काही दिवसांपूर्वी पुण्यात रहाणाऱ्या माझ्या आत्तेबहिणीने एका व्हॉट्स ऍप ग्रुप साठी "मला प्रभावित करणारी व्यक्ती" या विषयावर खालील उतारा लिहिला. त्यावरून मलाही आमच्या आज्जीबद्दल (तिच्या आईची आई /माझ्या वडिलांची आई ) काही माहिती नव्याने समजली आणि या पोस्टचं संकलन करण्याची प्रेरणा मिळाली:
माझ्या आयुष्यात मला सर्वप्रथम प्रभावीत करणारी व्यक्ती म्हणजे माझी आज्जी लक्ष्मीबाई देशमुख - पूर्वाश्रमीची द्वारका मोरे. मालवणच्या प्रतिष्ठित मोरे घराण्यात जन्मलेली आज्जी त्या काळात शालांत परीक्षा पास झालेली होती. तिचे भाऊ बॅरिस्टर, कलेक्टर असे उच्च शिक्षित होते. लग्नाआधी आज्जीने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, विदेशी कपड्यांची होळी केली होती .
लग्न होऊन ती ठाणे जिल्ह्यातील वरले या गावातील देशमुखांची सून झाली. लहान गाव, एकत्र कुटुंब पण आजोबा कोऑपरेटिव्ह मध्ये नोकरी करीत होते त्यामुळे ते कुटुंबासह पुणे, ठाणे, शहापूर इत्यादी ठिकाणी वास्तव्य करून होते. आज्जीने स्वतःच्या मुलांबरोबर दोन पुतण्यांनाही शिक्षणासाठी शहरात नेले. शेवटी आजोबा वाडा येथील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते तिथेच निवृत्त झाले.
वरले गावात देशमुखांची मोठी शेती होती. आजोबांनी खुप सुंदर बंगला बांधला होता. निवृत्त झाल्यानंतर ते शेती करत. आज्जीआजोबांना समाजकार्याची आवड होती. दोघांनी भरपूर समाजकार्य केले. आजोबा वाड्याच्या पी. जे. हायस्कूलच्या कमिटीवर होते तर आज्जी वाड्याच्या सरकारी हॉस्पिटलच्या कमिटीवर चेअरपर्सन होती. आज्जी त्या काळातली खुपच तडफदार स्त्री होती. ती उत्तम भाषण करीत असे. तिला वाचनाची आवड होती. वाड्याच्या थिएटर मध्ये मी तिच्याबरोबर अनेक सिनेमा पाहिले. निर्णयसागर प्रेसच्या मालकीणबाई आज्जीची खास मैत्रीण.
आज्जी दिसायला देखणी - उंच, गोरीपान, किंचित कुरळे केस, कानात मोत्याच्या कुड्या, अंतरा अंतरावर मोठा काळा मणी असलेलं घसघशीत सोन्याचे मंगळसूत्र आणि डायमंड घाटाच्या चार सोन्याच्या बांगड्या आणि त्यात दोन- दोनच लाल काचेच्या बांगड्या. नऊवारी इंदूरी साडी आणि नेहमी कुठल्याही साडीवर पांढरंच ब्लाऊज. नेहमी प्युअर लेदरची पर्स वापरत असे.
आज्जी स्वच्छ, शुद्ध मराठी बोलायची. इंग्लिशही ब-यापैकी लिहू- वाचू शकायची. तिचं व्यक्तीमत्व प्रभावी होतं. मला आई पेक्षा आज्जी जवळची वाटायची. आजोळी मी खुप राहिले आहे. आज्जीने खुप माया केली. सामाजिक कार्यकर्ती असुनही ती निगुतीने संसार करणारी सुगृहिणी होती. तिच्या हाताला चव होती. खुप सुंदर स्वयंपाक करायची. मला लग्नाच्या आधी थोडा फार स्वयंपाक मुख्य म्हणजे भाकरी आज्जीने शिकवली.
मला दोन मामा आणि एक मावशी. माझी आई सगळ्यात मोठी. एक मामा सिव्हिल इंजिनियर आणि दुसरे सरकारी अधिकारी होते. दोन्ही मामा मुंबईत रहायला होते. गावाकडे फक्त आज्जीआजोबा रहात. पण दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व मावस, मामेभावंडं, मावशी, मामामामी गावाला एकत्र येत असू.
आज्जी आम्हाला मसाले, पापड, मिरगुंड, हातसडीचे पोहे, कडवे वाल आणि काय काय पदार्थ, वस्तू अनेक वर्षे देत होती. माहेरपण करावं तर माझ्या आज्जीनंच!
तिच्या हाताखाली दिवसभर एक मोलकरीण असे. बंगल्या भोवती आंबा, पेरू, चिक्कू, जांभळ ,सुपारी, नारळ अशी अनेक फळझाडे आणि फुलझाडे होती. तो खुपच सुंदर परिसर होता. गाई, म्हशी, कोंबड्या, कुत्रा, मांजरी या सगळ्यांवर आज्जीची माया होती. भातशेती आणि स्वतंत्र आमराई होती.
