Sunday, July 23, 2023

काय बाई सांगू



काय बाई सांगू 
कसं ग सांगू 
मलाच माझी वाटे लाज 
काहीतरी होऊन गेलंय आज 

आपली आपल्यालाच लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. जे राजकीय नेते आपल्या नशिबी आलेत त्याला आपणच जबाबदार आहोत असं वाटू लागलंय. राजकारणाच्या घसरलेल्या दर्जाचं समर्थन करण्यासाठी हे नेते आणि त्यांचे मित्र -पत्रकार वारंवार एका वाक्याची मदत घेतात आणि आपण त्यांना ते करू देतो.    

ते वाक्य म्हणजे, "Everything is fair in love, war and politics". प्रेम, युद्ध आणि राजकारण ह्यात म्हणे सगळं माफ असतं. 

कोणीच त्यांना कधी विचारलं नाही कि खरंच सगळं माफ असतं का? तुम्हांला हे कोणी सांगितलं?  

वरील वाक्य आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी इतक्या वेळा ऐकवलं आहे कि केवळ पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे लोक त्यावर विश्वास ठेऊ लागलेत. हे वाक्य कुठुन आलं, कुठल्या संदर्भात कोणी ते पहिल्यांदा म्हंटलं हे पडताळुन पहाण्याची गरज कोणालाच वाटत नाही. ते वाक्य ऐकणाऱ्यांना त्याची शहानिशा करावीशी वाटत नाही आणि ते सर्वसामान्य लोकांच्या तोंडावर फेकणाऱ्या तथाकथित "नि:पक्षपाती" वाक्-पंडितांना किंवा आपल्या बेताल वागण्याचं समर्थन करू पहाणाऱ्या राजकारणी लोकांनाही त्याची गरज भासत नाही.  

फार लांब जाण्याची गरज नाही. ग्रंथालयात बसुन गहन संशोधनही करायला नको. आपल्या हातातल्या फोनवर थोडंसं शोधलं तर दिसेल की मुळ वाक्य "एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर " एवढंच आहे. त्यात "राजकारण" हा शब्द संधीसाधू राजकारणी लोकांनी आपल्या चुकीच्या वागण्याचं निर्लज्ज समर्थन करण्यासाठी घुसडलेला असावा. 

जॉन लीली या कवीच्या १५७९ साली प्रकाशित झालेल्या युफ्युईस - द ऍनाटमी ऑफ वीट्ट (Euphues - The Anatomy of Wit) या कादंबरीतील एका पात्राच्या तोंडचं हे वाक्य आहे. त्या कादंबरीत एका श्रीमंत, आकर्षक तरुणाच्या "रोमँटिक ऍडव्हेंचर्सचं" वर्णन आहे. कादंबरीत म्हंटलंय "the rules of fair play do not apply in love and war". 

देखणे श्रीमंत तरुण किती बिघडलेले - spoilt brats - असु शकतात याचं चित्रण आपण अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातुन बघितलेलं आहे आणि याची उदाहरणं खऱ्या आयुष्यातही पाहिली आहेत. वरील कादंबरीतील तरुण वाया गेलेला आहे कि नाही माहीत नाही पण स्वतःच्या अनिर्बंध वागण्याचं समर्थन करणारा बालिश आणि स्वार्थी मुलगा असु शकतो. अशा व्यक्तिरेखेच्या संदर्भातील वाक्य घेऊन ते सर्वसामान्य लोकांच्या तोंडावर फेकण्याचं काम महत्वाच्या पदावर बसणाऱ्या अनेक बेजबाबदार लोकांनी आजवर केलं आहे. 

हा आयता पाठिंबा मिळाल्या मुळेच कदाचित वर्षानुवर्षे अनेक प्रियकर आपल्या प्रेयसींवर अत्याचार करायला धजावले आहेत:
"माझं तिच्यावर प्रेम आहे पण तिनं मला झिडकारलं म्हणून मी तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं". 
"माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी तिच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे केले". 
"माझं तिच्यावर प्रेम आहे पण ती मला सोडून गेली म्हणून ती ज्या पार्लर मध्ये काम करते त्या पार्लरला मी आग लावली. त्यात ती जळुन मेली यात माझा काय दोष." 
हे सगळं प्रेमात माफ असतं? 

आजच्या काळात युद्धातही सगळं माफ नसतं. युद्धाचेही आंतरराष्ट्रीय नियम आहेत ते पाळावे लगतात. त्या विरुद्ध वागलं तर त्याची गणना वॉर क्राईम्स मध्ये होते. 

राजकारणी लोक जेंव्हा युद्ध आणि राजकारणाला एका ओळीत बसवतात तेंव्हा ते स्वतःला आणि जनतेला फसवु पहात असतात कि ते सत्ता आणि त्यापासुन मिळणाऱ्या फायद्यांना हपापले भ्रष्ट राजकारणी नाहीत तर समाज रक्षणार्थ लढणारे वीर योद्धे आहेत. लोकांच्या आणि स्वतःच्या नजरेत रसातळाला गेलेली स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा तो केविलवाणा प्रयत्न असतो आणि देशासाठी प्राणपणाला लावून लढणाऱ्या आणि प्रसंगी धारातीर्थी पडणाऱ्या खऱ्या  योद्धयांचा धडधडीत अपमान.    

राजकारण म्हणजे युद्ध नाही. तो रणसंग्राम नक्कीच नाही. युद्धात प्राणहानी आणि विध्वंस गृहीत धरला जातो. राजकारणात तसं गृहीत धरण्याची काही गरज नसते. समाजात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी, त्या शांततेच्या वातावरणात लोकांचा सर्वागीण विकास आणि प्रगती व्हावी, त्यांचं रहाणीमान सहज सोप्प व्हावं आणि हे घडवून आणण्यासाठी योग्य ते लोक निवडता यावेत याची प्रक्रिया म्हणजे राजकारण. सत्तापिपासू संधीसाधू लोक त्या प्रक्रियेचं रस्सीखेचेत रूपांतर करतात आणि तो एक खेळ असल्या प्रमाणे प्रेक्षक बघत बसतात.  

सगळ्या बघ्यांनी खरतर एक प्रश्न विचारायला हवा जो कोणी विचारत नाही -  कि खेळ रस्सीखेचेचा असला तरी त्याचे काही नियम आहेत का? दुसऱ्या बाजूच्या लोकांना आपल्याकडे खेचुन घेणं हा या खेळाचा उद्देश असला तरी कुठ्ल्याही अवैध मार्गानी ते केलं तर चालतं का?  म्हणजेच Do ends justify the means? 

'१९च्या निवडणुकीत आमची फसवणूक करण्यात आली त्याचा बदला घेणं हा आमचा राजकीय हक्क आहे हे वाक्य जर लोकांना ऐकवण्यात येत असेल तर तो बदला कुठल्या मार्गानी घेतला जावा याचे काही नियम आहेत की नाही हे लोकांनी विचारायला हवं.  

'१९ च्या निवडणुकीची फार मोठी गम्मत होऊन बसली आहे. जसं एखादं पुस्तक किंवा कविता एकदा वाचून समजली नाही तर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वाचताना तिचा अर्थ आपल्या समोर उलगडत जातो. तीच गोष्ट चित्रपटालाही लागू होते. एखादा चित्रपट पहिल्यांदा बघताना नीटसा समजला नसेल तर दुसऱ्यांदा बघितल्यावर कथानकाचा आधी न समजलेला भाग जास्त स्पष्ट होतो. 

'१९ च्या निवडणुकीचही तेच झालंय. त्या निवडणुकीची जितक्या वेळा उजळणी होतेय तितक्या वेळा तिचे विविध पैलू- जे तेंव्हा लक्षात आले नव्हते ते नव्याने दिसु लागलेत. त्यामुळे अर्थातच काही प्रश्न उभे रहातात. त्या निवडणुकीचं नाट्य संपल्या नंतर जनतेला अंधारात ठेऊन आपले निर्णय त्यांच्यावर लादण्याच काम सलग तीन वेळा कुठल्या राजकीय पक्षानी केलं? वागणुकीचा हा पॅटर्न कुठल्या पक्षात दिसुन येतो?

मग तो अवेळी झालेला शपथ विधी असो; रात्रीच्या अंधारात आमदारांना पळवून नेऊन त्यांना दुसऱ्या राज्यात लपवून ठेवणं असो; किंवा अगदी कालपरवा झालेली त्रिशंकु सरकारची सुरवात असो.  

अरे बापरे, "त्रिशंकु सरकार"? हा शब्द प्रयोग कुठुन आला? कोणी तो शब्द कुठल्या सरकारच्या बाबतीत पहिल्यांदा वापरला? मी नाही बाबा त्याची सुरवात केली. आपल्याला नाही माहीत कोणी तो पहिल्यांदा वापरला. यु ट्यूबवर शोधलं तर सापडेल कदाचित. पण कशाला उगीच आपला बहुमुल्य वेळ त्यात वाया घालवा. 

कारण, मुद्दा तो नाही. "त्रिशंकु सरकार" हा शब्द कोणी कुठल्या सरकारच्या बाबतीत पहिल्यांदा वापरला हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे कि लपूनछपून सरकार बदलाचे कट रचायचे, त्याबद्दल सर्वसामान्य जनतेला सर्वतोपरीने अंधारात ठेऊन आपले निर्णय त्यांच्यावर लादायचे हा पॅटर्न कुठल्या पक्षाच्या वागण्यात दिसुन येतो. ज्यांनी ते '१९ च्या निवडणुकी नंतर लागोपाठ तीन वेळा केलं त्त्याच पक्षानी ते त्या निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा केलं असेल अशी दाट शक्यता नाही का वाटत? 

राज्यातील जनतेला धक्का देण्याचं राजकारण करण्याची सवय जडलेल्या नेत्यांकडुन परिपक्वतेची अपेक्षा करणं मूर्खपणा ठरेल. परंतु या नेत्यांच्या अपरिपक्वतेमुळे, ते आणि त्यांच्या समर्थकांपासुन राज्याला काही धोका पोहचू शकतो का हे बघणंही खूप आवश्यक आहे. राज्यातील एकता - एकात्मतेत त्यांच्यामुळे बाधा येऊ शकते का यावर लक्ष ठेवायला हवं. राज्यात धार्मिक तेढ सोडून द्या, जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि लोकशाही सुधृढ रहावी म्हणून हे करणं गरजेचं आहे. 

राजकीय नेते काय बोलतात ते ऐकलं तर असं दिसतं कि क्रिकेट हा देशात सर्वात लोकप्रिय खेळ असल्यामुळे राजकारणाची रस्सीखेच खेळताना ते क्रिकेटची शब्दावली त्यामध्ये घुसवतात. "मी गुगली टाकला", "तो क्लीन बोल्ड झाला" अशी वाक्य मग लोकांना ऐकायला मिळतात. तिसऱ्याला वाटतं आपण एखादा शब्द घुसडला नाही तर क्रिकेटच्या बाबतीत आपण अडाणी आहोत असं वाटेल. म्हणून तो उगीचच म्हणतो "यॉर्कर". पोरकटपणा, पोरखेळ, पोरसवजा असे पोर ने सुरु होणारे शब्द न वापरता या वागण्याचं वर्णन करणं अशक्य आहे. त्यांच्या खेळात राज्याचा खेळखंडोबा होतो याबद्दल त्यांना ना खंत वाटते ना खेद. 

"पॉलिटिक्स ऑफ शॉक" चा वारंवार वापर करू पहाणाऱ्या नेत्यांना लगाम घालणं हे राज्यात रहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. खास करून महिलांचं. नव्याने सुरु झालेल्या त्रिशंकु सरकार मध्ये ज्या आठ मंत्र्यांची वर्णी लावण्यात आली आहे त्यात एक पेक्षा जास्त महिलेचा समावेश नाही या बद्दल महिलांनी तक्रार केली नाही तर दुसरं कोण करेल. 

परंतु त्यासाठी "राजकारण हा आपला प्रांत नाही" हे जुने संस्कार विसरावे लागतील. जे काय चाललंय ते नीट समजुन घ्यावं लागेल. पुरुष मंडळी आपसात खेळत असलेल्या रस्सीखेचे वर रोखुन नजर ठेवावी लागेलं. 

जरी लाजरी झाले धीट 
बघत राहिले त्यांना नीट 
कुळवंताची पोर जरी मी 
विसरून गेले रितरीवाज 

कारण काहीतरी होऊन गेलंय आज. 


 





Wednesday, March 8, 2023

काल्पनिक मुलाखत


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका खास व्यक्तीची मुलाखत घ्यावी अशी खूप इच्छा होती. अशी व्यक्ती जी अनेक पुरस्कारांची मानकरी होण्याच्या योग्यतेची आहे -  आदर्श सून, आदर्श पत्नी आणि आदर्श आई आहे. तसेच देशातील पहिल्या दोनतीन राजकीय नेत्यांमध्ये त्या व्यक्तीला स्थान आहे. 

त्यांच्या आयुष्याबद्दल खूप कुतुहुल होतं. एक मुळ महत्वाचा प्रश्न होता ज्याचं उत्तर दुसरं कोणी देऊ शकणार नाही असं वाटलं. 

