Monday, September 2, 2019

मुंबईकर (१)

 

मे महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी बिंदुनी घर सोडलं. दुपारची जेवणं झाल्यावर तिनं स्वयंपाकघर आवरलं, उरलेलं जेवण फ्रिजमध्ये ठेवलं, तिरमिरीत बॅग भरली आणि मुक्काम आईच्या घरात हलवला. कुलदीप पवारांबरोबर रहायचा आता तिला कंटाळा आला होता. आईचं घर बंद असायचं. आईवडील कधीतरी जायचे. पण ते तिथे नसतील तेंव्हा घराची किल्ली बिंदुकडे असायची. आईची परवानगी घ्यायची तिला गरज पडली नाही.

शेवटचं भांडण कशावरून झालं याची इतकी वेगवेगळी कारण तिनं वेगवेगळ्या लोकांना सांगितली आहेत कि नेमकं कारण काय घडलं हे आता तिलाही आठवत नाही. भांडणं तशी रोजचीच होती. पवार निवृत्त होण्या आधीपासून ती त्यांना सांगत होती, "आपण मुंबईत घर बघूया. तुम्ही निवृत्त झाल्यावर माझी काही तुमच्या गावी जाऊन रहायची इच्छा नाही. मला माझ्या आई जवळ आणि भावंडांच्या जवळ रहायला आवडेल. इतकी वर्ष तुमच्या फिरतीच्या नोकरीमुळे मला माझ्या माणसांपासून लांब रहावं लागलं. माझी आई आणि भावंडं मुंबईत एकत्र जमून मज्जा करतात आणि मी मात्र दर वेळी त्यातून वगळली जाते. निदान आता तरी मला माझ्या माणसांच्या जवळ रहायला मिळुदे. तुमच्या मावशीचं एवढं छान घर आहे मुंबईत. जुना भाड्याचा फ्लॅट असला तरी चांगला प्रशस्त आहे. मध्यवर्ती ठिकाणी आहे. शिवाय मावशींना मुलबाळ नाही. त्याही आता थकल्यात. जरा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तो फ्लॅट आपल्याला मिळाला तर बरच होईल."

पण पवारांनी बिंदुचं ऐकलं नाही. मावशीचं घर तिच्या पश्चात आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. त्यांची काही तत्व होती ती सोडायला ते तयार नव्हते. स्वेच्छा निवृत्ती स्विकारल्यावर त्यांनी आपल्या इच्छे प्रमाणे गावात घर बांधलं. या निर्णयाची फार मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली...पण ते पुढचं पुढे.

बिंदुचा चडफडाट झाला. आता गावी रहायला गेलं कि हे त्या फटफटीवरून शेतावर जाणार, मग शेतात मित्रांबरोबर दारूच्या पार्ट्या रंगणार...या विचारांनी तिला अस्वस्थ केलं. तिनं धाकटी बहीण टुणटुण जवळ आपली मनोव्यथा व्यक्त केली, "इतकी वर्ष सैन्याच्या कृपेनी दिल्लीत रहायला मिळालं आणि आता काय गं हे माझ्या नशिबी आलय. कशी जाऊन राहू मी कोल्हापूरात."

टुणटुण नेहमी सल्ला द्यायला टपलेली असे. सगळ्या भावंडांच्यात आपणच सर्वात हुशार अहोत, आई आणि भावंडांना योग्य मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे असा तिचा ठाम विश्वास होता. तिनं तत्परतेनं बिंदूला सल्ला दिला, " त्यांना सांग ना, मुंबई नको तर नको निदान पुण्यात तरी फ्लॅट घेऊन ठेवा. पुणं कसं मुंबई आणि कोल्हापूरच्या मध्ये आहे. कोल्हापूर पासून पुणं आता फार लांब राहिलेलं नाही. त्यांना राहू दे कोल्हापूरात. तू पुण्यात रहा. मी अधुनमधुन माँ ला घेऊन येईन. मावशी पुण्यात आहे. ती भेटेल. आपण धम्माल करू. हव्या तेवढ्या गप्पा मारू."

