Tuesday, July 19, 2022

आभास सावली हा असतो खरा प्रकाश


राज्यात सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडी बघता निवडणूकीच्या आधी लोकांनी स्वतःला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे. त्याची सुरवात म्हणून खाली एक प्रश्नावली दिली आहे. या मागे कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने आणि इतर पक्षांच्या विरोधात बोलणे किंवा कोणावर टीका करणे हा हेतू नाही. तर सर्वसामान्य लोकांनी भावनांच्या आहारी न जाता या घडामोडींकडे डोळस पणे बघावं जेणे करून त्यांचं शहर आणि राज्य भविष्य काळात कुठल्या मार्गानी जाऊ शकतं याची त्यांना कल्पना येईल - गोष्टी घडुन गेल्यावर सावकाश जाग आली असं होऊ नये - एवढाच हेतू आहे. त्या उद्देशा नुसार पहिला प्रश्न:


१) तुम्हाला तुमच्या लायकी प्रमाणे सरकार आणि राजकीय नेते मिळतात असं तुम्हांला वाटतं का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा:  

    अ) होय       

    ब) नाही   

    क) हा खूप गहन प्रश्न आहे ज्यावर विचार करायला माझ्याकडे पुरेसा वेळ नाही कारण लग्न -मुंजी, सण -समारंभ, व्हॉट्स 

         ऍप -फेसबुक सारखी माध्यमं यात माझा बराच वेळ खर्च होतो. 


२) राज्यात सरकार चालवणाऱ्या नेत्यांनी कोणाला कमी गांभीर्याने घ्यावं असं तुम्हांला वाटतं? 

    खालील पैकी हवे तेवढे पर्याय निवडा:

  अ ) अरुणाचल, हिमाचल किंवा तत्सम कुठल्यातरी प्रदेशातून आलेल्या नटीच्या चिवचिवाटाला.     

  ब ) दुसऱ्यांच्या घरासमोर उभं राहून मारुती स्तोत्र म्हणणाऱ्यांना.    

  क) एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाची असंवेदनशील हेटाळणी करणारी कोणा कवीची कविता  -

       बऱ्याच लोकांना खटकेल आणि टीकेस पात्र ठरेल याची जाणीव असल्या कारणाने - आपल्या 

       सोशल मीडियावर चिकटवून प्रसिद्धी मिळवू पहाणाऱ्या माजी नटीला.  

  ड ) या पैकी कोणालाही नाही. 

  इ) या बाबतीत माझं काही ठाम मत नाही. 


३) पुराण काळात ऋषी -मुनींची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांना त्या कामगिरीवर पाठवण्यात येत असे. प्रसार माध्यमे 

    आणि राजकीय नेते थोड्याफार आकर्षक दिसणाऱ्या (पर्यायाने मनोरंजनाच्या व्यवसायात काम करणाऱ्या) महिलांच्या

    बोलण्याला आणि वागण्याला नको तितकं महत्व देतात असं तुम्हांला वाटतं का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा:   

    अ) होय, उगीचच जास्त महत्व देतात असं वाटतं  

    ब ) नाही, योग्य तितकंच महत्व देतात असं वाटतं. 

    क) या बाबतीत माझं काही ठाम मत नाही. टाईम पास म्हणून हे ठीक आहे. 


४) प्रसार माध्यमे हा लोकशाही शासन पद्धतीचा एक प्रमुख आधार स्तंभ मानला जातो. ही माध्यमे आपलं काम चोख 

    पणे पार पाडत असोत किंवा नसोत, राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी दररोज त्यांच्याशी सवांद साधणं गरजेचं आहे असं 

    तुम्हांला वाटतं  का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा: 

    अ) होय, कारण तो माझ्या रोजच्या मनोरंजनचा आवडता कार्यक्रम आहे. 

    ब) नाही, उगीच वायफळ बडबड करण्यात वेळ दवडू नये.  

    क) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 

  

५) जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी दिवसाचा कुठला प्रहर योग्य आहे असं तुम्हांला वाटतं? 

    खालील पैकी हवे तितके पर्याय निवडा:    

    अ) मध्यरात्रीचा दाट अंधार कारण तेंव्हा बहुसंख्य लोक गाढ झोपलेले असतात. 

