सलमान गणेश मंदिरात कधी गेले असतील? अशक्य नाही. ते न्यूयॉर्क मध्ये रहातात. गेली अनेक वर्ष ते इथे रहातायत. एकदा आम्हाला मॅनहॅटनच्या डाउनटाऊन मध्ये एका दुकानात दिसले होते. खूप पूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा त्यांच्यावर तो फतवा लागू होता. आम्ही बेड बाथ अँड बियॉंड नावाच्या दुकानात गेलो होता. नावावरूनच लक्षात येतं कि ते गृहोपयोगी वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे. बेडरूम साठी लागणाऱ्या- चादरी, उशांचे अभ्रे, रजया, बाथरूम साठी लागणारे - टॉवेल्स, पायपुसणी तिथे मिळतात. तसंच बियॉंडच्या अंतर्गत इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो - स्वयंपाकघरात लागणारी भांडीकुंडी, कचऱ्याच्या टोपल्या, छोटी अप्लायन्सेस, पडदे , मेणबत्त्या, छत्र्या, च्युईंग गम, कुत्र्या -मांजराचं खाद्य वगैरे वगैर काय वाट्टेल ते. इतक्या असंख्य उपयोगी आणि निरुपयोगी वाटाव्यात अशा गोष्टींनी ते मोठ्ठ दुकान खचाखच भरलेलं असतं कि खरोखरच माणसाला जगण्यासाठी एवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे का कि हे जरा अतीच होतंय असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. बहुसंख्य वस्तू अर्थातच चीनोत्पादित (चीन + उत्पादित) असतात. न्यूयॉर्क - न्यूजर्सी मधे त्या दुकानाच्या अनेक शाखा आहेत. इतर राज्यातही असतील.
तेंव्हा अप्पर वेस्ट साईडला बेबाबि नव्हतं. आता आहे. पण तेंव्हा आम्हांला सर्वात जवळच लोकेशन ते डाउनटाऊन मधलं दुकानच होतं. आम्ही तिथे काय घ्यायला गेलो होतो ते आता आठवत नाही. पण घरासाठी आवश्यक काहीतरी असणार. नाहीतर मुद्दामहून तिकडे गेलो नसतो. ऑकटोबर / नोव्हेंबर मधली गोष्ट आहे. इतक्या वर्षांनंतरही महीना माझ्या का लक्षात राहिला त्याला कारण आहे.
दुकानाच्या बाहेर शॉपिंग कार्टस उभ्या होत्या. मी त्यातली एक घेतली. ढकलत ती दरवाजाजवळ नेली. काचेचा सरकता दरवाजा फाकला आणि समोरच दृश्य बघून मी आश्चर्यचकीत झाले : सरकत्या दरवाजा समोर हँगर विभागात सलमान रश्दी आणि पद्मा लक्ष्मी हँगर घेत होते. पहिला विचार मनात आला तो म्हणजे फतव्याचं काय झालं. लंडन मध्ये ते अज्ञात स्थळी पोलीस संरक्षणात रहात आहेत असं वाचलं होतं. न्यूयॉर्क मध्ये रहायला येणार आहेत, आले आहेत असंही वाचलं होतं. तरीही ते इतक्या उघड फिरत असतील असं वाटलं नव्हतं.
ते खूप उंच नाहीत. पद्मा पेक्षा कदाचित्त कमी असावेत. तरीही ती अंगुली निर्देश करून त्यांना वरच्या फळीवरचे हँगर दाखवीत होती आणि ते त्या उंचावर ठेवलेल्या हँगर पर्यंत हात पोहोचतो का बघत होते. त्यांना त्यांच्या शॉपिंग मध्ये सोडून मी पुढे गेले. सुट्टीचा दिवस होता. दुकानात फारशी गर्दी नव्हती. शॉपिंग संपवून पैसे द्यायला कॅशियरच्या लाईनीत उभी रहायला आले तर परत दोघे रांगेत माझ्या पुढे उभे. खुप वाटलं होतं त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात. दिवाळीचा पहिला दिवस होता (म्हणून महिना लक्षात राहिलाय). पण फतवावाले आजूबाजूला असले तर उगीच पीडा नको या भितीपोटी मी गप्प बसले.
