कत्रीना कुणी एक व्यक्ती नाही. ती खरी आहे पण प्रातिनिधिक आहे. अनेक व्यक्तींचं मिश्रण आहे.
कत्रीना तिच्या शॉर्ट्स किंवा रिल्स मधुन नियमित समोर येते. काही लाख दर्शक तिचे शॉर्ट्स पहातात. एकदा कधीतरी समोर आलेली तिची क्लिप चुकून बघितली, तेंव्हा पासुन ती माझ्या यूट्यूबच्या पानावर येत रहाते. मी गंमत म्हणून - "कत्रीनानी आज काय आचरटपणा लावलाय बघूया" म्हणून तिचे शॉर्ट्स बघते.
तिच्या एकूण दर्शकां पैकी किमान काही लोक तरी त्याच कारणास्तव बघत असावेत. जरी ते कौतुक आणि प्रोत्साहनाचा वर्षाव करीत असले तरी. दर्शक तिचे शॉर्ट्स का बघतात याच्याशी कत्रीनाला काही देणंघेणं दिसत नाही. ते बघतात एवढंच तिला हवं आहे.
तिचे शॉर्ट्स बघून मी फार गोंधळात पडते. कत्रीना मला धक्क्यांवर धक्के देते. ती काय चीज आहे ते मला समजेनासं झालं आहे. तिच्या एखाद मिनिटाच्या किंवा काही क्षणांच्या व्हिडीओ क्लिप मध्ये जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला तिच्या बद्दल काही माहीती नाही. तिचं वय एकूणचाळीस आहे असं ती एका व्हिडिओत म्हणाली होती. ती अमेरिका किंवा कॅनडा या पैकी एका प्रगत देशात रहाते.
तिला चार मुलं आहेत. म्हणजे होती. काही दिवसांपूर्वी तिनं एक शॉर्ट्स लावलं. त्यात तिनं आपल्या चार मुलांच्या हातात चार ept (early pregnancy test) च्या टुयब देऊन त्यांना त्यांच्या वडिलांकडे पाठवलं. बॅक्ग्राउंडला कत्रीना खूप खुशीत हर्षवायू झाल्या सारखी हसत म्हणत होती, "पाचव्या प्रेग्नन्सीची बातमी देऊन मी माझ्या नवऱ्याला आश्चर्यचकीत करीत आहे". तिच्या शॉर्ट्सचं शिर्षकही तेच होतं.
तो पहिला धक्का होता. मी शाळाकॉलेजात असताना माझ्या आजूबाजूच्या समाजात एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं होणं हे अडाणी आणि अशिक्षित माणसांचं लक्षण मानलं जायचं. जगाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे त्यामुळे पृथ्वी वरचा समतोल ढासळतोय आणि तिचं अस्तित्व धोक्यात आलं आहे असं आमच्या मनावर बिंबवलं गेलं होतं.
पिल्लावळ कुत्र्यामांजरांना होते. मनुष्य प्राण्यांनी जनन प्रक्रियेवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे असा आमचा समज करून देण्यात आला होता. माझ्या माहितीत माझ्या पिढीतील कोणालाही दोन पेक्षा जास्त मुलं नाहीत. बऱ्याच जणांना एकच आहे.
पाचव्या मुलाच्या आगमनाची बातमी ऐकल्यावर कत्रीनाच्या नवऱ्यानी घेतलेला खोल श्वास आणि त्याचा पडलेला चेहरा कॅमेऱ्याच्या नजरेतुन सुटला नाही. कत्रीनाच्या ते लक्षात आलं असावं. "तो ही बातमी प्रॉसेस करतोय" ती कॅमेऱ्याच्या पाठीमागुन म्हणली.
तिला अमेरिकेतील एका नावाजलेल्या लॉ कॉलेजात प्रवेश मिळाला होता पण तिनं तो घेतला नाही असं कत्रीनाने एका शॉर्ट्स मध्ये सांगितलं. वर प्रेक्षकांना विचारलं, "कठीण असतं का त्या कॉलेजात प्रवेश मिळणं?"
तेंव्हा पासुन तिचे शॉर्ट्स मी त्या चष्म्यातुन बघु लागले.
असं वाटू लागलं कि जणू ती स्वतःला, तिच्या दर्शकांना आणि तिच्या समकालीन महिलांना (ज्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या करिअर वर लक्ष केंद्रित केलं...त्यासाठी त्यांना लग्न आणि मुलं दोन्हीच्या बाबतीत थोडं कॉम्प्रमाईज करावं लागलं) दाखवू पहात आहे की, " जरी मी कायद्याच्या पदवीवर पाणी सोडलं असलं तरी बघाबघा मी कसं घरकाम आणि कुटुंबाला वाहुन घेतलं आहे. शिवाय शॉर्ट्स मध्ये करिअरही करतेय."
