Saturday, September 4, 2021

Oprah's Mantra 3



















 

Monday, August 23, 2021

ऊर्जा शोषक


ऊर्जा शोषक -  energy vampires हा शब्द आजकाल फार ऐकू येतो. 

Vampires ही संकल्पना युरोपियन लोककथां मधून आलेली आहे. त्यांच्या वर अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमा येऊन गेलेत. Vampires हे जीव स्वतःहून जगू शकत नाहीत. ते दुसऱ्यांच्या जीवनाचं सत्व शोषून -  दुसऱ्यांचं रक्त पिऊन जगतात. त्याप्रमाणे ऊर्जा शोषक लोक स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यांच्या ऊर्जेचं शोषण करतात.  

डॉकटर ख्रिसचीऍन नॉर्थरूप (Christiane Northrup M.D.) यांनी ऊर्जा शोषकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा यावर पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे Dodging the Energy Vampires. डॉ नॉर्थरूप पेशाने स्त्री रोग तज्ञ आहेत. अनेक वर्षे तो व्यवसाय केल्यावर आता त्या सर्व समावेशक (प्राचीन + अर्वाचीन ) उपचार पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांच्या पुस्तकाचा भर स्त्रीया किंवा पुरुषांनी ऊर्जा शोषक जोडीदारां पासून आपला बचाव कसा करावा यावर आहे.

ऊर्जा शोषक जोडीदार मिळाला किंवा मिळाली तर त्यांच्या पासून लांब जाणं, त्यांना आपल्या आयुष्यातुन वगळण हा त्यावरचा एकमेव उपाय असतो कारण त्या लोकांचं वागणं कधी बदलत नाही. पराकोटीच्या आत्मकेंद्रित वृत्तीने जोडीदाराला कसं दुखवायचं ते ऊर्जा शोषकांना चांगलं जमतं.

ऊर्जा शोषक हे केवळ जोडीदारच नाही तर वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटू शकतात. त्यात आपले आईवडील, भाऊबहीण, जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारी, ऑफिस मधले सहकारी, अनोळखी लोक कोणीही असू शकतं. त्यांना वेळीच ओळखून त्यांच्या पासुन आपला बचाव केला नाही तर आपलं शारिरीक आणि मानसिक आरोग्य बिघडू शकतं.

आईवडील मुलांच्या ऊर्जेचं शोषण कसं करतील असा प्रश्न पडू शकतो. पण दोन मुलं असली तर एका मुलाची कायम काळ्जी आणि लाड करायचे आणि दुसऱ्य मुलावर कायम अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचं ओझं टाकायचं असं करणारे आई किंवा वडील असू शकतात. 

जोडीदार हे मनानी किंवा कायद्यानी जोडलेलं नातं असतं. ते बऱ्याच मोठेपणी आपल्या आयुष्यात येतं. सोप्प नसलं तरी प्रयत्न केल्यावर ते तोडता येऊ शकतं. जास्त त्रासदायक असतं ते रक्ताचं नातं ज्या नात्यामुळे भरपूर मानसिक छळ होत असला तरी ते सहजासहजी लक्षात येतं नाही. लहानपणापासून त्याची सवय झालेली असते. तो छळ अंगात भिनलेला असतो. 

नातं मनाचं असो किंवा रक्ताचं - ऊर्जा शोषकांच्या वागण्याचा वारंवार त्रास होऊ लागला तर डोळसपणे त्यांचं वागणं तपासुन निग्रहाने त्यांना लांब ठेवण्याचा कठोरपणा करायला शिकावं लागतं. मुळातच ते तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतात याचं कारण तुम्ही empath असता. कठोरपणा तुमच्या स्वभावात नसतो. (empath - from empathy - दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची, दुसऱ्यांबद्दल कणव वाटण्याची कुवत)

ऊर्जा शोषकां पासून वेगळं होणं जमलं नाही तर self- care - स्वतःची काळजी घेणे, स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हाच एक उपाय उरतो. ऊर्जा शोषक दुसऱ्यांची पर्वा करत नाहीत. त्यांचं आयुष्यच दुसऱ्यांची ऊर्जा शोषण्यावर अवलंबून असत. अंतर्गत अस्वस्थता बऱ्याच लोकांमध्ये असते. काही लोक त्याचा स्वतःला त्रास करून घेतात. ऊर्जा शोषक दुसऱ्यांना त्रास देतात.

एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा आपल्याला इतका त्रास होतो कि आपण म्हणतो - ती नेहमी माझं डोकं खाते. हे क्वचित कधितरी घडलं तर सहन करता येतं. पण वारंवार झालं तर त्याचा नकळत आपल्यावर खोल परिणाम होतो. काही लोकांचा स्वभाव खूप नकारात्मक, विषारी असतो. त्यांच्या संगतीत जास्त वेळ घालवला तर ती नकारात्मकता, ते वीष कायमच आपल्यात उतरतं. काही लोक उगीचच आपला वेळ खातात. काहींना नेहमी तुमच्या समोर स्वतःच्या दुःख्खाचा पाढा वाचायला आवडतं. नसलेल्या दुःख्खाचं अवडंबर माजवून दुसऱ्यांच्या कडून सहानुभूती मिळवणे ह्यात ऊर्जा शोषकांचा हातखंडा असतो. 

एनर्जी व्हॅम्पायर हा शब्द समोर आला कि त्याबरोबरच दुसरा शब्द समोर येतो तो म्हणजे empath . हे दोन शब्द हातात हात घालून येतात. Empaths कायम सहानुभूतीने डबडबलेले असतात. त्यांना सगळ्यांच्या बद्दल सहानुभूती वाटते. कोण सहानुभूती, दयामाया दाखवण्याच्या लायकीचं आहे, कोण नाही असा भेदाभेद empaths करू शकत नाहीत. त्यांच्या मनात कोणाबद्दल काळंबेरं नसतं. त्यामुळे आपल्या बद्दल कोणाच्या मनात काळंबेरं असू शकेल हे त्यांच्या लक्षात येत नाही. ऊर्जा शोषक अशा लोकांना बरोबर हेरतात आणि त्यांच्यावर झडप घालून त्यांची ऊर्जा शोषतात. Empath हे ऊर्जा शोषकांचं सावज असतं. 

रोजच्या आयुष्यात आपल्या भोवती वावरणाऱ्या ऊर्जा शोषकांना ओळखणं सोप्प नसतं. पण त्यांना ओळखून त्यांच्या पासून स्वतःचा बचाव करणं फार गरजेचं असतं. तसं केलं नाही तर आपलं मानसिक,शारीरिक किंवा आर्थिक आरोग्य बिघडू शकतं. एखादी व्यक्ती खूप सरळमार्गी असेल, नाका समोर बघून चालण्याच्या वृत्तीची असेल तर तिच्या लक्षातही येत नाही कि तिच्या भोवतीच्या वर्तुळात कोणतरी तिच्या ऊर्जेचं शोषण करण्यासाठी टपून बसलेलं आहे. पण तसे टपून बसलेले लोक असू शकतात. 

एका घरात भावंडांच्या मध्ये प्रचंड सिबलिंग रायव्हरली - आपसातली चढाओढ असते. कुटुंबाची एकी, भावंडांचं प्रेम या गोंडस पांघरूणा खाली ती झाकायचा प्रयत्न केला जातो. तरी आपसातली चुरस लपत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन भावंडं असतात. त्यातील मुलीचं लग्न होतं. तिची मुलं मोठी होतात. तिचा संसार सुरु असतो. मग बऱ्याच वर्षांनी भावाचं लग्न होतं. त्याला मुलं होतात. भावाची व्यवसायातली प्रगती, त्याच्या मुलांचं आपल्या माहेरी होत असलेलं कौतुन बहिणीला सहन होत नाही. ती मुलांसह माहेरी येऊन रहाते. यापुढे मग *मीमीमी, माझी मुलं आणि त्यांचं कल्याण ह्याकडे माहेरी सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. शेअर कर, शेअर कर, तुझ्याकडे आहे ते शेअर कर, तुला तरी आमच्या शिवाय कोण आहे असा सतत पाठपुरावा करून भावाची ऊर्जा शोषली जाते. 

