Sunday, October 13, 2019

ये दिन क्या आये




      
                                                                   


निवडणूक संपली. मग त्यावर उलट सुलट चर्चा झाली. पत्रकारांनी विचारलं कि प्रचार आणि निवडणूक यातील असा एखादा प्रसंग सांगा जो कायम तुमच्या स्मरणात राहील. कोणी म्हणालं की श्रीयुत अक्षय कुमारनी गुलाबी रंगाची विजार घालूंन पंतप्रधानांची मुलाखत घेतली तो प्रसंग सर्वात अविस्मरणिय होता. कोणी दुसरा कुठलातरी प्रसंग कायम लक्षात राहिलं असं सांगितलं. मी ही मग या प्रश्नावर विचार केला आणि राहून राहून एक दृश्य डोळ्यांसमोर येत राहीलं. निवडणूक आणि प्रचाराच्या तापलेल्या वातावरणात, नजरेला गारवा देणाऱ्या हिरवळीवर टाकलेल्या खुर्च्यात बसुन, जुन्या वृक्षांच्या छायेत, हलक्या फुलक्या रंगाचे कपडे घालून तितकेच हलके फुलके प्रश्न पंतप्रधानांना विचारत, अक्षय कुमारनी आपल्या देशबांधवांच्या मनावरचा ताण हलका करण्याची फार बहुमोल कामगिरी बजावली यात शंका नाही पण तरीही मी त्या दृश्याला निवडणूक - प्रचार दृश्य क्रमांक १ चा दर्जा देऊ शकत नाही. माझ्या मते निवडणूक - प्रचार दृश्य क्रमांक १ चा बहुमान दुसऱ्याच एका मुलाखतीला मिळायला हवा.



  



ती मुलाखत म्हणजे स्वतःला साध्वी म्हणवुन घेणाऱ्या एका महिला उमेदवाराची एका वार्ताहराने बागेत उभं राहुन घ्यावी तशी एका गोठ्यात उभं राहुन घेतलेली मुलाखत. फारच वेगळी मुलाखत होती ती. अशा अर्थानी कि भगव्या पेहरावातील स्वयंघोषित साध्वी एका गायी जवळ थांबुन तिला चारा भरवित होती. तिच्या पाठीवरून मायेनी हात फिरवत होती. कुठल्या दिशेनी हात फिरवला कि आपला रक्तदाब (गायीचा नव्हे) नियंत्रित व्हायला मदत होते ते दाखवत होती. पत्रकार आवश्यक ते गांभिर्य चेहऱ्यावर ठेऊन अधून मधून शंका उपस्थित करत होता. ती त्यांला गोमातांची महती विषद करून सांगत होती. मध्येच ती म्हणाली कि तिनं तिचा कर्करोग गोमूत्र उपचारांनी बरा केला. सहज चालता चालता तिनं उपचारांची पाककृती सांगितली - गोमूत्र  + तूप + असच काहीतरी. असेलही. तिला त्या उपचारांचा उपयोग झाला असेलही कदाचित. कुणास ठाऊक. कोणी कुठली उपचार पद्धती वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दा तो नाही.  (स्वयं ---) साध्वी असंही म्हणाली कि गोठा हि साधना आणि तपस्या करण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. तिच्या पाठीमागे उभं असलेल्यांनी मान डोलावत तिची री ओढली.



                                     



ती मुलाखत बघताना सारखं असं मनात येत होतं कि हे दोघे बगिच्यात उभे असल्या सारखे गायींच्या मध्ये उभे आहेत, त्यांच्या मागे लोकांचा मोठा जमाव दिसतोय पण गोठ्यात गोमुत्राचा आणि शेणाचा वास येत नसेल?  सतत चालू असलेल्या मलमूत्र विसर्जन प्रक्रियेमुळे गोठ्यातील जमीन कायम दमट असते. तिथे माशा घोंघावत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कितीही स्वच्छता राखली, शेण खाली पडताच लगोलग साफ केलं तरी गोमूत्र कसं साफ करणार?  कॅमेरे आणि मुलाखतीचा लवाजमा गोठ्यात येण्याआधी जमिनीवर गुलाबजल किंवा अत्तर शिंपडलं तरी गोठ्यातला शेण -गोमुत्राचा वास झाकला गेला असेल असं वाटत नाही. पण यातलं काहीच कॅमेऱ्यावर दिसलं नाही. कोणी नाक मुरडताना दिसलं नाही कि घोंघावणाऱ्या माशांनी त्रस्त झालेलं दिसलं नाही. पडद्यावर स्वयं(---) साध्वी आणि वार्ताहार ऍमस्टरडॅम मध्ये ट्युलिप्सच्या ताटव्यांच्या मध्ये उभं असावं इतक्या सहज गोठ्यात बांधलेल्या गायींच्या मध्ये उभे होते (वार्ताहराच्या मनात तेंव्हा ये कहाँ आ गये हम युंही साथ साथ चलते घोळत होतं का ते हि कळायला मार्ग नाही). म्हणून त्या दृश्याला निवडणूक प्रचार  क्रमांक १ चा दर्जा द्यावासा वाटतो.



