Monday, November 30, 2020

प्रश्न तुमचे उत्तरं आमची (२)



प्रश्न तुमचे उत्तरं आमची
 या सदरातील प्रश्न जास्त करून महिलांनी विचारलेले असतात पण यावेळी पुरुषांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या जास्त होती.  

पहिला प्रश्न bullying विषयी होता. बुल्लीईंग हि जगभर एक गंभीर समस्या आहे. बुल्लीईंगच्या त्रासाला कंटाळून मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. कधीकधी लहानपणी मुलांना शाळेतली मुलं bully करतात- हे त्याचं प्रचलित रूप सर्वांनां माहित आहे. सायबर बुल्लीईंग विषयीही आता जनजागृती निर्माण होत आहे. पण घरात बुल्लीईंग होऊ शकतं याविषयी जास्त बोललं जात नाही. प नी ते बोलण्याचं घरिष्टय दाखवलं.  

त्याचा प्रश्न होता: मी चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. वयातील अंतरामुळे माझी मोठी भावंडं मला नेहमी bully करतात. मी लहान असल्यापासुन सुरु झालेलं बुल्लीईंग आता मी वयानी मोठा झालो असलो तरी थांबलेलं नाही. त्याचं स्वरूप बदललं आहे -एवढच. माझ्या वडिलांना या बुल्लीईंगची कल्पना होती. त्यांनी भावंडांपासुन माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण वडील गेल्यावर बुल्लीईंग जास्तच वाढलंय. मी काय करू?  

सवाल जवाबदार यांचं उत्तर: प, वडीलांची जागा घे आणि स्वतःच संरक्षण करायला शिक. भावंडांकडून होणाऱ्या bullying च मूळ समजुन घेतलस तरच त्यावर कायमचा उपाय शोधू शकशील. तु सर्वात लहान असल्याने लहानपणी मोठ्या भावंडांनी सांगायचं, तु ऐकायचं आणि ते सांगतील तसं वागायचं असं घडलं असण्याची शक्यता आहे. त्याची त्यांना सवय लागली असवी. आजही ते तुझ्याकडुन तीच अपेक्षा ठेवत असतील. पण आता सहाजिकच तुला त्याचा त्रास होतो आहे. थोडा विचार केलास तर लक्षात येईल कि हे बुल्लीईंग थांबवणं वाटतं तितकं कठीण नाही. नियमित ध्यान करत जा. भावंडांकडुन होणारं बुल्लीईंग कायमचं कसं थांबवायचं ह्याचा मार्ग तुला ध्यानात सापडेल. 

न चा प्रश्न : काही वर्षांपूर्वी माझ्या आईचं माझ्या बहिणीच्या घरी निधन झालं. त्यावेळी मी पत्नीसह सहलीला गेलो होतो. मी आईच्या अंत्यविधींना हजर राहू शकलो नाही. ती सल मला आजही बोचते. ती सल कमी करण्यासाठी मी माझ्या पत्नीच्या आईला माझी आई मानून तिची काळजी करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या सासूचा मुलगा असं म्हणतो की मी त्याच्या घरात लुडबुड करतो. तुम्हांला काय वाटतं? 

सवाल जवाबदार: न, सासुची काळजी केल्याने तुझी आई विषयीची खंत कमी होणार नाही. ती खंत कमी करण्यासाठी तु तुझ्या आई बरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आठव. त्या आठवणींना महत्व दे. सासु मध्ये आईला शोधण्याच्या फ़ंदात पडू नकोस. ती तिथे सापडणार नाही  - विशेष करून सासुला स्वतःचा मुलगा असेल तर. पूर्वी जावयाने आपला मान ठेऊन रहाणे हि एक संकल्पना अस्तित्वात होती. सीमारेषांचं उल्लंघन झालं की संघर्ष अटळ असतो. तु पत्रात म्हंटलं आहेस कि तु सासुची काळजी करतोस, काळजी घेतोस असं म्हंटलेलं नाही. त्याचा अर्थ मला नीटसा समजला नाही. पण सासुचा मुलगा आपल्या आईची काळजी घेण्यास सक्षम असेल तर तू तुझ्या सीमारेषा पाळून रहा. 

श चा प्रश्न: काही वर्षांपूर्वी माझ्या वडीलांचं आणि त्यांच्या आईचं  - माझ्या आज्जीचं निधन झालं. माझी आई त्यांच्या शेवटच्या दिवसात त्या दोघांच्याही जवळ नव्हती. आता मी माझ्या आईला स्वखुशीनं स्वतःच्या वयस्कर आईची सोबत करताना बघतो तेंव्हा मला माझ्या वडिलांबद्दल खूप वाईट वाटतं आणि आईचा रागही येतो. मी आईशी या विषयी बोलू का ? 