त्या काळातल्या बायकांपेक्षा ती वेगळी होती. मासिकपाळी आल्यावर तिने कधीही बाजूला बसायला सांगितले नाही. ती उपास, व्रतवैकल्ये कधीच करत नसे. ती खरोखरच कर्मयोगिनी होती. खुप समृद्ध जीवन जगली. लहानपणी कोणी विचारलं, "तू देशमुखबाईंची नात का ?" ते खुप छान वाटायचं.
लेखिका: राणी जगताप (प्रभा सोनवणे)
***
माझ्या आत्या मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात रहातात. काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या आठवणी 'रानजाई' या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध केल्या (प्रकाशक : तारा एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई). त्या पुस्तकातील आज्जीवरचा लेख आत्यांच्या परवानगीनी (थोडी काटछाट करून) खाली लावला आहे:
मोठी आई
आई हा शब्द उच्चारताच आईची अनेक रूपं दृष्टीसमोर तरळून जातात. प्रेमळ, करारी, जिद्दी , सतत काहीं ना काही काम करत रहाणारी. विणकाम भरतकाम करणारी. आम्हा दोघी बहिणींसाठी सुंदर सुंदर फ्रॉक स्वतः मशीनवर शिवणारी. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही पदार्थ करण्यात तरबेज आणि तेवढ्याच प्रेमाने सर्वांना खाऊ घालणारी. दिवाळीचे पदार्थ ती फार निगुतीने करायची. हे सर्व पदार्थ फार मोठ्या प्रमाणात करायला लागायचे. आत्ता सारखी बारा महिने दिवाळी त्यावेळी नव्हती आणि आत्ता सारखे दिवाळीच्या फराळाचे जिन्नस दुकानातही मिळत नसत. पहाटे उठून शेगडीवर छोट्या परातीत संक्रांतीचा पांढराशुभ्र हलवा करणारी आई मला अजूनही आठवते. बालपणी खाणं आणि खेळणं एवढंच माहित होतं. जसजस वय वाढत गेलं तसं तीचं मोठेपण जाणवायला लागलं.
देशमुखांचा एवढा मोठा चौसोपी वाडा. त्यात रहाणारी अनेक माणसं - जवळची, दूरची. १९३० साली आईचं लग्न झालं आणि इनामदारांची थोरली सून म्हणून तिने वाड्यात प्रवेश केला. त्यावेळी ती अठरा वर्षांची होती. त्यावेळी आईचं लग्न जरा उशिराच झालं असं म्हणायला हवं. आईवडील लहानपणीच वारल्याने सगळी जबाबदारी मोठ्या भावावरच होती. त्यातून तळकोकणातलं मालवण सारखं गाव. मुंबईला यायचं म्हणजे बोटीशिवाय दुसरं साधन नाही. तसं घाटावरून कोल्हापूर - पुणे मार्गे मुंबईला येता येत होतं. पण लांबचा पल्ला. वाहतुकीची साधनं मर्यादित. एवढ्या प्रवासाला दोन-तीन दिवस सहज लागत. त्यापेक्षा बोट सोयिस्कर होती. एक भाऊ बोटीवर कॅप्टन होते. चुलत भाऊ ठाण्याला कस्टम्स कलेक्टर होते. ठाण्याच्या खाडीवरचा त्यांचा प्रशस्त बंगला अजुनपर्यंत जातायेता दिसत होता. लहानपणी बंगल्यात आणि बंगल्याच्या बागेत घातलेला धुमाकूळ अजूनही आठवतो. त्यांच्यामुळेच हे लग्न जमलं. मालवण सारख्या सुशिक्षीत गावातून ठाणे जिल्ह्यातील वाडे तालुक्यातील 'वरले' नावाच्या अतिशय लहान खेड्यात ती कशी राहीली हेच आम्हांला नवल वाटतं.
गावात देशमुखांची फक्त चार घरं, बाकीचे सगळे आदिवासी. जमेची बाजू एवढीच कि गांव मुंबई - अहमदाबाद या राजरस्त्यावर होतं. त्यामुळे हा आदिवासी मागासलेला भाग असला तरी रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असायची. स्वातंत्र्यपूर्व काळात गोऱ्या लोकांच्या गाड्या ह्याच रस्तयाने धावत. देशमुखांचं घर धनधान्याने समृद्ध होतं. कोठारं भरलेली होती.
