Tuesday, August 30, 2011

हरिकेन आयरिन

शुक्रवारी दुपारी ब्युटी पार्लर मध्ये शाम्पुवाली मुलगी माझे केस धूत होती तेंव्हा ज्युलीचा आवाज माझ्या कानावर पडला. पटरीसियानं माझं डोकं सिंकवर धरून ठेवलं होतं तरी मी अवघडलेली मान वर करून बघितलं तर ती ज्युलीच होती. तिच्या हेअर ड्रेसरला जोरजोरात काहीतरी सांगत होती. "मी उद्या पहाटेच न्युयोर्कच्या बाहेर पडणार. कुठे जाणार अजून माहित नाही. जवळपास सगळीकडेच हरिकेनचा धोका आहे. बहुतेक थोड लांब पिट्सबर्गला वगेरे जाईन..."

तशी ज्युलीला मी थोडफार ओळखते. ती माझ्या घराजवळच राहते- दोन, तीन बिल्डींग सोडून. माझा मुलगा आधी ज्या शाळेत जायचा त्या शाळेत तिची मुलं आहेत. माझ्या दोन मैत्रिणींशी तिची चांगली मैत्री आहे. त्यांच्या कडून मला ज्युलीच्या बातम्या समजत असतात. दोन वर्षां पूर्वी तिचा डिव्होर्स झाला. त्यानंतर तिनं चेहऱ्यावर भरपूर प्लास्टिक सर्जरी करून घेतली. वजन पुष्कळ कमी केलं. घट्ट, लांडे कपडे घालायाल सुरुवात केली. पार्लरमध्ये तर नेहमीच दिसते. केसांमध्ये नित्यनवीन हायलाइट्स करून घेत असते.

उन्हाळ्याची सुट्टी संपायला एक आठवडा उरलाय. बाहेरगावी गेलेले बरेच लोक अजून परत आलेले नाहीत. पार्लर एकदम रिकामी होतं. त्यात ज्युलीचा आवाज खूपच मोठ्ठा ऐकू येत होता. "धिस गाय देट आय अम डेटिंग, हि वोन्ट हेल्प मी." म्हणजे guy. आपली गाय-म्हशितली गाय नाही. त्याचा उल्लेख तिनं बॉयफ्रेंड असा केला नाही म्हणजे डेटिंग फार दिवस चाललेलं नसावं. केस रंगवणारी अधूनमधून सहानभूतीपूर्वक हं हं करत होती. "त्यानं खरतर मला मदत करायला हवी. पण त्याची आई वयस्कर आहे म्हणून तो तिच्या जवळ थांबणार आहे. ते मी समजू शकते. पण खरतर त्याला दोन भाऊ आणि एक बहिण आहे. ते नाही का आई जवळ राहू शकणार. पण हे कोणीच पुरुष मला काही मदत करत नाहीत. म्हणजे माझे  वडील करतात थोडी मदत पण जास्त नाही. मला एकटीलाच सगळ बघायाल हवं. माझ्या मुलांची फ्लाईट आत्ता रात्री अकरा वाजता लेंड होतेय." (मुलं माजी-नवऱ्याबरोबर कुठेतरी गेली होती). ज्युलीचा एकतर्फी संवाद चालूच होता. "म्हणजे त्यांना घरी पोहोचे पर्यंत बारा -एक तरी वाजतील. मग मी आणि माझ्या दोन मैत्रिणी माझ्या मुलांना घेऊन पहाटेच निघणार. कदाचित मुलं आली कि लगेच रात्रीच निघू." तिनं परत एकदा कोणीच पुरुष तिला काही मदत करत नसल्याबद्दल  खंत व्यक्त केली. बसल्या बसल्या कार रेंटल कंपनीला फोन करून मोठी व्हेन मिळेल का ह्याची चवकशी केली. पण सगळ्या मोठ्या गाड्या बाहेर गेलेल्या होत्या. म्हणताना मग आधी ठरवलेल्या गाडीचं रिझर्व्हेशन पक्क केलं. आणि गेली एकदाची. पार्लर एकदम शांत झालं. 

