Saturday, September 15, 2018

गोमातांचं गाऱ्हाणं


मागल्या रविवारी पोळा होता.  खरतर तो बैलांचा सण.  पण बैल नाही तर नाही निदान सणानिमित्त काही गोमातांशी तरी थोडा संवाद साधावा असं वाटलं.  फार दूर नाही जावं लागत त्यांना भेटायला.  देवळाच्या गल्लीत असतात त्या.  पुष्कळ वर्ष त्यांचा मुक्काम आहे तिथे.  माझ्या घरी जायच्या वाटेवर आहे ते ठिकाण. 

दुपारी घरी जाताना थांबले त्यांच्यापाशी घटकाभर.  त्या जेवत होत्या.  






थोडावेळ त्यांच्या जवळ घुटमळले.  त्यांचं जेवण कधी होतंय याची वाट पहात तिथे उभी राहिले.  पण समजेना कि त्या जेवतायत अजून कि त्यांच जेवून झालंय.  पुढ्यत वाढलेलं तसंच दिसत होतं - चपाती, भाजी, भात बरच काही होतं कागदावर ठेवलेलं. 

शेवटी हळूच विचारलं  - "जेवताय का? "

एकूण एक सगळया जणींनी माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि भात -भाजी हुंगत बसल्या.

पुन्हा हळूच म्हंटल - "जरा बोलायचं होतं. "

पुन्हा दुर्लक्ष.

आता मला जरा ऑकवर्ड वाटायला लागलं होतं.  किती वेळ तिथे नुसतं घुटमळत उभं रहायचं.  दरवेळी सिग्नल लाल झाला कि गाडयांची लांब रांग समोर थांबत होती.  त्यातल्या कोणी पाहिलं तर.. एखादी गाडी नेमकी आपल्या बिल्डिंग मधली निघाली तर.. उदया लगेच विचारतील  - काय करत होतीस तिकडे?

गोमातांशी बोलायचा नाद सोडून देऊन तिथून काढता पाय घ्यायचा विचार करत होते तेवढ्यात त्यातली एक बुजुर्ग माता मान खाली घालून तिरप्या नजरेनं माझ्याकडे बघतेय असं वाटलं.  तिचा विचार बदलायच्या आत पटकन तिच्या जवळ जात म्हंटल - "पोळ्यानिमित्त लोकांना काही सांगायचंय का?".

तिनं नाही अशी मान हलवली.

"काहीतरी सांग ना.  लोक एवढे तुझी पूजा करतात, तुझ्या रक्षणासाठी झटतात.  त्यांच्यासाठी आशिर्वादपर चार शब्द सांग. नाहीतर संदेश तरी दे.

तिनं परत मान हलवत नाही म्हंटलं.  एव्हाना बाकीच्या माता जरा चुळबुळ करायला लागल्या होत्या:  हिला कोणी कधी लिडर नेमलं.  हि एकटीच का म्हणून हो - नाही करत मान हलवत बसणार.  आम्हीहि बोलू शकतो - असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.

ती संधी साधून त्यांना म्हंटल,  "मग तुमच्या काही तक्रारी असतील तर सांगा.  तुमच्या रहाणीमानात सुधारणा हवी असेल, काही सुखसोयी हव्या असतील तर तसं सांगा."

परत सगळयांनी नकारार्थी मान हलवली.

"काहीच तक्रारी नाहीत?   सगळं छान चाललंय तुमचं?"

त्या होय म्हणाल्या.

"हे असं कागदावर जेवण वाढलेल चालतं तुम्हाला?   पावसाचे दिवस आहेत.   फुटपाथ ओला आहे.   चिखल आहे.   त्यातच कागद ठेवून त्यावर चपात्या वाढल्यात ते आवडतं?"

"मग आम्हांला काय रोज केळीच्या पानावर जेवायला वाढणार?" बुजुर्ग माता वैतागून म्हणाली.

"तसं नाही.  पण माझे आज्जी - आजोबा आपल्या गुरांना कित्ती छान ठेवायचे.  त्यांच्यासाठी खळ्यात गोठा होता. गोठ्याजवळ चाऱ्यासाठी गवताचा मोठ्ठा टेकडीएवढा भारा रचलेला असायचा.   आम्ही लहान होतो तेंव्हा त्यावर चढुन खेळायला काय मजा यायची.   पौष्टिक खाद्य द्यायचं असेल तेंव्हा आज्जी ते घमेल्यात मिक्स करायची आणि ती घमेली गुरांच्या पुढ्यात ठेवायची.   हे असं चिखलात कागद ठेऊन त्यावर गुरांनां चपात्या घालायची पद्धत नव्हती बघितली मी."

"पुरे तुझ्या आज्जीच्या गोठया -  घमेल्यांचं कौतुक.  आलीय आम्हाला फुकटचा मोठेपणा सांगायला.  जा आता,"  घोळक्यातली एक मध्यम वयीन माता धुसफुसली.

