Tuesday, August 2, 2022

दिल ढुंढता है

                                                      
                                                             


जुलै महिन्यात दोन प्रसिद्ध व्यक्ती गेल्या. 

न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रथम पत्नी ईव्हाना ट्रम्प यांचं निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्या नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असायच्या. ९० च्या दशकात त्यांचा आणि डॉनल्ड ट्रम्प यांचा घटस्फोट न्यूयॉर्कमध्ये खूप गाजला होता कारण दोघेही इथेच रहायचे. त्या मुळच्या चेकोस्लव्हाकियाच्या होत्या.

ईव्हाना गेल्याची बातमी वाचल्यावर त्यांची एक मुलाखत बघत होते. त्यात त्या म्हणतात कि राष्ट्राध्यक्ष झाल्यावर श्रीयुत ट्रम्प यांनी त्यांना चेकोस्लव्हाकिया मध्ये अमेरिकेची राजदूत म्हणून जाण्याबद्दल विचारलं होतं. (घटस्फोट झाला असला तरी ते दोघे दर आठ -पंधरा दिवसांनी फोनवर बोलायचे. त्यांना तीन मुलं आहेत). 


एक अकेला इस शहर में 


चालून आलेलं राजदूत पद ईव्हानानी नाकारलं. त्याचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं कि "मी स्प्रिंग आणि फॉल मध्ये न्यूयॉर्क मध्ये असते, हिंवाळ्यात मायामी मध्ये, आणि उन्हाळ्यात सॅन ट्रोपे मध्ये. हे आयुष्य सोडून कशाला कुठे जाऊ ". 

घटस्फोट झाल्यावर गेल्या पंचवीस वर्षात ईव्हानानी दोनदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला श्रीयुत ट्रम्प हजर होते. न्यूयॉर्क मध्ये जशी एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच प्रमाणे ट्रम्प कुटुंब हे ही इथलं एक फिक्सचर आहे. त्यांच्या नावाच्या बऱ्याच इमारती शहरात आहेत.


दिल ढुंडता है 

दुसरं निधन मुंबईत गायक भूपिंदर सिंग यांचं झालं. दुर्दैवानी सध्या तिथे चालू असलेल्या राजकीय गदारोळात ती बातमी कुठे तरी कोपऱ्यात जाऊन पडली. माझ्या आवडीची कित्येक गाणी भूपिंदर सिंग यांच्या आवाजातली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या निधनाच्या बातमीला जेवढं मिळायला हवं होतं तेवढं महत्व मिळालं नाही. 

एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी वाचून आपल्याला काय वाटतं या मागची कारणं प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. खरतर कोण कुठली ती चेक - अमेरिकन ईव्हाना ट्रम्प. माझा त्यांचा काय संबंध. भारतात असताना त्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. पण जेंव्हा न्यूयॉर्कला आले तेंव्हा ईव्हाना ट्रम्प हे या शहरातलं खूप ठळक नाव होतं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी वाचून चुटपुट वाटली. 


झिंदगी मेरे घर आना 


तिसरं निधन मुंबईत झालं... की होत आहे (एका राजकीय पक्षाचं)... ते अजून स्पष्ट झालेलं नाही. शहरावर शोककळा पसरली नसेल  बहुतेक पण वादळ वारे वहात आहेत असं दिसतं. या आधी मुंबईत एवढं मोठं राजकीय वादळ कधी आलं होतं का आठवत नाही. आलं असेल कदाचित पण पूर्वी कुठलीही गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला थोडा वेळ लागायचा. आजच्या इतक्या वेगाने काही पोहूच शकत नसे - मग ते विषाणू असोत, वस्तू असोत, नाहीतर बातम्या असोत. 


दो दिवाने शहर में
                                 

भूपिंदर सिंग यांची कित्येक गाणी मी पुन्हा पुन्हा ऐकली आहेत. त्यांचं दो दिवाने शहर में हे घरोंदा सिनेमातलं गाणं जुन्या मुंबईची आठवण करून देतं. मुंबईत जेंव्हा जागेची टंचाई होती, बिल्डर आणि त्यांचे दलाल जागा देतो असं खोटं आश्वासन देऊन लोकां कडून पैसे घेत आणि जागा कधी मिळत नसे त्या काळातला तो चित्रपट आणि ते गाणं आहे. मुंबईतली अनेक कुटुंब तेंव्हा बिल्डर कडुन फसवणूक झाल्याच्या सामुदायिक अनुभवातुन गेली होती. 