    ब)  भली पहाट जेंव्हा बहुतांश लोक साखर झोपेत असतात. 

    क) दिवसा उजेडीचा लख्ख सूर्यप्रकाश जेंव्हा जे काय चाललं आहे ते जनतेला स्पष्ट दिसु शकतं. 

    

६) अंधारात घडणाऱ्या धक्कादायक राजकीय नाट्यांना २१ व्या शतकातील तुमच्या आधुनिक, सुशिक्षित, कायदा 

     आणि सुव्यवस्था प्रिय राज्यात / शहरात / आणि आयुष्यात स्थान आहे असं तुम्हांला वाटतं का?  

     खालील पैकी एक पर्याय निवडा:

    अ) होय, आहे.     

    ब) नाही, कारण रात्री गूढ सावल्यांचा खेळ चालतो

    क) या बद्दल माझी काही ठाम भूमिका नाही परंतु आपण रात्री शांत झोपलेले असताना राज्यात काही राजकीय उलथापालथ 

         घडू शकते हा विचार काळजी वाटायला लावणारा आहे. त्याचा लोकांच्या झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

         त्यांना असुरक्षित वाटू शकतं. 

         

७) एखाद्या नेत्याने पुन्हा पुन्हा तीच चूक केली तर त्या नेत्याला आणखी किती वेळा संधी देण्यात यावी असं तुम्हांला 

     वाटतं?

     खालील पैकी एक पर्याय निवडा.  

     अ) जे दोनदा झालं ते तिसऱ्यांदा होऊ शकतं त्यामुळे दोन पेक्षा जास्त वेळ संधी देण्यात येऊ नये. 

     ब) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 

     क) धक्कादायक राजकीय नाट्यांना चूक म्हणणं चूक आहे. या चुका नाहीत तर ऐतिहासिक काळात 

          देशाबाहेरून आलेल्या परकीय शत्रूंविरुद्ध स्थानिक राजांच्या सैन्यांनी वापरलेली युद्धाची तंत्र आहेत. त्या तंत्रांना 

          पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्यांना पुन्हा पुन्हा संधी द्यायला काही हरकत नाही. 


८) देश स्वतंत्र झाल्या नंतर सुरवातीच्या काळात देशाचं नेतृत्व करणारे नेते हे देशातील किंवा परदेशातील विद्यापीठात 

   शिक्षण घेतलेले होते. सध्या संपूर्ण जगावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं साम्राज्य पसरलेलं असताना आपले राजकीय नेते हे   

   देशातील रस्त्यांवर जे पारंपारिक व्यवसाय केले जातात - वडापाव विकणे, भाजी विकणे वगैरे क्षेत्रातुन आलेले   

   दिसतात. हा बदल देशासाठी चांगला आहे कि वाईट असं तुम्हांला वाटतं? 

   एक पर्याय निवडा:

   अ) नक्कीच ही upward mobility देशासाठी फार चांगली आहे कारण जितके वडापाव किंवा भाजी विकणारे 

       राजकारणात जातील त्यांची जागा दुसऱ्या कोणाला तरी मिळू शकते.  

   ब) हा बदल थोडा चिंताजनक आहे कारण वडापाव आणि भाजी विकणाऱ्यांची पुढची पिढी तयार नसेल तर 

       समाजाला ते घातक ठरू शकतं. 

   क) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 


९) येणाऱ्या काळात तुमच्या शहरावर कुठल्या संस्कृतीचा प्रभाव असावा असं तुम्हांला वाटतं?

    खालील पैकी हवे तेवढे पर्याय निवडा: 

    अ) मराठी संस्कृती 

    ब) बॉलिवूड

    क) पाश्चिमात्य संस्कृती 

    ड ) देशाच्या इतर राज्यातुन आलेली संस्कृती 

    इ ) आमच्या शहरातील आणि राज्यातील संस्कृतीची दिशा ठरवण्यास आता आम्ही सर्वस्वी असमर्थ आहोत. जे काही  

         होईल ते गप्प बसुन बघणे आणि येणारे बदल असहाय्यपणे स्विकारणे या खेरीज आमच्या हातात आता काही 

         उरलेलं नाही. 


१०) तुमच्या शहरात किंवा तुम्ही रहाता त्या ईमारतींमध्ये मांसाहारावर आणि मांसाहारी उपाहारगृहांवर बंदी घालण्यात आली  

      तर तुम्हांला आवडेल का?

