Sunday, April 12, 2015

मुंबई मिसळ

गेल्या आठवड्यात मुंबईहुन मल्टीप्लेक्स संबंधीच्या ज्या बातम्या आल्या त्या मी लक्षपूर्वक वाचल्या कारण मिसळ आणि वडापाव दोन्ही माझ्या आवडीचे पदार्थ आहेत. म्हणजे दही मिसळ. साधी मिसळ मला आवडत नाही. पण दादरच्या माझ्या नेहमीच्या डोसागृहात दही मिसळ बरोबर जे दही मिळतं ते गोड असतं. म्हणजे मेन्यूतच तसं लिहीलेलं असतं कि हा गोड पदार्थ आहे. म्हणून मग मी काय करते की साधी मिसळ मागवते आणि बरोबर एक प्लेट दही वेगळं मागवते. मग ते कॉम्बिनेशन बरोबर होतं.

दही मिसळ खाताना मी खूप पौष्टिक काहीतरी खातेय असं मला वाटतं. म्हणजे त्यात सर्वात खाली उसळ असते- काही ठिकाणी पांढऱ्या किंवा हिरव्या वाटाण्याची, काही ठिकाणी मटकी -वाटाणा मिक्स. उसळ पौष्टिक असते असं आहार शास्त्र सांगतं. त्यावर सर्वात वरती बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर भुरभुरलेली असते. त्यामुळे कच्च्या भाज्या खाल्ल्याचं समाधान मिळतं. बरोबर दह्याची वाटी असते - साधं दही खावं असंही आहारतज्ञ म्हणतात. आता मध्ये थोडासा तेलाचा लाल तवंग आणि तळलेली शेव किंवा फरसाणचा थर असतो पण त्यामुळे मिसळीची पौष्टीकता फारशी कमी होत असेल असं मला वाटत नाही.

माझ्या मुलाला मिसळ-पाव आवडतो - म्हणजे साधी मिसळ आणि पाव. दही मिसळ काय किंवा मिसळ -पाव काय दोन्ही टेबल -खुर्चीवर बसून खायचे पदार्थ आहेत. उभ्यानी किंवा मल्टीप्लेक्स मधल्या सीटवर बसुन ते नीट खाता येतील असं वाटतं नाही. साधी मिसळ एकवेळ उभ्यानी किंवा थिएटर मधल्या सीटवर बसुन खाता येईल. पण तरीही येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकांचा धक्का लागून प्लेट उपडी झाली आणि त्यातली मिसळ सांडली तर ते सगळं फारच राडरबड होईल आणि सिनेमा बघायच्या आनंदात त्यामुळे व्यत्यय येऊ शकेल.

त्यामनानं पौष्टिकतेच्या बाबतीत मिसळीच्या जवळपास पण मिसळीच्या मनानं सुक्का पदार्थ म्हणजे भेळ -पुरी.  मल्टीप्लेक्समध्ये भेळपुरी विकणं जास्त संयुक्तिक होईल असं वाटत. भेळ -पूरी हा मराठी खाद्यपदार्थ आहे का नाही ह्याची मला कल्पना नाही पण पॉपकॉर्न आणि ब्राऊनी जे मुंबईतल्या मल्टीप्लेक्स मघ्ये आवडीने खाल्ले जातात, त्यापेक्षा तो नक्कीच जास्त भारतीय असावा.

"भारतीय" शब्दावरून काहीतरी आठवलं. मुंबईच्या मॉलमध्ये गेल्यावर मुलानं मला ह्यावेळी विचारलं कि मॉल जर मुंबईत -भारतात आहे; मॉलमध्ये खरेदी करणारे बहुतांश लोक भारतीय आहेत; तर आंतरराष्ट्रीय लेबल्सच्या सनग्लासेस आणि कपड्यांच्या ज्या मोठ्ठ्या जाहिराती जिकडे तिकडे झळकतायत त्यातली मॉडेल्स पाश्चिमात्य (गोरी) का? मी ते नेहमीच बघत आलेय; ते आता माझ्या अंगवळणी पडलय; त्यामुळे माझ्याकडे त्याच्या प्रश्नाला चांगलं उत्तर नव्हतं, पण त्याला ते खटकल हे हि पुष्कळ झालं असं वाटलं . पण हे थोडं विषयांतर झालं.

मिसळ आणि भेळपुरी पेक्षाही वडापाव जास्त सुटसुटीत आणि बसून, उभं राहून कसाही खायला सोप्पा. खरतर तो potato किंवा vegi बर्गरच. आंतरराष्ट्रीय कॅफे शृंखला जर राजमा आणि मका घातलेल्या खिम्याला lamb chili नाव देतात तर वडा पावला potato burger म्हंटल तर ते खोट ठरू नये. वडापावला मल्टीप्लेक्समध्ये वडापाव ऐवजी potato बर्गर म्हंटल तर खाणाऱ्यांना कदाचित ते जास्त आवडेल.