एका व्यक्तीच्या हट्टापायी इतरांना त्रास होऊ शकतो. बायको आणि मुलं सोडून गेल्यावर बहिणीच्या नवऱ्याचा मृत्यू होतो. शेअर कर, शेअर कर, शेअर कर चा सारखा तगादा भावाच्या मागे लावल्यामुळे त्याच्यावर जीवघेणं आजारपण कोसळतं. त्याला आपल्या व्यवसातलं लक्ष कमी करावं लागतं. त्याची प्रगती थांबते. तरुण वयात भावावर ओढवलेल्या आजारपणाचे खोल परिणाम त्याच्या बायको - मुलांना भोगावे  लागतात. काळाच्या पडद्यावर हे सगळे ठिपके वेगवेगळे आणि लांबलांब दिसतत. पण जर ते ठिपके जोडता आले तर चित्र स्पष्ट होत जातं. मधल्या काळात बहिणीच्या मह्त्वाकांक्षेची घोडदौड न थांबता अव्याहत चालू असते. पण म्हणून भावाची ऊर्जा शोषण्याचं काम ती थांबवते असं नाही. ते चालूच रहातं. 

तुम्ही नाका समोर बघून चालत असताना कधी कोण ऊर्जा शोषक तुम्हाला येऊन चिकटेल सांगता येत नाही. 

मंदा आणि कुंदा दोघी बहीणी असतात. मंदाला मंद रिकामटेकडेपण सतावत असतं. आई आणि भावंडांच्या आयुष्यात मनसोक्त ढवळाढवळ करून ती वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. पण मुलं जशी मोठी होतात तसं रिकामटेकडेपण वाढत जातं. बहीण आपल्या जवळ असेल तर वेळ चांगला जाईल असं तिला वाटतं. परंतु बहीण जवळ हवी असली तरी स्वतःच्या घरात नको असते.

कुंदाची सोय दुसऱ्या कोणाच्या तरी घरात करण्यात येते. ते घर तुमचं असू शकतं. तुम्ही कुरबुर केली तर - एक तीळ सात जणांनी वाटून खावा अशी आपल्या संस्कृतीत म्हण आहे याची तुम्हांला आठवण करून दिली जाते. कुंदा तुमच्या घरात येऊन राहिल्यावर तुमच्या घरातलं वातावरण कुंद होतं. 

बहीण जवळ रहायला आल्यावर मंदाचं रिकामटेकडेपण थोडं कमी होतं. त्यातच कुंदाच्या मुलीचं लग्ना ठरतं. मग तर काय मज्जाच मज्जा. लग्न हा कोणाच्याही रिकामटेकडेपणावर रामबाण उपाय असतो. भाचीच्या लग्नात पुढाकार घेण्याची संधी मंदा दवडत नाही. लग्न झाल्यावर भाची आणि तिचा नवरा रहाणार कुठे याची काळजी करण्याची तिला काही गरज वाटत नाही. तिला ते स्वतःच्या घरात नको असतात ... बस्स. एवढीच तिची माफक अपेक्षा असते. आई काय किंवा मुलगी काय आपल्या घरात कोणी नको यावर मंदा ठाम असते. लग्न झालेली भाची नवऱ्या सकट तुमच्याच घरात रहायला येते. या दोघांना तरी तुमच्या घरात ठेऊन घ्या असं तुम्ही पुटपुटलात तर एक तीळ सात जणांत वाटून घ्यायची म्हण फक्त तुम्हांलाचं लागू हॊते, आम्हांला नाही असं तुम्हांला सुनावण्यात येतं. 

या ऊर्जा शोषकां पासुन स्वतःची सुटका करून घेण्यासाठी एखादी जादूची कांडी सापडते का ते शोधायला म्हणूत तुम्ही ऍमेझॉनच्या जंगलात तपासाला निघता . 