सवाल जवाबदार: श, तुझ्या भावना मी समजु शकतो. पण तुझ्या वडिलांपासुन आणि त्यांच्या कुटुंबियां पासुन लांब रहाण्याचा निर्णय तुझ्या आईचा होता. त्या बाबतीत तू आता काही करू शकत नाहीस. नवराबायको मध्ये आपसात बेबनाव असु शकतो. आई नाही तरी तु शेवटच्या काळात वडिलांचा सांभाळ केला असशील अशी मी आशा करतो. आईबद्दल राग वाटत असला तरी वडिलांच्या पश्चात आईच्या जोडीने तुही कुटुंब प्रमुख आहेस तेंव्हा तुझी जबाबदारी टाळू नकोस. आईला आधार दे.  

म चा प्रश्न: माझी वयस्कर आई गावी असते. तिला काही दिवसांसाठी माझ्या घरी रहायला आणावं अशी माझी फार ईच्छा आहे. समस्या हि आहे कि माझी नोकरी घरापासुन काही तासांच्या अंतरावर आहे. मी आठवडाभर नोकरीच्या गावी रहातो आणि शनिवार -रविवार घरी येतो. मी नोकरीच्या गावी असताना माझ्या आईला घरात ठेऊन घ्यायला माझ्या पत्नीने नकार दिला आहे. ती म्हणते की मी आईला माझ्याबरोबर नोकरीच्या जागी घेऊन जावं. परंतु मी कामावर गेल्यावर आई एकटी कशी राहील याची मला काळजी वाटते. यावर काही उपाय सुचवाल का?   

सवाल जवाबदार: म, शक्य असेल तर नोकरीच्या गावी कामाला बाई ठेव जी तु कामावर गेल्यावर तुझ्या आईच्या सोबत राहू शकेल. तुझ्या पत्नीला जर तुझी आई तुझ्या गैरहजेरीत घरात नको असेल तर तोच एक मार्ग आहे . 

हि प्रश्नोत्तरे वाचल्यावर लक्षात येतं कि घरगुती प्रश्न फक्त महिलांनाच असतात असं नाही तर पुरुषांनाही असु शकतात. सामंजस्यपूर्ण उत्तर मिळेल असा विश्वास वाटला तर ते मनमोकळेपणानी विचारलेही जातात. 





Saturday, October 17, 2020

You can fool some of the people all the time


                                            
                            You can fool all the people some of the time 
                                      and some of the people all the time, 
                           but you cannot fool all the people all the time.


वरील उदगार अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्रॅहम लिंकन यांचे आहेत...  (किंवा नाहीत)...  असं म्हणतात. पण उदगार कोणाचेही असले तरी त्यांचा अर्थ बदलत नाही : म्हणजे कि तुम्ही सरसकट सर्व  लोकांना कायम मूर्ख बनवू शकत नाही पण सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता आणि काही लोकांना कायम मूर्खावस्थेत ( मूर्ख + अवस्था) ठेवू शकता. 

सुशांत सिंगच्या जाण्याने जे वादळ उठलं ते पुढे कित्येक दिवस घोंघावत राहिलं. त्याच्या जाण्याबद्दल अनेक लोकांना जबाबदार धरण्यात आलं. त्यांच्यावर आरोप झाले. सुरवातीला दोन नावं ठळक पुढे आली. त्यातलं एक नाव करण जोहरचं होतं. सुशांत सिंगच्या जाण्याशी त्याचा संबंध असो किंवा नसो त्याची स्क्रुटिनी झाली हे सहाजिक आहे कारण तो सगळ्या माध्यमांमध्ये आहे. तो सिनेमात आहे. तो टीव्ही वर असतो. तो डिजिटल माध्यमां मध्येही दिसतो. 

जोहर सारखे बॉलिवूड मध्ये फॉर्म्युला फिल्म बनवणारे लोक हे dream merchants  - सपनोंके सौदागर आहेत. सर्वसामान्य लोकांना नाचगाण्यांनी भरलेल्या काल्पनिक आयुष्याची झगमगीत स्वप्न दाखवायची आणि आपण श्रीमंत व्हायचं हा त्यांचा व्यवसाय आहे. कदाचित हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सूत्र त्याच्या इशाऱ्यावर हलत असतील म्हणून त्याचं नाव पुढे आलं असेल. 

दुसऱ्या एका नावाची सुरवातीच्या दिवसात चर्चा झाली ते सलमान खानचं होतं. त्याचं कारण त्यानं आजवर केलेली कुकर्म हे असेल. मागे वन्य प्राण्यांची शिकार केली म्हणून त्याला कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. नंतर त्याच्या गाडीनी फुटपाथवर झोपलेल्या लोकांना उडवलं म्हणून त्याला कोर्टात जावं लागलं होतं. एवढं करूनही त्याची प्रतिमा कायम "हिरो"चीच राहीली आहे - त्याच्या स्वतःच्या नजरेत आणि त्याच्या चाहत्यांच्या नजरेतही. 