बेसन आणि बटाटा ह्या दोन गोष्टी विधात्यान केवळ तळण्यासाठीच निर्माण केल्यात असं वाटावं इतकं कढईतलं तळणं त्यांना सुट होतं. जेंव्हा त्या एकत्र तळून येतात तेंव्हा तर त्यात चुकीला फारसा वावच उरत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं कि त्यांना बटाटे वडे चांगले जमतात. पण ती समजूत चुकीची असते. बटाटे वड्यांमध्ये कांदा घालायचा नसतो. त्यात काजूही घालायचे नसतात आणि त्यात बेदाणे तर बिलकुल घालायचे नसतात. मनुका आणि काजू घालायला बटाटा वडा म्हणजे बिर्याणी किंवा खीर नाही. उद्या मल्टीप्लेक्स मध्ये कोणी जर काजू, कांदा किंवा मनुका घातलेले वडे विकायला लागलं तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशी मी आशा बाळगते.

Bhau Daji Lad Museum

भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड म्युझियम (पूर्वीच व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम) संबंधी ज्या बातम्या पेपरात येतायत त्याही मी वाचतेय. मार्च महिन्यात मुलाच्या स्प्रिंग ब्रेक मध्ये आम्ही मुंबईत होतो, तेंव्हा एक दिवस पेपरात बातमी आली कि शहरातील Fahion सप्ताहाचा समारोप जो भादाला संग्रहालयात होणार होता तो अचानक आयत्यावेळी दुसरीकडे हलवावा लागला कारण त्या भागात रहाणाऱ्या काही लोकांनी म्हणे शेवटच्याक्षणी ठरवलं कि म्युझियमचा वापर केवळ भारतीय सांस्कृतीक कार्यक्रमांसाठीच व्हायला हवा आणि Fashion Show हि आपली संस्कृती नाही. हे कारण हास्यास्पद वाटतं असच म्हणावं लागेल.

fashion सप्ताहाचा समारोप भादाला संग्रहालयात होणार आहे हि बातमी काही दिवस आधीच पेपरात आली होती. संस्कृती रक्षकांनी तेंव्हाच तो कार्यक्रम का नाही थांबवला? किंवा असं का नाही म्हंटल कि आता सगळ ठरलय तर कार्यक्रम होऊन जाऊ दे, पण पुन्हा अशा प्रकारचे कार्यक्रम संग्रहालयात होऊ दिले जाणार नाहीत. ते त्यातल्यात्यात जास्त मच्युअर वागणं झालं नसतं का? तशा प्रकारची चर्चा आयोजक आणि विरोधकांच्यात झाली होती का ह्याचा उल्लेख कुठल्याच बातमीत आढळला नाही. आधी ठरलेल्या कार्यक्रमाची जागा आयत्यावेळी बदलायला लावणं फारच पोरकटपणाचं वाटतं. शेवटच्या क्षणी जागा बदलताना आयोजकांची काय धांदल उडाली असेल ह्याची कल्पनाच करवत नाही. हे म्हणजे लग्नाचा मुहूर्त उद्यावर आला असताना अचानक दुसरा हॉल शोधायला लागण्या सारखं झालं.

तो कार्यक्रम भादालात सुरळीत पार पडला असता तर लगेच मुंबई जागतिक fashion च्या नकाशात Paris, मिलान, न्यूयॉर्कच्या पंक्तीला जाऊन बसली असती असं नाही. पण कोणी काही चांगले कार्यक्रम करत असेल तर त्यांचे पाय खेचत बसण्यान मुंबईचा आणि तिच्या समान्य जनतेचा तोटा होतो.