दोघी बहिणींच्या या प्लॅनचा सुगावा पवारांना लागणं शक्य नव्हतं पण त्यांना त्याचा अंदाज असावा. त्यांनी पुण्यात घर घ्यायलाही नकार दिला. त्यांना कोल्हापूर सोडायचं नव्हतं. निवृत्ती नंतरचं आयुष्य आपल्या गावी, आपल्या आई जवळ जावं अशी त्यांची इच्छा होती. मगाशी म्हंटल तसं या निर्णयाची फार मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली. कोणी असंही म्हणतील कि बिंदु आणि टुणटुणनी मिळून त्यांच्यवर सूड उगवला... पण ते पुढंच पुढे. कोल्हापूरला रहायला गेल्यावर काही वर्षांत बिंदुनी घर सोडलं. तिची मुलं मोठी झाली होती. दुसऱ्या गावात शिकत होती. तसंही तिला आता पवारांबरोबर रहायची काही जरूर उरली नव्हती. 
                                                                        *****

मुंबईत आई लीला चिटणीसला कल्पनाच नव्हती कि मुलगी कोल्हापुरातल्या आपल्या घरात येऊन राहिली आहे. बिंदु नियमित आईला आणि बहिणीला फोन करत असे. बहिणी जवळ ती मनातलं सगळं बोलून दाखवायची, पण आईला मात्र काही पत्ता लागू देत नसे. सगळं पूर्वी प्रमाणेच चाललंय असं भासवायची. लीला चिटणीस न चुकता जावयांची चवकशी करत. त्यांची आणि नातवंडांची खुशाली विचारत. पण आई पासून फार काळ काही लपून राहू शकत नाही असं म्हणतात. एक दिवस त्यांना शंका आली. त्यांनी बिंदुला नाही पण टुणटुणला विचारलं, "बिंदु घराबाहेर पडलीय का ग?"

लीला चिटणीस स्वतः या विषयी बिंदुशी काही बोलल्या कि नाही - माहित नाही. एवढं काय झालं, तू घर का सोडलंस, अशी माहेरी किती दिवस राहशील तू, हे प्रश्न त्यांनी मुलीला विचारले का?  एक वडीलधारी अनुभवी स्त्री आणि आई म्हणून मुलीला आपल्या नवऱ्याकडे परत जाण्याचा पोक्त सल्ला दिला का, मुलीचा संसार मोडू नये म्हणून काही प्रयत्न केले का -काहीच माहित नाही. त्यांचे पती सूर्यकांत वारल्यानंतर लीला चिटणीसच्या हातात काही उरलं नव्हतं. वडील गेल्यापासून आईचे सगळे निर्णय टुणटुणनी स्वतःकडे घेतले होते. आईची काळजी फक्त आपल्यालाच आहे, आईसाठी काय योग्य किंवा अयोग्य आहे, आईनी काय करावं किंवा काय करू नये  हे ठरविण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे असा तिचा दावा होता आणि तो दावा खोडुन काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. टुणटुणच्या अंगात कायम कोणाविरुद्ध तरी आवेष संचारलेला असे आणि त्या आवेषापुढे कोणाच काही चालत नसे, अगदी तिचे यजमान निळू फुलेंच सुद्धा नाही मग लीला चिटणीसचा काय निभाव लागणार. पवारांना सोडण्यासाठी टुणटुणनी बिंदुला पाठिंबा दिला. " परत पवारांकडे जाशील तर बघ!" तिनं बहिणीला बजावलं. टुणटुणच्या आवेषाचं आता पवार एक लक्ष्य बनले होते.

कोल्हापूरात बिंदुनी आईच्या घरात आपलं बस्तान बसवायला सुरवात केली. तिला जवळच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिचा दिनक्रम सुरळीत सुरु झाला. आता पवारांची कटकट मागे नव्हती. तिला खूप हलकं, मोकळं वाटू लागलं. रोजच्या भांडणां पासून सुटका झाली. बिंदुनी घर सोडल्याचा परिणाम पवारांवर काय झाला, झाला कि नाही हे नंतर पाहू. मुंबईत दोन व्यक्ती मात्र सावध झाल्या.