त्याचा नविन सिनेमा मुंबईत लागतो तेंव्हा शहरातल्या एकाही चित्रपटगृहात दुसरा कुठलाही सिनेमा काही दिवस दाखवला जात नाही. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात दर्शक त्याविरुद्ध ब्र ही काढत नाहीत. कोणी असं म्हणत नाही कि आम्हांला दुसरे सिनेमा बघण्याचं ऑप्शन मिळायला हवं. (ते हि समजण्यासारखं आहे: जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, मंदिर विरुद्ध मशिद, असे अनेक ज्वलंत मुद्दे पेटून उठण्यासाठी हाताशी असताना सिनेमाचे ऑप्शन न मिळणे हा मुद्दा फारच नगण्य ठरतो.) 

एक हिंदी वाक्प्रचार सलमान खानला फिट बसतो -  दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. किंवा वरील इंग्रजी वाक्य  - you can fool some of the people all the time. तुम्ही काही लोकांना कायम मुर्ख बनवु शकता - ज्याचं तंत्र बहुतेक त्याला आता चांगलं अवगत झालंय. बॉलीवूडच्या दुटप्पीपणाचं सलमान हे एक उदाहरण आहे. 

नव्वद कि दोन हजारच्या पहिल्या दशकात शायनी अहुजा नावाचा एक नट होता. काही सिनेमात त्यानं चांगलं काम केलं होतं. एक दिवस त्याच्या कामवालीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्याचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं. आज त्याचं नावही बॉलिवूडच्या आत किंवा बाहेर कोणाला आठवत नाही. पण गंभीर आरोप होऊनही सलमान खान आणि संजय दत्त सारख्या नटांच हिंदी सिनेसृष्टीतलं आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनातलं स्थान अढळ आहे. त्या स्थानाला कोणी धक्का लावू शकलेल नाही. हि काय जादू आहे? भरपूर पैसे खर्च करून डॅमेज कंट्रोल करणं- स्वतःविषयी चांगल्या बातम्या छापून आणणं त्यांना शक्य आहे म्हणून? 

काही वर्षांपूर्वी सुलतान नावाचा सिनेमा आला होता. तो बघताना असं वाटलं कि जसं वय वाढतंय तस सलमान खानच स्वतः वरचं प्रेमही वाढतंय. सुलतान मध्ये तो सुलतान नावाच्या पैलवानाच्या भूमिकेत दिसतो. पैलवान सुलतान जेंव्हा कुस्तीची लढत खेळण्यासाठी स्टेडियम मध्ये शिरतो  -  कमावलेल शरीर, अंगात शर्ट नाही, चेहऱ्यावर रुबाब  - तेंव्हा अख्ख स्टेडियम "सुलतान.. सुलतान" असा त्याच्या नावाचा जयघोष करत असतं. ते दृश्य बघताना थेटरातुन उठून जावंसं वाटत होत. असं वाटलं कि पडद्यावरच्या सुलतानच्या रूपात सलमान खान आपलं स्वप्न पूर्ण करून घेतोय - आपल्या कमावलेल्या दणकट शरीराच उघडं प्रदर्शन मांडत स्टेडियम मध्ये शिरण्याचं - अख्ख स्टेडियम "सलमान सलमान" असा त्याच्या नावाचा ऊदोऊदो करीत असताना. सलमान खान सारखे "हिरो" आणि कपिल शर्मा सारखे शो हि हिंदी सिनेसृष्टीनी जन्माला घातलेली आणि पोसलेली बाळं आहेत. त्यांची लोकप्रियता हा खरतर काळजीचा विषय व्हायला हवा. 

सलमाननं त्याच्या चॅरिटीला - being human असं नाव दिलंय. हे नाव देऊन त्यानं जणू जगजाहीर करून टाकलाय कि  I am just being human . माणसाच्या हातुन चुका होत असतात. "ह्युमन" असल्यामुळे चुका करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावत रहाणार. कित्येक लोक त्याच्या चॅरिटीचे कपडे विकत घेऊन ते नाव आपल्या छातीवर, पाठीवर मिरवतात. 

सुरवातीला या दोन नावांची चर्चा झाली. मग चर्चेनं आपली दिशा बदलली आणि ती वेगळ्याच मार्गानी जाऊ लागली. पण ज्या मार्गाने जावी असं वाटत होतं त्या मार्गानी गेली नाही. त्या सुमारास चित्रपट सृष्टीशी संबंधित सुशांत सिंग खेरीज आणखी दोन जण गेले. त्यामागे त्यांना आलेलं नैराश्य कारणीभूत होतं असं म्हंटलं गेलं. पण नैराश्याविषयी किंवा त्या वरील उपचारां विषयी फारशी चर्चा झाली नाही.  