माझी आई अतिशय देखणी होती. उंच गोरीपान सडपातळ बांधा असं तिचं रूप होतं. साहित्याची अतिशय आवड असणारी विशेषतः काव्याची. त्याकाळी तिच्याकडे भा. रा. तांबे, कवी यशवंत, बालकवी यांचे काव्यसंग्रह होते. त्यातील बहुतेक कविता तिला तोंडपाठ होत्या. तिचा आवाजही गोड सुरेल होता. मिराबाईची भजनं ती फार सुरेख गायची. तिच्यामुळे मला साहित्याची आवड फार लहानपणीच लागली. वयाच्या नवव्या वर्षी पर्ल बकची 'गुड अर्थ' हि कादंबरी वाचल्याचं आठवतं.
वाड्यात घरची माणसं होती तसेच गडी, त्यांच्या बायका याही होत्या. गोठा गाई-म्हशींनी भरलेला होता. सत्तर ऐंशी गुरं दावणीला होती. घोडेहो होते. कुत्री, मांजरं, कोंबड्या होत्या. आईला माणसांप्रमाणेच प्राणीही आवडत. ससे, मोर तिने पाळले होते. एवढं सारं असूनही वाड्यला शिस्त अशी नव्हती. आठ-नऊ वाजेपर्यंत पाहुणे मंडळी अंथरुणावर लोळत पडलेली असायची. अकरा - बारा वाजेपर्यंत पाहुण्यांचा चहा - न्याहरीच चाललेली असायची. त्याच्या पुढे जेवणं. दिवसभर सुनांना स्वयंपाकघरातच अडकून पडायला व्हायचं. इतर कामाला गडी -बाया होत्या पण स्वयंपाकाचं काम सुनानांच करावं लागायचं.
आईला हे सगळं असह्य वाटायचं. हे सगळं बदलायला पाहिजे असं तिला वाटत होतं. तिने वडिलांना हे सगळं सांगितलं. त्यांनाही हा बदल हवाच होता. पण घरातील मोठा मुलगा असल्यामुळे कुणाला दुखावणं शक्य नव्हतं. पण आई फार करारी होती. तशीच मृदूही होती. हळूहळू प्रेमाने तिने सगळा बदल घडवून आणला. वडिलांची साथ होतीच. पुण्याच्या नू.म.वि मधून ते मॅट्रीक पर्यंत शिकले होते. सुशिक्षीत विचारांचे होते. इनामदारांच्या घराण्यात जन्मून देखील त्यांना कसलंही व्यसन नव्हतं. साधी सुपारीही ते कधी खात नसत. "मेड फॉर इच आदर " अशी त्यांची जोडी होती.
गावात शाळा नव्हती. मुलांना शाळेत पाठवायचं म्हणजे दोन मैलावर तालुक्याच्या गावी. आईने वडिलांना सांगून ठाण्याच्या शिक्षण खात्याकडून (लोकल बोर्ड) शाळा मंजूर करून घेतली. इथली अडचण शिक्षण खात्यानेही जाणून घेतली. इंग्रजांचं राज्य होतं त्यामुळे गरजे प्रमाणे कामं होत होती. शाळा मंजूर झाली पण शाळेला इमारत पाहिजे. त्याकाळी लहान गावात एक शिक्षकी शाळा असत. एक मोठा हॉल, त्यामध्ये वेगवेगळे बाक टाकून पहिली पासून चवथी पर्यंतची शाळा भरे. एकेका वर्गात पाचसहा मुले असत. मास्तर आलटून पालटून एकेका यत्तेचा अभ्यास घेत. वडिलांनी आपल्या देखरेखी खाली शाळा बांधून घेतली. मास्तरांना रहायला घर हवं म्हणून वाड्या शेजारीच दोन खोल्यांचं टुमदार घर बांधलं. अशा तऱ्हेने गावात चवथी पर्यंतची शाळा झाली. पंचक्रोशीतील गावातील मुलांची तसेच आजूबाजूच्या पाड्यावरच्या मुलांची शिक्षणाची सोया झाली. आदिवासी, हरिजन यांची मुलं शाळेत शिकून पुढे जिल्ह्यात नोकऱ्याही करू लागली.
तालुक्याच्या गावी मराठी सातवी पर्यँतची सोय होती पण हायस्कुल नव्हतं. मुलांना पालघर, भिवंडी, ठाण्याला हायस्कुलसाठी जावं लागायचं. सगळ्यांनाच काही ते शक्य नव्हतं. तेंव्हा तालुक्यातील मान्यवरांनी एकत्र येऊन वाड्याला हायस्कुल काढण्याचे ठरविले. त्यात आईचा सहभाग मोठा होता. मुंबईच्या निर्णयसागर प्रेसच्या मालकीणबाई श्रीमती भागिरथीबाई चौधरी यांनी आईच्या शब्दाला मान देऊन आपले पती कै. पांडुरंग जावजी चौधरी यांचे नाव हायस्कुलला देणार या आश्वासनावर विश्वास ठेऊन रू, दहा हजाराची (रक्कम) देणगी शाळेसाठी दिली. हायस्कुलचे "पी. जे. हायस्कुल" असे नामकरण करण्यात आले. गावोगावच्या लोकांनी पैशाच्या, धान्याच्या रूपाने शाळेसाठी मदत केली. १९४५ पासून वाड्याला हायस्कुल सुरु झाले. पण माझ्या भावांना त्याचा उपयोग नव्हता कारण ते पुढच्या इयत्तेत गेले होते. आईला आमच्या भावंडांना आणि काकांच्या हायस्कुल मध्ये जाणाऱ्या मुलांसाठी ठाण्याला बिऱ्हाड करावं लागलं. वडिलांनीही शेतीचा कारभार धाकट्या भावांवर सोपवून सरकारी खात्यात नोकरी धरली. त्यांची ठाण्याला सहकारी खात्यात नेमणूक झाली.