*मीमीमीमीमी करणारे नार्सिसिस्ट (आत्मपूजक - स्वतःची पूजा करणारे) असू शकतात. नार्सिसिस्ट फक्त स्वतःचाच विचार करतात. दुसऱ्यांचा विचार करण्याची, दुसऱ्यांबद्दल सहानुभूति वाटण्याची क्षमता त्यांच्या मध्ये नसते. सगळे नार्सिसिस्ट ऊर्जा शोषक असतात. पण सगळे ऊर्जा शोषक नार्सिसिस्ट असतात का? एखादी व्यक्ती नार्सिसिस्ट आहे कि नाही याचं निदान करणं मानसशास्त्राच्या अखत्यारीत येतं. इंटरनेटवर वर एनर्जी व्हॅम्पायर्स आणि नार्सिसिझम या विषयावर भरपूर माहिती उपलब्ध आहे जेणेकरून आपल्या भोवतालच्या ऊर्जा शोषकांना कसं ओळखायचं याबाबतीत आपण जागरूक होऊ शकतो. 




Thursday, June 24, 2021

कानावर पडलेलं (Overheard)


लॉकडाऊनचा एक अनपेक्षित परिणाम असा झालाय की सार्वजनिक ठिकाणी कानावर पडणारं अनोळखी लोकांचं संभाषण ऐकण्याची सोय तात्पुरती का होईना बंद पडली आहे. एरवी कॉफी शॉप मध्ये बसलं की लोकनिरीक्षण करण्याची चांगली संधी मिळते. आजूबाजूला बसलेले लोक आपसात किंवा फोनवर काय बोलतात ते आपसूक ऐकू येतं. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. फक्त कान उघडे ठेवले कि भागतं. आपोआप मनोरंजन होतं. टीव्ही वरील लघु मालिकेतील एखादं दृश्य पडद्यावर बघतोय असं वाटतं. दुसऱ्यांच्या आयुष्यातलं तेवढंच नाट्य मला आता झेपतं. 

एकदा माझ्या समोर बसलेली ऐंशीच्या जवळपासची आज्जी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पलीकडची व्यक्ती तरुण असावी असा मी संभाषणावरून अंदाज बांधला. आश्चर्य वाटलं कि त्या वयातही कोणाला तरी आज्जीचा सल्ला महत्वाचा वाटत होता. कदाचित तिला ऑडिशन्सचा अनुभव असावा. आज्जी त्या व्यक्तीला म्हणाली, " मला खूप आश्चर्य वाटलं कि ऑडिशन झाल्यावर लगेच तू फिरायला कशी गेलीस (किंवा गेलास - इंग्रजीत "तू" पुल्लीगी आहे कि स्त्री लिंगी हे कळत नाही) . 

आज्जी पुढे म्हणाली "तू पोस्ट केलेले फोटो बघून मला प्रश्न पडला की तुला जास्त महत्वाचं काय आहे. फिरायला जाणं कि ऑडिशन. मी काही बोलले नाही कारण परत तू म्हणशील कि मी तुझ्यावर टीका करते. या सारख्या मोठ्या ऑडिशन्स तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीत. फार कमी मिळतील. तू ऑडिशन झाल्यावर फिरायला गेली असलीस तरी प्रवासाचं प्लॅनींग ऑडीशनच्या आधी केलं असणार. ऑडिशनच्या आधी तुझं सगळं लक्ष फक्त ऑडिशनवरच केंद्रित असायला हवं होतं. 

आज्जी अगदी हळुवार बोलत होती. अधून मधून पलीकडची व्यक्ती काहीतरी बोलत असावी. शेवटी ती म्हणाली. " पुढच्या वेळी कोणाला तरी बरोबर घेऊन जा. व्हॉइस कोच, ऍक्टिंग कोच असं कोणतरी. म्हणजे ते तुला तु ऑडिशन कशी दिलीस ते सांगतील." 

एवढं बोलून तिनं फोन बंद केला आणि कॉफी बरोबर जेवणाचा जो काय छोटासा ट्रे घेतला होता तो उघडुन जेवू लागली.  