एकदा एका मॉम्ज नाईट आउटला  - एका वर्गातल्या मुलांच्या आया एकत्र जेवायला बाहेर जातात तसं - एक आई आपल्या धूम्रपान सोडण्याच्या प्रयत्नांविषयी सांगत होती. धूम्रपान सोडणं सोप्प जावं म्हणून ती डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार औषध घेत होती. त्या औषधाचं नाव ऐकल्यावर दुसरी एक आई कळकळीनं तिला काय म्हणाली कि, " ते औषध घेऊ नकोस. ताबडतोब थांबव. माझ्या नवऱ्याला त्या औषधा विषयी बरीच माहिती आहे. त्या औषधानी आत्महत्येचे विचार मनात येतात. युरोप मध्ये तशा केसेस घडल्यावर तिथे त्या औषधावर बंदी घालण्यात आली आहे." 

आधुनिक औषधांच्या अघोरी साईड इफेक्ट्स बद्दल त्या औषधांच्या जाहिरातीं मध्येही सांगितलं जातं. मागे एक पापण्यांचे केस दाट करणाऱ्या औषधाची जाहीरात लागायची. त्यात इशाऱ्या दाखल असं म्हंटल जायचं की हे औषध घेतल्याने अंधत्व येण्याची शक्यता आहे. कॅन्सर, किडनी खराब होणे, डिप्रेशन आणि इतरही अनेक गंभीर साईड इफेक्ट्स कित्येक औषधांच्या जाहिरातीं मध्ये स्पष्ट नमूद केलेले असतात. एकदा औषधांचे दोन - तीन ऑप्शन्स सांगताना डॉकटर एका औषधा विषयी मला म्हणाली होती, " या औषधाच्या उंदरांवरील प्रयोगामध्ये उंदरांना घशाचा कर्करोग झाल्याचं आढळलं आहे."

सत्तरच्या दशकात असा समज होता कि जो गहू अमेरिकन लोक खात नाहीत तो भारतात पाठवला जातो. जी औषधं कडक स्थानिक नियमांमुळे युरोप - अमेरिकेत विकता येत नाहीत ती भारतासारख्या - कुछ भी चलता है टाईप देशात विकली जात आहेत कि काय यावर चर्चा व्हायला हवी होती पण तशी झाली नाही. नैराश्य हा इतका दुर्धर असाध्य आजार कसा काय झाला कि तज्ञांचे उपचार चालू असतानाही रुग्ण त्यातुन बरे होत नाहीत यावरही चर्चा झाली नाही. चर्चेला वेगळंच वळण लागलं. 

त्यात महिलांच्या एकदोन आभूषणांनी आपले हात धुऊन घेतले. पाटली घरंगळत कुठंतरी चाललीय. पैंजण जोरजोरात छुनछुन करतायत. शहरात फार अराजकता माजली आहे असं वाटतय. तरी मी मागेच म्हंटल होतं कि बॉलिवूडला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर हलवायची वेळ आली आहे. बाकी काही नाही तरी निव्वळ शहरातली गर्दी कमी करण्यासाठी. गर्दी कशी कमी करायची ह्याचा विचार इतर राज्यातुन मुंबईत आलेले लोक करू शकणार नाही. तो विचार मराठी माणसांनाच करावा लागेल.

बॉलिवूडला मुंबई बाहेर हलवण्याचं दुसरं कारण म्हणजे तिथली मंडळी फारशी शांतताप्रिय आहेत असं वाटत नाही. सत्तरच्या दशकात तेथील चित्रपट निर्मित माध्ये स्मगलर्सचा पैसा गुंतलेला असायचा असं म्हंटल जातं . ऐंशीच्या दशकात त्यांची जागा गॅंगस्टर्सनी घेतली. नव्वदच्या दशकाच्या शेवटी - नविन सहस्रकाच्या सुरवातीला असं म्हंटलं गेलं कि बॉलिवुड आता सुधारतय. तिथे कॉर्पोरेट कल्चर येऊ लागलंय. तिथली शिस्तबद्धता वाढली आहे. पण कॉर्पोरेट कल्चरची शिस्तबद्धता बॉलिवूडकरांना फारशी झेपलेली दिसत नाही. बाहेरचे गुंड कमी झाले म्हणून कि काय त्यांनी आता आपलीच इन -हाऊस गुंडगिरी सुरु केलेली दिसते. त्याला साजेसं फिल्मी नाव दिलं गेलंय - बॉलिवूड माफिया. हिंदी भाषिक प्रदेशातून बेशिस्त आणि गुंडगिरी वृत्ती शहरात आणि राज्यात पसरत आहे का यावर विचारही मराठी माणसांनाच करावा लागेल. दुसरं कोण करणार?