                                        



वरील प्रश्न महाराष्ट्रातील निवडणूकांच्या नंतर विचारण्यात आला तर एका वाक्याला वरचं स्थानं मिळेल. राज्यातील निवडणूक प्रचाराला आत्ताच कुठे सुरवात होतेय, परंतु कायम स्मरणात राहील असं वाक्य पत्रकार वागळे अगदी सुरवातीलाच म्हणून गेले जेंव्हा ते म्हणाले कि "कमळाबाईंनी वाघोबाला शेंडी लावली." सद्य परिस्थितीच वर्णन, त्यावर भाष्य सगळं त्यात आलं. त्याहीपेक्षा संस्मरणीय वाक्य आता कुणी पत्रकार किंवा उमेदवाराकडून ऐकायला मिळतं का हे दिसेलच. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईत रहाणाऱ्या सचिननी मुंबईत रहाणाऱ्या लताबाईंना (सध्या त्या कुठे राहतात माहीत नाही पण पूर्वी तरी मुंबईतच रहायच्या) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या - हिंदीतून. मराठीतून दिल्या असत्या तरी बाईंना समजल्या असत्या. पण मला तरी एकही मराठी वाक्य ऐकू आलं नाही. तेंव्हा वरील वाक्याची आणि खालील गाण्याची आठवण झाली आणि यमक जुळून आलं:                              
                                                        या चिमण्यांनो परत फिरा रे भाषेकडे अपुल्या
                                                             लावल्या वाघोबाला शेंड्या लावल्या
(खरतर शेंड्या लावल्या असं म्हणत नाहीत शेंडी लावली हा वाक्प्रचार आहे. पण शेंडी लावली च आपुल्याशी यमक जुळलं नसतं).



                                          



बाकी बाईंचा वाढदिवस मानानी साजरा झाला हे फार बरं झालं. नाहीतर आजकाल काही ठिकाणी लताबाई बॅशिंगची फॅशन आलेली आहे. बाईंनी अमुक केलं, तमुक केलं, त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी गायिकांना पुढे येऊ दिलं नाही असे आरोप मुलाखतीं मध्ये अधून मधून ऐकू येतात. राज्यसभा टीव्हीच्या मुलाखतींच्या कार्यक्रमात एरवी चांगल्या मुलाखती घेणारा मुलाखतकारही या फॅशन ट्रेंडला बळी पडलाय असं वाटतं. महिला गायिकांच्या मुलाखती घेताना तो हा मुद्दा आवर्जुन उपस्थित करतो. उषा उथुप यांची मुलाखत घेताना त्यांना म्हणाला कि "लताबाईंच्या आवाजानी भारतीय स्त्रीला स्वयंपाकघराकडे लोटलं असं संगीतातले स्कॉलर्स म्हणतात..."  संगीतातले स्कॉलर्स असं का म्हणतात माहित नाही. सर्वसामान्य लोकांना बाईंच्या आयुष्या बद्दल जे माहित आहे ते असं कि त्यांचे वडील त्या लहान असताना वारले. त्यानंतर लगेच त्या सिनेमात काम करु लागल्या. आपल्या कुटुंबाची आणि लहान भावंडांची जबाबदारी त्यांनी उचलली. जी स्त्री स्वतः लहान वयात नोकरी साठी घराबाहेर पडली आणि आयुष्यभर व्यवसायिक स्वरूपात गात राहीली ती इतर महिलांना स्वयंपाक घराकडे कशी ढकलू शकते?  हळुवार, रोमँटिक गाणी गायली म्हणून? तसं असेल तर त्यात ती गाणी लिहणाऱ्यांचा आणि ज्या सिनेमासाठी ती गाणी लिहिली गेली त्या सिनेमांचाही  हात असणार. आणि हे सगळं त्या काळा नुरूपच घडत असणार. त्यासाठी एकट्या बाईंना दोष देण्यात काय अर्थ. नंतर हेमलता. मला काही त्यांना नावं ठेवण्याचं कारण नाही. त्यांचं ते अखियोंके झरोखोंसे गाणं एकेकाळी फार गाजलं होतं. पण जवळपास चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या चित्तचोर सिनेमातल्या गाण्यांमध्ये त्यांना वरच्या पट्टीत सुरात गायला कष्ट पडतायत असं वाटलं होतं. त्या सिनेमातली गाणी अविस्मरणीय झाली ती येसूदासमुळे. राज्यसभा टीव्ही वरील मुलाखतीत हेमलतानी काही गाणी सादर केली. तेंव्हा त्यांना वरच्या पट्टीत गाण्यासाठी चाळीस वर्षांपूर्वी पडले होते त्याच्या चाळीस पट जास्त कष्ट आज पडतायत असं वाटलं. तरीही मुलाखतकार त्यांना लताबाई बॅशिंगची पुन्हा पुन्हा संधी देऊ पहात होता.