तो प्रश्न काल्पनिक मुलाखतीत विचारण्याची संधी मिळाली:  

ज्ञानी लोक असं म्हणतात कि आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यावर आपलं नियंत्रण फार कमी असतं. हे विधान जितकं तुमच्या बाबतीत खरं ठरलं आहे तितकं क्वचितच दुसऱ्या कोणाच्या बाबतीत खरं ठरंत असेल.  

तुम्ही सुखी संसारात स्थिरावलेल्या असताना एक दिवस तुमच्या सासुबाईंची अतिरेक्यांनी निर्घृण हत्या केली. त्या नंतर काही वर्षांनी तुमच्या पतींची हत्या झाली. या दोन्ही हत्या दोन वेगवेगळ्या देशातील विघटन वादी चळवळी मुळे झाल्या. इंदिराजींची हत्या त्यांनी खालिस्तान चळवळ संपुष्टात आणण्यासाठी जी कारवाई केली त्यामुळे झाली तर राजीव गांधींची हत्या श्रीलंकेतील तामिळ सेपरेटिस्ट चळवळी मुळे झाली.   

या दोन चळवळींचा तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम होण्याचं खरतर काही कारण नव्हतं. कुठले कोण हे दोन आशियायी देश. तुम्ही युरोपियन. तुम्हाला राजकारणाची पार्श्वभूमी नाही. राजीव गांधीं बरोबर लग्न करून तुम्ही भारतात आलात. त्यावेळी भविष्य काळात कधीतरी इथल्या राजकारणात भाग घ्यावा ही तुमची महत्वाकांक्षा असण शक्य नव्हतं. 

पण या दोन हत्त्यांमुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली आणि गेली जवळपास तीस वर्ष तुम्हांला भारताच्या राजकारणात सक्रीय भाग घ्यावा लागला. आपण या सगळ्याकडे कसं बघता?  

                                                                                          

                                                                                               ******


खूप मिनतवारी केल्यावर शेवटी सोनिया गांधी मुलाखत द्यायला तयार झाल्या. 

मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरली. माझ्या समोर यक्ष प्रश्न उभा राहीला कि मुलाखत घेताना कुठले कपडे घालावेत. काही राजकीय नेत्यांच्या जुन्या मुलाखती मी बघितल्या. या उद्देशाने कि मुलाखत घेणाऱ्यांनी काय घातलं होतं ते बघुन मलाही काय घालावं ते सुचेल.  

श्रीमती गांधी मुळच्या इटालियन असल्या कारणाने मला वाटलं जर मी एखाद्या इटालियन डिझायनरचे कपडे घातले तर त्यांना ते आवडेल आणि त्या मनमोकळी मुलाखत देतील. म्हणून मी गुची-व्हरसाची-डॉलचे & गब्बाना वगैरे सुप्रसिद्ध डिझायनर्सचे वेबसाईट धुंडाळले. न्यूयॉर्क मधल्या त्यांच्या दुकानातही जाऊन आले. पण मनासारखं काही मिळेना. काही ठिकाणी हव्या त्या रंगाचे कपडे होते पण साईझ नव्हता. काही ठिकाणी हवा तो रंग होता, साईझही होता पण किंमत इतकी अव्वाच्या सव्वा होती कि काल्पनिक मुलाखती साठी एवढे महाग कपडे घेणं मनाला पटेना. 

शेवटी ठरवलं कि मुंबईत जे मिळेल ते घ्यावं. त्या दृष्टीने तिकीट काढलं आणि सामान बांधायला सुरवात केली. आणि अहो आश्चर्यम्! हँगर वरचे कपडे मागेपुढे करताना इतर कपड्यांच्या गर्दीत लपलेली माझी एक जुनी गुलाबी पँट सापडली. ती माझ्याकडे होती हे मी साफ विसरून गेले होते. उगीच सगळ्या डिझायनर्सची दुकानं फिरण्यात वेळ घालवला. 

पँटची सोय झाली. पांढरा शर्ट मुलाच्या कपाटात सापडला. त्याचा शर्ट बॅगेत भरण्या आधी त्याला विचारायला हवं की काय असा विचार मनाला चाटुन गेला. पण तो विचार मी मनातच वीरू दिला.  

ठरल्या दिवशी मुंबईत घरी पोहोचले. मुलाखतीचा दिवस जवळ येऊ लागला तशी थोडी धाकधूक वाटू लागली. न जाणो कुठुन तरी मुलाला समजलं मी त्याचा शर्ट वापरला तर तो वैतागेल. त्यापेक्षा आधीच त्याला कळवलेलं बरं असं वाटलं. त्याला मेसेज टाकला: "सगळ्या डिझायनर्सच्या दुकानात शोधलं. कुठेच मनासारखं काही मिळालं नाही म्हणून तुझा शर्ट घ्यावा लागला" असं त्याला सांगितलं. 

त्यावर त्याचं उत्तर आलं, "आये, कपड्यांची कसली काळजी करतेस. आधी प्रश्नावली तयार कर." 

मनात विखुरलेले प्रश्न नीट एकत्र जमवायला हवेत हे तेंव्हा कुठे माझ्या लक्षात आलं. मी लगेच त्या कामाला लागले. पुन्हा एकदा जुन्या मुलाखतींकडे धाव घेतली. मुलाखत घेणाऱ्यांनी काय प्रश्न विचारले होते ते बघितलं. सर्वसामान्य लोकांना सोनिया गांधींकडून काय जाणून घ्यायला आवडेल हे - कामवाली बाई कामाला आली तेंव्हा तिला विचारलं, कुरियर बरोबर बिल्डिंगचा वॉचमन वर आला तेंव्हा त्या दोघांना विचारलं. शेजारणीला, बहिणीला आणि एकदोन मैत्रिणींनाही विचारून घेतलं. बरेच प्रश्न जमा झाले. 

शेवटी मुलाला विचारलं कि त्याला सोनिया गांधीं कडून काय जाणून घ्यायला आवडेल. 

तो म्हणाला, "विचार करून सांगतो. तू दिल्लीला कधी जाणार आहेस?"

मी म्हंटल, " मी कशाला दिल्लीला जाऊ. काल्पनिक मुलाखत झूम वर आहे". 

तो म्हणाला, " मग एवढा तिकिटाचा खर्च करून मुंबईला कशाला गेलीस? काल्पनिक झूम न्यूयॉर्क मधुन नसतं करता आलं? 

... असो...होतो असा गोंधळ कधीकधी. 

मुलाखत खूप छान झाली. मी माझे प्रश्न खूप छोटे ठेवले आणि त्यांना जास्त बोलू दिलं. त्यांनीही सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. जवळपास त्यांचा बहुमुल्य दीड ते पावणे दोन तास वेळ त्यांनी मला दिला. मी मनात असं ठरवलं होतं कि मुलाखतीच्या दरम्यान त्यांच्या नावाचा उल्लेख भारतीय पद्धतीनं सोनियाजी असा न करता इटालियन पद्धतीनं सॉन्याजी किंवा सॉन्याताई असा करायचा. पण तशी वेळ आली नाही. 

नमस्कार- चमत्काराचे सोपस्कार झाल्यावर मी सरळ प्रश्नांनाच हात घातला. 

इटालियन भाषे बरोबर माझी तोंडओळख आहे हे दाखवत म्हंटलं:  सिन्योरा, तुम्हांला आंबे खायला आवडतात का? भारतात येण्या आधी तुम्ही कधी आंबे खाल्ले होते का?   

सो. गांधी (हसून): भारतात येण्या आधी मी कधीच आंबा खाल्ला नव्हता किंवा पाहीलाही नव्हता. आंबा हे एक फळ असतं हे मला थोडंसं ऐकुन माहीत होतं. भारतात आल्यावर मी पहिल्यांदा आंबा बघितला आणि खाल्ला. आणि आता सिझन मध्ये नक्की खाते. 

प्रश्न: तुम्हांला आंबे कसे खायला आवडतात? महाराष्ट्रात आम्ही जास्त करून आमरस करून खातो किंवा फोडी चोखुन खातो. तुम्ही कसे खाता? 

सो. गांधी: आंब्याची साल काढून, त्याच्या लहान फोडी करून, त्यावर थंडगार फ्रेश क्रीम घालून ते काचेच्या नाजूक पात्रातुन खायला मला आवडतं. पण आजकाल आपण सगळे वजनाची फार काळजी करत असतो. त्यामुळे मी नेहमीच वरून क्रीम घालते असं नाही.  

प्रश्न: सिन्योरा, माझ्या घरी काम करणारी बाई कोकणी आहे. तिनं असं विचारलंय कि तुम्हांला कुठले आंबे आवडतात? 

सो. गांधी उत्तर द्यायला सुरवात करणार तेवढ्यात त्यांना थांबवत मी म्हंटलं: मला वाटतं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत तर बरं होईल. याचं कारण सांगते तुम्हांला - तुम्ही जर एखाद्या अमराठी म्हणजे नॉन -महाराष्ट्रीयन आंब्याचं नाव घेतलंत तर महाराष्ट्रात तुमच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागणार हे निश्चित. बऱ्याच मराठी लोकांना मनापासून असं वाटतं कि देवगड आणि रत्नागिरी हापूस सोडले तर दुसऱ्या कुठल्याही आंब्यांना बाजारात येण्याचा काही अधिकार नाही. पायरी आणि रायवळ त्यांच्या इथलेच आहेत म्हणून ते चालवून घेतात. नाहीतर पायरीला त्यांनी दारात उभं केलं नसतं. 

सो. गांधी (गालातल्या गालात हसुन) म्हणाल्या: अच्छा, अशी भानगड आहे का? मग उगीच त्या वादात पडायला नको.  

प्रश्न: आंबा पुराण मी इथे संपवते पण राजकारण हा आपल्या मुलाखतीचा मुख्य विषय नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल. एक स्त्री म्हणून तुमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्याबद्दल जाणुन घ्यायला मला आवडेल. 

आज आंतरराष्ट्रीय विवाह खूप मोठ्या प्रमाणात होतात. लग्न करून मुली नवऱ्या बरोबर कुठल्याही देशात रहायला जातात. पण जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरी तंत्रज्ञाना द्वारे त्या सतत दर मिनिटाला त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकतात. 

पन्नासएक वर्षांपूर्वी आपण युरोपातुन भारतात आलात तेंव्हा भारत खऱ्या अर्थाने एक थर्ड वर्ल्ड -अविकसित देश होता. गरीब होता. जरी आपला वावर इथल्या उच्च वर्गात मर्यादित असला तरी इटलीतील तुमच्या कुटुंबाशी संपर्कात रहाणं आजच्या इतकं तेंव्हा सोप्प नव्हतं. शिवाय भारतीय संस्कृती इटालियन संस्कृती पेक्षा खुप वेगळी आहे. इटलीतुन भारतात रहायला येणं तुम्हांला कठीण गेलं का? 

सो. गांधी: ते सोप्प नव्हतं. पण माझ्या पतींची साथ होती. सासुबाईंचा आधार होता. ते दिवस खुप सुंदर होते.  

प्रश्न: राजीव गांधीं बरोबर लग्न करताना तुमचं पुढील आयुष्य कसं असेल असं तुम्हांला वाटलं होतं? भारताच्या राजकाणात एवढी महत्वाची भूमिका तुम्हांला करावी लागेल असं तेंव्हा तुमच्या स्वप्नात तरी आलं होतं का? 

सो. गांधी: नक्कीच नाही. लग्न झालं तेंव्हा माझे पती पायलट होते. ते राजकारणात सक्रिय नव्हते. सासुबाई देशाच्या पंतप्रधान होत्या. आम्ही त्यांच्या बरोबर रहात होतो. पण राजकारणाशी माझा कधी प्रत्यक्ष संबंध येईल असं तेंव्हा वाटलं नव्हतं. नेहरू कुटुंबाचा भारताच्या इतिहासात किती मोठा सहभाग राहिलेला आहे हे मी इथे आल्यावर हळुहळु उलगडत गेलं. 

प्रश्न: आपण आपल्या सासुबाईंच्या आधाराचा उल्लेख केलात. त्यांचा तुमच्यावर फार मोठ्ठा प्रभाव आहे हे दिसुन येतं. ज्या तऱ्हेनं तुम्ही साडी आणि इतर भारतीय पेहराव आपलेसे केले आहेत, ते तुम्ही त्यांच्याकडुन शिकला असावात असं वाटतं. 

तुमच्या वागण्या-बोलण्याचं वर्णन करायला मला "खानदानी" हाच शब्द योग्य वाटतो. तुमच्या वागण्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, अकांडतांडव नाही. तुम्ही स्वतःच्या भावनांवर काबू ठेऊन वागताच पण लोकांच्या भावना चिथावण्याचा उद्योग कधी करीत नाही. 

खरतर या दोन्ही हत्त्यांचं भांडवल करून तुम्ही देशातील जनतेच्या भावनांना कायम आवाहन करू शकला असता. पण तुम्ही ते ही कधी केलं नाही. तुमचे पती असताना आणि ते गेल्या नंतर तुमचं वागणं  नेहमी exemplary राहिलेलं आहे. सासुबाईंबद्दल काय सांगाल? 

सो. गांधी (क्षणभर विचार करून): इंदिराजीं बद्दल काय सांगू? त्यांनी एका युद्धात देशाचं नेतृत्व केलं आणि विजय मिळवला. देश एकसंध रहावा म्हणून खालिस्तान चळवळीचा खात्मा करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली - त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?

