जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका खास व्यक्तीची मुलाखत घ्यावी अशी खूप इच्छा होती. अशी व्यक्ती जी अनेक पुरस्कारांची मानकरी होण्याच्या योग्यतेची आहे - आदर्श सून, आदर्श पत्नी आणि आदर्श आई आहे. तसेच देशातील पहिल्या दोनतीन राजकीय नेत्यांमध्ये त्या व्यक्तीला स्थान आहे.
त्यांच्या आयुष्याबद्दल खूप कुतुहुल होतं. एक मुळ महत्वाचा प्रश्न होता ज्याचं उत्तर दुसरं कोणी देऊ शकणार नाही असं वाटलं.
तो प्रश्न काल्पनिक मुलाखतीत विचारण्याची संधी मिळाली:
ज्ञानी लोक असं म्हणतात कि आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यावर आपलं नियंत्रण फार कमी असतं. हे विधान जितकं तुमच्या बाबतीत खरं ठरलं आहे तितकं क्वचितच दुसऱ्या कोणाच्या बाबतीत खरं ठरंत असेल.
तुम्ही सुखी संसारात स्थिरावलेल्या असताना एक दिवस तुमच्या सासुबाईंची अतिरेक्यांनी निर्घृण हत्या केली. त्या नंतर काही वर्षांनी तुमच्या पतींची हत्या झाली. या दोन्ही हत्या दोन वेगवेगळ्या देशातील विघटन वादी चळवळी मुळे झाल्या. इंदिराजींची हत्या त्यांनी खालिस्तान चळवळ संपुष्टात आणण्यासाठी जी कारवाई केली त्यामुळे झाली तर राजीव गांधींची हत्या श्रीलंकेतील तामिळ सेपरेटिस्ट चळवळी मुळे झाली.
या दोन चळवळींचा तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम होण्याचं खरतर काही कारण नव्हतं. कुठले कोण हे दोन आशियायी देश. तुम्ही युरोपियन. तुम्हाला राजकारणाची पार्श्वभूमी नाही. राजीव गांधीं बरोबर लग्न करून तुम्ही भारतात आलात. त्यावेळी भविष्य काळात कधीतरी इथल्या राजकारणात भाग घ्यावा ही तुमची महत्वाकांक्षा असण शक्य नव्हतं.
पण या दोन हत्त्यांमुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली आणि गेली जवळपास तीस वर्ष तुम्हांला भारताच्या राजकारणात सक्रीय भाग घ्यावा लागला. आपण या सगळ्याकडे कसं बघता?
******
खूप मिनतवारी केल्यावर शेवटी सोनिया गांधी मुलाखत द्यायला तयार झाल्या.
मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरली. माझ्या समोर यक्ष प्रश्न उभा राहीला कि मुलाखत घेताना कुठले कपडे घालावेत. काही राजकीय नेत्यांच्या जुन्या मुलाखती मी बघितल्या. या उद्देशाने कि मुलाखत घेणाऱ्यांनी काय घातलं होतं ते बघुन मलाही काय घालावं ते सुचेल.
श्रीमती गांधी मुळच्या इटालियन असल्या कारणाने मला वाटलं जर मी एखाद्या इटालियन डिझायनरचे कपडे घातले तर त्यांना ते आवडेल आणि त्या मनमोकळी मुलाखत देतील. म्हणून मी गुची-व्हरसाची-डॉलचे & गब्बाना वगैरे सुप्रसिद्ध डिझायनर्सचे वेबसाईट धुंडाळले. न्यूयॉर्क मधल्या त्यांच्या दुकानातही जाऊन आले. पण मनासारखं काही मिळेना. काही ठिकाणी हव्या त्या रंगाचे कपडे होते पण साईझ नव्हता. काही ठिकाणी हवा तो रंग होता, साईझही होता पण किंमत इतकी अव्वाच्या सव्वा होती कि काल्पनिक मुलाखती साठी एवढे महाग कपडे घेणं मनाला पटेना.
