कर्नाड गेल्यावर एका इंग्रजी वर्तमानपत्रात त्यांच्या आत्मकथनाबद्दल लेख आला होता. ते आत्मचरित्र कानडीत लिहिलेलं असल्यामुळे जे लोक ते मूळ भाषेत वाचू शकणार नाहीत त्यांच्यासाठी कर्नाड यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं बालपण याविषयी आत्मचरित्रात असलेली बरीच माहिती त्या लेखातून मिळाली. लेख चांगला विस्तृत होता. पण त्या लेखात एक वाक्य होतं. त्यात म्हंटल होतं - "Karnad’s family was from a high caste ... community, the same as Nandan Nilekani, Deepika Padukone, Prakash Padukone, Shyam Benegal, or to pick from a slightly distant past, Guru Dutt." हे वाचल्यावर त्या एरवी माहितीपूर्ण असलेल्या लेखाला त्या एका वाक्यानी गालबोट लागलं असं वाटलं. गालबोट हा फार मवाळ शब्द झाला. त्य लेखाचाच नाही तर त्या वर्तमानपत्राचा दर्जाही त्या वाक्यानी घसरला.
ते वाक्य जसच्या तसं आत्मचरित्रात आहे की नाही - जातीच्या नावा आधी लावलेलं " high caste" हे विशेषण, जातीतील प्रसिद्ध व्यक्तींची नामावली हे मूळ आत्मचरित्रात आहे की नाही मला माहित नाही. जरी असलं तरी वर्तमान पत्रात त्याचा उल्लेख आजच्या काळात खूप धक्कादायक वाटतो. ते वाक्य वाचून किती धक्का बसला याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. वाटलं नव्हतं कि एकविसाव्या शतकांत एखाद्या जातीच्या आधी "उच्च" हे विशेषण लावलेलं बघावं लागेल. मला वाटतं आजच्या काळात एखाद्या जातीच्या "उच्चत्वाचा" उल्लेख अभ्यासपूर्ण लेखात, जातीतील उच्चनीच्चतेच्या भेदभावांचे समाजातील घटकांवर जे दुष्परिणाम झालेले आहेत त्यांचं विवेचन करतानाच फक्त ऍक्सेप्टेबल होऊ शकतो. इतर कुठल्याही कॉन्टेक्स्ट मध्ये कुठल्याही जातीला "उच्चत्वा"चं (किंवा "निच्चत्वा"चं) लेबल लावणं ऍक्सेप्टेबल होऊ शकत नाही. जातीं मधली उच्चनिच्चता हि जुनी पुराणी मोडकळीत काढण्याच्या लायकीची रीत आहे जिला विज्ञानाचा किंवा निसर्गाचा पाया नाही. वर्णद्वेषाहुनही लाजिरवाणी ती प्रथा आहे असं म्हंटलं तरी चालेल. वर्णद्वेषात निदान माणसं आपल्याहुन वेगळ्या दिसणाऱ्या व्यक्तींचा द्वेष करतात. जातींमधली उच्चनिच्चता आपल्या सारख्याचं लोकांपासून स्वतःला उच्च समजण्यासाठी पाळली जाते.
कर्नाड एका विशिष्ट जातीत जन्माला आले असले तरी त्यांच कार्य बघितलं की असं वाटतं कि त्यांची जन्मजात त्यांनी केंव्हाच ट्रान्सेन्ड केली होती. त्यांच्या बद्दल जे वाचलंय, ज्या मुलाखती पाहिल्यात त्यावरून असं दिसतं की एक high caste playwirght and actor - उच्च जातीचे नाटककार आणि अभिनेते अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.
दुसरं म्हणजे कर्नाड यांचं स्वतःच कर्तृत्व इतकं उत्तुंग होतं की जातीतील इतर कर्तृत्ववान लोकांच्या पंक्तीत त्यांना नेऊन बसविल्याने त्यांच्या कर्तृत्वात भर पडण्याचा प्रश्न नव्हता. त्यांना त्याची काही गरज नव्हती. इतर कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्ती त्या जातीत जन्मलेल्या आहेत याचा उल्लेख करून त्या जातीची "उच्चता" वाचकांच्या निदर्शनास आणून द्यायची हा लेखाचा ऊद्देश असेल तर गोष्ट वेगळी.
