Saturday, November 12, 2022

बालदिन

 

हालोवीन 






दरवर्षी ३१ ऑकटोबरला हालोवीन साजरा होतो. तो का साजरा केला जातो आणि त्या दिवशी जी सजावट करतात त्यामागे काय अर्थ असतो हे मला अजूनही नीटसं समजलेलं नाही. चित्रविचित्र पोशाख करून तरुण हालोवीन पार्ट्या साजऱ्या करतात आणि लहान मुलं दारोदारी कँडी मागत फिरतात. मग बास्केटभर कँडी घरी येऊन पडते. तिचं काय करायचं? ती संपवायची कशी? खाल्ली तर आरोग्याला घातक नाही खाल्ली तर एवढी चांगली चॉकलेट्स फेकुन कशी द्यायची या मनाच्या नको त्या दोलायमान अवस्थेत पुढील काही आठवडे त्या बास्केटकडे बघत घालवावे लागतात. एवढंच हालोवीनच स्वरूप मला आजवर न्यूयॉर्क मध्ये दिसलं आहे. 



 


भारतात पूर्वी खरेखुरे भिकारी होते जे घरोघरी जाऊन भीक मागत असंत. तेंव्हा बैठी घरं जास्त आणि बंद दारांची फ्लॅट पद्धत कमी होती. आमच्या कडे जो भिकारी यायचा - कधी तो यायचा तर कधी त्याची बायको आणि लहान मुलं यायची- तो रात्री साधारण नऊसाडेनऊच्या सुमारास लोकांची जेवणं झाली कि त्याची फेरी सुरु करायचा. घरातलं उरलेलं अन्न त्यांना दिलं जायचं. आमच्याकडे ते काम माझं असायचं. त्यातलं पातळ आमटी, भाजी, भात वगैरे तो त्याच्या जवळच्या भांड्यात घेत असे. चपाती सारखे सुक्के पदार्थ खांद्याला लटकणाऱ्या कापडाच्या झोळीत टाकायला सांगायचा. वेगवेगळ्या घरातली भाजी, आमटी आणि कढी तो एकाच पातेल्यात कसा काय घेतो याचं लहानपणी मला फार आश्चर्य वाटायचं.  



                                                


ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे झोळी नाही तरी बास्केट घेऊन माझ्या मुलानी दारोदारी कँडी मागत फिरावं हे मला फारसं कधी पटलं नाही. मित्रांच्या संगतीनं त्यानं जे काही ट्रिक ऑर ट्रीटींग केलं असेल तेवढंच. 

भारतातही आता हालोवीन साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे असं दिसतं. तो साजरा करण्यामागचं कारण जाणुन घेऊन हे होत असेल तर बरं नाहीतर केवळ त्याचं बाजरी रूप साजरं होतं- त्याच्याशी निगडीत व्यवसायिकांच्या फायद्यासाठी - चित्रविचित्र पोशाख आणि कँडी विकणारे आणि अति कँडी खाऊन दात खराब झाले कि दंतवैद्य. 






आयुष्यात ज्या गोष्टींची भीती वाटू शकते त्याची खेळीमेळीत लहान मुलांना ओळख करून द्यावी हा उद्देश तर हालोवीन साजरा करण्यामागे नसेल? जसं महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय भयनाट्याचा  -horror show- तेथील सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम झालाय याचं प्रतिबिंब न्यूयॉर्क मधील हालोवीन सजावटीत मला यंदा दिसलं: 



राज्यात जे काही चाललंय त्यावर या दोघांचा अजूनही विश्वास बसलेला नाही.



काही लोक खूप हतबल झाले आहेत.  



हे दोघे एसटीची वाट बघत बाकावर बसले होते. तेवढ्यात
भयनाट्य सुरु झालं. तेंव्हा भीतीने ते इतके गलितगात्र झाले
कि बसमध्ये चढण्याचं त्राण त्यांच्या अंगात उरलं नाही.  



भयनाट्य सुरू झाल्यापासुन चालू झालेला
या महीलेचा आक्रोश अजून थांबलेला नाही 



काही लोक इतके प्रचंड गोंधळात पडले आहेत कि कुंपणाच्या
 या बाजूला उतरावं कि पलिकडे उडी घ्यावी कि कुंपणावरच
बसुन रहावं हे त्यांना समजेनासं झालं आहे.  



ह्याने स्वतःला चक्क दिव्याला टांगून घेतलं आहे. 
"मी सत्याग्रह करतोय, भयनाट्य संपे पर्यंत असाच
लोंबकळत राहीन " असं तो म्हणतो.  



सत्याग्रहाचा आणखी एक प्रकार: भयनाट्य संपल्याशिवाय 
स्वतःला श्रुंखलामुक्त करणार नाही असं याचं म्हणणं आहे. 



या दोघी काय म्हणतायत ते त्यांचं त्यांनाच माहीत. 