न्यूयॉर्क सिटीतल्या संग्रहालयात भरणारी प्रदर्शनं, लिंकन सेंटरला होणारे कार्यक्रम किंवा ब्रॉडवेचे शोज फक्त न्यूयॉर्कचे रहिवासीच बघतात असं नाही. बाहेर गावाहूनही लोक नियमितपणे ते कार्यक्रम बघायला इथे येत असतात. म्हणूनच इथली म्युझियम्स कधी रिकामी नसतात आणि त्यातल्या वस्तूंवर धुळ साठत नाही. काही महिन्यांपूर्वी मोमांत (MOMA ,  Museum Of Modern Art) Matisse च्या Cutoutsच मोठ्ठ प्रदर्शन भरलं होतं. बरेच दिवस ते चाललं.  Henry Matisse अर्थातच अमेरिकन नाही. पण  हे प्रदर्शन आहे कि सोहोळा आहे असं वाटावं इतकी लहान- थोरांची गर्दी रोज तिथे असायची. न्यूयॉर्क सारखच देशाचं सांस्कृतिक केंद्र बनायची कुवत मुंबईत नक्कीच आहे. म्हणून मला वाटतं केवळ मुंबईत रहाणाऱ्या नाही तर मुंबई बाहेर रहाणाऱ्यांनीही भादाला म्युझियम संबंधीच्या बातम्या वाचाव्यात - शक्यतो इंग्रजी आणि मराठी दोन्ही वर्तमानपत्रातून येणाऱ्या -आणि काय चाललय ते जाणून घ्यायचा प्रयत्न करावा.

ह्यावेळी वसईचा किल्ला बघितला. दोन्ही ठिकाणं अपेक्षेपेक्षा जास्त चांगली निघाली - वसई आणि किल्ला दोन्ही.  किल्ल्याचे सुंदर अवशेष अजून शिल्लक आहेत. आणि उत्तर मुंबईतल्या इतर उपनगरात इमारतींची अनिर्बंध वाढ झालीय तशी वसईत दिसली नाही. मुंबईत आजकाल अचानक कधीतरी गैर -मोसमी पाऊस पडतो. त्यामुळे सगळी झाडं धुऊन निघतात आणि हिरवळ टिकून रहाते. पूर्वी कसं एक पावसाळा संपला कि दुसरा सुरु होई पर्यंत मधल्या काळात सगळं रखरखीत व्हायचं तसं ह्यावेळी वाटलं नाही. मार्च - एप्रिल सुरु झाला कि मरणाचं उकडतं, पण आम्ही जायच्या एक -दोन दिवस आधीच पाऊस पडुन गेला होता. किल्ल्याचा परिसर हिरवा, ताजा टवटवीत दिसत होता. पण किल्ल्या विषयी काहीच ऐतिहासिक माहित तिथे उपलब्ध नव्हती.

एकूणच इतिहासाच्या धड्यात वसईच्या किल्ल्याची फारशी माहिती नसायची. जेवढा ऊदोऊदो रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग ह्या मराठ्यांनी बांधलेल्या गड -दुर्गांचा होतो, तेवढं कौतुक कधी वसईच्या किल्ल्याच्या नशिबी आलं नाही. तो मुंबईच्या एवढया जवळ असुनही आमच्या शाळेची सहल कधी तिथे गेली नव्हती. शिवनेरी बघायला शाळेनी आम्हांला पूण्याला नेलं होतं ते आठवतय. किल्ल्याच्या परिसरातही त्याविषयी काही माहिती लावलेली दिसली नाही. किल्ल्याचे अवशेष बऱ्याच मोठ्या परिसरात पसरलेत. पण त्याचा नकाशा किंवा तो कसा बघावा, सुरुवात कुठे करावी, शेवट कुठे करावा ह्या विषयी काही सूचनांचे फलक कुठे दिसले नाहीत.

तटबंदीची भिंत काही ठिकाणी शाबूत आहे. आणि वर चढून जायला फुटकळ पायऱ्या आहेत. आम्ही वर चढून गेलो तेंव्हा त्या भिंतीची रुंदी लक्षात आली. भिंतीचा सर्वात वरचा भाग म्हणजे अरुंद पाउल वाट आहे. तिथून भोवतालच्या खाडीचं मोठं विहंगम दृश्य दिसलं

खरतर वसई मुंबईपासून फार लांब नाही. आम्ही प्रभादेवीहून दुपारी दोनच्या सुमारास निघालो आणि रात्री आठ  वाजेपर्यंत परत आलो. त्यादिवशी traffic जास्त नव्हता, पण असला तरीं गाडीनी एका दिवसात जाऊन येण्या इतक ते  नक्कीच मुंबईच्या जवळ आहे. मग एक पर्यटन स्थळ म्हणून ते का विकसित करण्यात आलेलं नाही समजत नाही. मुंबईची मुळ कोळी संस्कृती जी शहरात आता नावालाच दिसते, ती पुढील पिढ्यांना समजावी म्हणून जतन करून ठेवण्यासाठीही कोणी काही प्रयत्न करताना दिसत नाही.

मल्टीप्लेक्स आणि म्युझियम मध्ये काय चाललय ह्याची काळजी करताना, मुंबईचे राखणदार मुंबई शहराची आणि तिच्या ऐतिहासिक वास्तूंची काळजी घ्यायला विसरतायत असं वाटतं.


    

No comments:

Post a Comment