Sunday, July 23, 2023

काय बाई सांगू



काय बाई सांगू 
कसं ग सांगू 
मलाच माझी वाटे लाज 
काहीतरी होऊन गेलंय आज 

आपली आपल्यालाच लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. जे राजकीय नेते आपल्या नशिबी आलेत त्याला आपणच जबाबदार आहोत असं वाटू लागलंय. राजकारणाच्या घसरलेल्या दर्जाचं समर्थन करण्यासाठी हे नेते आणि त्यांचे मित्र -पत्रकार वारंवार एका वाक्याची मदत घेतात आणि आपण त्यांना ते करू देतो.    

ते वाक्य म्हणजे, "Everything is fair in love, war and politics". प्रेम, युद्ध आणि राजकारण ह्यात म्हणे सगळं माफ असतं. 

कोणीच त्यांना कधी विचारलं नाही कि खरंच सगळं माफ असतं का? तुम्हांला हे कोणी सांगितलं?  

वरील वाक्य आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी इतक्या वेळा ऐकवलं आहे कि केवळ पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे लोक त्यावर विश्वास ठेऊ लागलेत. हे वाक्य कुठुन आलं, कुठल्या संदर्भात कोणी ते पहिल्यांदा म्हंटलं हे पडताळुन पहाण्याची गरज कोणालाच वाटत नाही. ते वाक्य ऐकणाऱ्यांना त्याची शहानिशा करावीशी वाटत नाही आणि ते सर्वसामान्य लोकांच्या तोंडावर फेकणाऱ्या तथाकथित "नि:पक्षपाती" वाक्-पंडितांना किंवा आपल्या बेताल वागण्याचं समर्थन करू पहाणाऱ्या राजकारणी लोकांनाही त्याची गरज भासत नाही.  

फार लांब जाण्याची गरज नाही. ग्रंथालयात बसुन गहन संशोधनही करायला नको. आपल्या हातातल्या फोनवर थोडंसं शोधलं तर दिसेल की मुळ वाक्य "एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर " एवढंच आहे. त्यात "राजकारण" हा शब्द संधीसाधू राजकारणी लोकांनी आपल्या चुकीच्या वागण्याचं निर्लज्ज समर्थन करण्यासाठी घुसडलेला असावा. 

जॉन लीली या कवीच्या १५७९ साली प्रकाशित झालेल्या युफ्युईस - द ऍनाटमी ऑफ वीट्ट (Euphues - The Anatomy of Wit) या कादंबरीतील एका पात्राच्या तोंडचं हे वाक्य आहे. त्या कादंबरीत एका श्रीमंत, आकर्षक तरुणाच्या "रोमँटिक ऍडव्हेंचर्सचं" वर्णन आहे. कादंबरीत म्हंटलंय "the rules of fair play do not apply in love and war". 

देखणे श्रीमंत तरुण किती बिघडलेले - spoilt brats - असु शकतात याचं चित्रण आपण अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातुन बघितलेलं आहे आणि याची उदाहरणं खऱ्या आयुष्यातही पाहिली आहेत. वरील कादंबरीतील तरुण वाया गेलेला आहे कि नाही माहीत नाही पण स्वतःच्या अनिर्बंध वागण्याचं समर्थन करणारा बालिश आणि स्वार्थी मुलगा असु शकतो. अशा व्यक्तिरेखेच्या संदर्भातील वाक्य घेऊन ते सर्वसामान्य लोकांच्या तोंडावर फेकण्याचं काम महत्वाच्या पदावर बसणाऱ्या अनेक बेजबाबदार लोकांनी आजवर केलं आहे. 

हा आयता पाठिंबा मिळाल्या मुळेच कदाचित वर्षानुवर्षे अनेक प्रियकर आपल्या प्रेयसींवर अत्याचार करायला धजावले आहेत:
"माझं तिच्यावर प्रेम आहे पण तिनं मला झिडकारलं म्हणून मी तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं". 
"माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तिच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे केले". 
"माझं तिच्यावर प्रेम आहे पण ती मला सोडून गेली म्हणून ती ज्या पार्लर मध्ये काम करते त्या पार्लरला मी आग लावली. त्यात ती जळुन मेली यात माझा काय दोष." 
हे सगळं प्रेमात माफ असतं? 

