Sunday, October 13, 2019

ये दिन क्या आये




      
                                                                   


निवडणूक संपली. मग त्यावर उलट सुलट चर्चा झाली. पत्रकारांनी विचारलं कि प्रचार आणि निवडणूक यातील असा एखादा प्रसंग सांगा जो कायम तुमच्या स्मरणात राहील. कोणी म्हणालं की श्रीयुत अक्षय कुमारनी गुलाबी रंगाची विजार घालूंन पंतप्रधानांची मुलाखत घेतली तो प्रसंग सर्वात अविस्मरणिय होता. कोणी दुसरा कुठलातरी प्रसंग कायम लक्षात राहिलं असं सांगितलं. मी ही मग या प्रश्नावर विचार केला आणि राहून राहून एक दृश्य डोळ्यांसमोर येत राहीलं. निवडणूक आणि प्रचाराच्या तापलेल्या वातावरणात, नजरेला गारवा देणाऱ्या हिरवळीवर टाकलेल्या खुर्च्यात बसुन, जुन्या वृक्षांच्या छायेत, हलक्या फुलक्या रंगाचे कपडे घालून तितकेच हलके फुलके प्रश्न पंतप्रधानांना विचारत, अक्षय कुमारनी आपल्या देशबांधवांच्या मनावरचा ताण हलका करण्याची फार बहुमोल कामगिरी बजावली यात शंका नाही पण तरीही मी त्या दृश्याला निवडणूक - प्रचार दृश्य क्रमांक १ चा दर्जा देऊ शकत नाही. माझ्या मते निवडणूक - प्रचार दृश्य क्रमांक १ चा बहुमान दुसऱ्याच एका मुलाखतीला मिळायला हवा.



  



ती मुलाखत म्हणजे स्वतःला साध्वी म्हणवुन घेणाऱ्या एका महिला उमेदवाराची एका वार्ताहराने बागेत उभं राहुन घ्यावी तशी एका गोठ्यात उभं राहुन घेतलेली मुलाखत. फारच वेगळी मुलाखत होती ती. अशा अर्थानी कि भगव्या पेहरावातील स्वयंघोषित साध्वी एका गायी जवळ थांबुन तिला चारा भरवित होती. तिच्या पाठीवरून मायेनी हात फिरवत होती. कुठल्या दिशेनी हात फिरवला कि आपला रक्तदाब (गायीचा नव्हे) नियंत्रित व्हायला मदत होते ते दाखवत होती. पत्रकार आवश्यक ते गांभिर्य चेहऱ्यावर ठेऊन अधून मधून शंका उपस्थित करत होता. ती त्यांला गोमातांची महती विषद करून सांगत होती. मध्येच ती म्हणाली कि तिनं तिचा कर्करोग गोमूत्र उपचारांनी बरा केला. सहज चालता चालता तिनं उपचारांची पाककृती सांगितली - गोमूत्र  + तूप + असच काहीतरी. असेलही. तिला त्या उपचारांचा उपयोग झाला असेलही कदाचित. कुणास ठाऊक. कोणी कुठली उपचार पद्धती वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दा तो नाही.  (स्वयं ---) साध्वी असंही म्हणाली कि गोठा हि साधना आणि तपस्या करण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. तिच्या पाठीमागे उभं असलेल्यांनी मान डोलावत तिची री ओढली.



                                     



ती मुलाखत बघताना सारखं असं मनात येत होतं कि हे दोघे बगिच्यात उभे असल्या सारखे गायींच्या मध्ये उभे आहेत, त्यांच्या मागे लोकांचा मोठा जमाव दिसतोय पण गोठ्यात गोमुत्राचा आणि शेणाचा वास येत नसेल?  सतत चालू असलेल्या मलमूत्र विसर्जन प्रक्रियेमुळे गोठ्यातील जमीन कायम दमट असते. तिथे माशा घोंघावत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कितीही स्वच्छता राखली, शेण खाली पडताच लगोलग साफ केलं तरी गोमूत्र कसं साफ करणार?  कॅमेरे आणि मुलाखतीचा लवाजमा गोठ्यात येण्याआधी जमिनीवर गुलाबजल किंवा अत्तर शिंपडलं तरी गोठ्यातला शेण -गोमुत्राचा वास झाकला गेला असेल असं वाटत नाही. पण यातलं काहीच कॅमेऱ्यावर दिसलं नाही. कोणी नाक मुरडताना दिसलं नाही कि घोंघावणाऱ्या माशांनी त्रस्त झालेलं दिसलं नाही. पडद्यावर स्वयं(---) साध्वी आणि वार्ताहार ऍमस्टरडॅम मध्ये ट्युलिप्सच्या ताटव्यांच्या मध्ये उभं असावं इतक्या सहज गोठ्यात बांधलेल्या गायींच्या मध्ये उभे होते (वार्ताहराच्या मनात तेंव्हा ये कहाँ आ गये हम युंही साथ साथ चलते घोळत होतं का ते हि कळायला मार्ग नाही). म्हणून त्या दृश्याला निवडणूक प्रचार  क्रमांक १ चा दर्जा द्यावासा वाटतो.



                                        



वरील प्रश्न महाराष्ट्रातील निवडणूकांच्या नंतर विचारण्यात आला तर एका वाक्याला वरचं स्थानं मिळेल. राज्यातील निवडणूक प्रचाराला आत्ताच कुठे सुरवात होतेय, परंतु कायम स्मरणात राहील असं वाक्य पत्रकार वागळे अगदी सुरवातीलाच म्हणून गेले जेंव्हा ते म्हणाले कि "कमळाबाईंनी वाघोबाला शेंडी लावली." सद्य परिस्थितीच वर्णन, त्यावर भाष्य सगळं त्यात आलं. त्याहीपेक्षा संस्मरणीय वाक्य आता कुणी पत्रकार किंवा उमेदवाराकडून ऐकायला मिळतं का हे दिसेलच. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईत रहाणाऱ्या सचिननी मुंबईत रहाणाऱ्या लताबाईंना (सध्या त्या कुठे राहतात माहीत नाही पण पूर्वी तरी मुंबईतच रहायच्या) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या - हिंदीतून. मराठीतून दिल्या असत्या तरी बाईंना समजल्या असत्या. पण मला तरी एकही मराठी वाक्य ऐकू आलं नाही. तेंव्हा वरील वाक्याची आणि खालील गाण्याची आठवण झाली आणि यमक जुळून आलं:                              
                                                        या चिमण्यांनो परत फिरा रे भाषेकडे अपुल्या
                                                             लावल्या वाघोबाला शेंड्या लावल्या
(खरतर शेंड्या लावल्या असं म्हणत नाहीत शेंडी लावली हा वाक्प्रचार आहे. पण शेंडी लावली च आपुल्याशी यमक जुळलं नसतं).