तिसरं कारण म्हणजे बऱ्याच मराठी लोकांना हिंदी सिनेसृष्टीचं, तिथल्या नटनट्यांचं फारसं कौतुक नसतं. ते मराठी सिरीयल, मराठी गाण्यांचे कार्यक्रम, मराठी बातम्या यातच जास्त रमतात. मग हिंदी सिनेसृष्टी मुंबईत असण्याचं प्रयोजन काय?  - याला अपवाद बहुतेक श्रीदेवीचा असेल. ज्याअर्थी महाराष्ट्र सरकारने तिला स्टेट फ्युनरल देऊ केली त्याअर्थी ती राज्यात प्रचंड लोकप्रिय असावी (?).  

जया बच्चननी संसदेत सादर केलेली आकडेवारी अधिकृत आहे कि नाही माहीत नाही पण ती अचूक आहे असं धरून चाललं तर पाच लाख डायरेक्ट नोकऱ्या आणि पन्नास लाख इन्डायरेकट नोकऱ्या बॉलिवूड मुळे लोकांना मिळतात. आणि त्याच्याशी निगडित जे उत्पन्न शहराला कि राज्याला मिळत असेल ते. एवढ्या नोकऱ्या राज्याबाहेर गेल्या तर इथल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल कि काय याची काळजी वाटण स्वाभाविक आहे. सुरवातीला बॉलिवूडपासुन मिळणाऱ्या उत्पन्नाशिवाय राज्याच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करण अशक्यप्राय वाटण्याचीही शक्यता आहे. 

परंतु कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधी तीची कल्पना करणं आवश्यक असतं. राईट बंधूं कल्पना करु शकले म्हणून विमानं प्रत्यक्षात उतरू लागली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली तेंव्हा कुठे ते स्थापन झालं. महाराजांचं नाव  घेत आपण जर परदेशातुन बुलेट ट्रेन राज्यात आणण्याची स्वप्न बघत राहिलो तर ती येईलही पण त्यामुळे मुंबईतली गर्दी कमी होईल का?  

उत्तर प्रदेश जर हिंदी सिनेसृष्टीला आपल्याकडे नेऊ इच्छित असेल तर त्यात एवढं घाबरण्यसारखं काय आहे? ते हि देशातील एक राज्य आहे. त्याची प्रगती हि देशाची प्रगती आहे. मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी आणि बॉलिवूडला उत्तर प्रदेशात हलवण्यासाठी या दोन राज्यांनी आपसात सहकार्य केलं तर त्यात सर्वसामान्य लोकांचं एवढं काय बिघडेल? हिंदी सिनेमा सृष्टीतुन मिळणाऱ्या उत्पन्ना शिवाय आपण राज्य आणि शहर चालवू  शकतो -  किमान एवढा आत्मविश्वास तरी शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवून घेणाऱ्यांच्यात असायला हवा. शिवाय आजच्या झुमच्या जमान्यात, आणि हवाई प्रवास दररोजचा झालेला असताना किती लोकांना हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी प्रत्यक्ष उत्तर प्रदेशात जाऊन रहावं लागेल हा हि एक मुद्दा आहे. 

ज्या सिनेसृष्टीनी पन्नास पेक्षा जास्त वर्ष स्थानिक भाषा, स्थानिक संस्कृती, स्थानिक लोक यांचा मान ठेवला नाही; या शहरात स्वतःच एक स्वतंत्र जग निर्माण केलं ज्यात प्रवेश करण्याचा व्हिसा आपल्याला कधी मिळु शकणार नाही अशी मराठी कलाकारांची भावना झाली; मराठी माणसांची घाटी, पांडू हवालदार अशी अवहेलना केली गेली ज्यामुळे आपल्याला आपल्या भाषेविषयी आणि स्वतः विषयी इतका न्यूनगंड निर्माण झाला कि मुंबईत लोक मराठी बोलेनासे झाले; हिंदी सिनेसृष्टीतील एखादी व्यक्ती दोन मोडके तोडके मराठी शब्द बोलली तर त्यात आपण धन्यता मानू लागलो; मराठी लोकांना हिंदी नीट बोलता येत नाही म्हणून हिंदी सिनेमात प्रवेश मिळेना पण हिंदी सिनेमात चुकून कधी एखाद दुसरी मराठी व्यक्तिरेखा असली तरी ती ही अस्खलित मराठी बोलत नाही याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं  -  अशा सिनेसृष्टीला कवटाळून बसण्याचा अट्टाहास का? 