नक्कीच, सासुबाईं कडुन मी खुप काही शिकले. त्यांना मी खुप जवळून बघितलं. आजच्या सारखी उपदेश आणि सल्ला देणारी समाज माध्यमं तेंव्हा नव्हती. जे काही शिकायचं ते आपल्या जवळच्या व्यक्तींकडुन शिकावं लागायच. माझं फार मोठं सौभाग्य कि त्या मला रोल मॉडेल म्हणून लाभल्या आणि त्यांचा सहवास मला खुप मिळाला.

प्रश्न: या ठिकाणी कुतुहुल म्हणून विचारते, तुमच्या सासुबाईंना एक भारतीय सूनही होती म्हणजे आहे. पण त्यांच्यावर इंदिराजींचा प्रभाव एवढा दिसत नाही जेवढा तुमच्या वर दिसतो. याचं कारण काय असेल असं वाटतं?

सो. गांधी: नक्की सांगू शकणार नाही. पण जर अंदाजच बांधायचा झाला तर कदाचित असं म्हणता येईल कि माझी धाकटी जाऊ भारतातच लहानाची मोठी झाली. एक भारतीय म्हणून तिचं व्यक्तिमत्व लग्ना आधीच घडलेलं होतं. मला ते सासुबाईं कडुन शिकावं लागलं.  

दुसरं म्हणजे तिचं माहेर, नातेवाईक, मित्रमैत्रिणी इथं दिल्लीतच आहे. ती हवं तेंव्हा माहेरी जाऊ शकत होती. कितीही दिवस तिथे राहु शकत होती. ते ऑप्शन मला नव्हतं. त्यामुळे मला इंदिराजींचा सहवास जास्त लाभला असावा. 

प्रश्न: मुलाखतीच्या सोयीसाठी तुमच्या भारतातील आयुष्याची दोन भागात विभागणी केली तर चालेल का? १९८४ च्या आधीचा काळ आणि त्या नंतरचा काळ. कारण १९८४ नंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे पालटलं.   

सो गांधी: हो. चालेल. 

प्रश्न: १९८४ मध्ये तुमच्या सासुबाईंची हत्या झाली. १९९१ मध्ये तुमच्या पतींची हत्या झाली. तुमचे धाकटे दीर आधीच विमान अपघातात गेले होते. पती गेल्या नंतर तुमच्यावर एक वेळ अशी आली कि कुटुंबातील तुमचे सगळे जवळचे लोक गेले होते. 

तुम्ही अशा देशात एकट्या होता ज्या देशाला तुम्ही फारतर वीसएक वर्ष ओळखत होता. मुलं तशी लहान होती. राहुल एकवीस वर्षांचे होते. प्रियांका एकोणीस वर्षांची. तुम्ही पूर्ण परदेशी, तुमची मुलं अर्धी परदेशी. 

पती गेल्या नंतर सुरवातीच्या काही दिवसात काय मानसिक स्थिती होती? आपण खूप एकटे आहोत. आपल्या भोवती जे लोक आहेत त्यातल्या कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही अशी भीती कधी वाटली का? 

सो. गांधी: राजीवजी गेल्या नंतर सुरवातीचे दिवस नक्कीच खूप कठीण होते. त्यातुन मी कशी बाहेर पडले ते आत्ता सांगत बसले तर इतर प्रश्नांना वेळ उरणार नाही. 

पण खंबीरपणा मी माझ्या सासुबाईं कडुन शिकले होते. त्यांनी न डगमगता देशावरील संकटांना कसं तोंड दिल ते मी बघितलं होतं. खाजगी आयुष्यात आलेल्या संकटांचा सामना कसा करायचा याचं ट्रेनिंग मला त्यातुन मिळालं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. 

प्रश्न: मी कल्पनाही करू शकत नाही कि राजीव गांधी गेल्या नंतर तुम्हांला आणि तुमच्या मुलांना कुठल्या दिव्यातुन जावं लागलं असेल. 

वयाच्या अवघ्या पंचेचाळिसाव्या वर्षी तुम्ही आपला जीवनसाथी गमावला ज्याच्यासाठी तुम्ही त्याच्या देशात आला होता. इतकंच नाही तर अचानक तुम्ही भारतातील राजकारणाच्या भोवऱ्यात ओढले गेलात. 

आजही देशाच्या राजकारणात महिलांचा सहभाग कमी आहे. तीस वर्षांपूर्वी तो आजच्याहुन कमी होता. तुमच्या भोवती जास्त करून सगळे भारतीय पुरुष. एक परदेशी तरुण स्त्री म्हणून तुमच्या बद्दल त्यांचा दृष्टिकोन, इंदिराजींकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टीकोना पेक्षा वेगळा असणार. 

देशासाठी काम करताना तुमच्या सासुबाईंनी आणि पतींनी आपले प्राण गमावले. त्यानंतर तुम्हांला आणि तुमच्या मुलांना खूप कठीण काळातुन जावं लागलं. तुम्हांला असं वाटतं का कि त्याबद्द्दल देशातील जनतेकडुन तुम्हांला मिळायला हवी होती तितकी सहानभूती कधी मिळाली? का तुमचं परदेशी असणं त्याच्या आड आलं? 

सो. गांधी: या प्रश्नाचं उत्तर भारताच्या जनतेनं स्वतःला विचारायचं आहे. मी नाही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार. 

प्रश्न: आज काळ खुप बदलला आहे. ग्रेट ब्रिटनच्या पंतप्रधानपदी एक भारतीय वंशाची व्यक्ती आहे. कित्येक भारतीयांनी त्या घटने नंतर आपली छाती अभिमानाने फुगवली आहे. आज कोणी असं म्हणत नाही कि ब्रिटन मध्ये आता रामराज्य येणार. 

तुमच्या वेळी मात्र तुमचे पती गेल्यानंतर तुमच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली कि आता भारतात रोमराज्य येणार. ती टीका केवळ तुम्ही महिला असल्यामुळे झाली असं तुम्हांला वाटतं का? 

सो. गांधी: हो, ते ही कारण असु शकेल. 

प्रश्न: तुमच्या मुलांबद्दल विचारलं नाही तर ही मुलाखत अपूर्ण राहील म्हणून विचारते, आजच्या पिढीला कल्पना नसेल कि खालिस्तान चळवळ चालू होती तेंव्हा देशात किती असुरक्षिततेचं वातावरण होतं. देशाच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला तेंव्हा खूप मोठा धोका होता. लोकांच्या हत्या होत होत्या, जागोजागी बॉंब स्फोट आणि अतिरेकी हल्ले होत होते. तुम्हांला आणि तुमच्या मुलांना बाहेरच्या जगात मोकळेपणानी वावरता येत नव्हतं. सतत सुरक्षा कवचाच्या आत रहावं लागलं. तुमच्या मुलांचं बालपण या दोन विघटनवादी चळवळींनी हिरावुन घेतलं असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 

मी जेंव्हा तुमच्या मुलांबद्दल विचार करते तेंव्हा मला नेहमी असा प्रश्न पडतो कि त्यांना कोवळ्या वयात इतका ट्रॉमा सहन करावा लागला आहे कि ते सकाळी बिछान्यातुन उठु तरी कसे शकतात. याचं मला फार आश्चर्य वाटतं. वयाच्या आठ वर्ष ते एकवीस वर्ष या काळात त्यांनी त्यांच्या जवळच्या तीन मुख्य व्यक्तींचे मृत्यू बघितले. ते मृत्यु आकस्मिक तर होतेच शिवाय त्यांची आज्जी, काका आणि वडील यांचे देह छिन्नविछिन्न करणारे होते. 

अमेरिके मध्ये  PTSD (post traumatic stress disorder) या मानसिक आजराबद्दल बरंच बोललं जातं. अमेरिकन सैनिक जेंव्हा परदेशातील युद्धावरून घरी परत येतात तेंव्हा युद्धात बघितलेल्या हानीचा आणि विध्वंसाचा त्यांच्या मनावर आणि कधीकधी शरीरावर देखील इतका खोल परिणाम झालेला असतो की त्या धक्क्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागतो किंवा काही जण कधीच त्यातुन बाहेर पडु शकत नाहीत. 

पण PTSD फक्त सैनिकां मध्येच आढळते असं नाही. एखादी व्यक्ती खूप ट्रॉमा मधून गेली तर तिला ते होऊ शकतं. काही महिलांना प्रसूती नंतरही PTSD होतं असं म्हणतात. 

तुमच्या मुलांना त्यांच्या जडणघडणीच्या वयात ज्या ट्रॉमातुन जावं लागलं त्याची तीव्रता इतकी जास्त होती कि त्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झाला आहे असं तुम्हांला वाटतं का? आणि तो किती खोल होता? 

सो. गांधी: निःसंशय काही प्रमाणात परिणाम तर झालाच असणार. कारण ते आघात इतके मोठे होते. 

पण मला वाटतं कि आजार शारिरीक असो किंवा मानसिक, तो सहन करण्याची आणि त्यावर मात करण्याची एखाद्या व्यक्तीची क्षमता निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबुन असते. कौटुंबिक पार्श्वभूमीचाही त्यात मोठा वाटा असतो असं मला वाटतं.  

माझ्या मुलांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्या चार पिढयांनी आपलं आयुष्य देशाच्या कामासाठी वाहिलेलं आहे. त्यासाठी आयुष्यात अनेक चढउतार सहन केले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी देशाला आपलं कुटुंब मानलं आहे. त्या वारश्यातुन माझ्या मुलांना जी अंतर्गत ताकद मिळाली आहे ती मी कमी लेखणार नाही. त्यांचे पणजोबा, आज्जी आणि वडीलांनी देशाचं नेतृत्व केलं आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या रक्तातुन मिळाला आहे. 

लहान वयात "नॉर्मल"आयुष्य जगता न आल्यामुळे त्यांना त्यांचं स्वतःच असं व्यक्तिमत्व घडवायला थोडा वेळ लागला असेल कदाचित. पण काळ हे सर्वोत्तम औषध आहे असं म्हणतात. जसं त्या घटनां पासुन आपण लांब जात आहोत तसं माझी मुलं त्यातुन सावरत आहेत असं मला वाटतं. 

प्रश्न: शेवटचे दोनएक प्रश्न विचारण्या आधी मला तुमचं अभिनंदन करावसं वाटतं कि गांधी -नेहरू घराण्याची सून असण्याचं ओझं तुम्ही एक परदेशी स्त्री असुनही खूप समर्थपणे निभावलंत. तुमच्या धाकट्या जाऊबाईंना भारतीय असुनही ते नीटसं जमलेलं दिसत नाही. त्यांच्यावर टीका करण्याचा माझा हेतु नाही. हे फक्त एक निरीक्षण आहे. 

काही वर्षांपूर्वी असं वाचलं होतं कि त्यांनी मुक्या प्राण्यांच संरक्षण करण्याच्या कामाला स्वतःला वाहुन घेतलं आहे. ते निश्चितच चांगलं काम आहे. पण मध्यंतरी कुठेतरी असं ऐकल कि दिल्लीत बेवारशी कुत्र्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्याचा त्रास आता रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनां होत आहे. इतका त्रास होतोय कि महिला रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायला घाबरू लागल्या आहेत. 

मी काही तुम्हांला असं म्हणंत नाही कि तुमच्या जाऊबाईंमुळे तो त्रास वाढला. सहज आपलं तुमच्या कानावर घालून ठेवलं. 

खरंच तुमचं अभिनंदन कि तुम्ही एक आदर्श सून, पत्नी आणि आई होऊ शकलात. 

सो. गांधी : धन्यवाद. 

प्रश्न:  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला जे प्रश्न विचारावेसे वाटत होते ते विचारण्याची संधी दिल्या बद्दल मी आपली खूप आभारी आहे. राजकारणा विषयी प्रश्न विचारायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण स्वतःहुन तुम्हांला काही सांगायचं आहे का? देशातील सध्याच्या राजकीय परिस्थिती बद्दल किंवा भारत जोडो यात्रे बद्दल? 

सो. गांधी: नाही, मला त्यावर काही भाष्य करायचं नाही. जे काही चाललंय ते सगळं भारतातील जनतेच्या समोर आहे. जनतेने डोळे उघडे ठेऊन ते बघावं एवढंच मी म्हणेन. 

प्रश्न: तुमचे स्वतः बद्दल काही प्लॅन आहेत का जे तुम्ही लोकांना सांगू शकाल. म्हणजे निवृत्त व्हावंसं वाटतं कि नाही वाटत?  कुठे निवृत्त व्हायला आवडेल - इटली मध्ये, भारतात गोव्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्लीत मुलांच्या जवळ? 

सो. गांधी: अजून ते काहीच मी ठरविलेलं नाही. 

प्रश्न: मुलाखतीच्या शेवटी मी आपल्याला विनंती करते कि आपण आत्मचरित्र लिहावं. आज काळ खुप विचित्र झाला आहे. बरेच लोक त्यांच्या वागण्यात कुठलीही मूल्य पाळत नाहीत असं दिसुन येतं. त्यामुळे लहान मुलं अतिशय चुकीचे आदर्श बघत वाढत आहेत. 

तुमच्या सारख्या पारंपारिक जीवन मूल्य जपलेल्या स्त्रीनं पुढील पिढ्यांना स्वतःचे अनुभव सांगण्याची गरज आहे. लिहाल का? 