                                          



बाकी बाईंचा वाढदिवस मानानी साजरा झाला हे फार बरं झालं. नाहीतर आजकाल काही ठिकाणी लताबाई बॅशिंगची फॅशन आलेली आहे. बाईंनी अमुक केलं, तमुक केलं, त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी गायिकांना पुढे येऊ दिलं नाही असे आरोप मुलाखतीं मध्ये अधून मधून ऐकू येतात. राज्यसभा टीव्हीच्या मुलाखतींच्या कार्यक्रमात एरवी चांगल्या मुलाखती घेणारा मुलाखतकारही या फॅशन ट्रेंडला बळी पडलाय असं वाटतं. महिला गायिकांच्या मुलाखती घेताना तो हा मुद्दा आवर्जुन उपस्थित करतो. उषा उथुप यांची मुलाखत घेताना त्यांना म्हणाला कि "लताबाईंच्या आवाजानी भारतीय स्त्रीला स्वयंपाकघराकडे लोटलं असं संगीतातले स्कॉलर्स म्हणतात..."  संगीतातले स्कॉलर्स असं का म्हणतात माहित नाही. सर्वसामान्य लोकांना बाईंच्या आयुष्या बद्दल जे माहित आहे ते असं कि त्यांचे वडील त्या लहान असताना वारले. त्यानंतर लगेच त्या सिनेमात काम करु लागल्या. आपल्या कुटुंबाची आणि लहान भावंडांची जबाबदारी त्यांनी उचलली. जी स्त्री स्वतः लहान वयात नोकरी साठी घराबाहेर पडली आणि आयुष्यभर व्यवसायिक स्वरूपात गात राहीली ती इतर महिलांना स्वयंपाक घराकडे कशी ढकलू शकते?  हळुवार, रोमँटिक गाणी गायली म्हणून? तसं असेल तर त्यात ती गाणी लिहणाऱ्यांचा आणि ज्या सिनेमासाठी ती गाणी लिहिली गेली त्या सिनेमांचाही  हात असणार. आणि हे सगळं त्या काळा नुरूपच घडत असणार. त्यासाठी एकट्या बाईंना दोष देण्यात काय अर्थ. नंतर हेमलता. मला काही त्यांना नावं ठेवण्याचं कारण नाही. त्यांचं ते अखियोंके झरोखोंसे गाणं एकेकाळी फार गाजलं होतं. पण जवळपास चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या चित्तचोर सिनेमातल्या गाण्यांमध्ये त्यांना वरच्या पट्टीत सुरात गायला कष्ट पडतायत असं वाटलं होतं. त्या सिनेमातली गाणी अविस्मरणीय झाली ती येसूदासमुळे. राज्यसभा टीव्ही वरील मुलाखतीत हेमलतानी काही गाणी सादर केली. तेंव्हा त्यांना वरच्या पट्टीत गाण्यासाठी चाळीस वर्षांपूर्वी पडले होते त्याच्या चाळीस पट जास्त कष्ट आज पडतायत असं वाटलं. तरीही मुलाखतकार त्यांना लताबाई बॅशिंगची पुन्हा पुन्हा संधी देऊ पहात होता.



                                          



इतर गायिकांना बाईं इतकी गाणी गायला मिळू शकली नाहीत याची कारण निरनिराळी असू शकतात. एक कारण असंही असू शकतं कि बाकीच्या गायिकांनी आपलं घर, संसार, मुलंबाळं सांभाळून पार्श्वगायन करण्याचा प्रयत्न केला असेल तर बाईंनी आपलं सर्वस्व गायनाला वाहिलं. आशा वेळी जे इतर कुठल्याही क्षेत्रात महिलांच्या बाबतीत होतं तेच इतर गायिकांच्या  बाबतीत झालं असण्याची शक्यता आहे.



        
               
                     

या ठिकाणी बार्बरा वॉल्टर्स या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही पत्रकार महिलेचं एक वाक्य आठवतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या की कुठलीही स्त्री आयुष्यात दोन गोष्टी उत्तम रित्या करू शकते  - ती एक चांगली आई होऊ शकते आणि आपल्या व्यवसायात खूप यशस्वी होऊ शकते पण मग तिचं तिच्या घराकडे आणि नवऱ्याकडे दुर्लक्ष होतं; तिनं मुलं आणि नवरा यावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर तिला तिच्या नोकरीत किंवा व्यवसायात हवं तितकं यश मिळू शकत नाही; आणि जर एखादया स्त्रीनं आपला नवरा आणि करिअर यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर तिचं तिच्या मुलांकडे दुर्लक्ष होणं अपरिहार्य असतं. पण तीन गोष्टी एकत्र - एखादी स्त्री करिअर मध्ये अत्युच्च स्थानावर पोहोचली आहे आणि घर, मुलं आणि नवरा यांच्याकडेही तिचं अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही असं होऊ शकत नाही. हे वॉल्टर्स अर्थतच त्यांच्या काळाबद्दल म्हणाल्या होत्या. त्या लताबाईंच्या समकालीन. इतक्या समकालीन कि बाईंचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ चा आणि बार्बरा वॉल्टर्स यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९२९.



       



अर्थात लोकांची मतं आणि गाण्यांची आवडनिवड वेगवेगळी असू शकते. त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली तर त्यात वावगं काहीं नाही. तसच बाईंचा आवाज आणि त्याची मोहिनी म्हणजे काय phenomenon आहे, आजही भारतात महिला गायिकांच्या  आवाजाचा तो मानदंड का मानला जातो हे संगीत तज्ञांनी उलट सुलट विश्लेषण करून जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यातही काही चूक नाही. पण The proof of the pudding is in the eating. - पुडिंग किती चांगलं झालं आहे हे ते किती खाल्लं जातं त्यावरून ठरतं. तसं बाईंच्या गाण्यांचं श्रेष्ठत्व त्यांची गाणी किती ऐकली जातात त्यात आहे. आणि ऐकली तर ती आजही जातातच. अनेक वेगवेगळ्या प्रकारची तरुण गायकांनी गायलेली गाणी आज हिट होत असतानाही बाईंची गाणी ऐकली जातात हे विशेष. किंबहुना ती इतकी ऐकली जातात कि एखादा आजचा संगितकार, कोणी तरी रस्त्यात म्हंटलेलं बाईंचं एक जून गाणं शोधून आपल्या नविन गाण्याच्या प्रसिद्धी साठी ते पुरेपूर वापरण्याचा केविलवाणा प्रयत्न आज करताना दिसतो - तेही  त्यांच्या येऊ घातलेल्या मोठ्या वाढदिवसाची संधी साधून. अशा प्रकारांमुळे बाईंच्या आवाजाची चिरकाल टिकलेली लोकप्रियता सिद्ध व्हायला मदतच होते.



       
                                     


बाईंचं तुम्हांला सर्वात जास्त आवडलेलं एक गाणं निवडा असं सांगितलं तर निवडता येणार नाही. कुठलं आणि कसं निवडणार. पण माझ्यासाठी एक गोष्ट फार सोप्पी आहे. मला जर त्यांचं सर्वात न आवडलेलं क्रमांक एकचं गाणं निवडायला सांगितलं तर मी एका फटक्यात उत्तर देऊ शकेन  -  बिंदिया चमकेगी चुडी खनकेगी. खूप लोकप्रिय गाणं आहे ते. मला वाटतं बिनाका गीत माला चालूं होती तेंव्हा ते प्रथम क्रमांकावरही आलं होतं. मला ते पूर्वी आवडलं नाही आणि आजही आवडत नाही. आणि नावडत्या गाण्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर - क्लोज सेकंड - बागो में बहार है कलियों पे निखारे है आणि तिसऱ्या क्रमांकावर आजकल पांव जमी पर नाही पडते मेरे. नावडत्या गाण्याची यादी तशी तोकडी आहे.



