्त काही नाही. दिग्दर्शकालाही त्यांच्याबद्दल बहुतेक तेवढीच माहीती असावी आणि ते चित्रपटात दिसून येतं .

एक अक्षम्य उणीव चित्रपटात दिसते ती म्हणजे पुलंनी केलेल्या परदेश प्रवासांचा आणि लिहिलेल्या प्रवास वर्णनांचा अनुल्लेख. ज्या काळात सर्वसाधारण मध्यम वर्गीय मराठी लोकांना देशाबाहेर फिरायला जाणं सहज शक्य होत नसे, इंग्लड आणि अमेरिका दुसरे ग्रह असावेत इतके दूर वाटायचे त्या काळात पु. ल. आणि सुनीताबाईंनी भरपूर परदेश प्रवास केला. भारतात दूरदर्शनची सुरवात करताना पुलंचा त्यात मोठा सहभाग होता. त्यासाठी ते काही महीने इंग्लंडमध्ये राहून बीबीसीतून प्रशिक्षण घेऊन आले होते. आपली जग भ्रमंती त्यांनी अपूर्वाई आणि पूर्वरंग या अतिशय सुंदर प्रवास वर्णनातून घरोघरात पोहोचवली. त्या तोडीचं प्रवासवर्णन मी आजतागायत मराठीत वाचलेलं नाही. अपूर्वाई च्या प्रस्तावनेत पु.ल  म्हणतात  -  हे माझ्या प्रवासाचं वर्णन कमी असून प्रवासातल्या माझं वर्णन जास्त आहे. त्यामुळेच कदाचित ते एखाद्या माहितीपूर्ण प्रवास वर्णनापेक्षा जास्त रसभरीत झालेलं आहे. कित्येक मराठी घरं अशी असतील ज्यांनी इंग्लड - युरोप आणि दक्षिण आशियातील देश पहिल्यांदा पुलंच्या पुस्तकातून पहिले. अशा या प्रवास वर्णनांचा उल्लेखही सिनेमात नाही. त्यांच्या परदेश प्रवासाचाच उल्लेख नाही तर प्रवास वर्णनाचा उल्लेख कुठून येणार.

सर्वसामान्य वाचकांसाठी पुलंची महती म्हणजे त्यांचं लिखाण: व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी, बटाट्याची चाळ.  अपूर्वाई, पूर्वरंग ही पुस्तकं, वाऱ्यावरची वरात हा कार्यक्रम, ती फुलराणी हे नाटक आणि त्यांचे लेख. पुलंच व्यक्तिमत्व आणि काम बहुरंगी आणि बहुढंगी होतं. ते वेगवेगळ्या क्षेत्रात सहज वावरले. जिथे वावरले त्या क्षेत्रातील त्यांचं काम लोंकप्रिय झालं. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढताना काय वगळायचं आणि काय घ्यायचं हे ठरवणं बहुदा सोप्प नसावं: पु. ल. आणि सुनीताबाईंना मुलं नव्हती अन त्याबद्दल सिनेमाच्या शेवटी सुनीताबाई पुलंना सॉरी म्हणतात, दिल्ली दूरदर्शनमध्ये काम करीत असताना पंतप्रधान पंडीत नेहरूंशी पुलंची भेट झाली होती, पुलंनी प्रकाशवाणी हे दूरदर्शनसाठी सुचवलेलं पर्यायी नाव दिल्लीत स्विकारलं गेलं नाही,  पु.ल. आणि सुनीताबाई शाळेत शिक्षकांची नोकरी करीत होते तेंव्हा बाळ ठाकरे त्यांचे विद्यार्थी होते -  ह्या पुलंच्या चाहत्यांच्या दृष्टीने कमी महत्वाच्या गोष्टी चित्रपटात आहेत पण वाचकांना आवडलेल्या प्रवास वर्णनांना चित्रपटात जागा मिळू शकली नाही ही निवड  खटकते.

