हि एका लग्नाची काल्पनिक गोष्ट आहे. याचा वास्तवाशी काही संबंध नाही. या गोष्टीतील व्यक्तिरेखांचं राजकारणातील काही पात्रांशी साधर्म्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा.
काही वर्षांपूर्वी दोन प्रेमी जीवांनी दादरच्या वनिता समाज मध्ये लग्नगांठ बांधली. त्या लग्नाचा मुहूर्त निवडण्यापासून ते कार्यालय बुक करण्या पर्यंत सगळं माझ्या आईनी केलं. तिचा त्या लग्नाशी काय संबंध होता मला माहित नाही.
पूर्वी दादर मध्ये दोन मोठी मराठी महिला मंडळं होती (अजूनही असतील कदाचित). : दादर (पूर्व) मध्ये हिंदू कॉलनीत भगिनी समाज होता...जिथे माझी मावशी जायची आणि दादर (पश्चिम) मध्ये शिवाजी पार्क समोर समुद्राच्या बाजूला वनिता समाज होता -जिथे कधी काही चांगले कार्यक्रम असले तर माझी आई आमच्या शेजारच्या इमारतीत रहाणाऱ्या जोशी काकूं बरोबर ते बघायला जायची.
आईला वनिता समाज मधील लग्नाच्या हॉलचं फार कौतुक होतं. त्या काळात दादर मध्ये रहाणाऱ्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय मराठी घरातील मुलांची लग्न वनिता समाज मध्ये होत असंत. महिनों महिने आधी ते कार्यालय बुक करावं लागायचं. वनिता समाज मध्ये मुलांचं लग्न होणं हे दादर मधल्या पालकांना त्यांच्या प्रतिष्ठेचं चिन्ह वाटायचं. निदान माझ्या आईला तरी वाटायचं.
त्यामुळे अपूर्व आणि पद्मा यांच्या विवाह समारंभासाठी तिने अर्थातच वनिता समाजातील मंगल कार्यालयाची निवड केली.
शिवाजी पार्कच्या जवळ रहात असुनही आणि नियमित वनिता समाजात कार्यक्रमांना जात असुनही, पार्क मध्ये दसऱ्याला काय होतं हे तिच्या लक्षात आलं नाही. जर आलं असतं तर एखाद्या सुज्ञ व्यक्तीने दसऱ्याचा मुहुर्त वनिता समाजमधील लग्नासाठी निवडला नसता. तो हॉल रिकामा मिळतोय यांनेच आई हुरळुन गेली असावी.
दसरा हा साडेतीन मुहूर्तां पैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी ते कार्यालय रिकामं मिळालं याचं कारण मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन इतर कोणी त्या दिवसासाठी ते बुक केलं नसावं. आईच्या ते लक्षात आलं नाही.
तरीही अपूर्व आणि पद्मा यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीची अडचण त्यांच्या समारंभाला फारशी भोवली नाही. लग्नासाठी आलेले नातेवाईक आपापल्या गावी परत गेले. नवविवाहीत जोडप्याने त्यांचा संसार सुरु केला. पुढली काही वर्ष दोघे एकत्र नांदले. गुण्यागोविंदाने एकत्र नांदले असं म्हणता येणार नाही.
अपूर्व संसारात नाखूष होता. तो कायम तक्रार करत राहीला. घटस्फोटाची भाषा करत राहीला. वारंवार आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत राहीला. पद्मानी नवऱ्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं.
अपूर्व जरी पत्नीवर नाखूष असला आणि वारंवार घटस्फोटाची धमकी देत असला, "घटस्फोटाचा अर्ज नेहमी माझ्या खिशात असतो" असं घरी येणाऱ्याजाणाऱ्या सगळ्यांना सांगत असला तरी त्यानं लग्न संपवण्यासाठी काही पावलं उचलली नाहीत. त्यामुळे शिव आणि पद्मा यांचा संसार काही वर्ष टिकला.
चारपाच वर्ष नाखुषीत घालवल्या नंतर अपूर्वनी ठाम भूमिका घेण्याचं ठरवलं. त्यानं आपल्या मागण्या पद्माला सांगितल्या. आपण आपल्या मागण्यांवर ठाम रहाणार असल्याचंही सांगितलं.
ते ऐकल्या बरोबर पद्मा खवळली. "फसवणूक...माझी फसवणूक होतेय," असं म्हणू लागली.