       








yesheeandmommy@gmail.com
अश्र्विन (कोजागरी) पौर्णिमा 

                                     

Monday, September 2, 2019

मुंबईकर (१)

 

मे महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी बिंदुनी घर सोडलं. दुपारची जेवणं झाल्यावर तिनं स्वयंपाकघर आवरलं, उरलेलं जेवण फ्रिजमध्ये ठेवलं, तिरमिरीत बॅग भरली आणि मुक्काम आईच्या घरात हलवला. कुलदीप पवारांबरोबर रहायचा आता तिला कंटाळा आला होता. आईचं घर बंद असायचं. आईवडील कधीतरी जायचे. पण ते तिथे नसतील तेंव्हा घराची किल्ली बिंदुकडे असायची. आईची परवानगी घ्यायची तिला गरज पडली नाही.

शेवटचं भांडण कशावरून झालं याची इतकी वेगवेगळी कारण तिनं वेगवेगळ्या लोकांना सांगितली आहेत कि नेमकं कारण काय घडलं हे आता तिलाही आठवत नाही. भांडणं तशी रोजचीच होती. पवार निवृत्त होण्या आधीपासून ती त्यांना सांगत होती, "आपण मुंबईत घर बघूया. तुम्ही निवृत्त झाल्यावर माझी काही तुमच्या गावी जाऊन रहायची इच्छा नाही. मला माझ्या आई जवळ आणि भावंडांच्या जवळ रहायला आवडेल. इतकी वर्ष तुमच्या फिरतीच्या नोकरीमुळे मला माझ्या माणसांपासून लांब रहावं लागलं. माझी आई आणि भावंडं मुंबईत एकत्र जमून मज्जा करतात आणि मी मात्र दर वेळी त्यातून वगळली जाते. निदान आता तरी मला माझ्या माणसांच्या जवळ रहायला मिळुदे. तुमच्या मावशीचं एवढं छान घर आहे मुंबईत. जुना भाड्याचा फ्लॅट असला तरी चांगला प्रशस्त आहे. मध्यवर्ती ठिकाणी आहे. शिवाय मावशींना मुलबाळ नाही. त्याही आता थकल्यात. जरा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तो फ्लॅट आपल्याला मिळाला तर बरच होईल."

पण पवारांनी बिंदुचं ऐकलं नाही. मावशीचं घर तिच्या पश्चात आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत. त्यांची काही तत्व होती ती सोडायला ते तयार नव्हते. स्वेच्छा निवृत्ती स्विकारल्यावर त्यांनी आपल्या इच्छे प्रमाणे गावात घर बांधलं. या निर्णयाची फार मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली...पण ते पुढचं पुढे.

बिंदुचा चडफडाट झाला. आता गावी रहायला गेलं कि हे त्या फटफटीवरून शेतावर जाणार, मग शेतात मित्रांबरोबर दारूच्या पार्ट्या रंगणार...या विचारांनी तिला अस्वस्थ केलं. तिनं धाकटी बहीण टुणटुण जवळ आपली मनोव्यथा व्यक्त केली, "इतकी वर्ष सैन्याच्या कृपेनी दिल्लीत रहायला मिळालं आणि आता काय गं हे माझ्या नशिबी आलय. कशी जाऊन राहू मी कोल्हापूरात."

टुणटुण नेहमी सल्ला द्यायला टपलेली असे. सगळ्या भावंडांच्यात आपणच सर्वात हुशार अहोत, आई आणि भावंडांना योग्य मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे असा तिचा ठाम विश्वास होता. तिनं तत्परतेनं बिंदूला सल्ला दिला, " त्यांना सांग ना, मुंबई नको तर नको निदान पुण्यात तरी फ्लॅट घेऊन ठेवा. पुणं कसं मुंबई आणि कोल्हापूरच्या मध्ये आहे. कोल्हापूर पासून पुणं आता फार लांब राहिलेलं नाही. त्यांना राहू दे कोल्हापूरात. तू पुण्यात रहा. मी अधुनमधुन माँ ला घेऊन येईन. मावशी पुण्यात आहे. ती भेटेल. आपण धम्माल करू. हव्या तेवढ्या गप्पा मारू."

दोघी बहिणींच्या या प्लॅनचा सुगावा पवारांना लागणं शक्य नव्हतं पण त्यांना त्याचा अंदाज असावा. त्यांनी पुण्यात घर घ्यायलाही नकार दिला. त्यांना कोल्हापूर सोडायचं नव्हतं. निवृत्ती नंतरचं आयुष्य आपल्या गावी, आपल्या आई जवळ जावं अशी त्यांची इच्छा होती. मगाशी म्हंटल तसं या निर्णयाची फार मोठी किंमत त्यांना पुढे चुकवावी लागली. कोणी असंही म्हणतील कि बिंदु आणि टुणटुणनी मिळून त्यांच्यवर सूड उगवला... पण ते पुढंच पुढे. कोल्हापूरला रहायला गेल्यावर काही वर्षांत बिंदुनी घर सोडलं. तिची मुलं मोठी झाली होती. दुसऱ्या गावात शिकत होती. तसंही तिला आता पवारांबरोबर रहायची काही जरूर उरली नव्हती. 
                                                                        *****

मुंबईत आई लीला चिटणीसला कल्पनाच नव्हती कि मुलगी कोल्हापुरातल्या आपल्या घरात येऊन राहिली आहे. बिंदु नियमित आईला आणि बहिणीला फोन करत असे. बहिणी जवळ ती मनातलं सगळं बोलून दाखवायची, पण आईला मात्र काही पत्ता लागू देत नसे. सगळं पूर्वी प्रमाणेच चाललंय असं भासवायची. लीला चिटणीस न चुकता जावयांची चवकशी करत. त्यांची आणि नातवंडांची खुशाली विचारत. पण आई पासून फार काळ काही लपून राहू शकत नाही असं म्हणतात. एक दिवस त्यांना शंका आली. त्यांनी बिंदुला नाही पण टुणटुणला विचारलं, "बिंदु घराबाहेर पडलीय का ग?"

लीला चिटणीस स्वतः या विषयी बिंदुशी काही बोलल्या कि नाही - माहित नाही. एवढं काय झालं, तू घर का सोडलंस, अशी माहेरी किती दिवस राहशील तू, हे प्रश्न त्यांनी मुलीला विचारले का?  एक वडीलधारी अनुभवी स्त्री आणि आई म्हणून मुलीला आपल्या नवऱ्याकडे परत जाण्याचा पोक्त सल्ला दिला का, मुलीचा संसार मोडू नये म्हणून काही प्रयत्न केले का -काहीच माहित नाही. त्यांचे पती सूर्यकांत वारल्यानंतर लीला चिटणीसच्या हातात काही उरलं नव्हतं. वडील गेल्यापासून आईचे सगळे निर्णय टुणटुणनी स्वतःकडे घेतले होते. आईची काळजी फक्त आपल्यालाच आहे, आईसाठी काय योग्य किंवा अयोग्य आहे, आईनी काय करावं किंवा काय करू नये  हे ठरविण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे असा तिचा दावा होता आणि तो दावा खोडुन काढण्याची कोणाची हिंमत नव्हती. टुणटुणच्या अंगात कायम कोणाविरुद्ध तरी आवेष संचारलेला असे आणि त्या आवेषापुढे कोणाच काही चालत नसे, अगदी तिचे यजमान निळू फुलेंच सुद्धा नाही मग लीला चिटणीसचा काय निभाव लागणार. पवारांना सोडण्यासाठी टुणटुणनी बिंदुला पाठिंबा दिला. " परत पवारांकडे जाशील तर बघ!" तिनं बहिणीला बजावलं. टुणटुणच्या आवेषाचं आता पवार एक लक्ष्य बनले होते.