माझं पण होत आलं होतं. मी पटकन दोन मैत्रिणींना sms केले. आजकाल मी टीव्ही बघत नाही. टीव्ही वरची ती भडक दृश्य, त्या सनसनाटी बातम्या नको वाटतात. त्यामुळे वर्तमानपत्रातून आणि इंटरनेट वर ज्या काही बातम्या समजतील तेवढयाच. तसा आयरीनचा उल्लेख ऐकला होता. पण एवढया वर्षात न्युयोर्कमध्ये आम्हाला कधीच कुठल्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्याव लागलं नव्हतं.  आमच्याकडे हिंवाळ्यात कधीतरी दोन-तीन फूट बर्फ पडतं आणि वादळ-भूकंप होतात वित्तीय. वॉल स्ट्रीट वरचे. त्यामुळे फारतर क्वीन्स, लाँग आयलंड, न्यू जर्सी ह्या भागात वादळाचा धोका असेल असं समजून मी त्या बातमीकडे फारसं लक्ष दिल नाही. 

तेवढयात माझ्या पटेल मैत्रिणीचा फोन आला. ती मिडटाऊनमध्ये, युनायटेड नेशन्सच्या जवळ रहाते. ते लोक रात्रीच बाहेर पडणार होते. मला वाटलं कॅनेक्टीक्ट्ला तिच्या मामाकडे जाणार असतील. पण ती म्हणाली, " तिथे जाऊन काय उपयोग. तिथेही वादळाचा धोका आहेच. माझ्या ओळखीचे काही लोक सिराकयुजला चाललेत. आम्हीही बहुतेक अपस्टेट न्युयोर्कला कुठेअरी जाऊ. आता थोड्या वेळातच निघणार कारण नंतर सगळेच लोक बाहेर पडायला लागले तर ट्रफिक वाढेल आणि बाहेर पडण मुश्कील होईल." 

मनहेटन सगळ्या बाजूनी अटलांटिक महासागर आणि हडसन नदिनी वेढलेल आहे. त्यामुळे बाहेर पडायला नदीवरचे पूल आणि नदीखालाचे बोगदे ह्यांच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून ती जरा घाबरलेली वाटली. सुषमाशी बोलले तर ती माझ्या इतकी नाही पण बरीचशी वादळाच्या बाबतीत अनभिज्ञ आणि निश्चिन्तही वाटली. ज्युलीच्या पार्लर मधल्या बडबडीतून माझ्या कानावर पडलं होतं कि मनहेटनचे ए,बी, सी असे झोन पाडलेत. आम्ही रहातो तो अप्पर वेस्ट साईडचा भाग झोन बी मध्ये येत होता. वॉल स्ट्रीट, बेटरी पार्क वगैरे डाउनटाऊनचे समुद्राच्या जवळचे भाग- जिथे भरतीच्या वेळी पूर येण्याची जास्त शक्यात होती- ते झोन ए मध्ये येत होते. पुराची शक्यता वाढली तर तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं असतं. आणि काही लोकांना हलवलंहि. पण सुषमाच्या म्हणण्याप्रमाणे वॉल स्ट्रीटच्या जवळपास असूनही त्यांची बिल्डींग झोन सी मध्ये येत होती ज्यात शहर-अधिकाऱ्यांच्या मते वादळाचा संभाव्य धोका झोन ए आणि झोन बी पेक्षा कमी होता. "पण काही झालं तरी आम्ही काही कुठे जाऊ शकणार नाही. कारण जेपनिज स्टोक मार्केट आपल्या रविवारी रात्रि उघडेल. त्यावेळी नवऱ्याला न्युयोर्कमध्ये असायला हवं." ती म्हणाली. शेवटी आम्ही दोघींनी मिळून ठरवलं कि निदान काही सामान तरी घरात आणून ठेऊया. वीज गेली तर मेणबत्त्या, टोर्च असलेले बरे. समजा दोन दिवस दुकान उघडली नाहीत तर जास्तीच दुध तरी असावं. 

सुपर मार्केट मध्ये गेले तर तिथे हि गर्दी. लोकं महिन्याभराच सामान साठवून ठेवत होते कि काय कुणास ठाऊक पण शॉपिंग कर्टस भरभरून खरेदी चालली होती. शेवटी सुपरमार्केटवाल्यांनी अनाउन्स केलं कि आम्ही सामानाची होम डिलिव्हरी आजच्या पुरती स्थगित केलीय. तुम्हाला बरोबर नेता येईल तेवढंच सामान घ्या. 