आजच्या काळात युद्धातही सगळं माफ नसतं. युद्धाचेही आंतरराष्ट्रीय नियम आहेत ते पाळावे लगतात. त्या विरुद्ध वागलं तर त्याची गणना वॉर क्राईम्स मध्ये होते. 

राजकारणी लोक जेंव्हा युद्ध आणि राजकारणाला एका ओळीत बसवतात तेंव्हा ते स्वतःला आणि जनतेला फसवु पहात असतात कि ते सत्ता आणि त्यापासुन मिळणाऱ्या फायद्यांना हपापले भ्रष्ट राजकारणी नाहीत तर समाज रक्षणार्थ लढणारे वीर योद्धे आहेत. लोकांच्या आणि स्वतःच्या नजरेत रसातळाला गेलेली स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा तो केविलवाणा प्रयत्न असतो आणि देशासाठी प्राणपणाला लावून लढणाऱ्या आणि प्रसंगी धारातीर्थी पडणाऱ्या खऱ्या  योद्धयांचा धडधडीत अपमान.    

राजकारण म्हणजे युद्ध नाही. तो रणसंग्राम नक्कीच नाही. युद्धात प्राणहानी आणि विध्वंस गृहीत धरला जातो. राजकारणात तसं गृहीत धरण्याची काही गरज नसते. समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी, त्या शांततेच्या वातावरणात लोकांचा सर्वागीण विकास आणि प्रगती व्हावी, त्यांचं रहाणीमान सहज सोप्प व्हावं आणि हे घडवून आणण्यासाठी योग्य ते लोक निवडता यावेत याची प्रक्रिया म्हणजे राजकारण. सत्तापिपासू संधीसाधू लोक त्या प्रक्रियेचं रस्सीखेचेत रूपांतर करतात आणि तो एक खेळ असल्या प्रमाणे प्रेक्षक बघत बसतात.  

सगळ्या बघ्यांनी खरतर एक प्रश्न विचारायला हवा जो कोणी विचारत नाही -  कि खेळ रस्सीखेचेचा असला तरी त्याचे काही नियम आहेत का? दुसऱ्या बाजूच्या लोकांना आपल्याकडे खेचुन घेणं हा या खेळाचा उद्देश असला तरी कुठ्ल्याही अवैध मार्गानी ते केलं तर चालतं का?  म्हणजेच Do ends justify the means? 

'१९च्या निवडणुकीत आमची फसवणूक करण्यात आली त्याचा बदला घेणं हा आमचा राजकीय हक्क आहे हे वाक्य जर लोकांना ऐकवण्यात येत असेल तर तो बदला कुठल्या मार्गानी घेतला जावा याचे काही नियम आहेत की नाही हे लोकांनी विचारायला हवं.  

'१९ च्या निवडणुकीची फार मोठी गम्मत होऊन बसली आहे. जसं एखादं पुस्तक किंवा कविता एकदा वाचून समजली नाही तर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वाचताना तिचा अर्थ आपल्या समोर उलगडत जातो. तीच गोष्ट चित्रपटालाही लागू होते. एखादा चित्रपट पहिल्यांदा बघताना नीटसा समजला नसेल तर दुसऱ्यांदा बघितल्यावर कथानकाचा आधी न समजलेला भाग जास्त स्पष्ट होतो. 

'१९ च्या निवडणुकीचही तेच झालंय. त्या निवडणुकीची जितक्या वेळा उजळणी होतेय तितक्या वेळा तिचे विविध पैलू- जे तेंव्हा लक्षात आले नव्हते ते नव्याने दिसु लागलेत. त्यामुळे अर्थातच काही प्रश्न उभे रहातात. त्या निवडणुकीचं नाट्य संपल्या नंतर जनतेला अंधारात ठेऊन आपले निर्णय त्यांच्यावर लादण्याच काम सलग तीन वेळा कुठल्या राजकीय पक्षानी केलं? वागणुकीचा हा पॅटर्न कुठल्या पक्षात दिसुन येतो?

मग तो अवेळी झालेला शपथ विधी असो; रात्रीच्या अंधारात आमदारांना पळवून नेऊन त्यांना दुसऱ्या राज्यात लपवून ठेवणं असो; किंवा अगदी कालपरवा झालेली त्रिशंकु सरकारची सुरवात असो.  