कोल्हापूरात बिंदुनी आईच्या घरात आपलं बस्तान बसवायला सुरवात केली. तिला जवळच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिचा दिनक्रम सुरळीत सुरु झाला. आता पवारांची कटकट मागे नव्हती. तिला खूप हलकं, मोकळं वाटू लागलं. रोजच्या भांडणां पासून सुटका झाली. बिंदुनी घर सोडल्याचा परिणाम पवारांवर काय झाला, झाला कि नाही हे नंतर पाहू. मुंबईत दोन व्यक्ती मात्र सावध झाल्या.

"माझा जुना फ्रिज कोल्हापूरच्या घरात आहे. बिंदुआक्कांना तो फ्रिज चांगलं गिऱ्हाईक पाहुन विकायला सांगा. आणि त्यांना म्हणावं शाळेत सांगून ठेवा, एखादया शिक्षिकेला जर दोन खोल्या भाड्यानी हव्या असतील तर...बिंदुआक्कांना एकटीला चार खोल्या लागणार नाहीत. दोन पुरतील. शिवाय त्यांना शेजारी कोणाची तरी सोबत असेल तर बरं होईल", लीला चिटणीसची सून शशिकलानी एक दिवस भाईंदरहून फोन करून सासूला फर्मान सोडलं. बिंदुला आपला जुना फ्रिज फुकट वापरता येऊ नये आणि अख्ख घरही रहायला मिळू नये याची सोय शशिकलानी बिंदुच्याच मार्फत केली. शशिकलाचं  हे कौशल्य बघून दुसरं कोणतरी चाट पडलं असतं पण चिटणीसांना आता त्याची सवय झाली होती.

सासूसासऱ्यांकडून आपल्याला काहीतरी मिळावं अशी निळू फुलेंचीही अपेक्षा होती. "मुलांना जे काही द्यायची आईवडिलांची इच्छा असते ते त्यांनी मुलं तरुण असतानाच दयायला हवं ",  चिटणीस कुटुंबातील कोणाच्यातरी कानावर पडेल अशा बेतानं ते हे वाक्य बोलून घेत असत. सासूबाईंचा विश्वास संपादन करण्यात त्यांनी यश मिळवलं होतं. लीला चिटणीस फुलेंना आपला मुलगा मानू  लागल्या होत्या. पण फुलेंची प्रतिक्रिया शशिकला इतकी उघड आणि तडकाफडकी नव्हती.

बिंदु पवारांना सोडून कोल्हापूरच्या घरात रहात आहे, शशिकलाचा फ्रिज विकण्यासाठी फोन आला होता या गोष्टी आईच्या बोलण्यातुन जयश्रीच्या कानावर पडत होत्या पण तिनं तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. आपल्याशी त्याचा काही संबंध आहे असं तेंव्हा तिला वाटलं नाही. सूर्यकांत आणि लीला चिटणीसची ती सर्वात घाकटी मुलगी. तिच्यात आणि मोठ्या भावंडांच्या वयात बरच अंतर होतं. जयश्री वयात आली तेंव्हा बिंदु आणि टुणटुण सासरी गेलेल्या होत्या आणि चंद्रकांतच लग्न शशिकला बरोबर झालं होतं.

सूर्यकांत होते तोपर्यंत सर्व सुरळीत चाललं. बिंदु उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन माहेरी यायची. सुट्टी संपत आली कि परत जायची. पवारांच्या नोकरीमुळे तीचं वास्तव्य महाराष्ट्रा बाहेर जास्त होतं. टुणटुण मात्र कायम आईला चिकटलेली होती. आई शिवाय तिचं पान हलत नसे. बारीक सारीक गोष्टीत तिला आईच्या आधाराची गरज भासे. स्वतःच्या जबाबदारीवर काही करायची तिला सवय नव्हती. वडिल असेपर्यंत त्यांच्या धाकामुळे ती माहेरी फारशी येत नसे पण आईशी रोज फोनवर बोलणं होई. सूर्यकांत बाहेर गेले कि लीला चिटणीस लेकीला फोन करित आणि मग मायलेकींच्या मनसोक्त गप्पा रंगत. सल्ला मसलत चाले. कधी टुणटुणला किंवा तिच्या मुलांना बरं नसलं तर लीला चिटणीस सकाळी लवकर उठुन, दोन्ही वेळचा स्वयंपाक करून, नवऱ्यासाठी दुपारचं जेवण टेबलवर ठेऊन कांदिवलीला टुणटुणच्या घरी जात. तिला काय हवं नको ते बघून सूर्यकांतना रात्रीचं जेवण वाढायला वेळेत घरी परत येत.

सूर्यकांतचा टुणटुणनी माहेरी यायला विरोध होता असं नाही. पण दुसऱ्यांच्या उठाठेवी करायच्या, लोकांच्या आयुष्यात नाक खुपसायचं, त्यांच्याविषयी गॉसिप करायचं हा तिचा स्वभाव त्यांना आवडत नसे. माहेरी आली की आतल्या खोलीत बसून आईशी हलक्या आवाजत कुजबुज करायची टुणटुणची सवय त्यांना फार खटकायची. अशावेळी सूर्यकांतचा मुक्काम एकतर बाहेरच्या खोलीत किंवा बाल्कनीत असायचा. पण जर ते बाथरूमला किंवा आपल्या बेडरूम मध्ये जायला उठले आणि पलीकडच्या खोलीतुन काही उठाठेवी कानावर पडतायत असं वाटलं तर ते रागात मोठ्ठ्यानी "लीला" अशी हाक मारून पत्नीला बाहेर बोलावून घेत. उगीचच "चहा कर...  पाणी दे", असे हुकूम सोडत. अशावेळी काहीतरी करून आई आणि मुलीच्या गप्पात खंड पाडण्याचा त्यांचा उद्देश असे.

अशीच एक दिवस दुपारी माहेरी आलेली टुणटुण संध्याकाळी घरी परत गेल्यावर रात्री जेवताना सूर्यकांतनी पत्नीला विचारलं,
 " मग...  काय म्हणत होती बच्ची?". टुणटुणला ते लाडानी बच्ची म्हणत.

"काही खास नाही. हेच आपलं इकडचं तिकडचं".

"दुपारभर इकडचं तिकडचं बोलत होती?"

"तसं नाही, म्हणजे तिला आपलं वाटतं कि आपल्या माहेरी सगळ्यांनी एकत्र रहावं. कुटुंबाची एकी कायम टिकुन रहावी. वाटणारच ना. सहाजिकच आहे ते,"  लीला चिटणीस मुलीची बाजू घेत म्हणाल्या.

बायको आणि मुलगी दुपारभर कुजबुज करत आतल्या खोलीत बसल्यामुळे आधीच वैतागलेल्या सूर्यकांतचा पारा हे उत्तर ऐकून आणखी वर चढला. "तुला मी कितीदा सांगितलंय मला दोन गोष्टी या घरात नकोयत. तू तिच्या संसारात लक्ष घालायचं नाही आणि तिला आपल्या घरात ढवळाढवळ करू द्यायची नाही." त्यांनी पत्नीला सुनावलं.

"कोणी कोणाच्याही संसारात ढवळाढवळ करत नाहीय. तुम्ही उगीच त्रागा करू नका." लीला चिटणीसनी नवऱ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शांतपणे संभाषण करणं चिटणीस दांपत्याला जमत नसे. प्रश्नोत्तरांच रूपांतर लगेच खटक्यात होई.