अमेरिकेची नाट्यसृष्टी मॅनहॅटन मध्ये आहे तसेच NBC, CBS,ABC सारख्या मोठ्या टीव्ही कंपन्यांचे स्टुडिओ ही इथे आहेत. कॉफी शॉप जवळ एक स्टुडिओ आहे तिंथे डॉकटर ऑझ  (Dr. Oz) या शोचं चित्रीकरण होतं. ऑझ नावाचे वैद्यकीय डॉकटर तज्ञ पाहुण्यांना आपल्या कार्यक्रमात बोलावून वेगवेगळ्या विषयांवर प्रेक्षकांना सल्ला देतात. या टीव्ही शोजची तिकीट बहुतेक फुकट असतात पण ती आधी मागवावी लागतात. नाहीतर रांगेत उभं रहावं लागतं आणि प्रवेश मिळेलच अशी खात्री नसते. स्टुडिओ बाहेरील रांगेत प्रामुख्याने महिला उभ्या असतात आणि त्यांनी ओढून बरोबर आणलेले बॉयफ्रेंड किंवा नवरा. 

मी कॉफी शॉप मध्ये बसले होते. समोरची खुर्ची रिकामी होती. एक बाई आली आणि म्हणाली - "मी इथे बसू?'. बसल्यावर म्हणाली कि ती डॉ. ऑझच्या दोन शोज च टेपिंग बघून आली होती. आपली बॅग उघडुन तिनं शो तर्फे मिळालेल्या भेटवस्तू मला दाखवल्या. शॅम्पू , कंडिशनर, लोशन, ग्रनोला बार असं बरच तिला भेट मिळालं होतं. 

मग तिनं थोड्या इथल्या तिथल्या गप्पा मारल्या. तिच्या घरातला कपडे सुकवायचा ड्रायर बिघडला होता. कपडे ड्रायर मध्ये चांगले वाळतात कि दोरीवर या विषयावर आम्ही थोडी चर्चा केली. भारतात सर्वसाधारण असा समज आहे कि कपडे ड्रायर मध्ये वाळवले तर लवकर खराव होतात. त्यापेक्षा दोरी बरी पडते. ते मी तिला सांगितलं. तर तिचं असं मत पडलं कि दोरीवर टॉवेल्स खूप ताठ वाळतात. त्यापेक्षा ड्रायर मध्ये मऊ वाळून निघतात. या तिच्या मताशी मी सहमत होते. पुढे ती म्हणाली की तिच्या बहीणीनी की भाचीनी - कोणीतरी हिंदू धर्म स्विकारलाय. त्यांच्या बरोबर ती नियमित फ्लशिंगच्या गणेश मंदिरात जाते. 

आमची दोघींचीही कॉफी पिऊन झाली होती म्हणून दोघी एकदमच कॉफी शॉपच्या बाहेर पडलो. जवळ पिझ्झा कुठे चांगला मिळतो असं विचारून ती पिझ्झाच्या शोधात गेली. जाताना म्हणाली की वेगवेगळ्या कार्यक्रमांचं चित्रिकरण बघण्यासाठी ती या भागात नेहमी येते, "भेटू आपण कधीतरी असेच कॉफी शॉप मध्ये". पण मग लॉकडाऊन आला. 

अमेरिकन लोकांची गप्पा मारण्याची ही पद्धत मला खूप कौतुकास्पद वाटते. इथल्या बऱ्याच लोकांना ते अगदी सहज जमतं. कॉफी शॉप, वेटिंगरूम, बस स्टॉप किंवा प्रवासात सर्वस्वी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी मित्रत्वाचा स्मॉल टॉक करते. यातला महत्वाचा भाग म्हणजे ते तुम्हाला तुमच्याबद्दल काही प्रश्न विचारत माहीत. उगीचच लोकांना खाजगी प्रश्न विचारायचे नाहीत हा इथल्या सामाजिक एटीकेटचा भाग आहे. 