शेवटी ठरवलं कि मुंबईत जे मिळेल ते घ्यावं. त्या दृष्टीने तिकीट काढलं आणि सामान बांधायला सुरवात केली. आणि अहो आश्चर्यम्! हँगर वरचे कपडे मागेपुढे करताना इतर कपड्यांच्या गर्दीत लपलेली माझी एक जुनी गुलाबी पँट सापडली. ती माझ्याकडे होती हे मी साफ विसरून गेले होते. उगीच सगळ्या डिझायनर्सची दुकानं फिरण्यात वेळ घालवला.
पँटची सोय झाली. पांढरा शर्ट मुलाच्या कपाटात सापडला. त्याचा शर्ट बॅगेत भरण्या आधी त्याला विचारायला हवं की काय असा विचार मनाला चाटुन गेला. पण तो विचार मी मनातच वीरू दिला.
ठरल्या दिवशी मुंबईत घरी पोहोचले. मुलाखतीचा दिवस जवळ येऊ लागला तशी थोडी धाकधूक वाटू लागली. न जाणो कुठुन तरी मुलाला समजलं मी त्याचा शर्ट वापरला तर तो वैतागेल. त्यापेक्षा आधीच त्याला कळवलेलं बरं असं वाटलं. त्याला मेसेज टाकला: "सगळ्या डिझायनर्सच्या दुकानात शोधलं. कुठेच मनासारखं काही मिळालं नाही म्हणून तुझा शर्ट घ्यावा लागला" असं त्याला सांगितलं.
त्यावर त्याचं उत्तर आलं, "आये, कपड्यांची कसली काळजी करतेस. आधी प्रश्नावली तयार कर."
मनात विखुरलेले प्रश्न नीट एकत्र जमवायला हवेत हे तेंव्हा कुठे माझ्या लक्षात आलं. मी लगेच त्या कामाला लागले. पुन्हा एकदा जुन्या मुलाखतींकडे धाव घेतली. मुलाखत घेणाऱ्यांनी काय प्रश्न विचारले होते ते बघितलं. सर्वसामान्य लोकांना सोनिया गांधींकडून काय जाणून घ्यायला आवडेल हे - कामवाली बाई कामाला आली तेंव्हा तिला विचारलं, कुरियर बरोबर बिल्डिंगचा वॉचमन वर आला तेंव्हा त्या दोघांना विचारलं. शेजारणीला, बहिणीला आणि एकदोन मैत्रिणींनाही विचारून घेतलं. बरेच प्रश्न जमा झाले.
शेवटी मुलाला विचारलं कि त्याला सोनिया गांधीं कडून काय जाणून घ्यायला आवडेल.
तो म्हणाला, "विचार करून सांगतो. तू दिल्लीला कधी जाणार आहेस?"
मी म्हंटल, " मी कशाला दिल्लीला जाऊ. काल्पनिक मुलाखत झूम वर आहे".
तो म्हणाला, " मग एवढा तिकिटाचा खर्च करून मुंबईला कशाला गेलीस? काल्पनिक झूम न्यूयॉर्क मधुन नसतं करता आलं?
... असो...होतो असा गोंधळ कधीकधी.
मुलाखत खूप छान झाली. मी माझे प्रश्न खूप छोटे ठेवले आणि त्यांना जास्त बोलू दिलं. त्यांनीही सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. जवळपास त्यांचा बहुमुल्य दीड ते पावणे दोन तास वेळ त्यांनी मला दिला. मी मनात असं ठरवलं होतं कि मुलाखतीच्या दरम्यान त्यांच्या नावाचा उल्लेख भारतीय पद्धतीनं सोनियाजी असा न करता इटालियन पद्धतीनं सॉन्याजी किंवा सॉन्याताई असा करायचा. पण तशी वेळ आली नाही.
