Saturday, September 5, 2020

क्लास वॉर्स


सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर पारितोषिक गेल्या वर्षी पॅरासाईट या कोरिअन सिनेमाला मिळालं. परदेशी भाषेतील चित्रपट असुनही इंग्रजी सिनेमांच्या श्रेणीत बक्षिस मिळवणारा ऑस्करच्या इतिहासातील तो पहिला चित्रपट ठरला. 

पॅरासाईट या शब्दाच अर्थ परोपजीवी (पर+ उपजिवी). दुसऱ्यांच्या जीवावर उपजीविका करणारे /जगणारे प्राणी आणि वनस्पती. इंग्रजी शब्दकोशात या शब्दाचा आणखीही एक अर्थ आढळतो तो म्हणजे श्रीमंतांची स्तुती करून त्यांच्या पाहुणचाराचा गैरफायदा घेणारे लोक. चित्रपटात एक गरीब कुटुंब एका श्रीमंत कुटुंबाच्या जीवावर कसं जगु पहातं आणि पुढे त्याच पर्यवसन कशात होतं ते दाखवलं आहे. 

सुरवातीला दोन्ही कुटुंब आपापल्या जगात जगत असतात. श्रीमंत पार्क कुटुंब त्यांच्या मोठया घरात - जे शहराच्या वरच्या भागात असतं. तिथे पोहोचण्यासाठी थोडी चढण चढावी लागते. ते घर एका प्रसिद्ध वास्तुशात्रज्ञांनी डिझाईन केलेलं असतं आणि आधुनिक मोजक्या पद्धतीनं सजवलेल असतं. 

गरीब किम कुटुंबाची खोली त्याच शहराच्या दुसऱ्या भागात रस्त्याच्या खालच्या पातळीवर असते. त्यात गच्चं भरलेल्या सामानाचा पसारा असतो. छोटाश्या खिडकीतून त्यांना रस्त्याचा थोडा भाग दिसतो. दोन्ही परिवारात चार सदस्य असतात - आई, वडील, एक मुलगा आणि एक मुलगी. पार्क आईवडील तरुण असतात. त्यांची मुलं लहान असतात. किम आईवडील मध्यमवयीन असतात. त्यांची मुलं कॉलेज मध्ये शिकणारी, नोकरीच्या शोधात असलेली असतात. 

दिवसभर खोलीत बसुन पिझ्झा डिलिव्हरीची खोकी जुळवण्याचं काम करायचं आणि ते करताना टीव्हीवर डेली सोप्स बघायचे हा किम कुटुंबाचा दिनक्रम असतो. रस्त्याखालच्या खोलीत एक प्रकारचा कुबट वास असतो जो त्या घरात रहाणाऱ्या लोकांच्या अंगाला चिकटतो. त्यांना तो जाणवत नाही पण पुढे जेंव्हा त्यांचा पार्क परिवाराशी संबंध येतो तेंव्हा श्रीमंत नाकांना तो वास लगेच झोंबतो. सिनेमात त्याला तळघराचा, जुन्या झालेल्या मुळ्या सारखा वास म्हंटलंय. 

गरीब म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं रहातं तशी ही गरिबी नाही. हे दक्षिण कोरिआतील - एका विकसित देशातील गरीब आहेत. भारतासारखी रोजी एक डॉलर पेक्षाही कमी उत्पन्नावर भागवावं लागणारी ही गरिबी नाही. ती सापेक्ष - रिलेटिव्ह आहे. हे जरी खरं असलं तरी त्यांच्याकडे the haves आणि the have nots  - ज्यांच्याकडे आहे ते लोक आणि ज्यांच्याकडे नाही ते लोक यामधली दरी अस्तित्वात नाही असं नाही. ती तफावत जगात खूप ठिकाणी आहे. त्यातून झालेला संघर्ष सिनेमात दाखवला आहे. नोकरी न मिळाल्यामुळे निराश झालेल्या बेरोजगार तरुणांनी भारी किंमतीच्या गाड्यांच्या शोरुमची नासधूस करावी तशा प्रकारचं हे रस्त्यातलं क्लास वॉर नाही. हे जास्त पर्सनल आहे. 

एकदा अनपेक्षितपणे किम कुटुंबातील मुलाला श्रीमंत घरात नोकरीची संधी मिळते. त्याचा मित्र शिक्षणासाठी अमेरिकेला चाललेला असतो. तो आपली शिकवणीची नोकरी त्याला देऊ करतो. पार्क कुटुंबातील मुलीला इंग्रजी शिकवण्यासाठी कुमार किम त्यांच्या घरात प्रवेश करतो. थोड्याच दिवसात कट कारस्थान करून अख्ख किम कुटुंब पार्क घरात शिरत. मराठीत एक म्हण आहे  - भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. तसच घडतं. 

