Sunday, June 14, 2020

प्रश्न तुमचे उत्तरं आमची


वर्तमानपत्राच्या रविवार पुरवणीत सोशल क्यूज नावाचं सदर असतं. त्यात वाचक प्रश्न विचारतात आणि त्या सदराचे लेखक प्रश्नांची उत्तरे देतात. गेल्या काही महिन्यात विचारण्यात आलेले प्रश्न खालील प्रमाणे होते.

एकदा एका निनावी बाईंनी विचारलं होतं: मी आणि माझा नवरा दुसऱ्या एका जोडप्या बरोबर अधून मधून बाहेर जेवायला जातो. मजा येते. आमचं त्यांचं चांगलं जमतं. पण ते नेहमी खूप भारी किंमतीची वाईनची बाटली मागवतात. मी आणि माझा नवरा फार थोडी वाईन पितो. पण आम्ही जेवणाचं बिल विभागून भरतो त्यामुळे त्यांच्या महाग वाईनचे पैसे आम्हाला भरावे लागतात. त्यांना कस सांगू कि दर वेळी एवढी महाग वाईन आम्हांला परवडत नाही?

प्रश्न सर्वसामान्य लोकांनी विचारलेले असतात. त्यात अमेरिकन समाजाचं प्रतिबिंब दिसतं.

एकदा एका बाईनी विचारलं:
मी एका रेस्टोरंट मध्ये महिलांच्या बाथरूमच्या बाहेर, आतली बाई बाहेर येण्याची वाट पहात उभी होते. दार उघडलं तेंव्हा आतुन एक तरुण पुरुष बाहेर आला. मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं. तो म्हणाला, " I am transitioning" (मी पुल्लिंगीचा स्त्रिलिंगी होतोय). माझी १०० टक्के खात्री आहे कि तो खोटं बोलत होता. तो बिल्कुल लिंग बदल वगैरे काही करत नव्हता. माझा नवरा म्हणतो, "जाऊ दे, सोडून दे."  पण मला सारखं वाटतय मी त्याला काहीतरी बोलायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं?

प्रश्नकर्त्यांचं पूर्ण नाव जाहीर केलं जात नाही. नुसतं पहिलं नाव किंवा नावातील पहिलं अक्षर किंवा निनावी अशी नावं छापली जातात. नेहमी बायकाच प्रश्न विचारतात असं नाही. पुरुषही विचारतात. बायकांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या जास्त असावी. मला वरील प्रश्न आठवतायत पण त्या प्रश्नांची उत्तरं आठवत नाहीत.

हल्लीच एका महिलेनं विचारलं होतं:
मी आणि माझा नवरा काही दिवसांसाठी सुट्टीवर गेलो होता तेंव्हा नवऱ्याची आई मुलांना सांभाळण्यासाठी आमच्या घरी येऊन राहिली. पण मी नसताना, मला न विचारता तिनं माझ्या डायनिंग टेबलच्या खुर्च्या बदलल्या. तिनं आणलेल्या खुर्च्या अगदी कुरूप आहेत. मला अजिबात आवडल्या नाहीत. मला त्या बदलायच्यात. पण माझी सासु अधुन मधून मुलांना सांभाळण्यासाठी घरी येते. तिनं घेतलेल्या खुर्च्या कशा बदलू जेणे करून तिला वाईट वाटणार नाही?

सदर लेखकानी सासुला न दुखावता खुर्च्या कशा बदलायच्या त्याबाबत सल्ला दिला. वर असही म्हणाले कि तू पाठवलेले फोटो बघितले. खुर्च्या खरोखरच भयानक आहेत. पण तुला हक्काची बेबीसिटर फुकट मिळतेय तेंव्हा जरा सबुरीने घे.

काही वर्षांपूर्वी थँक्सगिव्हिंग सणाच्या आधी एका नणंदेनं विचारलं होतं:
दरवर्षी माझी वहिनी आमच्या कुटुंबासाठी थँक्सगिव्हिंग डिनरच आयोजन करायची. पण ह्या वर्षी भावाचा घटस्फोट झाला. त्यामुळे ह्या वर्षीच थँक्सगिव्हिंग डिनर मी माझ्या घरी ठेवलं आहे. माझ्या भावजयीचा मला फोन आला होता कि तिला माझ्या घरी डिनरला यायला आवडेल. पण माझ्या भावाची आता नवीन गर्लफ्रेंड आहे. भावजय आली तर गर्लफ्रेंड येऊ शकणार नाही. भावजयला बोलावलं नाही तर तिची मुलं तिच्याकडे जातील मग माझी भाचवंड माझ्या डिनरला येऊ शकणार नाहीत. हा तिढा कसा सोडवू?