नमस्कार- चमत्काराचे सोपस्कार झाल्यावर मी सरळ प्रश्नांनाच हात घातला.
इटालियन भाषे बरोबर माझी तोंडओळख आहे हे दाखवत म्हंटलं: सिन्योरा, तुम्हांला आंबे खायला आवडतात का? भारतात येण्या आधी तुम्ही कधी आंबे खाल्ले होते का?
सो. गांधी (हसून): भारतात येण्या आधी मी कधीच आंबा खाल्ला नव्हता किंवा पाहीलाही नव्हता. आंबा हे एक फळ असतं हे मला थोडंसं ऐकुन माहीत होतं. भारतात आल्यावर मी पहिल्यांदा आंबा बघितला आणि खाल्ला. आणि आता सिझन मध्ये नक्की खाते.
प्रश्न: तुम्हांला आंबे कसे खायला आवडतात? महाराष्ट्रात आम्ही जास्त करून आमरस करून खातो किंवा फोडी चोखुन खातो. तुम्ही कसे खाता?
सो. गांधी: आंब्याची साल काढून, त्याच्या लहान फोडी करून, त्यावर थंडगार फ्रेश क्रीम घालून ते काचेच्या नाजूक पात्रातुन खायला मला आवडतं. पण आजकाल आपण सगळे वजनाची फार काळजी करत असतो. त्यामुळे मी नेहमीच वरून क्रीम घालते असं नाही.
प्रश्न: सिन्योरा, माझ्या घरी काम करणारी बाई कोकणी आहे. तिनं असं विचारलंय कि तुम्हांला कुठले आंबे आवडतात?
सो. गांधी उत्तर द्यायला सुरवात करणार तेवढ्यात त्यांना थांबवत मी म्हंटलं: मला वाटतं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत तर बरं होईल. याचं कारण सांगते तुम्हांला - तुम्ही जर एखाद्या अमराठी म्हणजे नॉन -महाराष्ट्रीयन आंब्याचं नाव घेतलंत तर महाराष्ट्रात तुमच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागणार हे निश्चित. बऱ्याच मराठी लोकांना मनापासून असं वाटतं कि देवगड आणि रत्नागिरी हापूस सोडले तर दुसऱ्या कुठल्याही आंब्यांना बाजारात येण्याचा काही अधिकार नाही. पायरी आणि रायवळ त्यांच्या इथलेच आहेत म्हणून ते चालवून घेतात. नाहीतर पायरीला त्यांनी दारात उभं केलं नसतं.
सो. गांधी (गालातल्या गालात हसुन) म्हणाल्या: अच्छा, अशी भानगड आहे का? मग उगीच त्या वादात पडायला नको.
प्रश्न: आंबा पुराण मी इथे संपवते पण राजकारण हा आपल्या मुलाखतीचा मुख्य विषय नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. एक स्त्री म्हणून तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्याबद्दल जाणुन घ्यायला मला आवडेल.
आज आंतरराष्ट्रीय विवाह खूप मोठ्या प्रमाणात होतात. लग्न करून मुली नवऱ्या बरोबर कुठल्याही देशात रहायला जातात. पण जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरी तंत्रज्ञाना द्वारे त्या सतत दर मिनिटाला त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकतात.
पन्नासएक वर्षांपूर्वी आपण युरोपातुन भारतात आलात तेंव्हा भारत खऱ्या अर्थाने एक थर्ड वर्ल्ड -अविकसित देश होता. गरीब होता. जरी आपला वावर इथल्या उच्च वर्गात मर्यादित असला तरी इटलीतील तुमच्या कुटुंबाशी संपर्कात रहाणं आजच्या इतकं तेंव्हा सोप्प नव्हतं. शिवाय भारतीय संस्कृती इटालियन संस्कृती पेक्षा खुप वेगळी आहे. इटलीतुन भारतात रहायला येणं तुम्हांला कठीण गेलं का?
