पहिला प्रश्न bullying विषयी होता. बुल्लीईंग हि जगभर एक गंभीर समस्या आहे. बुल्लीईंगच्या त्रासाला कंटाळून मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. कधीकधी लहानपणी मुलांना शाळेतली मुलं bully करतात- हे त्याचं प्रचलित रूप सर्वांनां माहित आहे. सायबर बुल्लीईंग विषयीही आता जनजागृती निर्माण होत आहे. पण घरात बुल्लीईंग होऊ शकतं याविषयी जास्त बोललं जात नाही. प नी ते बोलण्याचं घरिष्टय दाखवलं.
त्याचा प्रश्न होता: मी चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. वयातील अंतरामुळे माझी मोठी भावंडं मला नेहमी bully करतात. मी लहान असल्यापासुन सुरु झालेलं बुल्लीईंग आता मी वयानी मोठा झालो असलो तरी थांबलेलं नाही. त्याचं स्वरूप बदललं आहे -एवढच. माझ्या वडिलांना या बुल्लीईंगची कल्पना होती. त्यांनी भावंडांपासुन माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण वडील गेल्यावर बुल्लीईंग जास्तच वाढलंय. मी काय करू?
सवाल जवाबदार यांचं उत्तर: प, वडीलांची जागा घे आणि स्वतःच संरक्षण करायला शिक. भावंडांकडून होणाऱ्या bullying च मूळ समजुन घेतलस तरच त्यावर कायमचा उपाय शोधू शकशील. तु सर्वात लहान असल्याने लहानपणी मोठ्या भावंडांनी सांगायचं, तु ऐकायचं आणि ते सांगतील तसं वागायचं असं घडलं असण्याची शक्यता आहे. त्याची त्यांना सवय लागली असवी. आजही ते तुझ्याकडुन तीच अपेक्षा ठेवत असतील. पण आता सहाजिकच तुला त्याचा त्रास होतो आहे. थोडा विचार केलास तर लक्षात येईल कि हे बुल्लीईंग थांबवणं वाटतं तितकं कठीण नाही. नियमित ध्यान करत जा. भावंडांकडुन होणारं बुल्लीईंग कायमचं कसं थांबवायचं ह्याचा मार्ग तुला ध्यानात सापडेल.
न चा प्रश्न : काही वर्षांपूर्वी माझ्या आईचं माझ्या बहिणीच्या घरी निधन झालं. त्यावेळी मी पत्नीसह सहलीला गेलो होतो. मी आईच्या अंत्यविधींना हजर राहू शकलो नाही. ती सल मला आजही बोचते. ती सल कमी करण्यासाठी मी माझ्या पत्नीच्या आईला माझी आई मानून तिची काळजी करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या सासूचा मुलगा असं म्हणतो की मी त्याच्या घरात लुडबुड करतो. तुम्हांला काय वाटतं?
सवाल जवाबदार: न, सासुची काळजी केल्याने तुझी आई विषयीची खंत कमी होणार नाही. ती खंत कमी करण्यासाठी तु तुझ्या आई बरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठव. त्या आठवणींना महत्व दे. सासु मध्ये आईला शोधण्याच्या फ़ंदात पडू नकोस. ती तिथे सापडणार नाही - विशेष करून सासुला स्वतःचा मुलगा असेल तर. पूर्वी जावयाने आपला मान ठेऊन रहाणे हि एक संकल्पना अस्तित्वात होती. सीमारेषांचं उल्लंघन झालं की संघर्ष अटळ असतो. तु पत्रात म्हंटलं आहेस कि तु सासुची काळजी करतोस, काळजी घेतोस असं म्हंटलेलं नाही. त्याचा अर्थ मला नीटसा समजला नाही. पण सासुचा मुलगा आपल्या आईची काळजी घेण्यास सक्षम असेल तर तू तुझ्या सीमारेषा पाळून रहा.
श चा प्रश्न: काही वर्षांपूर्वी माझ्या वडीलांचं आणि त्यांच्या आईचं - माझ्या आज्जीचं निधन झालं. माझी आई त्यांच्या शेवटच्या दिवसात त्या दोघांच्याही जवळ नव्हती. आता मी माझ्या आईला स्वखुशीनं स्वतःच्या वयस्कर आईची सोबत करताना बघतो तेंव्हा मला माझ्या वडिलांबद्दल खूप वाईट वाटतं आणि आईचा रागही येतो. मी आईशी या विषयी बोलू का ?
सवाल जवाबदार: श, तुझ्या भावना मी समजु शकतो. पण तुझ्या वडिलांपासुन आणि त्यांच्या कुटुंबियां पासुन लांब रहाण्याचा निर्णय तुझ्या आईचा होता. त्या बाबतीत तू आता काही करू शकत नाहीस. नवराबायको मध्ये आपसात बेबनाव असु शकतो. आई नाही तरी तु शेवटच्या काळात वडिलांचा सांभाळ केला असशील अशी मी आशा करतो. आईबद्दल राग वाटत असला तरी वडिलांच्या पश्चात आईच्या जोडीने तुही कुटुंब प्रमुख आहेस तेंव्हा तुझी जबाबदारी टाळू नकोस. आईला आधार दे.
म चा प्रश्न: माझी वयस्कर आई गावी असते. तिला काही दिवसांसाठी माझ्या घरी रहायला आणावं अशी माझी फार ईच्छा आहे. समस्या हि आहे कि माझी नोकरी घरापासुन काही तासांच्या अंतरावर आहे. मी आठवडाभर नोकरीच्या गावी रहातो आणि शनिवार -रविवार घरी येतो. मी नोकरीच्या गावी असताना माझ्या आईला घरात ठेऊन घ्यायला माझ्या पत्नीने नकार दिला आहे. ती म्हणते की मी आईला माझ्याबरोबर नोकरीच्या जागी घेऊन जावं. परंतु मी कामावर गेल्यावर आई एकटी कशी राहील याची मला काळजी वाटते. यावर काही उपाय सुचवाल का?
सवाल जवाबदार: म, शक्य असेल तर नोकरीच्या गावी कामाला बाई ठेव जी तु कामावर गेल्यावर तुझ्या आईच्या सोबत राहू शकेल. तुझ्या पत्नीला जर तुझी आई तुझ्या गैरहजेरीत घरात नको असेल तर तोच एक मार्ग आहे .
हि प्रश्नोत्तरे वाचल्यावर लक्षात येतं कि घरगुती प्रश्न फक्त महिलांनाच असतात असं नाही तर पुरुषांनाही असु शकतात. सामंजस्यपूर्ण उत्तर मिळेल असा विश्वास वाटला तर ते मनमोकळेपणानी विचारलेही जातात.