Friday, April 5, 2019

शनिवार सकाळ


समजा माझा मुलगा पुढे कधी कॉमेडियन झाला तर विनोद निर्मिती साठी तो बहुदा माझा वापर करेल असं वाटतं. सगळीच मुलं आपल्या आईवडिलांचा करतात. रसेल पीटर्स त्याच्या वडिलांवर विनोद करतो. पीटर्सचा बरेचदा ऐकलेला विनोद आहे: तो लहान असताना बरोबरच्या कॅनेडियन मुलांच्या नादी लागून आपल्या वडिलांना धमकी देत असे -  "तुम्ही जर मला मारलत तर मी पोलीसला फोन करेन."  त्याचे भारतीय वडील म्हणत, "अगदी खुषाल कर. तू फोन केल्यावर पोलिसांना आपल्या घरी यायला दहा मिनिट तरी लागतील. तेवढ्या वेळात मी तुझी हवी तेवढी धुलाई करू शकतो."  तू नलिकेवरची सुपर वुमन लिली सिंग आपल्या पंजाबी आईवडिलांवर विनोद करते. ती स्वतःच तिच्या आईची आणि वडिलांची भूमिका साकारते आणि छोट्या विनोदी नाट्यछटा तयार करून त्या आपल्या चॅनल वर लावते. भरपूर लोक ते आवडीनं बघतात.

तसं माझ्या मुलाकडे आताच थोडंफार मटिरियल साठलं असावं. ते त्याच्या लक्षात आलं नसेल तर काही गोष्टींची इथे नोंद करून त्याला थोडी मदत करण्याचा विचार आहे जेणे करून त्याच्या लक्षात येईल कि मी त्याच्यासाठी एक चांगला विनोदाचा स्रोत होऊ शकते. माझ्या नेहमीच्या वागण्यात त्याला विनोद आढळेल अशी आशा आहे.

होतं काय की शनिवारी सकाळी त्याला कुठे जायचं असेल तर शुक्रवारी संध्याकाळी मी त्याला म्हणते, "तुला जिथे जायचंय ना तिथे जवळच माझं थोडं काम आहे. आपण बरोबरच जाऊ."  तसं माझं काम वगैरे काही नसतं पण उगीच त्याला एकटं कशाला सोडा म्हणत मी त्याच्या मागे लागते. खुशीत, नाखुषीनं कि नाईलाजास्तव माहित नाही पण तो सहज तयार होतो.

मी वेळेची फार पक्की आहे. कुठेही जायचं असो नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर असल्या प्रमाणे वेळेत हजर रहायला मला आवडतं. तीच सवय मुलाला लावायचा मी कसून प्रयत्न करतेय पण अजून तरी मला त्यात बिल्कुल यश आलेलं नाही. "ऊठ, ऊठ", हा नेहमीचा ओरडा करत कसे बसे आम्ही तयार होतो. उबर बोलावतो. उबर मध्ये बसत असताना माझ्या लक्षात येतं कि ड्रायव्हरनी त्याची सीट जरा जास्त मागे केलीय. त्यामुळे पुढच्या आणि मागच्या सीट मधलं अतंर खूप कमी झालंय.

मागच्या शनिवारी तसंच झालं, "मला पाय आखडून बसावं लागतय. त्याला सांगू कि काय सीट थोडी पुढे घे म्हणून,"  मी स्वतःशीच  पुटपुटले. मुलानं तात्काळ मला नको सांगूस म्हणून खुणावलं. आज काल सर्वसाधारणपणे सगळ्याच बाबतीत मी त्या तीन जग प्रसिद्ध माकडांसारखं डोळे, कान, आणी तोंड बंद ठेवावं अशी त्याची अपेक्षा असावी.

पाय आखडून बसावं लागल्यामुळे प्रवासात माझं मन रमेना. गाडीतला आवाज कानांना टोचू लागला. मी ड्रायव्हरला विनंती केली, " जरा रेडिओचा आवाज कमी करता का? किंवा बंद केलात तरी चालेल."  मुलाला ते आवडलं नाही पण  मी तिकडे दुर्लक्ष केलं. त्यानं गाडीत बसल्या बसल्या लगेच फोनच्या कांड्या आपल्या कानात अडकवल्या होत्या त्यामुळे त्याला रेडिओच्या आवाजाचा त्रास व्हायचा प्रश्न नव्हता.

थोडा वेळ शांततेत गेला आणि मला गरम व्हायला लागलं. बाहेर खूप थंडी असेल आणि गाडीत हिट चालू असेल तर मी ड्रायव्हरला म्हणते, " खिडकीची काच थोडी खाली करते हं. पाठीमागे गरम होतय." किंवा बाहेर थंडी नसेल आणि गाडीच्या काचा खाली असतील तर मी ड्रायव्हरला विचारते, " तुमचा ए सी बिघडलाय का? चालू करा ना. मागे फार गरम होतंय." अशावेळी मुलगा नाईलाजाने मान हलवत माझ्याकडे बघतो.

शेवटी एकदाचं आमचं उतरायचं ठिकाण आलं.  मी  मुलाला म्हंटल,  "तुझं झालं कि मला मेसेज कर, मग ठरवूया कुठे भेटायचं  ते." तो त्याच्या कामाला गेला. त्याचं काम होई पर्यंत काय करावं या विचारात मी जवळपास आमच्या सार्वजनिक वाचनालयाची शाखा, एखादं पुस्तकांचं दुकान वगैरे काही दिसतंय का ते बघितलं. काहीच दिसलं नाही. मात्र  कोपऱ्यावरचं स्टारबक्स मला खुणावत होतं. बाहेर थंडीत फिरण्यापेक्षा गरम कॉफीचे कडवट घुटके घेत उबेत बसण्याचा मोह झाला. पण मी तो मोह आवरला. त्यांच्या फ्रुट आणि चीज बॉक्सचं आजकाल मला व्यसन जडलय. बहुदा त्यामुळेच सकाळी वजनाचा काटा चार पौंडांनी वर गेला होता. उगीच तोंडात काही घालायला नको, मग तो काटा खाली येत नाही, त्यापेक्षा थोडं चाललेलं बरं असा विचार करत मी जवळच्या पार्कच्या दिशेनं चालू लागले.

वाटेत एक डिपार्टमेंटल स्टोअर लागलं. तिथे मोठ्ठ्या काचेच्या खिडकीत कपडे, चप्पल- बूट, हॅण्डबॅग्ज, स्कार्फ यांची आकर्षक मांडणी केलेली होत. माझी पावलं क्षणभर ते बघायला थबकली. खिडकीतली मांडणी बघून वाटलं पार्कमध्ये चाललं काय किंवा डिपार्टमेंटल स्टोअरच्या आत चाललं काय एकूण एकच. चालणं हे शेवटी चालणं आहे - आत काय नी बाहेर काय. पार्क मध्ये फिरायचा विचार बदलून मी दुकानातला सरकता जिना चढले .

लवकरच लक्षात आलं की पार्क मध्ये चालताना नक्कीच जास्त प्रसन्न वाटलं असतं. पण थोड्याच वेळात एकटीनं चालण्याचा कदाचित कंटाळा आला असता. एवढ्या मोठ्या दुकानात चालणं बरच तणावपूर्ण आहे - दाटीवाटीनं ठेवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू, त्यांच्या किंमती, त्यातल्या काहींवर डिस्काउंट आहे तर काहींवर नाही, साईझ, रंग या सगळ्याची सांगड घालताना मनावर ताण पडतोय. पण वेळही पटकन जातोय.

शिवाय डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये चालत असताना आपल्या काही सुप्त इच्छा अनपेक्षितपणे पूर्ण होऊ शकतात जे पार्क मध्ये चालताना संभव नसतं. म्हणजे आपल्याला जर खूप दिवसांपासून वाटत असेल कि आपल्या बाथरूमच्या कपाटात, दात घासण्यासाठी कोळशाची पावडर असावी तर अचानकपणे छोट्याशा नाजूक निळ्या बरणीत पॅक केलेली चारकोल पावडर आपल्या समोर येते आणि आपली ती इच्छा पूर्ण होऊ शकते. किंवा तू नलिकेवरच्या व्हिडिओत जर एखादया मुलीनं अंड्याचं पांढरं चेहऱ्याला लावताना केस मागे सारण्यासाठी विशिष्ट प्रकारचा हेअर बँड वापरला असेल आणि तसा हेअर बँड आपल्याकडे नसल्या कारणानी अंड्याचं पांढरं चेहऱ्याला लावण्याची प्रक्रिया आपल्याला पुढे ढकलावी लागली असेल तर अनपेक्षितपणे तशा प्रकारचा हेअर बँड आपल्या समोर येतो आणि आपली ती इच्छाही पूर्ण होते.

दुकानात मी स्किन केअर, हेअर केअर, फूट स्क्रब, लीप स्क्रब, हेअर मास्क, फेस मास्क, बाथ बॉम्ब, शॉवर ब्लास्ट च्या चक्रव्यूहात अडकलेली होते आणि फोन वाजला. कोण ते माझ्या चालण्यात व्यत्यय आणू पहातंय म्हणून बघितलं तर मुलाचा मेसेज होता  - "माझं झालं, चल जाऊया" तो म्हणाला. त्याचं खूप लवकर आटपलं असं वाटलं म्हणून घडाळ्यात बघितलं तर एक तास होऊन गेला होता. माझं अर्ध दुकानही अजून चालून झालं नव्हतं.

