लॉकडाऊनचा एक अनपेक्षित परिणाम असा झालाय की सार्वजनिक ठिकाणी कानावर पडणारं अनोळखी लोकांचं संभाषण ऐकण्याची सोय तात्पुरती का होईना बंद पडली आहे. एरवी कॉफी शॉप मध्ये बसलं की लोकनिरीक्षण करण्याची चांगली संधी मिळते. आजूबाजूला बसलेले लोक आपसात किंवा फोनवर काय बोलतात ते आपसूक ऐकू येतं. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. फक्त कान उघडे ठेवले कि भागतं. आपोआप मनोरंजन होतं. टीव्ही वरील लघु मालिकेतील एखादं दृश्य पडद्यावर बघतोय असं वाटतं. दुसऱ्यांच्या आयुष्यातलं तेवढंच नाट्य मला आता झेपतं.
एकदा माझ्या समोर बसलेली ऐंशीच्या जवळपासची आज्जी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पलीकडची व्यक्ती तरुण असावी असा मी संभाषणावरून अंदाज बांधला. आश्चर्य वाटलं कि त्या वयातही कोणाला तरी आज्जीचा सल्ला महत्वाचा वाटत होता. कदाचित तिला ऑडिशन्सचा अनुभव असावा. आज्जी त्या व्यक्तीला म्हणाली, " मला खूप आश्चर्य वाटलं कि ऑडिशन झाल्यावर लगेच तू फिरायला कशी गेलीस (किंवा गेलास - इंग्रजीत "तू" पुल्लीगी आहे कि स्त्री लिंगी हे कळत नाही) .
आज्जी पुढे म्हणाली "तू पोस्ट केलेले फोटो बघून मला प्रश्न पडला की तुला जास्त महत्वाचं काय आहे. फिरायला जाणं कि ऑडिशन. मी काही बोलले नाही कारण परत तू म्हणशील कि मी तुझ्यावर टीका करते. या सारख्या मोठ्या ऑडिशन्स तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीत. फार कमी मिळतील. तू ऑडिशन झाल्यावर फिरायला गेली असलीस तरी प्रवासाचं प्लॅनींग ऑडीशनच्या आधी केलं असणार. ऑडिशनच्या आधी तुझं सगळं लक्ष फक्त ऑडिशनवरच केंद्रित असायला हवं होतं.
आज्जी अगदी हळुवार बोलत होती. अधून मधून पलीकडची व्यक्ती काहीतरी बोलत असावी. शेवटी ती म्हणाली. " पुढच्या वेळी कोणाला तरी बरोबर घेऊन जा. व्हॉइस कोच, ऍक्टिंग कोच असं कोणतरी. म्हणजे ते तुला तु ऑडिशन कशी दिलीस ते सांगतील."
एवढं बोलून तिनं फोन बंद केला आणि कॉफी बरोबर जेवणाचा जो काय छोटासा ट्रे घेतला होता तो उघडुन जेवू लागली.
अमेरिकेची नाट्यसृष्टी मॅनहॅटन मध्ये आहे तसेच NBC, CBS,ABC सारख्या मोठ्या टीव्ही कंपन्यांचे स्टुडिओ ही इथे आहेत. कॉफी शॉप जवळ एक स्टुडिओ आहे तिंथे डॉकटर ऑझ (Dr. Oz) या शोचं चित्रीकरण होतं. ऑझ नावाचे वैद्यकीय डॉकटर तज्ञ पाहुण्यांना आपल्या कार्यक्रमात बोलावून वेगवेगळ्या विषयांवर प्रेक्षकांना सल्ला देतात. या टीव्ही शोजची तिकीट बहुतेक फुकट असतात पण ती आधी मागवावी लागतात. नाहीतर रांगेत उभं रहावं लागतं आणि प्रवेश मिळेलच अशी खात्री नसते. स्टुडिओ बाहेरील रांगेत प्रामुख्याने महिला उभ्या असतात आणि त्यांनी ओढून बरोबर आणलेले बॉयफ्रेंड किंवा नवरा.
मी कॉफी शॉप मध्ये बसले होते. समोरची खुर्ची रिकामी होती. एक बाई आली आणि म्हणाली - "मी इथे बसू?'. बसल्यावर म्हणाली कि ती डॉ. ऑझच्या दोन शोज च टेपिंग बघून आली होती. आपली बॅग उघडुन तिनं शो तर्फे मिळालेल्या भेटवस्तू मला दाखवल्या. शॅम्पू , कंडिशनर, लोशन, ग्रनोला बार असं बरच तिला भेट मिळालं होतं.
