भाई या चित्रपटात भक्ती बर्वेचा प्रवेश सिनेमाच्या अगदी शेवटी होतो. तिच्या आधी बाळ ठाकरे पुलंना पहायला येतात. पु.ल. हॉस्पिटलच्या बेडवर निपचित व्हेंटिलेटर लावलेल्या अवस्थते पडलेले असतात. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कोण आपल्याला पहायला येतंय त्यांना काही समजत नसतं. ठाकरे जायला निघतात तेंव्हा भक्ती येते.
भक्तीला सिनेमात बघितल्यावर मी प्रथम गोंधळले. दोन्ही तारखा चेक केल्या. ह्या दोन्ही घटना -पुलंचा शेवट आणि मुंबई -पुणे हायवेवर अपघातात झालेला भक्ती बर्वेच मृत्यू - मी भारता बाहेर असताना घडल्या. त्यांचा अनुक्रम माझ्या आठवणीत उलट- सुलट बसला होती. लांब रहात असताना संदर्भ- विरहित फक्त ठळक बातम्या समजल्या कि असं होतं. पु.ल. अगदी अलिकडे गेले आणि भक्ती बर्वे त्यांच्या खूप आधी गेली असं वाटत होतं. पण नाही. ह्या सहस्त्रकाच्या सुरवातीला जून २००० मध्ये पु. ल. गेले आणि त्यानंतर सात -आठ महिन्यात फेब्रुवारी २००१ मध्ये भक्ती बर्वे गेली. चित्रपटात भक्तीला बघतना मन उदास होतं. पु. ल. ८० च्या वर वय झाल्यावर गेले. भक्ती लवकर गेली.
भक्ती बर्वे पुलंना पहायला हॉस्पिटल मध्ये येते आणि त्या अनुषंगाने ती फुलराणी या त्यांच्या नाटकाच्या तालमीची दृश्य दाखवली जातात. संपूर्ण सिनेमात तोच फॉरमॅट वापरलेला आहे. जे कोणी पुलंना पहायला हॉस्पिटल मध्ये येतात - त्यांचे भाऊ, मित्र, संगीत आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती किंवा त्यांच्या पुस्तकातील व्यक्तिरेखा - त्या अनुषंगाने त्यांच्या बरोबरचे पुलंच्या आयुष्यातील प्रसंग दृश्यस्वरूपात दाखवले जातात. पुलंच्या निकटच्या मित्र वर्तुळातील दोघे - वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व - खूप आधी देवाघरी गेले होते. अर्थातच ते पुलंना पहायला इस्पितळात आलेत असं दाखवता आलं नसतं. त्या दोघांबरोबरचे प्रसंग सिनेमात अधून मधून विखुरलेले आहेत. वसंतराव देशपांडे तर अगदी सुरवाती पासुन - पुलंच्या कॉलेजच्या दिवसांपासून त्यांच्याबरोबर दिसतात.
चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे आनंदवनातील दृश्य वगळता सिनेमातील सर्व सेट्स चांगले आहेत - खास करून सर्व घरांचे सेट्स. महिलांची केश -वेशभूषा काळानुरुप साजेशी वाटते. बहुतेक सर्व कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. एक अपवाद वगळता: सुनील बर्वेंच्या जब्बार पटेलांची छाप पडत नाही. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शकाची बॉडी लँग्वेज बरोबर साकारण्यात आली आहे असं वाटत नाही. जब्बार पटेल यांच्या बऱ्याच मुलाखती मी दूरदर्शनवर प्रतिभा आणि प्रतिमा सारख्या कार्यक्रमातुन पूर्वी बघितल्या होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वाला सिनेमात न्याय मिळाला अस दिसत नाही.