सो. गांधी: बधु. 



तळटीप : काल्पनिक मुलाखत कल्पने पेक्षा जास्त लांबल्या मुळे काही प्रश्नोत्तरांचा समावेष या ठिकाणी होऊ शकला नाही. 






Sunday, January 22, 2023

कत्रीनांच्या करवा चौथची कैफियत


कत्रीना कुणी एक व्यक्ती नाही. ती खरी आहे पण प्रातिनिधिक आहे. अनेक व्यक्तींचं मिश्रण आहे. 

कत्रीना तिच्या शॉर्ट्स किंवा रिल्स मधुन नियमित समोर येते. काही लाख दर्शक तिचे शॉर्ट्स पहातात. एकदा कधीतरी समोर आलेली तिची क्लिप चुकून बघितली, तेंव्हा पासुन ती माझ्या यूट्यूबच्या पानावर येत रहाते. मी गंमत म्हणून - "कत्रीनानी आज काय आचरटपणा लावलाय बघूया" म्हणून तिचे शॉर्ट्स बघते. 

तिच्या एकूण दर्शकां पैकी किमान काही लोक तरी त्याच कारणास्तव बघत असावेत. जरी ते कौतुक आणि प्रोत्साहनाचा वर्षाव करीत असले तरी. दर्शक तिचे शॉर्ट्स का बघतात याच्याशी कत्रीनाला काही देणंघेणं दिसत नाही. ते बघतात एवढंच तिला हवं आहे. 

तिचे शॉर्ट्स बघून मी फार गोंधळात पडते. कत्रीना मला धक्क्यांवर धक्के देते. ती काय चीज आहे ते मला समजेनासं झालं आहे. तिच्या एखाद मिनिटाच्या किंवा काही क्षणांच्या व्हिडीओ क्लिप मध्ये जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला तिच्या बद्दल काही माहीती नाही. तिचं वय एकूणचाळीस आहे असं ती एका व्हिडिओत म्हणाली होती. ती अमेरिका किंवा कॅनडा या पैकी एका प्रगत देशात रहाते. 

तिला चार मुलं आहेत. म्हणजे होती. काही दिवसांपूर्वी तिनं एक शॉर्ट्स लावलं. त्यात तिनं आपल्या चार मुलांच्या हातात चार ept (early pregnancy test) च्या टुयब देऊन त्यांना त्यांच्या वडिलांकडे पाठवलं. बॅक्ग्राउंडला कत्रीना खूप खुशीत हर्षवायू झाल्या सारखी हसत म्हणत होती, "पाचव्या प्रेग्नन्सीची बातमी देऊन मी माझ्या नवऱ्याला आश्चर्यचकीत करीत आहे". तिच्या शॉर्ट्सचं शिर्षकही तेच होतं. 

तो पहिला धक्का होता. मी शाळाकॉलेजात असताना माझ्या आजूबाजूच्या समाजात एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं होणं हे अडाणी आणि अशिक्षित माणसांचं लक्षण मानलं जायचं. जगाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे त्यामुळे पृथ्वी वरचा समतोल ढासळतोय आणि तिचं अस्तित्व धोक्यात आलं आहे असं आमच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. 

पिल्लावळ कुत्र्यामांजरांना होते. मनुष्य प्राण्यांनी जनन प्रक्रियेवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे असा आमचा समज करून देण्यात आला होता. माझ्या माहितीत माझ्या पिढीतील कोणालाही दोन पेक्षा जास्त मुलं नाहीत. बऱ्याच जणांना एकच आहे. 

पाचव्या मुलाच्या आगमनाची बातमी ऐकल्यावर कत्रीनाच्या नवऱ्यानी घेतलेला खोल श्वास आणि त्याचा पडलेला चेहरा कॅमेऱ्याच्या नजरेतुन सुटला नाही. कत्रीनाच्या ते लक्षात आलं असावं. "तो ही बातमी प्रॉसेस करतोय" ती कॅमेऱ्याच्या पाठीमागुन म्हणली.   

तिला अमेरिकेतील एका नावाजलेल्या लॉ कॉलेजात प्रवेश मिळाला होता पण तिनं तो घेतला नाही असं कत्रीनाने एका शॉर्ट्स मध्ये सांगितलं. वर प्रेक्षकांना विचारलं, "कठीण असतं का त्या कॉलेजात प्रवेश मिळणं?" 

तेंव्हा पासुन तिचे शॉर्ट्स मी त्या चष्म्यातुन बघु लागले. 

असं वाटू लागलं कि जणू ती स्वतःला, तिच्या दर्शकांना आणि तिच्या समकालीन महिलांना (ज्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या करिअर वर लक्ष केंद्रित केलं...त्यासाठी त्यांना लग्न आणि मुलं दोन्हीच्या बाबतीत थोडं कॉम्प्रमाईज करावं लागलं) दाखवू पहात आहे की, " जरी मी कायद्याच्या पदवीवर पाणी सोडलं असलं तरी बघाबघा मी कसं घरकाम आणि कुटुंबाला वाहुन घेतलं आहे. शिवाय शॉर्ट्स मध्ये करिअरही करतेय." 

"मला डॉक्टर नवरा मिळाला आहे. तो माझ्या सारखाच गोंडस देखणा आहे. आम्हांला पाच मुलं आहेत. आम्ही दोघेही खूप हुशार आणि अभ्यासु आहोत. आमची मुलंही अभ्यासु आहेत ... आणि हे सगळं मिळविण्यासाठी ना मला लॉ कॉलेजात जावं लागलं ना लग्नाच्या बाबतीत काही तडजोड करावी लागली. सगळं कसं खूप सहज सुंदर घडतंय माझ्या आयुष्यात!" (एका शॉर्ट्स मध्ये तिचा नवरा आणि चार मुलं बुद्धिबळ सारखे बौद्धिक खेळ खेळत आणि वाचत बसलेली दिसतात. कॅमेरा त्यांच्यावरून फिरवत कत्रीना म्हणते, "कॉलेज मधल्या अभ्यासु मुलाशी तुम्ही जरा चांगलं काय वागता ... हे असं होतं!")

आपण पाचव्या मुलाला जन्म देत आहोत म्हणजे फार मोठा पराक्रम करत आहोत या थाटात कत्रीनाने पुढील महिने घालवले. वारंवार आपल्या पोटाच्या आकाराचा अपडेट दर्शकांना देत राहीली.  

पहिल्या तीमहीत म्हणाली, - "बघाबघा माझं पोट! मी सध्या तीन महिन्यांची गरोदर आहे. समोरून नीट दिसत नाही का? थांबा साईडनी दाखवते." 

दुसऱ्या तीमहीत म्हणाली - "बघाबघा माझं पोट! आता सहावा महिना आहे. मी पोटावर फिट बसणारा टी शर्ट घालते आणि साईडनी दाखवते म्हणजे माझं पोट किती मोठं झालंय ते तुम्हांला नीट दिसेल. 

तिसरी तीमही - पुन्हा तेच. पोट किती मोठं झालंय ते लोकांना दाखवण्याची धडपड. 

ती पोटाचं इतकं कौतुक करत होती कि मला वाटलं कंटाळून कोणतरी बघणारी तिला विचारेल, "मुलाला जन्म दिला म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर केलं असं वाटतं का तुला?'  

अशी कॉमेंट जर कुणी लिहिली तर मला खात्री आहे कि कत्रीना बाजूला राहील आणि तिचे चाहते त्या व्यक्तीवर तुटुन पडतील. म्हणतील, "डोकं फिरलयं का तुझं? मुल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेची तुलना तू एक टेकडी चढण्याशी करतेस?"      

                                                                             ***                                         

पहिली कत्रीना आपलं वाढलेलं पोट दर्शकांना नीट दिसावं म्हणून धडपडत होती तेवढ्यात दुसऱ्या कत्रीनाने बाजी मारली. तिनं चक्क आपलं बा-ळं-त-प-ण-च लोकांना दाखवलं. प्रत्यक्ष मुलाचा जन्म होताना दाखवलं. इतके खाजगी क्षण मलाच पडद्यावर बघवले नाहीत. 

कत्रीना(१) आणि कत्रीना(२) अनुक्रमे त्यांच्या गरोदरपणाचा आणि बाळंतपणाचा आनंद दर्शकांबरोबर वाटुन घेत होत्या तेंव्हा कत्रीना(३) बिच्चारी आपल्या गाडीत बसुन रडत होती. ते सुख यापुढे तिच्या नशिबात येणार नव्हतं. त्याबद्दल नवरा तिचं सांत्वन करत होता. कॅमेरा त्याच्याच हातात असावा. 

कत्रीना(३)ला डॉक्टरांनी सांगितलं होतं कि तिला चवथं मुल होऊ शकणार नाही. आहेत त्या तीन वरच थांबावं लागेल. म्हणून ती अश्रु ढाळत होती. 

जगात अनेक महीला आपल्याला एकतरी मुल व्हावं म्हणून तळमळत असताना ही तीन मुलांची आई का रडते आहे (आणि लोकांनां ते दाखवते आहे) मला समजेना. मी मनातल्या मनातं तिच्या रडण्यामागचं कारण शोधू लागले:

कारण अ - आहेत ती तीन मुलं आपल्याला मातृत्वाचं सुख देण्यात कमी पडत आहेत असं तिला वाटत होतं म्हणून चवथ होऊ शकणार नाही याबद्दल ती दुःखी होती?

ब - आपल्याला आणखी मुलं होऊ शकली नाहीत याचा अर्थ आपलं स्त्रीत्व संपुष्टात आलं आणि पत्नी म्हणून आपण कमी पडलो असं तिला वाटत होतं म्हणून रडत होती? 

क  - माझ्या सख्ख्या मैत्रिणीला/ बहिणीला/ शेजारणीला किंवा दुसऱ्या कोणाला तरी पाचसहासात मुलं आहेत आणि मला मात्र तीन वरच थांबावं लागतंय याचं दुःख होतं? 

कत्रीना(३) गाडीत बसुन रडत होती. गाडी कुठल्यातरी पार्किंग लॉट मध्ये उभी होती. ती डॉक्टरांच्या ऑफिस मधुन बाहेर आली आणि लगेच दर्शकांना हि बातमी सांगण्यासाठी तिनं शॉर्ट्स बनवायला सुरवात केली तेंव्हा तिला रडू कोसळलं कि ती रडत असताना ते लोकांना दाखवावं म्हणून तिनं कॅमेरा सुरु केला हे कळायला मार्ग नव्हता. 

या सर्व जन्मदात्रींना खरोखरच मोठ्या कुटुंबाची हौस असेलही कदाचित. किती मुलांना जन्म द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे (?). पण ज्या लोकांना असं वाटतं की मुलं नसली तरी किंवा एकदोन असली तरी बऱ्यापैकी परिपूर्ण आयुष्य जगता येतं आणि जितकी जास्त मुलं होतील तितकं त्यांच्याकडे लक्ष पुरवणं कठीण जाईल  - त्यांना एवढी मुलं होण्यामागे वेगळीच कारणं दिसतात:

दहाएक वर्षांपूर्वी अमेरिका आणि इंग्लड मध्ये टीव्ही मालिका येऊन गेल्या ज्यात खुप मुलं असलेल्या खऱ्याखुऱ्या कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्याचं चित्रीण दाखवण्यात आलं. त्या मालिकांची शिर्षकं फिफ्टीन अँड काउंटिंग, ट्वेंटी अँड काउंटिंग म्हणजे पंधरावीस मुलं आहेत आणि अजुन होतातच आहेत अशी होती. त्या मालिका बघत मोठं झालेल्या पिढीवर त्याचा परिणाम झालेला असण्याची शक्यता आहे. 

कत्रीना (१) गळ्यातील साखळी मध्ये तिच्या धर्माचं चिन्ह असलेलं लॉकेट ठळकपणे दिसेल असं घालते. मोठं कुटुंब हा तिच्या धार्मिकतेचा भाग आहे असं ते बघणाऱ्याला वाटु शकतं. 

वर्षानुवर्षे टीव्ही वरील मालिकांनी ही क्लुप्ती वापरलेली आहे. सुरवातीला लोकप्रिय असलेल्या मालिकेचं कथानक काही दिवसांनी थंडावलं, दर्शकांची संख्या रोडावली, लेखकांना नविन विषय सुचेनासे झाले कि नविन बाळाचं कथानक मालिकेत घातलं जातं. हमखास दर्शकांची संख्या वाढते. 

कत्रीना(१) ला पाच मुलं झाली... मुलांची संख्या वाढल्यावर ते नविन घरात रहायला गेले... ते सगळं तिनं तिच्या शॉर्ट्स मध्ये दाखवलं. त्याबरोबर तिला बघणाऱ्यांची संख्या वाढली. ते बघुन इतर कत्रीनांना आपल्या दर्शकांची संख्या वाढावी असं वाटु शकतं.    