हे बदलायचं असेल तर बॉलिवूड -विरहित मुंबईची (मुंबई sans बॉलिवूड) कल्पना करण्याचं धैर्य आधी दाखवावं लागेल तर कदाचित कधीतरी ते प्रत्यक्षात उतरु शकेल. नाहीतर राजकीय नेते सत्तेसाठी लोकांना मुर्ख बनवत रहातील आणि मुंबईला आता कोणी वाली उरलेला नाही असं म्हणत मुंबईकर हळहळत बसतील. 










Saturday, September 5, 2020

क्लास वॉर्स


सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर पारितोषिक गेल्या वर्षी पॅरासाईट या कोरिअन सिनेमाला मिळालं. परदेशी भाषेतील चित्रपट असुनही इंग्रजी सिनेमांच्या श्रेणीत बक्षिस मिळवणारा ऑस्करच्या इतिहासातील तो पहिला चित्रपट ठरला. 

पॅरासाईट या शब्दाच अर्थ परोपजीवी (पर+ उपजिवी). दुसऱ्यांच्या जीवावर उपजीविका करणारे /जगणारे प्राणी आणि वनस्पती. इंग्रजी शब्दकोशात या शब्दाचा आणखीही एक अर्थ आढळतो तो म्हणजे श्रीमंतांची स्तुती करून त्यांच्या पाहुणचाराचा गैरफायदा घेणारे लोक. चित्रपटात एक गरीब कुटुंब एका श्रीमंत कुटुंबाच्या जीवावर कसं जगु पहातं आणि पुढे त्याच पर्यवसन कशात होतं ते दाखवलं आहे. 

सुरवातीला दोन्ही कुटुंब आपापल्या जगात जगत असतात. श्रीमंत पार्क कुटुंब त्यांच्या मोठया घरात - जे शहराच्या वरच्या भागात असतं. तिथे पोहोचण्यासाठी थोडी चढण चढावी लागते. ते घर एका प्रसिद्ध वास्तुशात्रज्ञांनी डिझाईन केलेलं असतं आणि आधुनिक मोजक्या पद्धतीनं सजवलेल असतं. 

गरीब किम कुटुंबाची खोली त्याच शहराच्या दुसऱ्या भागात रस्त्याच्या खालच्या पातळीवर असते. त्यात गच्चं भरलेल्या सामानाचा पसारा असतो. छोटाश्या खिडकीतून त्यांना रस्त्याचा थोडा भाग दिसतो. दोन्ही परिवारात चार सदस्य असतात - आई, वडील, एक मुलगा आणि एक मुलगी. पार्क आईवडील तरुण असतात. त्यांची मुलं लहान असतात. किम आईवडील मध्यमवयीन असतात. त्यांची मुलं कॉलेज मध्ये शिकणारी, नोकरीच्या शोधात असलेली असतात. 

दिवसभर खोलीत बसुन पिझ्झा डिलिव्हरीची खोकी जुळवण्याचं काम करायचं आणि ते करताना टीव्हीवर डेली सोप्स बघायचे हा किम कुटुंबाचा दिनक्रम असतो. रस्त्याखालच्या खोलीत एक प्रकारचा कुबट वास असतो जो त्या घरात रहाणाऱ्या लोकांच्या अंगाला चिकटतो. त्यांना तो जाणवत नाही पण पुढे जेंव्हा त्यांचा पार्क परिवाराशी संबंध येतो तेंव्हा श्रीमंत नाकांना तो वास लगेच झोंबतो. सिनेमात त्याला तळघराचा, जुन्या झालेल्या मुळ्या सारखा वास म्हंटलंय. 

गरीब म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं रहातं तशी ही गरिबी नाही. हे दक्षिण कोरिआतील - एका विकसित देशातील गरीब आहेत. भारतासारखी रोजी एक डॉलर पेक्षाही कमी उत्पन्नावर भागवावं लागणारी ही गरिबी नाही. ती सापेक्ष - रिलेटिव्ह आहे. हे जरी खरं असलं तरी त्यांच्याकडे the haves आणि the have nots  - ज्यांच्याकडे आहे ते लोक आणि ज्यांच्याकडे नाही ते लोक यामधली दरी अस्तित्वात नाही असं नाही. ती तफावत जगात खूप ठिकाणी आहे. त्यातून झालेला संघर्ष सिनेमात दाखवला आहे. नोकरी न मिळाल्यामुळे निराश झालेल्या बेरोजगार तरुणांनी भारी किंमतीच्या गाड्यांच्या शोरुमची नासधूस करावी तशा प्रकारचं हे रस्त्यातलं क्लास वॉर नाही. हे जास्त पर्सनल आहे. 