मी त्याला दुकानाचा पत्ता दिला आणि दुसऱ्या मजल्यावर यायला सांगितलं. तो दुकानापाशी आला, पण बाहेरच थांबला.  मी एक -दोनदा सांगून बघितलं - "वर ये, जरा दुकानात फिरून बघ. काहीतरी सापडेल जे तुला पुष्कळ दिवसांपासून हवं आहे."  पण त्यानं नकार दिला.

मग माझा नाईलाज झाला. किती वेळ त्याला खालती उभं रहायला लावणार?  परत त्यानं कटकट केली असती. म्हणून ज्या वस्तू शॉपिंग बास्केट मध्ये होत्या त्यांचे पटकन पैसे दिले आणि मी खाली आले. आम्ही दोघे लंच-ब्रंच साठी डायनरच्या दिशेने चालू लागलो. थोडा वेळ चालल्यावर माझ्या मनात जे सलत होतं ते मी मुलाजवळ व्यक्त केलं. त्याला म्हंटलं,  "अरे, थिअरीच्या कपड्यांवर चांगला डिस्काउंट होता दुकानात, पण तुझं काम इतक्या पट्कन झालं कि मला नीट बघायला वेळच मिळाला नाही." "तू सांगितलंस हे मला दुकानातून बाहेर आल्या आल्या. परत परत तेच कितीदा सांगशील," तो कुरकुरला.

आम्ही डायनर मध्ये पोहचून खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर वेटरनी कॉफीचा कप माझ्या पुढ्यात आणून ठेवला. त्या बरोबर होतं  कॉफीत घालण्यासाठी नेहमी प्रमाणे फ्रिज मधलं थंडगार दूध. माझ्या मनातली नेहमीची तक्रार नकळत ओठांतून बाहेर पडली, "या लोकांना कधी समजणार कि गरम चहा- कॉफी मध्ये नेहमी गरम दूध घालावं. फ्रिज मधलं थंड दूध घातलं कि कॉफी चटकन थंड होते आणि ती पिण्यामागचा हेतू असफल होतो." मुलानी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपल्या सेलफोनवर लक्ष केंद्रित केलं.

मग मी स्वतःशीच थोडा संवाद साधला. माझ्या बोलण्यात तसं तथ्य आहे. अमेरिका भारता कडून सध्या बऱ्याच गोष्टी शिकते आहे - योग, ध्यान, चाय, हळदीचा वापर, अश्वगंधा, ब्राम्ही सारख्या जडीबुटींचा वापर (दात चकचकीत करण्यासाठी कोळशाच्या पुडीचा वापर). पण काही गोष्टी अजूनही शिकणं बाकी आहे. त्यातली एक म्हणजे गरम चहा- कॉफीत नेहमी गरम दूध घालायचं असतं आणि दुसरं म्हणजे माशांचे तुकडे नेहमी पातळ कापायचे असतात.  सामन, किंग फिशचे काप एवढे जाड कापुन ठेवतात कि तळताना ते बाहेरून पटकन शिजले जातात पण आतुन कच्चे रहातात. आतून शिजायची वाट बघत बसलं कि बाहेरून जास्त शिजतात. एवढी साधी गोष्ट या लोकांना का समजत नाही माहित नाही. मुंबईतल्या कुठल्याही मासळी बाजारातली कुठलीही कोळीण सहज शिकवू शकेल कि माशांचे काप पातळ कसे कापावेत.

कोळणींवरून आठवलं- मुंबई कितीही बदलली तरी एक गोष्ट कायम म्हणजे कायम...अगदी कायम मुंबईत टिकावीशी वाटते ती म्हणजे आपली आन- बान -शान आणि पहचान असलेल्या आपल्या कोळणी आणि आपले मासळी बाजार. कोळणी आता पूर्वीसारख्या दारावर मासळी विकायला येत नाहीत असं म्हणतात. दारोदार फिरून मासळी विकायची जरूर त्यांना आता भासत नाही हि चांगली गोष्ट आहे. प्रभादेवीतल्या आमच्या इमारतीत फेरीवाल्या विक्रेत्यांना प्रवेश नाही आणि इमारतीतले जे काही थोडे लोक मासेहारी आहेत ते मासळी बाजारात जातातच असं नाही. सुपर मार्केटमधून मासे आणतात. सिध्दीविनायक कृपा करो आणि मुंबईतले मासळी बाजार आणि त्यातलं कोळणींच स्थान अबाधित राहो...  डायनरच्या एग्ज बेनडिक्टचा आस्वाद घेत मी सिटी लाईट पासून सुरवात करून, अगर बझार ते प्रभादेवी अशा सगळ्या मासळी बाजारात एक चक्कर मारून आले.

अर्ध्या वाटेवर आलोच होतो म्हणताना जेवण झाल्यावर डायनर मधून आम्ही चालत घरी आलो. हवा छान होती. स्प्रिंग जवळपास सुरु झालाय. थंडी तर होंती पण ऊन पडलं होतं त्यामुळे जाणवत नव्हती. वाय त्याच्या फॅन्टसी बास्केट बॉल बद्दल काहीतरी सांगत होता. गप्पांच्या ओघात घरी कधी पोहोचलो समजलंच नाही. आणलेल्या वस्तू कपाटात ठेवताना लक्षात आलं एक फार मोठ्ठा घोळ झालाय. शॅम्पू- कंडिशनर-जेल-सिरम- मूस च्या घोटाळ्यात कोरड्या केसांचा कंडिशनर घ्यायच्या ऐवजी चुकून मी तेलकट केसांसाठीचा कंडिशनर आणला...आता परत जाऊन तो बदलून आणण्या शिवाय गत्यंतर नाही. तरी नशीब मुलाला पुढच्या शनिवारी परत तिथे जायचय.  मलाही त्याच्या बरोबर जाता येईल. नाहीतर दहा डॉलर्सचा कंडिशनर बदलून आणायला वीस डॉलर्स उबरचा खर्च असं उलट  गणित झालं असतं.

पुढल्या वेळी मात्र मी अजिबात मास्क, स्क्रब, लोशनच्या भोवऱ्यात अडकणार नाही. दुकानात शिरल्यावर इकडे तिकडे काय मांडून ठेवलंय ते न बघता सरळ जाऊन फक्त कंडिशनर बदलून घेणार आणि गेल्या पावली परत फिरून पार्क मध्ये चालायला जाणार...  किंवा थिअरीचे कपडे काही उरले असतील सेल मध्ये तर तेवढेच फक्त बघीन.. .बस ...  आवडलं तर एखादं- दुसरं काहीतरी घेईन.. बस्स. आणि मग लगेच पार्क मध्ये चालायला जाईन. पाऊस नाही पडला म्हणजे नशीब... नाहीतर परत स्टारबक्स खुणावेल.


yesheeandmommy.blogspot.com 

















वाय जर कॉमेडियन झाला तर त्यानं अत्यंत सट्ल कॉमेडी करावी अशी माझी ईच्छा आहे. अगदी सट्ल,  टंग इन चीक म्हणतात तशी. लाऊड बिल्कुल नाही पण तरीही सभोवतालच्या गोष्टींवर खोल भाष्य करणारी. मींडी कलिंग चा एक जोक वाचला होता. तो मला मजेशीर तरीही खोल वाटला. तीचं पूर्ण आडनाव चोकलिंगम.  ते छाटून तिनं कलिंग केलय. एकदा ती दागिन्यांचं प्रदर्शन बघायला गेली. तिथे एक कानातले डूल तिला खूप आवडले. त्याविषयी ती म्हणाली  - ते डूल फार सुंदर होते. अमल क्लुनी जर विधवा झाली तर तिला भेटायला जाताना घालून जाण्यासारखे होते.  किंवा पुलं चा जोक-  ते सुनिता बाईंना एकदा म्हणाले - आपल्या घरात मी एकटाच देशपांडे आहे, तू उपदेशपांडे आहेस. 




Sunday, March 17, 2019

काही आठवणी



                        



बार्बरा बुश जेंव्हा व्हाईट हाऊस मध्ये रहात होत्या तेंव्हा त्यांचे कपडे, हेअर स्टाईल यांची कधी चर्चा होत नसे. त्यांनीही अमेरिकेची फर्स्ट लेडी झाल्यावर आपल्या आधीच्या केश - वेशभूषेत काही बदल केले नाहीत. त्या जशा आधी होत्या तशाच त्यांचे पती राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही राहिल्या. त्यांच्या सूनबाईं लॉरा बुश यांचीही तीच गोष्ट. त्यांनीही व्हाईट हाऊस मध्ये रहायला गेल्यावर आपल्या स्टाईल मध्ये काही बदल केला नाही. एखाद वेळेस हेअर कट थोडा बदलला असेल. पण बहुतेक नाहीच. त्यांच्या सासूबाईं प्रमाणेच त्यांचीही  केश - वेशभूषा पारंपारिक पाश्चिमात्य पद्धतीची राहिली.

