आपली एखादी वस्तू हरवली की मला फार चुटपुट लागुन रहाते. मग ती कितीही महत्वाची/ बिन महत्वाची, साधी, क्षुल्लक गोष्ट असो... ती शोधल्या शिवाय चैन पडत नाही.
एकदा माझी पर्स ब्रॉडवे आणि ७० स्ट्रीटच्या कोपऱ्यावर विसरून राहिली होती ती कशी सापडली त्याचा किस्सा आधीच्या एका पोस्ट मध्ये मी सविस्तर लिहिलाय.
दुसरं म्हणजे मुलगा लहान होता तेंव्हा त्याचा एक सॅन्डल कुठे तरी पडला. मुंबईत. चालत्या गाडीतून तो कसा बाहेर पडला माहीत नाही. घरी पोहोचल्यावर गाडीतून उतरताना लक्षात आलं कि त्याच्या एकाच पायात सॅन्डल आहे.
खरतर हरवलेला सॅन्डल शोधायला जाण तसं वेडेपणाचं होतं. पण मी गेले. आम्ही जिथून आलो होतो त्या रस्त्यावर परत चक्कर मारली तर प्रभादेवीत व्होडाफोनच ऑफिस आहे - जिथे आम्ही आमच्या घराकडे जायला वळतो - त्या ऑफिसच्या अगदी समोर भर रस्त्यात तो सॅन्डल मला दिसला. त्या रस्त्यावर सतत खूप ट्रॅफिक असतो. तरीही सॅन्डल सापडला खरा.
मशिन मध्ये कपडे विसरायची तिची हि पहिली वेळ नाही. साफसफाईच्या कामत ती नीट आहे. कामाचा उरक चांगला आहे. मी स्वयंपाकाचा ओटा दहा वेळा पुसला तरी कोपऱ्यात कुठेतरी काही बारीक कचरा लपून बसतो, एखाद दोन डाग तसेच रहातात. पण ती खूप कमी वेळात अख्ख स्वयंपाकघर लख्ख करते.
जेंव्हा धुणं खालती घेऊन जायची वेळ येते तेंव्हा मात्र तिची जरा गडबड होते. कधी कपडे परत घेऊन येताना एखादा सॉक बास्केट मधून पडतो. तिच्या ते लक्षातही येत नाही. मी बाहेरून येते तेंव्हा मला लिफ्टच्या बाहेर पडलेला सॉक सापडतो.
तर कधी काही कपडे मशिन मध्येच विसरून येते. संध्याकाळी कपडे कपाटात ठेवताना माझ्या लक्षात आलं कि मी खालती जाऊन ते घेऊन येते. बिल्डिंगची लॉंड्री कोणी जास्त वापरत नाही - मोठी मशिन्स कम्फर्टर, ब्लँकेट्स धुण्यासाठी वापरतात. मागल्या वेळी माझे कपडे मला एका वॉशिंग मशिनच्या आतल्या भिंतीला ओल्या अवस्थेत चिकटलेले सापडले होते.
परवा माझा झोपताना घालायचा कुडता धुतलेल्या कपड्यात नव्हता. घरभर शोधल्यावर आठवलं कि बाई बहुतेक मशिनमध्ये विसरली असणार. रात्रीचे दहा -साडेदहा वाजले होते. तरी मी खालती गेले. लॉंड्री रूम मध्ये कोणी नव्हतं पण सगळी मशिन्स - बरेच वॉशर -ड्रायर्स आहेत - धडाधडा चालू होती. कोणाचं तरी महिन्याचं नाहीतर काही आठवड्यांचं साठलेलं धुणं चालू असावं.
मी गेल्या पावली परत फिरले; उगीच दुसऱ्यांच्या लॉंड्रीत ढवळाढवळ नको.
घरी परत येताना लिफ्ट मध्ये स्वतःला बजावलं - कुडता सापडला नाही ह्या गोष्टीचा झोपेवर परिणाम होऊ द्यायचा नाही. उशीर पर्यंत जागं राहून किंवा मध्यरात्री उठून कुडता शोधायला लॉंड्री रुम मध्ये पुन्हा चक्कर मारायची जरूर नाही. ज्यांची लॉंड्री चालू आहे त्यांना कुडता सापडला तर ते तो तिथेच ठेवतील आणि सकाळी तो मला मिळेल. त्याची मला खात्री होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी लॉंड्रीरूम मध्ये जाऊन बघितलं तर समोर माझा कुडता होता. ते अनपेक्षित नव्हतं. ज्या स्थितीत तो होता ते फार अनेपक्षित होतं.