अजूनही जातीचा उल्लेख भारतात नेहमी होतो. भारतातच नाही तर अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीयांमध्येही होतो. काही वर्षांपूर्वी न्यूजसीं मधल्या एका देवळात गेलो होतो. तिथे एक मराठी कुटुंब भेटलं - नवरा, बायको आणि मुलगा. मुलगा साधारण तीसएक वर्षांचा असेल. अनेक वर्ष अमेरिकेत स्थायिक झालेलं कुटुंब होतं. मुलगा फुल्ल मेकअप मध्ये होता- फाऊंडेशन सकट -भुवया कोरलेल्या, डोळ्यांभोवती आय लाईनर, ओठाला गुलाबी रंगाचं लिपस्टिक. म्हणजे आईवडील अगदीच जुन्या विचारांचे नसावेत. पण नमस्कार -चमत्कार झाल्यावर पहिला प्रश्न त्यातल्या आईनी मला विचारला तो म्हणजे माझं आडनाव काय. मग आडनावा वरून जात लक्षात आली नसावी म्हणून सरळ जात विचारली. साठीच्या जवळपासचं वय असावं त्यांचं. नंतर थोड्या गप्पा, विचारपूस झाल्यावर त्यांनी आग्रहानी आम्हाला त्यांच्या जवळचं प्रसादाचं केळं दिलं.
मागल्या उन्हाळ्यात न्यूजर्सी मधल्या एका महाराष्ट्रीयन जेवण मिळणाऱ्या रेस्टोरंट मध्ये गेलो होतो. पुन्हा तेच. यावेळी जोडपं आधीच्या जोडप्यापेक्षा कमी वयाचं होतं. बाईंनी आडनाव विचारलं आणि आडनावावरून जात नक्की समजली नाही म्हणताना जात कुठली ते विचारलं. जात परदेशातही आपला पिच्छा सोडत नाही.
मराठी लोक निदान नुसतं जात विचारून तरी थांबतात. देवळात भेटलेल्या बाईंनी माझी जात विचारली पण लगेच स्वतःची जात सांगितली नाही. मी ही त्यांची जात विचारली नाही. आणि त्यांची जात न समजल्याची उणीव मला इतक्या वर्षात कधी भासली नाही. त्यानंतर पुन्हा कधी त्यांची भेट झाली नाही पण त्यांनी आग्रहानी दिलेलं प्रसादाचं केळं अजून लक्षात आहे. म्हणजे मराठी लोकांना दुसऱ्यांची जात विचारायला आवडते पण स्वतःची जात सांगायला ते उत्सुक असतात असं नाही. त्याविरुद्ध तामिळ ब्राह्मण - जी भारतातील बहुधा सर्वात उच्चशिक्षित जातीं मधली एक असावी - आपण टॅम ब्रॅम असल्याचा उल्लेख स्वतःहुनच करत असतात. वर्षानुवर्षे अमेरिकेत रहाणारी मंडळीही फेसबुक सारख्या स्थळावर आपण टॅम ब्रॅम असल्याचं तुणतुणं वाजवतात. शिक्षणानी जातीचा अभिमान आणि जातीभेद कमी होईल ही आशा त्यामुळे फोल ठरते.
आपण कुठुन आलोय, आपली पार्श्वभूमी काय आहे, आपली खाण्याची आवडनिवड काय आहे हे लोकांना चटकन समजावं म्हणून कदाचित आपण सगळेच कळत नकळत कधीतरी जातीचा उल्लेख करत असू. भारतातल्या चक्रावून टाकणाऱ्या विविधतेत दर पंधरा -वीस किलोमीटरवर भाषा बदलते तसं वेगवेगळ्या जातींमध्ये खाद्यपदार्थ आणि ते बनवण्याची पद्धत, सणवार - व्रत वैकल्य साजरे करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्याचा आपसात गप्पा मारताना उल्लेख होऊ शकतो. जी विविधता स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय एकात्मता, युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेत एकता या आदर्श अपेक्षांच्या धाग्यांनी विणलेल्या मोहक गालिचा खाली आपण खूप यशस्वीपणे झाकुन ठेऊ शकलो असं आपल्याला वाटलं ती आता इंटरनेटच्या युगात गारुड्यानी टोपली उघडताच नागानी फणा वर काढावी तशी उफाळून वर येताना दिसते. तरीही वर्तमानपत्रात एखादया जातील "उच्च जात" म्हणून का संबोधण्यात यावं ते समजू शकत नाही.