परंपरे नुसार राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समाज कार्य करायचं असतं. सार्वजनिक वाचनालय हा लॉरा बुश यांच्या आवडीचा विषय होता, त्यात त्यांनी काम केलं. बुश कुटुंब पिढीजात श्रीमंत आहे. बार्बरा आणि लॉरा आपल्या कुटुंबाच्या इतमामाने व्हाईट हाऊस मध्ये राहिल्या. आपला, आपल्या पदाचा आणि देशाच्या राष्ट्रगृहाचा मान राखत आपली फर्स्ट लेडीची कारकीर्द त्यांनी पार पाडली. 

हिलरी क्लिंटन व्हाईट हाऊस मध्ये रहायला जायच्या आधी पासूनच चर्चेत होत्या. "मी काही कुकीज बेक करत घरात बसणार नाही," अशा प्रकारचं  वादग्रस्त विधान त्यांनी आपल्या नवऱ्याच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान केलं (त्यामुळे घरात बसून कुकीज बेक करण्याचा अभिमान बाळगणाऱ्या महिला भडकल्या ).  तेंव्हापासून जे सुरु झालं ते व्हाईट हाऊस मध्ये राहायला गेल्यावर त्यांनी केलेले केशरचनांचे वेगवेगळे प्रयोग, त्यांनी निवडलेलं हेल्थ केअर बिल हे काम आणि इतरही अनेक सर्वज्ञात कारणांसाठी त्यांच्या पतीं इतकीच प्रकाश झोताची तोफ कायम त्यांच्यावर डागलेली राहिली. आपण आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून व्हाईट हाऊस मध्ये वावरणार हे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलेलं आसल्यामुळे त्या तिथे रहात असे पर्यंत तो प्रकाश झोत त्यांच्यावर रोखलेला होता.

लॉरा बुश व्हाईट हाऊस मधून बाहेर पडल्यावर तिकडे रहायला गेल्या मिशेल ओबामा. त्या खूप लोकप्रिय फर्स्ट लेडी होत्या. सुरवातीलाच जे क्रू या सर्वसामान्य लोक वापरतात त्या ब्रँडचे कपडे घालून टीव्ही वर मुलाखत द्यायला गेल्या पासून मिशेल ओबामांच जे कौतुक सुरु झालं ते त्या व्हाईट हाऊस मधून बाहेर पडेपर्यंत चालूच राहिलं. त्या शिकागोच्या साऊथ साईड या भागात एका सामान्य कुटुंबात जन्मल्या आणि वाढल्या. त्यांच्याकडे पिढीजात पैशाची श्रीमंती नव्हती पण स्वतः कमावलेली शिक्षणाची श्रीमंती भरपूर आहे. नवरा  -बायको दोघांकडेही. देशाच्या राष्ट्रसदनात रहाणाऱ्या लोकांची आदर्श वागणूक कशी असावी याचा धडाचं जणू ओबामा कुटुंबांनी व्हाईट हाऊस मध्ये रहात असताना आपल्या वागण्याने घालून दिला. मिशेल ओबामांनी औपचारिक कार्यक्रमांसाठी ड्रेस निवडताना बहुतांशी अमेरिकन डिझाईनर्सना प्राधान्य दिलं याचीही बरीच प्रशंसा झाली. श्री ओबामा राष्ट्राध्यक्ष होण्या आधी सौ. ओबामा एका विद्यापीठात पदाधिकारी होत्या. फर्स्ट लेडी झाल्यावर त्यांनी ती नोकरी सोडली आणि सरकारी शाळांमधून मुलांना मिळणारं जेवण जास्त पौष्टिक व्हावं, ताजी आणि स्थानिक फळं, भाज्या यांचा त्या जेवणात समावेष असावा म्हणून काम करायला सुरवात केली.

सौ. ओबामांच्या नंतर व्हाईट हाऊस मध्ये रहायला आल्या सध्याच्या फर्स्ट लेडी मलानिया ट्रम्प. त्या न्यूयॉर्क सिटीत फीफ्थ  ऍव्हेन्यू वर रहाणाऱ्या. फीफ्थ ऍव्हेन्यू म्हणजे अमेरिकतलं फॅशनच माहेर घर, मक्का सगळं काय ते. विशेषतः जिथे ट्रम्प टॉवर आहे - ५७ वी स्ट्रीट आणि फिफथ ऍव्हेन्यू च्या कोपऱ्यावर - त्या भागात जगभरच्या सगळ्या मोठ्या फॅशन डिझाईनर्सच्या शोरुम्स आहेत. जगातलं असं एकही मोठं डिझाईनर लेबल नसेल ज्यांची शाखा किंवा "ग्लोबल फ्लॅगशिप स्टोअर", मॅनहॅटनच्या ५० ते ६० स्ट्रीट आणि फीफ्थ ते मॅडिसन ऍव्हेन्यू या भागात नाही. तसंच बर्गडॉर्फ गुडमन, सॅक्स सारखी उंची डिपार्टमेंटल स्टोअर्स ट्रम्प टॉवर मधून खाली अवतरलं कि लगेच पायथ्याशीच आहेत. त्यातून मलानिया लग्नाआधी मॉडेलिंग करायच्या त्यामुळे फॅशनमध्ये त्यांना गती असणं स्वाभाविक आहे. त्यांच्या पोशाखात बरीच विविधता असते. ते लेटेस्ट फॅशनचे असतात आणि कोणाला भेटायला जाताना त्यानीं काय परिधान केलं याची पेपरात "बातमी" होऊ शकते. आपल्या यजमानांच्या शपथ विधीच्या दिवशी त्यांनी परिधान केलेल्या फिक्कट आकाशी रंगाच्या ड्रेसचं बरंच कौतुक झालं. राल्फ लॉरेन या डिझाईनरचा तो ड्रेस खूप सुंदर होता आणि त्यांना शोभतही होता.

व्हाईट हाऊस मध्ये रहायला गेल्यावर मलानियानी सायबर बुलिइंग या सध्या फार गहन झालेल्या समस्येवर काम करायचं ठरवलं. फॅशनच्या जाणकारांचं मत असं कि मलानिया पूर्वाश्रमीच्या मॉडेल असल्यामुळे त्या नेहमी पोषाखाची निवड विचारपूर्वक करत असणार - केवळ काहीतरी घालायचं म्हणून घालायचं अशी नाही. काही महिन्यां पूर्वी टेक्सस मध्ये लहान मुलांच्या शेल्टरला भेट द्यायला जाताना, विमानात चढता - उतरताना त्यांनी झारा या ब्रँडचा ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कोट घातला होता. त्या कोटाच्या पाठीवर ठळक मोठ्या पांढऱ्या अक्षरात एक वाक्य लिहिलेलं होतं - आय रिअली डोन्ट केअर, डू यु.?  झालं...!!! दुसऱ्या दिवशी लगेच वर्तमानपत्रातून चर्चा झाली कि तो मजकूर कोणाला उद्देशून असावा. मलानिया लहान मुलांना भेटल्या तेंव्हा त्यांनी तो कोट घातला नव्हता म्हणजे मुलांना उद्देशून 'आय डोन्ट केअर' असं त्यांना म्हणायचं नसावं. फक्त विमानात चढता - उतरतानाच तो कोट घातला होता. म्हणजे मग कोणाला उद्देशून त्यांना "आय डोन्ट केअर" असं म्हणायचं होतं याची चर्चा काही दिवस रंगली.

अमेरिकन पत्रकार निवडून आलेल्या लोंकांवर कडी नजर ठेऊन असतात. सत्तेत असणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्याचं काम ते अमेरिकन जनतेच्या वतीने करतात. देशवासियांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी केवळ देशाच्या आणि जनतेच्या हिताचच काम करतायत ना, स्वतःच्या हिताचं तर नाही यावर ते डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवतात.  

तसेच मेघना आणि हरीच्या विवाह सोहोळ्यापासून आपण ऐकत आलो कि इंग्रज राजघराण्यातील लोंकांना काय करायची परवानगी आहे आणि काय नाही याचेही नियम आहेत. ते त्या कुटुंबातल्या लोकांना पाळावे लागतात. लग्नाआधी कॅलिफोर्नियात अभिनेत्री असलेली मेघना बी बी सीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, "अभिनय सोडावा लागतोय म्हणजे माझं करिअर संपलं असं मी मानत नाही. मला ज्या समाजकार्या बद्दल तळमळ आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला  आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हरीला साथ द्यायला मी उत्सुक आहे". थोडक्यात काय तर निवडणूक जिंकलेले लोकप्रतिनिघी असोत किंवा राजघराण्यातील लोक असोत - जेंव्हा ते त्या पदावर असतात तेंव्हा त्यांना सर्वसामान्य नागरिकां प्रमाणे आपल्याला हवं तसं वागण्याची मुभा नसते.