बालदिन 


१४ नोव्हेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदीवस असतो. तो बालदिन म्हणूनही ओळखला जातो. आता माहित नाही पण पूर्वी बालदिन साजरा करण्याची पध्द्त खूप साधी सोज्वळ होती: लहान मुलांच कौतुक होत असे आणि गुलाबाच्या फुलांना महत्व असायचं. दोन्ही पंडीत नेहरूंना आवडायचं असं म्हणतात. चाचा नेहरू या टोपणनावाने ते ओळखले जात. त्यांच्या कुडत्याच्या खिशात गुलाबाचं फुल खोवलेलं असायचं. थडगी, भुतंखेतं, कवट्या, हाडांचे सापळे त्या दिवसाच्या साजरी करणा मध्ये लहान मुलांच्या जवळपास दिसंत नसंत.  






नेहरुंच्या पूर्वजां विषयी निरनिराळी नविन माहिती देणारे संदेश समाज माध्यमां मध्ये बघण्याची आता आपल्याला सवय झाली आहे. काही लोक त्या माहीतीवर विश्वास ठेवतात तर काही ठेवत नाहीत आणि काहींना वाटतं कि ती माहीती खरी असली काय किंवा नसली काय त्यानं आता काही फरक पडत नाही. पण एका बाबतीत खरतर सर्वांमध्ये सहमती व्हायला हरकत नसावी कि त्या संदेशांमध्ये मध्ये भाषेच्या खूप चुका असतात. लेखनाच्या चुका असतात. व्याकरणाच्या चुका असतात. लेखकाचं नाव नसतं. ती माहीत कुठल्या पुस्तकातुन किंवा लेखातुन घेण्यात आली आहे याचा काही संदर्भ नसतो. लिहिणाऱ्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे, तो संदेश लोकांना पाठवण्या आधी त्यांनी स्वतः एकदा वाचून तरी बघितला होता का कि दुसऱ्या भाषेत लिहिलॆल्या मूळ संदेशाचं ते संगणकांनी केलेलं धेडगुजरी मराठी भाषांतर आहे असा प्रश्न पडतो. तरीही शिकले सवरलेले लोक ते संदेश दुसऱ्यांना पाठवायला कचरत नाहीत. 






लहान मुलांची आवड असणाऱ्या चाचा नेहरुंनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर देशाला जी दिशा दिली त्याचा देशातील निम्न आर्थिक स्तरातील लहान मुलांना किती फायदा झाला याची पुरेशी उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. नेहरू स्वतः ऍरिस्टोक्रॅटीक श्रीमंत घरात जन्मलेले होते. इंग्लंडच्या महाविद्यालयात शिकले होते. ते भारताला इंग्लड - अमेरिकेच्या मार्गाने नेऊ शकले असते. त्यांनी तसं केलं नाही. 

बहुतेक भारतीय ज्या दोन देशांना आदर्श मानतात, त्यांचा कित्ता गिरवु पहातात त्या इंग्लड आणि अमेरिकेत एखादी व्यक्ती जर त्या देशातील अतिशय महाग विद्यापिठात शिकलेली नसेल तर त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघू शकत नाही. तो विचारही मनात आणू शकत नाही. इंग्लडचे नविन पंतप्रधानही त्याचंच उदाहरण आहेत. ज्या प्रतिष्ठित विद्यापीठातुन मिळवलेल्या पदव्या त्यांच्या नावामागे आहेत त्या जर नसत्या तर ते पंतप्रधान पदाच्या जवळपास पोहचू शकले नसते. 


                                                             
                                                               


भारतात मात्र सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतुन आलेली, शाळाकॉलेजात न शिकलेली व्यक्ती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनु शकते. हा काही गेल्या दहापंधरा वर्षातील शासकीय धोरणांचा परिणाम नाही. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जे वातावरण देशात निर्माण झालं, लोकशाहीची पाळंमुळं रुजवण्यात आली त्याचा हा परिपाक आहे. 

अजून खूप काही प्रगती करायची बाकी असेल पण जी झाली आहे ती कमी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा देशात किती गरिबी होती हे त्या काळातील कृष्णधवल फोटो बघितले की लक्षात येतं. ते फोटो बघवत नाहीत.  

भारतातून उच्च शिक्षण घेऊन गेलेले लोक परदेशात जाऊन स्थायिक होतात असा आरोप पूर्वी केला जात असे. आता तो मुद्दाच उरलेला नाही. जगभर कोणीही कामानिमित्त कोठेही जाऊन राहु लागलं आहे.  

जगातील अनेक मोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुख पदी आज भारतातून शिकून गेलेली, इथल्या मध्यम वर्गातील घरात वाढलेली मुलं आहेत. भारतीय लोकांना त्यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांच्या नावांची लांबलचक यादी समाज माध्यमांमध्ये फिरते. माध्यमांमध्ये त्यांचा उदोउदो होतो. हे ही काही गेल्या दहापंधरा वर्षात घडलेलं नाही. कमीत कमी दोन पिढयांना  - आज उच्च अधिकार पदावर बसलेल्या या व्यक्ती आणि त्यांचे आईवडील - यांना शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या, उज्वल भविष्याची स्वप्न बघता आली त्याचं हे फळ आहे.  






