Friday, August 4, 2017

काचकाम




एकदा सुट्टी सुरु व्हायच्या आधी मी मुलाला म्हंटलं, "आता दोन आठवडे घरी आहेस तर तुला माझ्याकडून काही शिकायला आवडेल का? आजकाल सगळं भीत भीतच विचारावं लागतं.  

डोळे हातातल्या स्क्रीनवर खिळलेले ठेऊन  कंटाळा, नाईलाज, संशयानी भरलेल्या - आता हि काय नविन पिडा माझ्या पाठीमागे लावतेय कुणास ठाऊक अशा आवाजात त्यानं विचारलं, "काय ?" 

म्हंटल, "थोडासा स्वयंपाक, शर्टाचं बटण तुटलं तर तुझं तुला शिवता येईल इतपत शिवणकाम.

त्यानं स्क्रीन वरचे डोळे न हटवता नुसतीच मान हलवली - नंदीबैलासारखी. त्या मान हलवण्याचा अर्थ स्पष्ट नव्हता.

मी माझं घोडं आणखी थोडं पुढे दामटलं. त्याला म्हंटलं, " अरे, आजकाल बऱ्याच आयांना शिवणकाम तर सोडूनच द्या साधा सुईत दोरा कसा ओवायचा ते माहित नसतं. पण, तू फार भाग्यवान आहेस. तुझी आई तुला ते शिकवू शकते. "

स्वयंपाक शिकायला तो तयार झाला पण शिवणकाम त्याच्या गळी उतरवायला जास्त प्रयत्न करावे लागणार असं दिसलं म्हणून त्याला लहानपणीची आठवण सांगितली. सांगितली म्हणजे मी बोलायला सुरवात केली तो ऐकत होता कि नाही देव जाणे. 

माझे आजोबा खूप अभिमानानी सांगायचे कि आज्जीला सुईत दोरा ओवण्याच्या स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळालं होतं. "पहिलं बक्षिस, पहिलं बक्षिस!"  ते दोन- तीनदा त्यावर जोर द्यायचे. मुलाला म्हंटलं देशमुख घराण्याची हि उज्वल परंपरा तू पुढे चालवावीस अशी माझी फार इच्छा आहे असं काही मी तुला म्हणत नाही. आज काळ खूप बदललाय. घरात शिवणकाम करणं जवळपास कालबाह्य झालं आहे. सुदोओ स्पर्धा आता होतात का आणि त्याचे चॅम्पियन असतात का ते हि मला माहित नाही. तरीही चार टाके घालायला शिकलास तर त्याचा तुला पुढे उपयोगच होईल. म्हणतात ना अ स्टिच इन टाईम वील सेव्ह यू नाईन तसं.

त्यान बहुतेक ते सगळं एका कानानी ऐकलं आणि दुसऱ्या कानानी सोडून दिलं. त्याच्या सुदैवानी स्प्रिंग ब्रेक असाच संपला थोडासा प्रवास, थोडंसं इथे तिथे करण्यात. स्वयंपाक आणि शिवणकाम दोन्ही शिकायचं राहीलं.
               



बोका म्युझियम ऑफ आर्ट मधल्या ग्लासस्ट्रेस (Glasstress) प्रदर्शनात जगभरातील कलाकारांनी उभारलेल्या काचेच्या तीसएक कलाकृती होत्या.

वरील फोटोतील कलाकृतीचं नाव आहे ऍशेस टू ऍशेस. एखाद्या पुस्तकातील मजकूर आक्षेपार्ह वाटला म्हणून त्याच्या निषेधार्थ त्या पुस्तकाचं सार्वजनिक दहन करण्यात आल्याची उदाहरणं जगभरच्या इतिहासात आढळतात. इटलीत जन्मलेले अंटोनीयो रिएल्लो प्रेमापोटी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांचं दहन करतात आणि त्या रक्षा पवित्र भस्म किंवा अंगारा असल्या प्रमाणे काचेच्या पेल्यात जतन करतात. त्या प्याल्यांच डिझाईन १६ आणि १७ व्या शतकात प्रचलित असलेल्या  व्हनिशियन प्याल्यांच्या डिझाईनवर आधारित असतं. २०१० मध्ये त्यांनी हा प्रकल्प सुरु केला.