एकदा अनपेक्षितपणे किम कुटुंबातील मुलाला श्रीमंत घरात नोकरीची संधी मिळते. त्याचा मित्र शिक्षणासाठी अमेरिकेला चाललेला असतो. तो आपली शिकवणीची नोकरी त्याला देऊ करतो. पार्क कुटुंबातील मुलीला इंग्रजी शिकवण्यासाठी कुमार किम त्यांच्या घरात प्रवेश करतो. थोड्याच दिवसात कट कारस्थान करून अख्ख किम कुटुंब पार्क घरात शिरत. मराठीत एक म्हण आहे  - भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी. तसच घडतं. 

म्हणी आता फारशा वापरल्या जात नसल्या तरी मला आवडतात. थोड्या शब्दात त्या बरच काही सांगुन जातात. न्यूयॉर्कमध्ये मला दुसरी एक म्हण किंवा खरतर वाक्प्रचार वारंवार आठवतो. बस किंवा ट्रेन मध्ये एखादी व्यक्ती जोरजोरात फोनवर बोलत असते. बहुतांश लोक तिकडे दुर्लक्ष करतात. कानात ईअर प्लग्ज घालुन आपल्या फोनमध्ये डोकं खुपसून बसतात. पण तिच्या मागच्या/पुढच्या सीटवर बसलेल्या ज्येष्ठ महिलेला नेमकं त्याचवेळी पेपर वाचन करायचं असतं. ती एकदोनदा फोनवर बोलणारीकडे रागात बघते. फोनवालीच लक्ष नसतं. शेवटी ज्येष्ठ वाचिका वैतागून मोठ्याने तिला म्हणते, "आता बस् कर की. आम्हांला कशाला तुझ्या घरातलं -बाहेरच सगळं ऐकवतेस." फोनवाली ते ऐकून तिकडे दुर्लक्ष करते. मुद्दामहुन संभाषण लांबवते. 

तू कोण मला सांगणार? मी मला जे हवं ते करणार मग दुसऱ्यांना माझ्या वागण्याचा कितीही त्रास झाला तरी मला त्याची पर्वा नाही - अशी वृत्ती फार बोकाळलेली दिसते. तेंव्हा मला -  शहाण्याला शब्दाचा मार किंवा त्याचं हिंदी भाषांतर समझनेवाले को ईशारा काफी है - आठवतं. आजकाल हा वाक्प्रचार आठवण्या सारखे प्रसंग वाढत चाललेत .  

श्रीमंत घरात घुसण्यासाठी किम कुटुंब बिनधास्तपणे कारस्थानं करत. खोटंनाट बोलून कुमारी किम पार्क घरातील लहान मुलाला चित्रकला शिकवण्याची नोकरी पटकवते. एकदा पार्क कुटुंबाचा तरुण ड्रायव्हर शिकवणी संपल्यावर तिला घरी सोडायला जातो. वाटेत कामापुरतं संभाषण करून तो तिला ती सांगते त्या ठिकाणी सोडतो. गाडीतुन उतरायच्या आधी मागच्या सीटवर बसलेली कु. किम हळुच आपली पॅंटी काढुन सीटच्या खाली टाकते. नंतर बॉस गाडीत बसतो तेंव्हा त्याला ती दिसते. त्याला ड्रायव्हरचा संशय येतो. गाडीत असले उद्योग करणारा ड्रायव्हर नको म्हणून त्याला सुट्टीवर पाठवण्यात येतं. त्याच्या जागी वडील किम ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागतात. 

पार्क परिवाराच्या हाऊसकीपरला विशिष्ट फळांची ऍलर्जी असते. ते समजताच किम मंडळी त्या प्रकारची पुष्कळ फळं आणून स्वयंपाकघरात ठेवतात. हाऊसकीपर सारखी खोकु लागते. टिश्यू पेपरवर लाल रंगाचे डाग पाडून किम वडील ते कागद कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. मालकिणीला ते कागद दाखवून हाऊसकीपर सारखी खोकतेय आणि त्यातून रक्त पडतंय म्हणजे तिला टी बी झाला असावा असा संशय तिच्या मनात पेरतात. हाऊसकीपरची नोकरी जाते. तिच्या जागी आई किम हाऊसकीपर म्हणून येते. 

पार्क घरातील सगळ्या कामांचा भार  - गाडी चालवणे, घरकाम, मुलांचं संगोपन - किम कुटुंबाकडे सुपूर्द होतो. अशा रितीने पार्क कुटुंबही एक प्रकारे किम परिवाराच्या जीवावर जगू लागतं. आपला नविन ड्रायव्हर, नविन हाऊसकीपर, मुलांचे नविन टीचर्स यांचं आपसात काही नातं आहे याचा त्यांना पत्ता नसतो. नोकरी देण्याआधी त्या लोकांची पार्श्वभूमी तपासून बघण्याच्या फंदात पार्क पती - पत्नी पडत नाहीत. 