परवाच्या बालदिनी सध्याचे माननीय मुख्यमंत्री राज्यातील लहान मुलांना योग्य मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी आपल्या दिवंगत नेत्यांकडून खूप काही घेतलं आहे. आनंद दिघेंच्या आयुष्यावरील चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले. दिघे आता हयात नाहीत. जर असते तर त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं असतं का? किंवा बंड करायला परवानगी दिली असती का? हे आपल्याला कधी समजणार नाही. नंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचं उपनाव म्हणून बाळासाहेबांचं नाव निवडलं. बाळासाहेबही आज हयात नाही. हयात असते तर अशा प्रकारे आपलं नाव वापरायला त्यांनी परवानगी दिली असती का या प्रश्नाचं उत्तर उघड आहे.  
                                                        
मी तुमच्या कडून काय वाट्टेल ते घेणार, तुम्ही कोण मला अडवणार? हि वागणूक दिवसेंदिवस समाजात वाढताना दिसते. त्यातून लहान मुलांना खूप चुकीची उदाहरणं समोर दिसतात. देशातील आणि समाजातील चांगले नागरिक म्हणून कशा प्रकारे वागावं याचं मार्गदर्शन मोठ्यांकडून लहान मुलांना मिळालं नाही तर कुठून मिळणार?



All photos are from Halloween'22 in New York









Monday, September 26, 2022

गोष्ट एका लग्नाची


हि एका लग्नाची काल्पनिक गोष्ट आहे. याचा वास्तवाशी काही संबंध नाही. या गोष्टीतील व्यक्तिरेखांचं राजकारणातील काही पात्रांशी साधर्म्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. 

काही वर्षांपूर्वी दोन प्रेमी जीवांनी दादरच्या वनिता समाज मध्ये लग्नगांठ बांधली. त्या लग्नाचा मुहूर्त निवडण्यापासून ते कार्यालय बुक करण्या पर्यंत सगळं माझ्या आईनी केलं. तिचा त्या लग्नाशी काय संबंध होता मला माहित नाही. 

पूर्वी दादर मध्ये दोन मोठी मराठी महिला मंडळं होती (अजूनही असतील कदाचित). : दादर (पूर्व) मध्ये हिंदू कॉलनीत भगिनी समाज होता...जिथे माझी मावशी जायची आणि दादर (पश्चिम) मध्ये शिवाजी पार्क समोर समुद्राच्या बाजूला वनिता समाज होता -जिथे कधी काही चांगले कार्यक्रम असले तर माझी आई आमच्या शेजारच्या इमारतीत रहाणाऱ्या जोशी काकूं बरोबर ते बघायला जायची. 

आईला वनिता समाज मधील लग्नाच्या हॉलचं फार कौतुक होतं. त्या काळात दादर मध्ये रहाणाऱ्या मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय मराठी घरातील मुलांची लग्न वनिता समाज मध्ये होत असंत. महिनों महिने आधी ते कार्यालय बुक करावं लागायचं. वनिता समाज मध्ये मुलांचं लग्न होणं हे दादर मधल्या पालकांना त्यांच्या प्रतिष्ठेचं चिन्ह वाटायचं. निदान माझ्या आईला तरी वाटायचं. 

त्यामुळे अपूर्व आणि पद्मा यांच्या विवाह समारंभासाठी तिने अर्थातच वनिता समाजातील मंगल कार्यालयाची निवड केली. 

शिवाजी पार्कच्या जवळ रहात असुनही आणि नियमित वनिता समाजात कार्यक्रमांना जात असुनही, पार्क मध्ये दसऱ्याला काय होतं हे तिच्या लक्षात आलं नाही. जर आलं असतं तर एखाद्या सुज्ञ व्यक्तीने दसऱ्याचा मुहुर्त वनिता समाजमधील लग्नासाठी निवडला नसता. तो हॉल रिकामा मिळतोय यांनेच आई हुरळुन गेली असावी. 

दसरा हा साडेतीन मुहूर्तां पैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. त्या दिवशी ते कार्यालय रिकामं मिळालं याचं कारण मेळाव्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन इतर कोणी त्या दिवसासाठी ते बुक केलं नसावं. आईच्या ते लक्षात आलं नाही. 

तरीही अपूर्व आणि पद्मा यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीची अडचण त्यांच्या समारंभाला फारशी भोवली नाही. लग्नासाठी आलेले नातेवाईक आपापल्या गावी परत गेले. नवविवाहीत जोडप्याने त्यांचा संसार सुरु केला. पुढली काही वर्ष दोघे एकत्र नांदले. गुण्यागोविंदाने एकत्र नांदले असं म्हणता येणार नाही.  