रिएल्लो यांना पुस्तकांचा ध्यास आहे. An obsessive bibliophile असं त्यांचं वर्णन प्रदर्शनात केलंय. त्यांच्या आईनी जमवलेल्या विपुल ग्रंथसंग्रहामध्ये रिएल्लो वाढले. प्रदर्शनासोबतच्या माहितीत म्हंटल्याप्रमाणे त्यांच्या कलाकृतीत ऐतिहासिक डिझाईनच्या मद्याच्या प्याल्यांचं संकलन पहायला मिळतं आणि त्याबरोबरच ज्ञान -प्राशनाच रूपकही.

प्रत्येक प्याल्यावर त्यामध्ये ज्या पुस्तकाच्या रक्षा आहेत त्या पुस्तकाचं नाव, पुस्तकाच्या लेखकाचं नाव, पुस्तक कधी प्रसिद्ध झालं ती तारीख आणि कधी आणि कुठे ते दहन करण्यात आलं त्या तारखेची आणि स्थळाची नोंद आहे. आजकाल जगात  कुठे अचानक एखादा भारतीय संदर्भ सापडेल सांगता येत नाही. वरील कलाकृतीत तिसऱ्या फळीवरील सर्वात उजवीकडच्या प्याल्यात अमिताव घोष ह्यांच्या The Shadow Line पुस्तकाच्या रक्षा आहेत. त्याचं दहन दिल्लीत करण्यात आलं होतं. 
                                                                     



डोसन्ट हा शब्द मी पहिल्यांदा सेक्स अँड द सिटी ह्या टीव्ही मालिकेत ऐकला. त्याआधी डोसन्ट म्हणजे काय हे कोणाला माहित होतं. बोका रटोन म्युझियम मध्ये काचेच्या कलाकृतींचं हे प्रदर्शन मी दोन वेगवेगळ्या डोसन्ट बरोबर बघितलं - वेळ भरपूर होता आणि दुसरा काही उद्योग नव्हता. आणि एक गोष्ट खरी की दोन्ही डोसन्टनी अवांतर माहिती खूप सांगितली जी प्रदर्शनात उपलब्ध नव्हती किंवा असली तरी मी लक्षपूर्वक ती वाचली नसती.

Glassstress हे काय प्रकरण आहे, त्याचा व्हेनिस बीएनालेशी काय संबंध, मुररानो ग्लास, पेग्गी गुगनहाइम वगैरे शब्द कानावर पडत होते. माझ्या बरोबर प्रदर्शन बघणाऱ्या अमेरिकन महिला होत्या त्यांच्या ते सगळे शब्द ओळखीचे आहेत असं वाटत होतं. डोसन्टच्या ग्रुप बरोबर प्रदर्शन बघण्यात तीही एक मजा होती - विशिष्ट वयाच्या बिनधास्त मत प्रदर्शन आणि चर्चा करणाऱ्या महिलांच्या कॉमेंटस. दोन्ही वेळा ग्रुप मध्ये एखाद दुसरा नवरा सोडला तर बहुतेक सगळ्या महिला होत्या. बहुतेक जणी - दोन्ही डोसन्ट प्रमाणे- साधारण साठी-सत्तरीच्या आणि उत्साही. एखादी कलाकृती आवडली नाही कि सरळ  "It's not doing anything for me" असं म्हणत त्या पुढे सरकत होत्या.

स्पॅनिश आर्टिस्ट हावीए पेरेझ ह्यांच्या लाल झुंबराच्या कलाकृतीचं नाव करोना आहे. क्षणभंगुरत्व (impermanance) आणि सरत्या काळाचे शरीरावर होणारे परिणाम हे पेरेझ ह्यांच्या कलाकृतींचे विषय असतात. मृत्यू आणि आजारपण ह्याचं सूचक म्हणून ते आपल्या कलाकृतींमध्ये बरेचदा रक्तवर्णी लाल रंग वापरतात. हे झुंबर अठराव्या शतकात प्रचलित असणाऱ्या रेझ्झोनिको पद्धतीच्या झुंबरांवर आधारित आहे. श्रीमंती चैन, विलासी जीवनशैलीच प्रतीक वाटणारं हे किमती झुंबर मुद्दाम खाली पाडून फोडण्यात आलं. ते जिथे प्रदर्शित केलं जातं त्या त्या ठिकाणी ते काचेचे  तुकडे तस्सेच्या तसे विखुरले जातात.

