Monday, August 23, 2021

ऊर्जा शोषक


ऊर्जा शोषक -  energy vampires हा शब्द आजकाल फार ऐकू येतो. 

Vampires ही संकल्पना युरोपियन लोककथां मधून आलेली आहे. त्यांच्या वर अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमा येऊन गेलेत. Vampires हे जीव स्वतःहून जगू शकत नाहीत. ते दुसऱ्यांच्या जीवनाचं सत्व शोषून -  दुसऱ्यांचं रक्त पिऊन जगतात. त्याप्रमाणे ऊर्जा शोषक लोक स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यांच्या ऊर्जेचं शोषण करतात.  

डॉकटर ख्रिसचीऍन नॉर्थरूप (Christiane Northrup M.D.) यांनी ऊर्जा शोषकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा यावर पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे Dodging the Energy Vampires. डॉ नॉर्थरूप पेशाने स्त्री रोग तज्ञ आहेत. अनेक वर्षे तो व्यवसाय केल्यावर आता त्या सर्व समावेशक (प्राचीन + अर्वाचीन ) उपचार पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांच्या पुस्तकाचा भर स्त्रीया किंवा पुरुषांनी ऊर्जा शोषक जोडीदारां पासून आपला बचाव कसा करावा यावर आहे.

ऊर्जा शोषक जोडीदार मिळाला किंवा मिळाली तर त्यांच्या पासून लांब जाणं, त्यांना आपल्या आयुष्यातुन वगळण हा त्यावरचा एकमेव उपाय असतो कारण त्या लोकांचं वागणं कधी बदलत नाही. पराकोटीच्या आत्मकेंद्रित वृत्तीने जोडीदाराला कसं दुखवायचं ते ऊर्जा शोषकांना चांगलं जमतं.

ऊर्जा शोषक हे केवळ जोडीदारच नाही तर वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटू शकतात. त्यात आपले आईवडील, भाऊबहीण, जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारी, ऑफिस मधले सहकारी, अनोळखी लोक कोणीही असू शकतं. त्यांना वेळीच ओळखून त्यांच्या पासुन आपला बचाव केला नाही तर आपलं शारिरीक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकतं.

आईवडील मुलांच्या ऊर्जेचं शोषण कसं करतील असा प्रश्न पडू शकतो. पण दोन मुलं असली तर एका मुलाची कायम काळ्जी आणि लाड करायचे आणि दुसऱ्य मुलावर कायम अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचं ओझं टाकायचं असं करणारे आई किंवा वडील असू शकतात. 

जोडीदार हे मनानी किंवा कायद्यानी जोडलेलं नातं असतं. ते बऱ्याच मोठेपणी आपल्या आयुष्यात येतं. सोप्प नसलं तरी प्रयत्न केल्यावर ते तोडता येऊ शकतं. जास्त त्रासदायक असतं ते रक्ताचं नातं ज्या नात्यामुळे भरपूर मानसिक छळ होत असला तरी ते सहजासहजी लक्षात येतं नाही. लहानपणापासून त्याची सवय झालेली असते. तो छळ अंगात भिनलेला असतो. 

नातं मनाचं असो किंवा रक्ताचं - ऊर्जा शोषकांच्या वागण्याचा वारंवार त्रास होऊ लागला तर डोळसपणे त्यांचं वागणं तपासुन निग्रहाने त्यांना लांब ठेवण्याचा कठोरपणा करायला शिकावं लागतं. मुळातच ते तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात याचं कारण तुम्ही empath असता. कठोरपणा तुमच्या स्वभावात नसतो. (empath - from empathy - दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची, दुसऱ्यांबद्दल कणव वाटण्याची कुवत)

ऊर्जा शोषकां पासून वेगळं होणं जमलं नाही तर self- care - स्वतःची काळजी घेणे, स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हाच एक उपाय उरतो. ऊर्जा शोषक दुसऱ्यांची पर्वा करत नाहीत. त्यांचं आयुष्यच दुसऱ्यांची ऊर्जा शोषण्यावर अवलंबून असत. अंतर्गत अस्वस्थता बऱ्याच लोकांमध्ये असते. काही लोक त्याचा स्वतःला त्रास करून घेतात. ऊर्जा शोषक दुसऱ्यांना त्रास देतात.

एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा आपल्याला इतका त्रास होतो कि आपण म्हणतो - ती नेहमी माझं डोकं खाते. हे क्वचित कधितरी घडलं तर सहन करता येतं. पण वारंवार झालं तर त्याचा नकळत आपल्यावर खोल परिणाम होतो. काही लोकांचा स्वभाव खूप नकारात्मक, विषारी असतो. त्यांच्या संगतीत जास्त वेळ घालवला तर ती नकारात्मकता, ते वीष कायमच आपल्यात उतरतं. काही लोक उगीचच आपला वेळ खातात. काहींना नेहमी तुमच्या समोर स्वतःच्या दुःख्खाचा पाढा वाचायला आवडतं. नसलेल्या दुःख्खाचं अवडंबर माजवून दुसऱ्यांच्या कडून सहानुभूती मिळवणे ह्यात ऊर्जा शोषकांचा हातखंडा असतो. 

एनर्जी व्हॅम्पायर हा शब्द समोर आला कि त्याबरोबरच दुसरा शब्द समोर येतो तो म्हणजे empath . हे दोन शब्द हातात हात घालून येतात. Empaths कायम सहानुभूतीने डबडबलेले असतात. त्यांना सगळ्यांच्या बद्दल सहानुभूती वाटते. कोण सहानुभूती, दयामाया दाखवण्याच्या लायकीचं आहे, कोण नाही असा भेदाभेद empaths करू शकत नाहीत. त्यांच्या मनात कोणाबद्दल काळंबेरं नसतं. त्यामुळे आपल्या बद्दल कोणाच्या मनात काळंबेरं असू शकेल हे त्यांच्या लक्षात येत नाही. ऊर्जा शोषक अशा लोकांना बरोबर हेरतात आणि त्यांच्यावर झडप घालून त्यांची ऊर्जा शोषतात. Empath हे ऊर्जा शोषकांचं सावज असतं. 

रोजच्या आयुष्यात आपल्या भोवती वावरणाऱ्या ऊर्जा शोषकांना ओळखणं सोप्प नसतं. पण त्यांना ओळखून त्यांच्या पासून स्वतःचा बचाव करणं फार गरजेचं असतं. तसं केलं नाही तर आपलं मानसिक,शारीरिक किंवा आर्थिक आरोग्य बिघडू शकतं. एखादी व्यक्ती खूप सरळमार्गी असेल, नाका समोर बघून चालण्याच्या वृत्तीची असेल तर तिच्या लक्षातही येत नाही कि तिच्या भोवतीच्या वर्तुळात कोणतरी तिच्या ऊर्जेचं शोषण करण्यासाठी टपून बसलेलं आहे. पण तसे टपून बसलेले लोक असू शकतात. 

एका घरात भावंडांच्या मध्ये प्रचंड सिबलिंग रायव्हरली - आपसातली चढाओढ असते. कुटुंबाची एकी, भावंडांचं प्रेम या गोंडस पांघरूणा खाली ती झाकायचा प्रयत्न केला जातो. तरी आपसातली चुरस लपत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन भावंडं असतात. त्यातील मुलीचं लग्न होतं. तिची मुलं मोठी होतात. तिचा संसार सुरु असतो. मग बऱ्याच वर्षांनी भावाचं लग्न होतं. त्याला मुलं होतात. भावाची व्यवसायातली प्रगती, त्याच्या मुलांचं आपल्या माहेरी होत असलेलं कौतुन बहिणीला सहन होत नाही. ती मुलांसह माहेरी येऊन रहाते. यापुढे मग *मीमीमी, माझी मुलं आणि त्यांचं कल्याण ह्याकडे माहेरी सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. शेअर कर, शेअर कर, तुझ्याकडे आहे ते शेअर कर, तुला तरी आमच्या शिवाय कोण आहे असा सतत पाठपुरावा करून भावाची ऊर्जा शोषली जाते. 