सो. गांधी: ते सोप्प नव्हतं. पण माझ्या पतींची साथ होती. सासुबाईंचा आधार होता. ते दिवस खुप सुंदर होते.
प्रश्न: राजीव गांधीं बरोबर लग्न करताना तुमचं पुढील आयुष्य कसं असेल असं तुम्हांला वाटलं होतं? भारताच्या राजकाणात एवढी महत्वाची भूमिका तुम्हांला करावी लागेल असं तेंव्हा तुमच्या स्वप्नात तरी आलं होतं का?
सो. गांधी: नक्कीच नाही. लग्न झालं तेंव्हा माझे पती पायलट होते. ते राजकारणात सक्रिय नव्हते. सासुबाई देशाच्या पंतप्रधान होत्या. आम्ही त्यांच्या बरोबर रहात होतो. पण राजकारणाशी माझा कधी प्रत्यक्ष संबंध येईल असं तेंव्हा वाटलं नव्हतं. नेहरू कुटुंबाचा भारताच्या इतिहासात किती मोठा सहभाग राहिलेला आहे हे मी इथे आल्यावर हळुहळु उलगडत गेलं.
प्रश्न: आपण आपल्या सासुबाईंच्या आधाराचा उल्लेख केलात. त्यांचा तुमच्यावर फार मोठ्ठा प्रभाव आहे हे दिसुन येतं. ज्या तऱ्हेनं तुम्ही साडी आणि इतर भारतीय पेहराव आपलेसे केले आहेत, ते तुम्ही त्यांच्याकडुन शिकला असावात असं वाटतं.
तुमच्या वागण्या-बोलण्याचं वर्णन करायला मला "खानदानी" हाच शब्द योग्य वाटतो. तुमच्या वागण्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, अकांडतांडव नाही. तुम्ही स्वतःच्या भावनांवर काबू ठेऊन वागताच पण लोकांच्या भावना चिथावण्याचा उद्योग कधी करीत नाही.
खरतर या दोन्ही हत्त्यांचं भांडवल करून तुम्ही देशातील जनतेच्या भावनांना कायम आवाहन करू शकला असता. पण तुम्ही ते ही कधी केलं नाही. तुमचे पती असताना आणि ते गेल्या नंतर तुमचं वागणं नेहमी exemplary राहिलेलं आहे. सासुबाईंबद्दल काय सांगाल?
सो. गांधी (क्षणभर विचार करून): इंदिराजीं बद्दल काय सांगू? त्यांनी एका युद्धात देशाचं नेतृत्व केलं आणि विजय मिळवला. देश एकसंध रहावा म्हणून खालिस्तान चळवळीचा खात्मा करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली - त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?
नक्कीच, सासुबाईं कडुन मी खुप काही शिकले. त्यांना मी खुप जवळून बघितलं. आजच्या सारखी उपदेश आणि सल्ला देणारी समाज माध्यमं तेंव्हा नव्हती. जे काही शिकायचं ते आपल्या जवळच्या व्यक्तींकडुन शिकावं लागायच. माझं फार मोठं सौभाग्य कि त्या मला रोल मॉडेल म्हणून लाभल्या आणि त्यांचा सहवास मला खुप मिळाला.
प्रश्न: या ठिकाणी कुतुहुल म्हणून विचारते, तुमच्या सासुबाईंना एक भारतीय सूनही होती म्हणजे आहे. पण त्यांच्यावर इंदिराजींचा प्रभाव एवढा दिसत नाही जेवढा तुमच्या वर दिसतो. याचं कारण काय असेल असं वाटतं?
सो. गांधी: नक्की सांगू शकणार नाही. पण जर अंदाजच बांधायचा झाला तर कदाचित असं म्हणता येईल कि माझी धाकटी जाऊ भारतातच लहानाची मोठी झाली. एक भारतीय म्हणून तिचं व्यक्तिमत्व लग्ना आधीच घडलेलं होतं. मला ते सासुबाईं कडुन शिकावं लागलं.
