हालोवीन
दरवर्षी ३१ ऑकटोबरला हालोवीन साजरा होतो. तो का साजरा केला जातो आणि त्या दिवशी जी सजावट करतात त्यामागे काय अर्थ असतो हे मला अजूनही नीटसं समजलेलं नाही. चित्रविचित्र पोशाख करून तरुण हालोवीन पार्ट्या साजऱ्या करतात आणि लहान मुलं दारोदारी कँडी मागत फिरतात. मग बास्केटभर कँडी घरी येऊन पडते. तिचं काय करायचं? ती संपवायची कशी? खाल्ली तर आरोग्याला घातक नाही खाल्ली तर एवढी चांगली चॉकलेट्स फेकुन कशी द्यायची या मनाच्या नको त्या दोलायमान अवस्थेत पुढील काही आठवडे त्या बास्केटकडे बघत घालवावे लागतात. एवढंच हालोवीनच स्वरूप मला आजवर न्यूयॉर्क मध्ये दिसलं आहे.
भारतात पूर्वी खरेखुरे भिकारी होते जे घरोघरी जाऊन भीक मागत असंत. तेंव्हा बैठी घरं जास्त आणि बंद दारांची फ्लॅट पद्धत कमी होती. आमच्या कडे जो भिकारी यायचा - कधी तो यायचा तर कधी त्याची बायको आणि लहान मुलं यायची- तो रात्री साधारण नऊसाडेनऊच्या सुमारास लोकांची जेवणं झाली कि त्याची फेरी सुरु करायचा. घरातलं उरलेलं अन्न त्यांना दिलं जायचं. आमच्याकडे ते काम माझं असायचं. त्यातलं पातळ आमटी, भाजी, भात वगैरे तो त्याच्या जवळच्या भांड्यात घेत असे. चपाती सारखे सुक्के पदार्थ खांद्याला लटकणाऱ्या कापडाच्या झोळीत टाकायला सांगायचा. वेगवेगळ्या घरातली भाजी, आमटी आणि कढी तो एकाच पातेल्यात कसा काय घेतो याचं लहानपणी मला फार आश्चर्य वाटायचं.
ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे झोळी नाही तरी बास्केट घेऊन माझ्या मुलानी दारोदारी कँडी मागत फिरावं हे मला फारसं कधी पटलं नाही. मित्रांच्या संगतीनं त्यानं जे काही ट्रिक ऑर ट्रीटींग केलं असेल तेवढंच.
भारतातही आता हालोवीन साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे असं दिसतं. तो साजरा करण्यामागचं कारण जाणुन घेऊन हे होत असेल तर बरं नाहीतर केवळ त्याचं बाजरी रूप साजरं होतं- त्याच्याशी निगडीत व्यवसायिकांच्या फायद्यासाठी - चित्रविचित्र पोशाख आणि कँडी विकणारे आणि अति कँडी खाऊन दात खराब झाले कि दंतवैद्य.
आयुष्यात ज्या गोष्टींची भीती वाटू शकते त्याची खेळीमेळीत लहान मुलांना ओळख करून द्यावी हा उद्देश तर हालोवीन साजरा करण्यामागे नसेल? जसं महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय भयनाट्याचा -horror show- तेथील सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम झालाय याचं प्रतिबिंब न्यूयॉर्क मधील हालोवीन सजावटीत मला यंदा दिसलं:
हे दोघे एसटीची वाट बघत बाकावर बसले होते. तेवढ्यात भयनाट्य सुरु झालं. तेंव्हा भीतीने ते इतके गलितगात्र झाले कि बसमध्ये चढण्याचं त्राण त्यांच्या अंगात उरलं नाही. |
काही लोक इतके प्रचंड गोंधळात पडले आहेत कि कुंपणाच्या या बाजूला उतरावं कि पलिकडे उडी घ्यावी कि कुंपणावरच बसुन रहावं हे त्यांना समजेनासं झालं आहे. |
ह्याने स्वतःला चक्क दिव्याला टांगून घेतलं आहे. "मी सत्याग्रह करतोय, भयनाट्य संपे पर्यंत असाच लोंबकळत राहीन " असं तो म्हणतो. |
सत्याग्रहाचा आणखी एक प्रकार: भयनाट्य संपल्याशिवाय स्वतःला श्रुंखलामुक्त करणार नाही असं याचं म्हणणं आहे. |
या दोघी काय म्हणतायत ते त्यांचं त्यांनाच माहीत. |
१४ नोव्हेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदीवस असतो. तो बालदिन म्हणूनही ओळखला जातो. आता माहित नाही पण पूर्वी बालदिन साजरा करण्याची पध्द्त खूप साधी सोज्वळ होती: लहान मुलांच कौतुक होत असे आणि गुलाबाच्या फुलांना महत्व असायचं. दोन्ही पंडीत नेहरूंना आवडायचं असं म्हणतात. चाचा नेहरू या टोपणनावाने ते ओळखले जात. त्यांच्या कुडत्याच्या खिशात गुलाबाचं फुल खोवलेलं असायचं. थडगी, भुतंखेतं, कवट्या, हाडांचे सापळे त्या दिवसाच्या साजरी करणा मध्ये लहान मुलांच्या जवळपास दिसंत नसंत.