"लग्नाआधी आपलं ठरलं होतं कि लग्नानंतर तू कायम घर सांभाळणार आणि मी नोकरी करायची आणि आता तू म्हणतोस कि निम्मा वेळ तु नोकरी करणार आणि मी घरी बसायचं? मला हे कदापि मान्य नाही. मी घर सांभाळणार नाही. ही माझी फसवणूक आहे. तुला जर वचन पाळायचं नव्हतं तर लग्नानंतर कायम घर सांभाळण्याचं तू लग्नाआधी का कबूल केलं होतंस ?" पद्मा पुन्हापुन्हा तेचतेच म्हणत राहिली.
लग्नाआधी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्याने दोघांनी एकमेकांना अनेक वचनं दिली होती आणि आणाभाका घेतल्या होत्या हे ती विसरली. पत्नीचा आडमुठेपणा बघुन अपूर्वही मागे हटायला तयार होईना. शेवटी दोघांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. दोघेही हट्टाला पेटल्याने त्यांच्या संसाराच्या विभागणीत कॊणाला काय मिळणार हे ठरवण्यासाठी दोघांनी न्यायालयाकडे धाव घेतली.
*****
एकदा रात्री आई माझ्या स्वप्नात आली. ती पुणेवासी होती तेंव्हा मी तिला नियमित फोन करत असे पण ती स्वर्गवासी झाल्यापासून तिनं माझ्याशी काहीही संपर्क ठेवलेला नाही. ती गेली ती गेलीच. पण त्यादिवशी स्वप्नांत आली आणि म्हणाली. "अपूर्वनी तडकाफडकी घर का सोडलं? त्यानं असं भावनेच्या भरात घर सोडायला नको होतं".
मी गाढ झोपेत होते. तरी तिला म्हंटल, "तुला काय माहित त्यानं तडकाफडकी घर सोडलं? आपल्याला वाटतं ते अचानक घडलं याचा अर्थ असा नाही कि त्यानं तो निर्णय भावनेच्या भरात घेतला. तो निर्णय त्यानं त्याच्या वकिलांच्या सल्ल्याने घेतला असेल."
आईला ते पटलेलं दिसलं नाही म्हणून मी म्हंटल, " अगं, ज्या तऱ्हेनं अपूर्व आणि पद्माचे वकिल आपापल्या अशिलांची बाजू सध्या न्यायधिशां समोर मांडत आहेत आणि गेली काही वर्ष त्या दोघांची आपसात कशी भांडण चालली होती याच्या बातम्या आता आपल्या कानावर येत आहेत ते ऐकल्यावर असं वाटू लागलय कि गेले कित्यके महिने किंवा वर्ष ते दोघेही आपापल्या वकिलांचा सल्ला घेत असावेत. "
आई थोडी नवऱ्याशी जुळवून घ्यावं या संस्कारातली होती. ती म्हणाली, " पद्मानी जरा जुळवून घ्यायला हवं होतं. एवढी वर्ष तिनं नोकरी केली होती. काय बिघडलं असतं थोडी वर्ष घर सांभाळलं असतं आणि अपूर्वला नोकरी करू दिली असती तर? निदान मुलांसाठी तरी घर सांभाळण्याचं काम वाटून घ्यायचं. आता हि न्यायालयातली लढाई किती दिवस चालणार, त्यात मुलांची किती फरपट होणार? आणि शेवटी कोण जिंकणार?"
आईच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं.
*****
जे खऱ्या आयुष्यात घडतं त्यातुन काल्पनिक गोष्टी सुचतात किंवा उलटही होऊ शकतं. कल्पना आणि वास्तव यांची सरमिसळ होत असते.
गेल्या काही महिन्यांतल्या राजकीय घडामोडी बघता एक रहस्यमय मालिका दूरदर्शनवर दाखवण्यात येत आहे असं वाटू लागलं आहे. या मालिकेची निर्मिती कधी सुरु झाली, कथानक कसं उलगडत गेलं आणि शेवट काय होणार याचा अंदाज त्या मालिकेतील सगळ्या पात्रांना आणि त्यांच्या सल्लागारांना असावा. फक्त प्रेक्षकच सस्पेन्स मध्ये आहेत असं दिसतंय.
सत्तेच्या लालसे पोटी राजकीय नेत्यांनी राज्याला अनिश्चितते मध्ये लोटलं आहे, त्यांच्या वागण्यावर आपलं काही नियंत्रण उरलेलं नाही अशी भीती लोकांच्या मनात घर करू लागली आहे.
जेंव्हा भीती मनात घर करू लागते तेंव्हा आपण काय करतो?
प्रथम आपण Go भीती Go आणि Go अनिश्चितता Go असे मंत्रजप करतो. दहा कोटी लोकांनी श्रद्धेने हे मंत्रजप केले तर कुमारी भीती आणि कु.अनिश्चितता या जुळ्या बहिणी घाबरून तात्काळ चीनला पलायन करतील असा आपल्याला विश्वास वाटतो.