दुसरी एक भूमिका खटकते ती म्हणजे बेळगावच्या रावसाहेबांची. सिनेमात ती व्यक्तिरेखा बघताना - पु.ल. लिहायला बसलेले असताना उगीचच मध्ये मध्ये लुडबुड करून व्यत्यय आणणारी एक व्यक्ती अशी वाटते. पुलंच्या व्यक्तिचत्रणात रावसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे इतर अनेक पैलू दिसतात. व्यक्ती आणि वल्ली मधल्या ज्या व्यक्तिरेखा चित्रपटात धुसडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो यशस्वी झाला आहे असं वाटत नाही. त्यात रावसाहेब एकटेच आपल्या मूळ नावानिशी येतात. बाकी दोघे - अट्टाहासाने अतिशुद्ध मराठी बोलणारा सखाराम गटणे चित्रपटात रहाटे झालाय आणि जुन्या झालेल्या खोबऱ्या प्रमाणे खवट असलेला अंतू बर्वे कर्वे झाला आहे.
प्रॉब्लेम हा आहे की ज्यांनी व्यक्ती आणि वल्ली वाचलंय त्यांना या व्यक्तिरेखा पडद्यावर बघून काही समाधान मिळणार नाही कारण पुस्तकाच्या पानात त्या कितीतरी जास्त जिंवत होऊन आलेल्या आहेत. ज्यांनी व्यक्ती आणि वल्ली वाचेललं नाही त्यांना ह्या व्यक्ती त्या पुस्तकातून आलेल्या आहेत हे समजणार नाही. ज्यांना पुलंबद्दल काही माहित नाही त्यांना हा चित्रपट बघून असं वाटेल कि ते एक मराठी मध्यम वर्गीय सदगृहस्थ होते: पेटी चांगली वाजवायचे... नाटक - सिनेमाच्या क्षेत्रात त्यांनी थोडंफार काम केलं होतं...हसतमुख होते...कायम आनंदी असायचे...थोडे वेंधळे होते... थोरा-मोठ्यांच्या बरोबर त्यांची ऊठबस होती - आपल्या सामाजिक बांधिलकी बद्दल जागरूक होते - बस इतकंच. त्या पलिकडे जास्त काही नाही. दिग्दर्शकालाही त्यांच्याबद्दल बहुतेक तेवढीच माहीती असावी आणि ते चित्रपटात दिसून येतं .
एक अक्षम्य उणीव चित्रपटात दिसते ती म्हणजे पुलंनी केलेल्या परदेश प्रवासांचा आणि लिहिलेल्या प्रवास वर्णनांचा अनुल्लेख. ज्या काळात सर्वसाधारण मध्यम वर्गीय मराठी लोकांना देशाबाहेर फिरायला जाणं सहज शक्य होत नसे, इंग्लड आणि अमेरिका दुसरे ग्रह असावेत इतके दूर वाटायचे त्या काळात पु. ल. आणि सुनीताबाईंनी भरपूर परदेश प्रवास केला. भारतात दूरदर्शनची सुरवात करताना पुलंचा त्यात मोठा सहभाग होता. त्यासाठी ते काही महीने इंग्लंडमध्ये राहून बीबीसीतून प्रशिक्षण घेऊन आले होते. आपली जग भ्रमंती त्यांनी अपूर्वाई आणि पूर्वरंग या अतिशय सुंदर प्रवास वर्णनातून घरोघरात पोहोचवली. त्या तोडीचं प्रवासवर्णन मी आजतागायत मराठीत वाचलेलं नाही. अपूर्वाई च्या प्रस्तावनेत पु.ल म्हणतात - हे माझ्या प्रवासाचं वर्णन कमी असून प्रवासातल्या माझं वर्णन जास्त आहे. त्यामुळेच कदाचित ते एखाद्या माहितीपूर्ण प्रवास वर्णनापेक्षा जास्त रसभरीत झालेलं आहे. कित्येक मराठी घरं अशी असतील ज्यांनी इंग्लड - युरोप आणि दक्षिण आशियातील देश पहिल्यांदा पुलंच्या पुस्तकातून पहिले. अशा या प्रवास वर्णनांचा उल्लेखही सिनेमात नाही. त्यांच्या परदेश प्रवासाचाच उल्लेख नाही तर प्रवास वर्णनाचा उल्लेख कुठून येणार.