"माझा जुना फ्रिज कोल्हापूरच्या घरात आहे. बिंदुआक्कांना तो फ्रिज चांगलं गिऱ्हाईक पाहुन विकायला सांगा. आणि त्यांना म्हणावं शाळेत सांगून ठेवा, एखादया शिक्षिकेला जर दोन खोल्या भाड्यानी हव्या असतील तर...बिंदुआक्कांना एकटीला चार खोल्या लागणार नाहीत. दोन पुरतील. शिवाय त्यांना शेजारी कोणाची तरी सोबत असेल तर बरं होईल", लीला चिटणीसची सून शशिकलानी एक दिवस भाईंदरहून फोन करून सासूला फर्मान सोडलं. बिंदुला आपला जुना फ्रिज फुकट वापरता येऊ नये आणि अख्ख घरही रहायला मिळू नये याची सोय शशिकलानी बिंदुच्याच मार्फत केली. शशिकलाचं  हे कौशल्य बघून दुसरं कोणतरी चाट पडलं असतं पण चिटणीसांना आता त्याची सवय झाली होती.

सासूसासऱ्यांकडून आपल्याला काहीतरी मिळावं अशी निळू फुलेंचीही अपेक्षा होती. "मुलांना जे काही द्यायची आईवडिलांची इच्छा असते ते त्यांनी मुलं तरुण असतानाच दयायला हवं ",  चिटणीस कुटुंबातील कोणाच्यातरी कानावर पडेल अशा बेतानं ते हे वाक्य बोलून घेत असत. सासूबाईंचा विश्वास संपादन करण्यात त्यांनी यश मिळवलं होतं. लीला चिटणीस फुलेंना आपला मुलगा मानू  लागल्या होत्या. पण फुलेंची प्रतिक्रिया शशिकला इतकी उघड आणि तडकाफडकी नव्हती.

बिंदु पवारांना सोडून कोल्हापूरच्या घरात रहात आहे, शशिकलाचा फ्रिज विकण्यासाठी फोन आला होता या गोष्टी आईच्या बोलण्यातुन जयश्रीच्या कानावर पडत होत्या पण तिनं तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. आपल्याशी त्याचा काही संबंध आहे असं तेंव्हा तिला वाटलं नाही. सूर्यकांत आणि लीला चिटणीसची ती सर्वात घाकटी मुलगी. तिच्यात आणि मोठ्या भावंडांच्या वयात बरच अंतर होतं. जयश्री वयात आली तेंव्हा बिंदु आणि टुणटुण सासरी गेलेल्या होत्या आणि चंद्रकांतच लग्न शशिकला बरोबर झालं होतं.

सूर्यकांत होते तोपर्यंत सर्व सुरळीत चाललं. बिंदु उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन माहेरी यायची. सुट्टी संपत आली कि परत जायची. पवारांच्या नोकरीमुळे तीचं वास्तव्य महाराष्ट्रा बाहेर जास्त होतं. टुणटुण मात्र कायम आईला चिकटलेली होती. आई शिवाय तिचं पान हलत नसे. बारीक सारीक गोष्टीत तिला आईच्या आधाराची गरज भासे. स्वतःच्या जबाबदारीवर काही करायची तिला सवय नव्हती. वडिल असेपर्यंत त्यांच्या धाकामुळे ती माहेरी फारशी येत नसे पण आईशी रोज फोनवर बोलणं होई. सूर्यकांत बाहेर गेले कि लीला चिटणीस लेकीला फोन करित आणि मग मायलेकींच्या मनसोक्त गप्पा रंगत. सल्ला मसलत चाले. कधी टुणटुणला किंवा तिच्या मुलांना बरं नसलं तर लीला चिटणीस सकाळी लवकर उठुन, दोन्ही वेळचा स्वयंपाक करून, नवऱ्यासाठी दुपारचं जेवण टेबलवर ठेऊन कांदिवलीला टुणटुणच्या घरी जात. तिला काय हवं नको ते बघून सूर्यकांतना रात्रीचं जेवण वाढायला वेळेत घरी परत येत.