योगायोगानी अशा प्रकारच एक सदर एका मराठी वर्तमानपत्रातही वाचायला मिळालं. सवाल जवाबदार या सदर लेखकाने वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यातुन सध्याच्या भारतीय संस्कृतीचं दर्शन झालं. नमुन्या दाखल काही प्रश्न खाली दिले आहेत.

न नावाच्या एका महिलेनी विचारलं होतं:
काही महिन्यांपूर्वी माझ्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धाला आम्ही सगळे सासूबाईंकडे जमलो होतो. माझा मुलगा त्याच्या चुलत आणि आत्ते बहिणीं बरोबर खेळत होता. मध्येच त्यातल्या एका मुलीने भिंतीवरच्या खिळ्याला अडकवलेली एक चावी काढली आणि ती माझ्या मुलाशी खेळू लागली. खेळून झाल्यावर तिनं ती चावी जिथून काढली होती तिथे त्याच खिळ्याला अडकवून ठेवली. थोड्या वेळाने नणंदेला काय झाल माहीत नाही ती त्या चावी अडकवलेल्या खिळ्याच्या शेजारी उभी राहून जोरजोरात किंचाळू लागली. " न ...मगाशी बाळ घेऊन खेळत होता ती आईच्या कपाटाची चावी कुठे?  न...न...मगाशी बाळ घेऊन खेळत होता ती आईच्या कपाटाची चावी कुठे आहे"?  माझी सासू शेजारी उभी राहून तिला चावी दाखवत होती. "अगं, हि बघ इथे खिळ्याला अडकवलेली आहे. तू ओरडू नकोस. ही काय, चावी इथे खिळ्याला अडकवलेली आहे. तू एवढा आरडाओरडा करू नकोस." असं पुन्हा पुन्हा सांगितल्यावर तिचं किंचाळणं थांबल. पण चावी बघितल्या नंतरही तिला आपल्या आरडाओरड्याची जराही शरम वाटली नाही. काही झालच नाही अशा प्रकारे ती वागली. सॉरी हा एक शब्दही तिच्या तोंडातून निघाला नाही. मी समोर उभी राहून तिचा तमाशा बघत होते. प्रसंगाच्या गांभीर्याच भान ठेऊन मी तेंव्हा गप्प बसले. पण आता वाटतं तिला काहीतरी बोलायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं?

यावर सवाल जवाबदारांनी दिलेल उत्तर :
न, सर्वप्रथम मी तुझ अभिंनदन करतो कि तू प्रसंगाच भान ठेऊन गप्प बसलीस. तूही स्वतःला याबद्दल शाबासकी दे. बऱ्याच लोकांना वेळ - काळाच भान ठेवायला जमत नाही. तुझ्या नणंदेच उदाहरण तुझ्या समोर आहे. जरा कल्पना कर कि आपल्या मुलीचा तो आरडाओरडा बघून तुझ्या सासऱ्यांच्या आत्म्याला (जो त्याप्रसंगी तिथे हजर असण्याची शक्यता आहे) किती यातना झाल्या असतील.

आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तुझ्या भावना मी समजू शकतो. पण नणंदेला बोलून तू काय साधलं असतंस? तू समजा तिला काही बोलली असतीस तर तिच्या "संस्कारां"प्रमाणे तिनं कदाचित लगेच तुला उलट उत्तर दिलं असतं. तिच्या उलट उत्तराला तिच्याच वेगाने उलट उत्तर देणं तुला जमलं असतं का? या प्रश्नाचं उत्तर जर नकारार्थी असेल तर उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सोडून दे. मेडिटेशन कर. स्वतःच्या आत्म्याची शक्ती वाढवण्यासाठी नियमित ध्यान करत जा.

