काही दशकांपूर्वी
भारत एक खोज होता
मग परदेशी पर्यटकांना
आकर्षित करण्यासाठी
त्याला Shining India
म्हणण्यात आलं
आज भारत एक बजबजपुरी
झालाय असं वाटतं
काही वर्षांपूर्वी एका लेखकानी
मुंबईला मॅक्सिमम सिटी म्हंटलं होतं
आज त्या शहराची malignant city
महारोगी महानगरी झाली आहे
असं वाटतं
एवढं कसं बदललं?
लोकांचा आपल्या शहरावरचा
तोंडावरचा, वागण्यावरचा
ताबा कसा सुटला
संस्कार-हीनता
इतकी कशी बळावली
परवा मला फोनवर
अचानक धडाधड
मेसेज यायला लागले
"तू तुझ्या आईचा जीव घेतलास
वडिलांचा जीव घेतलास
त्यांचं सगळं हडप केलस"
नंबर अनोळखी होता
मी विचारलं, "कोण तुम्ही, नाव सांगा"
उत्तर आलं, "खराब मालिका"
नाव पट्कन डिलिटही करण्यात आलं
त्यांनी माझा नंबर कुठून कसा मिळवला
कुणास ठाऊक
मी म्हंटल, "नाही हो खराब मालिका
तुम्ही असं कसं म्हणता
आईवडिलांचं काहीच
माझ्याकडे नाही
मी कशाला त्यांचा जीव घेईन
ते नैसर्गिक कारणांमुळे गेले
हवं तर त्यांच्या मृत्युदाखल्याची
प्रत पाठवते तुम्हांला "
"अगं, भिकार बाई तु
फुटक्या कवडी इतकीही किंमत नाही तूला
तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार"
मालिका कडाडल्या
त्यांनी लावलेल्या कु-विशेषणांकडे
मी दुर्लक्ष केलं
उलट डोकं शांत ठेऊन म्हंटलं
"अहो खराब
मी आईवडिलांचा जीव घेतला असता
तर पोलिसांनी पकडलं नसतं का मला?"
"पकडणारच आहेत, पकडणारच आहेत
तुला काय वाटलं सोडतील तुला
तू येऊन तर बघ इथे
पाऊल तर ठेव
हातात बेड्या ठोकुन
तुरुंगात नाही टाकलं तुला तर
नावाची खराब मालिका नाही मी
सगळ्यांची आयुष्य उध्वस्त केलीस तू
भरपूर पुरावा आहे तुझ्या विरूद्ध"
त्यांनी धमकी दिली
"पण खराब
तुम्ही म्हणता
मी फुटक्या कवडी इतकीही किंमत नसलेली
भिकार बाई मग
मी कसं कोणाचं आयुष्य उध्वस्त करू शकते"
मी मनातली शंका व्यक्त केली
"अगं तुझी काय बिशाद तू कोणाच्या केसालाही धक्का लावशील
आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात असं वाटलं कि काय तुला"
खराब मालिका आपलंच आधीचं बोलणं खोडत म्हणाल्या
"खराब, माझा- तुमचा काही संबंध नाही
मी तुमचं काही घोडं मारलेलं नाही
मग तुम्ही उगीचच
माझ्यावर आग का पाखडताय
का तुम्हांला कोणीतरी
भाड्याने घेतलय
मला ट्रोल करण्यासाठी"
मी संभ्रमात पडले होते
"अगं, कैदाशीणी
तुझे दिवस संपलेत आता
तुला असा धडा शिकवते
कि तु दयेची भीक मागत
माझ्या दारात येशील"
खराबनी परत धमकी दिली
आणखी बरच काही बरळलय
हे संभाषण मुर्खांच्या मार्गानी
चाललंय असं वाटलं
म्हणून मी त्यांना म्हंटलं
"खराब, मला वाटतं तुम्हांला कोणीतरी
चुकीची माहिती दिली आहे
मी आता तुम्हांला ब्लॉक करते
म्हणजे परत कधी तुम्हांला
माझ्याशी चॅट करण्याची
इच्छा व्हायला नको"
"कर गं, तुला किती ब्लॉक करायचंय तेवढं कर
माझ्या जवळ तुझ्या विरुद्ध
भरमसाट पुरावा आहे
तो कसा ब्लॉक करशील?
मी पत्रकार परिषद बोलावली आहे
लहान -मोठ्या वाहिन्यांचे
वर्तमानपत्रांचे वार्ताहर,
ब्लॉगर्स आणि व्हलॉगर्स
यू ट्युबर्स, इन्फ्लुएन्सर्स
कन्टेन्ट क्रिएटर्स
सगळे पत्रकार परिषदेला हजर रहाणार आहेत
त्यांना मी तुझ्या विरुद्धचा पुरावा दाखवणार आहे
मग बघते कशी रडत भेकत
माझे पाय धरायला येशील ते " ....
मी खराब मालिकांना ब्लॉक केलं
कोणीतरी आपल्याकडे
दयेची भीक मागत यावं
"come begging
and crawling
for mercy"
अशी इच्छा
एखाद्याच्या मनात
का
उत्पन्न होत असेल