कत्रीनांच्या शॉर्ट्स किंवा रिळांमध्ये - मी, माझी मुलं, माझा नवरा, माझा स्वयंपाक या शिवाय दुसरं काही नसतं. एखाद्या कुटुंबाचा तोच तो दिनक्रम बघुन दर्शक काही दिवसांनी कंटाळतात. आपल्या मुलांबरोबर केलेल्या बालिश कलाकृती आणि पाककृती (फळांपासुन कँडी बनवा... पुडिंग मध्ये टॉफी घाला) आयांना कितीही क्यूट वाटल्या तरी बाहेरचे लोक ते किती काळ बघू शकतात याला मर्यादा असते. बदल म्हणून दुसऱ्या कोणाची तरी रिळं त्यांना खुणावू लागतात. अशा वेळी कत्रीनाच्या घरात पुनश्च पाळणा हलणार आहे असं समजलं कि दर्शक हमखास नव्या उत्साहाने तीची रिळं किंवा शॉर्ट्स बघू लागतात. किमान पुढील काही काळ तरी त्यांचं लक्ष त्यात गुंतलेलं राहु शकतं...  

                                                                            *** 

कत्रीना(१) चं पाचवं गरोदरपण स्वतःवर खुष होण्यात पुढे सरकत होतं त्या सुमारास भारतातील कत्रीना कुठल्यातरी सिनेमातील एक दोन गाण्यांच्या मुखड्यांवर नाचत होत्या. आई -सासु बरोबर, मित्रमैत्रिणीं सोबत, नवऱ्या बरोबर असं कोणा बरोबरही त्याच त्या मुखड्यांवर नाचत होत्या. मला परत धक्का बसला.  

पूर्वी घुमा म्हणून एक होती. तिला तिच्या मैत्रिणी मंगळागौरीच्या दिवशी नाचायला सांगायच्या. 

त्या म्हणायच्या, "नाच गं घुमा". 

घुमा म्हणायची, "नाही गं मैत्रिणींनो, या गावचा त्या गावचा माळी नाही आला. वेणी नाही मला. मी कशी नाचू. "

तरी मैत्रिणी आग्रह धरायच्या. म्हणायच्या, "नाच ग घुमा. तू नाचायलाच हवं " 

त्यावर घुमा म्हणायची, " नाही गं मैत्रिणींनो, या गावचा त्या गावचा कासार नाही आला. बांगड्या  नाही मला. मी कशी नाचू".  

घुमा खूप कारण सांगायची. आढेवेढे घ्यायची. घराच्या दिवाणखान्यात किंवा गच्चीवर मैत्रिणीं सोबत नाचायचं असलं तरी ती एका पायावर तयार होत नसे. 

कत्रीना मात्र इमारतीच्या पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर नाचल्या, बागेत,  रस्त्यात असं कुठंकुठं नाचल्या. त्यांच्या नाचाचं रूपही वेगळं आहे. पूर्वीच्या नाचात ना पासुन सुरु होणारा नाजूकपणा असायचा. आता उड्या मारणे आणि आपला पाठीमागचा भाग कॅमेऱ्याला दाखवून हलवणे याला नाच म्हणतात. 

                                                                                        ****

एकावर एक शॉक बसत असल्याने ते ऍबझॉर्ब करायची सवय लागली. मग करवा चौथ आली. कत्रीनांनी ती बॉलिवूड स्टाईल मध्ये साजरी केली. तेंव्हा काही वर्षांपूर्वी वाचलेला एक लेख आठवला. न्यूयॉर्कच्या वर्तमानपत्रात आला होता. लिहिणारीचं नाव आठवत नाही. 

तिनं जो मुद्दा मांडला होता त्याचा मला उमजलेला अर्थ असा: जुन्या हिंदी सिनेमां मध्ये खलनायिका हे एक पात्र असायचं. खलनायिका पडद्यावर ते सर्व करायची जे तेंव्हाच्या नायिका करत नसंत. ती पाश्चिमात्य कपडे घालायची. क्लब मध्ये कॅब्रे डान्स करायची. त्या काळानुरूप थोडंफार शरीर प्रदर्शन करायची. तेंव्हाच्या नायिका अंग झाकणारे भारतीय कपडे घालायच्या आणि सोज्वळ वागायच्या. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्याचं काम खलनायिकेचं असायचं. 

सिनेमा जसा बदलत गेला तसं जे एकेकाळी खलनायिका करायची ते नायिका करू लागल्या. त्या पडद्यावर बिकिनी घालू लागल्या. खूप तोकडा ब्लाऊज आणि कमरेच्या खूप खाली साडी नेसुन शरीर प्रदर्शन करीत उत्तान, सिडक्टिव्ह नृत्य करू लागल्या*. त्यामुळे चित्रपटात खलनायिकेची गरज भासेनाशी झाली. तिची भूमिका हळुहळु कमी होत गेली. आणि सध्याच्या हिंदी सिनेमातुन खलनायिका हे पात्र नाहीसं झालं आहे. 

आजच्या हिंदी सिनेमातील नायिका हि जुन्या सिनेमातील खलनायिका + नायिका यांची बेरीज आहे. त्या शरीर प्रदर्शन करत उत्तान नृत्य करून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचं काम करतात. तसंच त्या करवा चौथचा उपासही करतात. बॉलीवूडला आदर्श मानणारी मंडळी त्यांचं अनुकरण करतात. 





* टॉपच्या नायिकाही शरीर प्रदर्शन टाळू शकत नाहीत असं दिसून येतं: माधुरीचं कायम एका विशष्ट प्रकारे साडीचा पदर किंवा ओढणी घेणं किंवा ऐश्वर्याचा कजरा रे या गाण्यावरील नाच. भरपूर शरीर प्रदर्शन करत तिनं आपला नवरा आणि सासऱ्यांच्या बरोबर पडद्यावर तो उत्तान नाच केला आहे. भारतातील कोट्यावधी घरांमध्ये कुटुंबातील लहानमोठ्यांनी एकत्र बसुन तो टीव्ही वर बघितला असणार. कोणालाच आता त्यात काही विशेष वाटत नाही. इतकी आता आपल्याला त्याची सवय झाली आहे. 







Sunday, December 4, 2022

सेलेब्रिटींचे आजार


"ख्रिस हेम्सवर्थला अल्झायमर्स झालाय." मुलानं सनसनाटी बातमी दिली. 

"कोण तो?" मी ते नाव कधी ऐकलं नव्हतं. 

"सिनेमा नट आहे". 

"वय काय असेल त्याचं? " 

"३९."

"एकोणचाळीसाव्या वर्षी अल्झायमर्स? अरली ऑनसेट - लवकर होणाऱ्या अल्झायमर्ससाठी सुद्धा एकोणचाळीस जरा जास्तच तरुण वय वाटतं."

माध्यमांच्या पूर्णपणे आहारी गेलेले असल्यामुळे महामारीच्या काळात त्यांनी पुरतं घाबरवून सोडलेली ही पिढी आहे. मुलाला ती बातमी ऐकुन धक्का बसलेला दिसला. म्हणून मी थोडा गुगल सर्च केला. 

"म्हणजे त्याला अल्झायमर्स अजुन झालेला नाही पण त्याच्या शरीरात तो जीन आढळला आहे ज्यामुळे त्याला तो होऊ शकेल." मुलानं सावकाश खरी बातमी सांगितली. 

"दोन्ही मध्ये खूप फरक आहे, बाबा! एखाद्याला खरोखर एखादा आजरा झालेला असणं आणि तो होऊ शकेल असं दर्शवणारा जीन शरीरात सापडणं यात जमीन -अस्माना इतकं नसलं तरी फार अंतर आहे. दोन्हीची अशी गल्लत करू नकोस. "  या विषयी जे थोडंफार वाचलेलं आहे ते मी त्याला सांगितलं 

कुठल्यातरी मालिकेतील कामाचा भाग म्हणून हेम्सवर्थनी ज्या चाचण्या करून घेतल्या त्यात असं आढळलं कि त्याच्या मध्ये ApoE4 या जीनच्या दोन कॉपी आहेत - एक आई कडून आणि एक वडिलांकडून आलेली -  ज्याच्यामुळे त्याला अल्झायमर्स होण्याची शक्यता तो जीन शरीरात नसलेल्या लोकांपेक्षा आठ ते दहा पटिनी जास्त आहे. 

हेम्सवर्थच्या आजोबांना अल्झायमर्स झाला आहे. त्याच्या दृष्टीने हि बातमी चिंताजनक आहे. त्यानं सध्या कामापासुन थोडी रजा घेतली आहे. तो घरी ऑस्ट्रेलियाला परत जाऊन आपल्या परिवारासोबत वेळ घालवणार आहे. त्याला अल्झायमर्स झालेला नाही. तो होऊ नये म्हणून तो शारीरिक आणि मानसिक विश्रांती, योग्य आहार, आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित करणार आहे असं बातमीत म्हंटलं होतं. 

ते वाचल्यावर माझी पहीली प्रतिक्रिया अशी होती कि ... here we go again!  हेमस्वर्थ जर जगभर - खास करून तरुणांच्या मध्ये लोकप्रिय असेल तर जगभरातील जनतेचं लक्ष आता अल्झायमर्स कडे वेधलं जाणार. त्याच्या वयाच्या अनेक तरुणांना वाटणार कि आपणही ती तपासणी करून घ्यायला हवी कि काय? 

या आधी एकदोनदा असं घडलं आहे. कोलनॉस्कपी टेस्ट कशी प्रसिद्ध झाली ते मी बघितलं आहे. न्यूयॉर्क मध्येच त्याची सुरवात झाली. 

केटी कुरिक (Katie Couric) ही NBC टीव्ही च्या The Today show या सकाळच्या कार्यक्रमाची पूर्वीची सह -सूत्रसंचालक. अमेरिकन टीव्ही वरचं मोठं नाव. अनेक महत्वाच्या घटनांच - ऑलिंपिक खेळ, ब्रिटिश राजघराण्यातील महत्वाचे प्रसंग, अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षांचे शपथविधी याचं रिपोर्टींग तिनं Today show साठी तिच्या को - अँकर बरोबर केलं आहे. न्यूयॉर्क मध्ये रहाते. तिचा नवरा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी कोलन कॅन्सरनी वारला. 

नवरा गेल्यावर केटीनी आतड्याच्या कर्करोगा विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी स्वतःला वाहुन घेतलं. वेगवेगळ्या कार्यक्रमां मध्ये पाहुणी म्हणुन जाऊन त्या विषयी ती बोलू लागली. कोलनॉस्कपी करून घेण्याचं आव्हान लोकांना करू लागली. लोकांची त्या चाचणी बरोबर  - ज्याच्यामुळे आतड्यातील कॅन्सर सुरुवातीलाच सापडू शकतो - ओळख व्हावी म्हणून तिनं स्वतः ती चाचणी करून घेतली आणि ती आपल्या कार्यक्रमात दाखवली. 

लॉस अँजेलिस मध्ये दुसऱ्या एका वाहिनीवर रात्रीचा शो करणाऱ्या एका कमिडियन सोबत त्याच्या कोलनॉस्कपीला गेली. त्यानं त्याचं चित्रिण स्वतःच्या शो मध्ये दाखवलं. अशा प्रकारे आतड्याच्या कर्करोगा पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जागरूक रहाण किती महत्वाचं आहे हे लोकांना पटवुन देण्याचं काम केटीनी गेली वीस वर्ष केलं. 

मागच्या महिन्यात तिनं जाहीर केलं कि तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. पहिली स्टेज आहे. तिचा एक मॅमोग्रॅम - स्तनात कॅन्सरची सुरुवात होत आहे का हे दर्शवणारी चाचणी- हुकला त्यामुळे कॅन्सर झाला असं स्पष्टीकरण तिनं दिलं. 

मॅमोग्रॅमचं प्रस्थ आता फार वाढलं आहे. मनोरंजनाच्या व्यवसायातील खासकरून टेलिव्हिजन वरील कामामुळे घराघरात पोहचलेल्या अनेक प्रसिद्ध महिला ती तपासणी करून घेण्याचं महिलांना आव्हान करतात. ठराविक वयानंतर - मासिक पाळी गेल्या नंतर किंवा जायची वेळ जवळ आल्यावर - महिलांनी नियमित मॅमोग्रॅम करून घ्यावा असा सल्ला डॉक्टर्स देतात. आपल्या आरोग्याविषयी तुम्ही जबाबदारीनं वागत आहात याचं ते एक चिन्ह आहे असं महिलांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न होतात. 

मॅमोग्रॅम हि एक टेस्ट आहे. ती नेहमी अचूक असतेच असं नाही. ती केल्याने स्तनाचा कर्करोग होत नाही असंही नाही पण नियमित ती चाचणी करत राहिलं तर तुमच्या स्तनाच्या आत काय चाललंय यावर लक्ष ठेवणं डॉक्टरांना शक्य होतं. काही अंतर्गत - सहजासहजी बाहेरून न जाणवणारे - बदल आढळले तर डॉक्टर पुढील चाचण्या किंवा उपचार सुचवु शकतात असं म्हणतात. 

तरीही एक मॅमोग्रॅम करायचा राहीला आणि पुढच्या वेळी केला तर कॅन्सर सापडला हे केटीचं स्पष्टीकरण बुचकळ्यात टाकणारं आहे. त्या चाचणीची एवढी भीती स्तनाच्या कर्करोगाला आहे कि जोपर्यंत नियमित मॅमोग्रॅम करताय तोपर्यंत तो दिसुन येत नाही पण एकदा जरी ती टेस्ट चुकली तर लगेच पुढच्या चाचणीत कॅन्सर झाला आहे असं दिसुन येऊ शकतं असा काहीतरी अर्थ त्या स्पष्टीकरणातुन निघतो कि काय असं वाटतं.  