***
आईवडिलांनी घर सोडल्यापासून घरात भावाभावांच्या कुरबुरी सुरु झाल्या. शेवटी इस्टेटीच्या वाटण्या करून विभक्त व्हायचं ठरवलं. वडिलांची ठाण्याहून वाड्याला सहकारी बँकेचे मॅनेजर म्हणून बदली झाली. ठाण्याचं बिऱ्हाड सोडून आम्ही सर्व वरल्याला परत आलो. दोन्ही भाऊ, चुलत भाऊ बोर्डीच्या आचार्य भिसे यांच्या बोर्डिंग स्कुल मध्ये रुजू झाले. साने गरुजींचे भाऊच हायस्कुलचे हेड मास्तर होते. त्यामुळे शाळेवर सेवादलाचा प्रभाव होता.
भावांनी पुढचे कॉलेजचे शिक्षण पुण्याला एस.पी. कॉलेज मध्ये हॉस्टेलला राहून पूर्ण केले. मोठा भाऊ पूना इंजिनिअरिंग कॉलेज मधून इंजिनिअर झाला आणि धाकटा भाऊ सहकारी खात्यात वरच्या पदावर पोहचून निवृत्त झाला. आईला मुलांच्या शिक्षणाची जी चिंता वाटत होती ती मुलांनी दूर केली. मुलीही चांगल्या घरी पडल्या. त्यांची मुलंही व्यवसायाला लागली. आईने मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागले.
मोठा वाडा काकांच्या वाटणीला गेल्यामुळे वडिलांनी अमराईत स्वतंत्र बांगला बांधला. आम्ही तिथे राहू लागलो. वरल्याला आल्यावर आईचं सामाजिक कार्य पुन्हा सुरु झालं. साऱ्या गावचीच ती आई झाली. काही वर्ष ती सरकारी तालुका रुग्णालयाच्या कमिटीवर चेअरमन होती. जिल्हा परिषदा होण्यापूर्वी म्हणजे साधारण पन्नास -पंचावन्न वर्षांपूर्वी तालुका विकासगट समितीची सदस्य होती. या माध्यमातून तिने अनेक जणांना मदत केली. आदिवासींची तर ती आईच होती. आम्ही चौघ भावंडं सोडून घरातली आमची चुलत भावंडं, गावातली मुलं -माणसं तिला मोठी आई म्हणून हाक मारीत. घरातल्या थोरल्या काकीला मोठी आई म्हणायची त्यावेळी पद्धत होती.
***
गावातल्या कुठल्याही आदिवासी स्त्रीचे दिवस भरत आले कि ती आईकडे यायची. "आई, माझ्या पोटात दुखायला लागलं कि मी कोणाबरोबर तरी निरोप पाठवीन. तू फक्त माझ्या जवळ येऊन बस" असं म्हणायची. आदिवासी बायका बाळंतपणासाठी कधीच दवाखान्यात जात नाहीत. त्यांची बाळंतपण करणाऱ्या सुईणी असत. बाई अडली कि सुईणी जे काही अघोरी उपाय करीत त्याचा बायकांनी धसकाच घेतलेला असे. असा निरोप आला कि आई हातातली कामं तशीच ठेऊन, तांब्याभर चहा घेऊन त्या बाईच्या घरी दाखल होत असे. जाताना बाळाची नाळ कापण्यासाठी उकळलेली कात्री, दोरा, कापूस एका डब्यात घालून बरोबर एखादं जुनेरं घेऊन जात असे. सगळं बाळंतपण सुखरूप झालं कि मगच ती घरी येत असे. आल्यावर आंघोळ करून शेराचा भात शिजवून त्यावर वरण आणि लोणचं असं छोट्या परातीत घालून बरोबर दूधाचा तांब्या पान्हेरी काकू कडून तिच्या घरी पोहोचतं व्हायचं. असे पाच दिवस तिच्या घरी जेवण पोहचतं व्हायचं. पाचव्या दिवशी पाचवी झाली कि बाई उठून कामाला लागत असे.