 

                       
                                           




आम्ही मुंबईला जातो तेंव्हा मुंबईच्या रस्त्यांवरून बरंच फिरतो. माझ्या पेक्षाही माझ्या मुलाला दक्षिण मुंबईचे काही भाग आता जास्त माहीत झालेत. एखादं ठिकाण नक्की कुठे आहे हे माझ्यापेक्षा त्याच्या चांगलं लक्षात असतं. एखाद दिवशी रात्री कुलाब्याच्या लिओपोल्ड मध्ये जेवलो तर घरी परत येताना मरीन ड्राईव्ह वरून उजवीकडे वळून बाबुलनाथ, पेडर रोड मार्गे प्रभादेवीला यायच्या ऐवजी, सरळ जाऊन वाळकेश्वर, मलबार हील करत थोडं लांबच्या मार्गानी घरी यायला आम्हाला आवडतं. गाडीतल्या रेडिओवर सदाबहार हिंदी गाणी चालू असतात - कधी जुनी, कधी नवीन, पण मुलामुळे आता बहुतेक नवीनच. खूप छान वाटतं मरिन ड्राईव्ह - हाजी अली -वरळी सी फेस करत समुद्राच्या काठानी घरी परत यायला. अशा साध्या तरीही अनमोल आनंदा साठीच बहुतेक आम्हांला पुन्हा पुन्हा मुंबईला जावंसं वाटतं. 

मलबार हिल हा मुंबईचा सुंदर, जुना आणि पॉश भाग आहे. एक वर्षा आणि सह्याद्री या महाराष्ट्र राज्याच्या वास्तू सोडल्या तर मराठीला तिथे स्थान दिसत नाही. पण आपल्या शहराची हि अवस्था आपणच होऊ दिलीय त्याला कोण काय करणार. दक्षिण मुंबईतलं मलबार हील असो किंवा वांद्रा - पश्चिमचं पाली हील - मुंबईच्या श्रीमंत भागातून नाहीशी झालेली मराठी इथे कधी परत येऊ शकेल का हा प्रश्न त्या भागात गेलं कि नेहमी मनात येतो. 

भारतात पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनी काय करावं आणि काय करू नये याविषयी काही गाईड लाईन्स - मार्गदर्शक सीमारेखा असतात कि नाही माहित माही. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या संकल्पनेच्या बाबतीत पाश्चिमात्त्य लोक जितके जागरूक असतात - खास करून पत्रकार  - तेवढी जागरूकता आपल्याकडे दिसत नाही. आज पर्यत त्या बाबतीत विचार करायची गरज भासली नाही. आजवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवासस्थानात राहून गेलेल्या महिलांनी बहुधा आपल्या संस्कारातून मिळालेल्या, अनुभवातून शिकलेल्या मर्यादा पाळल्या असाव्यात. पण आता इंटरनेटच्या युगात हे प्रश्न उभे रहातील.

सध्याच्या सौ. मुख्यमंत्रींच्या बऱ्याच व्हिडीओ इंटरनेटवर आहेत: म्युझिक व्हिडीओ, त्यांनी म्हंटलेली बरीचशी हिंदी गाणी आणि नृत्य - त्यात एका पत्रकाराच्या विनंती वरून दाव्होस मध्ये रस्त्यात म्हंटलेलं गाणं, एखाद- दोन मराठी गाणी, न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये रॅम्प वॉक केल्यांनतर एका मराठी वहिनीला दिलेली मुलाखत वगैरे. वर्षात रहायला आल्यापासून सौ मुख्यमंत्री आपला गाण्याचा "छंद"  हिंदी सिनेसृष्टितील लोकांच्या मदतीनं जोमाने जोपासतायत असं दिसतं. 

हिंदी सिनेमात काम मिळवायला अधीर झालेली, ज्युनियर कॉलेज मध्ये शिकणारी एखादी मुलगी आपल्याला काय करता येतं ते दिगदर्शक, कास्टिंग एजंटना दाखवण्यासाठी ज्या प्रकारची व्हिडीओ बनवेल तशी ती म्युझिक व्हिडिओ आहे. त्यात महानायक असल्यामुळे ती व्हिडिओ बऱ्याच लोकांनीं बघितली आहे. जितक्या लोकांनी ती बघितली आहे त्या प्रमाणात कोणालातरी त्याचे पैसे मिळत असतील. अशी आशा करूया की त्या व्हिडिओतून मिळणाऱ्या पैशांचा निधी बनवून त्याचा उपयोग महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी केला जात असेल किंवा किमान मराठीच्या प्रसारासाठी तरी. कारण वर्षा शिवाय महानायक किंवा कमी -महा नायकही व्हिडीओत आले नसते. 

हिंदी सिनेमा सृष्टीत अशी काही मंडळी आहेत ज्यांना मराठीशी जवळीक साधण्या ऐवजी शेजारी राष्ट्रांशी जवळीक साधणं जास्त महत्वाचं वाटतं. तिथल्या लोकांना आपल्या सिनेमात काम द्यायचं, स्वतः त्या देशात जाऊन कार्यक्रम सादर करायचे अशा रितीने शेजारी राष्ट्राशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते आतुर असतात. खरतर ही मंडळी आज दोन -तीन पिढ्या मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात रहातायत. पण मराठीचा गंधही त्यांनी स्वतःला लागू दिलेला नाही. यापैकी कित्येकांची  महाराष्ट्र हि केवळ कर्मभूमीच नाही तर जन्मभूमीही आहे. पण ज्या राज्यानी त्यांच आयुष्य समृद्ध केलं त्या राज्याबद्दल कृतज्ञता, इथल्या भाषेबद्दल, लोकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्यांना वाटते की नाही अशी शंका यावी इतके ते लोक आपल्याच धंद्यात मश्गुल असतात. या लोकांची तिसरी - चवथी पिढी आता मुंबईत वाढत आहे. म्युझिक व्हिडीओच्या कमाईतून उभारण्यात आलेल्या निधीचा उपयोग या मंडळींना मराठीची विनाशुल्क म्हणजे मोफत शिकवणी लावण्यासाठी होऊ शकला तर  फार  बरं होईल.  

दुसरं म्हणजे शिवाजी मंदिरच्या नूतनी करणासाठीही त्यातल्या थोड्या निधीचा वापर करता आला तर बरं. दादर मधलं ते जुनं नाट्यगृह आहे. तिथे काही सुंदर नाटकं बघितल्याची आठवण मज जवळ आहे. खास करून दोन आठवतात  - महासागर आणि ती फुलराणीदोन्ही ओरिजिनल संचातली बघितली होती मी. नीना जोशी, भारती आचरेकर, नाना पाटेकर आणि मोहन भंडारींचं महासागर आणि भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषींच्या भूमिका असलेलं ती फुलराणी. त्या नाटकात चांगलं काय होतं  - अभिनय कि इतर काही हे तेंव्हा समजलं नव्हतं. पण एक छान नाट्य प्रयोग आपण आत्ता बघितला हे ती दोन्ही नाटकं बघितल्यावर जाणवलं होतं.

त्या नाटकांतील काही दृश्य आजही आठवतात: स्टेजवरच्या दिव्यांच्या प्रखर प्रकाशात गोड गुलाबी दिसणारी, "तुला शिकवीन चांगला धडा" म्हणत काठ-पदराच्या हिरव्या साडीत वाऱ्याच्या मंद झुळकी प्रमाणे स्टेजवर वावरणारी; राणीसाहेबांनी, "आपले वडील दारू पण पितात?" असं विचारल्यावर "दारूचं पितात!" म्हणणारी भक्ती बर्वे अजून डोळ्यांसमोर दिसते. मूळ संचात हि दोन्ही नाटकं बघायला मिळाली या माझ्या भाग्याचा मलाच अभिमान वाटतो. आई बरोबर बघितली होती हि नाटकं मी. मुंबईला गेल्यावर दरवेळी मी शिवाजी मंदिराला जाते. त्या रस्त्यावर वाहनांचा, माणसांचा, दुकानांचा, उपहारगृहांचा, फेरीवाल्या विक्रेत्यांचा भयंकर कलकलाट असतो. तरीही न चुकता जाते. तिथे तळमजल्यावर एक पुस्तकांचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर नाटकांच्या जहिरातींचे मोठे फलक लावलेले असतात. पण लॉबीची अवकळा बघून एखाद्या नाटकाचं तिकीट काढावं असं मनापासून वाटत नाही.

किंवा कदाचित माझी नाटकांची आवड आता बदलली असेल. कित्येक वर्षात शिवाजी मंदिर मध्ये नाटक बघितलं नाही. शेवटचं दुर्गा झाली गौरी बघितलं होतं. त्यांनतर नाही. अलीकडे नाटकं बघितली ती -  शिवाजी पार्कच्या सावरकर सभागृहात शाहा कुटुंबीयांनी सादर केलेलं हिंदी नाटक - इस्मत आपा के नाम - ते मला बऱ्याच दिवसांपासून बघायचं होतं आणि दुसरं - इंग्रजी नाटक, ते मरीन ड्राईव्ह वरच्या एन सी पी ए त बघितलं. इंग्रजी नाटकात चार पात्र होती...  म्हणजे पाचवं पात्रही होतं पण ते जाऊदे.  चार पात्रांपैकी - एक पारशी - दक्षिण मुंबईत रहाणारा, एक मुसलमान - तो हि दक्षिण मुंबईत भेंडी बाजार मध्ये रहाणारा, एक गोव्याचा ख्रिश्चन - त्याचंही घर मुंबईतच कुठेतरी. चवथं पात्र होतं- ठाण्याला रहाणारा, पहाटे चारला उठून रेल्वेतील आपल्या तिकिटं चेकरच्या नोकरीवर जाणारा मराठी माणूस. .. हे चित्रण वास्तवापासून फार दूर नसेल.