स नि विचारलं होतं:
माझ्या नवऱ्याची बहीण (सासरी पटत नसल्यामुळे) तिच्या मुलांसह आमच्याकडे रहाते. तिच्या मुलीचं लग्न ठरलंय. नणंदेला तिच्या नवऱ्याचा सहभाग (त्याची लग्नाचा खर्च करण्याची ऐपत आणि ईच्छा असुनही) मुलीच्या लग्नामध्ये नको आहे. ती माझ्या नवऱ्याकडे लग्नखर्चासाठी बरीच मोठी रक्कम मागत आहे. मला वाटत कि तिनं मुलीच्या वडिलांकडून लग्नासाठी पैसे घ्यावेत किंवा ते नको असतील तर मुलीला सांगावं कि थोडी वर्ष थांब, नोकरी कर, पैसे साठव आणि मग लग्न कर किंवा मुलीच्या सासरच्या लोकांना समजावून सांगावं की तुम्हांला आताच लग्न करून हवं असेल तर मी माझ्या बजेट मध्ये बसेल तस करून देईन. मी नणंदेला हे सुचवु का? तुम्हाला काय वाटतं?

सवाल जवाबदारांच यावर उत्तर:
स, तुझं म्हणण कितीही बरोबर असलं तरी या बाबतीत तू नणंदेला काही सुचवलस तरी त्याचा उपयोग होणार नाही. बहिणीला मुलीच्या लग्नासाठी पैसे द्यायचे कि नाही हा निर्णय तुझ्या नवऱ्याला घ्यावा लागेल. तो जर त्याच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जागरूक असेल आणि एवढी मोठी रक्कम भाचीला लग्नात आहेर म्हणून द्यावी असं त्याला वाटत नसेल तर त्यानं पैसे देतानाच बहिणीला सांगायला हवं कि हे कर्ज आहे हि गिफ्ट नाही. अमुक एक कालावधीत पैसे परत मिळावेत अशी माझी अपेक्षा आहे. बहिणीला पैसे मागताना संकोच वाटत नसेल तर भावाला त्याचे पैसे परत मागण्यात संकोच वाटण्याचं कारण नाही.

तिसरा प्रश्न त नी विचरला होता:
माझ्याकडे एकदा पार्टी होती. मी सासूला विचारलं कि तुमच्याकडे स्वयंपाकाची मोठी भांडी आहेत का? सासू म्हणली कि हो, आहेत. क्ष ला दिली आहेत. तिच्या कडून मागून घे. मी क्ष ला फोन करून भांडी मागितली तर क्ष म्हणाली कि तिच्याकडे सासूची भांडी नाहीत. दोधीं पैकी एक कोणतरी खोटं बोलतंय. प्रश्न भांड्यांचा नाही. मला ती भांडी अजिबात नकोत. पण जुन्यापुराण्या भाड्यांवरून कोण खोटं बोलू शकतं ते शोधून काढायचय. कसं शोधून काढू?

सवाल जवाबदारांच उत्तर:
त, या प्रश्नाचं उत्तर अकबर- बिरबलाच्या कथेत सापडतं. तूला ती गोष्ट माहित नाही का? नसणार बहुतेक. जर माहित असती तर हा प्रश्न तू मला विचारला नसतास. असो, आता विचारलाच आहेस तर सांगतो - असं कर, दोघींना दोन अगदी सारख्या लांबीच्या शेवग्याच्या शेंगा भेट दे. त्यांना सांग की जी खोट बोलत असेल तिच्या शेंगेची लांबी उद्या सकाळी सहा इंचांनी वाढलेली असेल. ज्या चोराच्या मनात चांदणं असेल ती खोटारडी आपली शेंग उद्या सहा इंच वाढेल आणि आपलं भांड फुटेल (भांडं जुनं असेल तर ते आधीच फुटलेलं असण्याची शक्यता आहे 😀) या काळजीनी आदल्या रात्री ती शेंग सहा इंच कापून ठेवेल. दुसऱ्या दिवशी तू दोन्ही शेंगा बघशील तेंव्हा जिची शेंग कापलेली असेल ती खोट बोलत आहे हे उघड होईल. बिरबलाच्या जमान्यात या युक्तीचा उपयोग होत असे. आजच्या कलियुगात होईल कि नाही माहिती नाही. पण करून बघ.