                                                                                   *****

काही दिवसांपूर्वी हेअर सलॉन मध्ये माझ्या शेजारी एक बाई बसली होती. साधारण साठपासष्ठच्या आसपासचं वय असेल. तिच्या बरोबर तिचा कुत्रा होता. सोनेरी केसांचा, लहानसा. त्याला ती सारखी, "मम्बाय एका जागी बस, मम्बाय इकडेतिकडे फिरू नकोस," असं म्हणत होती. सहाजिकच मी विचारलं, "हे नाव कुठून आलं?" ती म्हणाली, "गेली पंधरा वर्ष मी नियमित भारतात जातेय. त्यातही मम्बायला जायला मला जास्त आवडतं." 

मम्बायचं कोणीतरी भेटल्यामुळे ती फार खूष झाली. कौतुकाने आपल्या एकदोन प्रसिद्ध भारतीय मित्रांची नावं सांगितली  - त्यातला एक डिझायनर, दुसरा शेफ. राजेशाही फेटा घातलेला कुत्र्याचा फोटो दाखवला. 

ती उत्साहानी बोलत होती आणि फोटो दाखवत होती पण मधुनच तिच्या मनातली काळजी बोलण्यातुन व्यक्त होत होती. दुसऱ्या दिवशी तिला कोलनॉस्कपीसाठी जायचं होतं. "ऑगस्ट मध्ये केली होती. खरतर एवढ्या लगेच परत करत नाहीत. मध्ये काही वर्ष जाऊ देतात. पण मागच्या टेस्ट मध्ये डॉक्टरांना काहीतरी शंका आली म्हणून त्यांनी नोव्हेंबर मध्ये परत करायला सांगितली." 

केस आणि नखं रंगवुन घेऊन ती टेस्टसाठी जय्यत तयार होत होती पण काळजीत होती. बुधला भरून काहीतरी द्रव्य टेस्टच्या आधी प्यायला दिलंय म्हणाली. ऑगस्ट मध्ये टेस्ट केलीस ती काही त्रास होत होता म्हणून कि काही होत नसलं तरी चाचण्या करून घ्याव्यात या सल्ल्याचा परिणाम म्हणून हे तिला विचारायचं राहून गेलं.  

                                                               *****

ब्रेस्ट कॅन्सरच्या जीनचं नाव आहे BRCA. त्याला ब्रॅका असंही म्हणतात. त्याचे ब्रॅका १ आणि ब्रॅका २ असे प्रकार आहेत. 

हॉलिवुड मधली नटी अँजलिना जोली मध्ये ब्रॅका १ या जीनचं म्युटेशन आढळलं आहे. तिला असं वाटतं कि त्या जीन मुळे तिला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ८७ टक्के आहे तर ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्के आहे. म्हणून तिनं २०१३ साली डब्बल मॅस्टेक्टमी - दोन्ही  स्तन काढुन टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतली. त्या जागी अर्थातच खोटे बसवले असतील. तशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्यावर ते बसवतात. 

पण त्या क्षेत्रातील काही तज्ञांना तिचा हा  - कर्करोग झालेला नसतानाही तरुण वयात धडधाकट स्तन काढुन टाकण्याचा निर्णय मुर्खपणाचा वाटला. तिचं बघुन बऱ्याच महिलांनी ब्रॅका जीन आपल्यात आहे का ते जाणुन घेण्यासाठी विनाकारण जेनेटिक टेस्टिंग करून घेतलं असं ब्रिटिश मेडिकल जरनल (BMJ) नी केलेल्या (२०१७) पहाणीत आढळलं. त्याला अँजलिना इफ़ेक्ट म्हणतात. 

जोलीची आई स्तनाच्या कर्करोगाने गेली. माझ्या मुलांसाठी - त्यांना त्यांच्या आईचा सहवास दीर्घकाळ मिळावा यासाठी मी काहीही करीन असं काहीसं कारण तिनं दोन्ही निरोगी स्तन काढुन टाकण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. 

पूर्व युरोपातील अष्कनाझी ज्यू महिलांच्या मध्ये ब्रॅका जीन आढळण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. माझ्या मुलाच्या एका मित्राच्या आईनी काही वर्षांपूर्वी ती जेनेटिक टेस्ट करून घेतली. तिचे पूर्वज अष्कनाझी ज्यू होते म्हणून केली का तिच्या परिवारात कोणाला तरी तो आजार झाला होता म्हणुन केली ते आता मला आठवत नाही.  

तिच्यात ब्रॅका जीन आढळला. त्यानंतर तिनं फेसबुक वर पोस्ट लिहिली कि मला आता खुप कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे कि कॅन्सर झालेला नसताना कदाचित तो होऊ शकेल असे दर्शविणारा जीन शरीरात सापडला आहे या भीतीपोटी दोन्ही स्तन काढून टाकायचे का? काही आठवडे विचार केल्यावर तिनं रॅडिकल मॅस्टेक्टमी न करण्याचा निर्णय तेंव्हा घेतला होता. 

डब्बल मॅस्टेक्टमी, रॅडिकल हिस्टरेक्टमी - महिलांच्या जननेंद्रियांशी निगडीत आजरांवर करण्यात येणारे हे प्रचलित - उपचार असं म्हणता येणार नाही कारण या शस्त्रक्रिया केल्याने ही इंद्रिय आजार- मुक्त होत नाहीत (स्त्री त्या इंद्रियां पासुन मुक्त होते) पण ते आजार वाढू नयेत म्हणून करण्यात येणारी ती टोकाची उपाय योजना असते असं म्हणता येईल. या आजारांचं प्रमाण जगभर वाढत आहे का ते माहीत नाही. पण रॅडिकल हिस्टरेक्टमी - पूर्ण गर्भाशय काढुन टाकण्याची शत्रक्रिया भारतात जितकी सर्रास करण्यात येते तितकी सहज ती अमेरिकेत केली जात नाही. भारतात मूल होण्याचं वय उलटुन गेलेल्या महिलांच्या तोंडून, "पिशवी काढुन टाकली" हे त्यामानाने जास्त ऐकायला मिळतं. 

                                                                                  *****

लहान मुलांच्या कॅन्सरवर उपचार करणारं एक रुग्णालय आहे. कर्करोगग्रस्त मुलांवर तिथे मोफत उपचार होतात असं म्हणतात. त्या रुग्णालयाची जाहिरात वारंवार यु ट्यूब वरच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये येऊन टपकते. जाहिरातींचा ढांचा ठरलेला असतो - कॅन्सर किंवा ट्युमर झालेलं लहान मुलं आणि त्यांचे आईवडील त्या आजराविषयी बोलत असतात. त्या रुग्णालयात किती चांगले उपचार मुलाच्या आजारावर झाले याचं वर्णन करतात.  

रुग्णालयाला छोटीशी देणगी दिली तरी आणखी देणगी मागणाऱ्या पत्रांचा आणि फोनचा पाऊस सुरु होतो. पत्रांचा सुरही जाहिरातीं सारखाच असतो. तान्ह्या बाळा पासुन ते मोठ्या मुलांपर्यंत त्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांची कहाणी फोटो सहीत छापलेली असते. अशा प्रकारचं अग्रेसिव्ह फ़ंड रेजींग बघुन प्रश्न पडतो कि लहान मुलांना होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे का रुग्णालयाला आपला विस्तार वाढवायचा आहे. हा कोंबडी आधी कि अंडं आधी सारखा प्रश्न आहे. 

तोच प्रश्न मेडिकल devices बनवणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीतही पडतो: कंपनीची वाढ होण्यासाठी नफा कमावायला हवा. तो कमवायचा म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर मात करून आपल्या उत्पादनांचा खप वाढवणं आलं. त्यासाठी मार्केटिंग करणं आलं ...जितक्या जास्त रुग्णांवर ती डिव्हायसेस वापरली जातील तेवढी व्यवसायात वाढ होणार.  

                                                                           ***** 

सलॉन मध्ये गेल्यावर जो तरुण मुलगा माझ्या केसांची देखभाल करतो त्याला नुकतच अनके चाचण्यांमधून जावं लागलं. त्याला पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. सात वर्षांपूर्वी झाला होता. आता पुन्हा झाला. सात वर्षांपूर्वी कोलनॉस्कपी, एन्डोस्कपी सारख्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात काही सापडलं नाही. या वेळीही तसंच झालं. 

शोधा म्हणजे सापडेल - जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत शोधत रहायला हवं या उद्देशाने आता त्याला कॅप्स्यूल एन्डोस्कपी करून घ्यावी लागणार आहे. ज्यात कॅप्स्यूलच्या आकाराचा लहान वायरलेस कॅमरा रुग्णाला गिळावा लागतो. कॅमरा पचन मार्गातुन जात असताना त्या भागाचे हज्जारो फोटो काढतो आणि चुकुन गिळलेली चिकूची बी जशी शरीरातुन बाहेर पडते तसा बाहेर पडतो. जर त्या मार्गाने बाहेर नाही पडला तर काय होतं? जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तर उपलब्ध आहेत तिथेच या प्रश्नाचही उत्तर मिळू शकतं.  

या चाचण्या सर्दी- खोकला-ताप आला आहे म्हणून रक्त तपासणी करून घेतली - इतक्या साध्या अर्थातच नसतात. त्या करताना रुग्णाला पूर्ण भूल द्यावी लागते. 

सात वर्षांपूर्वी या अनुभवातुन गेल्यामुळे रक्तस्रावामागे काय कारण असावं याचा त्याला थोडा अंदाज आहे. तो मुळचा युरोप मधला आहे. तिकडे त्याची आज्जी गंभीर आजारी आहे असं त्याला समजलं. आज्जीनच त्याला लहानाचं मोठं केलं. तिला भेटायला जायची तयारी करत होता तेवढ्यात ती गेल्याची बातमी आली. त्याचवेळी त्याचा रक्तस्त्राव उदभवला. 

तो खूप संयमाने हे सांगत होता. कोलनॉस्कपीसाठी तयार होणारी महीला जितकी चाचणीच्या निदाना बद्दल काळजीत होती (वेगळ्या सलॉन मध्ये, वेगळ्या दिवशी तीची भेट झाली होती) तितकी काळजी तो व्यक्त करत नव्हता. पण मला मात्र वाटलं की त्यानी पथ्यपाणी आणि त्याच्या आहाराव्यवहारात बदल केला नाही, नुसतच टेस्ट आणि डॉक्टरांच्या औषधांवर अवलंबुन राहीला तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या - काही वर्षांनी परत कदाचित याच दिव्व्यातुन जावं लागेल.







Saturday, November 12, 2022

बालदिन

 

हालोवीन 






दरवर्षी ३१ ऑकटोबरला हालोवीन साजरा होतो. तो का साजरा केला जातो आणि त्या दिवशी जी सजावट करतात त्यामागे काय अर्थ असतो हे मला अजूनही नीटसं समजलेलं नाही. चित्रविचित्र पोशाख करून तरुण हालोवीन पार्ट्या साजऱ्या करतात आणि लहान मुलं दारोदारी कँडी मागत फिरतात. मग बास्केटभर कँडी घरी येऊन पडते. तिचं काय करायचं? ती संपवायची कशी? खाल्ली तर आरोग्याला घातक नाही खाल्ली तर एवढी चांगली चॉकलेट्स फेकुन कशी द्यायची या मनाच्या नको त्या दोलायमान अवस्थेत पुढील काही आठवडे त्या बास्केटकडे बघत घालवावे लागतात. एवढंच हालोवीनच स्वरूप मला आजवर न्यूयॉर्क मध्ये दिसलं आहे. 



 


भारतात पूर्वी खरेखुरे भिकारी होते जे घरोघरी जाऊन भीक मागत असंत. तेंव्हा बैठी घरं जास्त आणि बंद दारांची फ्लॅट पद्धत कमी होती. आमच्या कडे जो भिकारी यायचा - कधी तो यायचा तर कधी त्याची बायको आणि लहान मुलं यायची- तो रात्री साधारण नऊसाडेनऊच्या सुमारास लोकांची जेवणं झाली कि त्याची फेरी सुरु करायचा. घरातलं उरलेलं अन्न त्यांना दिलं जायचं. आमच्याकडे ते काम माझं असायचं. त्यातलं पातळ आमटी, भाजी, भात वगैरे तो त्याच्या जवळच्या भांड्यात घेत असे. चपाती सारखे सुक्के पदार्थ खांद्याला लटकणाऱ्या कापडाच्या झोळीत टाकायला सांगायचा. वेगवेगळ्या घरातली भाजी, आमटी आणि कढी तो एकाच पातेल्यात कसा काय घेतो याचं लहानपणी मला फार आश्चर्य वाटायचं.  



                                                


ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे झोळी नाही तरी बास्केट घेऊन माझ्या मुलानी दारोदारी कँडी मागत फिरावं हे मला फारसं कधी पटलं नाही. मित्रांच्या संगतीनं त्यानं जे काही ट्रिक ऑर ट्रीटींग केलं असेल तेवढंच. 

भारतातही आता हालोवीन साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे असं दिसतं. तो साजरा करण्यामागचं कारण जाणुन घेऊन हे होत असेल तर बरं नाहीतर केवळ त्याचं बाजरी रूप साजरं होतं- त्याच्याशी निगडीत व्यवसायिकांच्या फायद्यासाठी - चित्रविचित्र पोशाख आणि कँडी विकणारे आणि अति कँडी खाऊन दात खराब झाले कि दंतवैद्य. 






