Saturday, October 17, 2020

You can fool some of the people all the time


                                            
                            You can fool all the people some of the time 
                                      and some of the people all the time, 
                           but you cannot fool all the people all the time.


वरील उदगार अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्रॅहम लिंकन यांचे आहेत...  (किंवा नाहीत)...  असं म्हणतात. पण उदगार कोणाचेही असले तरी त्यांचा अर्थ बदलत नाही : म्हणजे कि तुम्ही सरसकट सर्व  लोकांना कायम मूर्ख बनवू शकत नाही पण सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता आणि काही लोकांना कायम मूर्खावस्थेत ( मूर्ख + अवस्था) ठेवू शकता. 

सुशांत सिंगच्या जाण्याने जे वादळ उठलं ते पुढे कित्येक दिवस घोंघावत राहिलं. त्याच्या जाण्याबद्दल अनेक लोकांना जबाबदार धरण्यात आलं. त्यांच्यावर आरोप झाले. सुरवातीला दोन नावं ठळक पुढे आली. त्यातलं एक नाव करण जोहरचं होतं. सुशांत सिंगच्या जाण्याशी त्याचा संबंध असो किंवा नसो त्याची स्क्रुटिनी झाली हे सहाजिक आहे कारण तो सगळ्या माध्यमांमध्ये आहे. तो सिनेमात आहे. तो टीव्ही वर असतो. तो डिजिटल माध्यमां मध्येही दिसतो. 

जोहर सारखे बॉलिवूड मध्ये फॉर्म्युला फिल्म बनवणारे लोक हे dream merchants  - सपनोंके सौदागर आहेत. सर्वसामान्य लोकांना नाचगाण्यांनी भरलेल्या काल्पनिक आयुष्याची झगमगीत स्वप्न दाखवायची आणि आपण श्रीमंत व्हायचं हा त्यांचा व्यवसाय आहे. कदाचित हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सूत्र त्याच्या इशाऱ्यावर हलत असतील म्हणून त्याचं नाव पुढे आलं असेल. 

दुसऱ्या एका नावाची सुरवातीच्या दिवसात चर्चा झाली ते सलमान खानचं होतं. त्याचं कारण त्यानं आजवर केलेली कुकर्म हे असेल. मागे वन्य प्राण्यांची शिकार केली म्हणून त्याला कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. नंतर त्याच्या गाडीनी फुटपाथवर झोपलेल्या लोकांना उडवलं म्हणून त्याला कोर्टात जावं लागलं होतं. एवढं करूनही त्याची प्रतिमा कायम "हिरो"चीच राहीली आहे - त्याच्या स्वतःच्या नजरेत आणि त्याच्या चाहत्यांच्या नजरेतही. 

त्याचा नविन सिनेमा मुंबईत लागतो तेंव्हा शहरातल्या एकाही चित्रपटगृहात दुसरा कुठलाही सिनेमा काही दिवस दाखवला जात नाही. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात दर्शक त्याविरुद्ध ब्र ही काढत नाहीत. कोणी असं म्हणत नाही कि आम्हांला दुसरे सिनेमा बघण्याचं ऑप्शन मिळायला हवं. (ते हि समजण्यासारखं आहे: जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, मंदिर विरुद्ध मशिद, असे अनेक ज्वलंत मुद्दे पेटून उठण्यासाठी हाताशी असताना सिनेमाचे ऑप्शन न मिळणे हा मुद्दा फारच नगण्य ठरतो.) 

एक हिंदी वाक्प्रचार सलमान खानला फिट बसतो -  दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. किंवा वरील इंग्रजी वाक्य  - you can fool some of the people all the time. तुम्ही काही लोकांना कायम मुर्ख बनवु शकता - ज्याचं तंत्र बहुतेक त्याला आता चांगलं अवगत झालंय. बॉलीवूडच्या दुटप्पीपणाचं सलमान हे एक उदाहरण आहे. 

