Wednesday, May 8, 2013

माझी गुलाबी पर्स

मागच्या आठवड्यात माझी पैशाची पर्स हरवली. म्हणजे हरवली असं नाही म्हणता येणार खरतर विसरली गेलि.  झालं काय कि मुलाची स्कूल बस 70th street आणि Broadway च्या कोपऱ्यावर थांबते. त्या कोपऱ्यावर एक वर्तमानपत्र, मासिकं, गोळ्या, चिप्स विकायचा stand आहे; मुंबईत कोपऱ्या-कोपऱ्यावर अंडी, ब्रेड, बिस्किटं विकणारे असतात ना त्या प्रकारचा. त्याच्या शेजारी न्यूयॉर्क टाईम्सचा एक मोठ्ठा नीळा पत्र्याचा बॉक्स आहे. बसला ट्राफिकमध्ये उशीर झाला तर बुड टेकायला तो उपयोगी पडतो. मागच्या गुरुवारी मुलगा बसमधून उतरला आणि म्हणाला, "मी शेजारच्या दुकानातून गोळ्या घेतो म्हणजे मला मित्रांच्या बरोबर त्या खाता येतिल".  त्याचे मित्र आपल्या आईबरोबर आम्हाला बस stop वर भेटणार होते आणि मग त्यांच्याबरोबर प्ले ग्राउंडवर खेळायला जायचा बेत होता.

बऱ्याच महिन्यांनी हि प्ले-डेट बाहेर ग्राउंडवर होत होती. गेले काही महिने थंडीमुळे मुलांना बिल्डींगच्या जीममध्येच खेळावं  लागलं होतं. त्याला त्यांची काहीच तक्रार नसते. त्यांना उलट जीमच आवडते. कारण तिथे बास्केट-बॉल, टेबल- टेनिस काय हवं ते खेळता येतं. पण आम्हाला आयांनाच असं वाटत कि सारख बंद जीममधल्या हीट- एसी मध्ये खेळण्यापेक्षा, थंडी नसेल तेंव्हा त्यांनी उघड्यावर मोकळ्या हवेत खेळावं.
                                           
                                                                  70th Street


    ब्रॉडवे आणि ७० स्ट्रीटच इंटरसेक्शन आणि उजव्या हाताला खाली कोपऱ्यात पब्लिक स्कूलच (PS 199) प्ले ग्राउंड


मुलाच्या गोळ्या घेऊन झाल्या तरी त्याच्या मित्रांचा पत्ता नव्हता.  बास्केट-बॉल खेळायच तर बॉलहि नव्हता. म्हणून मी त्यांच्या आईला टेक्स्ट केलं कि 'आम्ही बॉल घेऊन येतो. तुम्ही प्ले ग्राउंड वर थांबा'. 70th स्ट्रीट पासून आम्ही 72nd स्ट्रीटपर्यंत चालत गेलो. रस्ता क्रॉसकरून उजवीकडे वळल्यावर जवळ जवळ अर्धा ब्लॉक अंतरावर एक खेळण्यांच दुकान आहे. तिकडे बॉल निवडण्यात थोडा वेळ गेला. कॅशिअरच्या पुढ्यात थोडी लाईन होती म्हणून थांबावं लागलं. पैसे दयायला म्हणून मी मोठी पर्स उघडलि तेंव्हा लक्षात आलं कि आतलं पैशाच गुलाबी पाकीट गायब होतं.

मुलाला म्हंटल, "मगाशी मी घरी बहुतेक कशालातरी पाकीट काढलं असणार, ते घरीच राहिलं". मुलगा म्हणतो, "नाही, मी तुला दिलं होतं". म्हंटल, "कधी दिलं होतस?" तर म्हणाला, "मी गोळ्या घ्यायला म्हणून पैसे काढले आणि पाकीट तुला परत दिलं".

मी त्याच्या मित्रांची वाट बघण्यात, त्यांच्या आईला फोन/टेक्स्ट करण्यात इतकी मग्न होते कि मी त्याच्या हातातले पैसे बघितले पण त्यानं ते पाकीट काढलं कधी आणि ते कुठे ठेवलं ते काहीच मी बघितलं नाही. मला वाटलं  मोठ्या पर्सच्या आतल्या कप्प्यात त्याला सुट्टे पैसे सापडले असतील.

लोकांच्यासमोर मी मुलावर ओरडत नाही. पण त्यादिवशी नकळत त्या दुकानातच माझा आवाज चढला. तिथली कॅशियर आणि रांगेत उभ्या असलेल्या दुसऱ्या बाईला ते ऑकवर्ड वाटतय हे हि मला दिसत होतं तरीही माझा आवाज खाली येईना. नशीब बॉलपुरते पैसे मोठ्या पर्स मध्ये होते. ते देऊन, सुटे पैसे परत घेऊन, मुलावर ओरडतच मी दुकानातून बाहेर पडले आणि त्याला म्हंटल, "जा आता धावत पळत आणि बघ ते पाकीट त्या निळ्या पेटीवर आहे का".  तो धावत सुटला तशी पाकीट हरवल्याचा आता किती व्याप होणार ह्याची मी मनातल्या मनात उजळणी करत होते.  चेक बुक पाकिटात होतं म्हणजे ते कॅन्सल करावं लागणार. काही ID कार्डस होती ती कॅन्सल करून नवीनसाठी अप्लाय करावं लागणार.