आणखी एक निवड खटकते ती म्हणजे व्हेंटिलेटर लावलेल्या पुलंच पडद्यावरील दर्शन. व्हेंटिलेटर या नावाचा मराठी चित्रपट जो काही वर्षांपूर्वी येऊन गेला (आणि अतिशय सुंदर होता ) त्या चित्रपटात व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णाला खूप संवेदनशील रीतीने हाताळण्यात आलं होतं. नक्की आठवत नाही पण बहुतेक कधीच त्या सिनेमात व्हेंटिलेटर लावलेला रुग्ण पडद्यावर दिसत नाही किंवा दिसला असला तरी अगदी ओझरता - विसंगत वाटणार नाही असा ( तो चित्रपट बऱ्यापैकी विनोदी आहे ) . ह्या सिनेमात मात्र व्हेंटिलेटर लावलेले पु. ल. पुन्हा पुन्हा पडद्यावर दिसतात. सिनेमातलं बरच फुटेज विनाकारण हॉस्पिटलच्या दृश्यांनी खाल्लय. कदाचित ती भेटायला येणाऱ्या लोकांची थीम वापरायची होती म्हणून असेल. हॉस्पिटल मधिल एका दृश्यात विजया मेहता एका वार्ताहाराला - जो पुलंच्या तब्येती विषयी ताज्या बातमीसाठी धडपडत असतो - आपल्या जवळ बोलावून दटावतात, "I will speak to your station director ". या दृश्याचं प्रयोजन काय? चित्रपटाच्या थीम नुसार "भाईंच शेवटचं आजारपण" हे नाव चित्रपटाला जास्त संयुक्तिक ठरलं असतं.

हा चित्रपट प्रदर्शित झाला तेंव्हा त्यावर प्रखर टीका झाली होती. सेलफोन कॅमेऱ्यामुळे आजकाल लोकांच्या जाणीवा बोथट झाल्या असल्या - कोणीही कुठेही जाऊन कोणाचेही कसल्याही अवस्थेतील फोटो काढून ते समाज माध्यमांमध्ये लावण्यात धन्यता मानत असलं - तरी व्हेंटिलेटर लावलेला रुग्ण हि खऱ्या आयुष्यात खुप गांभीर्याने घेण्याची दुःखद गोष्ट आहे. आपल्या आवडत्या लेखकाच्या आयुष्यावरील चित्रपटाची थीम म्हणून त्याच्या शेवटच्या आजरपणाचा वापर करणं त्यांच्या चाहत्यांना खटकलं नसतं तर नवल - विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्यात इतर बरच काही दाखवण्यासारखं होत ते वगळून. ते आजरपण काही पुलंच्या आयुष्याचा फार मोठा भाग नव्हतं - अगदी शेवटच्या काही दिवसांच होतं  - जस ते अनेक लोकांच्या आयुष्याचं असु शकतं.







त्यापेक्षा थोडं मागे जाऊन जरा जास्त संशोधन केलं असतं, पुलंच्या साहित्याबद्दल जास्त जाणुन घ्यायचा प्रयत्न केला असता,
तर हॉस्पिटलच्या थीमला काही पर्याय सुचु शकला असता. भक्ती बर्वेला पडद्यावर बघुन मला तरी तसं वाटलं. जब्बार पटेल तर अगदी सुरवाती पासून हॉस्पिटलच्या दृश्श्यांमध्ये सुनीताबाईंच्या सोबत होते. समजा असं दाखवलं असत कि मुंबई दूरदर्शनच्या संग्रहालयासाठी भक्ती बर्वे आणि जब्बार पटेल, पु. ल. आणि सुनीताबाईंची प्रदीर्घ मुलाखत घेत आहेत... त्यानिमित्तानं अनेक दिवस ते पुलंच्या बरोबर घालवत आहेत...त्यांच्याबरोबर आनंदवन सारख्या त्यांच्या आवडत्या ठिकाणांना भेट देत आहेत...तर हॉस्पिटलची सोयीची पण निरस थीम टाळता आली असती.