मध्यंतरी एका टॉप टेन कि ट्वेन्टी कि फिफ्टी लिस्ट मध्ये भारतातील सर्वात जास्त रहाण्यायोग्य शहरात - मोस्ट लिव्हेबल सिटीज इन इंडिया मध्ये - मुंबई आणि पुण्या बरोबरच ठाण्याचं नाव होतं. ठाण्यातला बदल माझ्या डोळ्यांसमोर झालाय. गडकरी रंगायतन, सार्वजनिक स्विमिंग पूलसह मासुंदा तलाव परिसराचं सुशोभीकरण इथुन सुरवात झाली. त्या पलीकडे ठाणं आता पुष्कळ विस्तारलंय. हे सगळं मराठी माणसांनीच घडवून आणलं. म्हणजे मराठी माणसांना हि सवयच जडून गेलेली दिसते. गावं सुधारायची, त्यांचा दर्जा उंचावायचा. मग बाहेरून लोक येणार आणि आपणच उभारलेल्या गावातून आपली भाषा आणि आपणही हळूहळू नाहीसे होत जाणार. अगदी संत, निरिच्छ वृत्तीने आपली गावं आपण सोडतो. ते मुंबईत झालं, पुण्यात होतंय अशी चिन्ह दिसतायत, ठाण्यातहीं तेच झालं तर आपण दुसऱ्या कोणाला दोष नाही देऊ शकणार. दोन -तीन वर्षांपूर्वी ठाण्याच्या एका हाऊसिंग सोसायटीत नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम थोडा बघितला. तो मराठीत नव्हताच.

समजा ठाण्यातूनही आपण बाहेर पडलो तर मजल दरमजल करत एक दिवस बडोद्याला पोहचु. मग आपल्याला गुजराती शिकावं लागेल.  मुंबईत रहाणाऱ्या लोकांना गुजराती ऐकायची सवय आसते. मी असं ऐकलंय कि बडोद्यात नोकरी हवी असेल तर गुजरातीची परीक्षा द्यावी लागते. हे खरं आहे कि खोटं देव जाणे. परंतु थोडा लिहण्या- वाचण्याचा अभ्यास केला तर आपण त्या परीक्षेत पास  होऊ शकू .

न्यूयॉर्क फॅशन वीक मधील आपल्या रॅम्प वॉक संबंधी एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौभाग्यवती मुख्यमंत्री म्हणाल्या कि त्या रॅम्प वॉकच्या, "प्रमोटर्स आणि डायरेकटर्स कडे इंटिरियर आणि डिझाईन शिकायला येणाऱ्या मुलांमध्ये ५० टक्के मुले शेतकरी कुटुंबातुन येतात." शेतकरी कुटुंबातील मुलं इंटिरियर आणि डिझाईन शिकायला येत असतील तर ही फारच चांगली गोष्ट आहे. 

तरीही मुंबईत घडणाऱ्या घडामोडी बघून मला चित्र - विचित्र स्वप्न पडतच रहातात. परवा महानायक स्वप्नात आले. आपल्या गाडीतून कुठेतरी निघाले होते. जरा थकलेले वाटले. त्यांनी त्यांच्या हातातल्या सेलफोनवर एक दृष्टिक्षेप टाकला. अपॉईंटमेंट्स चेक केल्या. त्यांची पहिली अपॉइंटमेंट एका लग्नाच्या पंक्तीत पाहुण्यांना जेवण वाढण्याची होती. दुसरी एका म्युझिक व्हिडिओच्या चित्रीकरणाची. महानायकांनी एक दीर्घ श्वास घेतला. खिडकीतुन बाहेर बघत ते स्वतःशीच गुणगुणु लागले.. असा मी काय गुन्हा केला....







Wednesday, January 23, 2019

मृत्युलेख






वर्तमानपत्र कुठलही असो पहिल्या पानावरच्या बातम्या वाचूच नये असं वाटतं आजकाल. मन ताजतवानं  होईल, मनाला उभारी मिळेल असं त्यात काही नसतं. कुठेतरी युद्ध सुरु,  कुठेतरी गोळीबार, नाहीतर राजकारण अशा बातम्यांनी पहिली पानं भरलेली असतात. एखादी वाचनीय बातमी शोधत पानं पलटत जावं तर सकरात्मक,  प्रेरणादायी काही सापडतं ते पेपरच्या शेवटी - ओबिच्युएरी विभागात. न्यूयॉर्क टाईम्स मधले मृत्युलेख कधीकधी पेपरचं अख्ख/ अर्ध पान व्यापतात. बहुतांश मंडळी चांगली ऎंशी, नव्वद वर्ष पार केलेली असतात त्यामुळे त्यांच्या मृत्यूची दुःखद वार्ता यापेक्षा त्यांच्या संपंन्न दीर्घ आयुष्याचा गौरव अशा लेखात जास्त असतो. अशा काही मृत्यूलेखांनी माझ्या मनाला टवटवी आणली आहे, माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकली आहे, वाचनात भर टाकली आहे, आणि कधीकधी प्रवासातही.

त्यातलाच एक मृत्युलेख म्हणजे गेल्या वर्षी ६ जून च्या पेपरातला, जिल केर कॉनवे यांच्या वरचा. चांगला सविस्तर मृत्यूलेख होता तो. डॉक्टर केर  कॉनवे स्मिथ कॉलेजच्या प्रेसिडेंट होत्या. स्मिथ कॉलेज नक्की कुठे आहे हे माहित नसलं तरी त्याबद्दल तसं ऐकून माहिती होतं. बेट्टी फ्रीडॅन आणि ग्लोरिया स्टायनम  - ज्यांनी महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा म्हणून आपल्या कार्यानी आणि लिखाणानी सामाजिक क्रांती घडवून आणली, त्या दोघीही स्मिथ कॉलेजच्या विद्यार्थिनी. अमेरिकेतलं महिलांसाठीच ते सर्वात मोठ्ठ लिबरल आर्टस् कॉलेज.

डॉकटर कॉनवे स्मिथ कॉलेजच्या पहिल्या महिला प्रेसिडेंट. जन्मानी त्या ऑस्ट्रेलियन होत्या. तिथे त्यांच्या वडिलांचं मोठ्ठ  ३५००० हज्जार एकरांचं मेंढ्यांच आणि गुरांच कुरण होतं. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी मधून पदवी घेऊन प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या दोन मित्रांच्या समवेत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सेवेत नोकरी साठी अर्ज केला. त्यांच्या मित्रांना नोकरी मिळाली. त्यांना नाही. परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर शेरे लिहिले - ती जरा जास्तच सुंदर आहे...जरा जास्तच आक्रमक बुद्धीची आहे... वर्षाच्या आत तिचं लग्न होईल... परराष्ट्र सेवेसाठी चालणार नाही.

डॉकटर कॉनवेंनी आपल्या ट्रू नॉर्थ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलंय, "सप्टेंबर १९६० मध्ये मी हार्वर्ड आणि केम्ब्रीज, मॅसॅच्युसेट्सला जाण्यासाठी निघाले. आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यातून जात असताना जी हुरहूर, उत्साह असतो त्या संमिश्र स्थितीत होते. मी उच्च शिक्षणासाठी निघाले होते. तरीही हि निवड म्हणजे एका अभ्यासपूर्ण व्यवसायाच्या स्वप्नानी आकाराला आलेल्या आयुष्याची पूर्तता नव्हती. ऑस्ट्रेलियात मनासारख्या क्षेत्रात काम मिळण्याची शक्यता सर्वतोपरीने पडताळून पहिल्यानंतर , एक -एक करून ती सर्व क्षेत्र महिलांसाठी खुली नाहीत असं आढळल्यावर मी या निर्णयाप्रत पोहोचले होते."

आपल्या कारकिर्दीचा बराचसा भाग डॉक्टर केर - कॉनवेंनी केवळ परराष्ट्र सेवेतच नाही तर शास्त्र, कायदा, कला या सर्व क्षेत्रात महिलांना चांगली वागणूक मिळावी म्हणून झगडण्यात घालवला. त्या इतिहास तज्ञ होत्या. अमेरिकन समाजात स्त्रियांच्या भूमिकेबद्दल त्यांनी बरच लिखाण केलं. त्या कुशल अभ्यासक होत्या आणि आपल्या वैविध्य पूर्ण कारकिर्दीत त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरवातिच्या कालखंडातील अमेरिकेतील महिला सुधारकांचा विशेष अभ्यास केला.

