Friday, October 2, 2015

फ्लशिंग मेडोज

       "There is no way to peace. Peace is the way. " 

                                                           Mahatma Gandhi 

                                       (Oct 2, 1869 - Jan 30, 1948)                                              

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना १३ सप्टेंबरला झाला. मुलांचं कोचिंग मागच्या विकएंडला सुरु झालं. दोन आठवडे लागतात त्यांना स्पर्धेचा सगळा पसारा आवरायला. खर तर दोन आठवडे कमीच वाटतात. ज्या तऱ्हेनं आर्थर Ashe स्टेडियम आणि त्याच्या भोवतीचा परिसर यु एस ओपनसाठी परिवर्तित करण्यात येतो ते मला फार विस्मयकारक वाटतं. एरवी तिथे काहीच नसतं. आता सगळ बंद, शांत आहे. जिथे इनडोअर कोर्टस आहेत तेवढी एकच इमारत फक्त उघडी आहे. ते स्टेडियम भर वस्तीत नाही; वस्तीच्या थोडं बाहेर आहे. रेल्वे लाईन आणि हायवेनी वेढलेलं आहे. सिटी फिल्डच बेसबॉल स्टेडियम जवळ आहे; पण सामने नसतील तेंव्हा तेही रिकामं असतं. पाठीमागे रेल्वेचं यार्ड आहे तिथे अनेक रिकाम्या आगगाड्या पार्क केलेल्या असतात. जवळ पास रेस्टोरंट्स नाहीतं, घरं नाहीतं कि दुकानं नाहीत. नुसता रस्त्यांचा भुलभुलैय्या, दोन ट्रेन स्टेशन्स, रेल्वेचे रूळ  आणि त्याच्या मध्ये वसलेला अमेरिकन टेनिस असोसिएशनचा मोठ्ठा कॉम्प्लेक्स. पण ऑगस्टच्या मध्यावर ते उन्हाळ्याच्या सुट्टीत चालू असलेला मुलांचा समर कॅम्प बंद करतात आणि ऑगस्टच्या शेवटी यू एस ओपन टेनिस स्पर्धा सुरु होते. मधल्या दोन आठवड्यात त्या कॉम्प्लेक्सचा पूर्ण कायापालट केला जातो. ह्या वर्षी ३१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरच्या दरम्यान स्पर्धा खेळली गेली.

गेली काही वर्ष मी त्या परिसराची दोन्ही रूपं बघतेय - यु एस ओपन चालू नसतात आणि ती चालू असताना. अजूनही दर वेळी मी विस्मयचकित होते. unbelievable, amazing हि विशेषणं वर्णन करायला अपुरी पडतील अशा रीतीनं केवळ दोन आठवड्यात त्या स्पर्धेसाठी तो परिसर तयार केला जातो. अनेक रेस्टोरंट्स, बार, दुकानं उभारण्यात येतात. स्पर्धेसाठी येणाऱ्या लाख्खो लोकांच्या खाण्यापिण्याची, बाथरूमची, शॉपिंगची सोय केली जाते. आणि हे सगळं कुठेही अव्यवस्थित, तात्पुरत वाटेल अशा रीतीनं नाही. मला दर वर्षी आश्चर्य वाटतं कि हे सगळं एरवी तर दिसत नाही; असं अचानक कसं उपटतं! आणि स्पर्धा संपली कि दोन आठवड्यात कसं नाहीसं होतं. केवळ दोन आठवडे चालणाऱ्या त्या स्पर्धेसाठी तिथे दर वर्षी जणू  टेनिसच  disney land उभारण्यात येतं.