त्यातच मध्ये पु. ल. आणि नंदा प्रधानच्या गप्पा घातल्या असत्या तरी चाललं असतं. नंदा प्रधान व्यक्ती आणि वल्ली मध्ये आहे. पुलंचा कॉलेज मधील मित्र. श्रीमंत घरातला देखणा मुलगा सदाशिव पेठेत रहाणाऱ्या एका साध्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्यावर लहान भावंडांची जबाबदारी असते म्हणून ती लग्नाला नकार देते. असा हा नंदा प्रधान अधून मधून अचानक पुलंच्या आयुष्यात उपटतो, त्यांना गप्पा मारायला आपल्या बरोबर घेऊन जातो आणि परत नाहीसा होतो.  पु. ल. खूप आनंदी आणि उत्साही होते असं चित्रपटात पुन्हा पुन्हा म्हटलंय. अशा व्यक्तीला शेवटच्या घटक मोजत बिछान्यात पडलेल्या अवस्थते इतक्या वेळा पडद्यावर दाखवायचं काम त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तीने कदाचित केलं नसतं.

तलवारी पेक्षा लेखणी श्रेष्ठ असा एक वाक्प्रचार आहे परंतु असही म्हणतात कि अ पिक्चर इज वर्थ अ थाउजंड वर्ड्स - जे वर्णन करायला हज्जारो शब्द लागतील ते केवळ एका चित्राद्वारे व्यक्त होऊ शकतं. पुलंनी केवळ कागद आणि लेखणी वापरून कित्येक व्यक्तीं, देश आणि प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत केले. ते त्यांचं सामर्थ्य होतं. त्यांना पडद्यावर जिंवत करण्यासाठी चित्रपट हे प्रबळ माध्यम हाताशी असुनही त्याच्या तोडीचं कोणी मिळू शकलं नाही हे मराठीचं दुर्दैवं.

भविष्यकाळात किती लोक मराठी वाचतील याची जिथे शाश्वती नाही तिथे मराठी लेखकांबद्दल किती लोकांना जाणून घ्यावंस वाटेल हि शंका आहे. जर कुणाला पुलं बद्दल जास्त जाणून घ्यावंसं वाटलं तर पुलंच्या साठी निमित्त जयवंत दळवींनी संकलित केलेलं  पु .ल एक साठवण हे पुस्तक आणि त्याच्या जोडीला सुनीता बाईचं आहे मनोहर तरी हे आत्मलेखन पुरेसं आहे.  हा चित्रपट नाही बघितला तरी चालेल. चित्रपटावरून पुलंच्या वाचकांना त्यांच्या लिखाणानी किती आनंद मिळवून दिला होता हे समजत नाही.




Sunday, June 14, 2020

प्रश्न तुमचे उत्तरं आमची


वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीत सोशल क्यूज नावाचं सदर असतं. त्यात वाचक प्रश्न विचारतात आणि त्या सदराचे लेखक प्रश्नांची उत्तरे देतात. गेल्या काही महिन्यात विचारण्यात आलेले प्रश्न खालील प्रमाणे होते.

एकदा एका निनावी बाईंनी विचारलं होतं: मी आणि माझा नवरा दुसऱ्या एका जोडप्या बरोबर अधून मधून बाहेर जेवायला जातो. मजा येते. आमचं त्यांचं चांगलं जमतं. पण ते नेहमी खूप भारी किंमतीची वाईनची बाटली मागवतात. मी आणि माझा नवरा फार थोडी वाईन पितो. पण आम्ही जेवणाचं बिल विभागून भरतो त्यामुळे त्यांच्या महाग वाईनचे पैसे आम्हाला भरावे लागतात. त्यांना कस सांगू कि दर वेळी एवढी महाग वाईन आम्हांला परवडत नाही?

प्रश्न सर्वसामान्य लोकांनी विचारलेले असतात. त्यात अमेरिकन समाजाचं प्रतिबिंब दिसतं.

