Saturday, January 13, 2018

तिळगुळ घ्या नि गोडगोड बोला



                                    


नविन वर्षाची सुरवात चांगल्या विचारांनी व्हावी म्हणून ह्या पोस्टची सुरुवात ह्या गाण्यानी.

नाताळच्या सुट्टीत दोन पुस्तकं वाचली. क्झिट वेस्ट आणि ऍट द स्ट्रेंजर्स गेट - अरायव्हल्स ईन न्यूयॉर्क. खरं सांगायचं तर ही दोन पुस्तकं वाचायला घेतली. त्यातलं एक वाचून पूर्ण झालं दुसरं अजून व्हायचंय.

मोहसीन हमीद ह्यांचं एक्झिट वेस्ट हि कादंबरी आहे. न्यूयॉर्कच्या वर्तमान पत्रात त्या पुस्तकाची जी परिक्षण वाचली त्यात असं म्हंटलं होतं कि ती निर्वासितांची (refugees) कहाणी आहे. सईद आणि नादिया हे दोघे अस्थिरतेनं ग्रासलेल्या एका अनामिक शहरात रहात असतात. पुस्तकात त्या शहराचं नाव सांगितलं जात नाही. तिथे रहाणं असुरक्षित, अशक्यप्राय होतं तेंव्हा पैशाच्या मोबदल्यात एक गुप्त द्वार उघडून देणारा कोण तरी त्यांना भेटतो आणि त्यांचा पश्चिमेचा प्रवास सुरु होतो.

ग्रीस, लंडन मध्ये काही काळ घालवून टप्प्या टप्प्यानी ते दोघे कॅलिफोर्नियाला जाऊन पोहोचतात. त्यांचा प्रवास हा निर्वासितांचा प्रवास जरी असला - दर वेळी एका देशातून दुसऱ्या देशात जातात पैशाच्या मोबदल्यात गुप्त दरवाजे उघडून देणारं कोणतरी त्यांना भेटतं  -  तरी एक प्रकारे देशांतर करून परदेशी गमन करणाऱ्या कोणाचीही ती कहाणी होऊ शकते - मग देशाटन निर्वासित म्हणून केलेलं असो किंवा जास्त पैसे मिळवण्यासाठी.

सईद आणि नादिया ज्या शहरात जन्मलेले आणि वाढलेले असतात ते शहर सोडताना ते एकमेकांच्या सोबत असतात. पुढच्या प्रवासात हि सोबत काही काळ टिकते. पुढे मात्र दोघांच्या वाटा भिन्न होतात. पुस्तकातील शेवटचा परिच्छेद वाचताना आँधी ह्या जुन्या हिंदी सिनेमातील एका गाण्याची आणि दृश्याची आठवण झाली. लेखकानी तो सिनेमा बघितला नसेलही कदाचित पण त्या दोन दृश्यात खूप साम्य वाटलं.






आँधी मधलं जे खूप गाजलेलं गाणं आहे- तेरे बिना झिंदगी से कोई शिकवा तो नही, तेरे बिना झिंदगी भी लेकिन झिंदगी तो नही,  त्याच्या मध्ये जो संवाद आहे - संजीव कुमार आणि सुचित्रा सेन पुष्कळ वर्षांनी एकमेकांना भेटतात. दोघांचेही केस पांढरे झालेले असतात. दोघांचेही चेहरे थोडे थकलेले दिसतात. पडझड झालेल्या एका ऐतिहासिक वास्तूच्या भग्न अवशेषांमधून (जणू त्यांच्या दुभंगलेल्या लग्नाचं प्रतिक) फिरताना संजीव कुमार, सुचित्रा सेनला - सिनेमातल्या आरतीला सकाळच्या वेळी तो परिसर कसा दिसतो त्याचं वर्णन करत असतात. तेंव्हा ती म्हणते- का सांगतोयस मला हे सगळं. मी थोडीच कधी इथे सकाळच्या वेळी येऊ शकेन. त्यावेळी ते म्हणतात - हा चंद्र आहे ना त्याला रात्रीच बघायचं. तो सकाळी दिसत नाही.

एक्झिट वेस्ट मध्ये शहर सोडल्या नंतर पन्नास वर्षांनी नादिया आपल्या जन्मगावी येते. सईदला भेटते. तिच्या जुन्या घराजवळच्या एका कॉफी शॉप मध्ये ते भेटतात. बाकीचा सगळा परिसर बदलेला असतो. तिची जुनी इमारत अजून शाबूत असते. ते दोघे बराच वेळ गप्पा मारतात. निरोप घेताना ती सईदला विचारते - तुला चिले मधलं चांदणं बघायचं होतं ते तु बघितलंस का? तो म्हणतो कधी जमलं तर तिला तिकडे  घेऊन जायला त्याला खूप आवडेल. पण तो दिवस खरोखर कधी येईल कि नाही हे त्या दोघांनाही माहित नसतं.