"मला डॉक्टर नवरा मिळाला आहे. तो माझ्या सारखाच गोंडस देखणा आहे. आम्हांला पाच मुलं आहेत. आम्ही दोघेही खूप हुशार आणि अभ्यासु आहोत. आमची मुलंही अभ्यासु आहेत ... आणि हे सगळं मिळविण्यासाठी ना मला लॉ कॉलेजात जावं लागलं ना लग्नाच्या बाबतीत काही तडजोड करावी लागली. सगळं कसं खूप सहज सुंदर घडतंय माझ्या आयुष्यात!" (एका शॉर्ट्स मध्ये तिचा नवरा आणि चार मुलं बुद्धिबळ सारखे बौद्धिक खेळ खेळत आणि वाचत बसलेली दिसतात. कॅमेरा त्यांच्यावरून फिरवत कत्रीना म्हणते, "कॉलेज मधल्या अभ्यासु मुलाशी तुम्ही जरा चांगलं काय वागता ... हे असं होतं!")
आपण पाचव्या मुलाला जन्म देत आहोत म्हणजे फार मोठा पराक्रम करत आहोत या थाटात कत्रीनाने पुढील महिने घालवले. वारंवार आपल्या पोटाच्या आकाराचा अपडेट दर्शकांना देत राहीली.
पहिल्या तीमहीत म्हणाली, - "बघाबघा माझं पोट! मी सध्या तीन महिन्यांची गरोदर आहे. समोरून नीट दिसत नाही का? थांबा साईडनी दाखवते."
दुसऱ्या तीमहीत म्हणाली - "बघाबघा माझं पोट! आता सहावा महिना आहे. मी पोटावर फिट बसणारा टी शर्ट घालते आणि साईडनी दाखवते म्हणजे माझं पोट किती मोठं झालंय ते तुम्हांला नीट दिसेल.
तिसरी तीमही - पुन्हा तेच. पोट किती मोठं झालंय ते लोकांना दाखवण्याची धडपड.
ती पोटाचं इतकं कौतुक करत होती कि मला वाटलं कंटाळून कोणतरी बघणारी तिला विचारेल, "मुलाला जन्म दिला म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर केलं असं वाटतं का तुला?'
अशी कॉमेंट जर कुणी लिहिली तर मला खात्री आहे कि कत्रीना बाजूला राहील आणि तिचे चाहते त्या व्यक्तीवर तुटुन पडतील. म्हणतील, "डोकं फिरलयं का तुझं? मुल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेची तुलना तू एक टेकडी चढण्याशी करतेस?"
***
पहिली कत्रीना आपलं वाढलेलं पोट दर्शकांना नीट दिसावं म्हणून धडपडत होती तेवढ्यात दुसऱ्या कत्रीनाने बाजी मारली. तिनं चक्क आपलं बा-ळं-त-प-ण-च लोकांना दाखवलं. प्रत्यक्ष मुलाचा जन्म होताना दाखवलं. इतके खाजगी क्षण मलाच पडद्यावर बघवले नाहीत.
कत्रीना(१) आणि कत्रीना(२) अनुक्रमे त्यांच्या गरोदरपणाचा आणि बाळंतपणाचा आनंद दर्शकांबरोबर वाटुन घेत होत्या तेंव्हा कत्रीना(३) बिच्चारी आपल्या गाडीत बसुन रडत होती. ते सुख यापुढे तिच्या नशिबात येणार नव्हतं. त्याबद्दल नवरा तिचं सांत्वन करत होता. कॅमेरा त्याच्याच हातात असावा.
कत्रीना(३)ला डॉक्टरांनी सांगितलं होतं कि तिला चवथं मुल होऊ शकणार नाही. आहेत त्या तीन वरच थांबावं लागेल. म्हणून ती अश्रु ढाळत होती.
जगात अनेक महीला आपल्याला एकतरी मुल व्हावं म्हणून तळमळत असताना ही तीन मुलांची आई का रडते आहे (आणि लोकांनां ते दाखवते आहे) मला समजेना. मी मनातल्या मनातं तिच्या रडण्यामागचं कारण शोधू लागले:
कारण अ - आहेत ती तीन मुलं आपल्याला मातृत्वाचं सुख देण्यात कमी पडत आहेत असं तिला वाटत होतं म्हणून चवथ होऊ शकणार नाही याबद्दल ती दुःखी होती?
ब - आपल्याला आणखी मुलं होऊ शकली नाहीत याचा अर्थ आपलं स्त्रीत्व संपुष्टात आलं आणि पत्नी म्हणून आपण कमी पडलो असं तिला वाटत होतं म्हणून रडत होती?