माताच ती तिचं बोलणं काय मनावर घ्यायच म्हणून मी प्रश्न विचारणं चालू ठेवलं.

"ऊन -पावसात कायम उघड्यावर उभ्या असता.  उघड्यावरच जेवता.  डोकयावर छप्पर असावं असं नाही वाटत तुम्हांला?".

"तू काय चंद्रावरून टपकलीस का गं?  का मंगळावरून?  दिसत नाही तुला शहरात किती माणसं उघड्यावर रहातात, जेवतात, झोपतात ते.  आमचं काय मोठं घेऊन बसलीस.  जा आता".

मी त्यांना नको ते प्रश्न विचारत होते हे उघड होतं.  पण मला हि संधी दवडायची नव्हती.  कितीतरी वर्ष त्या माझ्या शेजारी रहातायत पण त्यांच्याशी गप्पा मारायचा योग कधी आला नव्हता.

"तरीपण, ह्या इमारतीत रहाणाऱ्या लॊकांनी, दुकानदारांनी त्यांच्या समोरचा फुटपाथ स्वच्छ ठेवायला हवा असं नाही वाटत तुम्हाला?

"ते का म्हणून फुटपाथ स्वच्छ करतील.  ते त्यांचं काम थोडंच आहे."

न्यूयॉर्क मध्ये असतं.  बिल्डिंग समोरचा फुटपाथ स्वच्छ ठेवणं हे त्या बिल्डिंगच काम असतं.  नाहीतर दंड भरावा लागतो -  हे मनात आलेलं मी मनातच ठेवलं.  मातांना बोलले असते तर त्या पुन्हा भडकल्या असत्या  - फुकटचा मोठेपणा सांगते म्हणून.

"बरं मग रस्ते, सिग्नल त्याबद्दल काही तक्रार?"

"त्याबद्दल काय तक्रार असणार आमची?"

"तुम्ही सिग्नल क्रॉस करून पलीकडे समुद्रावर जाता ते बघते मी.  रस्त्यावर खूप ट्रॅफीक असतो.   तुम्हाला रस्ता ओलांडताना भिती नाही वाटत?"

"अगं बाई,  शहरातले सिग्नल कधी चालू असतात, तर कधी बंद असतात.  रात्री तर नेहमीच बंद असतात.  रात्री गाड्या नसतात का रस्त्यावर?  तसही नाही.  पण सगळे सिग्नल मात्र बंद.   का ते ती मुंबादेवीच जाणे.   पण रस्ता क्रॉस करायची काळजी आमच्यापेक्षा तू जास्त कर.  आम्हांला रस्ता ओलांडताना बघून गाड्या आपला वेग तरी कमी करतात.  तुम्हां लोकांना बघून नाही कोणी वेग कमी करत.  जा आता.  उद्यापासून नीट धावत पळत रस्ता क्रॉस करायला शिक.  नाहीतर दोन्ही बाजूचा ट्रॅफिक चालू होईल आणि तू बसशील मध्येच अडकून".  एकीनं असं म्हणताच सगळ्या गोमाता फिदीफिदी हसल्या.

माझी चेष्टा करण्यात त्यांना आता गम्मत वाटतेय असं दिसत होतं.  पण त्यांच्या तोंडून एखादी तक्रार तरी ऐकायचीच असा मी चंग बांधला.

"बरं, त्या सबवेच्या कामाचं काय"?   सगळ्या मातांनी ऐकून न ऐकल्या सारखं केलं कि त्यांना खरंच ऐकू गेलं नाही कुणास ठाऊक.

मी पुन्हा विचारलं,  "ते मेट्रोचं काम चालू आहे त्याच काय"?

"काय त्याचं"?

"तुमचं रहाणीमान त्यामुळे सुधारेल असं तुम्हाला वाटतं का"?

"आमचं रहाणीमान कशाला सुधारेल मेट्रोमुळे?  आम्हांला थोडंच कोणी तिथे सोडणार आहे.  अगं, त्या बैलांना सी लिंक वर सोडत नाहीत.  ठळक अक्षरात पाटी लावली आहे सुरवातीलाच, वाचली नाहीस?  - बैलगाड्यांना प्रवेश नाही.   मग आम्हांला मेट्रोत जाऊ देतील होय?   मी सांगते बघ तुला, स्टेशनच्या बाहेर ठळक पाटी लावतील - गोमातांना प्रवेश नाही. "

"तेच तर म्हणते आहे ना मी.  ह्या शहराचे रहिवासी म्हणून तुम्हांला काही अधिकार आहेत कि नाही?  आणि ते तुम्हांला मिळतायत का ? "

"आमच्या अधिकारांच आंम्ही बघून घेऊ.  तुम्ही नका त्याची काळजी करू."  एक तरुणशी, यंगीश माता अधिकारवाणीने बोलली.

"ते ठिक आहे.  पण सगळीकडे बोर्ड लावलेत ना कि "मुंबई इज अपग्रेडींग',  म्हणून विचारलं कि शहरात चांगल्या सुधारणा होतायत असं तुम्हाला वाटतं का"?