म्हणी आता फारशा वापरल्या जात नसल्या तरी मला आवडतात. थोड्या शब्दात त्या बरच काही सांगुन जातात. न्यूयॉर्कमध्ये मला दुसरी एक म्हण किंवा खरतर वाक्प्रचार वारंवार आठवतो. बस किंवा ट्रेन मध्ये एखादी व्यक्ती जोरजोरात फोनवर बोलत असते. बहुतांश लोक तिकडे दुर्लक्ष करतात. कानात ईअर प्लग्ज घालुन आपल्या फोनमध्ये डोकं खुपसून बसतात. पण तिच्या मागच्या/पुढच्या सीटवर बसलेल्या ज्येष्ठ महिलेला नेमकं त्याचवेळी पेपर वाचन करायचं असतं. ती एकदोनदा फोनवर बोलणारीकडे रागात बघते. फोनवालीच लक्ष नसतं. शेवटी ज्येष्ठ वाचिका वैतागून मोठ्याने तिला म्हणते, "आता बस् कर की. आम्हांला कशाला तुझ्या घरातलं -बाहेरच सगळं ऐकवतेस." फोनवाली ते ऐकून तिकडे दुर्लक्ष करते. मुद्दामहुन संभाषण लांबवते. 

तू कोण मला सांगणार? मी मला जे हवं ते करणार मग दुसऱ्यांना माझ्या वागण्याचा कितीही त्रास झाला तरी मला त्याची पर्वा नाही - अशी वृत्ती फार बोकाळलेली दिसते. तेंव्हा मला -  शहाण्याला शब्दाचा मार किंवा त्याचं हिंदी भाषांतर समझनेवाले को ईशारा काफी है - आठवतं. आजकाल हा वाक्प्रचार आठवण्या सारखे प्रसंग वाढत चाललेत .  

श्रीमंत घरात घुसण्यासाठी किम कुटुंब बिनधास्तपणे कारस्थानं करत. खोटंनाट बोलून कुमारी किम पार्क घरातील लहान मुलाला चित्रकला शिकवण्याची नोकरी पटकवते. एकदा पार्क कुटुंबाचा तरुण ड्रायव्हर शिकवणी संपल्यावर तिला घरी सोडायला जातो. वाटेत कामापुरतं संभाषण करून तो तिला ती सांगते त्या ठिकाणी सोडतो. गाडीतुन उतरायच्या आधी मागच्या सीटवर बसलेली कु. किम हळुच आपली पॅंटी काढुन सीटच्या खाली टाकते. नंतर बॉस गाडीत बसतो तेंव्हा त्याला ती दिसते. त्याला ड्रायव्हरचा संशय येतो. गाडीत असले उद्योग करणारा ड्रायव्हर नको म्हणून त्याला सुट्टीवर पाठवण्यात येतं. त्याच्या जागी वडील किम ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागतात. 

पार्क परिवाराच्या हाऊसकीपरला विशिष्ट फळांची ऍलर्जी असते. ते समजताच किम मंडळी त्या प्रकारची पुष्कळ फळं आणून स्वयंपाकघरात ठेवतात. हाऊसकीपर सारखी खोकु लागते. टिश्यू पेपरवर लाल रंगाचे डाग पाडून किम वडील ते कागद कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. मालकिणीला ते कागद दाखवून हाऊसकीपर सारखी खोकतेय आणि त्यातून रक्त पडतंय म्हणजे तिला टी बी झाला असावा असा संशय तिच्या मनात पेरतात. हाऊसकीपरची नोकरी जाते. तिच्या जागी आई किम हाऊसकीपर म्हणून येते. 

पार्क घरातील सगळ्या कामांचा भार  - गाडी चालवणे, घरकाम, मुलांचं संगोपन - किम कुटुंबाकडे सुपूर्द होतो. अशा रितीने पार्क कुटुंबही एक प्रकारे किम परिवाराच्या जीवावर जगू लागतं. आपला नविन ड्रायव्हर, नविन हाऊसकीपर, मुलांचे नविन टीचर्स यांचं आपसात काही नातं आहे याचा त्यांना पत्ता नसतो. नोकरी देण्याआधी त्या लोकांची पार्श्वभूमी तपासून बघण्याच्या फंदात पार्क पती - पत्नी पडत नाहीत. 