एक्झिट वेस्ट चा सूर असा आहे कि शहरं उध्वस्त होतात, पुन्हा उभी रहातात. माणसं निर्वासित होतात. नवीन देशात, शहरात  प्रस्थापित होतात. हे चक्र असच चालू रहातं. ज्या शहरानी सईद -नादियाला निर्वासित केलेलं असत त्या शहरातली नविन पिढी पन्नास वर्षांनंतर बघितल तर त्यांच्या सभोवती मजेत वावरत असते. सईद -नादियाला ज्या घटनां मुळे शहर सोडाव लागल त्या घटना ह्या नविन पिढीच्या दृष्टींनी केवळ इतिहास असतात.

                                                                            *****

ऍडम गॉपनिक ह्यांचं ऍट द स्ट्रेंजर्स गेट हे आत्मकथन आहे. म्हंटल तर गॉपनिक आणि त्यांच्या पत्नीच्या कॅनडा ते न्यूयॉर्क ह्या प्रवासाची ती कहाणी आहे. एक्झिट वेस्ट मध्ये नादिया आणि सईद ह्या जोडप्याचा (बहुतेक) त्रिखंडातला - आशिया, युरोप आणि शेवटी अमेरिका - निर्वासित म्हणून दाखवेलला काल्पनिक प्रवास हा जितक्या सरळ सोप्या भाषेत, जास्त फाटे न फोडता एका दिशेने सांगितलेला आहे, गॉपनिक आणि त्यांच्या पत्नीचा मॉन्ट्रीअल ते न्यूयॉर्क सिटी हा खराखुरा, मुख्यत्वे करून न्यूयॉर्कच्या उच्चभ्रू कला आणि साहित्य जगतातील प्रवास तेवढ्या सरधोपट पणे सांगितलेला नाही. त्या पुस्तकात न्यूयॉर्क शहररासहित अनेक गोष्टींचं खूप सविस्तर विवेचन आहे. ते काळातही सारख मागे -पुढे जात रहात. एखादा छोटा चंचल पक्षी एका मोठ्या वृक्षाच्या एका फांदीवर थोडावेळ बसेल, लगेच पंख फडफडवत उडून वरच्या दुसऱ्या फांदीवर जाऊन बसेल, तिथे थोडावेळ विसावून मग परत खालच्या तिसऱ्याच एखादया फांदीवर जाऊन बसेल तसं फॅशन, स्वयंपाक, लेखन, चित्रकला अस वेगवेगळ्या विषयांवर थोडा थोडा वेळ विसावत ते पुस्तक पुढे चाललय. आणि अजून माझ एक चतुर्थांशही पुस्तक वाचून झालं नसेल. ते पुस्तक वाचून कधी पूर्ण होईल...पूर्ण होईल कि नाही ते सांगता येत नाही.

गॉपनिक ह्यांच पॅरिस वरच पुस्तक पॅरिस टू द मून मी काही वर्षांपूर्वी वाचायला घेतल होत. त्याचीही शेवटची काही पान अजून वाचून व्हायची आहेत. पुस्तकं वाचून पूर्ण होवोत किंवा न होवोत, शहरांवर लिहिलेली चांगली पुस्तकं नेहमीच एक वेगळा आनंद देतात. मग ते पुस्तक इंग्रजीत असो कि मराठीत, शहर न्यूयॉर्क असो कि मुंबई, कॅथरीन बूं च बिहाईंड द ब्युटीफुल फॉरेव्हर्स असो किंवा मधु मंगेश कर्णिकांच माहीमची खाडी.

                                                                             *****

परदेशात रहाणाऱ्या लोकांनी भारताची काळजी करू नये अस भारतात रहाणारे काही लोक म्हणतात. ते तस बरोबर आहे. पण कळल तरी वळ्त नाही तस काळजी तर वाटतच रहाते. म्हणजे मुलं लांब रहात असली कि आईला कशी त्यांची काळजी वाटते त्यातलाच थोडा प्रकार. मुलं लांब मौज करत असतात आणि आई मात्र घरात बसून त्यांची काळजी करत रहाते तसं मुंबईकर मुंबईत मस्त मजेत रहात असतील आणि मी न्यूयॉर्क मध्ये बसून नेहमी मुंबईची काळजी करते. आता तर पूण्याची सुद्धा. मधूनच मात्र अस काही घडतं कि माझी काळजी अनाठायी आहे असं वाटत नाही.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला जाऊन आल्या नंतर जुलै मध्ये मी एक पोस्ट लिहिली होती. त्यात असं म्हंटल होतं कि मुंबईच्या गर्दीची आता काळजी वाटायला लागलीय.