"कुठे बोर्ड लावलेत"?

"जिथे जिथे मेट्रोचं काम चालू आहे ना, तिथे बोर्ड लावलेत - "मुंबई इज अपग्रेडींग'' असे.  तुम्ही नाही पाहिले? "






"अपग्रेडींग म्हणजे?   अगं आम्हाला मराठी धड वाचता येत नाही तर इंग्रजी काय कप्पाळ समजणार".

"बरं ते जाऊ दे.   ती थोडी लांबची गोष्ट झाली.  आपण तुमच्या सभोवताली म्हणजे इमिजिएट सराउंडिग मध्ये काय चाललंय त्या विषयी बोलूया.  इथे आता तुमच्या शेजारी गणेश उत्सवासाठी स्टेज उभारलय त्याचा तुम्हांला काही त्रास होतो का?"

"त्याचा आम्हाला कसला त्रास होणार?" गोमाता आता थोड्या आक्रमक होतायत असं वाटलं.  पण माझ्याकडेही कारणांची कमतरता नव्हती.

"म्हणजे एकतर रस्ता अरुंद आहे.  त्यावर सतत ट्रॅफिक चालू  असतो.  तुमच्या अवती भोवती किती गाड्या, स्कुटर पार्क केल्यात.  गिचमिड आहे नुसती.  त्यातच आता मांडव उभारलाय,  लाउड्स्पिकरचा आवाज,  झगमगीत लाईट  - कसलाच त्रास होत नाही तुम्हाला?"

"अगं,  त्रास कसला त्यात?   रोज आम्हांला उभ्या जागी दिवसभर गणरायाचं दर्शन होतं हे आम्ही आमचं मोठं भाग्य समजतो.   त्यासाठी दहा -पंधरा दिवस थोडा त्रास सहन करावा लागला तर त्यात काय मोठंसं.   शेवटी सगळ्यांनी आपसात मिळूनमिसळून नको का रहायला?  आणि तुला जिकडे तिकडे त्रासच कसा दिसतो गं?  म्हणे ह्याचा काही त्रास होतो का?  त्याविषयी काही तक्रार आहे का?  त्याची काही अडचण होते का ? - सारखा आपला एकच सूर.  तुझी हि नकारात्मक वृत्ती सोड आता आणि शहराकडे थोड्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिक."

"ते तर झालंच.  पण ते फेरीवाले.  ते तर कायमच असतात ना.  त्यांचा नाही त्रास होत"?

"कुठले फेरीवाले?"  माझ्या न संपणाऱ्या प्रश्नांनी  माता आता चिडू लागल्यात असं वाटलं.

"ते कोपऱ्यावर, सिग्नल जवळ असतात ते.  भेळपुरी, पाणीपुरी विकणारे.  ते तर कायमच असतात ना."  मी चाचरत म्हंटल.

"ते कायम कुठे असतात?  ते रोज दुपारी दोन - तीन नंतर येतात बिचारे.  आणि रात्री अकरा -बाराच्या सुमारास निघून जातात. आणि ते पाणीपुरी नाही काही विकत.  ते दाबेली विकतात".

"तीन - चार जण असतात ना.  त्यातला एक मला वाटतं भेळपुरी विकतो".

मी असं म्हंटल्यावर संभाषणाचा रोखच बदलला.  सगळ्या माता आवेशात बोलू लागल्या.  काहींच्या मते तिथे फक्त दाबेली विकली जाते.  काहींना माझ्याप्रमाणेच वाटत होतं कि भेळपुरी, पाणीपुरीही विकली जात असावी.

शेवटी ती पहिल्यांदा बोललेली जुनी -जाणती बुजुर्ग माता म्हणाली,  "थांब थोडावेळ इथे.  येतीलच ते इतक्यात.  मग आपल्याला दिसेलच ते दाबेली विकतात कि भेळपुरी ते.

पण मला तिथे थांबवेना.  हवा चांगली होती.  डोक्यावर ऊन रणरणत नव्हतं.  पण पायाखाली ओलं होतं - अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे आणि शेण - गोमूत्रामुळे झालेलं.  तिथेच मातांच जेवणही होतं रद्दी पेपरवर ठेवलेलं.  जास्त वेळ त्या ओल्यात थांबलं तर डास चावून उगीच डेंग्यू बिंग्यु व्हायची भीती.  तेवढ्यात एक माणूस आला आणि एका गोमातेच्या पायाशी बसून तिचं दूध काढू लागला.  मातांना त्याची सवय असावी - भर रहदारीच्या रस्त्यावर कोणीतरी येऊन त्यांचं दूध काढायची.  त्यांची त्याबद्दल काही हरकत दिसली नाही.  मलाच वाटलं त्यांना थोडी प्रायव्हसी द्यावी.  मी  निघाले तिथून.






yesheeandmommy@gmail.com