एखादी बाई अडली तर तिला घरच्या बैलगाडीत झोपवून, बरोबर सुईणीला देऊन वाड्याच्या सुतिकागृहात पाठवत असे. आपणही एस.टी. बसमधून, बस नसली तर चालतही दवाखान्यात जाऊन डॉकटर, नर्सबाईंना भेटून बाईचं बाळंतपण होई पर्यंत तिथे थांबत असे. घरून जेवण पाठवण्याची सोय नसली तर समोरच्या मावशीबाईंकडे जेवणाची सोय आगाऊ पैसे देऊन करत असे. अशी कितीतरी बाळंतपणं आईने केली. आईच्या हाताला काय गुण होता कोण जाणे पण तिने तापावर दिलेलं काढे, चाटणं आजारपण घालवत असे. आदिवासींचा डॉकटर पेक्षा आईच्या औषधांवर जास्त विश्वास होता.
***
एकदा अशीच दुपारच्या वेळी एक बाई फाटका बाहेर उभी राहून आईला हाक मारू लागली. आई बाहेर आली. बाई सारं अंग डोक्यापासून गुडघ्या पर्यंत झाकून उभी होती. माशांचा मोठा घोळका तिच्या भोवती फिरत होता. ती जिथे उभी होती तिथे तिच्या सर्वांगातुन झिरपणाऱ्या लशीतून खालची जमीन ओली झाली होती. त्यावरही माशा घोंघावत होत्या. कुठल्यातरी बऱ्या न होणाऱ्या चर्मरोगानं तिला ग्रासलं होत. ती गंगी होती. कातकरी जमातीतील (कातोडी) होती. तिच्या लोकांनी तिला कातोडी बाहेर हकलून दिली होती. सरकारी दवाखान्यातही तिला कोणी ठेऊन घेतलं नसत. तशी सोयच तिथे नव्हती.
"आई, दोन दिस उपाशी आहे गं. साऱ्या अंगाला ठणका लागलाय. काय करू," रडण्याचे आणि बोलण्याचेही कष्ट ती सहन करू शकत नव्हती. आईला ते एक आव्हान होतं. आणि आईने ते स्विकारलं.
थंडीचे दिवस होते. आईने तिला रस्त्यापलीकडे वडाच्या झाडाच्या आडोशाला जाऊन बसायला सांगितलं. पान्हेरी काकू बरोबर पत्रावळीवर भात कालवण वाढून पाण्यासाठी एक मडकही दिलं. आप्पाला दोन मोठे लाकडाचे ओंडके नेऊन टाकायला सांगून तिला शेकोटी पेटवून दिली. दोन पोती, एक जुनं लुगडं तिला पांघरायला दिलं. आणि मग तिने चर्मरोगांवरच तिचं पेटंट औषध तयार करायला घेतलं. आदिवासींना चर्मरोग हा सर्रास असायचा. कातकरी जमात मासे पकडायला नाहीतर पाणकंद काढायला पाण्यात उतरतील तेंव्हाच त्यांच्या अंगाला पाणी लागणार.
घरात गंधकाच्या पिवळ्या कांड्या नेहमी आणलेल्या असायच्या...
... पोटभर अन्न, वस्त्र, निवारा आणि योग्य औषधोपचार यांनी गंगी दोन महिन्यात टुणटुणीत झाली. अंगावरच्या साऱ्या जखमा बऱ्या होऊन कातडी गुळगुळीत झाली. डोक्यावर केस उगवले. हिंडू फिरू लागली. एका जागी राहून तिला कंटाळा आला. रानचं पाखरू रानात जायला उत्सुक झालं. जमातीनेही आता तिला स्विकारलं. या सर्व औषधोपचारांसाठी आईला दोन किलो पेक्षा जास्त गंधक कुटावा लागला. या साऱ्या कामात वडिलांची साथ होती म्हणूनच ती हे करू शकली.
***
एक दिवस सकाळीच समोरच्या झोपडीत रहाणारी लक्ष्मी रडत ओरडतच आईला हाका मारत आली, "आई, बघ हे काय झालं". हातावर आडवी धरलेली चारपाच महिन्यांची 'मटो' होती. पोटाला भाजली होती. भाजलेले फोड फुटून कातडी लोंबत होती. त्या चिमण्या जीवात रडण्याचंही त्राण नव्हतं.
"काय झालं ग लक्ष्मी?"
लक्ष्मी मटोला झोळीत झोपवून पाणी आणायला विहिरीवर गेली होती. मटो पेक्षा मोठ्या असलेल्या दोन-तीन वर्षांच्या चंद्याला रडली तर जरा झोळीला झोका दे म्हणून सांगितलं होतं. झोळीत झोपलेली मटो थोड्यावेळाने रडायला लागली म्हणून चंद्या झोळीला झोका द्यायला लागला. झोका थोडा मोठा झाला असावा. झोळी उलटी झाली आणि मटो जवळच असलेल्या झगडीत पोटावर पडली. झगडी विझलेली होती पण आतले निखारे आणि गरम राख यानं पोर भाजून निघाली होती. आईनं खोबरेल तेलाची बाटली आणली आणि हळुवारपणे कापसाने पोटाला खोबऱ्याचं तेल लावलं. दुपारी येऊन मलम घेऊन जा म्हणून सांगितलं.