क - माझ्या सख्ख्या मैत्रिणीला/ बहिणीला/ शेजारणीला किंवा दुसऱ्या कोणाला तरी पाचसहासात मुलं आहेत आणि मला मात्र तीन वरच थांबावं लागतंय याचं दुःख होतं?
कत्रीना(३) गाडीत बसुन रडत होती. गाडी कुठल्यातरी पार्किंग लॉट मध्ये उभी होती. ती डॉक्टरांच्या ऑफिस मधुन बाहेर आली आणि लगेच दर्शकांना हि बातमी सांगण्यासाठी तिनं शॉर्ट्स बनवायला सुरवात केली तेंव्हा तिला रडू कोसळलं कि ती रडत असताना ते लोकांना दाखवावं म्हणून तिनं कॅमेरा सुरु केला हे कळायला मार्ग नव्हता.
या सर्व जन्मदात्रींना खरोखरच मोठ्या कुटुंबाची हौस असेलही कदाचित. किती मुलांना जन्म द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे (?). पण ज्या लोकांना असं वाटतं की मुलं नसली तरी किंवा एकदोन असली तरी बऱ्यापैकी परिपूर्ण आयुष्य जगता येतं आणि जितकी जास्त मुलं होतील तितकं त्यांच्याकडे लक्ष पुरवणं कठीण जाईल - त्यांना एवढी मुलं होण्यामागे वेगळीच कारणं दिसतात:
दहाएक वर्षांपूर्वी अमेरिका आणि इंग्लड मध्ये टीव्ही मालिका येऊन गेल्या ज्यात खुप मुलं असलेल्या खऱ्याखुऱ्या कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्याचं चित्रीण दाखवण्यात आलं. त्या मालिकांची शिर्षकं फिफ्टीन अँड काउंटिंग, ट्वेंटी अँड काउंटिंग म्हणजे पंधरावीस मुलं आहेत आणि अजुन होतातच आहेत अशी होती. त्या मालिका बघत मोठं झालेल्या पिढीवर त्याचा परिणाम झालेला असण्याची शक्यता आहे.
कत्रीना (१) गळ्यातील साखळी मध्ये तिच्या धर्माचं चिन्ह असलेलं लॉकेट ठळकपणे दिसेल असं घालते. मोठं कुटुंब हा तिच्या धार्मिकतेचा भाग आहे असं ते बघणाऱ्याला वाटु शकतं.
वर्षानुवर्षे टीव्ही वरील मालिकांनी ही क्लुप्ती वापरलेली आहे. सुरवातीला लोकप्रिय असलेल्या मालिकेचं कथानक काही दिवसांनी थंडावलं, दर्शकांची संख्या रोडावली, लेखकांना नविन विषय सुचेनासे झाले कि नविन बाळाचं कथानक मालिकेत घातलं जातं. हमखास दर्शकांची संख्या वाढते.
कत्रीना(१) ला पाच मुलं झाली... मुलांची संख्या वाढल्यावर ते नविन घरात रहायला गेले... ते सगळं तिनं तिच्या शॉर्ट्स मध्ये दाखवलं. त्याबरोबर तिला बघणाऱ्यांची संख्या वाढली. ते बघुन इतर कत्रीनांना आपल्या दर्शकांची संख्या वाढावी असं वाटु शकतं.
कत्रीनांच्या शॉर्ट्स किंवा रिळांमध्ये - मी, माझी मुलं, माझा नवरा, माझा स्वयंपाक या शिवाय दुसरं काही नसतं. एखाद्या कुटुंबाचा तोच तो दिनक्रम बघुन दर्शक काही दिवसांनी कंटाळतात. आपल्या मुलांबरोबर केलेल्या बालिश कलाकृती आणि पाककृती (फळांपासुन कँडी बनवा... पुडिंग मध्ये टॉफी घाला) आयांना कितीही क्यूट वाटल्या तरी बाहेरचे लोक ते किती काळ बघू शकतात याला मर्यादा असते. बदल म्हणून दुसऱ्या कोणाची तरी रिळं त्यांना खुणावू लागतात. अशा वेळी कत्रीनाच्या घरात पुनश्च पाळणा हलणार आहे असं समजलं कि दर्शक हमखास नव्या उत्साहाने तीची रिळं किंवा शॉर्ट्स बघू लागतात. किमान पुढील काही काळ तरी त्यांचं लक्ष त्यात गुंतलेलं राहु शकतं...
***
कत्रीना(१) चं पाचवं गरोदरपण स्वतःवर खुष होण्यात पुढे सरकत होतं त्या सुमारास भारतातील कत्रीना कुठल्यातरी सिनेमातील एक दोन गाण्यांच्या मुखड्यांवर नाचत होत्या. आई -सासु बरोबर, मित्रमैत्रिणीं सोबत, नवऱ्या बरोबर असं कोणा बरोबरही त्याच त्या मुखड्यांवर नाचत होत्या. मला परत धक्का बसला.