अपूर्व संसारात नाखूष होता. तो कायम तक्रार करत राहीला. घटस्फोटाची भाषा करत राहीला. वारंवार आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत राहीला. पद्मानी नवऱ्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं. 

अपूर्व जरी पत्नीवर नाखूष असला आणि वारंवार घटस्फोटाची धमकी देत असला, "घटस्फोटाचा अर्ज नेहमी माझ्या खिशात असतो" असं घरी येणाऱ्याजाणाऱ्या सगळ्यांना सांगत असला तरी त्यानं लग्न संपवण्यासाठी काही पावलं उचलली नाहीत. त्यामुळे शिव आणि पद्मा यांचा संसार काही वर्ष टिकला. 

चारपाच वर्ष नाखुषीत घालवल्या नंतर अपूर्वनी ठाम भूमिका घेण्याचं ठरवलं. त्यानं आपल्या मागण्या पद्माला सांगितल्या. आपण आपल्या मागण्यांवर ठाम रहाणार असल्याचंही सांगितलं. 

ते ऐकल्या बरोबर पद्मा खवळली. "फसवणूक...माझी फसवणूक होतेय," असं म्हणू लागली. 

"लग्नाआधी आपलं ठरलं होतं कि लग्नानंतर तू कायम घर सांभाळणार आणि मी नोकरी करायची आणि आता तू म्हणतोस कि निम्मा वेळ तु नोकरी करणार आणि मी घरी बसायचं? मला हे कदापि मान्य नाही. मी घर सांभाळणार नाही. ही माझी फसवणूक आहे. तुला जर वचन पाळायचं नव्हतं तर लग्नानंतर कायम घर सांभाळण्याचं तू लग्नाआधी का कबूल केलं होतंस ?" पद्मा पुन्हापुन्हा तेचतेच म्हणत राहिली. 

लग्नाआधी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्याने दोघांनी एकमेकांना अनेक वचनं दिली होती आणि आणाभाका घेतल्या होत्या हे ती विसरली. पत्नीचा आडमुठेपणा बघुन अपूर्वही मागे हटायला तयार होईना. शेवटी दोघांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. दोघेही हट्टाला पेटल्याने त्यांच्या संसाराच्या विभागणीत कॊणाला काय मिळणार हे ठरवण्यासाठी दोघांनी न्यायालयाकडे धाव घेतली.                                                                           

                                                                            *****

एकदा रात्री आई माझ्या स्वप्नात आली. ती पुणेवासी होती तेंव्हा मी तिला नियमित फोन करत असे पण ती स्वर्गवासी झाल्यापासून तिनं माझ्याशी काहीही संपर्क ठेवलेला नाही. ती गेली ती गेलीच. पण त्यादिवशी स्वप्नांत आली आणि म्हणाली. "अपूर्वनी तडकाफडकी घर का सोडलं? त्यानं असं भावनेच्या भरात घर सोडायला नको होतं". 

मी गाढ झोपेत होते. तरी तिला म्हंटल, "तुला काय माहित त्यानं तडकाफडकी घर सोडलं? आपल्याला वाटतं ते अचानक घडलं याचा अर्थ असा नाही कि त्यानं तो निर्णय भावनेच्या भरात घेतला. तो निर्णय त्यानं त्याच्या वकिलांच्या सल्ल्याने घेतला असेल." 

आईला ते पटलेलं दिसलं नाही म्हणून मी म्हंटल,  " अगं, ज्या तऱ्हेनं अपूर्व आणि पद्माचे वकिल आपापल्या अशिलांची बाजू सध्या न्यायधिशां समोर मांडत आहेत आणि गेली काही वर्ष त्या दोघांची आपसात कशी भांडण चालली होती याच्या बातम्या आता आपल्या कानावर येत आहेत ते ऐकल्यावर असं वाटू लागलय कि गेले कित्यके महिने किंवा वर्ष ते दोघेही आपापल्या वकिलांचा सल्ला घेत असावेत. "

आई थोडी नवऱ्याशी जुळवून घ्यावं या संस्कारातली होती. ती म्हणाली, " पद्मानी जरा जुळवून घ्यायला हवं होतं. एवढी वर्ष तिनं नोकरी केली होती. काय बिघडलं असतं थोडी वर्ष घर सांभाळलं असतं आणि अपूर्वला नोकरी करू दिली असती तर? निदान मुलांसाठी तरी घर सांभाळण्याचं काम वाटून घ्यायचं. आता हि न्यायालयातली लढाई किती दिवस चालणार, त्यात मुलांची किती फरपट होणार? आणि शेवटी कोण जिंकणार?" 

आईच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. 

                                                                       *****

जे खऱ्या आयुष्यात घडतं त्यातुन काल्पनिक गोष्टी सुचतात किंवा उलटही होऊ शकतं. कल्पना आणि वास्तव यांची सरमिसळ होत असते. 