२३००० च्या जवळपास लोक बसु शकतील असं आर्थर Ashe स्टेडियम जगातलं सर्वात मोठ्ठ टेनिस स्टेडियम आहे. तिथे पुरुषांच्या आणि महिलांच्या एकेरीचे अंतिम सामने खेळले जातात आणि टॉप सीडेड प्लेअर्सचे सुरवातीच्या फेऱ्यांतले सामने होतात. बाकीचे सामने लुई आर्मस्ट्रॉंग स्टेडियम आणि आजुबाजूला पंधरा -वीस आउट डोअर कोर्टस आहेत त्यावर होतात. आर्थर Ashe स्टेडियमवर retractable छप्पर बांधण्याचं काम सुरु आहे - पाऊस आला तर बंद करता येईल आणि इतरवेळी उघडं ठेवता येईल असं. गेल्या वर्षीची यू एस ओपन स्पर्धा संपल्यावर ते काम सुरु झालं. आणि पुढल्या वर्षीच्या स्पर्धेआधी मला वाटतं ते छप्पर तयार होणार आहे. म्हणजे सध्या ते काम अर्धवट झालेलं आहे. गेलं वर्षभर बांधकाम चालू होतं. पण तो सगळा बांधकामाचा पसाराहि त्यांनी स्पर्धा सुरु व्हायच्या आधी वेळेत आवरता घेतला. ह्यावर्षी आर्थर Ashe  स्टेडियमच्या आतमध्ये बसून जर तुम्ही वरचं छप्पर बघितलं असतं तर कोणीतरी सांगितल्या शिवाय तुमच्या लक्षातही आलं नसतं कि हे अर्धवट तयार झालेलं छप्पर आहे. असं वाटलं असतं कि काहीतरी मॉडर्न सुंदर डिझाईन केलेलं आहे.

शे- दीडशे मिलियन डॉलर्सचा एवढा मोठ्ठा बांधकाम प्रकल्प अर्ध्यावर आणून थांबवायचा -तो हि अशा रीतीने कि स्पर्धेसाठी येणाऱ्या लाख्खो लोकांना ते खटकणार नाही, त्याचा अडथळा होणार नाही, कुठले तरी पत्रे डोक्यावर कोसळतायत, स्क्रू खाली पडतायत असले छोटे-मोठे  अपघात होणार नाहीत - ते मला फार कौतुकास्पद वाटलं! ह्या सगळ्या चोख व्यवस्थापनामुळेच यू एस ओपनची तिकीटं एवढी महाग (सरासरी किमंत - २०० डॉलर्स) असतात कि काय कुणास ठाऊक!

सिटीफिल्ड मधले मेट्स चे बेसबॉल गेम्स आणि Madison Square Garden मधले न्यूयॉर्क निक्स चे बास्केट बॉल गेम्स ह्यांच्यापेक्षा यू एस ओपन हे वेगळं प्रकरण आहे- वर्षातून एकदा होते म्हणून असेल कदाचित. मेट्स आणि निक्सचे सामने बघायला लोक सर्रास त्या टीमची जर्सी, स्वेटशर्ट घालून जात असतील पण यू एस ओपन बघायला कोणी तसल्या अवतारात जात नाही. पुरुष नाही आणि बायका तर त्याहून नाही. ते दोन आठवडे फ्लशिंग मेडोज मध्ये  न्यूयॉर्क fashion वीकच चित्र दिसतं असं मी म्हणणार नाही; पण त्याच्या जवळपास.


उन्हाळ्यात समर कॅम्प आणि यु एस ओपन मुळे प्रशिक्षण वर्ग बंद आणि फॉल, विंटर, स्प्रिंग हे थंडीचे मौसम त्यामुळे कोचिंग नेहमी इनडोअर कोर्टवर चालतं. ज्या इमारतीत इनडोअर कोर्टस आहेत त्या इमारतीची रचनाही फार छान आहे. आर्थर Asheच्या शेजारी, त्या स्टेडियमच्या सावलीत हि इमारत उभी आहे. लॉबीतुन आत शिरल्यावर लांब हॉलवे आहे. त्याच्या दोन्ही बाजूला टेनिस कोर्टस आहेत. एका बाजूला सहा आणि दुसऱ्या बाजूला तीन. हॉलवेच्या वरती मोठ्ठी लांब viewing gallery आहे जी दोन्हीबाजूच्या कोर्टसना उघडी आहे. म्हणजे त्या galleryत  बसून तुम्ही खालच्या मजल्यावर दोन्ही बाजूच्या कोर्टसवर चाललेला खेळ बघू शकता. वरच्या मजल्यावर viewing galleryच्या पाठीमागेहि काही कोर्टस आहेत. एकुण बारा इनडोअर कोर्टस तरी असतील. न्यूयॉर्क परिसरात काही खाजगी टेनिस अकॅडमिही आहेत आणि तिथे भरपूर महाग आणि चांगल्या प्रतीचं टेनिस शिकवत असतील कदाचित पण त्यांना अमेरिकेन टेनिस असोसिएशनच्या फ्लशिंग मेडोजच्या ह्या केंद्राची सर नाही.