नंतर त्या दोघांचं लग्न झालं. मग काही वर्षांनी घटस्फोट झाला. हे सगळं न्यूयॉर्कमध्येच झालं. न्यूयॉर्कच्या गॉसिप बातम्यांमध्ये दोघेही नियमित असतात. पद्मा लक्ष्मीच्या आत्मकथनात (कि कुठल्यातरी मुलाखतीत) वाचलंय कि ती फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जाते. तिच्यात आणि माझ्यात ती गोष्ट कॉमन आहे. मी हि गणेश मंदिरात जाते. ती आजवर मला कधी तिथे दिसलेली नाही. ते हि दिसलेले नाहीत. पण जुलै मधल्या न्यूयॉर्कर मासिकात त्यांची गॊष्ट आहे ती वाचल्यावर मनात शंका येतेय कि ते त्या देवळात जात असतील किंवा गेले असतील का? देवळात काय कोणीही जाऊ शकतं. कदाचित लग्न झाल्यावर जोडीनी गेले असतील. कदाचित गोष्ट लिहताना संशोधन म्हणून गेले असतील.
द लिटिल किंग नावाच्या गोष्टीत कथेतल्या प्रमुख व्यक्तिरेखे विषयी लिहिलंय (माझं ढोबळ भाषांतर असं आहे):"तो स्वतः खूप धार्मिक नव्हता, आणि शहरातल्या तीन डझन मशिदीं पैकी एकातही त्यांने कधी पाऊल ठेवलं नव्हतं, चौदाव्या रस्त्यावरच्या अल -फारूक या मोठ्या मशिदीतही नाही. "खरं सांगायचं तर ", तो अगदी जवळच्या मित्रांना म्हणायचा "अ ) मी प्रार्थना करणाऱ्यातला नाही आणि ब ) खरतर मला स्वामिनारायण मंदिराचा लुक जास्त आवडतो.""
गणेश मंदिर स्वामिनारायण मंदिराहून वेगळं आहे. फ्लशिंग मध्ये दोन्ही आहेत. पण स्वामिनारायण मंदिरात कुठल्या देवी - देवतांच्या मूर्ती आहेत कल्पना नाही. गणेश मंदिरातल्या मूर्ती मला बऱ्यापैकी माहित आहेत. चारपाच पायऱ्या चढून वर गेलं कि मोठा सभामंडप आहे. त्याच्या मध्यभागी मोठ्या गणेश मूर्तीचा गाभारा आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे. सभामंडपाच्या चार कोपऱ्यात काळ्या दगडाच्याच पण गणेश मूर्तीहुन थोड्या लहान आकाराच्या चार मूर्तींचे गाभारे आहेत: एका कोपऱ्यात महालक्ष्मी, दुसऱ्या कोपऱ्यात वेंकटेश्वर, तिसऱ्या कोपऱ्यात शिवलिंग आणि चवथ्या कोपऱ्यात एका देवाची मूर्ती आहे ज्याचं नाव आता आठवत नाही. दोन कोपऱ्यांच्या मध्ये समोरासमोरच्या लांब भिंतीना लागून ओळींनी अनेक देव -देवतांच्या दीड दोन फूट उंचीच्य पितळी मूर्तींचे स्वतंत्र देव्हारे आहेत. सर्व मूर्ती जरतारी रेशमी वस्त्र आणि सोनेरी दागिन्यांनी मढलेल्या असतात. एखादया देवाच्या आवडी नुसार त्याला सुती वस्त्र नेसवलेलं असतं किंवा गळ्यात वेलचीची माळ घातलेली असते. त्यातले काही देव त्या देवळात जाण्याआधी मला माहित नव्हते: पितळी मूर्तींमध्ये खोडियार मातेची मूर्ती आहे. विकिपीडियात असं म्हंटलंय कि तिची देवळं गुजरात, राजस्थान आणि मुंबईत आहेत. पण मुंबईत पाहिल्याचं आठवत नाही.