"किती वर्ष झाली आता तिच्या लग्नाला - दहा... बारा कि जास्तच?" सूर्यकांत गर्जले. "इतक्या वर्षात तिच्या सासरची एकी जपण्यासाठी काय केलं तिनं? आज पर्यंत कितीदा कोल्हापूरला सासरी जाऊन राहिलीय ती? तिला म्हणावं आम्ही तुला फुलेंच्या घरात दिलेली आहे. तू आता फुलेंच्या एकीची काळजी कर. चिटणीसांच्या एकीचं आम्ही काय ते बघून घेऊ." सूर्यकांत खवळून म्हणाले.

कोणी "त्या" प्रसंगाची आठवण करून दिलेली त्यांना आवडत नसे. चंद्रकांतच शशिकलाशी लग्न झाल्यावर सुरवातीला सगळे एकत्र रहात होते. एक दिवस घरात काहीतरी बिनसलं. सूर्यकांतनी मुलाला वेगळं रहायला सांगितलं. कोणाच्या तरी ओळखीनं चाळीत दोन खोल्या घेऊन चंद्रकांत आणि शशिकला भाईंदरला रहायला गेले.

त्यालाही पुष्कळ वर्ष होऊन गेली आणि एक दिवस अचानक अर्धांग वायूच्या झटक्याने सूर्यकांत गेले. तेंव्हा शिक्षण संपवून जयश्री नोकरीला लागली होती. माटुंग्याच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून व्यवस्थापनाची पदवी घेतल्यावर तिला एका आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार कंपनीत नोकरी मिळाली. घरात तिच्या लग्नाचे विचार गेली काही वर्ष चालू होते. तेही जास्त करून टुणटुणच्या आग्रहामुळे.

आजकाल टुणटुण घरी येऊन गेल्याच आईनी न सांगताही जयश्रीला समजत असे. ती संध्याकाळी उशिरा ऑफिस मधून घरी आली कि लीला चिटणीस डायनिंग टेबलवर तिचं ताट वाढून देत आणि तिच्या शेजारी बसून सहज गप्पांच्या ओघात बोलावं तसं  कुठल्यातरी लांबच्या नातेवाईकांच नाव घेऊन म्हणत, " शकूमावशीच्या मुलीला इतक्या मोठ्या स्थळा कडून मागणी आलीय. एकुलता एक मुलगा आहे. बी ए , एल एल बी झालाय. जमीनदार लोक आहेत. पुण्यात फर्ग्युसन रोडवर खूप मोठ्ठा बंगला आहे त्या लोकांचा. आपल्या इथल्या नाना - नानी पार्क एवढा त्यांच्या घराचा बगीचा आहे असं म्हणतात", किंवा "बाळु मामाच्या मुलीचं लग्न ठरलं. अमेरिकेहून आलाय मुलगा. ग्रीन कार्ड की काय ते आहे म्हणे त्याच्याकडे. आठ दिवसात लग्न करून जाणार आहे. ती मागाहून जाईल." 

आई या बातम्या सांगू लागली कि जयश्रीला कानात वेगळंच काही तरी ऐकू येई आणि अपराधी वाटे - "बघ, या दोन्ही मुली तुझ्या पेक्षा वयानी कितीतरी लहान आहेत. तुझी तिशी जवळ आलीय. त्यांचं तर अजून शिक्षणही पूर्ण झालेलं नाही. विशीच्या आत लग्न ठरली दोघींची. तुझ्या वयाची कोणी चांगली मुलं आता उरलेली नाहीत. बहुतेकांची लग्न झालीत."

लांबच्या नात्यातली शकूमावशी काय किंवा बाळुमामा काय - या लोकांशी आपली माँ अजिबात संपर्कात नाही. आबांच्या धाकामुळे हे लोक फारसे आपल्या घरी येत नाहीत आणि माँ फोनवरही कधी त्यांच्याशी बोलत नाही. या सगळ्या टुणटुण फुले अखिल पश्चिम महाराष्ट्र (मुंबई सह) उठाठेवी नेटवर्क मधून आईपर्यंत पोहोचलेल्या बातम्या आहेत हे जयश्रीला अनुभवांनी माहित झालं होतं.

खरी परिस्थिती अशी होती कि तीन मुलांची लग्न करून सूर्यकांत आणि लीला चिटणीस थकले होते. मोठ्या उत्साहानी त्यांनी जयश्रीसाठी वरसंशोधन कधी केलं नाही. शिवाय जयश्रीच्या काही ठराविक अपेक्षा होत्या: शक्यतो मुंबईतलाच हवा, पश्चिम उपनगरातला असेल तर उत्तम, आय टी मधला असेल तर चांगलं. आपल्या या अटी कमी करण्याची वेळ अजून आली आहे असं तिला वाटत नव्हतं. जयश्रीला लग्नाची घाई नव्हती. ऑफिस मध्ये कामासाठी परदेशातून येणाऱ्या बायका ती बघत होती. तिशी - चाळीशीच्या वाटतात. काहींच्या लग्नाचा पत्ता नसतो. अतिशय प्रोफेशनल असतात. आपल्या करिअरच्या बाबतीत खूप जागरूक असतात. जे बघत होती त्याचा परिणाम तिच्यावर होत होता.

कसही करून लवकरात लवकर एकदाचं आपलं लग्न व्हावं असं तिला कधी वाटलंच नव्हतं. नोकरीत जम बसे पर्यंत लग्नाचा विचार करायचीही तिची इच्छा नव्हती. ऑफिसमधले तिचे  सहकारी कामासाठी नियमित परदेशी जात. एक ना एक दिवस आपल्यालाही परदेशी जायची संधी मिळेल असं स्वप्न आता ती बघू लागली होती. आपलं लग्न जमवण्याची बच्चीदिदीची धडपड म्हणजे स्वतःचा रिकामपणा घालवण्याचा आणि आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा एक उद्योग आहे असं जयश्रीला वाटू लागलं होतं. पण त्याविरुद्ध काही बोलायची सोय नव्हती. तो तिचा स्वभाव नव्हता.
                                                         
                                                                           *****

सूर्यकांत गेल्यावर काही दिवसांनी निळू फुलेंना वाटू लागलं कि बिंदुची मुलं शिक्षणासाठी मुंबईत येतील तर बरं होईल. मुंबईत त्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने जास्त सोयी आहेत. इथे त्यांना जास्त चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांनी टुणटुणला तसं सुचवुन बघितलं. तिला ते पटलं. तिनं बिंदुशी याविषयी बोलायचं ठरवलं. दोघी बहिणींमध्ये फोनाफोनी झाली. मुलं आज्जीकडे येऊन राहिली तर लीला चिटणीसना त्यांचं करायला जमेल का.. जयश्री तर दिवसभर कामावर असणार. शेवटी विचारविनिमय करून दोघींनी ठरवलं की मुलांना तर आणायचंच मुंबईत आणि त्यांच्याबरोबर बिंदुनीही यायचं म्हणजे मग आज्जीला नातवंडांचं काही करावं लागणार नाही. बिंदु फार खुश झाली या निर्णयावर. तिची जुनी तक्रार - आई आणि भावंड एकत्र जमून मज्जा करतात आणि मी दरवेळी त्यातून वगळली जाते - आता संपणार होती.

नेहमी प्रमाणे या वेळीही टुणटुण आणि बिंदुनी आपसात काय ठरवलं त्याचा लीला चिटणीसना पत्ता नव्हता. वडील गेल्यापासून दोन्ही मुली आईला गृहीत धरू लागल्या होत्या. तशा सूर्यकांत असतानाही त्या आईला गृहीत धरत होत्या. पंरंतु वडील गेल्यानंतर बिंदु आणि टुणटुणवर कोणाचा अंकुश उरला नाही.