अरे बापरे, "त्रिशंकु सरकार"? हा शब्द प्रयोग कुठुन आला? कोणी तो शब्द कुठल्या सरकारच्या बाबतीत पहिल्यांदा वापरला? मी नाही बाबा त्याची सुरवात केली. आपल्याला नाही माहीत कोणी तो पहिल्यांदा वापरला. यु ट्यूबवर शोधलं तर सापडेल कदाचित. पण कशाला उगीच आपला बहुमुल्य वेळ त्यात वाया घालवा. 

कारण, मुद्दा तो नाही. "त्रिशंकु सरकार" हा शब्द कोणी कुठल्या सरकारच्या बाबतीत पहिल्यांदा वापरला हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे कि लपूनछपून सरकार बदलाचे कट रचायचे, त्याबद्दल सर्वसामान्य जनतेला सर्वतोपरीने अंधारात ठेऊन आपले निर्णय त्यांच्यावर लादायचे हा पॅटर्न कुठल्या पक्षाच्या वागण्यात दिसुन येतो. ज्यांनी ते '१९ च्या निवडणुकी नंतर लागोपाठ तीन वेळा केलं त्त्याच पक्षानी ते त्या निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा केलं असेल अशी दाट शक्यता नाही का वाटत? 

राज्यातील जनतेला धक्का देण्याचं राजकारण करण्याची सवय जडलेल्या नेत्यांकडुन परिपक्वतेची अपेक्षा करणं मूर्खपणा ठरेल. परंतु या नेत्यांच्या अपरिपक्वतेमुळे, ते आणि त्यांच्या समर्थकांपासुन राज्याला काही धोका पोहचू शकतो का हे बघणंही खूप आवश्यक आहे. राज्यातील एकता - एकात्मतेत त्यांच्यामुळे बाधा येऊ शकते का यावर लक्ष ठेवायला हवं. राज्यात धार्मिक तेढ सोडून द्या, जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि लोकशाही सुधृढ रहावी म्हणून हे करणं गरजेचं आहे. 

राजकीय नेते काय बोलतात ते ऐकलं तर असं दिसतं कि क्रिकेट हा देशात सर्वात लोकप्रिय खेळ असल्यामुळे राजकारणाची रस्सीखेच खेळताना ते क्रिकेटची शब्दावली त्यामध्ये घुसवतात. "मी गुगली टाकला", "तो क्लीन बोल्ड झाला" अशी वाक्य मग लोकांना ऐकायला मिळतात. तिसऱ्याला वाटतं आपण एखादा शब्द घुसडला नाही तर क्रिकेटच्या बाबतीत आपण अडाणी आहोत असं वाटेल. म्हणून तो उगीचच म्हणतो "यॉर्कर". पोरकटपणा, पोरखेळ, पोरसवजा असे पोर ने सुरु होणारे शब्द न वापरता या वागण्याचं वर्णन करणं अशक्य आहे. त्यांच्या खेळात राज्याचा खेळखंडोबा होतो याबद्दल त्यांना ना खंत वाटते ना खेद. 

"पॉलिटिक्स ऑफ शॉक" चा वारंवार वापर करू पहाणाऱ्या नेत्यांना लगाम घालणं हे राज्यात रहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. खास करून महिलांचं. नव्याने सुरु झालेल्या त्रिशंकु सरकार मध्ये ज्या आठ मंत्र्यांची वर्णी लावण्यात आली आहे त्यात एक पेक्षा जास्त महिलेचा समावेश नाही या बद्दल महिलांनी तक्रार केली नाही तर दुसरं कोण करेल. 

परंतु त्यासाठी "राजकारण हा आपला प्रांत नाही" हे जुने संस्कार विसरावे लागतील. जे काय चाललंय ते नीट समजुन घ्यावं लागेल. पुरुष मंडळी आपसात खेळत असलेल्या रस्सीखेचे वर रोखुन नजर ठेवावी लागेलं. 

जरी लाजरी झाले धीट 
बघत राहिले त्यांना नीट 
कुळवंताची पोर जरी मी 
विसरून गेले रितरीवाज 

कारण काहीतरी होऊन गेलंय आज.