गणेश मंदिरात संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी गेलं तर फार गर्दी असते. नेहमी कसले तरी सप्ताह चालू असतात. त्यानिमित्तानं भक्तगण जमलेले असतात. एकदा सकाळी गेले तर अभिषेक चालू होता. पांढरं सुती वस्त्र नेसवलेल्या पितळी मूर्तीच्या डोक्यावरून पुजारी दूध आणि इतर द्रव्य ओतत होते. ते बघून मला थंडी वाजली. न्यूयॉर्क मध्ये उन्हाळ्याचे दोन -तीन महिने सोडले तर इतर वेळी बऱ्यापैकी थंडी असते. थंडीत आपले कपडे भिजलेले असताना आपल्या डोक्यावर लोकांनी बाटल्याच्या बाटल्या थंड दूध ओतलं तर आपण गारठणार नाही तर काय होईल. त्यातून अंग धातूंचं असेल तर बघायलाच नको. गर्दीच्या वेळी मृदंगम, नादस्वरम अशी वाद्य कानठळ्या बसतील इतक्या जोरात वाजवली जातात. भक्तगणांना ते आवडत असावं. देवांचं कुणास ठाऊक. इतर दिवशी सकाळी किंवा दुपारी गेलं तर देऊळ शांत असतं.
द लिटिल किंग हि गोष्ट भ्रष्टाचार आणि सध्या भेडसावणारं ओपिऑइड व्यसनाचं संकट या गंभीर विषयांवर आहे पण त्याला रश्दींचा मजेशीर टच आहे. त्यांच्या आगामी कादंबरीवर ती कथा आधारलेली आहे. कथेचा सारांश असा कि र. क. स्माईल नावाचा भारतीय वंशाचा डॉकटर आपल्या औषध निर्मितीच्या व्यवसायामुळे अब्जाधीश झालेला आहे. त्याच्य कंपनीने एक नविन वेदनाशामक औषधी स्प्रे बाजारात आणलेला आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधीत अतिवेदनेने तळमळणाऱ्या रुग्णांना तात्पुरता आराम पडू शकतो. परंतु डॉकटर स्माईल हे आपल्या माहितीतील काही डॉकटरां मार्फत ज्यांना कसलीही व्याधी नाही, जे आजरी नाहीत त्या लोकांच्या व्यसनपूर्तीसाठी ते वेदनाशामक (बेकायदेशीररित्या) पुरवण्याची सोय करतात.
"अटलांटा परिसरातील भारतीय समाजात डॉकटर स्माईलना मानाचं स्थान आहे. शहरातील भारतीय वर्तमानपत्राचे ते आधारस्थंभ आहेत तसेच अनेक सामाजिक संस्था, मंडळांना ते देणग्या देतात - मग ती मंडळं भारतातील वेगवेगळ्या राज्यातुन आलेल्या लोकांची असोत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांची ( बंगाली, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलगू), वेगवेगळ्या जातींची, उपजातींची, धर्माची आणि वेगवेगळी कुलदैवत मानणाऱ्यांची ( देवी, महादेव, नारायण, आणि लोहासुर - लोखंडाचा देव, खोडीयार - घोड्याचा देव, आणि हार्दूल - कॉलऱ्याचा देव सुद्धा) ."
लोहासुर आणि हर्दूल देवांच्या मूर्ती गणेश मंदिरात बघिल्याचं आठवत नाही (असतील कदाचित पण मला आठवत नाही). खोडियार देवीची मूर्ती तिथे नक्की आहे. वरील तीन चार ठिपके जोडल्यावर असं वाटत - पद्मा म्हणते ती त्या देवळात जाते... पद्मा आणि रश्दी काही वर्षांपूर्वी पतिपत्नी होते... त्या देवळात खोडियार माता आहे म्हणजे मी जसं खोडियार मातेला पहिल्यांदा फ्लशिंगच्या गणेश मंदिरात पाहिलं तसं रश्दीनीही कदाचित तिथेच तिला बघितलं असेल. आणि तिथून ती गोष्टीत अवतरली असेल. अर्थात माझा अंदाज साफ चुकीचाही असू शकतो.