एकदा एका बाईनी विचारलं:
मी एका रेस्टोरंट मध्ये महिलांच्या बाथरूमच्या बाहेर, आतली बाई बाहेर येण्याची वाट पहात उभी होते. दार उघडलं तेंव्हा आतुन एक तरुण पुरुष बाहेर आला. मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं. तो म्हणाला, " I am transitioning" (मी पुल्लिंगीचा स्त्रिलिंगी होतोय). माझी १०० टक्के खात्री आहे कि तो खोटं बोलत होता. तो बिल्कुल लिंग बदल वगैरे काही करत नव्हता. माझा नवरा म्हणतो, "जाऊ दे, सोडून दे."  पण मला सारखं वाटतय मी त्याला काहीतरी बोलायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं?

प्रश्नकर्त्यांचं पूर्ण नाव जाहीर केलं जात नाही. नुसतं पहिलं नाव किंवा नावातील पहिलं अक्षर किंवा निनावी अशी नावं छापली जातात. नेहमी बायकाच प्रश्न विचारतात असं नाही. पुरुषही विचारतात. बायकांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या जास्त असावी. मला वरील प्रश्न आठवतायत पण त्या प्रश्नांची उत्तरं आठवत नाहीत.

हल्लीच एका महिलेनं विचारलं होतं:
मी आणि माझा नवरा काही दिवसांसाठी सुट्टीवर गेलो होता तेंव्हा नवऱ्याची आई मुलांना सांभाळण्यासाठी आमच्या घरी येऊन राहिली. पण मी नसताना, मला न विचारता तिनं माझ्या डायनिंग टेबलच्या खुर्च्या बदलल्या. तिनं आणलेल्या खुर्च्या अगदी कुरूप आहेत. मला अजिबात आवडल्या नाहीत. मला त्या बदलायच्यात. पण माझी सासु अधुन मधून मुलांना सांभाळण्यासाठी घरी येते. तिनं घेतलेल्या खुर्च्या कशा बदलू जेणे करून तिला वाईट वाटणार नाही?

सदर लेखकानी सासुला न दुखावता खुर्च्या कशा बदलायच्या त्याबाबत सल्ला दिला. वर असही म्हणाले कि तू पाठवलेले फोटो बघितले. खुर्च्या खरोखरच भयानक आहेत. पण तुला हक्काची बेबीसिटर फुकट मिळतेय तेंव्हा जरा सबुरीने घे.

काही वर्षांपूर्वी थँक्सगिव्हिंग सणाच्या आधी एका नणंदेनं विचारलं होतं:
दरवर्षी माझी वहिनी आमच्या कुटुंबासाठी थँक्सगिव्हिंग डिनरच आयोजन करायची. पण ह्या वर्षी भावाचा घटस्फोट झाला. त्यामुळे ह्या वर्षीच थँक्सगिव्हिंग डिनर मी माझ्या घरी ठेवलं आहे. माझ्या भावजयीचा मला फोन आला होता कि तिला माझ्या घरी डिनरला यायला आवडेल. पण माझ्या भावाची आता नवीन गर्लफ्रेंड आहे. भावजय आली तर गर्लफ्रेंड येऊ शकणार नाही. भावजयला बोलावलं नाही तर तिची मुलं तिच्याकडे जातील मग माझी भाचवंड माझ्या डिनरला येऊ शकणार नाहीत. हा तिढा कसा सोडवू?

योगायोगानी अशा प्रकारच एक सदर एका मराठी वर्तमानपत्रातही वाचायला मिळालं. सवाल जवाबदार या सदर लेखकाने वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यातुन सध्याच्या भारतीय संस्कृतीचं दर्शन झालं. नमुन्या दाखल काही प्रश्न खाली दिले आहेत.