काही दिवसांपूर्वी मैत्रिणी बरोबर बोलत होते. ती नात्यातल्या एका लग्नाला जाऊन आली होती. मला तिला विचारायचं होतं कि लग्नातल्या जेवणात काही पारंपरिक पदार्थ होते कि आजकाल सगळ्या बफे मध्ये दिसतात त्या पनीर टिक्का नी मश्रुम मसाला सारख्या आधुनिक पदार्थांची रेलचेल होती. ( मी मश्रुम आणि पनीर विरोधी नाही. चिकनचा अतिरेक झाल्यावर रेस्टोरंट मध्ये आम्ही कधीतरी पनीर टिक्का ऑर्डर केलाय. नाही असं नाही. तसंच पास्ता मध्ये मश्रुम छान लागतात, मश्रुम सूपही चांगलं लागतं, स्टफ्ड मश्रुमही चांगले लागतात. पण मश्रुम आणि मसाल्याला एकत्र आणून केलेला पदार्थ चांगला लागत असेल यावर विश्वास बसत नाही. असो). मैत्रीण म्हणाली, "पूर्वी आमच्या (जातीत) लग्नात मसुराची आमटी, वालाचं बिरडं हे पदार्थ हमखास असायचे पण आता ते पदार्थ लग्नाच्या जेवणात नसतात". तर अशा रितीने गप्पांच्या ओघात जातीचा उल्लेख कधीतरी येऊन जातो. पण त्यात एखादया जातीच्या उच्च - नीच्चतेचा प्रश्न नसतो.
म्हणून ".... high caste ... community " हा शब्दप्रयोग फार त्रासदायक वाटतो. हे वाक्य किती चुकीचं आहे याची त्या पेपरला कल्पना नसावी? एखाद्या लहान, प्रादेशिक वर्तमानपत्राकडून अशी चूक घडली तर तिकडे दुर्लक्ष करणं एकवेळ शक्य होईल. पण भारताच्या तथाकथित सिलिकॉन व्हॅली मधून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी वर्तमानपत्रात एखादया जातीच्या पाठीमागे "high" (किंवा "low" ) caste हे विशेषण लावणं बरोबर होऊ शकतं? आपण जग फिरलेल्या, 'हे विश्वची माझे घर' मानणाऱ्या भारतीयांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्या भारतीयां इतकाच आपला दृष्टिकोनही ग्लोबल -विश्वव्यापी आहे असा आव आणणाऱ्या वर्तमान पत्राकडून हि चूक अक्षम्य वाटते. आजवर कुठल्याही मराठी वर्तमानपत्रात एवढं कास्टिस्ट, एखाद्या जातीच्या "उच्चत्वा" संबंधी इतकं उघड विधान वाचल्याचं आठवत नाही.
विशिष्ट जातींची संमेलनं, खाद्य मेळावे आजही होत असतात. त्यात त्या जातीतील मान्यवर व्यक्तींचा गौरवही केला जातो. पण पहिल्या भेटीत विनाकारण जात विचारणं जसं अनावश्यक आहे तितकंच देशाच्या सांस्कृतिक पटलावर इतकी वर्ष भरीव कामगिरी बजावणाऱ्या नाटककाराच्या गौरवपर लेखात "high caste" या विशेषणा सहीत जातीचा उल्लेख करणं अत्यंत अनावश्यक वाटतं. उद्या समजा अमिताभ बच्चन वरील गौरवपर लेखात कोणीतरी लिहिलं कि ते अमुक एका ("उच्च"?) जातीत जन्मले होते तर समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतुन, जगाच्या कानाकोपऱ्यातुन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या मनावर केराचं पाणी ओतल्या सारखं होईल.
कोणी स्वतःच्या बचावासाठी असं म्हणू नये कि - आम्ही नाही बाबा कुठल्या जातीला खालची जात म्हंटलं. आम्ही फक्त एका "उच्च" जातीत कोणकोण जन्मलं आहे एवढंच फक्त सांगितलं. हे म्हणजे वर्णद्वेष करणाऱ्यांनी - आम्ही नाही बाबा कोणाला कनिष्ठ म्हणत. आम्ही फक्त गोरे सुपिरियर आहेत एवढंच म्हणतो - असं म्हणण्या सारखं आहे. कारण एखाद्याची "उच्चता" दाखवताना दुसऱ्या कोणाची तरी "निच्चता" त्यात नेहमीच अभिप्रेत असते.