सूर्यकांतचा टुणटुणनी माहेरी यायला विरोध होता असं नाही. पण दुसऱ्यांच्या उठाठेवी करायच्या, लोकांच्या आयुष्यात नाक खुपसायचं, त्यांच्याविषयी गॉसिप करायचं हा तिचा स्वभाव त्यांना आवडत नसे. माहेरी आली की आतल्या खोलीत बसून आईशी हलक्या आवाजत कुजबुज करायची टुणटुणची सवय त्यांना फार खटकायची. अशावेळी सूर्यकांतचा मुक्काम एकतर बाहेरच्या खोलीत किंवा बाल्कनीत असायचा. पण जर ते बाथरूमला किंवा आपल्या बेडरूम मध्ये जायला उठले आणि पलीकडच्या खोलीतुन काही उठाठेवी कानावर पडतायत असं वाटलं तर ते रागात मोठ्ठ्यानी "लीला" अशी हाक मारून पत्नीला बाहेर बोलावून घेत. उगीचच "चहा कर...  पाणी दे", असे हुकूम सोडत. अशावेळी काहीतरी करून आई आणि मुलीच्या गप्पात खंड पाडण्याचा त्यांचा उद्देश असे.

अशीच एक दिवस दुपारी माहेरी आलेली टुणटुण संध्याकाळी घरी परत गेल्यावर रात्री जेवताना सूर्यकांतनी पत्नीला विचारलं,
 " मग...  काय म्हणत होती बच्ची?". टुणटुणला ते लाडानी बच्ची म्हणत.

"काही खास नाही. हेच आपलं इकडचं तिकडचं".

"दुपारभर इकडचं तिकडचं बोलत होती?"

"तसं नाही, म्हणजे तिला आपलं वाटतं कि आपल्या माहेरी सगळ्यांनी एकत्र रहावं. कुटुंबाची एकी कायम टिकुन रहावी. वाटणारच ना. सहाजिकच आहे ते,"  लीला चिटणीस मुलीची बाजू घेत म्हणाल्या.

बायको आणि मुलगी दुपारभर कुजबुज करत आतल्या खोलीत बसल्यामुळे आधीच वैतागलेल्या सूर्यकांतचा पारा हे उत्तर ऐकून आणखी वर चढला. "तुला मी कितीदा सांगितलंय मला दोन गोष्टी या घरात नकोयत. तू तिच्या संसारात लक्ष घालायचं नाही आणि तिला आपल्या घरात ढवळाढवळ करू द्यायची नाही." त्यांनी पत्नीला सुनावलं.

"कोणी कोणाच्याही संसारात ढवळाढवळ करत नाहीय. तुम्ही उगीच त्रागा करू नका." लीला चिटणीसनी नवऱ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शांतपणे संभाषण करणं चिटणीस दांपत्याला जमत नसे. प्रश्नोत्तरांच रूपांतर लगेच खटक्यात होई.

"किती वर्ष झाली आता तिच्या लग्नाला - दहा... बारा कि जास्तच?" सूर्यकांत गर्जले. "इतक्या वर्षात तिच्या सासरची एकी जपण्यासाठी काय केलं तिनं? आज पर्यंत कितीदा कोल्हापूरला सासरी जाऊन राहिलीय ती? तिला म्हणावं आम्ही तुला फुलेंच्या घरात दिलेली आहे. तू आता फुलेंच्या एकीची काळजी कर. चिटणीसांच्या एकीचं आम्ही काय ते बघून घेऊ." सूर्यकांत खवळून म्हणाले.

कोणी "त्या" प्रसंगाची आठवण करून दिलेली त्यांना आवडत नसे. चंद्रकांतच शशिकलाशी लग्न झाल्यावर सुरवातीला सगळे एकत्र रहात होते. एक दिवस घरात काहीतरी बिनसलं. सूर्यकांतनी मुलाला वेगळं रहायला सांगितलं. कोणाच्या तरी ओळखीनं चाळीत दोन खोल्या घेऊन चंद्रकांत आणि शशिकला भाईंदरला रहायला गेले.

त्यालाही पुष्कळ वर्ष होऊन गेली आणि एक दिवस अचानक अर्धांग वायूच्या झटक्याने सूर्यकांत गेले. तेंव्हा शिक्षण संपवून जयश्री नोकरीला लागली होती. माटुंग्याच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून व्यवस्थापनाची पदवी घेतल्यावर तिला एका आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार कंपनीत नोकरी मिळाली. घरात तिच्या लग्नाचे विचार गेली काही वर्ष चालू होते. तेही जास्त करून टुणटुणच्या आग्रहामुळे.

