Friday, October 12, 2018

माझं सुध्दा


काल पुन्हा ती स्वप्नात आली.

असंबध्द काहीतरी बरळत होती;  "एखादं सिनेमा / नाटक  आपलं निखळ मनोरंजन करतं ,  तर एखादं  आपल्याला खूप विचार करायला लावततं.  श्रेष्ठ कलाकृती कुठली जी निव्वळ मनोरंजन करते ती,  जी खूप हसवते ती,  जी खूप रडवते ती,  जी खूप घाबरवते ती,   कि जी खूप विचार करायला लावते ती.  आणि जर एखाद्य कलाकृतीनी या सगळ्या भावना आपल्या मनात एकाच वेळी जागृत केल्या तर... तर त्या कलाकृतीला काय म्हणायचं?"

वाटलं,  हिला काय झालं असलं विचित्र काहीतरी बडबडायला.  तिला विचारलं काय झालं तर ती एकदम रडायला लागली. ओक्सबोक्शी रडली, रड रड रडली बिचारी.  मी ही रडू दिलं.  दुसरं करणार तरी काय.  अधून  मधून येते ती स्वप्नात.  मनात काहीतरी सलत असेल तर मन मोकळं करायला येते.  वाटलं त्यातलाच काहीतरी प्रकार असावा. मी गप्प बसून राहिले.

थोडी शांत झाल्यावर नाक,  डोळे पुसत म्हणाली,  "इज्जत लुटली माझी,  बरबाद केलं मला".

"कोणी?"

"त्या नाटकानं."

"कुठलं नाटक?"

"तेच सध्या चालू आहे ते.  ब्युटी अँड द बीस्ट."

"म्हणजे"?

"एवढं सुद्धा इंग्रजी समजत नाही तुला?  ब्युटी अँड द बीस्ट म्हणजे सुंदरी आणि श्वापद.  प्रयोग चालू आहेत सध्या त्याचे माझ्या इथे?"

"पण त्यावरून तुला एवढं रडायला काय झालं"?

तिच्या आवाजात दुःख, वेदना, क्रोध, काळजी, भीती सगळंच होतं.   म्हणाली,  "त्या नाटकाचं काही नाही गं.  तुला माहित आहे मी पहिल्या पासून किती मोकळ्या मनाची आहे ते.  पण त्यावरून जे वादळ उठलंय ना त्याचा फार त्रास होतोय बघ.  पूर्वी कसं होतं,  एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटली की जा कोर्टात आणि मग कोर्टाला ठरवू दे कोणाला शिक्षा करायची कि नाही, कोणावर बंदी आणायची कि नाही ते.  आता कोर्ट राहिलं बाजूला आणि टीव्हीवाल्यांचाच आरडा ओरडा फार झालाय."

मला शांत झोपायचं होतं.  तिनं लवकर जावं म्हणून म्हंटलं,  "करू दे ना त्यांना किती आरडाओरडा करायचा ते.  तू कशाला तिकडे लक्ष देतेस.  तू आपली मजेत रहा.  नवरात्र सुरु झालंय . दसरा जवळ आलाय.  थोड्याच दिवसांनी दिवाळी येईल.  त्या नंतर नाताळ.  सणांचा काही तोटा नाही आपल्याकडे.  सगळे सण मस्त एन्जॉय कर.  काळजी सोड.  हल्लीची मुलं म्हणतात तसं, तू चील्ल मार ".

"चील्ल मारू म्हणतेस?   चिल्लम आणून दे त्यापेक्षा.  त्यानी तरी बरं वाटतं का बघते.  एकतर इथे गर्दीनी माझा उर फाटायची वेळ आलीय.  कुठूनही कोणीही येतं.  इथे झोपड्या काय बांधतं.  बंगले काय बांधतं.  आणि वरून असली घाणेरडी भाषा आणि आरडा ओरडा.  वैताग आलाय नुसता.  पूर्वी नव्हतं बाई असं.  तुम्ही लोकांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं म्हणून हे सगळं सहन करायची पाळी आली माझ्यावर. "



                                        



"आता उगीच आमच्यावर कशाला घसरतेस?  आम्ही काय केलं?" तिचा आरोप झटकून टाकायच्या आशेनी मी म्हंटलं.

"तुमच्यावर नाही तर मग कोणावर घसरू.   तुम्हीच जबाबदार आहात याला.  कसली ती रागीट, भांडखोर भाषा आणि तो आरडाओरडा.  कॅमेऱ्यासमोर असले शब्द वापरून बोलतात?   टीव्हीवाल्यांनी नियंत्रण नको का ठेवायला कोण त्यांच्या कार्यक्रमात येऊन काय,  कसं बोलतं त्यावर.  पण टीव्हीवाले स्वतःच जोरजोरात बोंबलत असतात आणि पाहुण्यांनाही ओरडायला लावतात.  तुम्ही चालवून घेता म्हणूनच चाललय ना सगळं.'