गेल्या काही महिन्यांतल्या राजकीय घडामोडी बघता एक रहस्यमय मालिका दूरदर्शनवर दाखवण्यात येत आहे असं वाटू लागलं आहे. या मालिकेची निर्मिती कधी सुरु झाली, कथानक कसं उलगडत गेलं आणि शेवट काय होणार याचा अंदाज त्या मालिकेतील सगळ्या पात्रांना आणि त्यांच्या सल्लागारांना असावा. फक्त प्रेक्षकच सस्पेन्स मध्ये आहेत असं दिसतंय.  

सत्तेच्या लालसे पोटी राजकीय नेत्यांनी राज्याला अनिश्चितते मध्ये लोटलं आहे, त्यांच्या वागण्यावर आपलं काही नियंत्रण उरलेलं नाही अशी भीती लोकांच्या मनात घर करू लागली आहे. 

जेंव्हा भीती मनात घर करू लागते तेंव्हा आपण काय करतो? 

प्रथम आपण Go भीती Go आणि Go अनिश्चितता Go असे मंत्रजप करतो. दहा कोटी लोकांनी श्रद्धेने हे मंत्रजप केले तर कुमारी भीती आणि कु.अनिश्चितता या जुळ्या बहिणी घाबरून तात्काळ चीनला पलायन करतील असा आपल्याला विश्वास वाटतो.

दुर्दैवाने सगळे लोक ऐकत नाहीत. मनोभावे जप करत नाहीत. त्यापेक्षा ते मनोरंजनाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे जप निष्प्रभ ठरतात. तसं झालं तर... 

                                                                              *****

... तर जप करायचं सोडून देऊन आपण नुसताच विचार करत बसतो. तेंव्हा या मालिकेतील कथानकाशी समांतर घटना आपल्याला सभोवताली घडलेल्या दिसतात:  

दादरला पोर्तुगीज चर्च आहे. त्याच्या तिरकं समोर रस्त्याच्या पश्चिम बाजूला गोखले रस्त्यावर एक खाणावळ होती. आधी एक होती पण नंतर त्याच्या दोन खाणावळी झाल्या: त्यातल्या एकाचं नाव आहे मालवण किनारा आणि त्याला अगदी लागून असलेल्या दुसऱ्या खाणावळीचं नाव आहे मालवणी किनारा. काही वर्षांपूर्वी त्या खाणावळीचे दोन भाग झाले.   

पक्ष विघटनाशी समांतर अशी हि घटना आहे.  

मालिकेतलं दुसरं महत्वाचं कथानक म्हणजे संस्थापकांना किंवा त्यांच्या वारसदारांना पदच्युत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

जगद्विख्यात ऍपल कंपनीचा इतिहास सर्वाना माहित आहे. एकोणीसशे शहात्तर साली स्टिव्ह जॉब्ज याने आपला मित्र स्टिव्ह वॉझनियाक बरोबर ऍपल कंपनीची स्थापना केली. एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी मॅकनटॉश संगणक पहिल्यांदा बाजारात आणला. परंतु जॉब्जनी ज्या व्यक्तीची ऍपलच्या सीईओ पदी नेमणूक केली होती त्याने कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बरोबर मिळून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जॉब्जला ऍपल सोडायला भाग पाडलं.   

साधारणपणे इथपर्यंतचं कथानक आपण आजवर बघितलं आहे. ही समांतर उदाहरणं सेवाभावी राजकारणातील नसुन स्पर्धात्मक उद्योग क्षेत्रातील आहेत हा भाग वेगळा. मालिकेच्या पुढील भागांमध्ये काय होणार हा प्रेक्षकांसाठी सस्पेन्स आहे. 

खऱ्या आयुष्यात, आपणच सुरु केलेल्या कंपनीतुन उचलबांगडी झाल्यावर स्टिव्ह जॉब्ज ने NeXT नावाची कंप्युटर प्लॅटफॉर्म विकसित करणारी कंपनी स्थापन केली. एकोणीसशे शह्यांणव साली ऍपलने NeXT विकत घेतली. त्या मार्गाने जॉब्ज स्वगृही म्हणजे ऍपल मध्ये परतला आणि कंपनीचा अध्यक्ष बनला. पुढे काही वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यानं आय फोन सहीत तत्सम अनेक लोकप्रिय उत्पादने बाजरात आणली. त्या काळात त्यानं आपलं आरोग्य गमावलं. पण ऍपलच्या उत्पादनांनी जगाला वेड लावलं. 

                                                                                *****                                                                                  

या मालिकेतली दृश्य बघितली तर असं वाटतं कि काही पुरुष राजकीय नेते मिळून आपसात त्यांचा सत्ते पे सत्ता चा खेळ खेळत आहेत. एकदोन ठळक नावं वगळली तर ते महिलांना आपल्या खेळात समाविष्ट करून घेताना दिसत नाहीत. 