मग तिनं थोड्या इथल्या तिथल्या गप्पा मारल्या. तिच्या घरातला कपडे सुकवायचा ड्रायर बिघडला होता. कपडे ड्रायर मध्ये चांगले वाळतात कि दोरीवर या विषयावर आम्ही थोडी चर्चा केली. भारतात सर्वसाधारण असा समज आहे कि कपडे ड्रायर मध्ये वाळवले तर लवकर खराव होतात. त्यापेक्षा दोरी बरी पडते. ते मी तिला सांगितलं. तर तिचं असं मत पडलं कि दोरीवर टॉवेल्स खूप ताठ वाळतात. त्यापेक्षा ड्रायर मध्ये मऊ वाळून निघतात. या तिच्या मताशी मी सहमत होते. पुढे ती म्हणाली की तिच्या बहीणीनी की भाचीनी - कोणीतरी हिंदू धर्म स्विकारलाय. त्यांच्या बरोबर ती नियमित फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जाते.
आमची दोघींचीही कॉफी पिऊन झाली होती म्हणून दोघी एकदमच कॉफी शॉपच्या बाहेर पडलो. जवळ पिझ्झा कुठे चांगला मिळतो असं विचारून ती पिझ्झाच्या शोधात गेली. जाताना म्हणाली की वेगवेगळ्या कार्यक्रमांचं चित्रिकरण बघण्यासाठी ती या भागात नेहमी येते, "भेटू आपण कधीतरी असेच कॉफी शॉप मध्ये". पण मग लॉकडाऊन आला.
अमेरिकन लोकांची गप्पा मारण्याची ही पद्धत मला खूप कौतुकास्पद वाटते. इथल्या बऱ्याच लोकांना ते अगदी सहज जमतं. कॉफी शॉप, वेटिंगरूम, बस स्टॉप किंवा प्रवासात सर्वस्वी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी मित्रत्वाचा स्मॉल टॉक करते. यातला महत्वाचा भाग म्हणजे ते तुम्हाला तुमच्याबद्दल काही प्रश्न विचारत माहीत. उगीचच लोकांना खाजगी प्रश्न विचारायचे नाहीत हा इथल्या सामाजिक एटीकेटचा भाग आहे.
स्वतःबद्दल सांगावसं वाटेल ते तुम्हांला सांगतात. तुम्ही जे काही सांगाल ते ऐकून घेतात. स्वतःच्या दुःखाचा पाढा तुमच्यासमोर वाचत नाहीत. राजकारणा सारख्या वादग्रस्त विषयांवर बोलत नाहीत. तुमचं नावगाव विचारत नाहीत. स्वतःच सांगतात असही नाही. प्रसंगानुसार इथलं तिथलं बोलतात. आपली वेळ झाली कि बाय, was nice talking to you म्हणतात आणि निघून जातात.
काही वर्षांपूर्वी आम्ही ट्रेननी फ्लॉरिडाला चाललो होतो. वॉशिंग्टन डीसी जवळच्या बाल्टिमोर स्टेशनवरून मायामीला एक ट्रेन जाते ज्यात तुम्ही आपली गाडी बरोबर नेऊ शकता. न्यूयॉर्क, न्यूजर्सी सह अमेरिकेच्या ईशान्य (पूर्वोत्तर) भागात रहाणारे बरेच निवृत्त लोक हिंवाळ्यात फ्लॉरिडाला रहायला जातात. आपली गाडी बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांना त्या ट्रेनचा उपयोग होता. शिवाय मायामीच्या कॉलेज मध्ये शिकणारी मुलं सुट्टीत घरी येतात तेंव्हा आपली गाडी बरोबर घेऊन येतात आणि सुट्टी संपली कि गाडी ट्रेन मध्ये चढवून कॉलेजला परत जातात. आम्ही सहज गंमत म्हणून गाडी बरोबर घेऊन चाललो होतो.
ट्रेन एकूण चांगली आहे. आपल्याला स्वतंत्र केबिन घेता येते. त्यात अगदी छोट्या सिंक, शॉवर सहित बाथरूम आतच असते. बाहेरचं स्वच्छतागृह वापरावं लागत नाही. पण परत कधी जायचं झालं तर मी आपले खाद्यपदार्थ बरोबर घेऊन जाईन. म्हणजे ग्रिल केलेला थंडगार मासा आणि जेमतेम कोमट भातावर समाधान मानायची पाळी येणार नाही. ट्रेन संध्याकाळी बाल्टिमोरहुन सुटते. दुसऱ्या दिवशी दुपारी मायामीला पोहोचते.
मी सकाळी लवकर उठते. उठल्यावर लगेच मला चहा लागतो. मला वाटलं एवढ्या सकाळी डायनिंग कारमध्ये कोणी नसेल. म्हणून मी एकटीच चहा प्यायला गेले. बघितलं तर सगळी टेबलं भरलेली होती. एक टेबल रिकामं होतं तिथे मी बसले. लगेचच माझ्या समोरच्या बाकावर एक वडील आणि मुलगा येऊन बसले. थोड्याच वेळात माझ्या शेजारी एक बाई येऊन बसली आणि अगदी सहज ते तिघे आपसात गप्पा मारू लागले. दोघेही आपापल्या मुलांना कॉलेजला सोडायला चालले होते.