मला वाटलं होतं कि लॉंड्री रूम मध्ये धुतलेल्या कपडयांच्या घड्या घालण्यासाठी जे मोठं टेबल आहे त्यावर चुरगळलेल्या स्थितीत कुडता मला सापडेल. त्याऐवजी ज्यांना तो सापडला त्यंनी चक्क झटकून बिटकून लॉंड्री बास्केटला हँगर अडकवण्यासाठी जी दांडी असते त्या दांडीवर तो ताठ वाळत घातला होता.
मी फार आश्चर्यचकीत झाले. मागून पुढून तपासून खात्री करून घेतली कि नक्की माझाच आहे. कामवालीला दाखवण्यासाठी फोटो काढला. तिला विचारलं कि पहिल्यांदा ती नाहीच म्हणते - मी नाही कपडे विसरले, मी नाही मायक्रोवेव्ह तारेनी घासुन त्यावर चरे पाडले. त्यातून तिचं इंग्रजी फार जुजबी आहे. कुडता कुठे, कसा सापडला हे मी सांगुन तिला समजलं नाही तर फोटोवरून जास्त चांगल कळेल असं वाटलं.
मनात आलं मला जर कोणाचे ओले कपडे मशिन मध्ये सापडले असते तर मी ते झटकून वाळत टाकायचे कष्ट घेतले असते? आता ह्यापुढे घेईन. Pay it forward या न्यायानी ह्यापुढे नक्कीच घेईन. पण ह्या आधी बहुदा नसते घेतले. कोणाचे आहेत कुणास ठाऊक म्हणत बाजूला ठेऊन दिले असते. फारतर तात्पुरते बाहेर काढून माझं धुणं धुऊन झाल्यावर ज्या मशिन मध्ये सापडले त्याचं मशिन मध्ये पून्हा ठेऊन दिले असते. पण झटकून वाळत घातले असते असं वाटत नाही.
न्यूयॉर्क रहायला फार टफ, कठीण, कठोर शहर आहे असं म्हणतात. सगळे आपल्या महत्वाकांक्षेत इतके गुरफ़टलेले असतात कि चांगुलपणा हा ह्या शहराचा स्थायिभाव आहे असा आरोप करायला कोणी धजावणार नाही. तरीही असे- रँडम ऍक्ट ऑफ काईन्डनेस - कधितरी अनुभवास येतात.
एकदा आम्ही ७२ स्ट्रीट वर गाडी पार्क करत होतो तर एका बाईंनी खिडकीच्या काचेवर ठोठावलं. काच खाली केल्यावर तिचं पार्किंग तिकीट आम्हांला दिलं आणि म्हणाली, "माझं काम झालंय, मी चाललेय पण ह्या तिकिटात अजून तासाभराचं पार्किंग उरलंय. तुम्ही ते वापरू शकता".
मुलगा एकदा ट्रेननी कुठेतरी चालला होता तर डब्यात एका लहान मुलानी उलटी केली. म्हणताना त्या मुलाची आई ते पुसून घेऊ लागली. तिच्या जवळचे वाईप्स संपले तेंव्हा डब्यातल्या इतर प्रवाशांनी आपल्या जवळचे वाईप्स तिला देऊ केले.
जिनं आम्हाला तिचं पार्किंग तिकिट दिलं त्या बाईचे आम्ही लगेच तिथल्या तिथे आभार मानू शकलो . चुटपुट या गोष्टीची वाटते की ज्यांनी माझा कुडता इतका व्यवस्थित वाळत घातला ती व्यक्ती कोण होती ते मला माहित नाही. त्यांचे आभार मानणं तर दूरच राहिलं.
***
न्यूयॉर्कच्या ट्रेन मध्ये एखादी कविता नेहमी असते. एकाच डब्यात दोन कविता त्यादिवशी पहिल्यांदा बघितल्या.
शेवटी संजू नाही बघितला. दोन - तीन वीकएंड बघायचा कि नाही बघायचा असं चालू होतं. संजूबाबाची कहाणी पूर्ण परिचित असल्यामुळे फारशी इच्छा नव्हती. पण मुंबईतल्या माध्यमांत त्या सिनेमाचं भरपूर कौतुक होत होतं. चित्रपटांनी किती कोटींचा बिझनेस केल, तो बॉक्स ऑफिस वर कसा यशस्वी झाला त्याच्या बातम्या येत होत्या. केवळ एक चांगलं मनोरंजन म्हणून बघावं कि काय असं वाटत होतं.