सत्तर- बहात्तर स्ट्रीट आणि ब्रॉडवे हा Manhattanचा इतका गजबजलेला भाग आहे कि भर गर्दीच्यावेळी असं उघड्यावर पडलेलं पाकीट वीस-पंचवीस मिनिटांनंतर तिथे परत मिळू शकणार नाही ह्याची मला खात्री होती. दहा वर्षांपूर्वी रिव्हरसाईड ड्राईव्हवर नाही मिळालं तर ब्रॉडवेवर काय मिळणार.

दहा-बारावर्षांपूर्वी आम्ही 74th street आणि रिव्हरसाईड ड्राईव्हच्या कोपऱ्यावर रहात होतो. ब्रॉडवेपासून दोन ब्लॉकच्या अंतरावर असूनही ब्रॉडवेच्यामनाने हा रस्ता दिवसाच्या कुठल्याही वेळी खूपच शांत असतो. नावाप्रमाणेच नदीच्या बाजूनी जाणारा. फॉल आणि विन्टर मध्ये ह्या रस्त्यावर कधीकधी इतका वारा असतो कि आपला तोल संभाळण कठीण होतं. एकदा सकाळी मी घराबाहेर पडले आणि कोट- तोल सांभाळत, वाऱ्याला तोंड देत जेमतेम काही पावलं चालले असेन…तर लगेच लक्षात आलं कि खांद्याला लावलेली पर्सच गायब झालीय. तेंव्हा माझ्याकडे एक चामड्याची चंची होती - खूप वर्षांपूर्वी गोव्याला एका छोट्याशा दुकानात घेतलेली. तिची पाठीमागची बाजू प्लेन काळ्या चामड्याची होती, पुढच्या बाजूला राजस्थानी मिररवर्कच भरतकाम केलेलं ब्राऊन रंगाच कापड होतं आणि खांद्याला अडकवायला नाजूक काळा गोफ होता. खूप सुंदर पर्स होती. हुबेहुब चंचीच्याच आकाराची. फारसं काही सामान रहात नसे तीच्यात. पण त्यादिवशी मला फक्त चेकबुक घेऊनच कुठेतरी जायचं होतं म्हणून ती पर्स घेतली. पर्स गायब झाल्याच लक्षात आल्यावर लगेच मी चार-पाच ब्लॉकचा परिसर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धुंडाळला. रस्ता तर निर्मनुष्य होता. जवळपास चीटपाखरुही दिसत नव्हत. फॉलचे दिवस असल्यामुळे पालापाचोळा तेवढा जिकडे तिकडे उडत होता. त्या पालापाचोळ्या बरोबर लांब कुठे उडून गेली कि काय कुणास ठाऊक. पण ती पर्स काही सापडली नाही.


उजव्या हाताला खालच्या कोपऱ्यात रिव्हर साईड ड्राईव्हचा  74th स्ट्रीट  जवळचा भाग . 

तो अनुभव आठवतच मी 72nd street क्रॉस करून बस stop कडे चालले होते तर समोरून मुलगा माझ्या दिशेने पळत येताना दिसला… त्याच्या हातात माझी गुलाबी पर्स! दहा वर्षात न्यूयॉर्कर्सच्या प्रामाणिकपणात वाढ झाली कि काय असं वाटून गेलं. तर मैत्रीण म्हणाली, "तसं काही नसणार. पण आजकाल वाढत्या टेररीस्ट हल्ल्यांमुळे गजबजलेल्या भागात भरपूर कॅमेरे लावलेले असतात (बॉस्टन मारेथोन मधले बॉम्ब हल्ले नुकतेच झाले होते).  हे कारण असेल कदाचित नाहीतर उगीच पर्समध्ये बॉम्ब -बिंब असला तर… हि भीती असेल. म्हणून कोणी पर्सला हात लावला नसेल".

किंवा कदाचित त्या गुलाबी पर्सला मला सोडून कुठे जायचं नसेल!

एकदा मुंबईतही मी ते पाकीट एका पेपरवाल्याकडे विसरले होते. कीर्ती कॉलेजच्या बाहेर जी वडापाववाल्याची गल्ली आहे त्या गल्लीतून बाहेर येउन कॅडल रोड क्रॉस केला कि पलीकडच्या बाजूला, डाव्या हाताला कोपऱ्यावर एक पेपरवाले बसतात. आज कित्तीतरी वर्ष तो newstand तिथे आहे. मीच गेली वीस- पंचवीस वर्ष तिथुन पेपर घेतेय. दोन वर्षांपूर्वी एका  संध्याकाळी मी पेपर-मासिकं घेऊन पैसे दिले आणि पाकीट तिथेच विसरले. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून पेपरवर प्लास्टिक घातलेलं होतं त्याखाली बहुतेक माझं पाकीट गाडलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं. मासिकं घेतल्यावर मी दुसरीकडे कुठेच गेले नव्हते त्यामुळे पाकीट कुठे राहिलं असेल ते आठवणं कठीण गेलं नहि. तसंच दुसऱ्या कुणीतरी उचलायच्या आधी पेपरवाल्या भाऊंना ते सापडलं तर त्यांनी ते ठेवलं असणार ह्याचीही मला खात्री होती. आणि झालही तसच. मी विचारायला गेले तर ते भाऊ नव्हते. एक ताई होत्या. त्यांना विचारलं, "रात्री इथे पाकीट सापडलं का?" तर त्या म्हणाल्या, "थांबा फोन करून विचारते".  आणि त्यांनी फोन केल्यावर मिनिटा-दोन मिनिटातच आले आपले कालचेच भाऊ माझं पाकीट घेऊन.














No comments:

Post a Comment