आणि हो, तुझं वाचन जरा वाढव. म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला पुस्तकांत सापडतील. उगीच दुसऱ्यांना विचारायची वेळ येणार नाही.

मराठी वर्तमानपत्रातील प्रश्नोत्तर वाचल्या नंतर न्यूयॉर्क टाईम्स मधलं  सोशल क्यूज वाचलं तेंव्हा भारतीय आणि अमेरिकन विचारातील फरक पुन्हा एकदा जाणवला.

एका निनावी महिलेने विचारलं होतं:
माझा मुलगा आणि सून त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन दहा दिवस आमच्याबरोबर आमच्या हिंवाळ्याच्या घरात रहायला येणार आहेत. माझी सून फार आळशी आहे. ती सारख्या झोपा काढत असते. जेंव्हा झोपलेली नसते तेंव्हा फोनवर असते. माझा मुलगा थोडा बरा आहे. पण तो हि सारखा लोळत असतो. त्यांच्या घरी भांडी खरकटी पडलेली असतात, कपडे जमिनीवर पसरलेले असतात वगैरे. ते आमच्या घरी येतील तेंव्हा त्यांना कसं सांगू की सारा वेळ फोन वर घालवु नका आणि सतत झोपू नका - खासकरून त्यांची मुलगी जागी असेल तेंव्हा. ते मुलीला त्यांच्याबरोबर झोपवण्याचा प्रयत्न करतात. पण ती झोपत नाही. मला काहीतरी बोललच पाहिजे नाहीतर माझं डोकं फिरायची पाळी येईल.

यावर सदर लेखकाने दिलेलं उत्तर:
मी हे बरेचदा ऐकलंय - कधी कधी मुलांच्याकडून. त्यांचं म्हणणं असं असतं: आम्ही नोकऱ्या आणि लहान मुलं सांभाळून पार थकून गेलो होतो. म्हणून आठवडाभर सुट्टीसाठी आईवडीलांकडे गेलो. वाटलं होतं भरपूर झोप आणि आयतं पाळणाघर मिळेल. पण कसलं काय. आम्ही घरात पाय ठेवताच त्यांची कटकट सुरु झाली.

निनावी, फरक हा आहे कि तुला वाटतंय तुझा मुलगा आणि सून घरचे पाहुणे आहेत. पण ते तुझ्याकडे एक फुकट सुट्टीच ठिकाण - मुलांसाठी आया आणि साफसफाई या विनाशुल्क सेवां सहित  - या दृष्टिकोनातून बघत असतील. सुरवातीलाच काही गोष्टी स्पष्ट बोलून घे - म्हणजे तू नातीला किती वेळ सांभाळू शकशील वगैरे. त्यांना नाराज करण्यात काही अर्थ नाही - खास करून तुला तुझा मुलगा आणि नात परत परत येत रहावेत असं वाटत असेल तर.

यानंतर सल्लागारांनी त्या आईला इतरही काही सुचवलं - कि सारखं झोपण्यावरून आणि फोनच्या वापरावरून ती लहान मुलं असल्या प्रमाणे त्यांच्यावर बॉसिंग करू नकोस. खरकटी भांडी आणि अस्ताव्यस्त पसरलेल कपडे मात्र आवरून ठेवायला सांग. आणि शेवटी म्हणाले: एक शेवटचा (सु)विचार - जर तुला परवडत असेल तर दहा पैकी काही दिवसांसाठी त्यांची सोय जवळच्या हॉटेल मध्ये कर. दहा दिवस एकमेकांच्या पायात पाय घालून रहाण्यापेक्षा अधून मधून जेवायला, फिरायला वगैरे एकत्र जमलात तर तुमची सगळ्यांचीच सुट्टी जास्त आनंदात जाईल.

तात्पर्य: अमेरिकन सल्ल्या नुसार ज्या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होत असेल त्या लोकांना थोडं दूर ठेवा.
भारतीय सल्ला: ज्या लोकांशी तुमचे संस्कार जुळ्त नसतील आणि ज्यांच्या वागण्याने तुम्हांला मनस्ताप होत असेल अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मेडिटेशन करा. ध्यान केल्याने तुमची सहनशक्ती वाढेल.