आयुष्यात ज्या गोष्टींची भीती वाटू शकते त्याची खेळीमेळीत लहान मुलांना ओळख करून द्यावी हा उद्देश तर हालोवीन साजरा करण्यामागे नसेल? जसं महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय भयनाट्याचा  -horror show- तेथील सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम झालाय याचं प्रतिबिंब न्यूयॉर्क मधील हालोवीन सजावटीत मला यंदा दिसलं: 



राज्यात जे काही चाललंय त्यावर या दोघांचा अजूनही विश्वास बसलेला नाही.



काही लोक खूप हतबल झाले आहेत.  



हे दोघे एसटीची वाट बघत बाकावर बसले होते. तेवढ्यात
भयनाट्य सुरु झालं. तेंव्हा भीतीने ते इतके गलितगात्र झाले
कि बसमध्ये चढण्याचं त्राण त्यांच्या अंगात उरलं नाही.  



भयनाट्य सुरू झाल्यापासुन चालू झालेला
या महीलेचा आक्रोश अजून थांबलेला नाही 



काही लोक इतके प्रचंड गोंधळात पडले आहेत कि कुंपणाच्या
 या बाजूला उतरावं कि पलिकडे उडी घ्यावी कि कुंपणावरच
बसुन रहावं हे त्यांना समजेनासं झालं आहे.  



ह्याने स्वतःला चक्क दिव्याला टांगून घेतलं आहे. 
"मी सत्याग्रह करतोय, भयनाट्य संपे पर्यंत असाच
लोंबकळत राहीन " असं तो म्हणतो.  



सत्याग्रहाचा आणखी एक प्रकार: भयनाट्य संपल्याशिवाय 
स्वतःला श्रुंखलामुक्त करणार नाही असं याचं म्हणणं आहे. 



या दोघी काय म्हणतायत ते त्यांचं त्यांनाच माहीत. 



बालदिन 


१४ नोव्हेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदीवस असतो. तो बालदिन म्हणूनही ओळखला जातो. आता माहित नाही पण पूर्वी बालदिन साजरा करण्याची पध्द्त खूप साधी सोज्वळ होती: लहान मुलांच कौतुक होत असे आणि गुलाबाच्या फुलांना महत्व असायचं. दोन्ही पंडीत नेहरूंना आवडायचं असं म्हणतात. चाचा नेहरू या टोपणनावाने ते ओळखले जात. त्यांच्या कुडत्याच्या खिशात गुलाबाचं फुल खोवलेलं असायचं. थडगी, भुतंखेतं, कवट्या, हाडांचे सापळे त्या दिवसाच्या साजरी करणा मध्ये लहान मुलांच्या जवळपास दिसंत नसंत.  






नेहरुंच्या पूर्वजां विषयी निरनिराळी नविन माहिती देणारे संदेश समाज माध्यमां मध्ये बघण्याची आता आपल्याला सवय झाली आहे. काही लोक त्या माहीतीवर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत आणि काहींना वाटतं कि ती माहीती खरी असली काय किंवा नसली काय त्यानं आता काही फरक पडत नाही. पण एका बाबतीत खरतर सर्वांमध्ये सहमती व्हायला हरकत नसावी कि त्या संदेशांमध्ये मध्ये भाषेच्या खूप चुका असतात. लेखनाच्या चुका असतात. व्याकरणाच्या चुका असतात. लेखकाचं नाव नसतं. ती माहीत कुठल्या पुस्तकातुन किंवा लेखातुन घेण्यात आली आहे याचा काही संदर्भ नसतो. लिहिणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे, तो संदेश लोकांना पाठवण्या आधी त्यांनी स्वतः एकदा वाचून तरी बघितला होता का कि दुसऱ्या भाषेत लिहिलॆल्या मूळ संदेशाचं ते संगणकांनी केलेलं धेडगुजरी मराठी भाषांतर आहे असा प्रश्न पडतो. तरीही शिकले सवरलेले लोक ते संदेश दुसऱ्यांना पाठवायला कचरत नाहीत. 






लहान मुलांची आवड असणाऱ्या चाचा नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर देशाला जी दिशा दिली त्याचा देशातील निम्न आर्थिक स्तरातील लहान मुलांना किती फायदा झाला याची पुरेशी उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. नेहरू स्वतः ऍरिस्टोक्रॅटीक श्रीमंत घरात जन्मलेले होते. इंग्लंडच्या महाविद्यालयात शिकले होते. ते भारताला इंग्लड - अमेरिकेच्या मार्गाने नेऊ शकले असते. त्यांनी तसं केलं नाही. 

बहुतेक भारतीय ज्या दोन देशांना आदर्श मानतात, त्यांचा कित्ता गिरवु पहातात त्या इंग्लड आणि अमेरिकेत एखादी व्यक्ती जर त्या देशातील अतिशय महाग विद्यापिठात शिकलेली नसेल तर त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघू शकत नाही. तो विचारही मनात आणू शकत नाही. इंग्लडचे नविन पंतप्रधानही त्याचंच उदाहरण आहेत. ज्या प्रतिष्ठित विद्यापीठातुन मिळवलेल्या पदव्या त्यांच्या नावामागे आहेत त्या जर नसत्या तर ते पंतप्रधान पदाच्या जवळपास पोहचू शकले नसते. 


                                                             
                                                               


भारतात मात्र सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतुन आलेली, शाळाकॉलेजात न शिकलेली व्यक्ती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनु शकते. हा काही गेल्या दहापंधरा वर्षातील शासकीय धोरणांचा परिणाम नाही. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जे वातावरण देशात निर्माण झालं, लोकशाहीची पाळंमुळं रुजवण्यात आली त्याचा हा परिपाक आहे. 

अजून खूप काही प्रगती करायची बाकी असेल पण जी झाली आहे ती कमी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा देशात किती गरिबी होती हे त्या काळातील कृष्णधवल फोटो बघितले की लक्षात येतं. ते फोटो बघवत नाहीत.  

भारतातून उच्च शिक्षण घेऊन गेलेले लोक परदेशात जाऊन स्थायिक होतात असा आरोप पूर्वी केला जात असे. आता तो मुद्दाच उरलेला नाही. जगभर कोणीही कामानिमित्त कोठेही जाऊन राहु लागलं आहे.  

जगातील अनेक मोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख पदी आज भारतातून शिकून गेलेली, इथल्या मध्यम वर्गातील घरात वाढलेली मुलं आहेत. भारतीय लोकांना त्यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांच्या नावांची लांबलचक यादी समाज माध्यमांमध्ये फिरते. माध्यमांमध्ये त्यांचा उदोउदो होतो. हे ही काही गेल्या दहापंधरा वर्षात घडलेलं नाही. कमीत कमी दोन पिढयांना  - आज उच्च अधिकार पदावर बसलेल्या या व्यक्ती आणि त्यांचे आईवडील - यांना शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या, उज्वल भविष्याची स्वप्न बघता आली त्याचं हे फळ आहे.  






परवाच्या बालदिनी सध्याचे माननीय मुख्यमंत्री राज्यातील लहान मुलांना योग्य मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी आपल्या दिवंगत नेत्यांकडून खूप काही घेतलं आहे. आनंद दिघेंच्या आयुष्यावरील चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले. दिघे आता हयात नाहीत. जर असते तर त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं असतं का? किंवा बंड करायला परवानगी दिली असती का? हे आपल्याला कधी समजणार नाही. नंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचं उपनाव म्हणून बाळासाहेबांचं नाव निवडलं. बाळासाहेबही आज हयात नाही. हयात असते तर अशा प्रकारे आपलं नाव वापरायला त्यांनी परवानगी दिली असती का या प्रश्नाचं उत्तर उघड आहे.  
                                                        
मी तुमच्या कडून काय वाट्टेल ते घेणार, तुम्ही कोण मला अडवणार? हि वागणूक दिवसेंदिवस समाजात वाढताना दिसते. त्यातून लहान मुलांना खूप चुकीची उदाहरणं समोर दिसतात. देशातील आणि समाजातील चांगले नागरिक म्हणून कशा प्रकारे वागावं याचं मार्गदर्शन मोठ्यांकडून लहान मुलांना मिळालं नाही तर कुठून मिळणार?



All photos are from Halloween'22 in New York









Monday, September 26, 2022

गोष्ट एका लग्नाची


हि एका लग्नाची काल्पनिक गोष्ट आहे. याचा वास्तवाशी काही संबंध नाही. या गोष्टीतील व्यक्तिरेखांचं राजकारणातील काही पात्रांशी साधर्म्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. 

काही वर्षांपूर्वी दोन प्रेमी जीवांनी दादरच्या वनिता समाज मध्ये लग्नगांठ बांधली. त्या लग्नाचा मुहूर्त निवडण्यापासून ते कार्यालय बुक करण्या पर्यंत सगळं माझ्या आईनी केलं. तिचा त्या लग्नाशी काय संबंध होता मला माहित नाही. 

पूर्वी दादर मध्ये दोन मोठी मराठी महिला मंडळं होती (अजूनही असतील कदाचित). : दादर (पूर्व) मध्ये हिंदू कॉलनीत भगिनी समाज होता...जिथे माझी मावशी जायची आणि दादर (पश्चिम) मध्ये शिवाजी पार्क समोर समुद्राच्या बाजूला वनिता समाज होता -जिथे कधी काही चांगले कार्यक्रम असले तर माझी आई आमच्या शेजारच्या इमारतीत रहाणाऱ्या जोशी काकूं बरोबर ते बघायला जायची. 

आईला वनिता समाज मधील लग्नाच्या हॉलचं फार कौतुक होतं. त्या काळात दादर मध्ये रहाणाऱ्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय मराठी घरातील मुलांची लग्न वनिता समाज मध्ये होत असंत. महिनों महिने आधी ते कार्यालय बुक करावं लागायचं. वनिता समाज मध्ये मुलांचं लग्न होणं हे दादर मधल्या पालकांना त्यांच्या प्रतिष्ठेचं चिन्ह वाटायचं. निदान माझ्या आईला तरी वाटायचं. 

त्यामुळे अपूर्व आणि पद्मा यांच्या विवाह समारंभासाठी तिने अर्थातच वनिता समाजातील मंगल कार्यालयाची निवड केली. 

शिवाजी पार्कच्या जवळ रहात असुनही आणि नियमित वनिता समाजात कार्यक्रमांना जात असुनही, पार्क मध्ये दसऱ्याला काय होतं हे तिच्या लक्षात आलं नाही. जर आलं असतं तर एखाद्या सुज्ञ व्यक्तीने दसऱ्याचा मुहुर्त वनिता समाजमधील लग्नासाठी निवडला नसता. तो हॉल रिकामा मिळतोय यांनेच आई हुरळुन गेली असावी. 

दसरा हा साडेतीन मुहूर्तां पैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी ते कार्यालय रिकामं मिळालं याचं कारण मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन इतर कोणी त्या दिवसासाठी ते बुक केलं नसावं. आईच्या ते लक्षात आलं नाही. 

तरीही अपूर्व आणि पद्मा यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीची अडचण त्यांच्या समारंभाला फारशी भोवली नाही. लग्नासाठी आलेले नातेवाईक आपापल्या गावी परत गेले. नवविवाहीत जोडप्याने त्यांचा संसार सुरु केला. पुढली काही वर्ष दोघे एकत्र नांदले. गुण्यागोविंदाने एकत्र नांदले असं म्हणता येणार नाही.  

अपूर्व संसारात नाखूष होता. तो कायम तक्रार करत राहीला. घटस्फोटाची भाषा करत राहीला. वारंवार आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत राहीला. पद्मानी नवऱ्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं. 

अपूर्व जरी पत्नीवर नाखूष असला आणि वारंवार घटस्फोटाची धमकी देत असला, "घटस्फोटाचा अर्ज नेहमी माझ्या खिशात असतो" असं घरी येणाऱ्याजाणाऱ्या सगळ्यांना सांगत असला तरी त्यानं लग्न संपवण्यासाठी काही पावलं उचलली नाहीत. त्यामुळे शिव आणि पद्मा यांचा संसार काही वर्ष टिकला. 

चारपाच वर्ष नाखुषीत घालवल्या नंतर अपूर्वनी ठाम भूमिका घेण्याचं ठरवलं. त्यानं आपल्या मागण्या पद्माला सांगितल्या. आपण आपल्या मागण्यांवर ठाम रहाणार असल्याचंही सांगितलं. 

ते ऐकल्या बरोबर पद्मा खवळली. "फसवणूक...माझी फसवणूक होतेय," असं म्हणू लागली. 

"लग्नाआधी आपलं ठरलं होतं कि लग्नानंतर तू कायम घर सांभाळणार आणि मी नोकरी करायची आणि आता तू म्हणतोस कि निम्मा वेळ तु नोकरी करणार आणि मी घरी बसायचं? मला हे कदापि मान्य नाही. मी घर सांभाळणार नाही. ही माझी फसवणूक आहे. तुला जर वचन पाळायचं नव्हतं तर लग्नानंतर कायम घर सांभाळण्याचं तू लग्नाआधी का कबूल केलं होतंस ?" पद्मा पुन्हापुन्हा तेचतेच म्हणत राहिली. 