नव्वद कि दोन हजारच्या पहिल्या दशकात शायनी अहुजा नावाचा एक नट होता. काही सिनेमात त्यानं चांगलं काम केलं होतं. एक दिवस त्याच्या कामवालीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्याचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं. आज त्याचं नावही बॉलिवूडच्या आत किंवा बाहेर कोणाला आठवत नाही. पण गंभीर आरोप होऊनही सलमान खान आणि संजय दत्त सारख्या नटांच हिंदी सिनेसृष्टीतलं आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनातलं स्थान अढळ आहे. त्या स्थानाला कोणी धक्का लावू शकलेल नाही. हि काय जादू आहे? भरपूर पैसे खर्च करून डॅमेज कंट्रोल करणं- स्वतःविषयी चांगल्या बातम्या छापून आणणं त्यांना शक्य आहे म्हणून? 

काही वर्षांपूर्वी सुलतान नावाचा सिनेमा आला होता. तो बघताना असं वाटलं कि जसं वय वाढतंय तस सलमान खानच स्वतः वरचं प्रेमही वाढतंय. सुलतान मध्ये तो सुलतान नावाच्या पैलवानाच्या भूमिकेत दिसतो. पैलवान सुलतान जेंव्हा कुस्तीची लढत खेळण्यासाठी स्टेडियम मध्ये शिरतो  -  कमावलेल शरीर, अंगात शर्ट नाही, चेहऱ्यावर रुबाब  - तेंव्हा अख्ख स्टेडियम "सुलतान.. सुलतान" असा त्याच्या नावाचा जयघोष करत असतं. ते दृश्य बघताना थेटरातुन उठून जावंसं वाटत होत. असं वाटलं कि पडद्यावरच्या सुलतानच्या रूपात सलमान खान आपलं स्वप्न पूर्ण करून घेतोय - आपल्या कमावलेल्या दणकट शरीराच उघडं प्रदर्शन मांडत स्टेडियम मध्ये शिरण्याचं - अख्ख स्टेडियम "सलमान सलमान" असा त्याच्या नावाचा ऊदोऊदो करीत असताना. सलमान खान सारखे "हिरो" आणि कपिल शर्मा सारखे शो हि हिंदी सिनेसृष्टीनी जन्माला घातलेली आणि पोसलेली बाळं आहेत. त्यांची लोकप्रियता हा खरतर काळजीचा विषय व्हायला हवा. 

सलमाननं त्याच्या चॅरिटीला - being human असं नाव दिलंय. हे नाव देऊन त्यानं जणू जगजाहीर करून टाकलाय कि  I am just being human . माणसाच्या हातुन चुका होत असतात. "ह्युमन" असल्यामुळे चुका करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावत रहाणार. कित्येक लोक त्याच्या चॅरिटीचे कपडे विकत घेऊन ते नाव आपल्या छातीवर, पाठीवर मिरवतात. 

सुरवातीला या दोन नावांची चर्चा झाली. मग चर्चेनं आपली दिशा बदलली आणि ती वेगळ्याच मार्गानी जाऊ लागली. पण ज्या मार्गाने जावी असं वाटत होतं त्या मार्गानी गेली नाही. त्या सुमारास चित्रपट सृष्टीशी संबंधित सुशांत सिंग खेरीज आणखी दोन जण गेले. त्यामागे त्यांना आलेलं नैराश्य कारणीभूत होतं असं म्हंटलं गेलं. पण नैराश्याविषयी किंवा त्या वरील उपचारां विषयी फारशी चर्चा झाली नाही.  

एकदा एका मॉम्ज नाईट आउटला  - एका वर्गातल्या मुलांच्या आया एकत्र जेवायला बाहेर जातात तसं - एक आई आपल्या धूम्रपान सोडण्याच्या प्रयत्नांविषयी सांगत होती. धूम्रपान सोडणं सोप्प जावं म्हणून ती डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार औषध घेत होती. त्या औषधाचं नाव ऐकल्यावर दुसरी एक आई कळकळीनं तिला काय म्हणाली कि, " ते औषध घेऊ नकोस. ताबडतोब थांबव. माझ्या नवऱ्याला त्या औषधा विषयी बरीच माहिती आहे. त्या औषधानी आत्महत्येचे विचार मनात येतात. युरोप मध्ये तशा केसेस घडल्यावर तिथे त्या औषधावर बंदी घालण्यात आली आहे." 