मला तिथलं वातावरण खुप आवडतं, निरोगी वाटतं. अडीज- तीन वर्षाच्या लहान मुलांपासून ते सत्तर- ऐंशी वर्षाच्या तरुणांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातले लोक तिथे आपल्या मित्र -मैत्रीणीं समवेत येऊन खेळत असतात किंवा शिकत असतात. कुठल्याही वयाच्या, वजनाच्या, आकाराच्या बायका घट्ट तोकडे टेनिसचे ड्रेस, शॉर्टस घालून खेळतात आणि कोणालाच त्यात काही विशेष वाटत नाही - बघणाऱ्यांना नाही कि खेळणाऱ्यांना नाही. जणू तिथे निव्वळ खेळाची उपासना होते आणि बाकी सगळं गौण असतं.

मुंबईला गेल्यावर माझा मुलगा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या कुलाब्याच्या कोर्टस वर खेळतो. ते प्रशिक्षण केंद्रही चांगलं आहे. फ्लशिंग मेडोजच्या तुलनेनं फार लहान आहे पण पुरेशी कोर्टस आहेत. तिथे एकही इनडोअर कोर्ट नाही. मला वाटतं अख्या भारतात कुठेच इनडोअर कोर्टस नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशिक्षणात थोडा व्यत्यय येऊ शकतो. पण प्रशिक्षणाचा दर्जा चांगला आहे. फरक असेल तर तो दोन्ही ठिकाणच्या वातावणात. ताज्या ओल्या नारळाचं लाल वाटण लावून केलेलं माशाचं कालवण आणि गरम वाफाळलेला पांढरा भात हे जेवण दुपारी जेवलं तर अंगावर जशी सुस्ती येते तशा प्रकारच्या सुस्तीत तिथला कारभार चालतो असं वाटतं.

तिथले पदाधिकारी म्हणतात कि आई -वडील मुलं लहान असताना त्यांना टेनिस खेळायला पाठवतात; पण ती साधारण चौदा वर्षांची झाली कि म्हणतात आता खेळ बास झाला; अभ्यासाकडे, घरच्या धंदयाकडे लक्ष दया. भारत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळात इतर देशांच्या तुलनेत मागे पडतो कारण शासन आणि पदाधिकारी खेळाच्या बाबतित उदासिन, निरुत्साही आहेत असं नेहमी म्हंटल जातं. ते कारण खरं असेलही. पण इतरही काही सांस्कृतिक कारणं असावित: एक म्हणजे आहारात जर मांसाहाराचा पुरेसा समावेश नसेल तर पोर्क, बीफ हा मुख्य आहार असणाऱ्या खेळाडूंसमोर जागतिक स्तरावरच्या (नुसतं खेळातलं कौशल्य नाही) strength, stamina, endurance च्या स्पर्धेत टिकाव लागू शकतो का? (पाकिस्तानी जलदतम गोलंदाजानी यू टयूब वरच्या मुलाखतीत म्हंटलय कि भारतात जलद गती गोलंदाज तयार होतं नाहीत ह्याचं कारण त्यांचा शाकाहार हे असावं.) जगात भारतासारखा एखादाच देश असेल जिथे लोकांच्या आहारात मांसाहार फार कमी असतो. चीनी लोकही मासे आणि भाज्या भरपूर खात असेल तरी पोर्कही नियमित खातात.