त्यानंतर दोन महिन्यातच - सप्टेंबरमध्ये प्रभादेवी जवळच्या रेल्वे स्टेशनवर चेंगरा चेंगरी झाली. त्यात २० च्या वर लोक मारले गेले. एक विधान, जे मी मराठी पत्रकार आणि सिनेमा सृष्टीतील व्यक्तींच्या कडून माध्यमांमध्ये ऐकलंय - मुंबईला कोणी वाली उरलेला नाही - त्या विधानाचा त्यावेळी प्रत्यय आला. (आमची मुंबई, आमची मुंबई म्हणणारी मराठी माणसंच मुंबईला कोणी वाली उरलेला नाही असं म्हणतात तेंव्हा बिचाऱ्या मुंबईनी कोणाकडे बघायच हा प्रश्नही इथे उपस्थित होतो).

स्टेशनवर घडलेल्या त्या दुर्घटनेची जबाबदारी कोणीच घेतली नाही. ज्या शहरात ते स्टेशन आहे त्या शहराचं प्रशासन म्हणे त्या घटनेला जबाबदार नाही. ज्या राज्यात ते शहर आहे ज्या शहरात ते स्टेशन आहे त्या राज्याचं प्रशासनही म्हणे त्या घटनेला जबाबदार नाही. मला वाटतं थोडा वेळ, अगदी तात्पुरतं रेल्वे प्रशासनाला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यानांही लगेच दोषमुक्त करण्यात आलं. मुंबईच्या वर्तमानपत्रात मी असं वाचलं कि शेवटी तीन गोष्टींवर त्या दुर्घटनेचं खापर फोडण्यात आलं माणसांची गर्दी, अचानक आलेला पाऊस, आणि मोठ्ठ्यानी झालेला आवाज. ह्या तीन गोष्टी तर मुंबईच्या कुठल्याही भागात कधीही एकत्र येऊ शकतात.





वाढत्या गर्दी इतकीच मुंबईत मराठीचा दर्जा घसरत चाललाय हि माझी दुसरी मोठठी काळजीही अनाठायी आहे असं वाटत नाही.

पुस्तकांवरच्या चर्चा बघत असताना तू नलिकेवर एक मुलाखत दिसली. तसं त्या व्हिडीओ मधलं सगळं संभाषण बॉंबे, बॉंबे करत इंग्रजीत चालू आहे. त्यात साधारण बाविसाव्या मिनिटाला वरच्या क्लिप मधल्या मराठी लावणीचा उल्लेख येतो. त्यानंतर जी विधानं केली जातात त्या विधानांनी माझ्या मराठी भावना अंमळ दुखावल्या गेल्या.

वाजले कि बारा  हि लावणी माझ्या खूप आवडीची. नटरंग सिनेमातली. त्या चित्रपटातील सगळीच गाणी एकापेक्षा एक चांगली आहेत. तर वर उल्लेखलेल्या संभाषणात एक कॉमेडियन असं म्हणतो कि त्याला एका कंपनीनी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. तो स्टेज वर जायच्या आधी एका गायिकेनं वाजले कि बारा  हि लावणी सादर केली. त्यांनतर त्याच्या कॉमेडीचा कार्यक्रम होता. तो स्टेजवर गेल्यावर सुरवातीच्या नव्वद सेकंदात त्याच्या लक्षात आलं कि उपस्थितांना त्याच्या विनोदात काही रस नाहीय. (कि लावणी समोर त्याची कॉमेडी फिक्की पडली?) म्हणतांना तो तिथून सटकला आणि घरी गेला. आयोजकांनी सगळे पैसे त्याला आगाऊच दिले होते ते परत करायची म्हणे त्याची तयारी आहे जर ते वचन देतील कि ते पुन्हा कधीही लावणी आणि कॉमेडियनला एकत्र एका कार्यक्रमात बोलवणार नाहीत.