आजकाल टुणटुण घरी येऊन गेल्याच आईनी न सांगताही जयश्रीला समजत असे. ती संध्याकाळी उशिरा ऑफिस मधून घरी आली कि लीला चिटणीस डायनिंग टेबलवर तिचं ताट वाढून देत आणि तिच्या शेजारी बसून सहज गप्पांच्या ओघात बोलावं तसं  कुठल्यातरी लांबच्या नातेवाईकांच नाव घेऊन म्हणत, " शकूमावशीच्या मुलीला इतक्या मोठ्या स्थळा कडून मागणी आलीय. एकुलता एक मुलगा आहे. बी ए , एल एल बी झालाय. जमीनदार लोक आहेत. पुण्यात फर्ग्युसन रोडवर खूप मोठ्ठा बंगला आहे त्या लोकांचा. आपल्या इथल्या नाना - नानी पार्क एवढा त्यांच्या घराचा बगीचा आहे असं म्हणतात", किंवा "बाळु मामाच्या मुलीचं लग्न ठरलं. अमेरिकेहून आलाय मुलगा. ग्रीन कार्ड की काय ते आहे म्हणे त्याच्याकडे. आठ दिवसात लग्न करून जाणार आहे. ती मागाहून जाईल." 

आई या बातम्या सांगू लागली कि जयश्रीला कानात वेगळंच काही तरी ऐकू येई आणि अपराधी वाटे - "बघ, या दोन्ही मुली तुझ्या पेक्षा वयानी कितीतरी लहान आहेत. तुझी तिशी जवळ आलीय. त्यांचं तर अजून शिक्षणही पूर्ण झालेलं नाही. विशीच्या आत लग्न ठरली दोघींची. तुझ्या वयाची कोणी चांगली मुलं आता उरलेली नाहीत. बहुतेकांची लग्न झालीत."

लांबच्या नात्यातली शकूमावशी काय किंवा बाळुमामा काय - या लोकांशी आपली माँ अजिबात संपर्कात नाही. आबांच्या धाकामुळे हे लोक फारसे आपल्या घरी येत नाहीत आणि माँ फोनवरही कधी त्यांच्याशी बोलत नाही. या सगळ्या टुणटुण फुले अखिल पश्चिम महाराष्ट्र (मुंबई सह) उठाठेवी नेटवर्क मधून आईपर्यंत पोहोचलेल्या बातम्या आहेत हे जयश्रीला अनुभवांनी माहित झालं होतं.

खरी परिस्थिती अशी होती कि तीन मुलांची लग्न करून सूर्यकांत आणि लीला चिटणीस थकले होते. मोठ्या उत्साहानी त्यांनी जयश्रीसाठी वरसंशोधन कधी केलं नाही. शिवाय जयश्रीच्या काही ठराविक अपेक्षा होत्या: शक्यतो मुंबईतलाच हवा, पश्चिम उपनगरातला असेल तर उत्तम, आय टी मधला असेल तर चांगलं. आपल्या या अटी कमी करण्याची वेळ अजून आली आहे असं तिला वाटत नव्हतं. जयश्रीला लग्नाची घाई नव्हती. ऑफिस मध्ये कामासाठी परदेशातून येणाऱ्या बायका ती बघत होती. तिशी - चाळीशीच्या वाटतात. काहींच्या लग्नाचा पत्ता नसतो. अतिशय प्रोफेशनल असतात. आपल्या करिअरच्या बाबतीत खूप जागरूक असतात. जे बघत होती त्याचा परिणाम तिच्यावर होत होता.