न नावाच्या एका महिलेनी विचारलं होतं:
काही महिन्यांपूर्वी माझ्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धाला आम्ही सगळे सासूबाईंकडे जमलो होतो. माझा मुलगा त्याच्या चुलत आणि आत्ते बहिणीं बरोबर खेळत होता. मध्येच त्यातल्या एका मुलीने भिंतीवरच्या खिळ्याला अडकवलेली एक चावी काढली आणि ती माझ्या मुलाशी खेळू लागली. खेळून झाल्यावर तिनं ती चावी जिथून काढली होती तिथे त्याच खिळ्याला अडकवून ठेवली. थोड्या वेळाने नणंदेला काय झाल माहीत नाही ती त्या चावी अडकवलेल्या खिळ्याच्या शेजारी उभी राहून जोरजोरात किंचाळू लागली. " न ...मगाशी बाळ घेऊन खेळत होता ती आईच्या कपाटाची चावी कुठे?  न...न...मगाशी बाळ घेऊन खेळत होता ती आईच्या कपाटाची चावी कुठे आहे"?  माझी सासू शेजारी उभी राहून तिला चावी दाखवत होती. "अगं, हि बघ इथे खिळ्याला अडकवलेली आहे. तू ओरडू नकोस. ही काय, चावी इथे खिळ्याला अडकवलेली आहे. तू एवढा आरडाओरडा करू नकोस." असं पुन्हा पुन्हा सांगितल्यावर तिचं किंचाळणं थांबल. पण चावी बघितल्या नंतरही तिला आपल्या आरडाओरड्याची जराही शरम वाटली नाही. काही झालच नाही अशा प्रकारे ती वागली. सॉरी हा एक शब्दही तिच्या तोंडातून निघाला नाही. मी समोर उभी राहून तिचा तमाशा बघत होते. प्रसंगाच्या गांभीर्याच भान ठेऊन मी तेंव्हा गप्प बसले. पण आता वाटतं तिला काहीतरी बोलायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं?

यावर सवाल जवाबदारांनी दिलेल उत्तर :
न, सर्वप्रथम मी तुझ अभिंनदन करतो कि तू प्रसंगाच भान ठेऊन गप्प बसलीस. तूही स्वतःला याबद्दल शाबासकी दे. बऱ्याच लोकांना वेळ - काळाच भान ठेवायला जमत नाही. तुझ्या नणंदेच उदाहरण तुझ्या समोर आहे. जरा कल्पना कर कि आपल्या मुलीचा तो आरडाओरडा बघून तुझ्या सासऱ्यांच्या आत्म्याला (जो त्याप्रसंगी तिथे हजर असण्याची शक्यता आहे) किती यातना झाल्या असतील.

आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तुझ्या भावना मी समजू शकतो. पण नणंदेला बोलून तू काय साधलं असतंस? तू समजा तिला काही बोलली असतीस तर तिच्या "संस्कारां"प्रमाणे तिनं कदाचित लगेच तुला उलट उत्तर दिलं असतं. तिच्या उलट उत्तराला तिच्याच वेगाने उलट उत्तर देणं तुला जमलं असतं का? या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी असेल तर उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सोडून दे. मेडिटेशन कर. स्वतःच्या आत्म्याची शक्ती वाढवण्यासाठी नियमित ध्यान करत जा.

स नि विचारलं होतं:
माझ्या नवऱ्याची बहीण (सासरी पटत नसल्यामुळे) तिच्या मुलांसह आमच्याकडे रहाते. तिच्या मुलीचं लग्न ठरलंय. नणंदेला तिच्या नवऱ्याचा सहभाग (त्याची लग्नाचा खर्च करण्याची ऐपत आणि ईच्छा असुनही) मुलीच्या लग्नामध्ये नको आहे. ती माझ्या नवऱ्याकडे लग्नखर्चासाठी बरीच मोठी रक्कम मागत आहे. मला वाटत कि तिनं मुलीच्या वडिलांकडून लग्नासाठी पैसे घ्यावेत किंवा ते नको असतील तर मुलीला सांगावं कि थोडी वर्ष थांब, नोकरी कर, पैसे साठव आणि मग लग्न कर किंवा मुलीच्या सासरच्या लोकांना समजावून सांगावं की तुम्हांला आताच लग्न करून हवं असेल तर मी माझ्या बजेट मध्ये बसेल तस करून देईन. मी नणंदेला हे सुचवु का? तुम्हाला काय वाटतं?