होके मजबूर मुझे 


भूपिंदर सिंग यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे झाला. ईव्हाना ट्रम्प आपल्या घरातील जिन्यावरून पडून गेल्या. तो अपघात होता. 

राजकीय पक्षाचा मृत्यू अजुन झालेला नाही पण त्याचा खात्मा करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे आरोप होत आहेत. जर ते आरोप खरे ठरले आणि खरोखरच पक्षाचा शेवट झाला तर पक्षाच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक म्हणता येईल की घातपात किंवा हत्या म्हणावी लागेल?

आजकाल आपण कलेक्टिव्ह consciousness हा शब्द प्रयोग फार ऐकतो. ती संकल्पना थोडी विस्तृत केली तर आपल्या मनावर फक्त आपल्या घरातुन आणि शाळेतुन संस्कार होतात असं नाही. आपण ज्या अनुभवातुन जातो -  एक देश म्हणून, एक राज्य म्हणून, एक शहर म्हणून त्यांनी आपल्या मनाला आणि विचारांना आकार मिळत असतो. 

                           
 बीती ना बिताई रैना 


मुंबईत आजवर झालेल्या अनेक दंगली, दहशतवादी हल्ले, महाभयंकर पूर, दर पावसाळ्यात रस्त्यावर साचणारं पाणी या सगळ्या अनुभवांनी शहरात रहाणाऱ्या लोकांना घडवलं आहे. मुंबईत राजकीय पक्षाची हत्या झाली तर तो ही एक सामुदायिक अनुभव असेल. त्याचे शहरावर आणि राज्यावर काय बरेवाईट दूरगामी परिणाम होतील हे त्या विषयातील जाणकार सांगू शकतील कारण एका प्रादेशिक पक्षा बरोबर अनेक लोकांच आयुष्य आणि आठवणी निगडीत असतात. 

एक आठवण राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. 

 
नाम गुम जायेगा   


आऊटलुक मासिकानी घेतलेली ती मुलाखत यु ट्यूब वर आहे. हा किस्सा दुसऱ्या भागाच्या शेवटी येतो. बजाज जेंव्हा लहान म्हणजे विशीत होते तेंव्हा पुण्याच्या त्यांच्या बजाज कंपनीत संप चालू होता. कित्यके महिने तो संप मिटत नव्हता. एक युनियन नेता अडून बसला होता आणि संप मिटू देत नव्हता. त्यासंबंधी बोलणी करण्यासाठी राजीव बजाज त्यांचे वडील राहुल बजाज यांच्या सोबत बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. ठाकरेंनी त्यांची बाजू ऐकून घेतली. मग आपल्या सहकाऱ्यांना विचारलं कि खरंच तो युनियनचा नेता त्रास देतोयं का.

बजाज मुलाखतीत म्हणातात की त्या बैठकीत ठाकरेंचे जे सहकारी हजर होते त्यांची नावं मी सांगत नाही कारण त्यातले काही जण आत्ताच्या मंत्रिमंडळात आहेत (एक वर्षापूर्वीची मुलाखत आहे). जेंव्हा सहकाऱ्यांनी सांगितलं कि होय, खरंच तो नेता अडवणूक करतोय तेंव्हा ठाकरे म्हणाले - "काढून टाका त्याला". फक्त त्यांनी राहुल बजाज यांनां सांगितलं कि तुम्ही त्याला एक ऑटो रिक्षा भेट द्या. म्हणजे जरी त्याची नोकरी गेली तरी तो उद्या पासुन रिक्षा चालवून पॆसे मिळवून त्याच्या कुटुंबाचं पोट भरू शकेल. 

          

कभी किसी को मुक्कमल जहाँ नही मिलता

मुलाखतीत बजाज म्हणतात कि ज्या समस्येवर तोडगा शोधणं खूप कठीण जाणार आहे असं त्यांना बैठकीच्या आधी वाटत होतं ती समस्या ठाकरेंनी इतक्या चुटकीसरशी तरीही संवेदनशीलतेने "counterintuitive" (त्यांनी वापरलेला शब्द) पद्धतींने मिटवली ते बघून तरुण वयात ते खूप मोठा धडा शिकले. त्यांच्या आई (राहुल बजाज यांच्या पत्नी) मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातील होत्या असंही ते मुलाखतीत म्हणतात.