इतर पुस्तकां बरोबरच त्यांनी तीन मनोगत लिहिली जी टीकाकारांच्या प्रशंसेस पात्र ठरली. पहिलं मनोगत १९८९ साली प्रकाशित झालेलं द रोड फ्रॉम कुरेन.  हे त्यांच्या ऑस्ट्रेलियातील बालपण बद्दल आहे. त्यानंतर १९९४ मधलं ट्रू नॉर्थ हे ऑस्ट्रेलियाहुन अमेरिकेला आल्या नंतरच्या कालखंडाबद्दल आहे आणि २००१ मधलं अ वूमन्ज एज्युकेशन जे स्मिथ कॉलेज मधील त्यांच्या कारकिर्दी विषयी आहे. 

डॉक्टर कॉनवे असं म्हणत कि आपल्या आईला जाणून घेण्यासाठी, ज्या समाज प्रवाहांनी त्यांच्या आईला घडवलं ते समाज प्रवाह समजून घेण्यासाठीच एक साधन म्हणून त्या इतिहासाच्या अभ्यासाकडे आकर्षित झाल्या. त्या पंधरा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांचा मोठा भाऊ वयाच्या वीसाव्या वर्षी अपघातात गेला. त्या एका ठिकाणी लिहितात,  "माझ्या आईला नेहमी असं वाटत आलं कि माझं उच्च शिक्षण म्हणजे हे दोन मोठे दैवी आघात सहन करावे लागल्या बद्दलची भरपाई म्हणून तिला मिळालेलं बक्षीस असायला हवं."

डॉकटर कॉनवे १९७५ साली वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्मिथ कॉलेजच्या अध्यक्ष झाल्या. बऱ्याच नामवंत महिला या कॉलेजच्या माजी विद्यार्थिंनीं मध्ये मोडतात. ग्लोरिया स्टायनम आणि बेट्टी फ्रिडॅन बरोबरच गॉन विथ द विंड या सुप्रसिद्ध कादंबरीची लेखिका -  मार्गारेट  मिचेल, पाककलाशास्त्र तज्ञ ज्युलिया चाईल्ड, अमेरिकेच्या दोन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी - नॅन्सी रेगन आणि बार्बरा बुश. तसंच द बेल जार ची लेखिका आणि कवयत्री सिल्व्हिया प्लॅथही त्याच कॉलेजची.

या झाल्या स्मिथ कॉलेजच्या काही खऱ्याखुऱ्या माजी विद्यार्थिनी. त्यांच्या बरोबरच ओव्हर द इयर्स गाजलेल्या टी व्ही मालिकांतील काही व्यक्तिरेखाही स्मिथ मध्ये शिकलेल्या आहेत असं दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ सेक्स अँड द सिटी मधली शार्लट यॉर्क ही व्यक्तीरेखा,  ग्रेज ऍनाटमी मधली ख्रिस्टीना यांग,  गिलमोर गर्ल्स मधली एमिली गिलमोर... आणि ज्या व्यक्तिरेखेनी लहानपणी मला खूप भुरळ घातली होती ती क्रेमर व्हर्सेस क्रेमर या सिनेमातली मेरील स्ट्रीप नी पडद्यावर साकारलेली जोऍना क्रेमर.

१८७५ साली सुरु झालेलं स्मिथ कॉलेज सुरवातीचा बराच काळ श्रीमंत मुलींसाठीच फिनिशिंग स्कुल म्हणून ओळखलं जात असे. पण १९६० आणि ७० च्या दशकात बेट्टी फ्रिडॅन आणि ग्लोरिया स्टायनम तिथून शिकून बाहेर पडल्या आणि तेंव्हा पासून ते कॉलेज पूर्णपणे स्त्रीवादी म्हणून गणलं जाऊ लागलं. स्मिथ मध्ये शिकलेल्या महिला महत्वाकांक्षी, दृढनिश्चयी आणि यशस्वी समजल्या जातात.






मुंबईत असताना क्रेमर व्हर्सेस क्रेमरची मी व्हिडीओ वरती बरीच पारायणं केली होती. का माहित नाही. तशी तेंव्हा मी झंजीर, दिवार, द गुड द बॅड अँड द अग्ली आणि फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर या सिनेमांचीही बरीच पारायणं केली होती. पण त्या सिनेमांची गोष्ट वेगळी. त्यात अँग्री यंग मेन होते. हिंदीत अमिताभ बच्चन आणि इंग्रजीत क्लिंट ईस्टवूड. क्रेमर व्हर्सेस क्रेमर मध्ये असं काय होतं? टुटसी डस्टीन हॉफमन? आता आठवतं कि तेंव्हा खूप प्रभाव पडला होता तो मेरीला स्ट्रीपचा आणि तिच्या अभिनयाचा. तो सिनेमा बघताना अर्थातच मला जोऍना क्रेमर स्मिथ मध्ये शिकलेली आहे असं दाखवलंय वगैरे काही समजलं नव्हतं. ते आत्ता समजलं. अमेरिकन सिनेमातले सगळेच्या सगळे संवाद तेंव्हा समजत नसत.स्मिथ कॉलेजच नावही माहित नव्हतं. एकूण अमेरिकेबद्दलच मी पूर्णपणे अज्ञानी होते. क्रेमर व्हर्सेस क्रेमर चित्रीकरण मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साईड, सेंट्रल पार्क या भागात झालंय. ते सगळे भाग कधी काळी आपले नेहमीचे होतील किंवा व्हावेत असं तो सिनेमा पहाताना स्वप्नातही आलं नव्हतं.

पण तेंव्हा (आणि बहुतेक अजूनही) अर्थ सारखा एखाद दुसरा सिनेमा वगळता हिंदी सिनेमातील बहुतेक हिरॉईन  म्हणजे छान छान चकचकीत, रंगीबेरंगी कपडे घालून, भरपूर चेहरा रंगवून नाचायचं - या पलीकडे फारसं काही करत नसत. त्या पार्श्वभूमीवर मेरील स्ट्रीपची ती भूमिका आणि तो सिनेमा मला खूप आवडला होता हे खरं.

थोडं विषयांतर करायचं झालं तर हिंदी सिनेमात नायक - नायिकांच्या निवडीचे निकष बदलतील तेंव्हा बहुतेक हिंदी सिनेमा, त्यातला महिलांचा दर्जा आणि कदाचित त्याबरोबरच देशातली सामाजिक स्थितीही सुधारेल. सध्या बघितलं तर हिंदी नटनटांच्या बाबतीत अभिनय करता येणं हा मुद्दा अनावश्यक मानला जातो. नट्यांचं कौतुक होतं ते कुठल्या निकषांवर?  -  तर म्हणे अमुक तमुक काय सुंदर नाचते, अमुक तमुक काय सुंदर हसते आणि कळस म्हणजे अमुक तमुक म्हणे जगातली सर्वात सुंदर स्त्री ( असं जगातली सर्वात सुंदर स्त्री कोण हे ठरवणं शक्य आहे? ).  नटांच्या बाबतीतही थोडंफार तसंच असतं  - एखाद्याचं शरीर कमावलेलं तर दुसरा एखादा म्हणे मार्शल आर्ट्स एक्सपर्ट.

९०च्या दशकात भारताचे दरवाजे परदेशी कंपन्यांसाठी खुले झाले आणि एका पाठोपाठ एक भारतीय मुली तेंव्हा आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकू लागल्या. त्या स्पर्धांचे प्रमुख प्रायोजक महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनं बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात. त्यांच्या साठी ही जहिरातीची आयती संधी होती. प्रियांका चोप्रा चुकीचं उत्तर देऊनही जिंकली तेंव्हाच खरतर आपल्याला थोडी शंका यायला हवी होती. तिच्या सकट त्या स्पर्धा जिंकलेल्या मुलींना सरळ, विनासायास हिंदी सिनेमात नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या.

सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या मुली हिंदी सिनेमात आल्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत महिलांचा दर्जा उंचावायला मदत झाली का - हा चर्चेचा विषय होऊ शकेल. एवढं मात्र खरं कि या मुलींना सिनेमात कामं निव्वळ त्या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या मुळे मिळाली होती. अभिनयातला "अ" हि त्यांच्या पैकी एकिनीही सिनेमात येण्याआधी गिरवलेला नव्हता. सिनेमात आल्यावर तरी गिरवला कि नाही कुणास ठाऊक.

एकदा या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातली बाजारपेठ काबीज केल्यावर गेल्या काही वर्षात बघितलं तर क्वचितच एखादया भारतीय मुलीनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांकावर स्थान मिळवलंय. त्यामुळे त्यांचा हिंदी सिनेमात प्रवेश करण्याचा ओघही कमी झालाय. कदाचित यथावकाश तो थांबेलही.