त्याच संभाषणातली दुसरी तापदायक गोष्ट म्हणजे तो कॉमेडियन मुंबईत रहाणाऱ्या ज्या लेखकाची मुलाखत घेतोय त्या लेखकाच सारख बॉंबे, बॉंबे चालू आहे. स्वतःच्या गावाला मात्र तो चेन्नाई म्हणतोय. मद्रास नाही. मुद्दाम करतोय कि काय कुणास ठाऊक. 

कोणावरही व्यक्तिगत टीका करायची ह्या ब्लॉगची ईच्छा नसते. उगीचच एकमेकांना नावं ठेवत बसायची असं ब्लॉगच स्वरूप असू नये असं वाटतं. पण जेंव्हा मुंबईचा आणि मुंबईच्या संस्कृतीचा प्रश्न येतो तेंव्हा रहावत नाही. भविष्य काळात मुंबईतील सगळ्या रहिवाशांना एकत्र आणणारी एखादी भाषा आणि संस्कृती असेल का, असायला हवी का हा प्रश्न नेहमी माझ्या मनात असतो. आणि जर अशी एक कॉमन भाषा आणि संस्कृती मुंबईत असावी तर ती कोणती. इंग्रजी भाषा आणि त्याच्या अनुषंगाने येणारी पाश्चात्य संस्कृती कि बॉलिवूड संस्कृती आणि तिच्या बरोबर येईल ती हिंदी भाषा. कि आणखी तिसरीच कुठलीतरी भाषा आणि संस्कृती.

काही पाश्च्यात्त्य कॉमेडियन फ पासून सुरु होणारा इंग्रजी अपशब्द सर्रास आपल्या स्टॅन्ड अप रुटीन मध्ये वापरतात तेंव्हा ते कानांना खटकतं. त्यांची नक्कल करत मुंबईतही एखादा विनोदकार फ चा शब्द सारखा वापरतो तेंव्हा ते जास्तच खटकतं. वर उल्लेख केलेल्या संभाषणा मध्ये ही फ ची फुगडी बराच वेळ ऐकू येते. म्हणून वैतागानी असं वाटतं कि त्या विनोदकाराला सांगावं - बाबारे, मुंबईत आता गर्दी फार वाढलीय. लावणी साठी वेगळा मंच, तुझ्या उभ्या उभ्या विनोदासाठी वेगळा मंच हि चैन जागेच्या दृष्टींनी आता परवडण्यासाखी राहिलेली नाही. मुंबईत टिकायचं असेल तर लावणी बरोबर नांदायला शिकावं लागेल.

वाजले कि बारा हि लावणी जुनी नाही. ती २०१० साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातली आहे. गुरु ठाकूर नावाच्या तरुण मराठी कवीनी लिहिलेली. पोस्टच्या सुरवातीला जे गाणं आहे ते हि त्यानीच लिहिलेलं. लावणीनी तर एकविसाव्या शतकात प्रवेश केलाय. तिच्याशी जमवून घेणं जमत नसेल तर चूक लावणीची नाही, लावणी आणि कॉमेडीला एकत्र आणू पहाणाऱ्या आयोजकांचीहि नाही, चूक फक्त आपल्या समोर बसलेल्या प्रेक्षकांना हसवू न शकणाऱ्या विनोदकाची असेल.

                                                                           *****

मी लहान असताना पूणे हे मराठी संस्कृतीच माहेरघर समजल जायच. आता पूण्यातही परप्रांतातून आलेले पुष्कळ लोक आहेत. त्यातले किती मराठी बोलू शकतात?  मुंबई इतकी गर्दी अजून तिथे झाली नसेल. तरीही आजही अनेक मंडळी अशी सापडतील जी म्हणतात  -  I was born and brought up in Puna ....cannot speak marathi.

तू नलिकेवर एखादी पाककृती शोधत असताना अनेक कुकींग चॅनल्स किंवा vlog समोर येतात. त्यातल्याच एका चॅनलवर एक हिंदी भाषिक महिला -  पूण्यात रहाणारी-  अळूवडीची पाककृती दाखवत होती. म्हणजे ती स्वतःच त्या एपिसोड मध्ये सुरवातीला म्हणतेय कि आज मी तुम्हांला महाराष्ट्रीयन पद्धतीच्या आलूवडीची रेसिपी दाखवते. मग पाककृती दाखवत असताना मध्येच म्हणते "पता नही इसको आलू वडी क्यूँ बोलते हैं. इसमे आलू तो बिल्कुल नहि है".  ते ऐकून मला हसावं कि रडावं तेच कळेना. महाराष्ट्रात, पूण्यात राहून एखादी पाककृती आपल्या वीस लाख चाहत्यांच्या पूढ्यात ठेवण्या आधी त्या पदार्थाचं नाव अळूवडी आहे कि आलूवडी ते हि लोकांना जाणून घ्यावस वाटत नाही?