     अ) अजिबात आवडणार नाही 

     ब) संपूर्ण देश कधी एकदा शाकाहारी होतोय याची आम्ही वाट पहातोय  

     क) हा फार गंभीर प्रश्न आहे ज्याकडे मी आजवर सोयीस्करपणे कानाडोळा केलेला आहे कारण माझा बराचसा वेळ रोज 

          सकाळी बाजारात जाऊन ताजे मासे, मटण, कोंबडी आणणे आणि त्याचे कालवण करून खाण्यात जातो. 

    

११) तुमच्या शहरात आणि राज्यात जास्त महत्व कुठल्या गोष्टीला असावं असं तुम्हांला वाटतं?

     खालील पैकी एक पर्याय निवडा:

     अ) तुमची भाषा 

     ब) तुमचा धर्म 

     क) दोन्ही 

     ड ) दोन्ही नाही 

     इ) या प्रश्नावर विचार करण्याची किंवा दोन्ही पैकी एक निवडण्याची मला आजवर कधी गरज भासलेली नाही. 


१२) घराणेशाही विरोधी बंड जर एका प्रादेशिक पक्षात यशस्वी होऊ शकतं तर त्याची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्तरावरील    

     पक्षात करता येईल असं तुम्हांला वाटतं का? 

     एक पर्याय निवडा:

     अ) होय 

     ब) नाही 

     क) सांगणं अवघड आहे. 


१३) तुमच्या राज्याचा समृद्ध इतिहास बघता राज्यातील राजकीय नेत्यांनी आजवर राष्ट्रीय पातळी वरील राजकारणात 

      राज्याच्या योग्यते नुसार पुढाकार घेतला आहे असं तुम्हांला वाटत का? 

      एक पर्याय निवडा: 

      अ) होय 

      ब) नाही

      क) या बद्दल मी कधी विचार केलेला नाही.  

 

१४) तुमच्या राज्यातील शिस्तबद्धता, कायदा आणि सुव्यवस्था, कला - खेळ -समाज सुधारणा या सारख्या क्षेत्रात फार मोठी 

      कामगिरी बजावणारी उत्तुंग व्यक्तीमत्व बघता तुमच्या राज्यांनी देशाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची वेळ 

     आली आहे असं तुम्हाला वाटतं का? 

      एक पर्याय निवडा:

      अ) होय 

      ब) नाही

      क) या बद्दल मी कधी विचार केलेला नाही. 


१५) एखादी व्यक्ती किती काळ खुर्चीत बसु शकते हे कशावर अवलंबून आहे असं तुम्हाला वाटतं? 

       हवे तितके पर्याय निवडा:

     अ) त्या व्यक्तीच्या खुर्चीत बसण्याच्या क्षमतेवर. 

     ब) त्या व्यक्तीला खुर्चीतुन ढकलून ती खुर्ची बळकावू पहाणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेवर.  

     क) खुर्ची किती मऊ किंवा टणक आहे यावर ते अवलंबून आहे.    

     क) कोणी, कुठे, किती वेळ बसायचं हे ठरविणारे आपण कोण. ते ठरविणारा वर बसला आहे. 

     ड ) इतर कारणांवर ( हा पर्याय निवडला तर कारण वीषद करा).  


१६) चोवीस तास चालू असणारे टीव्ही वरील कार्यक्र्म हा मानवजातीला लागलेला शाप आहे. त्या ऐवजी ७० च्या 

      दशकाप्रमाणे दिवसातून फक्त काही तास टीव्ही वर कार्यक्रम दाखवले जावेत आणि इतर वेळी टी व्ही बंद असावा असं 

      तुम्हांला वाटतं का? 

      अ) होय, नक्कीच. माझ्या आवडीच्या मालिका वगळता टी व्ही वरचे इतर कार्यक्रम बकवास असतात.  

           ते बंद व्हायला हवेत.   

      ब) नाही, दिवसरात्र टीव्ही नसेल तर विरंगुळ्या अभावी माझं डोकं फिरण्याची शक्यता संभवते.  

      क) कालचक्र मागे फिरवून टी व्ही चे तास कमी करण आता शक्य होईल असं वाटत नाही.