सामान घेऊन थोडी रमतगमतच घरी आले. बाहेर छान उन पडलं होतं. गुरुवारच्या दिवसभराच्या पावसानंतर आकाश निरभ्र झालं होतं. जास्त गरमही होत नव्हतं. खूप छान हवा होती. २४-३६ तासात येऊ घातलेल्या वादळाची चाहूल कुठेच दिसत नव्हती. घरच्या फोनवर मुंबईच्या शेजारणीचा मेसेज होता, "काय चाललय तुमचं तिथे. फोन कर जरा." म्हंटल तिच्याशी नंतर बोलावं. आत्ता मुंबईत मध्यरात्र झालीय. ती झोपली असेल. आधी इथल्या बिल्डींग मध्ये काय चाललाय ते बघावं. 

आमच्या इमारतीतली सगळी मंडळी शांत होती. बहुतेक जण इथेच राहणार होते. आपली बिल्डींग नवीन आहे त्यामुळे वादळ-भूकंपाला तोंड देऊ शकेल असं मजबूत बांधकाम आहे आणि जर कदाचित वाऱ्याच्या जोरामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या तर बिल्डींग इंजिनियरला फोन करा. ते येऊन तुम्हाला खिडक्या बंद करू देतील, एवढी महत्वाची महिती मिळाली. लिफ्ट मध्ये एक शेजारी भेटले. त्यांना विचारलं बाहेर जाणार कि इथेच रहाणार. ते म्हणाले, "छे छे, कशाला कुठे जायचं. आपल्याला एवढया वरून वादळ बघायाल खूप मजा येईल". 

शक्य तेवढी पूर्वतयारी करून झाली. म्हणजे बाथरूम आणि किचनमध्ये पाणी भरून ठेवायचं बाकी होतं. न्युयोर्क मध्ये कधी वीज जात नाही कि कधी पाणी भरू ठेवावं लागत नाही. त्यामुळे पिंप शोधण्या पासून तयारी होती. पण समजा जर वीज गेली आणि पाण्याची टाकी रिकामी झाली तर असावं म्हणून थोडं पाणी भरून ठेवलं. आता रविवारी सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान येणाऱ्या वादळाची वाट बघायाल आम्ही सज्ज होतो. 

शनिवारी सकाळी खूप ढगाळ झालं. अधून मधून पाऊस पडायला सुरुवात झाली. तरी रस्त्यावरती लोक दिसत होते. नदीकाठी जॉगिंग करत होते. हेल्मेटधारी सायकलस्वार जोरात जाताना दिसत होते. नदीकाठानि जाणाऱ्या हायवेवरती तुरळक वाहनांची ये जा चालली होती. मी वरून खिडकीतूनच सगळीकडे लक्ष ठेऊन होते. शेजारच्या बिल्डींगमध्ये वरच्या मजल्यावर कोणीतरी खिडक्यांच्या काचांना आडव्या तिडव्या टेप्स लावल्या होत्या. आम्ही तेवढे कष्ट घ्यायचे नाहीत असं ठरवलं. एक मोठ्ठ लेगोचं पझल काढलं आणि करत बसलो. 

थोड्या वेळानी इमेल चेक केलं तर बेरल आणि अभिजित कडून आलेली मेल दिसली. 'तुम्हाला कळवायला खूप वाईट वाटतय कि आम्ही होंगकोंगला शिफ्ट होतोय.' म्हंटल हे काय! वादळाचा तडाखा उद्या बसायचा तो आज कुठे. बेरल माझी चिनी मैत्रीण. मुळची होंगकोंगची. नवरा कलकत्त्याचा. होंगकोंग, लंडन करत सहा-सात वर्षांपूर्वी न्युयोर्कला आले. आणि ह्या सहा वर्षात बेरलन न्युयोर्कमध्ये कित्ती काय काय केलं. दोन मुलांमध्ये मिळून पाच शाळा बदलल्या. "माझी मुलं न्युयोर्क मधल्या सर्वोत्तम शाळेतच जायला हवीत" हा अट्टाहास. तीन अपार्टमेंट्स बदलली. एका अपार्टमेंटच फरशीपासून छता पर्यंत मोठ्ठ रेनोव्हेशन करून घेतलं. आणि असे न्यूयोर्कमध्ये राहण्याचे लॉन्ग टर्म प्लेन्स चालू असताना अचानक सगळ सोडून होंगकोंगला चालली? सुट्टी सुरु व्हायच्या आधी भेटली तेंव्हा काहीच म्हणाली नव्हती. म्हणजे म्हणाली होती की "मी आणि मुलं होंगकोंगला चाललोय. आता एकदम शाळा सुरु व्हायच्या आधीच परत येऊ. शाळा सुरु झाली की भेटूच आपण." 