लग्नाआधी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्याने दोघांनी एकमेकांना अनेक वचनं दिली होती आणि आणाभाका घेतल्या होत्या हे ती विसरली. पत्नीचा आडमुठेपणा बघुन अपूर्वही मागे हटायला तयार होईना. शेवटी दोघांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. दोघेही हट्टाला पेटल्याने त्यांच्या संसाराच्या विभागणीत कॊणाला काय मिळणार हे ठरवण्यासाठी दोघांनी न्यायालयाकडे धाव घेतली.                                                                           

                                                                            *****

एकदा रात्री आई माझ्या स्वप्नात आली. ती पुणेवासी होती तेंव्हा मी तिला नियमित फोन करत असे पण ती स्वर्गवासी झाल्यापासून तिनं माझ्याशी काहीही संपर्क ठेवलेला नाही. ती गेली ती गेलीच. पण त्यादिवशी स्वप्नांत आली आणि म्हणाली. "अपूर्वनी तडकाफडकी घर का सोडलं? त्यानं असं भावनेच्या भरात घर सोडायला नको होतं". 

मी गाढ झोपेत होते. तरी तिला म्हंटल, "तुला काय माहित त्यानं तडकाफडकी घर सोडलं? आपल्याला वाटतं ते अचानक घडलं याचा अर्थ असा नाही कि त्यानं तो निर्णय भावनेच्या भरात घेतला. तो निर्णय त्यानं त्याच्या वकिलांच्या सल्ल्याने घेतला असेल." 

आईला ते पटलेलं दिसलं नाही म्हणून मी म्हंटल,  " अगं, ज्या तऱ्हेनं अपूर्व आणि पद्माचे वकिल आपापल्या अशिलांची बाजू सध्या न्यायधिशां समोर मांडत आहेत आणि गेली काही वर्ष त्या दोघांची आपसात कशी भांडण चालली होती याच्या बातम्या आता आपल्या कानावर येत आहेत ते ऐकल्यावर असं वाटू लागलय कि गेले कित्यके महिने किंवा वर्ष ते दोघेही आपापल्या वकिलांचा सल्ला घेत असावेत. "

आई थोडी नवऱ्याशी जुळवून घ्यावं या संस्कारातली होती. ती म्हणाली, " पद्मानी जरा जुळवून घ्यायला हवं होतं. एवढी वर्ष तिनं नोकरी केली होती. काय बिघडलं असतं थोडी वर्ष घर सांभाळलं असतं आणि अपूर्वला नोकरी करू दिली असती तर? निदान मुलांसाठी तरी घर सांभाळण्याचं काम वाटून घ्यायचं. आता हि न्यायालयातली लढाई किती दिवस चालणार, त्यात मुलांची किती फरपट होणार? आणि शेवटी कोण जिंकणार?" 

आईच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. 

                                                                       *****

जे खऱ्या आयुष्यात घडतं त्यातुन काल्पनिक गोष्टी सुचतात किंवा उलटही होऊ शकतं. कल्पना आणि वास्तव यांची सरमिसळ होत असते. 

गेल्या काही महिन्यांतल्या राजकीय घडामोडी बघता एक रहस्यमय मालिका दूरदर्शनवर दाखवण्यात येत आहे असं वाटू लागलं आहे. या मालिकेची निर्मिती कधी सुरु झाली, कथानक कसं उलगडत गेलं आणि शेवट काय होणार याचा अंदाज त्या मालिकेतील सगळ्या पात्रांना आणि त्यांच्या सल्लागारांना असावा. फक्त प्रेक्षकच सस्पेन्स मध्ये आहेत असं दिसतंय.  

सत्तेच्या लालसे पोटी राजकीय नेत्यांनी राज्याला अनिश्चितते मध्ये लोटलं आहे, त्यांच्या वागण्यावर आपलं काही नियंत्रण उरलेलं नाही अशी भीती लोकांच्या मनात घर करू लागली आहे. 

जेंव्हा भीती मनात घर करू लागते तेंव्हा आपण काय करतो? 

प्रथम आपण Go भीती Go आणि Go अनिश्चितता Go असे मंत्रजप करतो. दहा कोटी लोकांनी श्रद्धेने हे मंत्रजप केले तर कुमारी भीती आणि कु.अनिश्चितता या जुळ्या बहिणी घाबरून तात्काळ चीनला पलायन करतील असा आपल्याला विश्वास वाटतो.

दुर्दैवाने सगळे लोक ऐकत नाहीत. मनोभावे जप करत नाहीत. त्यापेक्षा ते मनोरंजनाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे जप निष्प्रभ ठरतात. तसं झालं तर... 

                                                                              *****

... तर जप करायचं सोडून देऊन आपण नुसताच विचार करत बसतो. तेंव्हा या मालिकेतील कथानकाशी समांतर घटना आपल्याला सभोवताली घडलेल्या दिसतात:  

दादरला पोर्तुगीज चर्च आहे. त्याच्या तिरकं समोर रस्त्याच्या पश्चिम बाजूला गोखले रस्त्यावर एक खाणावळ होती. आधी एक होती पण नंतर त्याच्या दोन खाणावळी झाल्या: त्यातल्या एकाचं नाव आहे मालवण किनारा आणि त्याला अगदी लागून असलेल्या दुसऱ्या खाणावळीचं नाव आहे मालवणी किनारा. काही वर्षांपूर्वी त्या खाणावळीचे दोन भाग झाले.   

पक्ष विघटनाशी समांतर अशी हि घटना आहे.  

मालिकेतलं दुसरं महत्वाचं कथानक म्हणजे संस्थापकांना किंवा त्यांच्या वारसदारांना पदच्युत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

जगद्विख्यात ऍपल कंपनीचा इतिहास सर्वाना माहित आहे. एकोणीसशे शहात्तर साली स्टिव्ह जॉब्ज याने आपला मित्र स्टिव्ह वॉझनियाक बरोबर ऍपल कंपनीची स्थापना केली. एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी मॅकनटॉश संगणक पहिल्यांदा बाजारात आणला. परंतु जॉब्जनी ज्या व्यक्तीची ऍपलच्या सीईओ पदी नेमणूक केली होती त्याने कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर मिळून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जॉब्जला ऍपल सोडायला भाग पाडलं.   

साधारणपणे इथपर्यंतचं कथानक आपण आजवर बघितलं आहे. ही समांतर उदाहरणं सेवाभावी राजकारणातील नसुन स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रातील आहेत हा भाग वेगळा. मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय होणार हा प्रेक्षकांसाठी सस्पेन्स आहे. 

खऱ्या आयुष्यात, आपणच सुरु केलेल्या कंपनीतुन उचलबांगडी झाल्यावर स्टिव्ह जॉब्ज ने NeXT नावाची कंप्युटर प्लॅटफॉर्म विकसित करणारी कंपनी स्थापन केली. एकोणीसशे शह्यांणव साली ऍपलने NeXT विकत घेतली. त्या मार्गाने जॉब्ज स्वगृही म्हणजे ऍपल मध्ये परतला आणि कंपनीचा अध्यक्ष बनला. पुढे काही वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यानं आय फोन सहीत तत्सम अनेक लोकप्रिय उत्पादने बाजरात आणली. त्या काळात त्यानं आपलं आरोग्य गमावलं. पण ऍपलच्या उत्पादनांनी जगाला वेड लावलं. 

                                                                                *****                                                                                  

या मालिकेतली दृश्य बघितली तर असं वाटतं कि काही पुरुष राजकीय नेते मिळून आपसात त्यांचा सत्ते पे सत्ता चा खेळ खेळत आहेत. एकदोन ठळक नावं वगळली तर ते महिलांना आपल्या खेळात समाविष्ट करून घेताना दिसत नाहीत. 

हे चिंताजनक आहे. आजवर मुंबई हे महिलांसाठी खुप सुरक्षित शहर राहिलेलं आहे. राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांत महिला रात्रीच्या वेळी एकट्यादुकट्या बाहेर जाऊ शकत नाहीत असं म्हणतात. 

भविष्यकाळातही मुंबई महिलांसाठी सुरक्षित राहील याची काळजी महिलांना घ्यावी लागेल. त्यासाठी जागरूक रहावं लागेल. नाहीतर बघता बघता हे शहर महिलांसाठी असुरक्षित होईल आणि ते लक्षात येई पर्यंत काही करण्याची वेळ टळून गेलेली असेल. 

                                                                               *****

गणपती तर गावाला गेले. आपल्याला त्यांच्यावाचून चैन पडो न पडो आता दसरा आणि दिवाळी येईल. शोभा डे यांनी त्यांच्या Selective Memory: Stories from My Life या पुस्तकात दिवाळीशी निगडित एक आठवण सांगितली आहे. त्या लिहितात: 

'मी नेहमी मुलांना घेऊन दिवाळीची खरेदी करायला जुन्या बंगल्याच्या जवळ असलेल्या मध्य मुंबईतील बाजारात जात असे...   नेहमी प्रमाणे बरीच लहान मुलं मला चिकटलेली होती. आम्ही अनेक लहानसहान गोष्टी घ्यायला थांबलो. अवंतिकाच्या हातात आठ छोटे रंगीबेरंगी कंदील होते (ती जेमतेम सहा वर्षांची होती). आदित्य उत्साहाने त्याचे (फटाके) बॉम्ब आणि रॉकेट्स मिरवत होता. तेवढ्यात मला एक म्हातारी आज्जी विशष्ट प्रकारच्या रांगोळीच्या पॅटर्न्सच पुस्तक विकताना दिसली. तिच्याकडून मी ते पुस्तक घेतलं आणि पर्स मध्ये सुट्टे पैसे शोधण्यापुरता मुलांचा हात सोडला. याला तीस  सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला नसेल. तिथुन निघताना जेंव्हा मी परत मुलांची संख्या मोजली तेंव्हा एक मुल कमी भरलं. माझंच. दिवाळीच्या खरेदीत मग्न गर्दीनी खचाखच भरलेल्या त्या अंधाऱ्या गल्लीत अवंतिका कुठे दिसेना. 

मी माझ्या हातातले छोटे हात सोडू शकत नव्हते. गजबजलेल्या कोपऱ्यावर त्यांना एकटही सोडू शकत नव्हते. शोधक नजरेनं आणि धडधडत्या छातीनी मी अक्षरशः त्यांना ओढत प्रत्येक फेरीवाल्याकडे जाऊन विचारलं, "तुम्ही लहान मुलीला बघितलं? तिच्या हातात कंदील होते".  बहुतेकांनी मान हलवून कुठे तरी लांब बोट दाखवत म्हंटलं,  "ती त्या बाजूला गेली". अशक्य. सहा वर्षांची मुलगी काही सेकंदात इतक्या लांब कशी जाईल? तरीही ज्याला ज्याला मी विचारलं त्या प्रत्येकाने अगदी खात्रीने सांगितलं, "त्या दिशेला"  

मी माझ्या नेहमीच्या सराफाच्या दुकानात शिरले. ओरडून तिथल्या विक्रेत्यांना विचारलं, "माझी मुलगी.... तुम्ही माझ्या मुलीला पाहिलंत का? चमचमत्या सोन्याच्या काउंटर मागून ते ही ओरडले, " हो. आली होती ती इथे. पण ती आता इथे नाहीय." ते तर दिसतच होतं. पण ती इथे नाही तर कुठे होती? 

तशीच सगळ्या बच्चे कंपनीला घेऊन मी त्या अरुंद, घाण कचरा विखुरलेल्या छोट्या फुटपाथवरून तिला हाका मारत धावत सुटले. 

ते दृश्य बघण्या सारखं असेल: एक सैरभैर झालेली बाई, तिच्या ओढणीला अर्धा डझन मुलं लटकतायत, "अवंतिका" असं पुकारत सैरावैरा धावतेय. 

पन्नास मीटर अंतरावर दोन पुरुषांनी मला गाठलं. 

"तुम्ही कंदीलवाल्या लहान मुलीला शोधताय का?" 

"हो" मी किंचाळले. 

"ती घरी गेली," ते शांतपणे म्हणाले. 

"तुम्हांला कसं माहीत. तुम्ही कोण?"

"ती रडताना दिसली म्हणून आम्ही तिला थांबवलं. आमची एक महीला स्वयंसेविका तिला इथे घेऊन आली आणि तिला तिचं नाव आणि पत्ता विचारला. तुम्ही जवळच रहाता ना? तिनं त्या बोळातुन बंगल्याकडे जाण्याचा शॉर्ट कट दाखवला. काळजी करू नका. ती सुरक्षित आहे. त्या तिला घरी घेऊन गेल्या."

त्या क्षणी मी तर मेलेच. नक्कीच. छातीतली धडधड थांबली. अवंतिका माझी लाडकी बाळी घरी सुरक्षित होती. मला दुसरं काही सुचत नव्हतं ना कशाची पर्वा होती. माझे ओठ कोरडे पडले होते. त्यावरून जीभ फिरवत मी त्यांना पुन्हा विचारलं, " तुम्ही कोण?'

"आम्ही या भागातल्या शिवसेना शाखेचे आहोत," ते उत्तरले.' 

त्या आठवणीच्या शेवटी शोभा डे लिहितात, " I don't care what anybody thinks of the Sena. I owe them one. A big one. I'm deeply, deeply grateful. And indebted for life (मी त्यांची आजन्म ऋणी आहे)".