मुंबईच्या श्रीमंत वस्तीत रहाणारी एखादी कोणतरी सहकुटुंब आपला मुक्काम पूण्याला हलवते. दक्षिण मुंबईत लहानाची मोठी झालेली. मराठी बोलता येत नाही. परदेशात काही वर्ष राहिलेली तिची बहीण भारतात परत जायचं ठरवते ते हि सरळ पूण्यालाच. आयुष्यभर मुंबईत राहून जे लोक कधी एक शब्द मराठी बोलायला शिकले नाहीत ते केवळ पूणे हे कधीकाळी मराठी संस्कृतीचं माहेर घर होतं हे लक्षात ठेऊन पूण्यात रहायला गेल्यावर लगेच फाड फाड अस्खलित मराठी बोलायला लागतील ह्यावर विश्वास बसत नाही. उद्या त्यांची मुलं जर म्हणाली I grew up in Puna ... cannot speak marathi तर दोष कोणाचा.

बॉलिवूड मधल्या नटनट्यांसकट मुंबईत रहाणाऱ्या कित्येक लोकांची आता महाराष्ट्रात इतरत्र दुसरी घरं आहेत. अलिबागला  बीच हाउस, पनवेलला फार्म हाउस, खंडाळा, पाचगणीत बंगले... अशी वेगवेगळ्या ठिकाणी. मनात नेहमी असा विचार येतो कि हि मंडळी जेंव्हा आपल्या दुसऱ्या घरी जातात तेंव्हा त्या मराठी -भाषिक गावात तरी ते मराठी बोलतात का? आणि मराठी बोलणाऱ्या गावात सेकंड होम्स असूनही ह्यांचं मराठीशी - भारतातल्याच एका भाषेशी एवढं वैर का. हे असच चालू राहिलं तर पूण्यासकट अलिबाग, पनवेल, खंडाळा, पाचगणी ही महाराष्ट्रातील गावं आहेत ह्याचा लोकांनां विसर पडायल वेळ लागणार नाही.

एक्झिट वेस्ट मध्ये एक परिच्छेद आहे. नादिया आणि सईद लंडन मध्ये रहात असतात तेंव्हा त्या गोष्टीत असं म्हंटलंय - A mutually agreed time tax had been enacted, such that a portion of the income and toil of those who had recently arrived on the island would go to those who had been there for decades, and this time tax was tapered in both directions, becoming a smaller and smaller sliver as one continued to reside, and then larger and larger subsidy thereafter. 

मला तो परिच्छेद नीट समजला नाही म्हणून मी त्याचा सोयिस्कर अर्थ असा लावला कि शहर कुठलंही असो बाहेरून जे लोक त्या शहरात रहायला येतात ते त्या शहरातल्या मूळ रहिवाशांचं, पिढ्यान पिढ्या, पिढ्यान पिढ्या त्या शहरात राहिलेल्या लोकांचं देणं लागतात. न्यूयॉर्क मध्ये रहात असताना मी कायम ह्या गोष्टीचं भान ठेवते. मी जरी  दोन दशकं इथे राहिले असले तरी हे शहर मी यायच्या आधी अस्तित्वात होतं आणि आज ते जे काही आहे ते पिढ्यान पिढ्या इथे रहात असलेल्या लोकांमुळे आहे. 

अशी आशा करूया कि देशाच्या इतर प्रांतातून मुंबई आणि पूण्याला येणारे लोकही हि जाणीव ठेवतील कि ते इथे यायच्या आधी हि दोन्ही शहरं अस्तित्वात होती - आपल्या भाषा आणि संस्कृतीसह. And the least they can do... the least they can do is respect that. त्या भाषेचं आणि संस्कृतीचं ते नक्कीच देणं लागतात. 

आणि जर समजा ती जाणीव त्यांनी ठेवली नाही, ठेवायची जरुर त्यांना वाटली नाही, मुंबई प्रमाणेच उद्या पूणंही मराठी माणसांच्या हातातून निसटत गेलं तर तो दोष कोणाचा - त्या बाहेरून आलेल्या लोकांचा नक्कीच नसेल. कुठेतरी आपल्या शहारांचं/ राज्याचं नेतृत्व करण्यात आपण - मराठी माणसं - वक्तृत्व आणि कर्तृत्व ह्या दोन्ही आघाड्यांवर कमी पडलो असा त्याचा अर्थ होईल का? 


     






yesheeandmommy@gmail.com