कसही करून लवकरात लवकर एकदाचं आपलं लग्न व्हावं असं तिला कधी वाटलंच नव्हतं. नोकरीत जम बसे पर्यंत लग्नाचा विचार करायचीही तिची इच्छा नव्हती. ऑफिसमधले तिचे  सहकारी कामासाठी नियमित परदेशी जात. एक ना एक दिवस आपल्यालाही परदेशी जायची संधी मिळेल असं स्वप्न आता ती बघू लागली होती. आपलं लग्न जमवण्याची बच्चीदिदीची धडपड म्हणजे स्वतःचा रिकामपणा घालवण्याचा आणि आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा एक उद्योग आहे असं जयश्रीला वाटू लागलं होतं. पण त्याविरुद्ध काही बोलायची सोय नव्हती. तो तिचा स्वभाव नव्हता.
                                                         
                                                                           *****

सूर्यकांत गेल्यावर काही दिवसांनी निळू फुलेंना वाटू लागलं कि बिंदुची मुलं शिक्षणासाठी मुंबईत येतील तर बरं होईल. मुंबईत त्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने जास्त सोयी आहेत. इथे त्यांना जास्त चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांनी टुणटुणला तसं सुचवुन बघितलं. तिला ते पटलं. तिनं बिंदुशी याविषयी बोलायचं ठरवलं. दोघी बहिणींमध्ये फोनाफोनी झाली. मुलं आज्जीकडे येऊन राहिली तर लीला चिटणीसना त्यांचं करायला जमेल का.. जयश्री तर दिवसभर कामावर असणार. शेवटी विचारविनिमय करून दोघींनी ठरवलं की मुलांना तर आणायचंच मुंबईत आणि त्यांच्याबरोबर बिंदुनीही यायचं म्हणजे मग आज्जीला नातवंडांचं काही करावं लागणार नाही. बिंदु फार खुश झाली या निर्णयावर. तिची जुनी तक्रार - आई आणि भावंड एकत्र जमून मज्जा करतात आणि मी दरवेळी त्यातून वगळली जाते - आता संपणार होती.

नेहमी प्रमाणे या वेळीही टुणटुण आणि बिंदुनी आपसात काय ठरवलं त्याचा लीला चिटणीसना पत्ता नव्हता. वडील गेल्यापासून दोन्ही मुली आईला गृहीत धरू लागल्या होत्या. तशा सूर्यकांत असतानाही त्या आईला गृहीत धरत होत्या. पंरंतु वडील गेल्यानंतर बिंदु आणि टुणटुणवर कोणाचा अंकुश उरला नाही.

बिंदुनी नोकरी सोडली आणि लीला चिटणीस आणि जयश्री बरोबर मुंबईत रहायला आली. आधी ती आली मग तिची मुलं आली. बिंदुच्या मुलांना मुंबईत आणण्यासाठी फुलेंनी पुढाकार घेतला. आई बरोबर आजोळी जाऊन रहाण्या विषयी कुलदीप पवारांच आपल्या मुलांशी काही संभाषण झालं का  -माहीत नाही. मुलं नियमित वडिलांना भेटत होती का  - कुणास ठाऊक.

बिंदु मुंबईत रहायला आल्यावर टुणटुणचं आईकडे येणं वाढलं. सूर्यकांत नसल्यामुळे आता ती बाहेरच्या खोलीत बसून आई आणि बहिणीशी हितगुज करू शकत असे. त्यात नातेवाईकांच्या गॉसिप बरोबर जयश्रीच्या लग्नाचा विषयही निघे. कुठल्या पेपरमध्ये जाहीरात द्यायची, वेबसाईट वर नोंद करायची कि वधुवर सूचक मंडळात नाव घालायचं यावर चर्चा होई. आठवडा संपताना यायचं, जयश्री ऑफिस मधून आली कि तिला प्रश्न विचारून भंडावून सोडायचं - "उशीर का झाला? इतका वेळ कुठे होतीस? बरोबर कोण होतं? ऑफिस मधुन किती वाजता निघालीस? घरी पोहोचायला इतका वेळ का लागला? मध्ये कुठं गेली होतीस क?" अशा प्रश्नांचा तिच्यावर भडीमार करायचा असा परिपाठ तिनं सुरु केला.