नेहरुंच्या पूर्वजां विषयी निरनिराळी नविन माहिती देणारे संदेश समाज माध्यमां मध्ये बघण्याची आता आपल्याला सवय झाली आहे. काही लोक त्या माहीतीवर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत आणि काहींना वाटतं कि ती माहीती खरी असली काय किंवा नसली काय त्यानं आता काही फरक पडत नाही. पण एका बाबतीत खरतर सर्वांमध्ये सहमती व्हायला हरकत नसावी कि त्या संदेशांमध्ये मध्ये भाषेच्या खूप चुका असतात. लेखनाच्या चुका असतात. व्याकरणाच्या चुका असतात. लेखकाचं नाव नसतं. ती माहीत कुठल्या पुस्तकातुन किंवा लेखातुन घेण्यात आली आहे याचा काही संदर्भ नसतो. लिहिणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे, तो संदेश लोकांना पाठवण्या आधी त्यांनी स्वतः एकदा वाचून तरी बघितला होता का कि दुसऱ्या भाषेत लिहिलॆल्या मूळ संदेशाचं ते संगणकांनी केलेलं धेडगुजरी मराठी भाषांतर आहे असा प्रश्न पडतो. तरीही शिकले सवरलेले लोक ते संदेश दुसऱ्यांना पाठवायला कचरत नाहीत.
लहान मुलांची आवड असणाऱ्या चाचा नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर देशाला जी दिशा दिली त्याचा देशातील निम्न आर्थिक स्तरातील लहान मुलांना किती फायदा झाला याची पुरेशी उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. नेहरू स्वतः ऍरिस्टोक्रॅटीक श्रीमंत घरात जन्मलेले होते. इंग्लंडच्या महाविद्यालयात शिकले होते. ते भारताला इंग्लड - अमेरिकेच्या मार्गाने नेऊ शकले असते. त्यांनी तसं केलं नाही.
बहुतेक भारतीय ज्या दोन देशांना आदर्श मानतात, त्यांचा कित्ता गिरवु पहातात त्या इंग्लड आणि अमेरिकेत एखादी व्यक्ती जर त्या देशातील अतिशय महाग विद्यापिठात शिकलेली नसेल तर त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघू शकत नाही. तो विचारही मनात आणू शकत नाही. इंग्लडचे नविन पंतप्रधानही त्याचंच उदाहरण आहेत. ज्या प्रतिष्ठित विद्यापीठातुन मिळवलेल्या पदव्या त्यांच्या नावामागे आहेत त्या जर नसत्या तर ते पंतप्रधान पदाच्या जवळपास पोहचू शकले नसते.
भारतात मात्र सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतुन आलेली, शाळाकॉलेजात न शिकलेली व्यक्ती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनु शकते. हा काही गेल्या दहापंधरा वर्षातील शासकीय धोरणांचा परिणाम नाही. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जे वातावरण देशात निर्माण झालं, लोकशाहीची पाळंमुळं रुजवण्यात आली त्याचा हा परिपाक आहे.
अजून खूप काही प्रगती करायची बाकी असेल पण जी झाली आहे ती कमी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा देशात किती गरिबी होती हे त्या काळातील कृष्णधवल फोटो बघितले की लक्षात येतं. ते फोटो बघवत नाहीत.
भारतातून उच्च शिक्षण घेऊन गेलेले लोक परदेशात जाऊन स्थायिक होतात असा आरोप पूर्वी केला जात असे. आता तो मुद्दाच उरलेला नाही. जगभर कोणीही कामानिमित्त कोठेही जाऊन राहु लागलं आहे.
जगातील अनेक मोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख पदी आज भारतातून शिकून गेलेली, इथल्या मध्यम वर्गातील घरात वाढलेली मुलं आहेत. भारतीय लोकांना त्यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांच्या नावांची लांबलचक यादी समाज माध्यमांमध्ये फिरते. माध्यमांमध्ये त्यांचा उदोउदो होतो. हे ही काही गेल्या दहापंधरा वर्षात घडलेलं नाही. कमीत कमी दोन पिढयांना - आज उच्च अधिकार पदावर बसलेल्या या व्यक्ती आणि त्यांचे आईवडील - यांना शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या, उज्वल भविष्याची स्वप्न बघता आली त्याचं हे फळ आहे.
परवाच्या बालदिनी सध्याचे माननीय मुख्यमंत्री राज्यातील लहान मुलांना योग्य मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी आपल्या दिवंगत नेत्यांकडून खूप काही घेतलं आहे. आनंद दिघेंच्या आयुष्यावरील चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले. दिघे आता हयात नाहीत. जर असते तर त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं असतं का? किंवा बंड करायला परवानगी दिली असती का? हे आपल्याला कधी समजणार नाही. नंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचं उपनाव म्हणून बाळासाहेबांचं नाव निवडलं. बाळासाहेबही आज हयात नाही. हयात असते तर अशा प्रकारे आपलं नाव वापरायला त्यांनी परवानगी दिली असती का या प्रश्नाचं उत्तर उघड आहे.
मी तुमच्या कडून काय वाट्टेल ते घेणार, तुम्ही कोण मला अडवणार? हि वागणूक दिवसेंदिवस समाजात वाढताना दिसते. त्यातून लहान मुलांना खूप चुकीची उदाहरणं समोर दिसतात. देशातील आणि समाजातील चांगले नागरिक म्हणून कशा प्रकारे वागावं याचं मार्गदर्शन मोठ्यांकडून लहान मुलांना मिळालं नाही तर कुठून मिळणार?
All photos are from Halloween'22 in New York |