आधुनिक औषधांच्या अघोरी साईड इफेक्ट्स बद्दल त्या औषधांच्या जाहिरातीं मध्येही सांगितलं जातं. मागे एक पापण्यांचे केस दाट करणाऱ्या औषधाची जाहीरात लागायची. त्यात इशाऱ्या दाखल असं म्हंटल जायचं की हे औषध घेतल्याने अंधत्व येण्याची शक्यता आहे. कॅन्सर, किडनी खराब होणे, डिप्रेशन आणि इतरही अनेक गंभीर साईड इफेक्ट्स कित्येक औषधांच्या जाहिरातीं मध्ये स्पष्ट नमूद केलेले असतात. एकदा औषधांचे दोन - तीन ऑप्शन्स सांगताना डॉकटर एका औषधा विषयी मला म्हणाली होती, " या औषधाच्या उंदरांवरील प्रयोगामध्ये उंदरांना घशाचा कर्करोग झाल्याचं आढळलं आहे."

सत्तरच्या दशकात असा समज होता कि जो गहू अमेरिकन लोक खात नाहीत तो भारतात पाठवला जातो. जी औषधं कडक स्थानिक नियमांमुळे युरोप - अमेरिकेत विकता येत नाहीत ती भारतासारख्या - कुछ भी चलता है टाईप देशात विकली जात आहेत कि काय यावर चर्चा व्हायला हवी होती पण तशी झाली नाही. नैराश्य हा इतका दुर्धर असाध्य आजार कसा काय झाला कि तज्ञांचे उपचार चालू असतानाही रुग्ण त्यातुन बरे होत नाहीत यावरही चर्चा झाली नाही. चर्चेला वेगळंच वळण लागलं. 

त्यात महिलांच्या एकदोन आभूषणांनी आपले हात धुऊन घेतले. पाटली घरंगळत कुठंतरी चाललीय. पैंजण जोरजोरात छुनछुन करतायत. शहरात फार अराजकता माजली आहे असं वाटतय. तरी मी मागेच म्हंटल होतं कि बॉलिवूडला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर हलवायची वेळ आली आहे. बाकी काही नाही तरी निव्वळ शहरातली गर्दी कमी करण्यासाठी. गर्दी कशी कमी करायची ह्याचा विचार इतर राज्यातुन मुंबईत आलेले लोक करू शकणार नाही. तो विचार मराठी माणसांनाच करावा लागेल.

बॉलिवूडला मुंबई बाहेर हलवण्याचं दुसरं कारण म्हणजे तिथली मंडळी फारशी शांतताप्रिय आहेत असं वाटत नाही. सत्तरच्या दशकात तेथील चित्रपट निर्मित माध्ये स्मगलर्सचा पैसा गुंतलेला असायचा असं म्हंटल जातं . ऐंशीच्या दशकात त्यांची जागा गॅंगस्टर्सनी घेतली. नव्वदच्या दशकाच्या शेवटी - नविन सहस्रकाच्या सुरवातीला असं म्हंटलं गेलं कि बॉलिवुड आता सुधारतय. तिथे कॉर्पोरेट कल्चर येऊ लागलंय. तिथली शिस्तबद्धता वाढली आहे. पण कॉर्पोरेट कल्चरची शिस्तबद्धता बॉलिवूडकरांना फारशी झेपलेली दिसत नाही. बाहेरचे गुंड कमी झाले म्हणून कि काय त्यांनी आता आपलीच इन -हाऊस गुंडगिरी सुरु केलेली दिसते. त्याला साजेसं फिल्मी नाव दिलं गेलंय - बॉलिवूड माफिया. हिंदी भाषिक प्रदेशातून बेशिस्त आणि गुंडगिरी वृत्ती शहरात आणि राज्यात पसरत आहे का यावर विचारही मराठी माणसांनाच करावा लागेल. दुसरं कोण करणार?

तिसरं कारण म्हणजे बऱ्याच मराठी लोकांना हिंदी सिनेसृष्टीचं, तिथल्या नटनट्यांचं फारसं कौतुक नसतं. ते मराठी सिरीयल, मराठी गाण्यांचे कार्यक्रम, मराठी बातम्या यातच जास्त रमतात. मग हिंदी सिनेसृष्टी मुंबईत असण्याचं प्रयोजन काय?  - याला अपवाद बहुतेक श्रीदेवीचा असेल. ज्याअर्थी महाराष्ट्र सरकारने तिला स्टेट फ्युनरल देऊ केली त्याअर्थी ती राज्यात प्रचंड लोकप्रिय असावी (?).  

