Monday, September 6, 2021

घटस्फोटाची रोपं


मलिंडा आणि बिल गेट्स आणि मकेंझी आणि जेफ बेझोज या जगप्रसिद्ध अतिश्रीमंत जोडप्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकल्यावर किती जणांना वाटलं असेल - ते घेतात तर मी का नको? जगभरात कोट्ट्यावधी लोक ज्यांना आदर्श मानत असतील अशी दोन जोडपी आपली २५-३० वर्ष जुनी लग्न संपवताना बघून किती जणांच्या मनातील घटस्फोटाच्या बीजाला अंकुर फुटले असतील.   

काहींना मुळातच दुसऱ्यांकडे जे आहे ते स्वतःला हवं असतं. दुसरे जे करतात ते करावंसं वाटतं. 

मैत्रिण फेसबुकवर आपले प्रवासाचे फोटो टाकते. लगेच एखाद्या बायकोला वाटतं, "शी, कसलं निरस आयुष्य जगतेय मी. माझी मैत्रीण जगभर फिरतेय. शाळेत दहा वर्ष एकत्र शिकलो आम्ही. आज ती कुठे आहे आणि मी कुठे आहे. मी घरात बसून रांधा - वाढा- उष्टी काढा करतेय आणि ती कुठेतरी जमैका - फिमैकात बीच वर उभी राहून सेल्फी काढतेय" 

खरंतर पाचच मिनिटांपूर्वी तिनं दुसऱ्या एका मैत्रिणीला फोनवर सांगितलेलं असतं, " मला ना आजकाल स्टेकेशनच बरी वाटते. कोणी सांगितलंय ते महिनोन महिने आधी तिकिटं काढा. बॅगा घेऊन विमानतळावर जा. नेमकं निघायच्या दिवशी हवामान खराब होतं. कधी विमान उशिरा सुटतं. कधी सुटतच नाही. सुटलं तरी विमानात खायला काही देत नाहीत. सकाळी लवकर फ्लाईट असेल तर आदल्या रात्री सँडविच करून, अंडी उकडून फ्रीज मध्ये ठेवावी लागतात. खायचे पदार्थ विमानात नेऊ देतात पण घरचं पाणी नेऊ देत नाहीत. एवढ्या लोकांच्या बरोबर विमानतळावर आणि विमानात बसायचं, तिथली बाथरूम्स वापरायची म्हणजे व्हायरसची टांगती तलवार डोक्यावर असते. कशाला हवाय तो जीवाला त्रास. त्यापेक्षा घरात बसावं. फिरण्याचे पैसे शॉपिंगवर आणि बाहेर जेवण्यावर उधळावेत. व्हेकेशन पेक्षा स्टेकेशनच बरी". 

पण मैत्रिणीचे प्रवासाचे फोटो बघितले कि तिचं डोकं फिरतं. ते किती वर्षां पूर्वीचे आहेत ते न बघताच ती नवरा आणि मुलांच्यावर खेकसते, "चला, फुटा सगळे जण इथुन. कुठे जायला नको नि यायला नको. दिवसभर आपले नुसते फोनमध्ये डोकं खुपसुन बसलेले असता" 

तसं रांधा -वाढा आणि उष्टी काढा एवढंच माझं आयुष्य झालंय हे म्हणायला खूप नाट्यमय वाटत असलं तरी ते पूर्णपणे खरं नसतं. दुपारची जेवणं - आज सॅलड मागव, उद्या सॅंडविच मागव अशी असतात. रात्री वरण-भात-भाजी खायचा कंटाळा आलाय - चला पिझ्झा मागवूया, टर्कीश, चिनी नाहीतर जपानी मागवूया असं होतं. त्यात रांधायचं काही नसतं. वाढायचही फारसं नसतं. उष्टी काढणे म्हणजे ज्यातून जेवण आलं आहे ते प्लॅस्टिकचे डब्बे धुऊन रिसायकल करणे आणि उरलेलं खरकटं, जेवण आलेल्या पिशवीत टाकून ते कचऱ्याच्या टोपलीत टाकणे इथ पर्यंतच मर्यादीत असतं. पण रांधा - वाढा - उष्टी  करते असं म्हंटलं कि आपण खूप कष्ट करतो असं वाटतं. 

त्यातच बेझोज आणि गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीची भर पडते. घरातल्या कुंडीत एक बीज रोवलं जातं. 