एकदा दुपारी जयश्री घरी नसताना आली. आईला म्हणाली, "हे परवा कोल्हापूरला चाललेत. मोठे दीर पाय घसरून पडले. त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. त्यांना बघायला जातायत. जयूची माहिती लिहून देते त्यांना. ते धनवटेबाईंच्या घरी जाऊन त्यांना देऊन येतील. ताराबाई पार्कात रहातात त्या. त्यांना बरीच स्थळं माहित आहेत. मागे मी फोनवर बोलले होते त्यांच्याशी. श्रीमंत शेतकऱ्यांची, साखर कारखानदारांच्या मुलांची स्थळं आहेत म्हणत होत्या . एक मुलगा सुचवला होता त्यांनी. छान होता. सर्वात धाकटा होता. मोठ्या दोन भावांची लग्न झालेली आहेत. मोठे बागायतदार लोक आहेत. म्हणजे सगळे जण गावात रहातात पण सासू आणि सुनांसाठी स्वतंत्र गाड्या आणि ड्रायव्हर आहेत त्यामुळे त्या हवं तेंव्हा कुठेही जाऊ येऊ शकतात. मी तुला सांगणार होते पण तेंव्हाच आबांचं आजारपण झालं मग त्या गडबडीत राहून गेलं. त्या मुलाचं तर लग्न झालं असं वाटतं. पण तेंव्हा त्या बाई म्हणाल्या होत्या कि मुलीची सविस्तर माहिती दया मग आणखी स्थळं सांगिन. हे जातातच आहेत तर त्यांना भेटून येतील. राजरामपुरीत जाऊन घरही बघून येतील. आक्का इथे रहायला आल्यापासून आपण कोणी फिरकलोच नाही तिकडे.

टुणटुण सासरी जात नसे पण बहिणीवर लक्ष ठेवण्याचं काम तिनं स्वतःकडे घेतलं होतं. जयश्रीला टुणटुणच्या उलट तपासणीचा फार राग यायचा. तो मनातल्या मनात गिळून सरळ उत्तर दयावी तर वधू-वर परीक्षेच्या सूचना सुरु होत. अमका मुलगा चांगला वाटतो त्याला घरी बोलवूया, तमका मुलगा अमेरिकेहून दोन आठवड्यांसाठी आलाय त्याला त्याच्या घरी जाऊन भेटूया.. सगळं नको झालं जयश्रीला. माँ बरोबरच बच्चीदीदी आता आपलंही आयुष्य कंट्रोल करू पाहतेय असं तिला वाटू लागलं.  त्यातच ऑफिस मधली तिची जवळची मैत्रीण बदली होऊन बंगळूरला गेली. जयश्रीलाही मग बंगळूरला जावंसं वाटू लागलं. तिनं आईकडे बोलून बघितलं. लीला चिटणीस खुशीत, "हो, का, बंगळूरला बदली होतेय का तुझी?" एवढंच म्हणाल्या. त्यावरून आईचा तरी बदलीला विरोध दिसत नाही असं ती धरून चालली.

                                                                        *****

मध्ये काही दिवस गेले. एका रविवारी सकाळी दारात रिक्षा उभी राहिली. टुणटुण मुलांना घेऊन आली होती. हातातल्या पिशवीत मसाला लावून मुरवलेल्या मटणाचा मोठ्ठा डब्बा होता. "हल्लीच मी हैद्राबादी बिर्यानी बनवायचा क्लास केला, आज बिर्यानीचा बेत करूया", म्हणाली. कामवाल्या काशीला लाकडी उंच स्टुलावर चढवून आईच जुनं पितळेचं मोठ्ठ भांड माळ्यावरून खाली काढायला लावलं. तिलाच ते घासायला दिलं. बिंदु आणि टुणटुण मग बाकीच्या तयारीत गुंतल्या.

ओट्या लगतच्या सिंक मध्ये भांडी घासताना काशीच्या गप्पा चालू होत्या, "वैनी नाय येणार बिर्याणी खायला"? तिनं विचारलं.

" छे, ते लोक कुठे एवढ्या लांबून येणार. मुलांचे  क्लास असतात. अभ्यास असतो. इथे यायचं तर जाण्यायेण्यातच सारा वेळ मोडतो त्यांचा",  लीला चिटणिसनी चहाचा कप तिच्या शेजारी ठेवत म्हंटलं.