ते फुटलेलं झुंबर आणि त्यावर बसलेले कावळे बघून का कोण जाणे मला जुन्या हिंदी सिनेमात बघितलेली भुताटकीची दृश्य आठवली : ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातलं गावा बाहेरच्या ओसाड माळरानातलं रिकामं- पण जुन्या ऐशवर्यच्या काही खुणा अजूनही शिल्लक असलेलं एकाकी घरं, काळी पावसाळी रात्र, बाहेर विजा चमकतायत, ढगांचा गडगडाट चालू आहे, घरात सगळं जुनं- पुराण भयाण वाटतंय, वाऱ्यामुळे मधूनच खिडक्यांची तावदानं किरकिरतायत.....तेवढ्यात कसला तरी आवाज येतो... कोणाच्या तरी पायल ची छमछम ऐकू येते... वगैरे.




पुढच्या कलाकृतींनी लगेच मूड बदलला. डोसन्ट हे मुख्यत्वे हौशी काम असतं. आणि मला वाटतं तोच त्यातला महत्वाचा शब्द - key word असावा - हौस. बरेचदा निवृत्त महिला आणि पुरुष हे काम करतात. ज्या हौसेनं हि मंडळी आपल्याला प्रदर्शन दाखवतात, सगळी सविस्तर माहिती सांगतात - विनावेतन किंवा विनामानधनाचं - त्याचं कौतुक वाटतं. 

मुलाच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या निमित्तानं आम्ही न्यूयॉर्क परिसरातल्या काही ऐतिहासिक वास्तू बघितल्या. खरतर ती न्यूयॉर्क शहराच्या इतिहासातील महत्वाच्या व्यक्तींची घरंच होती. सतराव्या - अठराव्या शतकात बांधलेली आणि आता म्युझियम बनवून जशीच्या तशी जतन केलेली. एक होतं ब्रॉंक्स मधली सर्वात जुनी इमारत - १७४८ साली बांधलेलं फ्रेडरिक व्हॅन कोर्टलंड हाऊस आणि दुसरं लेखक वॉशिंग्टन अर्व्हिंग ह्यांचं सनिसाईड हे स्लीपी हॉलो मधलं हडसन नदीच्या काठावरचं टुमदार पण खूप सुंदर घर. तिथल्या ज्येष्ठ  मार्गदर्शकांनी ज्या सहजतेनी मुलांना त्या घरातल्या प्रत्येक गोष्टी मागची सविस्तर माहिती सांगितली, त्यांना अभ्यासासाठी फोटो काढायला मदत केली त्यावरून त्यांची आपल्या कामा विषयीची कळकळ आणि विषयाचा सविस्तर अभ्यास जाणवत होता.

माध्यमिक शाळेत मुलाला दोन वर्ष फक्त न्यूयॉर्क शहराचा इतिहास शिकवण्यात आला. इतकं त्यांच्या दृष्टींनी ह्या शहराच्या इतिहासाला महत्व आहे. मला नेहमी वाटतं कि मुंबई हा महाराष्ट्राच्या राजमुगुटातला शिरोमणी - jewel in the crown आहे. तिचा इतिहास महाराष्ट्रातल्या पुढील पिढ्यांना शिकवणं आणि तो त्यांच्यासाठी जतन करणं हि आपली जबाबदारी आहे.

वरील कलाकृती बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येतं कि ती आफ्रिकेशी संबंधित असावी. त्यातल्या माणसांच्या प्रतिकृती काचेच्या आहेत. दिसायला ते लोकं आफ्रिकन दिसले तरी त्यांचे पोशाख पूर्णपणे पाश्चिमात्य आहेत. मधोमध जो पंधरा फूट उंच मनोरा आहे तो युरोपियन पद्धतीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांचा आहे. युरोपियन वसाहत वादासमोर किंवा त्याच्यामुळे आफ्रिकन लोक किती खुजे पडले, त्यांचे पोशाख- बाह्यांग त्यामुळे बदललं असं तर कलाकाराला ह्या कलाकृतीतून दाखवायचं नसेल.