बिंदुनी नोकरी सोडली आणि लीला चिटणीस आणि जयश्री बरोबर मुंबईत रहायला आली. आधी ती आली मग तिची मुलं आली. बिंदुच्या मुलांना मुंबईत आणण्यासाठी फुलेंनी पुढाकार घेतला. आई बरोबर आजोळी जाऊन रहाण्या विषयी कुलदीप पवारांच आपल्या मुलांशी काही संभाषण झालं का  -माहीत नाही. मुलं नियमित वडिलांना भेटत होती का  - कुणास ठाऊक.

बिंदु मुंबईत रहायला आल्यावर टुणटुणचं आईकडे येणं वाढलं. सूर्यकांत नसल्यामुळे आता ती बाहेरच्या खोलीत बसून आई आणि बहिणीशी हितगुज करू शकत असे. त्यात नातेवाईकांच्या गॉसिप बरोबर जयश्रीच्या लग्नाचा विषयही निघे. कुठल्या पेपरमध्ये जाहीरात द्यायची, वेबसाईट वर नोंद करायची कि वधुवर सूचक मंडळात नाव घालायचं यावर चर्चा होई. आठवडा संपताना यायचं, जयश्री ऑफिस मधून आली कि तिला प्रश्न विचारून भंडावून सोडायचं - "उशीर का झाला? इतका वेळ कुठे होतीस? बरोबर कोण होतं? ऑफिस मधुन किती वाजता निघालीस? घरी पोहोचायला इतका वेळ का लागला? मध्ये कुठं गेली होतीस क?" अशा प्रश्नांचा तिच्यावर भडीमार करायचा असा परिपाठ तिनं सुरु केला.

एकदा दुपारी जयश्री घरी नसताना आली. आईला म्हणाली, "हे परवा कोल्हापूरला चाललेत. मोठे दीर पाय घसरून पडले. त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. त्यांना बघायला जातायत. जयूची माहिती लिहून देते त्यांना. ते धनवटेबाईंच्या घरी जाऊन त्यांना देऊन येतील. ताराबाई पार्कात रहातात त्या. त्यांना बरीच स्थळं माहित आहेत. मागे मी फोनवर बोलले होते त्यांच्याशी. श्रीमंत शेतकऱ्यांची, साखर कारखानदारांच्या मुलांची स्थळं आहेत म्हणत होत्या . एक मुलगा सुचवला होता त्यांनी. छान होता. सर्वात धाकटा होता. मोठ्या दोन भावांची लग्न झालेली आहेत. मोठे बागायतदार लोक आहेत. म्हणजे सगळे जण गावात रहातात पण सासू आणि सुनांसाठी स्वतंत्र गाड्या आणि ड्रायव्हर आहेत त्यामुळे त्या हवं तेंव्हा कुठेही जाऊ येऊ शकतात. मी तुला सांगणार होते पण तेंव्हाच आबांचं आजारपण झालं मग त्या गडबडीत राहून गेलं. त्या मुलाचं तर लग्न झालं असं वाटतं. पण तेंव्हा त्या बाई म्हणाल्या होत्या कि मुलीची सविस्तर माहिती दया मग आणखी स्थळं सांगिन. हे जातातच आहेत तर त्यांना भेटून येतील. राजरामपुरीत जाऊन घरही बघून येतील. आक्का इथे रहायला आल्यापासून आपण कोणी फिरकलोच नाही तिकडे.

टुणटुण सासरी जात नसे पण बहिणीवर लक्ष ठेवण्याचं काम तिनं स्वतःकडे घेतलं होतं. जयश्रीला टुणटुणच्या उलट तपासणीचा फार राग यायचा. तो मनातल्या मनात गिळून सरळ उत्तर दयावी तर वधू-वर परीक्षेच्या सूचना सुरु होत. अमका मुलगा चांगला वाटतो त्याला घरी बोलवूया, तमका मुलगा अमेरिकेहून दोन आठवड्यांसाठी आलाय त्याला त्याच्या घरी जाऊन भेटूया.. सगळं नको झालं जयश्रीला. माँ बरोबरच बच्चीदीदी आता आपलंही आयुष्य कंट्रोल करू पाहतेय असं तिला वाटू लागलं.  त्यातच ऑफिस मधली तिची जवळची मैत्रीण बदली होऊन बंगळूरला गेली. जयश्रीलाही मग बंगळूरला जावंसं वाटू लागलं. तिनं आईकडे बोलून बघितलं. लीला चिटणीस खुशीत, "हो, का, बंगळूरला बदली होतेय का तुझी?" एवढंच म्हणाल्या. त्यावरून आईचा तरी बदलीला विरोध दिसत नाही असं ती धरून चालली.

                                                                        *****

मध्ये काही दिवस गेले. एका रविवारी सकाळी दारात रिक्षा उभी राहिली. टुणटुण मुलांना घेऊन आली होती. हातातल्या पिशवीत मसाला लावून मुरवलेल्या मटणाचा मोठ्ठा डब्बा होता. "हल्लीच मी हैद्राबादी बिर्यानी बनवायचा क्लास केला, आज बिर्यानीचा बेत करूया", म्हणाली. कामवाल्या काशीला लाकडी उंच स्टुलावर चढवून आईच जुनं पितळेचं मोठ्ठ भांड माळ्यावरून खाली काढायला लावलं. तिलाच ते घासायला दिलं. बिंदु आणि टुणटुण मग बाकीच्या तयारीत गुंतल्या.

ओट्या लगतच्या सिंक मध्ये भांडी घासताना काशीच्या गप्पा चालू होत्या, "वैनी नाय येणार बिर्याणी खायला"? तिनं विचारलं.

" छे, ते लोक कुठे एवढ्या लांबून येणार. मुलांचे  क्लास असतात. अभ्यास असतो. इथे यायचं तर जाण्यायेण्यातच सारा वेळ मोडतो त्यांचा",  लीला चिटणिसनी चहाचा कप तिच्या शेजारी ठेवत म्हंटलं.

"तुमच्या लेकी नशिबवान हायेत, माँ. तुमचा लई जीव आहे त्यांच्यावर. माझ्या आईचा माझ्या पेक्षा आपल्या सुनांवरच जास्त जीव. मला चार दिवसाच्यावर म्हायेरी ऱ्हाऊ देत नाही. म्हणते जा बाई आता तू तुझ्या घरी. जास्त दिवस ऱ्हाशील तर उगीच माझ्या सुनांच्या संसारात जहर कालिवशील ".  ओले हात पातळाला पुसुन चहा पिण्यासाठी जमिनीवर बसत काशी म्हणाली.

स्वयंपाकघरात कामवाली धरून चार बायकांची लगबग. बाहेरच्या खोलीत बिंदु आणि टुणटुणच्या मिळून चार मुलांची गडबड. जयश्रीला थोडं ऑफिसचं काम करायचं होतं. तिनं आपला लॅपटॉप घेतला आणि बाल्कनीत वडीलांच्या आवडत्या आराम खुर्चीत काम करत बसली.