हे चिंताजनक आहे. आजवर मुंबई हे महिलांसाठी खुप सुरक्षित शहर राहिलेलं आहे. राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांत महिला रात्रीच्या वेळी एकट्यादुकट्या बाहेर जाऊ शकत नाहीत असं म्हणतात. 

भविष्यकाळातही मुंबई महिलांसाठी सुरक्षित राहील याची काळजी महिलांना घ्यावी लागेल. त्यासाठी जागरूक रहावं लागेल. नाहीतर बघता बघता हे शहर महिलांसाठी असुरक्षित होईल आणि ते लक्षात येई पर्यंत काही करण्याची वेळ टळून गेलेली असेल. 

                                                                               *****

गणपती तर गावाला गेले. आपल्याला त्यांच्यावाचून चैन पडो न पडो आता दसरा आणि दिवाळी येईल. शोभा डे यांनी त्यांच्या Selective Memory: Stories from My Life या पुस्तकात दिवाळीशी निगडित एक आठवण सांगितली आहे. त्या लिहितात: 

'मी नेहमी मुलांना घेऊन दिवाळीची खरेदी करायला जुन्या बंगल्याच्या जवळ असलेल्या मध्य मुंबईतील बाजारात जात असे...   नेहमी प्रमाणे बरीच लहान मुलं मला चिकटलेली होती. आम्ही अनेक लहानसहान गोष्टी घ्यायला थांबलो. अवंतिकाच्या हातात आठ छोटे रंगीबेरंगी कंदील होते (ती जेमतेम सहा वर्षांची होती). आदित्य उत्साहाने त्याचे (फटाके) बॉम्ब आणि रॉकेट्स मिरवत होता. तेवढ्यात मला एक म्हातारी आज्जी विशष्ट प्रकारच्या रांगोळीच्या पॅटर्न्सच पुस्तक विकताना दिसली. तिच्याकडून मी ते पुस्तक घेतलं आणि पर्स मध्ये सुट्टे पैसे शोधण्यापुरता मुलांचा हात सोडला. याला तीस  सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला नसेल. तिथुन निघताना जेंव्हा मी परत मुलांची संख्या मोजली तेंव्हा एक मुल कमी भरलं. माझंच. दिवाळीच्या खरेदीत मग्न गर्दीनी खचाखच भरलेल्या त्या अंधाऱ्या गल्लीत अवंतिका कुठे दिसेना. 

मी माझ्या हातातले छोटे हात सोडू शकत नव्हते. गजबजलेल्या कोपऱ्यावर त्यांना एकटही सोडू शकत नव्हते. शोधक नजरेनं आणि धडधडत्या छातीनी मी अक्षरशः त्यांना ओढत प्रत्येक फेरीवाल्याकडे जाऊन विचारलं, "तुम्ही लहान मुलीला बघितलं? तिच्या हातात कंदील होते".  बहुतेकांनी मान हलवून कुठे तरी लांब बोट दाखवत म्हंटलं,  "ती त्या बाजूला गेली". अशक्य. सहा वर्षांची मुलगी काही सेकंदात इतक्या लांब कशी जाईल? तरीही ज्याला ज्याला मी विचारलं त्या प्रत्येकाने अगदी खात्रीने सांगितलं, "त्या दिशेला"  

मी माझ्या नेहमीच्या सराफाच्या दुकानात शिरले. ओरडून तिथल्या विक्रेत्यांना विचारलं, "माझी मुलगी.... तुम्ही माझ्या मुलीला पाहिलंत का? चमचमत्या सोन्याच्या काउंटर मागून ते ही ओरडले, " हो. आली होती ती इथे. पण ती आता इथे नाहीय." ते तर दिसतच होतं. पण ती इथे नाही तर कुठे होती? 

तशीच सगळ्या बच्चे कंपनीला घेऊन मी त्या अरुंद, घाण कचरा विखुरलेल्या छोट्या फुटपाथवरून तिला हाका मारत धावत सुटले. 

ते दृश्य बघण्या सारखं असेल: एक सैरभैर झालेली बाई, तिच्या ओढणीला अर्धा डझन मुलं लटकतायत, "अवंतिका" असं पुकारत सैरावैरा धावतेय. 

पन्नास मीटर अंतरावर दोन पुरुषांनी मला गाठलं. 

"तुम्ही कंदीलवाल्या लहान मुलीला शोधताय का?" 

"हो" मी किंचाळले. 

"ती घरी गेली," ते शांतपणे म्हणाले. 

"तुम्हांला कसं माहीत. तुम्ही कोण?"

"ती रडताना दिसली म्हणून आम्ही तिला थांबवलं. आमची एक महीला स्वयंसेविका तिला इथे घेऊन आली आणि तिला तिचं नाव आणि पत्ता विचारला. तुम्ही जवळच रहाता ना? तिनं त्या बोळातुन बंगल्याकडे जाण्याचा शॉर्ट कट दाखवला. काळजी करू नका. ती सुरक्षित आहे. त्या तिला घरी घेऊन गेल्या."