आईने चुन्याचा डबा शोधून काढला. चुन्याची निवळी आणि खोबऱ्याचं तेल यांचं मलम हे भाजण्यावरचं आईचं पेटंट औषध होतं.
...पंधरा वीस दिवसांनंतर जखमांवर नवीन कातडं दिसायला लागलं. पूर्ण बरं व्हायला महिना लागला.जखमा खोलवर नव्हत्या पण जखमांच्या खुणा राहिल्याच. पण जीव वाचला हेच समाधान. काही वर्षांपूर्वी गावी गेले होते. मटो भेटली होती. मटो आता दोन नातवंडांची आजी झालेय. पोटावरच्या भाजलेल्या खुणा अजून आहेतच.
***
आता वडिलांच्या विषयी थोडं. माझे वडील, आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू, साऱ्या गावचेच अण्णा. अतिशय कलाप्रिय. त्यांची निरिक्षण शक्ती जबरदस्त होती.
गोठ्यातील गुरांची देखभाल करणे, दूध काढणे, घरात आणि घराभोवती स्वच्छता राखणे या सर्व कामात आईला त्यांची अमोल मदत होई. दोघेही समविचाराचे असल्यानेच संसारातील अनेक समस्यांचा मुकाबला दोघांनीही मिळून समर्थपणे केला. पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, उपासतापास यापेक्षा नीतिमत्ता, सदाचरण, सत प्रवृत्ती यावर दोघांचाही अढळ विश्वास. अशी ही एकमेकांना पूरक व्यक्तिमत्वे होती.
आमच्या आमराईत सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं होती. आंबे, पेरू, चिक्कु, काजू, सिताफळ, रामफळ, बोरं, चिंचा, जांभळं, मोसंबी , फणस , हापूसची चाळीस -पन्नास कलमं. त्यातही अनेक प्रकार - पायरी, तोतापुरी, नारळी आंबा. तसेच वेगवेगळ्या चवीच्या रायवळ आंब्यांची विशाल झाडं होती. त्याचे आंबे काढायला वेळच नसे. आईनं सगळ्या गावाला, आदिवासींना सांगून ठेवलं होतं ज्याला आंबे पाहिजे असतील त्याने रायवळ आंबे काढावे, निम्मे इथे ठेऊन निम्मे घेऊन जायचे. दोन पोती काढली तर एक पोतं त्यांचं एक आमचं.
वडिलांप्रमाणे आईलाही बागकामाची आवड होती. त्यावेळी भाज्या विकत आणायची पद्धत नव्हती. भाज्यांची दुकानही कुठं नव्हती. आपल्या आवारात असतील तेवढ्याच भाज्या. पावसाळ्यात येणाऱ्या गवार, वांगी, भेंडी, पडवळ, दोडकं, दुधी, लाल भोपळा, काकड्या, करादे ,कोनी यांचे वेल अशा भाज्या असायच्या. वडिलांनी रानातून करटोल्याचे कंद बागेत आणून लावले होते. पावसाची चाहूल लागली कि जमिनीतून करटोल्याचे वेल बाहेर पडत. पावसाळ्याचे पाच-सहा महिने भरपूर करटोली मिळत. उन्हाळ्यासाठी तोंडल्याचा मांडव, घेवड्याचा मांडव, शेवग्याची, हादग्याची साताआठ झाडे, कांचन, तांबड्या माठाचे उंच उसासारखे देठ, अळू प्रत्यके घरी असायचाच. वर्षभर पुरेल इतकी पोतंभर मिरची, हळद आई घरीच लावत असे. मोठमोठे सुरणाचे गड्डे सोप्यात रचून ठवलेले असत. आमची आमराई बारा महिने फुलाफळांनी बहरलेली असायची.
आईने गायीम्हशींच्या धारा काढण्याचे कामही शिकून घेतले होते. आमच्याकडे मातीच्या चुली असायच्या. आई मातीच्या चुली करण्यात पटाईत. दरवर्षी शेतातली माती आणून भिजत घालायची. आम्ही मुली देखील भातुकली साठी लहान चुली बनवायचो. चूल उंच ओट्यावर असायची पण वडिलांनी तिला धुरांडं बसवून बिन धुराची चूल केली होती.
आई नेहमी म्हणायची, आयुष्यात सचोटीनं वागा. लांडीलबाडी, फसवणूक कधी कुणाची करू नका. दुसऱ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करा. मनाने देखील कुणाचं वाईट चिंतू नका. परमेश्वर सर्व बघत असतो. आईने कधी उपासतापास, व्रतंवैकल्य, पूजेची कर्मकांडं केली नाहीत. ते करायला तिच्याकडे वेळच नव्हता. अखंड कर्मयोग हाच तिचा परमेश्वर होता.