उदाहरणा दाखल बघायचं झालं तर अमेरिकेत सौंदर्य स्पर्धा, मॉडेलिंग आणि हॉलिवूड ही संपूर्णपणे वेगळी क्षेत्र आहेत. त्यात अज्जिबात सरमिसळ केली जात नाही. त्यांचे निवडीचे निकषही सर्वस्वी वेगळे असतात. सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या मुली आपली बक्षिसाची रक्कम घेतात, ती पुढील शिक्षणासाठी वापरतात आणि त्यानंतर सर्वसामान्य आयुष्य जगतात. त्यांना ना मॉडेलिंगची संधी मिळते ना सिनेमा -नाटकात किंवा टीव्हीवर अभिनय करण्याची. फॅशन मॉडेल्सची निवड सर्वस्वी वेगळ्या निकषांवर केली जाते. फॅशन मॉडेल्स या सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या नसतात आणि केवळ यशस्वी मॉडेल आहे म्हणून तिला सिनेमात भूमिका मिळाली असं कधी होत नाही. हॉलिवूडच्या अभिनेत्री कधीच कुठल्या डिझाईनर साठी रॅम्पवर चालताना दिसत नाहीत. मग डिझाइनर कितीही मोठा/ मोठी असो. एखादा फॅशन शो पहिल्या रांगेत बसून बघणे यापलीकडे सिने नटनट्यांचा फॅशन शो मध्ये कधी सहभाग नसतो. आणि हॉलिवूडच्या सिनेमात पडद्यावर भूमिका साकारणारे ना मॉडेलिंग मधून तिथे जातात ना सौंदर्य स्पर्धा जिंकून. ते येतात ते नाटकातून किंवा अभिनयाचं रितसर शिक्षण घेऊन... हे थोडं विषयांतर झालं.






योगायोग असा कि मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ऍमहर्स्टला जाणार होतं. ते आधीच ठरलेलं होतं. तिथे आठवडा भर रहाणार होतो. ऍमहर्स्ट हे खेडेगाव आहे. अमेरिकेतलं खेडं असल्यामुळे तिथे वॉल मार्ट आणि टार्गेट सारखी मोठ्ठी दुकानं आहेत.  पण तरीही गाव लहानच आहे. आजूबाजूला फारसं काही नाही. जवळच्या चिकोपी गावात राखीव सैन्याचा तळ आहे, इतर लहान गावं आणि शेतं आहेत. आम्हांला त्यानी काही फरक पडतो अशातला भाग नाही. आम्ही काही प्रेक्षणिय स्थळं बघायला जाणारे, तिथे जाऊन हौसेनी फोटो काढणारे पर्यटक नाही.

कुठेही - मग ते देशात असो कि परदेशात  - फिरायला गेलं कि आमचा दिनक्रम ठरलेला असतो. सकाळी सावकाश उठायचं. आरामात बसून किमान दोन कप तरी चहा प्यायचा. त्याबरोबर टीव्ही किंवा पेपर वाचन - हे पूर्वी असायचं. आता त्याची जागा इंटरनेट आणि ध्यानानी घेतली आहे. ते झाल्यावर आंघोळ वगैरे करून तयार होईपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होते. मग एखादं भारतीय रेस्टोरंट शोधायला बाहेर पडायचं. बऱ्याच प्रयत्नां नंतर - अर्धा पाऊण तास वेगवेगळ्या दिशांना फिरल्यावर एखादं कुठेतरी सापडतच. तिथे चिकन करी आणि रोटीचं जेवण झालं कि सहाजिकच डोळ्यावर झोप येते. मग हॉटेलात परत येऊन झोपायच. झोपून उठल्यावर दुपारचा चहा. तो पिऊन तयार होऊन बाहेर पडेस्तोवर पाच वाजतात. बघण्यासारखं सगळं बंद होतं. मग आता एवीतेवी दुसरं काहीच करता येण्यासारखं नाही तर जरा लांबच्या एखादया रेस्टोरंट मध्ये जाऊया म्हणजे जाताना आपुसकच आजूबाजूचा परिसर बघयला मिळेल असं म्हणतं आम्ही रात्रीच्या जेवणासाठी रेस्टोरंट शोधायला बाहेर पडतो. दुसऱ्या दिवशी परत याचं दिनक्रमाची पुनरावृत्ती होते. हे आता ठरून गेलंय.

म्हणून कि बिस्केन आमच्या फार आवडीच पर्यटन स्थळ आहे. फ्लोरिडा मधलं ते एक छोटं बेट आहे. तिथे पाहण्या - करण्या सारखं काही नाही. फक्त मायामी जवळ असल्यामुळे हवं तेंव्हा  - प्रभादेवीहुन सी लिंकनी बांद्र्याला जावं तसं - मायामीला जाता येतं आणि तिथे सुशी पासून सव्हीचे पर्यंत ज्याचा मूड असेल ते जेवता येतं. गंमत म्हणजे खुद्द कि बिस्केन मध्ये समुद्रावरच्या रिट्झ कार्लटन रिझॉर्ट पासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर एक छोटंसं भारतीय रेस्टोरंट आहे. चक्क एका मुंबईच्या माणसाचं. तिथे आम्हांला एकदा एक डोंबिवलीचा वेटर भेटला होता. असं कोणी भेटलं आणि प्रवासात एक -दोन दिवसा आड चिकन करी - रोटी, डाळ - भात वगैरे खायला मिळालं कि आम्हांला आपला प्रवास फार यशस्वी झाला, एवढ्या लांब आलो त्याचं अगदी सार्थक झालं असं वाटतं. कि बिस्केनहुन मायामीला जायच्या - यायच्या रस्त्यावर एक मोठं मत्स्यालय आहे. दर वेळी ते दिसलं कि मला फार चुटपुट वाटते कि आपण इतक्या वेळा त्यावरून जातो पण एकदाही जरा गाडी थांबवून आत जायचे कष्ट कधी घेतले नाहीत. पण घरात म्हणजे गाडीत इतर कोणाला तेव्हढी खंत सुध्दा वाटत नाही.

ऍमहर्स्ट परिसरातही आम्हांला दोन -तीन भारतीय रेस्टोरंट सापडली आणि तिथे आम्ही न चुकता जाऊन हजेरी लावून आलो.   न्यू इंग्लंड मधला उन्हाळा फार सुंदर असतो असं मी खूप ऐकलं होतं. उन्हाळा छान असतो म्हणजे काय तर फार गरम होत नाही पण फार थंडही नसतं आणि सगळीकडे गर्द हिरवी झाडी असते - हे लवकरच लक्षात आलं. आणि घरं जुन्या पद्धतीची असतात. म्हणजे लॉंग आयलंड, न्यूजर्सी मधल्या उपनगरातल्या घरांसारखी सगळी कुकी कटरच्या एकाच साच्यातून काढलेली आहेत असं वाटत नाही. हिरवीगार शेतं, नागमोडी वळणाचे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी, मधूनच एखादं सुबक घर, लाल रंगाचा तबेला, पांढर लाकडी चर्च आणि आल्हाददायक  हवा - उन्हाळा चांगला नसेल तर नवल.






न्यूयॉर्क आणि बॉस्टन यांच्या मध्ये ऍमहर्स्ट आहे. भोवतालचा सगळा परिसर खेडवळ आहे. तरीही मला वाटलं कि वेळ चांगला जाऊ शकेल. एमिली डिकिन्सनच म्युझियम म्हणून जतन केलेलं जुनं घर ऍमहर्स्ट कॉलेजच्या जवळ आहे. एक दिवस ते बघायचं. थोडं आजूबाजूच्या गावात फिरायचं कि झालं. एवढाच प्लॅन होता. पण दुसऱ्याच दिवशी हायवे वरून जाताना नॉर्थऍम्प्टन गावाचं आणि स्मिथ कॉलेजच एक्झिट दिसलं. ते इतकं अनपेक्षित होतं कि मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझी उत्सुकता पार शिगेला पोहोचली. कधी एकदा ते जाऊन बघते असं झालं. ऍमहर्स्ट पासून नॉर्थऍम्प्टन पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे.

कॉलेज टाऊन्सचं एक वेगळंच वातावरण असतं.  सळसळतं तारूण्य, अनुभवी गुरुजन आणि विदया आणि ज्ञानाची देवाण -घेवाण यांच्या मिश्रणामुळे ते तयार होतं असावं. मग ते प्रिन्स्टन असो, ऑक्सफर्ड असो, बर्कली असो किंवा भर शहरातला कोलंबिया किंवा न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचा परिसर असो. नॉर्थऍम्प्टनही त्याला अपवाद नाही. टुमदार गाव आहे. कॉलेजचं कॅम्पस गावभर पसरलंय. डॉकटर केर-कॉनवेंच्या काळात स्मिथ कॉलेजचा निधी २२० मिलियन डॉलर्स होता. विकिपीडिया नुसार आता तो १. ३९ बिलियन डॉलर्स आहे. कॉलेज बघतिल्यावर त्याची प्रचिती येते. चढ -उतारांच्या रस्त्यांवर विखुरलेली कॉलेजची वेगवेगळी डिपार्टमेंट्स, उंचावरून दिसणारी खालची मैदानं आणि खेळाच्या इतर सुविधा बघितल्या कि ज्या मुलींना अशा कॉलेजात शिकायला मिळतं त्या किती भाग्यवान असं मनात आल्या शिवाय रहात नाही - फक्त न्यू इंग्लंडचा कडक आणि लांबलचक हिंवाळा - न्यूयॉर्क पेक्षाहि कडक आणि लांब  - आणि कॉलेज शिवाय इतर फारसं काही नसलेलं सुनसान गावं सहन करायची तयारी हवी.