ह्या बातमिचा मला वादळापेक्षा जास्त धक्का बसला. केवढा जिवाचा आटापिटा करून बेरलन मुलासाठी आपल्याला हव्या त्या शाळेत एडमिशन मिळवली. जेमतेम दोन वर्ष मुलगा त्या शाळेत गेला असेल. आता ती एडमिशन सोडून द्यायला हवी... पण मला खात्री आहे की होंगकोंगमध्येही ती मुलांच्या एडमिशनसाठी अशीच प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आणि दोन-तीन वर्षानी कदाचित न्युयोर्कल परत येईल आणि मुलाना त्यांच्या जुन्या शाळेत घालेल. पण पाच-सहा वर्षांपूर्वी होंगकोंगला शिफ्ट झालेले कोणीच अजुन न्युयोर्कला परतलेले नाहीत हे ही खरय. 

वादळाचा प्रवास कुठपर्यंत अलाय ते बघायला टीव्ही लावला. सगळ्या चेनल्सवर वादळाच्याच बातम्या चालल्या होत्या. आता वादळ कुठपर्यंत आलय. कुठल्या गावात किती मैलाच्या वेगानं वारे वहातायत ह्याचे माहिती पूर्ण डिटेल्स सांगत आणि दाखवत होते. शनिवारी संध्याकाळी जोरात पाऊस पडायला लागला. पुराच्या भीतीमुळे बसेस आणि ट्रेन्स दुपारी बारा वाजताच बंद करण्यात आल्या होत्या. टेक्सी मात्र रात्रभर चालू होत्या. न्युयोर्कमधले टेक्सीचालक जास्तकरून बांगलादेशी. मला खूप पूर्वी भारतात असताना दूरदर्शनवर बघितलेली त्यांच्या देशातल्या चक्रीवादळाची आणि ब्र्म्हपुत्रेला आलेल्या पुराची दृश्य आठवली. शनिवारी रात्रभर पाऊस पडला.

रविवारी सकाळी उठलो तर पाऊस खूप जोरात पडत होता. वाऱ्याचा जोर मात्र जास्त नव्हता. नदी काठान लोक फिरताना दिसत होते. भरतीची वेळ होती. पाण्याची पातळी वाढली होती. काही भागात पाणी रस्यावर यायला लागलं होतं. पण सुदैवानं परिस्थिती गंभीर होण्याआधीच पावसाचा भर ओसरला. दुपारपर्यंत पाऊस एकदम थांबला. रस्ते सुकू लागले. काही लहान दुकानं आणि रेस्तोरान्त्स उघडली. 

घरात बसून कंटाळा आला होता. इंडियन शॉपिंग उरकून घ्यावं म्हणून संध्याकाळी क्विन्सच्या इंडियन मार्केट मध्ये गेले. रस्त्यात कुठेच वादळामुळे काही नुकसान झालेलं, झाडांची पडझड झालेली दिसली नाही. जेक्सन हाइट्स नेपाळी, बांगलादेशी मंडळींनी गजबजल होतं. ईद निमित्त झाडांवर दिव्याची रोषणाई केली होती. पटेल ब्रदर्सच मोठ्ठ ग्रोसरी स्टोअर (ह्या पटेलचा माझ्या मैत्रिणीशी काही संबंध नाही) बंद होतं. पण लहान दुकानं उघडी होती. त्यातल्या एकात थोडं सामान घेतलं. आमच्या नेहमीच्या जेक्सन डायनरमध्ये जेवलो आणि घरी परतलो. 

सोमवारी सगळं सुरळीत चालू झालं. आयरीनन इतर काही ठिकाणी बरच नुकसान केलं. पूर आले, वीज गेली, जीवित हानी झाली. न्युयोर्क थोडक्यात वाचलं. ह्या आधीच वादळ म्हणे न्युयोर्कमध्ये शंभर हूनही अधिक वर्षांपूर्वी आलं होतं. त्यानंतर कधी वादळ नाही कि भूकंप नाही. गेल्या दोन आठवड्यात मात्र आधी भूकंपाचा धक्का बसला नंतर वादळाचा. जगभर होत चालेल्या हवामानातील बदलाची तर ही चिन्ह नसावीत....

No comments:

Post a Comment