एका व्यक्तीच्या हट्टापायी इतरांना त्रास होऊ शकतो. बायको आणि मुलं सोडून गेल्यावर बहिणीच्या नवऱ्याचा मृत्यू होतो. शेअर कर, शेअर कर, शेअर कर चा सारखा तगादा भावाच्या मागे लावल्यामुळे त्याच्यावर जीवघेणं आजारपण कोसळतं. त्याला आपल्या व्यवसातलं लक्ष कमी करावं लागतं. त्याची प्रगती थांबते. तरुण वयात भावावर ओढवलेल्या आजारपणाचे खोल परिणाम त्याच्या बायको - मुलांना भोगावे  लागतात. काळाच्या पडद्यावर हे सगळे ठिपके वेगवेगळे आणि लांबलांब दिसतत. पण जर ते ठिपके जोडता आले तर चित्र स्पष्ट होत जातं. मधल्या काळात बहिणीच्या मह्त्वाकांक्षेची घोडदौड न थांबता अव्याहत चालू असते. पण म्हणून भावाची ऊर्जा शोषण्याचं काम ती थांबवते असं नाही. ते चालूच रहातं. 

तुम्ही नाका समोर बघून चालत असताना कधी कोण ऊर्जा शोषक तुम्हाला येऊन चिकटेल सांगता येत नाही. 

मंदा आणि कुंदा दोघी बहीणी असतात. मंदाला मंद रिकामटेकडेपण सतावत असतं. आई आणि भावंडांच्या आयुष्यात मनसोक्त ढवळाढवळ करून ती वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. पण मुलं जशी मोठी होतात तसं रिकामटेकडेपण वाढत जातं. बहीण आपल्या जवळ असेल तर वेळ चांगला जाईल असं तिला वाटतं. परंतु बहीण जवळ हवी असली तरी स्वतःच्या घरात नको असते.

कुंदाची सोय दुसऱ्या कोणाच्या तरी घरात करण्यात येते. ते घर तुमचं असू शकतं. तुम्ही कुरबुर केली तर - एक तीळ सात जणांनी वाटून खावा अशी आपल्या संस्कृतीत म्हण आहे याची तुम्हांला आठवण करून दिली जाते. कुंदा तुमच्या घरात येऊन राहिल्यावर तुमच्या घरातलं वातावरण कुंद होतं. 

बहीण जवळ रहायला आल्यावर मंदाचं रिकामटेकडेपण थोडं कमी होतं. त्यातच कुंदाच्या मुलीचं लग्ना ठरतं. मग तर काय मज्जाच मज्जा. लग्न हा कोणाच्याही रिकामटेकडेपणावर रामबाण उपाय असतो. भाचीच्या लग्नात पुढाकार घेण्याची संधी मंदा दवडत नाही. लग्न झाल्यावर भाची आणि तिचा नवरा रहाणार कुठे याची काळजी करण्याची तिला काही गरज वाटत नाही. तिला ते स्वतःच्या घरात नको असतात ... बस्स. एवढीच तिची माफक अपेक्षा असते. आई काय किंवा मुलगी काय आपल्या घरात कोणी नको यावर मंदा ठाम असते. लग्न झालेली भाची नवऱ्या सकट तुमच्याच घरात रहायला येते. या दोघांना तरी तुमच्या घरात ठेऊन घ्या असं तुम्ही पुटपुटलात तर एक तीळ सात जणांत वाटून घ्यायची म्हण फक्त तुम्हांलाचं लागू हॊते, आम्हांला नाही असं तुम्हांला सुनावण्यात येतं. 

या ऊर्जा शोषकां पासुन स्वतःची सुटका करून घेण्यासाठी एखादी जादूची कांडी सापडते का ते शोधायला म्हणूत तुम्ही ऍमेझॉनच्या जंगलात तपासाला निघता . 


*मीमीमीमीमी करणारे नार्सिसिस्ट (आत्मपूजक - स्वतःची पूजा करणारे) असू शकतात. नार्सिसिस्ट फक्त स्वतःचाच विचार करतात. दुसऱ्यांचा विचार करण्याची, दुसऱ्यांबद्दल सहानुभूति वाटण्याची क्षमता त्यांच्या मध्ये नसते. सगळे नार्सिसिस्ट ऊर्जा शोषक असतात. पण सगळे ऊर्जा शोषक नार्सिसिस्ट असतात का? एखादी व्यक्ती नार्सिसिस्ट आहे कि नाही याचं निदान करणं मानसशास्त्राच्या अखत्यारीत येतं. इंटरनेटवर वर एनर्जी व्हॅम्पायर्स आणि नार्सिसिझम या विषयावर भरपूर माहिती उपलब्ध आहे जेणेकरून आपल्या भोवतालच्या ऊर्जा शोषकांना कसं ओळखायचं याबाबतीत आपण जागरूक होऊ शकतो.