दुर्दैवाने सगळे लोक ऐकत नाहीत. मनोभावे जप करत नाहीत. त्यापेक्षा ते मनोरंजनाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे जप निष्प्रभ ठरतात. तसं झालं तर...
*****
... तर जप करायचं सोडून देऊन आपण नुसताच विचार करत बसतो. तेंव्हा या मालिकेतील कथानकाशी समांतर घटना आपल्याला सभोवताली घडलेल्या दिसतात:
दादरला पोर्तुगीज चर्च आहे. त्याच्या तिरकं समोर रस्त्याच्या पश्चिम बाजूला गोखले रस्त्यावर एक खाणावळ होती. आधी एक होती पण नंतर त्याच्या दोन खाणावळी झाल्या: त्यातल्या एकाचं नाव आहे मालवण किनारा आणि त्याला अगदी लागून असलेल्या दुसऱ्या खाणावळीचं नाव आहे मालवणी किनारा. काही वर्षांपूर्वी त्या खाणावळीचे दोन भाग झाले.
पक्ष विघटनाशी समांतर अशी हि घटना आहे.
मालिकेतलं दुसरं महत्वाचं कथानक म्हणजे संस्थापकांना किंवा त्यांच्या वारसदारांना पदच्युत करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
जगद्विख्यात ऍपल कंपनीचा इतिहास सर्वाना माहित आहे. एकोणीसशे शहात्तर साली स्टिव्ह जॉब्ज याने आपला मित्र स्टिव्ह वॉझनियाक बरोबर ऍपल कंपनीची स्थापना केली. एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी मॅकनटॉश संगणक पहिल्यांदा बाजारात आणला. परंतु जॉब्जनी ज्या व्यक्तीची ऍपलच्या सीईओ पदी नेमणूक केली होती त्याने कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर मिळून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जॉब्जला ऍपल सोडायला भाग पाडलं.
साधारणपणे इथपर्यंतचं कथानक आपण आजवर बघितलं आहे. ही समांतर उदाहरणं सेवाभावी राजकारणातील नसुन स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रातील आहेत हा भाग वेगळा. मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय होणार हा प्रेक्षकांसाठी सस्पेन्स आहे.
खऱ्या आयुष्यात, आपणच सुरु केलेल्या कंपनीतुन उचलबांगडी झाल्यावर स्टिव्ह जॉब्ज ने NeXT नावाची कंप्युटर प्लॅटफॉर्म विकसित करणारी कंपनी स्थापन केली. एकोणीसशे शह्यांणव साली ऍपलने NeXT विकत घेतली. त्या मार्गाने जॉब्ज स्वगृही म्हणजे ऍपल मध्ये परतला आणि कंपनीचा अध्यक्ष बनला. पुढे काही वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यानं आय फोन सहीत तत्सम अनेक लोकप्रिय उत्पादने बाजरात आणली. त्या काळात त्यानं आपलं आरोग्य गमावलं. पण ऍपलच्या उत्पादनांनी जगाला वेड लावलं.
*****
या मालिकेतली दृश्य बघितली तर असं वाटतं कि काही पुरुष राजकीय नेते मिळून आपसात त्यांचा सत्ते पे सत्ता चा खेळ खेळत आहेत. एकदोन ठळक नावं वगळली तर ते महिलांना आपल्या खेळात समाविष्ट करून घेताना दिसत नाहीत.
हे चिंताजनक आहे. आजवर मुंबई हे महिलांसाठी खुप सुरक्षित शहर राहिलेलं आहे. राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांत महिला रात्रीच्या वेळी एकट्यादुकट्या बाहेर जाऊ शकत नाहीत असं म्हणतात.
भविष्यकाळातही मुंबई महिलांसाठी सुरक्षित राहील याची काळजी महिलांना घ्यावी लागेल. त्यासाठी जागरूक रहावं लागेल. नाहीतर बघता बघता हे शहर महिलांसाठी असुरक्षित होईल आणि ते लक्षात येई पर्यंत काही करण्याची वेळ टळून गेलेली असेल.