दुसरं म्हणजे तिचं माहेर, नातेवाईक, मित्रमैत्रिणी इथं दिल्लीतच आहे. ती हवं तेंव्हा माहेरी जाऊ शकत होती. कितीही दिवस तिथे राहु शकत होती. ते ऑप्शन मला नव्हतं. त्यामुळे मला इंदिराजींचा सहवास जास्त लाभला असावा.
प्रश्न: मुलाखतीच्या सोयीसाठी तुमच्या भारतातील आयुष्याची दोन भागात विभागणी केली तर चालेल का? १९८४ च्या आधीचा काळ आणि त्या नंतरचा काळ. कारण १९८४ नंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे पालटलं.
सो गांधी: हो. चालेल.
प्रश्न: १९८४ मध्ये तुमच्या सासुबाईंची हत्या झाली. १९९१ मध्ये तुमच्या पतींची हत्या झाली. तुमचे धाकटे दीर आधीच विमान अपघातात गेले होते. पती गेल्या नंतर तुमच्यावर एक वेळ अशी आली कि कुटुंबातील तुमचे सगळे जवळचे लोक गेले होते.
तुम्ही अशा देशात एकट्या होता ज्या देशाला तुम्ही फारतर वीसएक वर्ष ओळखत होता. मुलं तशी लहान होती. राहुल एकवीस वर्षांचे होते. प्रियांका एकोणीस वर्षांची. तुम्ही पूर्ण परदेशी, तुमची मुलं अर्धी परदेशी.
पती गेल्या नंतर सुरवातीच्या काही दिवसात काय मानसिक स्थिती होती? आपण खूप एकटे आहोत. आपल्या भोवती जे लोक आहेत त्यातल्या कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही अशी भीती कधी वाटली का?
सो. गांधी: राजीवजी गेल्या नंतर सुरवातीचे दिवस नक्कीच खूप कठीण होते. त्यातुन मी कशी बाहेर पडले ते आत्ता सांगत बसले तर इतर प्रश्नांना वेळ उरणार नाही.
पण खंबीरपणा मी माझ्या सासुबाईं कडुन शिकले होते. त्यांनी न डगमगता देशावरील संकटांना कसं तोंड दिल ते मी बघितलं होतं. खाजगी आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना कसा करायचा याचं ट्रेनिंग मला त्यातुन मिळालं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
प्रश्न: मी कल्पनाही करू शकत नाही कि राजीव गांधी गेल्या नंतर तुम्हांला आणि तुमच्या मुलांना कुठल्या दिव्यातुन जावं लागलं असेल.
वयाच्या अवघ्या पंचेचाळिसाव्या वर्षी तुम्ही आपला जीवनसाथी गमावला ज्याच्यासाठी तुम्ही त्याच्या देशात आला होता. इतकंच नाही तर अचानक तुम्ही भारतातील राजकारणाच्या भोवऱ्यात ओढले गेलात.
आजही देशाच्या राजकारणात महिलांचा सहभाग कमी आहे. तीस वर्षांपूर्वी तो आजच्याहुन कमी होता. तुमच्या भोवती जास्त करून सगळे भारतीय पुरुष. एक परदेशी तरुण स्त्री म्हणून तुमच्या बद्दल त्यांचा दृष्टिकोन, इंदिराजींकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टीकोना पेक्षा वेगळा असणार.
देशासाठी काम करताना तुमच्या सासुबाईंनी आणि पतींनी आपले प्राण गमावले. त्यानंतर तुम्हांला आणि तुमच्या मुलांना खूप कठीण काळातुन जावं लागलं. तुम्हांला असं वाटतं का कि त्याबद्द्दल देशातील जनतेकडुन तुम्हांला मिळायला हवी होती तितकी सहानभूती कधी मिळाली? का तुमचं परदेशी असणं त्याच्या आड आलं?