लॉकडाऊन मुळे नेहमीच्या काही गोष्टी करता न आल्याने आधीच कंटाळा आलेला असतो. नवऱ्याला रेस्टोरंट मध्ये जेवायला जायची आवड असते. बराच काळ ते शक्य होत नाही. नंतर काही प्रमाणात शक्य झालं तरी व्हॅक्सीन घेतली की नाही,  टेस्ट केली कि नाही अशा प्रश्नांची उत्तरे दिली तरच आत प्रवेश मिळतो. काहींना त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडत नाही. मग कंटाळा अधिक राग अशी बेरीज होते. 

कुंडीतल्या बीजाला खतपाणी मिळतं. 

थोडे दिवस घ्यावा कि घेऊ नये अशी घालमेल होते. घेतला तर काय होईल, नाही घेतला तर काय होईल यावर चर्चा होते. घ्यायचाच असेल तर वकील हवेत -दोघांचे वेगवेगळे - एक त्याचा आणि एक तिचा. ओळखीच्या वकिलाला फोन लावला जातो - "बाबा रे, घटस्फोट वाल्या वकिलांची नावं माहिती असली तर दे". तो म्हणतो, "नक्कीच, मला बरीच नावं माहीत आहेत. चार वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी वेगळे झालो तेंव्हा आम्ही त्यापैकी काही जणांशी बोललो होतो." 

"अरे व्वा! तुझा पण घटस्फोट झालाय. फारच छान." 

हे ऐकल्यावर कुंडीत झारी भर पाणी पडतं. 

आपसात अजिबात न पटणाऱ्या कित्यके जोडप्यांना आयुष्यभर भांडत एका घरात राहावं लागतं कारण दोन वेगवेगळी घरं घेणं परवडत नाही. दोन घरं परवडतील कि नाही हे ठरवण्यासाठी आर्थिक बाबीं मधल्या तज्ञाची मदत लागते. 

त्याला फोन लावला जातो. तो म्हणतो, "अर्रे, त्यात काहीच कठीण नाही. चार वर्षांपूर्वी माझा आणि माझ्या पत्नीचा घटस्फोट झाला. आम्ही एका मध्यस्ताची मदत घेतली. त्याने सगळी विभागणी एकदम छान करून दिली. " 

"अरे वा! तुझाही घटस्फोट झाला? चार वर्षांपूर्वी ? घटस्फोटाची साथ आली होती कि काय तेंव्हा? "  

हे ऐकलं कि कुंडीत एक चमचा खत पडतं. 

What Women Want  नावाचा सिनेमा वीस वर्षांपूर्वी येऊन गेला. मी तो पाहिला नाही. त्यामुळे बायकांना काय हवं असतं ते मला माहीत नाही. पण मलिंडा गेट्स आणि मकेंझी बेझोज यांना काय हवं आहे हे माध्यमांमध्ये त्यांच्या विषयी जे वाचायला मिळतं त्यावरून समजतं.  

बेझोज यांचा घटस्फोट आधी झाला. त्यातून मकेंझी बेझोजना भरपूर पैसे मिळाले. शिवाय ऍमेझॉन मध्ये छोट्टासा हिस्सा. त्यांच्या प्रचंड संपत्तीतील बरचसे पैसे त्या दान करतात. त्या स्वतः लेखिका आहेत. त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. जेफ बेझोज पासुन घटस्फोट झाल्यावर आता त्यांनी त्यांच्या मुलांच्या शाळेतील शिक्षकाशी लग्न केलं आहे. 

गेट्स घटस्फोट आत्ता होतोय. सिऍटल जवळ गेट्स कुटुंबाचं ६०००० स्क्वेअर फूटाच घर आहे. परंतु मलिंडा गेट्सनी मागे एका मुलाखतीत म्हंटल होतं - "मी वाट बघतेय कधी एकदा आमची मुलं आपापल्या मार्गाने जातील आणि मी आणि बिल १५०० स्क्वेअर फुटाच्या घरात रहायला जाऊ." 

दोघींचेही नवरे अमर्याद संपत्ती मिळवण्याच्या आणि केवळ ह्या ग्रहावरच नाही तर परग्रहांवरही आपलं वर्चस्व स्थापन करण्याच्या मागे असताना, जोडीदार म्हणून शाळा शिक्षकाची निवड करणं - ज्याची मिळकत आणि कार्यक्षेत्र (महत्वाचं असलं तरी) मर्यादित असणार किंवा १५०० स्क्वेअर फुटाच्या लहानशा घरात रहाण्याची स्वप्न बघणं - यातुन दोन्ही बायकांनी दाखवून दिलय कि त्यांना यापूढे काय हवंय. 