शेवटी बघण्यासारखं काही नाही म्हंटल तरी एक दोन ठिकाणं सापडलीच. स्मिथ कॉलेजच स्वतःच छान म्युझियम आहे. जवळचं स्प्रिंगफिल्ड गाव ऐतिहासिक दृष्टया महत्वाचं असल्याने तिथल्या संग्रहालयात जतन केलेले जुन्या वाहनांचे नमुने प्रेक्षणिय आहेत. सुप्रसिद्ध लेखक डॉकटर सुस ज्यांची पुस्तकं अमेरिकेतील बालकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत  - ते मुळचे स्प्रिंगफिल्डचे. म्युझियम मध्ये रूपांतरित केलेलं त्यांचं जुनं घर आणि त्यांच्या पुस्तकांवर आधारलेली बागेतली धातूची शिल्प बघण्यासारखी होती.






हि झाली उन्हाळ्यातली गोष्ट. उन्हाळा संपून फ़ॉल सुरु झाल्यावर २५ ऑकटोबरच्या अंकातलं ओबिच्युएरी पान म्हणजे जणू मृत्युलेखांचा पुष्पगुच्छ होता - विविध प्रकारच्या फुलांनी सजलेला.  अर्ध्याहून अधिक पान व्यापलं होतं ते ओसामु शिमोमीरा यांच्या मृत्यूलेखानी. डॉकटर शिमोमीरा नोबेल पुरस्कार विजेते रसायन शास्त्रज्ञ होते. त्यांनी जेली फिश मधील चकाकणाऱ्या हिरव्या प्रथिनांचा शोध लावला. त्यांचा मृत्यू नागासाकी गावात वयाच्या नव्वदाव्या वर्षी झाला. नागासाकी म्हंटल कि अर्थातच आपल्याला हिरोशिमा आणि नागासाकीचे अणुबॉम्ब हल्ले आठवतात.

ओसामु शिमोमीरांचा जन्म क्योटो शहरात झाला होता. त्यांच्या बालपणात आणि शिक्षणात दुसऱ्या महायुद्धानी बरेचदा व्यत्यय आणला.  त्यांचे वडील जपानी सैन्यात काम करत होते म्हणताना ते आणि त्यांच्या दोन भावंडाना नागासाकी जवळ रहाणाऱ्या त्यांच्या आज्जी -आजोबांच्याकडे  ठेवण्यात आलं. सोळाव्या वर्षी त्यांचं हायस्कुलच शिक्षण पूर्ण झालं  - शाळेत नाही तर एका फॅक्टरीत जिथे त्यांच्या वर्गाला विमानांची इंजिनं दुरुस्त करण्यासाठी पाठवलं होतं. ऑगस्ट ९, १९४५ ला म्हणजे हिरोशिमावर अणुबॉम्ब पडल्या नंतर तीन दिवसांनी त्यांनी एका अमेरिकन बी -२९ विमानातुन दोन -तीन पॅराशूट्स बाहेर पडताना बघितली. थोड्या वेळानी आणखी एक बी -२९ विमान आलं.

डॉकटर शिमोमुरांच्य्या नोबेल आत्मचरित्रात असं म्हंटलय कि दुसरं  बी -२९ विमान बघितल्यावर ते आपल्या कामाच्या स्टूलावर बसले. एक मोठ्ठा प्रकाश झोत छोट्या खिडकीतून आत आला. ३० सेकंद काही दिसेनासं झालं. त्यानंतर ४० सेकंदांनी मोठ्ठा आवाज झाला आणि हवेच्या दबावाची पातळी अचानक बदलली. कुठेतरी मोठा स्फोट झाला हे त्यांचा लक्षात आलं. पण कुठे ते माहित नव्हतं - नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.

आकाशात भराभर काळे ढग जमू लागले. डॉकटर शिमोमुरा जेंव्हा फॅक्टरी पासून तीन मैल लांब असलेल्या त्यांच्या घरी चालत जायला निघाले तेंव्हा हलकासा काळा पाऊस पडायला सुरवात झाली होती. घरी पोहोचे पर्यंत त्यांचा पांढरा शर्ट करड्या रंगाचा होऊन गेला. त्यांच्या आज्जीनी चटकन त्यांच्या आंघोळीचं पाणी काढलं. त्या आंघोळी मूळेच ते त्या काळ्या पावसा मधील किरणोत्सर्गाच्या दुष्परिणामांपासून बचावले असावेत असं डॉकटर शिमोमुरांचं मत होतं.

अणुबॉम्ब हल्ला प्रत्यक्ष अनुभवलेल्या व्यक्तीने केलेलं त्याच वर्णन वाचल्यावर सुन्न मनानी पानावरुन नजर फिरवली तर खालच्या डाव्या कोपऱ्यात बातमी होती ती ग्रीन बीन कॅसरोल या लोकप्रिय पाककृतीच्या क्रियेत्या डोरकस रायली यांच्या मृत्यूची. रायली यांनी १९५५ मध्ये कॅम्पबेल कंपनीच्या होम इकनॉमिक्स डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना ती पाककृती तयार केली. कॅम्पबेलच क्रीम ऑफ मश्रुम सूप, शिजवलेली  फरसबी, थोडंसं दुध  सॉय सॉस, मिरपूड आणि वरून भुरभुरलेला कुरकुरीत तळलेला कांदा हे साहित्य एकत्र करून त्यांनी तो पदार्थ तयार केला होता. सुरवातीला त्याचं नाव ग्रीन बीन बेक असं होतं. तो पदार्थ ५० च्या दशकात अमेरिकन कुटुंबामध्ये इतका लोकप्रिय झाला कि अनेक लोकांच्या बालपणाच्या आठवणी त्याच्याशी निगडित आहेत. किचकट कृती आणि ताजे साहित्य वापरून पदार्थं बनवायची पध्दत आता आली असली तरीही थॅंक्सगिव्हिंगच्या सणाला २० मिलियन घरांमध्ये ग्रीन बीन कॅसरोल आजही  केला जातो. 

कामानी अन्नपूर्णा असलेल्या डोरकस रायलींच्या मृत्युलेखा शेजारी,  उजव्या हाताच्या कोपऱ्यात होती अन्नपूर्णा देवींच्या  निधनाची बातमी. पंडित रविशंकरांच्या त्या प्रथम पत्नी आणि त्यांचे गुरु उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या. जन्मानी त्या रोशन आरा. त्यांच्या गावच्या महाराजांनी त्यांचं नाव अन्नपूर्णादेवी ठेवलं.  त्या  पंधरा वर्षांच्या असताना त्यांचं लग्न पंडित रविशंकर यांच्याबरोबर करून देण्यात आलं. थोडंसं गूढ, अनाकलनीय व्यक्तीमत्व होतं त्यांचं. त्या सुरबहार वादनात पारंगत होत्या. पंडित रविशंकर यांच्या सितार वादना पेक्षाही श्रोत्यांना त्यांचं वादन जास्त आवडत असे असं त्यांनी एकदा म्हंटल होतं. पण लग्नानंतर सुरवातीच्या काळात पंडित रविशंकरांच्या बरोबर केलेले  काही कार्यक्रम वगळता अन्नपूर्णा देवींनी फारसे जाहीर कार्यक्रम केले नाहीत. त्या एकांत प्रिय होत्या. साठच्या दशकात त्यांनी कार्यक्रम करणं आणि मुलाखती देणं पूर्ण थांबवलं. त्यानंतर त्यांची संगीत साधना चालू राहिली ती त्यांच्या शिष्यांमधून.

१९७३ साली आलेला जया आणि अमिताभ बच्चन यांचा अभिमान हा सिनेमा अन्नपूर्णा देवी आणि पंडित रविशंकर यांचं लग्न आणि त्यातील ताणतणावांवर बेतलेला आहे असं म्हंटल जात असं त्या मृत्युलेखात म्हंटलं होतं.  तरी मी सुरवातीलाच म्हंटल कि या मृत्युलेखांपासून आपल्या सामान्य ज्ञानात बरीच भर पडू शकते.





                                              






yesheeandmommy.blogspot.com 















या पोस्ट वरून एक जुना विनोद आठवला. मुंबईच्या एका इंग्रजी पेपरात खूप पूर्वी वाचला होता. तो मी पुन्हा पुन्हा रिसायकल / रियुज करते. इथेही केल्याशिवाय रहावत नाही: इंग्लड मधल्या एका छोट्या गावात मिसेस पटेल तिथल्या स्थानिक वर्तमानपत्राच्या ऑफिसला फोन करते.  म्हणते, "मिस्टर पटेलांच्या मृत्यूची अनाऊंन्समेंट छापायची आहे . केवढ्याला पडेल."  पलीकडून माणूस म्हणतो,  "पाच शब्दांना पाच पौंड."  मिसेस पटेल म्हणते, "दोन पौंडांत पटेल गेले असं छापा ना."  तो म्हणतो, "कमीत कमी पाच पौंड , पाच शब्द."  मिसेस पटेल म्हणते,  "बरं तर मग छापा - पटेल गेले. व्होल्वो विकायची  आहे."