शेवटी पार्क आणि किम - श्रीमंत आणि गरीब दोन्ही कुटुंबांच्या लक्षात आलं कि आपल्याला एकमेकांमुळे खूप फायदा होतोय. मग ते एकमेकांना मदत करत कायम गुण्यागोविंदाने राहिले - असा सिनेमाचा सुखांत होत नाही. ... and they lived happily ever after असा शेवट व्हायला ही काही परिकथा -fairytale नाही. हे तर त्रिकालाबघीत सत्य आहे कीं सीमारेखांचं उल्लंघन झालं की युद्ध अटळ असतं. सिनेमात शेवटी द्वंद्व होतं. फक्त गरीब विरुद्ध श्रीमंत नाही तर गरीब विरुद्ध गरीब असंही.  

आपल्या लहान मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्क कुटुंब नदीकाठी सहलीला जातं. ती संधी साधून जुनी हाऊसकीपर घरी येते. तेंव्हा किम चौकडी अनायसे रिकाम्या मिळालेल्या श्रीमंत घरात पार्टी करत असते. त्यांनी दार उघडताच जुनी हाऊसकीपर लगबगीनं घरात शिरून एका कपाटाच्या मागे दडलेला गुप्त दरवाजा उघडते आणि धावतपळत खालच्या तळघरात उतरते. तिथे तिचा नवरा रहात असतो. त्याची नोकरी गेल्या पासून तो पार्क कुटुंबाच्या नकळत त्यांच्या तळघरात येऊन राहिलेला असतो. नोकरी गेल्यामुळे हाऊसकीपरला अचानक घर सोडावं लागतं पण तेंव्हा ती नवऱ्याला तळघरातुन बाहेर काढु शकत नाही.

गरीब विरुद्ध गरीब द्वंद्व होतं ते दोन हाऊसकीपरच्या कुटुंबांमध्ये - तळघराचा ताबा मिळवण्यासाठी. ते पडद्यावर इतकं ब्रूटल, इतकं क्रूर दाखवलंय, इतकं ताणलेलं आहे कि हे संपणार तरी कधी असं वाटतं. दोन्ही कुटुंब तळघरात एकमेकांना मारतात, झोडपतात, खेचतात, ढकलतात, ओरबाडतात, पाडतात, तुडवतात, रक्तबंबाळ करतात, बेशुद्ध पाडतात  - आपल्या शरीराचा प्रत्यके अवयव दुसऱ्यावर मात करण्यासाठी वापरतात. 

त्याच्या तुलनेत गरीब विरुद्ध श्रीमंत द्वंद्व सुंदर सेटिंग मध्ये होतं आणि थोडक्यात आटपत. या द्वंद्वात सगळी पात्र लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तयार होऊन आलेली असतात. घराबाहेरचं लॉन पार्टीसाठी सजवलेलं असतं. टेबलं मांडलेली असतात. मुलाची हौस म्हणून पार्टीत खोटी लढाई खेळण्यात येते - खऱ्या तलवारी वापरून. या द्वंद्वात गरीब आणि श्रीमंत शरीरं एकमेकांना स्पर्श करत नाहीत. शस्त्रांचा वापर होतो. 

द्वंद्वात कोणाचाच विजय होत नाही. गरीब घरातील मुलीचा आणि श्रीमंत परिवारातील वडीलांचा त्यात अंत होतो. तळघरातल्या मारामारीत जुन्या हाऊसकीपरचा आणि तिच्या नवऱ्याचा जीव जातो. एका वेगळ्या अर्थाने तळघर गरीब वडिलांच्या ताब्यात येतं. पार्क आई मुलांना घेऊन दुसरीकडे रहायला जाते. घर विकायला काढलं जातं. तरीही घराचं तळधर किम वडिलांच्या ताब्यात रहातं. त्यांच्या रूपात किम परिवाराचा जीव त्या घरात अडकून पडतो. कुमार किम ते घर विकत घेऊन तळघरातून वडिलांना बाहेर काढायची स्वप्न बघतो.  

एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरते जेंव्हा ती भौगोलिक सीमारेषांच्या पलीकडे जाते. या चित्रपटाची कथा जगातील कुठल्याही शहरात घडू शकते. कुठलीही भाषा बोलणाऱ्या लोकांना ती लागू होऊ शकते. या चित्रपटाला केवळ परदेशी सिनेमा नाही तर जनरल सिनेमाच्या कॅटेगरीत पहिलं बक्षीस देताना ऑस्कर्सच्या निवड समितीनं कदाचित तोच विचार केला असेल.