"जाऊ दे गं.  आजकाल प्रेक्षकांना सनसनाटी आरडाओरडा आवडतो त्याला आपण काय करणार.  प्रेक्षकांनी जर बघितला   नाही तर टीव्हीवाले आरडाओरडा करतील का?  प्रेक्षक मोठ्या संख्येने बघतात म्हणून टीव्हीवाले ओरडत रहातात.  कबूल कि गर्दीचा तुला नक्कीच त्रास होत असणार.  तो तर सगळ्यानांच होतोय. पण त्यावर उपाय काय?  आणि तुला खरंतर खूप अभिमान वाटायला पाहिजे कि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तुझ्या दारात येतात - आपली मोठमोठी स्वप्न घेऊन ती पुरी करायला."

तिनं एक दीर्घ उसासा टाकला आणि उदास वाणीने म्हणाली, "काटेरी मुगुट आहे बाई हा.  आता नाही झेपत मला.  भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी असे वागतात सगळे.  वर जाणिव नाही ठेवत कसलीच.  मीच किती दिवस सगळ्यांचा भार वाहू.  सुरवातीला वाटलं होतं गावोगावहून लोक येतील,  माझ्या इथली सुव्यवस्था बघून काहीतरी  शिकतील आणि आपापली गावं सुधारतील.  पण यांनी तर उलटच करायला घेतलंय.  या लोकांनी तर माझीच  दुर्दशा करायला घेतलीय त्यांच्या गावांप्रमाणे.  तुम्हा लोकांना ना काळजीच नाही कसली म्हणून आज माझी हि अवस्था झालीय. "

"परत आमच्यावर घसरलीस?"

"नाहीतर काय करू.  तुम्हीच म्हणत असाल सगळ्यांना, आओ जाओ घर तुम्हारा.  म्हणून येतात सगळे इथे गर्दी करायला. देशात इतर मोठी शहरंच नाहीत कि काय? तिथे का नाही जात कोणी?"

"जात असतील गं.  तिथे सुद्धा जात असतील.  आपल्याला काय माहित.  बरं मला सांग,  मगाशी बरळत का होतीस झोपेत बडबडल्या सारखी?"

"झोपेत मी नाही,  तू आहेस.  मी चांगली खडखडीत जागी आहे.  भविष्याच्या काळजीनी झोप उडाली आहे माझी.  जरा डोळा लागेल तर शप्पथ. "

"कोणाच्या भविष्याची काळजी करते आहेस एवढी - आमच्या कि तुझ्या स्वतःच्या?" मी सहज गमतीनं विचारलं.

पण ती गम्मत ऐकायच्या मूडमध्ये नसावी.  उखडून म्हणाली,  " हेच तर माझं दुर्दैव आहे.  तुम्हा लोकांना वाटतंय तूमचं  भवितव्य आणि माझं भवितव्य वेगळं आहे.  भ्रमात आहात तुम्ही सगळे.  माझं काहीही होऊ दे तुम्ही आपले कायम असहाय्य, हतबल, आम्ही काय करू शकतो,  आमच्या हातात काही उरलेलच नाही अशा प्रकारे वागणार.  मग माझी काळजी मलाच करायला हवी.

"तू पुन्हा पुन्हा सारखी आमच्यावर का घसरतेस?  एवढी काही परिस्थिती वाईट दिसत नाही.  तू उगीच अतिरेक करते आहेस."

हे ऐकून तर ती खवळलीच माझ्यावर,  "तुला इथे बसून बोलायला काय जातं.  मला तिथे काय ऐकून घ्यावं लागतं ते बघ जरा.  एकतर सगळे जोरजोरात इंग्रजीत बोलत असतात.  त्यातलं निम्म मला समजत नाही.   त्यांना तरी समजतं का कुणास ठाऊक. म्हणतात - बिल कॉस्बीला जशी शिक्षा झाली तशी इथे व्हायला हवी.  हार्वी वाईनस्टाईनला जे  केलं ते  इथे करायला हवं.   मी 2 ला भारतात आणायची वेळ आली आहे.  ह्यांचे सगळे संदर्भ परदेशी कसे ग?  हे इंग्रजीत भांडणारे लोक स्वतःहून विचार करायची कुवतच हरवून बसलेत कि मनानी कायम परदेशात रहात असतात?  यांना कायम सगळं मार्गदर्शन पाश्चात्य देशातूनच का लागतं.  तिथे नविन काय सुरु होतं आणि आम्ही कधी त्याचं इथे अनुकरण करतो त्यासाठी टपून बसलेले असतात जणू.