"तुमच्या लेकी नशिबवान हायेत, माँ. तुमचा लई जीव आहे त्यांच्यावर. माझ्या आईचा माझ्या पेक्षा आपल्या सुनांवरच जास्त जीव. मला चार दिवसाच्यावर म्हायेरी ऱ्हाऊ देत नाही. म्हणते जा बाई आता तू तुझ्या घरी. जास्त दिवस ऱ्हाशील तर उगीच माझ्या सुनांच्या संसारात जहर कालिवशील ".  ओले हात पातळाला पुसुन चहा पिण्यासाठी जमिनीवर बसत काशी म्हणाली.

स्वयंपाकघरात कामवाली धरून चार बायकांची लगबग. बाहेरच्या खोलीत बिंदु आणि टुणटुणच्या मिळून चार मुलांची गडबड. जयश्रीला थोडं ऑफिसचं काम करायचं होतं. तिनं आपला लॅपटॉप घेतला आणि बाल्कनीत वडीलांच्या आवडत्या आराम खुर्चीत काम करत बसली.

काम करताना मधूनच एखादी व्हिडीओ बघ, कुठल्यातरी वतर्मान पत्रातले मथळे वाच असं चाललं होतं. एका बातमीनी तिचं लक्ष वेधून घेतलं म्हणून त्यावर क्लिक करून ती बातमी तिनं सविस्तर वाचली. जवळच्या धारावीतली बातमी होती. स्लमडॉग मिल्यनेअर सिनेमात काम केलेली लहान मुलगी धारावीच्या झोपडपट्टीत रहात होती. काही दिवसांपूर्वी सिनेमातील तिच्या कामाबद्दल काही लाख रुपयांचा चेक तिच्या वडिलांना मिळाला. त्या चेकची बातमी त्यांच्या नातेवाईकांमध्ये पसरताच सगळे नातेवाईक मुलीच्या वडिलांभोवती गोळा झाले. प्रत्येक जण त्यांच्याकडे पैशाची मागणी करू लागला. सगळ्यांनी एकच गलका केला. रुबिनाच्या वडिलांना नातेवाईकांच्या मागण्या आणि गोंगाट इतका असह्य झाला कि त्यांनी त्या नातेवाईकांच्या समोर तो चेक फाडून टाकला.

ती बातमी वाचून जयश्रीला खूप विषण्ण वाटलं. दिसतील शीतं तिथं जमतील भूतं हा मथळा असायला हवा होता या बातमीचा- तिच्या मनात आलं. तेवढ्यात टुणटुण आणि बिंदु हातात एक वाडगा घेऊन आल्या. "खीर चाखून बघ जरा गोड बरोबर आहे का", वाटी जयश्रीच्या हातात देत बिंदू म्हणाली. जयश्रीनी वाटीतली चमचाभर खीर संपवली, "गॊड बरोबर आहे पण वेलची पूड घाला ना थोडी",  म्हणून सांगितलं तरी दोघी तिथेच उभ्या राहिल्या.   

निवांत सकाळ होती. ढगाळ पावसाळी वातवरण होतं. इमारती समोरचा रस्ता शांत होता. पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या बारीक पानांचा सडा रस्त्यावर सांडलेला होता. तुरळक वर्दळ होती. मधूनच एखादी गाडी, रिक्षा, सायकल, पायी चालणारे लोक जात होते. सोसायटीच्या लोखंडी प्रवेशद्वारा जवळ चौकीदार मामा उभे होते. रस्त्या पलिकडल्या फुटपाथवर बूट - चप्पला विकणाऱ्या छोट्या खोपटाबाहेर उभं राहून एक जण आपली चप्पल दुरुस्त करून घेत होता. तिकडे बघत टुणटुण म्हणाली. " त्यापेक्षा तू तुमच्या पुण्याच्या ऑफिस मध्ये बदली करून घे ना. आपल्यातली बरीच मुलं आहेत पुण्यात".

क्रमशः

( सर्व ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्रींना अभिवादन करून त्यांची नावं वापरली आहेत.)


पुढील भागात:

 .... १/३ कच्ची, १/३ करपलेली वगळून उरलेली बिर्यानी सगळयांना जेमतेम पुरली. जेवण झाल्यावर टुणटुणनी सिनेमा बघायची टूम काढली. सगळे बाहेरच्या खोलीत टीव्ही समोर बसले....