बाईनी सुरवात केली कि नेहमी ते गाडी चालवत फ्लॉरिडाला जातात पण अखंड हायवेवरचा तो प्रवास जॉर्जियाच्या पुढे फार कंटाळवाणा होतो म्हणून यावेळी ट्रेननी जायचं ठरवलं. सवयीनुसार चहा पिता पिता मी कान देऊन त्यांचं संभाषण ऐकत होते. दोघेही स्वतःबद्दल काही बोलले नाहीत. आपल्या नवऱ्याचा किंवा बायकोचा उल्लेख केला नाही. नवरा किंवा बायको बरोबर का नाही याचं स्पष्टीकरण द्यायची त्यांना गरज भासली नाही. मी त्यांच्या गप्पात भाग घेत नव्हते तरी त्यांनी मला ऑकवर्ड वाटू दिलं नाही. प्रवास आणि कॉलेज असं विषयातून विषयात त्यांच्या गप्पा फिरत राहिल्या.
या उलट भारतात बाई एकटी किंवा मुलांसह प्रवास करत असेल तर तिला, "तुझा नवरा/ मुलांचे वडील कुठे आहेत?" असं अगदी सरळ रोखठोक शब्दात अनोळखी लोकांनी सगळ्यांच्या समोर विचारलेलं मी ऐकलं आहे.
मलाही एका बाईंनी विचारलं होतं. कोणाच्या समोर नाही.आम्ही दोघीच होतो. न्यूयॉर्कहुन मी मुंबईला येत होते. ती शेजारच्या सीटवर येऊन बसली. पहिल्या दोन मिनिटात तिनं स्वतः बद्दल सगळी माहिती सांगितली : पस्तीस वर्ष न्यूजर्सी मध्ये रहात होती. त्यांचं कँडी स्टोअर होतं. नवरा गेल्यावर दरवर्षी हिंवाळ्यात सहा महिने घाटकोपरला, उन्हाळ्यात न्यूजर्सीत मुलाकडे रहाते. नवरात्र लवकरच सुरु होतय म्हणून घरी चालली आहे. मुलगाही बरोबर आहे. तो डॉकटर आहे. तो दुसऱ्या केबिन मध्ये बसलाय. आईला त्याने अपग्रेडेड सीटवर बसवलंय. तरीही दोनदा येऊन तो आईची विचारपूस करून, तिला काही हवं नको ते बघून गेला... वगैरे.
आपलं सांगून झाल्यावर - आता तुझी पाळी, वीज देते टाळी अशी तिची अपेक्षा असावी. पण माझी विचारपूस करायला येईल असं दुसऱ्या केबिनमध्ये कोणी बसलेलं नव्हतं. मग मी काय सांगणार. शिवाय विमानात बसल्यावर सर्वप्रथम मेन्यू वाचून जेवायला काय मागवायचं ते ठरवणे, टीव्ही वर कुठले चित्रपट आणि मालिका बघण्यासारख्या आहेत - त्यातलं झोपायच्या आधी काय बघायचं, झोपून उठल्यावर काय बघायचं हे ठरवणे, विमान कंपनीने प्रेमाने दिलेले पायमोजे पायावर चढवणे ही कामे आधी उरकून घेणं फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. ते मी करत होते. थोडा वेळ वाट पाहुन शेवटी तिनंच विचारल, " नवरा, मुलं कोणीच नाही तुला?'
दुसऱ्यांच्या गप्पांमध्ये फक्त मलाच रस असतो असं नाही तर इतरांनाही असु शकतो असा अनुभव एकदा आला. भारतीय रेस्टोरंट मध्ये जवळच्या टेबलावर एक भारतीय तरुण बसला होता. बरोबर सुंदर अमेरिकन तरुणी होती. पहिली वहिली डेट असावी असं चित्र दिसत होतं. मुलगी छान तयार होऊन आली होती. टवटवीत निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आकर्षक मेकअप, केशरचना केली होती. त्याच्यावर छाप पाडण्याचा ती आपल्या परीने प्रयत्न करत होती. पण तो तिच्यात फारसा इंटरेस्ट दाखवत नव्हता. तिच्या बोलण्याला तो कंटाळलाय कि काय अशी मला काळजी वाटायला लागली. त्याचं सगळं लक्ष आमच्या टेबलवर चाललेल्या अस्सल देशी गप्पांकडे होत.