शेवटी पार्क आणि किम - श्रीमंत आणि गरीब दोन्ही कुटुंबांच्या लक्षात आलं कि आपल्याला एकमेकांमुळे खूप फायदा होतोय. मग ते एकमेकांना मदत करत कायम गुण्यागोविंदाने राहिले - असा सिनेमाचा सुखांत होत नाही. ... and they lived happily ever after असा शेवट व्हायला ही काही परिकथा -fairytale नाही. हे तर त्रिकालाबघीत सत्य आहे कीं सीमारेखांचं उल्लंघन झालं की युद्ध अटळ असतं. सिनेमात शेवटी द्वंद्व होतं. फक्त गरीब विरुद्ध श्रीमंत नाही तर गरीब विरुद्ध गरीब असंही.  

आपल्या लहान मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्क कुटुंब नदीकाठी सहलीला जातं. ती संधी साधून जुनी हाऊसकीपर घरी येते. तेंव्हा किम चौकडी अनायसे रिकाम्या मिळालेल्या श्रीमंत घरात पार्टी करत असते. त्यांनी दार उघडताच जुनी हाऊसकीपर लगबगीनं घरात शिरून एका कपाटाच्या मागे दडलेला गुप्त दरवाजा उघडते आणि धावतपळत खालच्या तळघरात उतरते. तिथे तिचा नवरा रहात असतो. त्याची नोकरी गेल्या पासून तो पार्क कुटुंबाच्या नकळत त्यांच्या तळघरात येऊन राहिलेला असतो. नोकरी गेल्यामुळे हाऊसकीपरला अचानक घर सोडावं लागतं पण तेंव्हा ती नवऱ्याला तळघरातुन बाहेर काढु शकत नाही.

गरीब विरुद्ध गरीब द्वंद्व होतं ते दोन हाऊसकीपरच्या कुटुंबांमध्ये - तळघराचा ताबा मिळवण्यासाठी. ते पडद्यावर इतकं ब्रूटल, इतकं क्रूर दाखवलंय, इतकं ताणलेलं आहे कि हे संपणार तरी कधी असं वाटतं. दोन्ही कुटुंब तळघरात एकमेकांना मारतात, झोडपतात, खेचतात, ढकलतात, ओरबाडतात, पाडतात, तुडवतात, रक्तबंबाळ करतात, बेशुद्ध पाडतात  - आपल्या शरीराचा प्रत्यके अवयव दुसऱ्यावर मात करण्यासाठी वापरतात. 

त्याच्या तुलनेत गरीब विरुद्ध श्रीमंत द्वंद्व सुंदर सेटिंग मध्ये होतं आणि थोडक्यात आटपत. या द्वंद्वात सगळी पात्र लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तयार होऊन आलेली असतात. घराबाहेरचं लॉन पार्टीसाठी सजवलेलं असतं. टेबलं मांडलेली असतात. मुलाची हौस म्हणून पार्टीत खोटी लढाई खेळण्यात येते - खऱ्या तलवारी वापरून. या द्वंद्वात गरीब आणि श्रीमंत शरीरं एकमेकांना स्पर्श करत नाहीत. शस्त्रांचा वापर होतो. 

द्वंद्वात कोणाचाच विजय होत नाही. गरीब घरातील मुलीचा आणि श्रीमंत परिवारातील वडीलांचा त्यात अंत होतो. तळघरातल्या मारामारीत जुन्या हाऊसकीपरचा आणि तिच्या नवऱ्याचा जीव जातो. एका वेगळ्या अर्थाने तळघर गरीब वडिलांच्या ताब्यात येतं. पार्क आई मुलांना घेऊन दुसरीकडे रहायला जाते. घर विकायला काढलं जातं. तरीही घराचं तळधर किम वडिलांच्या ताब्यात रहातं. त्यांच्या रूपात किम परिवाराचा जीव त्या घरात अडकून पडतो. कुमार किम ते घर विकत घेऊन तळघरातून वडिलांना बाहेर काढायची स्वप्न बघतो.  

एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरते जेंव्हा ती भौगोलिक सीमारेषांच्या पलीकडे जाते. या चित्रपटाची कथा जगातील कुठल्याही शहरात घडू शकते. कुठलीही भाषा बोलणाऱ्या लोकांना ती लागू होऊ शकते. या चित्रपटाला केवळ परदेशी सिनेमा नाही तर जनरल सिनेमाच्या कॅटेगरीत पहिलं बक्षीस देताना ऑस्कर्सच्या निवड समितीनं कदाचित तोच विचार केला असेल.