जया बच्चननी संसदेत सादर केलेली आकडेवारी अधिकृत आहे कि नाही माहीत नाही पण ती अचूक आहे असं धरून चाललं तर पाच लाख डायरेक्ट नोकऱ्या आणि पन्नास लाख इन्डायरेकट नोकऱ्या बॉलिवूड मुळे लोकांना मिळतात. आणि त्याच्याशी निगडित जे उत्पन्न शहराला कि राज्याला मिळत असेल ते. एवढ्या नोकऱ्या राज्याबाहेर गेल्या तर इथल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल कि काय याची काळजी वाटण स्वाभाविक आहे. सुरवातीला बॉलिवूडपासुन मिळणाऱ्या उत्पन्नाशिवाय राज्याच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करण अशक्यप्राय वाटण्याचीही शक्यता आहे. 

परंतु कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधी तीची कल्पना करणं आवश्यक असतं. राईट बंधूं कल्पना करु शकले म्हणून विमानं प्रत्यक्षात उतरू लागली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली तेंव्हा कुठे ते स्थापन झालं. महाराजांचं नाव  घेत आपण जर परदेशातुन बुलेट ट्रेन राज्यात आणण्याची स्वप्न बघत राहिलो तर ती येईलही पण त्यामुळे मुंबईतली गर्दी कमी होईल का?  

उत्तर प्रदेश जर हिंदी सिनेसृष्टीला आपल्याकडे नेऊ इच्छित असेल तर त्यात एवढं घाबरण्यसारखं काय आहे? ते हि देशातील एक राज्य आहे. त्याची प्रगती हि देशाची प्रगती आहे. मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी आणि बॉलिवूडला उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी या दोन राज्यांनी आपसात सहकार्य केलं तर त्यात सर्वसामान्य लोकांचं एवढं काय बिघडेल? हिंदी सिनेमा सृष्टीतुन मिळणाऱ्या उत्पन्ना शिवाय आपण राज्य आणि शहर चालवू  शकतो -  किमान एवढा आत्मविश्वास तरी शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवून घेणाऱ्यांच्यात असायला हवा. शिवाय आजच्या झुमच्या जमान्यात, आणि हवाई प्रवास दररोजचा झालेला असताना किती लोकांना हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी प्रत्यक्ष उत्तर प्रदेशात जाऊन रहावं लागेल हा हि एक मुद्दा आहे. 

ज्या सिनेसृष्टीनी पन्नास पेक्षा जास्त वर्ष स्थानिक भाषा, स्थानिक संस्कृती, स्थानिक लोक यांचा मान ठेवला नाही; या शहरात स्वतःच एक स्वतंत्र जग निर्माण केलं ज्यात प्रवेश करण्याचा व्हिसा आपल्याला कधी मिळु शकणार नाही अशी मराठी कलाकारांची भावना झाली; मराठी माणसांची घाटी, पांडू हवालदार अशी अवहेलना केली गेली ज्यामुळे आपल्याला आपल्या भाषेविषयी आणि स्वतः विषयी इतका न्यूनगंड निर्माण झाला कि मुंबईत लोक मराठी बोलेनासे झाले; हिंदी सिनेसृष्टीतील एखादी व्यक्ती दोन मोडके तोडके मराठी शब्द बोलली तर त्यात आपण धन्यता मानू लागलो; मराठी लोकांना हिंदी नीट बोलता येत नाही म्हणून हिंदी सिनेमात प्रवेश मिळेना पण हिंदी सिनेमात चुकून कधी एखाद दुसरी मराठी व्यक्तिरेखा असली तरी ती ही अस्खलित मराठी बोलत नाही याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं  -  अशा सिनेसृष्टीला कवटाळून बसण्याचा अट्टाहास का? 

हे बदलायचं असेल तर बॉलिवूड -विरहित मुंबईची (मुंबई sans बॉलिवूड) कल्पना करण्याचं धैर्य आधी दाखवावं लागेल तर कदाचित कधीतरी ते प्रत्यक्षात उतरु शकेल. नाहीतर राजकीय नेते सत्तेसाठी लोकांना मुर्ख बनवत रहातील आणि मुंबईला आता कोणी वाली उरलेला नाही असं म्हणत मुंबईकर हळहळत बसतील.