स्वतःबद्दल सांगावसं वाटेल ते तुम्हांला सांगतात. तुम्ही जे काही सांगाल ते ऐकून घेतात. स्वतःच्या दुःखाचा पाढा तुमच्यासमोर वाचत नाहीत. राजकारणा सारख्या वादग्रस्त विषयांवर बोलत नाहीत. तुमचं नावगाव विचारत नाहीत. स्वतःच सांगतात असही नाही. प्रसंगानुसार इथलं तिथलं बोलतात. आपली वेळ झाली कि बाय, was nice talking to you म्हणतात आणि निघून जातात. 

काही वर्षांपूर्वी आम्ही ट्रेननी फ्लॉरिडाला चाललो होतो. वॉशिंग्टन डीसी जवळच्या बाल्टिमोर स्टेशनवरून मायामीला एक ट्रेन जाते ज्यात तुम्ही आपली गाडी बरोबर नेऊ शकता. न्यूयॉर्क, न्यूजर्सी सह अमेरिकेच्या ईशान्य (पूर्वोत्तर) भागात रहाणारे बरेच निवृत्त लोक हिंवाळ्यात फ्लॉरिडाला रहायला जातात. आपली गाडी बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांना त्या ट्रेनचा उपयोग होता. शिवाय मायामीच्या कॉलेज मध्ये शिकणारी मुलं सुट्टीत घरी येतात तेंव्हा आपली गाडी बरोबर घेऊन येतात आणि सुट्टी संपली कि गाडी ट्रेन मध्ये चढवून कॉलेजला परत जातात. आम्ही सहज गंमत म्हणून गाडी बरोबर घेऊन चाललो होतो. 

ट्रेन एकूण चांगली आहे. आपल्याला स्वतंत्र केबिन घेता येते. त्यात अगदी छोट्या सिंक, शॉवर सहित बाथरूम आतच असते. बाहेरचं स्वच्छतागृह वापरावं लागत नाही. पण परत कधी जायचं झालं तर मी आपले खाद्यपदार्थ बरोबर घेऊन जाईन. म्हणजे ग्रिल केलेला थंडगार मासा आणि जेमतेम कोमट भातावर समाधान मानायची पाळी येणार नाही. ट्रेन संध्याकाळी बाल्टिमोरहुन सुटते. दुसऱ्या दिवशी दुपारी मायामीला पोहोचते. 

मी सकाळी लवकर उठते. उठल्यावर लगेच मला चहा लागतो. मला वाटलं एवढ्या सकाळी डायनिंग कारमध्ये कोणी नसेल. म्हणून मी एकटीच चहा प्यायला गेले. बघितलं तर सगळी टेबलं भरलेली होती. एक टेबल रिकामं होतं तिथे मी बसले. लगेचच माझ्या समोरच्या बाकावर एक वडील आणि मुलगा येऊन बसले. थोड्याच वेळात माझ्या शेजारी एक बाई येऊन बसली आणि अगदी सहज ते तिघे आपसात गप्पा मारू लागले. दोघेही आपापल्या मुलांना कॉलेजला सोडायला चालले होते. 

बाईनी सुरवात केली कि नेहमी ते गाडी चालवत फ्लॉरिडाला जातात पण अखंड हायवेवरचा तो प्रवास जॉर्जियाच्या पुढे फार कंटाळवाणा होतो म्हणून यावेळी ट्रेननी जायचं ठरवलं. सवयीनुसार चहा पिता पिता मी कान देऊन त्यांचं संभाषण ऐकत होते. दोघेही स्वतःबद्दल काही बोलले नाहीत. आपल्या नवऱ्याचा किंवा बायकोचा उल्लेख केला नाही. नवरा किंवा बायको बरोबर का नाही याचं स्पष्टीकरण द्यायची त्यांना गरज भासली नाही. मी त्यांच्या गप्पात भाग घेत नव्हते तरी त्यांनी मला ऑकवर्ड वाटू दिलं नाही. प्रवास आणि कॉलेज असं विषयातून विषयात त्यांच्या गप्पा फिरत राहिल्या. 

या उलट भारतात बाई एकटी किंवा मुलांसह प्रवास करत असेल तर तिला, "तुझा नवरा/ मुलांचे वडील कुठे आहेत?" असं अगदी सरळ रोखठोक शब्दात अनोळखी लोकांनी सगळ्यांच्या समोर विचारलेलं मी ऐकलं आहे. 