ज्या लोकांना जातिव्यवस्थेची थोडीफार जाण आहे त्यांना कर्नाड यांच्या कुटुंबाची माहिती वाचल्यावर लगेच लक्षात येईल कि ज्या अर्थी त्यांचे वडील स्वातंत्र्य पूर्व काळात डॉकटर झालेले होते, कर्नाड स्वतः ऱ्होड्स शिष्यवृत्तीवर इंग्लंडला जाऊन शिकुन आले होते त्याअर्थी ते उच्च शिक्षित कुटुंबात जन्मलेले असणार. आणि पूर्वीच्या काळी उच्च शिक्षणाची संधी मिळणं किंवा न मिळणं हे बहुतांशी व्यक्तीच्या जन्मजातीवर अवलंबून असायचं. ज्या लोकांना जातीव्यवस्थेबद्दल ही माहिती नाही त्यानां कर्नाड यांची जात काय होती आणि ती "उच्च" होती हे समजलं नसतं तरी त्यांनी काय फरक पडला असता?
होतं काय कि एखाद्या लहान गावात रहाणाऱ्या मुलीनी "खालच्या" जातीच्या मुलाबरोबर लग्न केलं म्हणून तिच्या बापानी तिला मारलं किंवा कुठल्या तरी गावामध्ये जमिनीसाठी "वरच्या" जातीच्या लोकांनी "खालच्या" जातीतल्या दहा जणांची हत्त्या केली - अशा बातम्या पेपरात वाचल्या कि शहरातले लोक आश्चर्य व्यक्त करतात. 'हे अजूनही चालू आहे? काय अडाणी लोक आहेत,' अशा भावनेने त्या बातम्या आपण वाचतो. पण जातींमधली उच्चनिच्चता चालू ठेवण्यासाठी शहरातली माध्यमं कशा प्रकारे हातभार लावतात हे आपल्या लक्षातही येत नाही. त्याला आक्षेप घेणं तर लांबच राहिलं.
बेनेगल, निलेकणी, पदुकोण यांची जात काय आहे हा प्रश्न माझ्यासकट अनेक भारतियांच्या मनात आजपर्यँत कदाचित कधी आलाही नसेल. जरी आला असला तरी तो उघड कोणाला विचारायची गरज वाटली नसेल आणि वर्तमानपत्रातुन जाहीरपणे त्यांची जात समजावी अशी कोणाची अपेक्षा नसेल.
सगळी माणसं एका रंगाची असु शकत नाहीत आणि रंगावरून माणसांची उंच्चनिच्चता ठरत नाही हे सत्य आता जगातील बहुतेक लोकांनी स्विकारलं आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर वर्णद्वेष जोपासुन चालणार नाही हे जगभरातली माध्यमं जाणतात. अमेरिकन टीव्ही वर वर्णद्वेषाच्या बाबतीत झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली जाते. तरीही लाईव्ह टीव्ही वर चुका घडतात. नाही असं नाही. पण ज्या व्यक्तीकडून चूक घडली त्या व्यक्तीला लगोलग डच्चू दिला जातो नाहीतर (चूक थोडी कमी गंभीर असेल तर) जाहीर माफी मागावी लागते. वर्तमानपत्रात अशा चुका टाळणं सहज शक्य असतं कारण तिथे लाईव्ह काही नसतं.
जातींमधले फरक हे वर्णातील वेगळेपणा प्रमाणे नैसर्गिक नसले तरी ते पिढ्यानपिढ्या अंगात मुरलेले आहेत. ते लवकर नाहीशे होतील अशी चिन्ह दिसत नाहीत. पण त्यातली उच्चनिच्चता नाहीशी करणं सहज शक्य आहे - जर माणसांमधली उच्चनिच्चता खरोखर नाहीशी व्हावी असं वाटत असेल तर आणि माध्यमांनी जातीच्या नावाआधी "उच्च"तेची विशेषणं लावायचं थांबवलं तर. नाहीतर वाचकांवर झिरो टॉलरन्सची भूमिका घ्यायची पाळी येईल. काळाची चक्र मागे फिरावीत आणि आपल्या पुढील पिढयांनी जातींच्या उच्चनीच्चतेला पुन्हा नव्याने बळी पडावं असं आपल्या पैकी अनेकांना वाटत नसेल.