त्या क्षणी मी तर मेलेच. नक्कीच. छातीतली धडधड थांबली. अवंतिका माझी लाडकी बाळी घरी सुरक्षित होती. मला दुसरं काही सुचत नव्हतं ना कशाची पर्वा होती. माझे ओठ कोरडे पडले होते. त्यावरून जीभ फिरवत मी त्यांना पुन्हा विचारलं, " तुम्ही कोण?'

"आम्ही या भागातल्या शिवसेना शाखेचे आहोत," ते उत्तरले.' 

त्या आठवणीच्या शेवटी शोभा डे लिहितात, " I don't care what anybody thinks of the Sena. I owe them one. A big one. I'm deeply, deeply grateful. And indebted for life (मी त्यांची आजन्म ऋणी आहे)". 






Tuesday, August 2, 2022

दिल ढुंढता है

                                                      
                                                             


जुलै महिन्यात दोन प्रसिद्ध व्यक्ती गेल्या. 

न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रथम पत्नी ईव्हाना ट्रम्प यांचं निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्या नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असायच्या. ९० च्या दशकात त्यांचा आणि डॉनल्ड ट्रम्प यांचा घटस्फोट न्यूयॉर्कमध्ये खूप गाजला होता कारण दोघेही इथेच रहायचे. त्या मुळच्या चेकोस्लव्हाकियाच्या होत्या.

ईव्हाना गेल्याची बातमी वाचल्यावर त्यांची एक मुलाखत बघत होते. त्यात त्या म्हणतात कि राष्ट्राध्यक्ष झाल्यावर श्रीयुत ट्रम्प यांनी त्यांना चेकोस्लव्हाकिया मध्ये अमेरिकेची राजदूत म्हणून जाण्याबद्दल विचारलं होतं. (घटस्फोट झाला असला तरी ते दोघे दर आठ -पंधरा दिवसांनी फोनवर बोलायचे. त्यांना तीन मुलं आहेत). 


एक अकेला इस शहर में 


चालून आलेलं राजदूत पद ईव्हानानी नाकारलं. त्याचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं कि "मी स्प्रिंग आणि फॉल मध्ये न्यूयॉर्क मध्ये असते, हिंवाळ्यात मायामी मध्ये, आणि उन्हाळ्यात सॅन ट्रोपे मध्ये. हे आयुष्य सोडून कशाला कुठे जाऊ ". 

घटस्फोट झाल्यावर गेल्या पंचवीस वर्षात ईव्हानानी दोनदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला श्रीयुत ट्रम्प हजर होते. न्यूयॉर्क मध्ये जशी एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच प्रमाणे ट्रम्प कुटुंब हे ही इथलं एक फिक्सचर आहे. त्यांच्या नावाच्या बऱ्याच इमारती शहरात आहेत.


दिल ढुंडता है 

दुसरं निधन मुंबईत गायक भूपिंदर सिंग यांचं झालं. दुर्दैवानी सध्या तिथे चालू असलेल्या राजकीय गदारोळात ती बातमी कुठे तरी कोपऱ्यात जाऊन पडली. माझ्या आवडीची कित्येक गाणी भूपिंदर सिंग यांच्या आवाजातली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या निधनाच्या बातमीला जेवढं मिळायला हवं होतं तेवढं महत्व मिळालं नाही. 

एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी वाचून आपल्याला काय वाटतं या मागची कारणं प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. खरतर कोण कुठली ती चेक - अमेरिकन ईव्हाना ट्रम्प. माझा त्यांचा काय संबंध. भारतात असताना त्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. पण जेंव्हा न्यूयॉर्कला आले तेंव्हा ईव्हाना ट्रम्प हे या शहरातलं खूप ठळक नाव होतं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी वाचून चुटपुट वाटली. 


झिंदगी मेरे घर आना 


तिसरं निधन मुंबईत झालं... की होत आहे (एका राजकीय पक्षाचं)... ते अजून स्पष्ट झालेलं नाही. शहरावर शोककळा पसरली नसेल  बहुतेक पण वादळ वारे वहात आहेत असं दिसतं. या आधी मुंबईत एवढं मोठं राजकीय वादळ कधी आलं होतं का आठवत नाही. आलं असेल कदाचित पण पूर्वी कुठलीही गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला थोडा वेळ लागायचा. आजच्या इतक्या वेगाने काही पोहूच शकत नसे - मग ते विषाणू असोत, वस्तू असोत, नाहीतर बातम्या असोत. 