दुसरं म्हणजे आपल्या देशातील एकंदरच गोऱ्या रंगाच्या प्रेमामुळे बरेच मध्यम वर्गीय, उच्चमध्यम वर्गीय पालक - जे मुलांच्या प्रशिक्षणासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करू शकतात ते - मुलांना जास्त वेळ उन्हात खेळू दयायला नाखूष असतात का? उन्हात थोडा वेळ जरी खेळलं तरी भारतीय त्वचा लगेच काळी पडते. वर्षनवर्ष उन्हात सराव केला- जो बऱ्याच खेळात आवश्यक असतो - तर मुलांचा मूळचा रंग कितीतरी पटींनी काळवंडतो. कदाचित बऱ्याच आयांना ते चालत नसेल.

ऑलिम्पिक्स, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स वगळता टेनिस हा एकमेव खेळ आहे जिथे पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा एकाच वेळी, एकाच ठिकाणी होतात. महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम समान असते. काही टॉप सीडेड महिला खेळाडू पुरुष खेळाडूं इतक्याच लोकप्रिय आहेत. तरीही प्रशिक्षण घेणारे गट बघितले कि असं वाटतं कि लहान मुलांच्या गटात मुला- मुलींची संख्या समान असते पण बारा वर्षांपुढील वयोगटात पाच- सहा मुलगे असले तर एक -दोनच मुली असतात. म्हणजे मुली लहान असताना आई -वडील हौसेनं त्यांना कोर्टापर्यंत घेऊन तर येतात पण त्या जशा मोठ्या होतात आणि स्वतःची आवड स्वतः निवडतात तेंव्हा आपली पावलं दुसरीकडे वळवतात कि काय?

ऐंशीच्या दशकात मुंबई दूरदर्शननी सगळया grand slam टेनिस टुर्नामेंट्सच्या फायनल्सच थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली. यु एस ओपन, ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनल्स रात्री उशीर पर्यंत जागून नाहीतर सकाळी लवकर उठून बघितल्याचं मला आठवतय. तेंव्हाच्या टॉप सीडेड खेळाडूत ठळक नावं होती - महिलांमध्ये स्टेफी ग्राफ आणि मार्टिना नव्हरातीलोव्हा आणि पुरुषांमध्ये बोर्ग, मेकेन्ऱो, बेकर, एडबर्ग वगैरे. मार्टिना अगदी माझ्या वडिलांच्या आत्त्यासारखी दिसते असं मला तिला बघताना नेहमी वाटायचं. १९८०ची बोर्ग आणि मेकेन्ऱो मधली ऐतिहासिक विम्बल्डन फायनल, पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत खूप नाव कमावलेल्या मराठी नटानं त्याच्या आणि माझ्या वडिलांच्या कॉमन मालवणी मित्राबरोबर आमच्या घरी कारपेटवर मांडी घालून बसून कोंबडीचा रस्सा -भाकरी जेवत बघितली होती. त्या सामन्याशी ती आठवण कायमची निगडीत आहे. पण दूरदर्शवर पाहिलेल्या टेनिसच प्रतिक म्हणून डोळ्यासमोर येतो तो लांब सोनेरी कुरळे केस हेड बँडनी बंदिस्त केलेला, रागात तावातावानी अंपायरशी वाद घालणारा जॉन मेकेन्ऱो.

परवा फेडरर विरुध्द कोलश्रायबर सामन्याच्या वेळी आर्थर Ashe स्टेडियमच्या कॉमेंटेटर बॉक्स मध्ये शांतपणे उभा असलेला मेकेन्ऱो दिसला. लांब कुरळे सोनेरी केस आता नाहीसे झालेत. अर्थात मधली बरीच वर्षही गायब झालीत.No comments:

Post a Comment