मलाही एका बाईंनी विचारलं होतं. कोणाच्या समोर नाही.आम्ही दोघीच होतो. न्यूयॉर्कहुन मी मुंबईला येत होते. ती शेजारच्या सीटवर येऊन बसली. पहिल्या दोन मिनिटात तिनं स्वतः बद्दल सगळी माहिती सांगितली : पस्तीस वर्ष न्यूजर्सी मध्ये रहात होती. त्यांचं कँडी स्टोअर होतं. नवरा गेल्यावर दरवर्षी हिंवाळ्यात सहा महिने घाटकोपरला, उन्हाळ्यात न्यूजर्सीत मुलाकडे रहाते. नवरात्र लवकरच सुरु होतय म्हणून घरी चालली आहे. मुलगाही बरोबर आहे. तो डॉकटर आहे. तो दुसऱ्या केबिन मध्ये बसलाय. आईला त्याने अपग्रेडेड सीटवर बसवलंय. तरीही दोनदा येऊन तो आईची विचारपूस करून, तिला काही हवं नको ते बघून गेला... वगैरे. 

आपलं सांगून झाल्यावर - आता तुझी पाळी, वीज देते टाळी अशी तिची अपेक्षा असावी. पण माझी विचारपूस करायला येईल असं दुसऱ्या केबिनमध्ये कोणी बसलेलं नव्हतं. मग मी काय सांगणार. शिवाय विमानात बसल्यावर सर्वप्रथम मेन्यू वाचून जेवायला काय मागवायचं ते ठरवणे, टीव्ही वर कुठले चित्रपट आणि मालिका बघण्यासारख्या आहेत - त्यातलं झोपायच्या आधी काय बघायचं, झोपून उठल्यावर काय बघायचं हे ठरवणे, विमान कंपनीने प्रेमाने दिलेले पायमोजे पायावर चढवणे ही कामे आधी उरकून घेणं फार महत्वाचं असतं असं मला वाटतं. ते मी करत होते. थोडा वेळ वाट पाहुन शेवटी तिनंच विचारल, " नवरा, मुलं कोणीच नाही तुला?' 

दुसऱ्यांच्या गप्पांमध्ये फक्त मलाच रस असतो असं नाही तर इतरांनाही असु शकतो असा अनुभव एकदा आला. भारतीय रेस्टोरंट मध्ये जवळच्या टेबलावर एक भारतीय तरुण बसला होता. बरोबर सुंदर अमेरिकन तरुणी होती. पहिली वहिली डेट असावी असं चित्र दिसत होतं. मुलगी छान तयार होऊन आली होती. टवटवीत निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आकर्षक मेकअप, केशरचना केली होती. त्याच्यावर छाप पाडण्याचा ती आपल्या परीने प्रयत्न करत होती. पण तो तिच्यात फारसा इंटरेस्ट दाखवत नव्हता. तिच्या बोलण्याला तो कंटाळलाय कि काय अशी मला काळजी वाटायला लागली. त्याचं सगळं लक्ष आमच्या टेबलवर चाललेल्या अस्सल देशी गप्पांकडे होत. 

कॉफी शॉप मध्ये एक रागीट संभाषणही ऐकलं. खरंच ऐकलं कि लॉकडाऊन मुळे तिथे जाता न आल्याने जे ऐकलं होतं ते स्वप्नात आलं हे नक्की सांगता येणार नाही..आईस्ड कॉफीनी भरलेला प्लॅस्टिकचा मोठ्ठा कप हातात घेऊन लांब काळा कोट घातलेली बाई समोरच्या टेबलवर येऊन बसली. बाहेर कडक थंडी असूनही बर्फानी वरपर्यंत भरलेल्या, दूध - साखर विरहीत कडवट पाणचट कॉफीचा तिनं  स्ट्रॉनी एक घुटका घेतला, धडाधड सेल फोनची बटण दाबली आणि पलिकडल्या व्यक्तिवर आग पाखडायला सुरवात केली.    