सो. गांधी: या प्रश्नाचं उत्तर भारताच्या जनतेनं स्वतःला विचारायचं आहे. मी नाही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार.
प्रश्न: आज काळ खुप बदलला आहे. ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एक भारतीय वंशाची व्यक्ती आहे. कित्येक भारतीयांनी त्या घटने नंतर आपली छाती अभिमानाने फुगवली आहे. आज कोणी असं म्हणत नाही कि ब्रिटन मध्ये आता रामराज्य येणार.
तुमच्या वेळी मात्र तुमचे पती गेल्यानंतर तुमच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली कि आता भारतात रोमराज्य येणार. ती टीका केवळ तुम्ही महिला असल्यामुळे झाली असं तुम्हांला वाटतं का?
सो. गांधी: हो, ते ही कारण असु शकेल.
प्रश्न: तुमच्या मुलांबद्दल विचारलं नाही तर ही मुलाखत अपूर्ण राहील म्हणून विचारते, आजच्या पिढीला कल्पना नसेल कि खालिस्तान चळवळ चालू होती तेंव्हा देशात किती असुरक्षिततेचं वातावरण होतं. देशाच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला तेंव्हा खूप मोठा धोका होता. लोकांच्या हत्या होत होत्या, जागोजागी बॉंब स्फोट आणि अतिरेकी हल्ले होत होते. तुम्हांला आणि तुमच्या मुलांना बाहेरच्या जगात मोकळेपणानी वावरता येत नव्हतं. सतत सुरक्षा कवचाच्या आत रहावं लागलं. तुमच्या मुलांचं बालपण या दोन विघटनवादी चळवळींनी हिरावुन घेतलं असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
अमेरिके मध्ये PTSD (post traumatic stress disorder) या मानसिक आजराबद्दल बरंच बोललं जातं. अमेरिकन सैनिक जेंव्हा परदेशातील युद्धावरून घरी परत येतात तेंव्हा युद्धात बघितलेल्या हानीचा आणि विध्वंसाचा त्यांच्या मनावर आणि कधीकधी शरीरावर देखील इतका खोल परिणाम झालेला असतो की त्या धक्क्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागतो किंवा काही जण कधीच त्यातुन बाहेर पडु शकत नाहीत.
पण PTSD फक्त सैनिकां मध्येच आढळते असं नाही. एखादी व्यक्ती खूप ट्रॉमा मधून गेली तर तिला ते होऊ शकतं. काही महिलांना प्रसूती नंतरही PTSD होतं असं म्हणतात.
तुमच्या मुलांना त्यांच्या जडणघडणीच्या वयात ज्या ट्रॉमातुन जावं लागलं त्याची तीव्रता इतकी जास्त होती कि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झाला आहे असं तुम्हांला वाटतं का? आणि तो किती खोल होता?
सो. गांधी: निःसंशय काही प्रमाणात परिणाम तर झालाच असणार. कारण ते आघात इतके मोठे होते.
पण मला वाटतं कि आजार शारिरीक असो किंवा मानसिक, तो सहन करण्याची आणि त्यावर मात करण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमता निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबुन असते. कौटुंबिक पार्श्वभूमीचाही त्यात मोठा वाटा असतो असं मला वाटतं.
माझ्या मुलांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्या चार पिढयांनी आपलं आयुष्य देशाच्या कामासाठी वाहिलेलं आहे. त्यासाठी आयुष्यात अनेक चढउतार सहन केले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी देशाला आपलं कुटुंब मानलं आहे. त्या वारश्यातुन माझ्या मुलांना जी अंतर्गत ताकद मिळाली आहे ती मी कमी लेखणार नाही. त्यांचे पणजोबा, आज्जी आणि वडीलांनी देशाचं नेतृत्व केलं आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या रक्तातुन मिळाला आहे.