सवाल जवाबदारांच यावर उत्तर:
स, तुझं म्हणण कितीही बरोबर असलं तरी या बाबतीत तू नणंदेला काही सुचवलस तरी त्याचा उपयोग होणार नाही. बहिणीला मुलीच्या लग्नासाठी पैसे द्यायचे कि नाही हा निर्णय तुझ्या नवऱ्याला घ्यावा लागेल. तो जर त्याच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जागरूक असेल आणि एवढी मोठी रक्कम भाचीला लग्नात आहेर म्हणून द्यावी असं त्याला वाटत नसेल तर त्यानं पैसे देतानाच बहिणीला सांगायला हवं कि हे कर्ज आहे हि गिफ्ट नाही. अमुक एक कालावधीत पैसे परत मिळावेत अशी माझी अपेक्षा आहे. बहिणीला पैसे मागताना संकोच वाटत नसेल तर भावाला त्याचे पैसे परत मागण्यात संकोच वाटण्याचं कारण नाही.

तिसरा प्रश्न त नी विचरला होता:
माझ्याकडे एकदा पार्टी होती. मी सासूला विचारलं कि तुमच्याकडे स्वयंपाकाची मोठी भांडी आहेत का? सासू म्हणली कि हो, आहेत. क्ष ला दिली आहेत. तिच्या कडून मागून घे. मी क्ष ला फोन करून भांडी मागितली तर क्ष म्हणाली कि तिच्याकडे सासूची भांडी नाहीत. दोधीं पैकी एक कोणतरी खोटं बोलतंय. प्रश्न भांड्यांचा नाही. मला ती भांडी अजिबात नकोत. पण जुन्यापुराण्या भाड्यांवरून कोण खोटं बोलू शकतं ते शोधून काढायचय. कसं शोधून काढू?

सवाल जवाबदारांच उत्तर:
त, या प्रश्नाचं उत्तर अकबर- बिरबलाच्या कथेत सापडतं. तूला ती गोष्ट माहित नाही का? नसणार बहुतेक. जर माहित असती तर हा प्रश्न तू मला विचारला नसतास. असो, आता विचारलाच आहेस तर सांगतो - असं कर, दोघींना दोन अगदी सारख्या लांबीच्या शेवग्याच्या शेंगा भेट दे. त्यांना सांग की जी खोट बोलत असेल तिच्या शेंगेची लांबी उद्या सकाळी सहा इंचांनी वाढलेली असेल. ज्या चोराच्या मनात चांदणं असेल ती खोटारडी आपली शेंग उद्या सहा इंच वाढेल आणि आपलं भांड फुटेल (भांडं जुनं असेल तर ते आधीच फुटलेलं असण्याची शक्यता आहे 😀) या काळजीनी आदल्या रात्री ती शेंग सहा इंच कापून ठेवेल. दुसऱ्या दिवशी तू दोन्ही शेंगा बघशील तेंव्हा जिची शेंग कापलेली असेल ती खोट बोलत आहे हे उघड होईल. बिरबलाच्या जमान्यात या युक्तीचा उपयोग होत असे. आजच्या कलियुगात होईल कि नाही माहिती नाही. पण करून बघ.

आणि हो, तुझं वाचन जरा वाढव. म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला पुस्तकांत सापडतील. उगीच दुसऱ्यांना विचारायची वेळ येणार नाही.

मराठी वर्तमानपत्रातील प्रश्नोत्तर वाचल्या नंतर न्यूयॉर्क टाईम्स मधलं  सोशल क्यूज वाचलं तेंव्हा भारतीय आणि अमेरिकन विचारातील फरक पुन्हा एकदा जाणवला.