चित्रपट प्रदर्शनाच्या मागे जे अर्थकारण असतं ते मला माहीत नाही. नविन सिनेमा रिलीज होताना त्यामागे काय प्रणाली असते कल्पना नाही. मागे कुठलातरी हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा मी मुंबईत होते. बहुतेक सुलतान असावा. नक्की आठवत नाही. कुठल्यातरी बड्या ताऱ्याचा होता. तो बघावसं वाटत नव्हतं. पण पेपरात बघितलं तर त्या वीकएंडला अख्ख्या मुंबईत एकूण एक सगळ्या चित्रपटगृहात सगळ्या पडदयावर फक्त तोच सिनेमा दाखवत होते. ज्यांना तो सिनेमा बघायचा नसेल त्यांच्या साठी दुसरा काही चॉईस नव्हता. म्हणजे ज्या लोकांचा त्या वीकएंडला चित्रपट बघायचा प्लॅन असेल त्यांना झक्कत तो सिनेमा बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. हि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेहमीच असं होतं का मला माहीत नाही.
न्यूयॉर्कमध्ये असं कधी होत नाही. चित्रपट कितीही मोठा असूदेत - मोठं बजेट, मोठ्या दिगदर्शकाचा. वीकएंडला सगळेच्या सगळे स्क्रीन एका सिनेमानी व्यापलेत असं होत नाही. दर्शकांनां दुसरे सिनेमा बघण्याचे ऑप्शन्स असतात.
न्यूयॉर्क मध्ये दुसरी एक चांगली पध्द्त आहे: माझा मुलगा प्री स्कुल मध्ये होता तेंव्हा त्याच्या शाळेच्या समोर जी बाग आहे ती त्या खाजगी शाळेनी स्वतःच्या खर्चानी विकसित केलेली होती - त्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनां खेळण्यायोग्य होईल या दृष्टीने. पण ते प्लेग्राऊंड अर्थातच त्या भागात रहाणाऱ्या सर्व मुलांसाठी खुलं होतं - मग ती मुलं त्या शाळेत जाणारी असोत किँवा नसोत.
बॉलिवूड मधील बड्या मंडळींनी अशा प्रकारची सामाजिक जाणीव ठेवायला हरकत नाही. मुंबईत नवा सिनेमा रिलीज करताना सगळ्या मल्टिप्लेक्स मध्ये किमान एक स्क्रीन जुन्या/नव्या चांगल्या मराठी सिनेमासाठी राखून ठेवावा. त्या मराठी सिनेमाची फारशी तिकीट विक्री झाली नाही, तोटा झाला तर तो त्यांनी सहन करावा. महाराष्ट्रानी त्यांना भरभरून दिलंय. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी पूण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतलंय. व्यवसायासाठी वर्षन वर्ष मुंबईत रहातायत. महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं तेवढं देणं ते नक्कीच लागतात.
मुंबईच्या माध्यमात संजूच जे कौतुक चाललय ते खरं आहे कि केवळ बॉलिवूडला खूष करण्यासाठी स्तुतिसुमने उधळली जातायत ते समजत नव्हतं. शेवटी एक अमेरिकन परिक्षण वाचून निर्णया पक्का केला. त्या परिक्षणाचा मथळा पुरेसा बोलका होता: संजु - अ ग्लोरिफाइड इन्फोमर्शियल अबाऊट अ बॉलिवूड बॅड बॉय.
मी इन्फोमर्शियल बघत नाही. एका बॅड बॉयच्या आयुष्याबद्दलच इन्फोमर्शियल बघाण्यात काही अर्थ नव्हता.
सध्या आमच्या नदीवर समर अवतरलाय. उन्हाळा म्हंटलं कि कसं रखरखित, घामट वाटतं. तसं या उन्हळ्यात काही नसतं. ऑकटोबर ते एप्रिल नदीवर कोणी जास्त फिरकु शकत नाही. बोचरा वारा आणि थंडी असते. मे च्या मध्यावर किनाऱ्यावरचा कॅफे उघडला की नदीवरची वर्दळ वाढते. कि उलट होतं - वर्दळ वाढते म्हणून कॅफे उघडतो कि काय कुणास ठाऊक.
संगीत, सिनेमा असे मनोरंजनाचे कार्यक्रम चालू होतात. लोकं जॉगिंग, सायकलिंग, योग करायला खाली उतरतात. किनाऱ्यावरच्या बाकावर बसलं कि नदीचा संथ प्रवाह बघताना मनही शांत होऊ शकतं.
ज्या आठवड्यात न्यूयॉर्क मध्ये अतिशय आल्हाददायक हवामान होतं तेंव्हा मुंबई पावसात झोडपून निघत होती. पावसातल्या मुंबईचं जितकं छान चित्रण वरील गाण्यात आहे तसं दुसऱ्या कुठल्या गाण्यात मी पाहिलेलं नाही.
yesheeandmommy@gmail.com |