भारतापेक्षा अमेरिकेत घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. काही आकडेवारी नुसार जवळपास ५० % अमेरिकन लग्नांच पर्यवसन घटस्फोटात होत. याचं  कारण इथली समाजव्यवस्था, आर्थिक सुब्बत्ता, त्याचे फायदे आणि त्याच्या अनुषंगाने येणारे ताणतणाव हे असावं. शिवाय एकात एक असे अनेक व्यवसाय त्यामुळे तयार होतात  - कौटुंबिक कायद्यात प्रवीण असलेले वकिल, त्यांच्याशी संलग्न अनेक प्रकारचे सल्लगार, आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि त्यांनी दुसरी लग्न केली कि बदलत्या कुटुंबाशी मुलांना जुळवुन घ्यावं लागतं म्हणून मुलांसाठी वेगवेगळे समुपदेशक वगैरे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जितके जास्त व्यवसाय तयार होतील तितकं चागलं. 

पूर्वी भारतात घटस्फोट हा प्रकार फारसा नव्हता. लग्नातुन बाहेर पडावंसं वाटलं तर पुरुष पहिली बायको असतानाही दुसरं लग्न करायचे. मुलं लहान असतील तर नवऱ्या बरोबर रहाणे आणि तो जे देईल त्यात संसार चालवणे याशिवाय बायकांना गत्यंतर नसायचं. माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर मुलं मोठी झाली कि बायका माहेर जाऊन रहायच्या. 

कोल्हापूर- सांगली परिसरातील इनामदारांच्या वाड्यात अशा परत आलेल्या आत्त्या असायच्या. लहानपणी नातेवाईकांच्या गप्पात ऐकलेलं मला आठवतंय- बडोद्याची आत्या आता इथेच असते, इंदूरची आत्या आली ती परत कधी घरी गेलीच नाही. फारसा गाजावाजा न करता बायका आपली घर सोडून माहेरच्या घरात शिरायच्या. आधीच पन्नास माणसं असलेल्या एकत्र कुटुंबात ते खपून जायचं. त्या घरात त्यांना काही महत्व मिळत नसे. आईच्या भोवती राहून तिला मिळ्णाऱ्यातलं थोडंसं महत्व त्या स्वतःकडे घेऊ पहातायत असं वाटायचं.   

बहिणाबाईंच्या चार ओळी त्यांच्या काळातील परिस्थितीचं वर्णन करतात. त्यांच्या आज माहेराले जाणं या कवितेत बहिणाबाई म्हणतात: 

देते देरे योग्या ध्यान 

ऐक काय मी सांगते 

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते. 

आपल्या मुलीला माहेर मिळावं म्हणून आई प्रसंगी कठीण परिस्थिती सहन करूनही सासरी नांदत असे. अशा प्रकारे विचार करण्याची तेंव्हा आपल्याकडे पद्धत होती. भारतातही जशी आर्थिक प्रगती होतेय तसं घटस्फोटाच प्रमाण वाढतंय. 

गेट्स आणि बेझोज यांच्या व्यवसायाच्या व्यापकतेमुळे त्यांच्या घटस्फोटाची "बातमी " होण अपरिहार्य होतं. तरीही या दोन्ही कुटुंबांनी आपले घटस्फोट खूप भारदस्त पणे हाताळले. त्या विरुद्ध ९० च्या दशकात न्यूयॉर्क सिटीमध्ये तेंव्हाचे महापौर रुडी ज्युलियानी यांचा घटस्फोट आणि ट्रम्प साहेबांचा त्यांची पहिली पत्नी ईव्हाना ट्रम्प पासूनचा घटस्फोट यांचं जवळपास तमाशात रूपांतर झालं होतं. 

ज्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला आहे त्यांच्या मुलांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त असतं असं म्हणतात. सहाजिक आहे. आईबाबांनी जो मार्ग दाखवून दिला त्यावरून चालणं मुलांना सोप्प जात असेल. आईनी क्षुल्लक कारणा वरून घर सोडलं तर मुलगीही तसं का नाही करणार? ज्योत से ज्योत जगाते चलो तसं रोप से रोप लगाते चलो अशी घटस्फोटाची रोपं अशा प्रकारे पसरत असावती. 

हे म्हणजे वृद्धाश्रमांसारखं झालं. अमेरिकेत वृद्धाश्रम हि मूलभूत गरज आहे. फार पूर्वीपासून आईवडिल आणि मुलांनी एकत्र रहायची इथे पद्धत नाही. भारतात केवळ दोनतीन दशकांपूर्वी वृद्धाश्रम फारसे प्रचलित नव्हते. पण आता खेडेगावातही त्यांची गरज भासू लागलेली दिसते. बघता बघता घटस्फोटाची रोपं भारतात पसरून त्यांचं प्रमाणही अमेरिके इतकंच होण्याची शक्यता आहे. 






Saturday, September 4, 2021

Oprah's Mantra 3