                                          



इतर गायिकांना बाईं इतकी गाणी गायला मिळू शकली नाहीत याची कारण निरनिराळी असू शकतात. एक कारण असंही असू शकतं कि बाकीच्या गायिकांनी आपलं घर, संसार, मुलंबाळं सांभाळून पार्श्वगायन करण्याचा प्रयत्न केला असेल तर बाईंनी आपलं सर्वस्व गायनाला वाहिलं. आशा वेळी जे इतर कुठल्याही क्षेत्रात महिलांच्या बाबतीत होतं तेच इतर गायिकांच्या  बाबतीत झालं असण्याची शक्यता आहे.



        
               
                     

या ठिकाणी बार्बरा वॉल्टर्स या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही पत्रकार महिलेचं एक वाक्य आठवतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या की कुठलीही स्त्री आयुष्यात दोन गोष्टी उत्तम रित्या करू शकते  - ती एक चांगली आई होऊ शकते आणि आपल्या व्यवसायात खूप यशस्वी होऊ शकते पण मग तिचं तिच्या घराकडे आणि नवऱ्याकडे दुर्लक्ष होतं; तिनं मुलं आणि नवरा यावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर तिला तिच्या नोकरीत किंवा व्यवसायात हवं तितकं यश मिळू शकत नाही; आणि जर एखादया स्त्रीनं आपला नवरा आणि करिअर यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर तिचं तिच्या मुलांकडे दुर्लक्ष होणं अपरिहार्य असतं. पण तीन गोष्टी एकत्र - एखादी स्त्री करिअर मध्ये अत्युच्च स्थानावर पोहोचली आहे आणि घर, मुलं आणि नवरा यांच्याकडेही तिचं अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही असं होऊ शकत नाही. हे वॉल्टर्स अर्थतच त्यांच्या काळाबद्दल म्हणाल्या होत्या. त्या लताबाईंच्या समकालीन. इतक्या समकालीन कि बाईंचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ चा आणि बार्बरा वॉल्टर्स यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९२९.



       



अर्थात लोकांची मतं आणि गाण्यांची आवडनिवड वेगवेगळी असू शकते. त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली तर त्यात वावगं काहीं नाही. तसच बाईंचा आवाज आणि त्याची मोहिनी म्हणजे काय phenomenon आहे, आजही भारतात महिला गायिकांच्या  आवाजाचा तो मानदंड का मानला जातो हे संगीत तज्ञांनी उलट सुलट विश्लेषण करून जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यातही काही चूक नाही. पण The proof of the pudding is in the eating. - पुडिंग किती चांगलं झालं आहे हे ते किती खाल्लं जातं त्यावरून ठरतं. तसं बाईंच्या गाण्यांचं श्रेष्ठत्व त्यांची गाणी किती ऐकली जातात त्यात आहे. आणि ऐकली तर ती आजही जातातच. अनेक वेगवेगळ्या प्रकारची तरुण गायकांनी गायलेली गाणी आज हिट होत असतानाही बाईंची गाणी ऐकली जातात हे विशेष. किंबहुना ती इतकी ऐकली जातात कि एखादा आजचा संगितकार, कोणी तरी रस्त्यात म्हंटलेलं बाईंचं एक जून गाणं शोधून आपल्या नविन गाण्याच्या प्रसिद्धी साठी ते पुरेपूर वापरण्याचा केविलवाणा प्रयत्न आज करताना दिसतो - तेही  त्यांच्या येऊ घातलेल्या मोठ्या वाढदिवसाची संधी साधून. अशा प्रकारांमुळे बाईंच्या आवाजाची चिरकाल टिकलेली लोकप्रियता सिद्ध व्हायला मदतच होते.



       
                                     


बाईंचं तुम्हांला सर्वात जास्त आवडलेलं एक गाणं निवडा असं सांगितलं तर निवडता येणार नाही. कुठलं आणि कसं निवडणार. पण माझ्यासाठी एक गोष्ट फार सोप्पी आहे. मला जर त्यांचं सर्वात न आवडलेलं क्रमांक एकचं गाणं निवडायला सांगितलं तर मी एका फटक्यात उत्तर देऊ शकेन  -  बिंदिया चमकेगी चुडी खनकेगी. खूप लोकप्रिय गाणं आहे ते. मला वाटतं बिनाका गीत माला चालूं होती तेंव्हा ते प्रथम क्रमांकावरही आलं होतं. मला ते पूर्वी आवडलं नाही आणि आजही आवडत नाही. आणि नावडत्या गाण्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर - क्लोज सेकंड - बागो में बहार है कलियों पे निखारे है आणि तिसऱ्या क्रमांकावर आजकल पांव जमी पर नाही पडते मेरे. नावडत्या गाण्याची यादी तशी तोकडी आहे.



       








yesheeandmommy@gmail.com
अश्र्विन (कोजागरी) पौर्णिमा