"हाय... तुझा मेसेज मिळाला. Are you out of your mind?  माझ्या घरात फुकट राहिल्याबद्दल मी तुला पैसे दयावेत अशी ग्रेट आयडिया आता तुझ्या हुशार डोक्यातून निघाली आहे? इतकी वर्ष तू एक पेनी सुद्धा भाडं दिलं नाहीस. त्या साईझच घर, त्या भागात भाड्यानी घ्यावं लागलं असतं तर तुझे किती पैसे खर्च झाले असते याचा हिशोब केलायस का कधी? Do the math.  

तुला कोणीही इथे रहायला बोलावलं नव्हतं. तू स्वतःहुन आलीस. तुला सोयीचं होतं म्हणून राहीलीस. जनरली सून सासुशी वाईट वागणारच अस लोक धरून चालतात. मॉम एक दुर्मिळ उदाहरण आहे जिथे तिच्या मुलींनीच स्वतःच्या स्वर्थी फायद्यासाठी तिचा आणि तिच्या घरांचा पुरेपूर वापर करून घेतलाय आणि मॉमला बिच्चारील ते कळतही नाही. 

तू आणि जॉनीनी डॅडच्या मृत्युपत्रातून मिळालं ते सगळं घेतलं. जे मृत्युपत्रात नव्हतं ते हि आपसात संगनमत करून मॉम कडून काढून घेतलत. वर सगळ्यांना सांगता मॉमनी स्वतःहून तुम्हाला दिल. डॅड होते तोपर्यंत मॉम त्यांच्या कंट्रोल खाली होती. ते गेल्यावर आता तुझ्या वर्चस्वाखाली आहे. स्वतःचा कुठलाच निर्णय ती घेऊ शकत नाही. तु सांगशील तिथे तिला राहावं लागतं. तू सांगशील ते बोलावं लागतं. 

मी मॉमला भेटू सुध्दा शकत नाही कारण तुमच्या तावडीत सापडले कि तुम्ही काहींतरी कारण सांगून माझ्याकडून पैसे घ्यायला बघता. मी वेळोवेळी मॉम आणि डॅडला भरपूर आर्थिक मदत केली होती. म्हणून डॅडनी हे घर मला दिलं. ते अजून मला मिळालेलं नाही. पण कधीतरी हे घर तुला मिळेल असं सांगत तुम्ही लोकांनी आजवर माझ्याकडून भरपूर पैसे घेतलेत. मी कायम पैसे देण्याचं काम केलंय आणि तुम्ही फक्त घेण्याचं काम केलंय. 

मॉम आणि डॅडला देण्या ऐवजी ते पैसे कुठेतरी गुंतवले असते तर आज या घरा सारखी आणखी घरं माझ्याकडे असती. त्यांना पैसे देताना मी कधी तो विचार केला नाही पण माझ्याकडून पैसे काढून घेताना तुम्ही ते सोयीस्कर पणे विसरता. 

मी यापुढे तुला एक पेनीही देणार नही. मी फॅमिली निटिंगला येणार नाही. ती आशा तू सोडून दे. तुमची फॅमिली मिटिंग म्हणजे मला जाळ्यात पकडून माझ्याकडून पैसे काढून घेण्याची ट्रिक आहे हे उशिरा का होईना आता माझ्या लक्षात आलंय. करप्ट फॅमिली म्हणजे काय ते तुमच्याकडे बघितलं कि समजतं.  

पाहिजे तर जॉनीकडून घे. माझे पन्नास हज्जार डॉलर्स त्याच्याकडे आहेत. इतके वर्षात त्याने ते परत केलेले नाहीत. व्याजासकट ते आता भरपूर वाढले असतील. त्यातले बघ तुला काही मिळतात का. आणि आता माझं घर सोड. पुष्कळ वर्ष राहिलीस. खूप त्रास दिलास. माझा मानसिक छळ केल्याबद्दल खरंतर तू मला नुकसान भरपाई द्यायला हवी." 

एवढं बोलून तिनं फोन बंद केला. कपच्या तळाशी उरलेली बर्फातली कॉफी संपवत बसली.