काम करताना मधूनच एखादी व्हिडीओ बघ, कुठल्यातरी वतर्मान पत्रातले मथळे वाच असं चाललं होतं. एका बातमीनी तिचं लक्ष वेधून घेतलं म्हणून त्यावर क्लिक करून ती बातमी तिनं सविस्तर वाचली. जवळच्या धारावीतली बातमी होती. स्लमडॉग मिल्यनेअर सिनेमात काम केलेली लहान मुलगी धारावीच्या झोपडपट्टीत रहात होती. काही दिवसांपूर्वी सिनेमातील तिच्या कामाबद्दल काही लाख रुपयांचा चेक तिच्या वडिलांना मिळाला. त्या चेकची बातमी त्यांच्या नातेवाईकांमध्ये पसरताच सगळे नातेवाईक मुलीच्या वडिलांभोवती गोळा झाले. प्रत्येक जण त्यांच्याकडे पैशाची मागणी करू लागला. सगळ्यांनी एकच गलका केला. रुबिनाच्या वडिलांना नातेवाईकांच्या मागण्या आणि गोंगाट इतका असह्य झाला कि त्यांनी त्या नातेवाईकांच्या समोर तो चेक फाडून टाकला.

ती बातमी वाचून जयश्रीला खूप विषण्ण वाटलं. दिसतील शीतं तिथं जमतील भूतं हा मथळा असायला हवा होता या बातमीचा- तिच्या मनात आलं. तेवढ्यात टुणटुण आणि बिंदु हातात एक वाडगा घेऊन आल्या. "खीर चाखून बघ जरा गोड बरोबर आहे का", वाटी जयश्रीच्या हातात देत बिंदू म्हणाली. जयश्रीनी वाटीतली चमचाभर खीर संपवली, "गॊड बरोबर आहे पण वेलची पूड घाला ना थोडी",  म्हणून सांगितलं तरी दोघी तिथेच उभ्या राहिल्या.   

निवांत सकाळ होती. ढगाळ पावसाळी वातवरण होतं. इमारती समोरचा रस्ता शांत होता. पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या बारीक पानांचा सडा रस्त्यावर सांडलेला होता. तुरळक वर्दळ होती. मधूनच एखादी गाडी, रिक्षा, सायकल, पायी चालणारे लोक जात होते. सोसायटीच्या लोखंडी प्रवेशद्वारा जवळ चौकीदार मामा उभे होते. रस्त्या पलिकडल्या फुटपाथवर बूट - चप्पला विकणाऱ्या छोट्या खोपटाबाहेर उभं राहून एक जण आपली चप्पल दुरुस्त करून घेत होता. तिकडे बघत टुणटुण म्हणाली. " त्यापेक्षा तू तुमच्या पुण्याच्या ऑफिस मध्ये बदली करून घे ना. आपल्यातली बरीच मुलं आहेत पुण्यात".

क्रमशः

( सर्व ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्रींना अभिवादन करून त्यांची नावं वापरली आहेत.)


पुढील भागात:

 .... १/३ कच्ची, १/३ करपलेली वगळून उरलेली बिर्यानी सगळयांना जेमतेम पुरली. जेवण झाल्यावर टुणटुणनी सिनेमा बघायची टूम काढली. सगळे बाहेरच्या खोलीत टीव्ही समोर बसले....





Sunday, August 4, 2019

खोडियार माता


सलमान गणेश मंदिरात कधी गेले असतील? अशक्य नाही. ते न्यूयॉर्क मध्ये रहातात. गेली अनेक वर्ष ते इथे रहातायत. एकदा आम्हाला मॅनहॅटनच्या डाउनटाऊन मध्ये एका दुकानात दिसले होते. खूप पूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा त्यांच्यावर तो फतवा लागू होता. आम्ही बेड बाथ अँड बियॉंड नावाच्या दुकानात गेलो होता. नावावरूनच लक्षात येतं कि ते गृहोपयोगी वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे. बेडरूम साठी लागणाऱ्या- चादरी, उशांचे अभ्रे, रजया, बाथरूम साठी लागणारे - टॉवेल्स, पायपुसणी तिथे मिळतात. तसंच बियॉंडच्या अंतर्गत इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो - स्वयंपाकघरात लागणारी भांडीकुंडी, कचऱ्याच्या टोपल्या, छोटी अप्लायन्सेस, पडदे , मेणबत्त्या, छत्र्या, च्युईंग गम, कुत्र्या -मांजराचं खाद्य वगैरे वगैर काय वाट्टेल ते. इतक्या असंख्य उपयोगी आणि निरुपयोगी वाटाव्यात अशा गोष्टींनी ते मोठ्ठ दुकान खचाखच भरलेलं असतं कि खरोखरच माणसाला जगण्यासाठी एवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे का कि हे जरा अतीच होतंय असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही. बहुसंख्य वस्तू अर्थातच चीनोत्पादित (चीन + उत्पादित) असतात. न्यूयॉर्क - न्यूजर्सी मधे त्या दुकानाच्या अनेक शाखा आहेत. इतर राज्यातही असतील.

तेंव्हा अप्पर वेस्ट साईडला बेबाबि नव्हतं. आता आहे. पण तेंव्हा आम्हांला सर्वात जवळच लोकेशन ते डाउनटाऊन मधलं दुकानच होतं. आम्ही तिथे काय घ्यायला गेलो होतो ते आता आठवत नाही. पण घरासाठी आवश्यक काहीतरी असणार. नाहीतर मुद्दामहून तिकडे गेलो नसतो. ऑकटोबर / नोव्हेंबर मधली गोष्ट आहे.  इतक्या वर्षांनंतरही महीना माझ्या का लक्षात राहिला त्याला कारण आहे.

दुकानाच्या बाहेर शॉपिंग कार्टस उभ्या होत्या. मी त्यातली एक घेतली. ढकलत ती दरवाजाजवळ नेली. काचेचा सरकता दरवाजा फाकला आणि समोरच दृश्य बघून मी आश्चर्यचकीत झाले : सरकत्या दरवाजा समोर हँगर विभागात सलमान रश्दी आणि पद्मा लक्ष्मी हँगर घेत होते. पहिला विचार मनात आला तो म्हणजे फतव्याचं काय झालं. लंडन मध्ये ते अज्ञात स्थळी पोलीस संरक्षणात रहात आहेत असं वाचलं होतं. न्यूयॉर्क मध्ये रहायला येणार आहेत, आले आहेत असंही वाचलं होतं. तरीही ते इतक्या उघड फिरत असतील असं वाटलं नव्हतं.

ते खूप उंच नाहीत. पद्मा पेक्षा कदाचित्त कमी असावेत. तरीही ती अंगुली निर्देश करून त्यांना वरच्या फळीवरचे हँगर दाखवीत होती आणि ते त्या उंचावर ठेवलेल्या हँगर पर्यंत हात पोहोचतो का बघत होते. त्यांना त्यांच्या शॉपिंग मध्ये सोडून मी पुढे गेले. सुट्टीचा दिवस होता. दुकानात फारशी गर्दी नव्हती. शॉपिंग संपवून पैसे द्यायला कॅशियरच्या लाईनीत उभी रहायला आले तर परत दोघे रांगेत माझ्या पुढे उभे. खुप वाटलं होतं त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात. दिवाळीचा पहिला दिवस होता (म्हणून महिना लक्षात राहिलाय). पण फतवावाले आजूबाजूला असले तर उगीच पीडा नको या भितीपोटी मी गप्प बसले.