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा तिचा जीवनमंत्र होता. अजूनही तिची नुसती आठवण आली तरी तिचा सर्व जीवनपट डोळ्यासमोर उभा रहातो.
या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः:
|
लेखिका: तारा देशमुख (सुमन चव्हाण) |
***
आज्जी बद्दलच्या माझ्या आठवणी आत्त्यांच्या आणि राणीआक्काच्या नंतरच्या आहेत. मला आठवतं तेंव्हा आज्जी तिच्या सामाजिक कामातुन निवृत्त झाली होती. घर - शेत - तिथे काम करणारे कामगार या सगळ्या व्यापाची प्रेमाने देखभाल करत होती. तिच्या समाजकार्याबद्दल ती स्वतः कधी बोलत नसे पण माझी आई सांगायची. कौतुकान म्हणायची, "वरल्याची सीट आदिवासींसाठी राखीव आहे म्हणून नाहीतर तुझी आज्जी कधीच निवडणुकीला उभी राहिली असती."
आज्जी प्रमाणेच माझ्या वडिलांनाही भूतकाळात बागडण्याची फारशी आवड नाव्हती. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा इतिहास आजच्या पिढ्यांना जास्त माहित नाही. थोडंफार कानावर पडलं ते असं कि वरल्याचे देशमुख हे मुळचे मध्य प्रदेशातील धार चे पवार. चवदाव्या शतकात अदिलशहाने देशमुखी द्यायला सुरवात केली तेंव्हा वरले हे गाव आमच्या पूर्वजांना इनाम मिळालं. धार चे पवार वरल्याचे इनामदार देशमुख झाले. आमचं कुलदैवत धारलाच आहे. कित्येक पिढ्यात तिथे कोणी गेलं नाही. माझ्या आईने तुळजापूरच्या भवानीवर कसबसं समाधान मानलं पण ती कायम कुरबुरत राहिली कि हि आपली कुलदेवता नाही. आपली कुलदेवता व्याघ्राम्बरी आहे - वाघावर बसलेली दुर्गा आहे.
लग्न होऊन आज्जी मालवणहून वरल्याला आल्यावर प्रथम मोठ्या घरात राहिली. एकत्र कुटुंबातुन बाहेर पडल्यावर आज्जीआजोबांनी जुन्या घराच्या जवळच स्वतंत्र घर बांधलं. ७० -८० वर्षांपूर्वी खेडेगावात बंगला पद्धतीची घरं नसायची. वाडा पद्धतीची असायची. छोटा दरवाजा.. त्यातून आत गेलं की चौक आणि त्याभोवती खोल्या अशी रचना असायची. पण आई सांगायची कि आज्जीनी आबांना निक्षून सांगितलं होतं - बंगला बांधायचा... त्यापुढे मोठ्ठ अंगण हवं... त्याला कंपाउंड - आणि कंपाउंडला मोठ द्वार हवंच. एक ना एक दिवस माझा मुलगा मोठी गाडी घेईल ती त्याला गेट मधून आत आणून अंगणात उभी करता आली पाहिजे."
१९९० च्या दशका आधी परदेशी मोठ्य गाड्या भारतात सहजासहजी मिळत नसत. फियाट आणि अँबेसेडर या भारतीय गाड्या असायच्या. पण बाबा तेंव्हा हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरीला होते आणि HCC ची एक अमेरिकन डॉज गाडी होती - काळ्या रंगाची. फियाट आणि अँबेसेडर च्या तुलनेत तेंव्हा ती इतकी प्रचंड पसरलेली दिसायची कि आम्ही तिला रणगाडा म्हणायचो. आम्ही आणि काका मिळून वरल्याला जाणार असलो कि बाबा रणगाडा घेऊन यायचे.
मला रणगाड्याचं खूप कौतुक होतं. वरल्याला जायला बाबांनी डॉज आणलीय म्हंटल कि माझा उत्साह नुसता ओसंडून वहायचा. मोठ्यांच्या आधीच भावांबरोबर गाडीत जाऊन बसायचं, तिच्या मऊ काळ्या चामड्याच्या सीट वरून हात फिरवायचा, त्या दाबून किती मऊ आहेत ते बघायचं अशा प्रकारे तो व्यक्त व्हायचा. रणगाडयातून आम्ही बरेचदा वरल्याला गेलो - शेजारी, मित्र यांना घेऊन. मुलाची मोठी गाडी अंगणात उभी असावी हि आजीची ईच्छा त्या डॉज मुळे पूर्ण झाली. पुढे बाबांनी स्वतःची मोठी गाडी घेतली पण ते बघायला आज्जी नव्हती आणि ती पार्क करायला वरल्याचं घर आणि ते अंगण नव्हतं.