"ब्यूटी अँड द बीस्ट हे परदेशी नाटक आहे ना म्हणून बाहेरचे संदर्भ वापरत असतील."  त्या नावाचा ब्रॉडवे शो आहे असं ऐकल्याचं मला आठवत होतं.

"तुला हे सगळं हसण्यावारी न्यायचं असेल तर खुश्शाल ने.  पण सिनेमा आणि टीव्हीवाल्यांच्या या भागिदारीत मधल्या मध्ये मी  आणि माझी संस्कृती भरडली जातेय हे विसरू नकोस".

मला वरमल्यासारखं झालं.  सारवासारव करत तिला म्हंटल,  " तुझा आरोप मी मान्य करते.  आजच्या या परिस्थितीला आम्ही जबाबदार आहोत हे खरं.  तुझ्या इथे मराठीची किंमत कमी करायला,  मराठी माणसांची, संस्कृतीची तुझ्यावरची पकड ढिली करायला आम्हीच जबाबदार आहोत.  त्या अर्थानी म्हणत असशील तर तुझं म्हणणं खरं आहे.  आम्ही सोडलंय तुला वाऱ्यावर.

मी बघते ना मुंबईत रहाणारी कुटुंब - आईवडील मराठी बोलणारे;  मंत्रालय, पोलीस अशा कुठल्यातरी सरकारी खात्यात नोकरी करणारे.  सगळे नातेवाईक मराठी.  पण पोरं कोपऱ्यावरच्या इंग्रजी शाळेत शिकणार आणि म्हणणार, 'माझं मराठी फार खराब आहे.'   बरं या मुलांचं हिंदी आणि इंग्रजी फार उच्च दर्जाचं असतं असंही नाही.  त्या भाषा दामटून बोलतील.  पण मराठी खराब असल्याचाच अभिमान फार.  आणि गम्मत म्हणजे मराठी खराब नसतं त्यांचं.  चांगलं बोलतात.  पण ते कबूल करायला लाजतात.   त्यांना वाटतं कि मराठी येतं म्हंटल तर आपण फार बावळट  दिसू आणि मराठी येत नाही म्हंटलं कि सॉफिस्टिकेटेड - असंलं काहीतरी विचित्र त्रांगडं असतं बघ बिचाऱ्यांच्या डोक्यात.

एखादी म्हणते,  'येतं मला मराठी बोलता.  पण माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती.  बदलीच्या नोकरीत मराठी बोलून चालत नाही.  आणि माझ्या नवऱ्याला मराठी येत नाही.  आम्ही घरात त्याची भाषा बोलतो.  त्यामुळे मला मराठीचा सरावच उरलेला नाही.'  इतका उबग येतो कि नाही असल्या लोकांचा.  वाटतं तिला सांगावं, '' बाई,  मग इथे काय करतेयस?  नवरा- मुलांना घे आणि जाऊन रहा त्याच्या गावी आणि बोल त्याची भाषा किती बोलायची तेवढी.  त्याच्या सकट मुंबईला का चिकटून बसली आहेस'."


                                   
                                          



मी एवढं सगळं तिच्या बाजूनी बोलल्यामुळे ती खुष झालेली दिसली.  कानात बोलावं तसं हळूच म्हणाली, "पटलं ना आता मी काय म्हणते ते.   तुला म्हणून सांगते,  या दृकश्राव्य माध्यमांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करू नका.  पस्तावाल.  फार प्रभावी माध्यमं आहेत ही.  हिंदी सिनेमाची लोकप्रियता तर तुम्हांला आधीच माहीत आहे.  सगळे सिनेमा, त्यातली गाणी वाईट असतात असं मी म्हणत नाही पण मध्येच एखादं अश्लिल अंगविक्षेप असलेलं आयटेम सॉंग घुसडायचं,  परदेशातल्या पॉर्न स्टारला इथे हिरॉईन बनवायचं असले प्रकारही ह्या सिनेसृष्टीत चालतात.  त्याचा तुमच्या मुलांवर वाईट परिणाम होत नसेल असं गृहीत धरू नका.  सिनेसृष्टीचं एवढं स्तोम माजू देऊ नका.  तिथे कुठलीच संस्कृती नाही.  नटनट्यांना एवढं डोक्यावर चढवून ठेऊ नका.  हे असंच चालू राहिलं तर एक दिवस तुमचंच  शहर तुम्हांला परकं वाटायला लागेल.  परवा मराठी पेपरच्या वेब साईटवर बातमी काय होती माहित आहे?  कुठल्याशा द्वितीय- तृतीय श्रेणीच्या माजी सुंदरीचं म्हणे बेबी शॉवर झालं.  डोहाळे जेवण म्हणतात त्याला.   मराठी वर्तमानपत्रवाले सुध्दा डोहाळे जेवण म्हणायला लागले तर भाषेचं काय होणार?  आणि हि नविन परदेशी माध्यमं - त्यांचा प्रभाव तर सिनेमा पेक्षाही जास्त.  सगळी तरुण मंडळी कायम तिथेच वावरत असते.  तिथल्या इंग्रजी पोस्ट पलिकडे बहुतेकांचं वाचन नसेल.  प्रादेशिक भाषेतलं एक पान तरी त्यांना वाचता येईल का कुणास ठाऊक.  कधिकधी माझी फार काळजी वाटते  बघ.  काय होणार आहे माझं पुढे समजत नाही."