सर्वसामान्य वाचकांसाठी पुलंची महती म्हणजे त्यांचं लिखाण: व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी, बटाट्याची चाळ. अपूर्वाई, पूर्वरंग ही पुस्तकं, वाऱ्यावरची वरात हा कार्यक्रम, ती फुलराणी हे नाटक आणि त्यांचे लेख. पुलंच व्यक्तिमत्व आणि काम बहुरंगी आणि बहुढंगी होतं. ते वेगवेगळ्या क्षेत्रात सहज वावरले. जिथे वावरले त्या क्षेत्रातील त्यांचं काम लोंकप्रिय झालं. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढताना काय वगळायचं आणि काय घ्यायचं हे ठरवणं बहुदा सोप्प नसावं: पु. ल. आणि सुनीताबाईंना मुलं नव्हती अन त्याबद्दल सिनेमाच्या शेवटी सुनीताबाई पुलंना सॉरी म्हणतात, दिल्ली दूरदर्शनमध्ये काम करीत असताना पंतप्रधान पंडीत नेहरूंशी पुलंची भेट झाली होती, पुलंनी प्रकाशवाणी हे दूरदर्शनसाठी सुचवलेलं पर्यायी नाव दिल्लीत स्विकारलं गेलं नाही, पु.ल. आणि सुनीताबाई शाळेत शिक्षकांची नोकरी करीत होते तेंव्हा बाळ ठाकरे त्यांचे विद्यार्थी होते - ह्या पुलंच्या चाहत्यांच्या दृष्टीने कमी महत्वाच्या गोष्टी चित्रपटात आहेत पण वाचकांना आवडलेल्या प्रवास वर्णनांना चित्रपटात जागा मिळू शकली नाही ही निवड खटकते.
आणखी एक निवड खटकते ती म्हणजे व्हेंटिलेटर लावलेल्या पुलंच पडद्यावरील दर्शन. व्हेंटिलेटर या नावाचा मराठी चित्रपट जो काही वर्षांपूर्वी येऊन गेला (आणि अतिशय सुंदर होता ) त्या चित्रपटात व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णाला खूप संवेदनशील रीतीने हाताळण्यात आलं होतं. नक्की आठवत नाही पण बहुतेक कधीच त्या सिनेमात व्हेंटिलेटर लावलेला रुग्ण पडद्यावर दिसत नाही किंवा दिसला असला तरी अगदी ओझरता - विसंगत वाटणार नाही असा ( तो चित्रपट बऱ्यापैकी विनोदी आहे ) . ह्या सिनेमात मात्र व्हेंटिलेटर लावलेले पु. ल. पुन्हा पुन्हा पडद्यावर दिसतात. सिनेमातलं बरच फुटेज विनाकारण हॉस्पिटलच्या दृश्यांनी खाल्लय. कदाचित ती भेटायला येणाऱ्या लोकांची थीम वापरायची होती म्हणून असेल. हॉस्पिटल मधिल एका दृश्यात विजया मेहता एका वार्ताहाराला - जो पुलंच्या तब्येती विषयी ताज्या बातमीसाठी धडपडत असतो - आपल्या जवळ बोलावून दटावतात, "I will speak to your station director ". या दृश्याचं प्रयोजन काय? चित्रपटाच्या थीम नुसार "भाईंच शेवटचं आजारपण" हे नाव चित्रपटाला जास्त संयुक्तिक ठरलं असतं.
हा चित्रपट प्रदर्शित झाला तेंव्हा त्यावर प्रखर टीका झाली होती. सेलफोन कॅमेऱ्यामुळे आजकाल लोकांच्या जाणीवा बोथट झाल्या असल्या - कोणीही कुठेही जाऊन कोणाचेही कसल्याही अवस्थेतील फोटो काढून ते समाज माध्यमांमध्ये लावण्यात धन्यता मानत असलं - तरी व्हेंटिलेटर लावलेला रुग्ण हि खऱ्या आयुष्यात खुप गांभीर्याने घेण्याची दुःखद गोष्ट आहे. आपल्या आवडत्या लेखकाच्या आयुष्यावरील चित्रपटाची थीम म्हणून त्याच्या शेवटच्या आजरपणाचा वापर करणं त्यांच्या चाहत्यांना खटकलं नसतं तर नवल - विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्यात इतर बरच काही दाखवण्यासारखं होत ते वगळून. ते आजरपण काही पुलंच्या आयुष्याचा फार मोठा भाग नव्हतं - अगदी शेवटच्या काही दिवसांच होतं - जस ते अनेक लोकांच्या आयुष्याचं असु शकतं.