एका निनावी महिलेने विचारलं होतं:
माझा मुलगा आणि सून त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन दहा दिवस आमच्याबरोबर आमच्या हिंवाळ्याच्या घरात रहायला येणार आहेत. माझी सून फार आळशी आहे. ती सारख्या झोपा काढत असते. जेंव्हा झोपलेली नसते तेंव्हा फोनवर असते. माझा मुलगा थोडा बरा आहे. पण तो हि सारखा लोळत असतो. त्यांच्या घरी भांडी खरकटी पडलेली असतात, कपडे जमिनीवर पसरलेले असतात वगैरे. ते आमच्या घरी येतील तेंव्हा त्यांना कसं सांगू की सारा वेळ फोन वर घालवु नका आणि सतत झोपू नका - खासकरून त्यांची मुलगी जागी असेल तेंव्हा. ते मुलीला त्यांच्याबरोबर झोपवण्याचा प्रयत्न करतात. पण ती झोपत नाही. मला काहीतरी बोललच पाहिजे नाहीतर माझं डोकं फिरायची पाळी येईल.

यावर सदर लेखकाने दिलेलं उत्तर:
मी हे बरेचदा ऐकलंय - कधी कधी मुलांच्याकडून. त्यांचं म्हणणं असं असतं: आम्ही नोकऱ्या आणि लहान मुलं सांभाळून पार थकून गेलो होतो. म्हणून आठवडाभर सुट्टीसाठी आईवडीलांकडे गेलो. वाटलं होतं भरपूर झोप आणि आयतं पाळणाघर मिळेल. पण कसलं काय. आम्ही घरात पाय ठेवताच त्यांची कटकट सुरु झाली.

निनावी, फरक हा आहे कि तुला वाटतंय तुझा मुलगा आणि सून घरचे पाहुणे आहेत. पण ते तुझ्याकडे एक फुकट सुट्टीच ठिकाण - मुलांसाठी आया आणि साफसफाई या विनाशुल्क सेवां सहित  - या दृष्टिकोनातून बघत असतील. सुरवातीलाच काही गोष्टी स्पष्ट बोलून घे - म्हणजे तू नातीला किती वेळ सांभाळू शकशील वगैरे. त्यांना नाराज करण्यात काही अर्थ नाही - खास करून तुला तुझा मुलगा आणि नात परत परत येत रहावेत असं वाटत असेल तर.

यानंतर सल्लागारांनी त्या आईला इतरही काही सुचवलं - कि सारखं झोपण्यावरून आणि फोनच्या वापरावरून ती लहान मुलं असल्या प्रमाणे त्यांच्यावर बॉसिंग करू नकोस. खरकटी भांडी आणि अस्ताव्यस्त पसरलेल कपडे मात्र आवरून ठेवायला सांग. आणि शेवटी म्हणाले: एक शेवटचा (सु)विचार - जर तुला परवडत असेल तर दहा पैकी काही दिवसांसाठी त्यांची सोय जवळच्या हॉटेल मध्ये कर. दहा दिवस एकमेकांच्या पायात पाय घालून रहाण्यापेक्षा अधून मधून जेवायला, फिरायला वगैरे एकत्र जमलात तर तुमची सगळ्यांचीच सुट्टी जास्त आनंदात जाईल.

तात्पर्य: अमेरिकन सल्ल्या नुसार ज्या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होत असेल त्या लोकांना थोडं दूर ठेवा.
भारतीय सल्ला: ज्या लोकांशी तुमचे संस्कार जुळ्त नसतील आणि ज्यांच्या वागण्याने तुम्हांला मनस्ताप होत असेल अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मेडिटेशन करा. ध्यान केल्याने तुमची सहनशक्ती वाढेल.







Thursday, April 2, 2020

पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा



                                                          कुश लव रामायण गाती 

 पुत्र सांगती चरीत पित्याचे 
ज्योतीने तेजाची आरती 


     


पुरुषार्थाची चारी चौकट 
त्यात पहाता नीज जीवनपट 
प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट 
प्रभूंचे लोचन पाणावती 


स्वयंवर झाले सीतेचे

मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धार
नयना माजी एकवटुनिया निज शक्ती सारी


 


  नीलकाशी जशी भरावी उष्ण:प्रभा लाला 
 तसेच भरले रामांगी मधु नुपूरस्वरतालं 
 सभामंडपी मिलन झाले मायाब्रम्हाचे 