तिनं गाडी फिरवून परत स्वतःच्या काळजीवर आणली.  तिचं सांत्वन कसं करावं,  तिला दिलासा कसा द्यावा ते समजेना. स्वतःशीच बोलत असल्या सारखी ती बोलत राहिली,  " तुम्ही सगळे जाल गं एक ना एक दिवस निघून पण मला कायम इथेच रहायला हवं.  माझ्या पुढच्या पिढ्या कशा असतील?  फक्त इंग्रजी बोलणाऱ्या असतील?  जी भाषा मराठीची जागा घेईल ती आपली संस्कृती बरोबर घेऊन येईल.  महाराष्ट्राची इंग्रजी राजधानी अशी माझी अवस्था होईल का गं एक दिवस?"

हे फारच गंभीर होतं.  माझं डोकं काम करेनासं झालं.  सुन्न होऊन मी बसून राहिले.  तिला काय सांगावं काही सुचेना.  तिची काळजी मला समजत नव्हती असं नाही पण मी खूप विचारात पडले.  तशात माझी उठायची वेळ झाली होती.  ती आणखी बराच वेळ बोलत राहिली असती पण तिला मध्येच थांबवत मी म्हंटल,  "ये आता तू.  मला ऊठायला हवं.  माझ्या झोपेचं खोबरं केलंस आज."

मी जा म्हंटल्याचा तिला राग आला नाही आणि रागावून ती तडकाफडकी निघूनही गेली नाही.  उलट शांतपणे हसून म्हणाली, " ते तर कधितरी होणारच होतं - तुझ्या झोपेचं खोबरं गं.  तुझी वेळ झाली असेल तर ऊठ तू.  मी जाते.  पण सवड मिळेल तेंव्हा जरा माझं नाव टाक त्या मी 2 मध्ये."

"मी कसं तुझं नाव टाकू त्यात?

"ते मला काही माहीत नाही.  पण मी 2 जर भारतात येणार असेल तर त्यात पहिलं नाव माझं पाहिजे.  वर्षानुवर्षं लोक माझ्या इच्छे विरुध्द माझ्यावर बळजबरी, अत्याचार,  जबरदस्ती करतायत.  माझ्याशी गैरवर्तणूक, करतायत.  भारतातल्या मी 2 मध्ये पहिलं नाव माझंच हवं."

ती गेल्यावर मी उठले आणि सकाळचा पहिला चहा केला.  गरम चहाचे घुटके घेत कम्प्युटर उघडून बसले.  वाटलं बघावं तरी ती म्हणते त्यात काही तथ्य आहे का.  वेगवेगळ्या क्लिप्स बघितल्या.  त्यात बरच काही होतं.  आगीत तेल ओतू पहाणारा तो टीव्ही वरचा गोंधळ फारच लांच्छनास्पद  होता.  इतके वर्षात अमेरिकन टीव्हीवर मी इतकी असभ्य भाषा आणि आरडाओरडा कधीच पहिला नाही.  कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं आणि काय नाही ह्याच भान इथल्या टीव्हीवर पाळलं  जातं. कार्यक्रमातील वादविवादाचं संतुलन संचालक स्वतः पाळतात आणि पाहुणेही पाळतील याची दक्षता घेतली जाते.  इथे तर संचलक स्वतःच जोरजोरात एकतर्फी ओरडत होते.

वादळाच्या व्हिडीओज बघून डोकं गरगरायला लागलं म्हणून आणखी एक कप चहा केला. चहाचा दुसरा कप संपवत असताना, आजकाल मुंबईला गेल्यावर जे वाटतं ते आठवलं - हिंदी सिनेमा सृष्टीला मुंबई बाहेर हलवलं तर मुंबई स्वच्छ,  सुंदर आणि गर्दी विरहीत होऊ शकेल का?