नंतर त्या दोघांचं लग्न झालं. मग काही वर्षांनी घटस्फोट झाला. हे सगळं न्यूयॉर्कमध्येच झालं. न्यूयॉर्कच्या गॉसिप बातम्यांमध्ये दोघेही नियमित असतात. पद्मा लक्ष्मीच्या आत्मकथनात (कि कुठल्यातरी मुलाखतीत) वाचलंय कि ती फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जाते. तिच्यात आणि माझ्यात ती गोष्ट कॉमन आहे. मी हि गणेश मंदिरात जाते. ती आजवर मला कधी तिथे दिसलेली नाही. ते हि दिसलेले नाहीत. पण जुलै मधल्या न्यूयॉर्कर मासिकात त्यांची गॊष्ट आहे ती वाचल्यावर मनात शंका येतेय कि ते त्या देवळात जात असतील किंवा गेले असतील का? देवळात काय कोणीही जाऊ शकतं. कदाचित लग्न झाल्यावर जोडीनी गेले असतील. कदाचित गोष्ट लिहताना संशोधन म्हणून गेले असतील.

द लिटिल किंग नावाच्या गोष्टीत कथेतल्या प्रमुख व्यक्तिरेखे विषयी लिहिलंय (माझं ढोबळ भाषांतर असं आहे):"तो स्वतः खूप धार्मिक नव्हता, आणि शहरातल्या तीन डझन मशिदीं पैकी एकातही त्यांने कधी पाऊल ठेवलं नव्हतं, चौदाव्या रस्त्यावरच्या अल -फारूक या मोठ्या मशिदीतही नाही. "खरं सांगायचं तर ",  तो अगदी जवळच्या मित्रांना म्हणायचा "अ ) मी प्रार्थना करणाऱ्यातला नाही आणि ब ) खरतर मला स्वामिनारायण मंदिराचा लुक जास्त आवडतो.""

गणेश मंदिर स्वामिनारायण मंदिराहून वेगळं आहे. फ्लशिंग मध्ये दोन्ही आहेत. पण स्वामिनारायण मंदिरात कुठल्या देवी - देवतांच्या मूर्ती आहेत कल्पना नाही. गणेश मंदिरातल्या मूर्ती मला बऱ्यापैकी माहित आहेत. चारपाच पायऱ्या चढून वर गेलं कि मोठा सभामंडप आहे. त्याच्या मध्यभागी मोठ्या गणेश मूर्तीचा गाभारा आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे. सभामंडपाच्या चार कोपऱ्यात काळ्या दगडाच्याच पण गणेश मूर्तीहुन थोड्या लहान आकाराच्या चार मूर्तींचे गाभारे आहेत: एका कोपऱ्यात महालक्ष्मी, दुसऱ्या कोपऱ्यात वेंकटेश्वर, तिसऱ्या कोपऱ्यात शिवलिंग आणि चवथ्या कोपऱ्यात एका देवाची मूर्ती आहे ज्याचं नाव आता आठवत नाही. दोन कोपऱ्यांच्या मध्ये समोरासमोरच्या लांब भिंतीना लागून ओळींनी अनेक देव -देवतांच्या दीड दोन फूट उंचीच्य पितळी मूर्तींचे स्वतंत्र देव्हारे आहेत. सर्व मूर्ती जरतारी रेशमी  वस्त्र आणि सोनेरी दागिन्यांनी मढलेल्या असतात. एखादया देवाच्या आवडी नुसार त्याला सुती वस्त्र नेसवलेलं असतं किंवा गळ्यात वेलचीची माळ घातलेली असते. त्यातले काही देव त्या देवळात जाण्याआधी मला माहित नव्हते: पितळी मूर्तींमध्ये खोडियार मातेची मूर्ती आहे. विकिपीडियात असं म्हंटलंय कि तिची देवळं गुजरात, राजस्थान आणि मुंबईत आहेत. पण मुंबईत पाहिल्याचं आठवत नाही.

गणेश मंदिरात संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी गेलं तर फार गर्दी असते. नेहमी कसले तरी सप्ताह चालू असतात. त्यानिमित्तानं भक्तगण जमलेले असतात. एकदा सकाळी गेले तर अभिषेक चालू होता. पांढरं सुती वस्त्र नेसवलेल्या पितळी मूर्तीच्या डोक्यावरून पुजारी दूध आणि इतर द्रव्य ओतत होते. ते बघून मला थंडी वाजली. न्यूयॉर्क मध्ये उन्हाळ्याचे दोन -तीन महिने सोडले तर इतर वेळी बऱ्यापैकी थंडी असते. थंडीत आपले कपडे भिजलेले असताना आपल्या डोक्यावर लोकांनी बाटल्याच्या बाटल्या थंड दूध ओतलं तर आपण गारठणार नाही तर काय होईल. त्यातून अंग धातूंचं असेल तर बघायलाच नको. गर्दीच्या वेळी मृदंगम, नादस्वरम अशी वाद्य कानठळ्या बसतील इतक्या जोरात वाजवली जातात. भक्तगणांना ते आवडत असावं. देवांचं कुणास ठाऊक. इतर दिवशी सकाळी किंवा दुपारी गेलं तर देऊळ शांत असतं.

द लिटिल किंग हि गोष्ट भ्रष्टाचार आणि सध्या भेडसावणारं ओपिऑइड व्यसनाचं संकट या गंभीर विषयांवर आहे पण त्याला रश्दींचा मजेशीर टच आहे. त्यांच्या आगामी कादंबरीवर ती कथा आधारलेली आहे. कथेचा सारांश असा कि र. क. स्माईल नावाचा भारतीय वंशाचा डॉकटर आपल्या औषध निर्मितीच्या व्यवसायामुळे अब्जाधीश झालेला आहे. त्याच्य कंपनीने एक नविन वेदनाशामक औषधी स्प्रे बाजारात आणलेला आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधीत अतिवेदनेने तळमळणाऱ्या रुग्णांना तात्पुरता आराम पडू शकतो. परंतु डॉकटर स्माईल हे आपल्या माहितीतील काही डॉकटरां मार्फत ज्यांना कसलीही व्याधी नाही, जे आजरी नाहीत त्या लोकांच्या व्यसनपूर्तीसाठी ते वेदनाशामक (बेकायदेशीररित्या) पुरवण्याची सोय करतात.

"अटलांटा परिसरातील भारतीय समाजात डॉकटर स्माईलना मानाचं स्थान आहे. शहरातील भारतीय वर्तमानपत्राचे ते आधारस्थंभ आहेत तसेच अनेक सामाजिक संस्था, मंडळांना ते देणग्या देतात - मग ती मंडळं भारतातील वेगवेगळ्या राज्यातुन आलेल्या लोकांची असोत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांची ( बंगाली, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलगू), वेगवेगळ्या जातींची, उपजातींची, धर्माची आणि वेगवेगळी कुलदैवत मानणाऱ्यांची ( देवी, महादेव, नारायण, आणि लोहासुर - लोखंडाचा देव, खोडीयार - घोड्याचा देव, आणि हार्दूल - कॉलऱ्याचा देव सुद्धा) ."

लोहासुर आणि हर्दूल देवांच्या मूर्ती गणेश मंदिरात बघिल्याचं आठवत नाही (असतील कदाचित पण मला आठवत नाही). खोडियार देवीची मूर्ती तिथे नक्की आहे. वरील तीन चार ठिपके जोडल्यावर असं वाटत - पद्मा म्हणते ती त्या देवळात जाते... पद्मा आणि रश्दी काही वर्षांपूर्वी पतिपत्नी होते... त्या देवळात खोडियार माता आहे म्हणजे मी जसं खोडियार मातेला पहिल्यांदा फ्लशिंगच्या गणेश मंदिरात पाहिलं तसं रश्दीनीही कदाचित तिथेच तिला बघितलं असेल. आणि तिथून ती गोष्टीत अवतरली असेल. अर्थात माझा अंदाज साफ चुकीचाही असू शकतो.