Thursday, June 27, 2013

मुंबईचं मनोगत

दोन दिवसांपूर्वी पहाटे मुंबई स्वप्नात आली. जरा नाराज होती. आल्या आल्या म्हणाली, "शोभा डेंनि माझ्याबद्दल काय लिहिलंय वाचलंस का?"

म्हंटल : नाही, का ग?

मुंबई : रोज तर तिचा ब्लॉग वाचतेस. आणि एवढ महत्वाच नाही वाचलस?

मी : तुझा उल्लेख पाहिला मी एका पोस्ट मध्ये. पण मला वाटलं तिनं तुर्कस्तानबद्दल काहीतरी लिहिलय. म्हणून वरवर चाळलं नुसत. लक्षपूर्वक नाही वाचलं. तुझ्याबद्दल काय लिहिलय?

मुंबई : ती म्हणते कि मोठे बिल्डर आणि राजकारणी मिळून माझी सगळी जमीन घशात घालायच्या मागे आहेत. आज ते महालक्ष्मी रेसकोर्स गिळंकृत करायला बघतायत. उद्या हंगिंग गार्डन्सच्या मागे लागतील. आणि मुंबईकर नुसते बघत
बसलेत. तुर्की सरकार जेंव्हा इस्तंबुलमधल्या ६० एकराच्या गेझी पार्कवर शॉपिंग मॉल बांधायला निघालं तेंव्हा तिथली सामान्य जनता म्हणे सरकार विरुद्ध खवळून उठली. आणि आपल्याकडे मात्र नुसती टीव्हीवर चर्चा करायची आणि पेपरात पत्र लिहायची ह्यापलीकडे लोकं काही करायलाच तयार नाहीत. त्यांच्यात काही जोशच उरलेला नाही.

मी : जोश नाही कसं म्हणतेस. मागे दिल्लीत त्या मुलीवर बलात्कार झाला तर तरुण पिढी खवळून उठलीच कि.
जागोजागी निदर्शनं झाली. शिवाजी पार्कलाही बघितली मी तरुण मुलांची निदर्शनं.

मुंबई : मी नाही म्हणत ग ती डेबाईच म्हणतेय. पण माझ्याच बाबतीत एवढी उदासीनता का? बिल्डरलोकांना तर पैशाशिवाय कशाचीच पर्वा नाही. गुंड/राजकारणी त्यांना सामील. जुन्या ऐतिहासिक वास्तू, थोडीफार काही वनराई उरली होती ती त्यांनी आधीच उध्वस्त केलीय. आणि मुंबईकर घाबरून गप्प बसलेत.

"घाबरून नसेल." मी पुटपुटले. "मला वाटत काय झालय माहिती आहे का, जेन्ट्रीफिकेशनमुळे तुझ्या काही भागातून तुझे मूळचे मुंबईकर हद्दपार झालेत. आणि तिथे नवीन आलेल्या श्रीमंतीमुळे त्यांना तुझ्यातुन मार्जिनलाईझ झाल्यासारख वाटतय बघ."

मुंबई : होक्का. काय बडबडतेस. जेन्ट्रीफिकेशन काय. मार्जिनलाईझ काय. न्यूयॉर्कला गेल्यापासून तुझं शब्दभांडार बरंच वाढलेलं दिसतय.

मी : जाऊ दे. उगाच जरा मोठे शब्द वापरायचा चान्स घेतला. मला काय म्हणायचय कि तुझ्या काही भागातल्या श्रीमंतीच मूळच्या साध्या-सुध्या मुंबईकरांवर दडपण येतं. तुझी सूत्र आपल्या हातात घेण्याइतपत आत्मविश्वास नाही त्यांच्यात.

मुंबई : मग त्यात माझी काय चूक? मी किती सहन करायचं? मागे काही मंडळी माझं शांघाय आणि सिंगापूर करायला निघाली होती. ते जेंव्हा होईल तेंव्हा काय होईल माझ्या ह्या "साध्या-सुध्या मुंबईकरांच". आणखी किती लांब पळतील ते माझ्या पासून. मला सांग उद्या जर कोणी तुला म्हंटल कि आपण तुझी अंजेलिना जोली करूया तर तुला कसं वाटेल.

मी गप्प बसले. मनात आलं, मला जर कोणी अंजेलिना जोली करू शकत असेल तर आणखी काय पाहिजे. पण मुंबई जोक ऐकायच्या मूड मध्ये नव्हती. तिला दिलासा द्यायला मी म्हंटल,

"तुझं शांघाय - सिंगापूर व्हायची काळजी तू नको करूस. अग ठसठशीत मराठी सौंदर्य तुझं. ते कसं लोपेल. पण मी आपलं माझ्या अनुभवावरून तुला सांगते. आता बघ मी न्यूयॉर्कमध्ये रहाते. खूप सुंदर शहर आहे हे. रुंद रस्ते आणि फुटपाथ, शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्ठे पब्लिक पार्क्स, बिन-गर्दीच्या ट्रेन्स आणि बसेस. असं वाटतं कि कोणतरी झटतय इथे रहाणाऱ्या लोकांना आणि येणाऱ्या पर्यटकांना खूष ठेवण्यासाठी. पण तरीही मला तुझ्याबद्दल जेवढ प्रेम वाटत ते ह्या शहराबद्दल कसं वाटणार?

तसंच काहीसं तुझ्याकडे येणाऱ्या लोकांच होत असेल ग. नोकरी-धंद्या निमित्त बाहेरगावाहून जे येतात त्यांचा उद्देश काय असतो- दोन बेडरूमच्या घरातून तीन बेडरुमच्या घरात कसं जायचं. आणि दुसऱ्या मजल्यावरून दहाव्या मजल्यावर रहायला कधी जायचं. मी बघते ना माझ्या प्रभादेवीतल्या शेजाऱ्यांच. सुट्टीत परदेश सहली करायच्या. एरवीही काय घरातून गाडीत बसायचं. गाडीतून - ऑफिसात, हॉटेलात, शॉपिंग मॉलमध्ये आणि विमानतळवर. त्यांना कुठे ग तुझी काळजी करण्यात इंटरेस्ट. त्यांना तर तुझी भाषाही बोलता येत नाही. आणि तुझे मूळ मुंबईकर जे दूर कुठल्यातरी उपनगरात ढकलले गेलेत ते कामावरून सुटल्यावर लोकलचा प्रवास करून इतके थकून भागून घरी येत असतील कि टीव्ही बघण्याशिवाय इतर काही करायच त्राणच त्यांच्यात उरत नसेल. म्हणून तुला वाटतय कि तुला कोणी वाली उरलेला नाही."

मुंबई : मला आशेचा किरण दाखवायचं सोडून तू तर…

गजर झाला तशी गेली बिचारी. माझा दिवस सुरु झाला तशी तिची रात्र.
No comments:

Post a Comment