लहान वयात "नॉर्मल"आयुष्य जगता न आल्यामुळे त्यांना त्यांचं स्वतःच असं व्यक्तिमत्व घडवायला थोडा वेळ लागला असेल कदाचित. पण काळ हे सर्वोत्तम औषध आहे असं म्हणतात. जसं त्या घटनां पासुन आपण लांब जात आहोत तसं माझी मुलं त्यातुन सावरत आहेत असं मला वाटतं.
प्रश्न: शेवटचे दोनएक प्रश्न विचारण्या आधी मला तुमचं अभिनंदन करावसं वाटतं कि गांधी -नेहरू घराण्याची सून असण्याचं ओझं तुम्ही एक परदेशी स्त्री असुनही खूप समर्थपणे निभावलंत. तुमच्या धाकट्या जाऊबाईंना भारतीय असुनही ते नीटसं जमलेलं दिसत नाही. त्यांच्यावर टीका करण्याचा माझा हेतु नाही. हे फक्त एक निरीक्षण आहे.
काही वर्षांपूर्वी असं वाचलं होतं कि त्यांनी मुक्या प्राण्यांच संरक्षण करण्याच्या कामाला स्वतःला वाहुन घेतलं आहे. ते निश्चितच चांगलं काम आहे. पण मध्यंतरी कुठेतरी असं ऐकल कि दिल्लीत बेवारशी कुत्र्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्याचा त्रास आता रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनां होत आहे. इतका त्रास होतोय कि महिला रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायला घाबरू लागल्या आहेत.
मी काही तुम्हांला असं म्हणंत नाही कि तुमच्या जाऊबाईंमुळे तो त्रास वाढला. सहज आपलं तुमच्या कानावर घालून ठेवलं.
खरंच तुमचं अभिनंदन कि तुम्ही एक आदर्श सून, पत्नी आणि आई होऊ शकलात.
सो. गांधी : धन्यवाद.
प्रश्न: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला जे प्रश्न विचारावेसे वाटत होते ते विचारण्याची संधी दिल्या बद्दल मी आपली खूप आभारी आहे. राजकारणा विषयी प्रश्न विचारायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण स्वतःहुन तुम्हांला काही सांगायचं आहे का? देशातील सध्याच्या राजकीय परिस्थिती बद्दल किंवा भारत जोडो यात्रे बद्दल?
सो. गांधी: नाही, मला त्यावर काही भाष्य करायचं नाही. जे काही चाललंय ते सगळं भारतातील जनतेच्या समोर आहे. जनतेने डोळे उघडे ठेऊन ते बघावं एवढंच मी म्हणेन.
प्रश्न: तुमचे स्वतः बद्दल काही प्लॅन आहेत का जे तुम्ही लोकांना सांगू शकाल. म्हणजे निवृत्त व्हावंसं वाटतं कि नाही वाटत? कुठे निवृत्त व्हायला आवडेल - इटली मध्ये, भारतात गोव्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीत मुलांच्या जवळ?
सो. गांधी: अजून ते काहीच मी ठरविलेलं नाही.
प्रश्न: मुलाखतीच्या शेवटी मी आपल्याला विनंती करते कि आपण आत्मचरित्र लिहावं. आज काळ खुप विचित्र झाला आहे. बरेच लोक त्यांच्या वागण्यात कुठलीही मूल्य पाळत नाहीत असं दिसुन येतं. त्यामुळे लहान मुलं अतिशय चुकीचे आदर्श बघत वाढत आहेत.
तुमच्या सारख्या पारंपारिक जीवन मूल्य जपलेल्या स्त्रीनं पुढील पिढ्यांना स्वतःचे अनुभव सांगण्याची गरज आहे. लिहाल का?
सो. गांधी: बधु.
तळटीप : काल्पनिक मुलाखत कल्पने पेक्षा जास्त लांबल्या मुळे काही प्रश्नोत्तरांचा समावेष या ठिकाणी होऊ शकला नाही.