*****
गणपती तर गावाला गेले. आपल्याला त्यांच्यावाचून चैन पडो न पडो आता दसरा आणि दिवाळी येईल. शोभा डे यांनी त्यांच्या Selective Memory: Stories from My Life या पुस्तकात दिवाळीशी निगडित एक आठवण सांगितली आहे. त्या लिहितात:
'मी नेहमी मुलांना घेऊन दिवाळीची खरेदी करायला जुन्या बंगल्याच्या जवळ असलेल्या मध्य मुंबईतील बाजारात जात असे... नेहमी प्रमाणे बरीच लहान मुलं मला चिकटलेली होती. आम्ही अनेक लहानसहान गोष्टी घ्यायला थांबलो. अवंतिकाच्या हातात आठ छोटे रंगीबेरंगी कंदील होते (ती जेमतेम सहा वर्षांची होती). आदित्य उत्साहाने त्याचे (फटाके) बॉम्ब आणि रॉकेट्स मिरवत होता. तेवढ्यात मला एक म्हातारी आज्जी विशष्ट प्रकारच्या रांगोळीच्या पॅटर्न्सच पुस्तक विकताना दिसली. तिच्याकडून मी ते पुस्तक घेतलं आणि पर्स मध्ये सुट्टे पैसे शोधण्यापुरता मुलांचा हात सोडला. याला तीस सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला नसेल. तिथुन निघताना जेंव्हा मी परत मुलांची संख्या मोजली तेंव्हा एक मुल कमी भरलं. माझंच. दिवाळीच्या खरेदीत मग्न गर्दीनी खचाखच भरलेल्या त्या अंधाऱ्या गल्लीत अवंतिका कुठे दिसेना.
मी माझ्या हातातले छोटे हात सोडू शकत नव्हते. गजबजलेल्या कोपऱ्यावर त्यांना एकटही सोडू शकत नव्हते. शोधक नजरेनं आणि धडधडत्या छातीनी मी अक्षरशः त्यांना ओढत प्रत्येक फेरीवाल्याकडे जाऊन विचारलं, "तुम्ही लहान मुलीला बघितलं? तिच्या हातात कंदील होते". बहुतेकांनी मान हलवून कुठे तरी लांब बोट दाखवत म्हंटलं, "ती त्या बाजूला गेली". अशक्य. सहा वर्षांची मुलगी काही सेकंदात इतक्या लांब कशी जाईल? तरीही ज्याला ज्याला मी विचारलं त्या प्रत्येकाने अगदी खात्रीने सांगितलं, "त्या दिशेला"
मी माझ्या नेहमीच्या सराफाच्या दुकानात शिरले. ओरडून तिथल्या विक्रेत्यांना विचारलं, "माझी मुलगी.... तुम्ही माझ्या मुलीला पाहिलंत का? चमचमत्या सोन्याच्या काउंटर मागून ते ही ओरडले, " हो. आली होती ती इथे. पण ती आता इथे नाहीय." ते तर दिसतच होतं. पण ती इथे नाही तर कुठे होती?
तशीच सगळ्या बच्चे कंपनीला घेऊन मी त्या अरुंद, घाण कचरा विखुरलेल्या छोट्या फुटपाथवरून तिला हाका मारत धावत सुटले.
ते दृश्य बघण्या सारखं असेल: एक सैरभैर झालेली बाई, तिच्या ओढणीला अर्धा डझन मुलं लटकतायत, "अवंतिका" असं पुकारत सैरावैरा धावतेय.
पन्नास मीटर अंतरावर दोन पुरुषांनी मला गाठलं.
"तुम्ही कंदीलवाल्या लहान मुलीला शोधताय का?"
"हो" मी किंचाळले.
"ती घरी गेली," ते शांतपणे म्हणाले.
"तुम्हांला कसं माहीत. तुम्ही कोण?"
"ती रडताना दिसली म्हणून आम्ही तिला थांबवलं. आमची एक महीला स्वयंसेविका तिला इथे घेऊन आली आणि तिला तिचं नाव आणि पत्ता विचारला. तुम्ही जवळच रहाता ना? तिनं त्या बोळातुन बंगल्याकडे जाण्याचा शॉर्ट कट दाखवला. काळजी करू नका. ती सुरक्षित आहे. त्या तिला घरी घेऊन गेल्या."
त्या क्षणी मी तर मेलेच. नक्कीच. छातीतली धडधड थांबली. अवंतिका माझी लाडकी बाळी घरी सुरक्षित होती. मला दुसरं काही सुचत नव्हतं ना कशाची पर्वा होती. माझे ओठ कोरडे पडले होते. त्यावरून जीभ फिरवत मी त्यांना पुन्हा विचारलं, " तुम्ही कोण?'
"आम्ही या भागातल्या शिवसेना शाखेचे आहोत," ते उत्तरले.'
त्या आठवणीच्या शेवटी शोभा डे लिहितात, " I don't care what anybody thinks of the Sena. I owe them one. A big one. I'm deeply, deeply grateful. And indebted for life (मी त्यांची आजन्म ऋणी आहे)".