दो दिवाने शहर में
                                 

भूपिंदर सिंग यांची कित्येक गाणी मी पुन्हा पुन्हा ऐकली आहेत. त्यांचं दो दिवाने शहर में हे घरोंदा सिनेमातलं गाणं जुन्या मुंबईची आठवण करून देतं. मुंबईत जेंव्हा जागेची टंचाई होती, बिल्डर आणि त्यांचे दलाल जागा देतो असं खोटं आश्वासन देऊन लोकां कडून पैसे घेत आणि जागा कधी मिळत नसे त्या काळातला तो चित्रपट आणि ते गाणं आहे. मुंबईतली अनेक कुटुंब तेंव्हा बिल्डर कडुन फसवणूक झाल्याच्या सामुदायिक अनुभवातुन गेली होती. 


होके मजबूर मुझे 


भूपिंदर सिंग यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे झाला. ईव्हाना ट्रम्प आपल्या घरातील जिन्यावरून पडून गेल्या. तो अपघात होता. 

राजकीय पक्षाचा मृत्यू अजुन झालेला नाही पण त्याचा खात्मा करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे आरोप होत आहेत. जर ते आरोप खरे ठरले आणि खरोखरच पक्षाचा शेवट झाला तर पक्षाच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक म्हणता येईल की घातपात किंवा हत्या म्हणावी लागेल?

आजकाल आपण कलेक्टिव्ह consciousness हा शब्द प्रयोग फार ऐकतो. ती संकल्पना थोडी विस्तृत केली तर आपल्या मनावर फक्त आपल्या घरातुन आणि शाळेतुन संस्कार होतात असं नाही. आपण ज्या अनुभवातुन जातो -  एक देश म्हणून, एक राज्य म्हणून, एक शहर म्हणून त्यांनी आपल्या मनाला आणि विचारांना आकार मिळत असतो. 

                           
 बीती ना बिताई रैना 


मुंबईत आजवर झालेल्या अनेक दंगली, दहशतवादी हल्ले, महाभयंकर पूर, दर पावसाळ्यात रस्त्यावर साचणारं पाणी या सगळ्या अनुभवांनी शहरात रहाणाऱ्या लोकांना घडवलं आहे. मुंबईत राजकीय पक्षाची हत्या झाली तर तो ही एक सामुदायिक अनुभव असेल. त्याचे शहरावर आणि राज्यावर काय बरेवाईट दूरगामी परिणाम होतील हे त्या विषयातील जाणकार सांगू शकतील कारण एका प्रादेशिक पक्षा बरोबर अनेक लोकांच आयुष्य आणि आठवणी निगडीत असतात. 

एक आठवण राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. 

 
नाम गुम जायेगा   


आऊटलुक मासिकानी घेतलेली ती मुलाखत यु ट्यूब वर आहे. हा किस्सा दुसऱ्या भागाच्या शेवटी येतो. बजाज जेंव्हा लहान म्हणजे विशीत होते तेंव्हा पुण्याच्या त्यांच्या बजाज कंपनीत संप चालू होता. कित्यके महिने तो संप मिटत नव्हता. एक युनियन नेता अडून बसला होता आणि संप मिटू देत नव्हता. त्यासंबंधी बोलणी करण्यासाठी राजीव बजाज त्यांचे वडील राहुल बजाज यांच्या सोबत बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. ठाकरेंनी त्यांची बाजू ऐकून घेतली. मग आपल्या सहकाऱ्यांना विचारलं कि खरंच तो युनियनचा नेता त्रास देतोयं का.

बजाज मुलाखतीत म्हणातात की त्या बैठकीत ठाकरेंचे जे सहकारी हजर होते त्यांची नावं मी सांगत नाही कारण त्यातले काही जण आत्ताच्या मंत्रिमंडळात आहेत (एक वर्षापूर्वीची मुलाखत आहे). जेंव्हा सहकाऱ्यांनी सांगितलं कि होय, खरंच तो नेता अडवणूक करतोय तेंव्हा ठाकरे म्हणाले - "काढून टाका त्याला". फक्त त्यांनी राहुल बजाज यांनां सांगितलं कि तुम्ही त्याला एक ऑटो रिक्षा भेट द्या. म्हणजे जरी त्याची नोकरी गेली तरी तो उद्या पासुन रिक्षा चालवून पॆसे मिळवून त्याच्या कुटुंबाचं पोट भरू शकेल. 

          

कभी किसी को मुक्कमल जहाँ नही मिलता

मुलाखतीत बजाज म्हणतात कि ज्या समस्येवर तोडगा शोधणं खूप कठीण जाणार आहे असं त्यांना बैठकीच्या आधी वाटत होतं ती समस्या ठाकरेंनी इतक्या चुटकीसरशी तरीही संवेदनशीलतेने "counterintuitive" (त्यांनी वापरलेला शब्द) पद्धतींने मिटवली ते बघून तरुण वयात ते खूप मोठा धडा शिकले. त्यांच्या आई (राहुल बजाज यांच्या पत्नी) मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातील होत्या असंही ते मुलाखतीत म्हणतात.