कॉफी शॉप मध्ये एक रागीट संभाषणही ऐकलं. खरंच ऐकलं कि लॉकडाऊन मुळे तिथे जाता न आल्याने जे ऐकलं होतं ते स्वप्नात आलं हे नक्की सांगता येणार नाही..आईस्ड कॉफीनी भरलेला प्लॅस्टिकचा मोठ्ठा कप हातात घेऊन लांब काळा कोट घातलेली बाई समोरच्या टेबलवर येऊन बसली. बाहेर कडक थंडी असूनही बर्फानी वरपर्यंत भरलेल्या, दूध - साखर विरहीत कडवट पाणचट कॉफीचा तिनं स्ट्रॉनी एक घुटका घेतला, धडाधड सेल फोनची बटण दाबली आणि पलिकडल्या व्यक्तिवर आग पाखडायला सुरवात केली.
"हाय... तुझा मेसेज मिळाला. Are you out of your mind? माझ्या घरात फुकट राहिल्याबद्दल मी तुला पैसे दयावेत अशी ग्रेट आयडिया आता तुझ्या हुशार डोक्यातून निघाली आहे? इतकी वर्ष तू एक पेनी सुद्धा भाडं दिलं नाहीस. त्या साईझच घर, त्या भागात भाड्यानी घ्यावं लागलं असतं तर तुझे किती पैसे खर्च झाले असते याचा हिशोब केलायस का कधी? Do the math.
तुला कोणीही इथे रहायला बोलावलं नव्हतं. तू स्वतःहुन आलीस. तुला सोयीचं होतं म्हणून राहीलीस. जनरली सून सासुशी वाईट वागणारच अस लोक धरून चालतात. मॉम एक दुर्मिळ उदाहरण आहे जिथे तिच्या मुलींनीच स्वतःच्या स्वर्थी फायद्यासाठी तिचा आणि तिच्या घरांचा पुरेपूर वापर करून घेतलाय आणि मॉमला बिच्चारील ते कळतही नाही.
तू आणि जॉनीनी डॅडच्या मृत्युपत्रातून मिळालं ते सगळं घेतलं. जे मृत्युपत्रात नव्हतं ते हि आपसात संगनमत करून मॉम कडून काढून घेतलत. वर सगळ्यांना सांगता मॉमनी स्वतःहून तुम्हाला दिल. डॅड होते तोपर्यंत मॉम त्यांच्या कंट्रोल खाली होती. ते गेल्यावर आता तुझ्या वर्चस्वाखाली आहे. स्वतःचा कुठलाच निर्णय ती घेऊ शकत नाही. तु सांगशील तिथे तिला राहावं लागतं. तू सांगशील ते बोलावं लागतं.
मी मॉमला भेटू सुध्दा शकत नाही कारण तुमच्या तावडीत सापडले कि तुम्ही काहींतरी कारण सांगून माझ्याकडून पैसे घ्यायला बघता. मी वेळोवेळी मॉम आणि डॅडला भरपूर आर्थिक मदत केली होती. म्हणून डॅडनी हे घर मला दिलं. ते अजून मला मिळालेलं नाही. पण कधीतरी हे घर तुला मिळेल असं सांगत तुम्ही लोकांनी आजवर माझ्याकडून भरपूर पैसे घेतलेत. मी कायम पैसे देण्याचं काम केलंय आणि तुम्ही फक्त घेण्याचं काम केलंय.
मॉम आणि डॅडला देण्या ऐवजी ते पैसे कुठेतरी गुंतवले असते तर आज या घरा सारखी आणखी घरं माझ्याकडे असती. त्यांना पैसे देताना मी कधी तो विचार केला नाही पण माझ्याकडून पैसे काढून घेताना तुम्ही ते सोयीस्कर पणे विसरता.
मी यापुढे तुला एक पेनीही देणार नही. मी फॅमिली निटिंगला येणार नाही. ती आशा तू सोडून दे. तुमची फॅमिली मिटिंग म्हणजे मला जाळ्यात पकडून माझ्याकडून पैसे काढून घेण्याची ट्रिक आहे हे उशिरा का होईना आता माझ्या लक्षात आलंय. करप्ट फॅमिली म्हणजे काय ते तुमच्याकडे बघितलं कि समजतं.
पाहिजे तर जॉनीकडून घे. माझे पन्नास हज्जार डॉलर्स त्याच्याकडे आहेत. इतके वर्षात त्याने ते परत केलेले नाहीत. व्याजासकट ते आता भरपूर वाढले असतील. त्यातले बघ तुला काही मिळतात का. आणि आता माझं घर सोड. पुष्कळ वर्ष राहिलीस. खूप त्रास दिलास. माझा मानसिक छळ केल्याबद्दल खरंतर तू मला नुकसान भरपाई द्यायला हवी."
एवढं बोलून तिनं फोन बंद केला. कपच्या तळाशी उरलेली बर्फातली कॉफी संपवत बसली.