                                                                मोडू नका वचनास

 दंडकवनी त्या लढता शंभर 
  इंद्रासाठी घडले संगर 
    रथास तुमच्या कुणी घातला 
 निजबाहूंचा आस 




    एक वराने द्या मज आंदण  
 भरतासाठी हे सिंहासन 
 दुज्या वराने चौदा वर्षे
रामाला वनवास 


                                                                 माता न तू वैरिणी
   
कसा शांतवू शब्दाने मी कौसल्येचा शोक 
   सुमित्रेस त्या उदासवाणे गमतील तिन्ही लोक 
   कुठल्या वचने नगरजनांची करू मी समजावणी 





 वनाहुनही उजाड झाले रामाविण हे धाम 
वनांत हिंडून धुंडून आणिन परत प्रभू श्रीराम 
 नका आडवे येऊ आता कुणी माझिया पणी 


पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा

दोन ओंडक्यांची होते 
सागरात भेट 
एक लाट तोंडी दोघा 
पुन्हा नाही गाठं


     


अयोध्येस होत तू राजा 
रंक मी वनीचा 
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा 





प्रत्येकाने एकदा तरी या गीतांचे शब्द वाचावे .
ऑन लाईन सहज उलब्ध आहेत 





















Wednesday, March 25, 2020

आजचं गाणं - आजचा सुविचार





                                   





सुविचार:                                          Reboot Your Mind


The most meaningless trouble is caused 
by holding to ready -made ideas. It happens 
if someone does not return to the zero-point,
or if someone does not know the value of the 
 zero-point, the point where anything can be 
produced. It gives birth to all things.  

                                                                                Hua-Ching Ni , Taoist Master 
                                                                                                   A Mindful Morning या पुस्तकातुन. 



ज्याप्रमाणे शाळेचा एक तास संपला कि पुढचा तास सुरु होण्याआधी शिक्षक फळा पुसून स्वच्छ करतात. नविन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर ते नीट सुरु व्हावं म्हणून कम्पुटर रिबूट करण्यात येतो. त्याप्रमाणेच रोज सकाळी मनाला नव्याने सुरवात करण्याची संधी मिळाली तर ते हि उत्तम प्रकारे चालूं शकतं. ध्यान करण्याचा उद्देश मनाची पाटी पुसून स्वच्छ करणे हा असतो जेणेकरून ते नविन दिवसाच्या घडामोडींसाठी सज्ज होईल. 

जेंव्हा तुम्ही ध्यान कराल तेंव्हा मनातील विचारांकडे अशा भावनेनी पहा कि जणु ते विचार म्हणजे कारंजात थुईथूई नाचणारं पाणी आहे. मन रिसेट करायचं असेल तर त्या विचारांकडे डोळस पणे बघा. मनाने एका विचारावरून दुसऱ्या विचारावर कधी उडी मारली याकडे लक्ष द्या. सरावाने ते जमेल. दोन विचारांच्या मध्ये हळूवारपणे तुमचं मन श्वासोच्छवासाकडे वळवा. म्हणजे एका विचाराकडून दुसऱ्या विचाराकडे जाण्याआधी मधल्या काळात मनानी काय करायचं हा प्रश्न मिटेल. दोन विचारांच्या मध्ये जी रिकामी जागा असते त्यात श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करात्या रिकाम्या जागा, ती शांतता हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीला पोहोचण्याचा प्रयत्न करा जिथे मनात आवाज कमी आणि शांतता जास्त असेल. शक्य होईल तितका वेळ मग त्या स्थितीत रहा. 





yesheeandmommy @gmail.com 


















Monday, March 23, 2020

आवडलेला चित्रपट



A love story - मराठीतील चिक फ्लिक (chick flick)









yesheeandmommy@gmail.com


















Saturday, March 21, 2020

Favorite Kenny Rogers Songs - RIP























मागील पोस्ट वरील अभिप्रायांबद्दल
 धन्यवाद.
yesheeandmommy@gmail.com