या ठिकाणी काकांचा उल्लेख आला आहे तर त्यांच्या विषयी थोडं लिहायलाच हवं. माझ्या काकाकाकींनी माझ्यावर आपल्या मुलीसारखी माया केली. माझे वडिल आणि त्यांच्या भावंडांनी आपसात आणि आम्हां मुलांवर निर्व्याज प्रेम केलं. त्या काळी घरातील मोठ्या मुलावर काही जबाबदाऱ्या असायच्या. त्यांच्या पासुन वडिल कधी मागे हटले नाहीत. पण भावंडांनी त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या नाहीत. ते आज्जीचे संस्कार होते.
आज्जीचं सगळंच नेटकं असायचं. ज्या नीटसपणे तिन आपलं घर आणि परसदार जपलं होतं त्याचं नेटकेपणाने ती स्वयंपाक करायची. तिला स्वयंपाकाची आवड होती. शुक्रवारी तिचा ठरलेला मेन्यू होता - हरभऱ्याची उसळ आणि ताकाची कढी. ताकाची कढी ती आठवड्यतून दोन - तीनदा तरी करायचीच- कधी उसळी बरोबर तर कधी सुकटीच्या चटणी बरोबर तर कधी मटणा बरोबर. खास कोणाला दुपारच्या चहाला घरी बोलावलं तर नारळी भात आणि हरभऱ्याची उसळ करायची. शिरा, नारळी भात, बेसन लाडू ती अगदी नेहमी करत असे. तिच्या बरोबर लाडू वळायला मला खूप आवडायचं. प्रत्येक लाडवाला एक बेदाणा आणि एक काजू लावत आम्ही जमिनीवर बसून लाडू वळायचो.
आज्जीनं मातीची चूल ओट्यावर बसवून घेतली होती. सुंदर स्वयंपाकघर होतं ते: चौकोनी, लाल फरशीचं. ओट्याला लागून मोठी खिडकी होती. त्यातून बाहेरची बाग दिसायची. स्वयंपाकघराच्या समोर कोठीची खोली होती. त्यात साठवणीच्या धान्याची पोती असायची. आम्ही वरल्याहून मुंबईला यायला निघालो कि आज्जी आम्हा नातवंडांना कोंबड्यांच्या खुराड्यात अंडी आणायला पाठवायची. आम्ही अंडी गोळा करून आणली कि ती ब्रुक बॉण्ड चहाच्या रिकाम्या लाल खोक्यात बेसनाचा एक जाड थर - त्यामध्ये अंडी खोचायची- परत त्यावर बेसनाचा दुसरा थर अशी थरावर थर घालून अंडी पॅक करून देत असे. ते पॅकिंग इतकं पक्क असायचं कि एकही अंड फुटुन बेसनात मिसळलंय असं कधी झालं नाही. बेसन घरच्या शेतातल्या हरभऱ्याच्या डाळीचं असायचं.
वरल्याला तेंव्हा गिरणी नव्हती. आज तरी आहे कि नाही कुणास ठाऊक. मुंबईच्या इतकं जवळ असुनही वरलं अजुनही छोटं खेडंच आहे - फारशी लोकवस्ती नसलेलं. एक दिवस ठरवून आज्जी सगळी दळणं घेऊन तालुक्याच्या गावी वाड्याला जायची. दुपारचं जेवण, थोडी झोप झाली कि आप्पा गड्याला बैलगाडी जुंपायला सांगायची. तो दळणाचे डबे गाडीत नेऊन ठेवायचा. जी काही आम्ही नातवंड तिथे हजर असू ती गाडीत चढून बसायचो. मग सगळ्यांच्या शेवटी आज्जी यायची - उंच, ताठ, काठ पदराच्या पांढऱ्या सुती नऊवारीचा डोक्यावर पदर आणि हातात लाल चुटक रंगाची पर्स. लाल रंग आज्जीचा आवडता असावा. तिची पर्स लाल होती- कायम ती एकच पर्स तिनं वापरली, हातातल्या बांगड्या लाल असायच्या आणि घरातल्या फरशीचा रंगही लालच होता.
आज्जीच्या स्वभावात शांतपणा होता. असमाधानता नव्हती. चिडचिड नव्हती. भांडखोरपणा नव्हता. तिचा स्वभाव लोभी- लालची नव्हता. कोणाकडून काही ओरबाडून घ्यायची वृत्ती नव्हती. ती सहज विचलित होत नसे. आज्जी - आबांचं आपसातल नातं खुप प्रेमाचं आणि सन्मानाचं होतं. तेच संस्कार माझ्या वडिलांवर झाले आणि पुढे माझ्या भावावर. देशमुखांच्या घरात असताना मी हे गृहीत धरून चालले. सगळे पुरुष आपल्या बायकांशी असेच सन्मानानं वागत असावेत असा माझा समज झाला. लग्नानंतर लक्षात आलं कि सगळ्या घरातले संस्कार सारखे नसतात. आज्जी -आबांच्या नात्याचं मोल मला तेंव्हा पासुन जास्त जाणवलं. सुसंस्कार ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द कऱण्यात येणारी बहुमूल्य ठेव आहे असं वाटायला लागलं.