पूर्वी घुमा म्हणून एक होती. तिला तिच्या मैत्रिणी मंगळागौरीच्या दिवशी नाचायला सांगायच्या.
त्या म्हणायच्या, "नाच गं घुमा".
घुमा म्हणायची, "नाही गं मैत्रिणींनो, या गावचा त्या गावचा माळी नाही आला. वेणी नाही मला. मी कशी नाचू. "
तरी मैत्रिणी आग्रह धरायच्या. म्हणायच्या, "नाच ग घुमा. तू नाचायलाच हवं "
त्यावर घुमा म्हणायची, " नाही गं मैत्रिणींनो, या गावचा त्या गावचा कासार नाही आला. बांगड्या नाही मला. मी कशी नाचू".
घुमा खूप कारण सांगायची. आढेवेढे घ्यायची. घराच्या दिवाणखान्यात किंवा गच्चीवर मैत्रिणीं सोबत नाचायचं असलं तरी ती एका पायावर तयार होत नसे.
कत्रीना मात्र इमारतीच्या पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर नाचल्या, बागेत, रस्त्यात असं कुठंकुठं नाचल्या. त्यांच्या नाचाचं रूपही वेगळं आहे. पूर्वीच्या नाचात ना पासुन सुरु होणारा नाजूकपणा असायचा. आता उड्या मारणे आणि आपला पाठीमागचा भाग कॅमेऱ्याला दाखवून हलवणे याला नाच म्हणतात.
****
एकावर एक शॉक बसत असल्याने ते ऍबझॉर्ब करायची सवय लागली. मग करवा चौथ आली. कत्रीनांनी ती बॉलिवूड स्टाईल मध्ये साजरी केली. तेंव्हा काही वर्षांपूर्वी वाचलेला एक लेख आठवला. न्यूयॉर्कच्या वर्तमानपत्रात आला होता. लिहिणारीचं नाव आठवत नाही.
तिनं जो मुद्दा मांडला होता त्याचा मला उमजलेला अर्थ असा: जुन्या हिंदी सिनेमां मध्ये खलनायिका हे एक पात्र असायचं. खलनायिका पडद्यावर ते सर्व करायची जे तेंव्हाच्या नायिका करत नसंत. ती पाश्चिमात्य कपडे घालायची. क्लब मध्ये कॅब्रे डान्स करायची. त्या काळानुरूप थोडंफार शरीर प्रदर्शन करायची. तेंव्हाच्या नायिका अंग झाकणारे भारतीय कपडे घालायच्या आणि सोज्वळ वागायच्या. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्याचं काम खलनायिकेचं असायचं.
सिनेमा जसा बदलत गेला तसं जे एकेकाळी खलनायिका करायची ते नायिका करू लागल्या. त्या पडद्यावर बिकिनी घालू लागल्या. खूप तोकडा ब्लाऊज आणि कमरेच्या खूप खाली साडी नेसुन शरीर प्रदर्शन करीत उत्तान, सिडक्टिव्ह नृत्य करू लागल्या*. त्यामुळे चित्रपटात खलनायिकेची गरज भासेनाशी झाली. तिची भूमिका हळुहळु कमी होत गेली. आणि सध्याच्या हिंदी सिनेमातुन खलनायिका हे पात्र नाहीसं झालं आहे.
आजच्या हिंदी सिनेमातील नायिका हि जुन्या सिनेमातील खलनायिका + नायिका यांची बेरीज आहे. त्या शरीर प्रदर्शन करत उत्तान नृत्य करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं काम करतात. तसंच त्या करवा चौथचा उपासही करतात. बॉलीवूडला आदर्श मानणारी मंडळी त्यांचं अनुकरण करतात.
* टॉपच्या नायिकाही शरीर प्रदर्शन टाळू शकत नाहीत असं दिसून येतं: माधुरीचं कायम एका विशष्ट प्रकारे साडीचा पदर किंवा ओढणी घेणं किंवा ऐश्वर्याचा कजरा रे या गाण्यावरील नाच. भरपूर शरीर प्रदर्शन करत तिनं आपला नवरा आणि सासऱ्यांच्या बरोबर पडद्यावर तो उत्तान नाच केला आहे. भारतातील कोट्यावधी घरांमध्ये कुटुंबातील लहानमोठ्यांनी एकत्र बसुन तो टीव्ही वर बघितला असणार. कोणालाच आता त्यात काही विशेष वाटत नाही. इतकी आता आपल्याला त्याची सवय झाली आहे.