त्यापेक्षा थोडं मागे जाऊन जरा जास्त संशोधन केलं असतं, पुलंच्या साहित्याबद्दल जास्त जाणुन घ्यायचा प्रयत्न केला असता,
तर हॉस्पिटलच्या थीमला काही पर्याय सुचु शकला असता. भक्ती बर्वेला पडद्यावर बघुन मला तरी तसं वाटलं. जब्बार पटेल तर अगदी सुरवाती पासून हॉस्पिटलच्या दृश्श्यांमध्ये सुनीताबाईंच्या सोबत होते. समजा असं दाखवलं असत कि मुंबई दूरदर्शनच्या संग्रहालयासाठी भक्ती बर्वे आणि जब्बार पटेल, पु. ल. आणि सुनीताबाईंची प्रदीर्घ मुलाखत घेत आहेत... त्यानिमित्तानं अनेक दिवस ते पुलंच्या बरोबर घालवत आहेत...त्यांच्याबरोबर आनंदवन सारख्या त्यांच्या आवडत्या ठिकाणांना भेट देत आहेत...तर हॉस्पिटलची सोयीची पण निरस थीम टाळता आली असती.
त्यातच मध्ये पु. ल. आणि नंदा प्रधानच्या गप्पा घातल्या असत्या तरी चाललं असतं. नंदा प्रधान व्यक्ती आणि वल्ली मध्ये आहे. पुलंचा कॉलेज मधील मित्र. श्रीमंत घरातला देखणा मुलगा सदाशिव पेठेत रहाणाऱ्या एका साध्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्यावर लहान भावंडांची जबाबदारी असते म्हणून ती लग्नाला नकार देते. असा हा नंदा प्रधान अधून मधून अचानक पुलंच्या आयुष्यात उपटतो, त्यांना गप्पा मारायला आपल्या बरोबर घेऊन जातो आणि परत नाहीसा होतो. पु. ल. खूप आनंदी आणि उत्साही होते असं चित्रपटात पुन्हा पुन्हा म्हटलंय. अशा व्यक्तीला शेवटच्या घटक मोजत बिछान्यात पडलेल्या अवस्थते इतक्या वेळा पडद्यावर दाखवायचं काम त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तीने कदाचित केलं नसतं.
तलवारी पेक्षा लेखणी श्रेष्ठ असा एक वाक्प्रचार आहे परंतु असही म्हणतात कि अ पिक्चर इज वर्थ अ थाउजंड वर्ड्स - जे वर्णन करायला हज्जारो शब्द लागतील ते केवळ एका चित्राद्वारे व्यक्त होऊ शकतं. पुलंनी केवळ कागद आणि लेखणी वापरून कित्येक व्यक्तीं, देश आणि प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत केले. ते त्यांचं सामर्थ्य होतं. त्यांना पडद्यावर जिंवत करण्यासाठी चित्रपट हे प्रबळ माध्यम हाताशी असुनही त्याच्या तोडीचं कोणी मिळू शकलं नाही हे मराठीचं दुर्दैवं.
भविष्यकाळात किती लोक मराठी वाचतील याची जिथे शाश्वती नाही तिथे मराठी लेखकांबद्दल किती लोकांना जाणून घ्यावंस वाटेल हि शंका आहे. जर कुणाला पुलं बद्दल जास्त जाणून घ्यावंसं वाटलं तर पुलंच्या साठी निमित्त जयवंत दळवींनी संकलित केलेलं पु .ल एक साठवण हे पुस्तक आणि त्याच्या जोडीला सुनीता बाईचं आहे मनोहर तरी हे आत्मलेखन पुरेसं आहे. हा चित्रपट नाही बघितला तरी चालेल. चित्रपटावरून पुलंच्या वाचकांना त्यांच्या लिखाणानी किती आनंद मिळवून दिला होता हे समजत नाही.