पस्काल मार्टिन तायु हे मूळचे कॅमरुनचे. वसाहतवादानंतरच्या काळातील आफ्रिकेचं पुनर्चित्रण करायचा प्रयत्न ते त्यांच्या कलेद्वारे करतात. जागतिकीकरण, देशांतर, राष्ट्रीयत्व, राजकीय सत्तेचा गैर वापर आणि एड्स सारख्या विषयाला आपल्या कलेद्वारे वाचा फोडायचा त्यांचा प्रयत्न असतो.




टेबलवर ठेवलेल्या वस्तूंची स्थिरचित्र बरेचदा बघायला मिळतात. ती बहुतांशी रंगीत असतात. अशा प्रकारच्या १७ व्या शतकातील डच चित्रांमध्ये (vanitas) टेबलवर कवटी, घड्याळ, कुजलेली फळं, जळणारी मेणबत्ती (सर्व गोष्टी मृत्यू आणि अंताच्या द्योतक) आणि नेहमीच्या वापरातल्या पर्स, खेळातले पत्ते अशा ऐहिक उपभोगाच्या गोष्टी ठेवलेल्या असत. हान्स ऑप डी बीक ह्यांच्या The Frozen Vanitas नावाच्या वरील कलाकृतीत अर्थातच सगळं काचेचं आहे आणि vanita ची हि एकविसाव्या शतकातील आवृत्ती असल्यामुळे त्यात कवटी आणि मेणबत्ती बरोबरच मोबाईल फोन, पेपर कप, स्ट्रॉ आणि उंच टाचांच्या चपला वगैर तत्कालिक गोष्टीहि आहेत.



एवढा सुंदर मासा बघिततल्यावर मला आईची आठवण झाली नसती तरच नवल. तिच्या नावात मासा आणि नेहमी जेवणातही. सुरणाच्या कापाच्या आकाराची  पातळ काचेची कापं खवलांसारखी खोवून हा मासा बनवलेला आहे. स्पष्टवक्त्या महिलांच्या मते ह्या कलाकृतीत जितक कौतुक कलाकाराच आहे तितकच कौतुक ते धारदार काचेचे काप हाताळून हि कलाकृती बनवणाऱ्या कारागिरांचही व्हायला हवं. कारण ह्या सगळ्या कलाकृतींमध्ये मूळ संकल्पना कलाकाराची असली तरी तिला आकार द्यायचं, मूर्त स्वरूप द्यायच कठीण काम कारागिरांनीं केलेलं आहे. काचकाम केलेल्या कारागिरांच्या नावाचा उल्लेख प्रदर्शनात नव्हता.  


                                                       

हि कलाकृती दोन भागात सादर करण्यात आलेली आहे. भिंतीवर एक जपानी चित्र आहे. त्या चित्रात जो छोटा लाल मासा आहे त्याचं काचेचं शिल्प त्या चित्रासमोर आहे. जणू काचेचा मासा चित्रातील आपलं प्रतिबिंब न्याहाळतोय. पोलंड मध्ये जन्मलेल्या मार्टा क्लनोवस्का ह्यांच्या शिल्पकलेचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांची शिल्प हि मूळ सपाट पृष्ठभावरील कलाकृतीतली एखाद्या छोट्याशा प्राण्याची त्या चित्राच्या बाहेर वाढवुन मोठी केलेली आवृत्ती असते.

Cardiac Arrest (top): दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या केंडेल गिअर्स ह्यांची हि कलाकृती आहे - Cardiac Arrest नावाची. वयाच्या १५व्या वर्षापासून गिअर्स वर्णद्वेष विरोधी चळवळीत सक्रीय सहभागी झाले होते. वरील कलाकृती पोलिसांच्या लाठीची (batons) काचेची प्रतिकृती वापरून बनवलेली आहे. गिअर्स फुटलेल्या काचा, काटेरी तारा, सायरन वगैरे धोका निदर्शक माध्यमं आपल्या कलाकृतीत वापरतात. त्यांच्या मते लाठ्या मोडू शकतात - पण सामाजिक बदलासाठी लढा देणाऱ्या लोकांवर जोरदार वार केल्या मुळेच.      

yesheeandmommy@gmail.com