Wednesday, November 9, 2016

थोडसं निवडणूकीबद्दल

निवडणूक संपली. मी मतदान केलं नाही. मतदान करायचं नव्हतं म्हणताना निवडणूकीकडे आणि प्रचाराकडे त्रयस्थासारखं बघता आलं.

दोन्ही उमेदवार न्यूयॉर्कचे. मी हि आता न्यूयॉर्कची म्हणून खरतर दोघांच कौतुक वाटायला हवं होतं. पण तसं काही वाटलं नाही. उलट प्रचाराच्या दरम्यान जे काही कानावर पडत होतं त्यामुळे ह्या दोघांऐवजी तिसरच कोणीतरी उमेदवार असायला हवं होतं असं वाटत ऱ्हायलं.

दोन्ही पक्षांची संमेलनं, उमेदवारांमधले वादविवाद, प्रचारादरम्यानच्या सनसनाटी घडामोडी काहीच टीव्ही वर बघितलं नाही. तरीही बातम्या कानावर येत होत्या: बरेच लोक नाराज होते. काही घाबरले होते. उमेदवारांची प्रतिस्पर्ध्यावरील कठोर टीका, रोज नवीन उलट सुलट बातम्या ऐकून काही लोक प्रचाराला कंटाळले होते. कधी एकदा हे संपतंय असं बऱ्याच जणांना वाटत होतं. काहींना लाजही वाटत होती. विशेष करून एका उमेदवाराच्या वक्तव्यांची. आपल्या देशाची प्रतिमा बाहेरच्या जगासमोर  डागळली जातेय असं काहींना वाटलं. तर आमचा राष्ट्राध्यक्ष होऊ पहाणारा हा उमेदवार जे काही म्हणतोय त्याच्याशी आम्ही बिलकूल सहमत नाही, तो आमच्या विचारांचं प्रतिनिधित्व नक्कीच करत नाही असं जगाला ओरडून सांगाव असं काहींना पोटतिडकीनी वाटतंय असंही दिसलं.

तमाशा हा शब्द आपण फक्त भारतातील राजकारणाच्या बाबतीतच वापरू शकतो; अमेरिकेत उंची घरात रहाणारे, डिझाईनर सूट्स घालणारे गोरे लोक तमाशा कसा करु शकतील अशी शंका ह्या आधी जर कोणाला वाटली असेल तर ती ह्या निवडणूकीत दूर झाली असणार. जग जवळ आल्याचं हे आणखी एक चिन्ह असावं.

दोघेही उमेदवार न्यूयॉर्कचे असल्यामुळे आपल्या परिचयाचे आहेत असं उगीचच वाटत राहिलं. त्यातही डॉनल्ड ट्रम्प मूळचे न्यूयॉर्कचे. मी इथे आल्यापासुन त्यांना नेहमी टीव्ही वर पहातेय. माझ्या आवडीचा एक टॉक शो होता. म्हणजे शो अजूनही आहे पण मी आता तो बघत नाही. पूर्वी ट्रम्प कधीतरी त्या शो मध्ये पाहूणे म्हणून यायचे. मुख्याध्यापकांनी एखादया विद्यार्थ्याला आपल्या ऑफिसात बोलावलं तर तो कसा आपण किती सोज्वळ आहोत हे दाखवायचा प्रयत्न करेल तसं त्यांचं त्या वेळी वागणं असायचं.

आम्ही रहातो त्या इमारतीवर ट्रम्प हे नाव आहे तसंच शेजारच्या काही इमारतींवरही. उंचच्या उंच इमारती आहेत सगळ्या. त्यांच्या भोवतालचा परिसर गेल्या दहा -पंधरा वर्षात सुधारून खूप सुंदर करण्यात आलाय. पूर्वी इथे काहीच नव्हतं. नदीच्या काठानी जाणारी ओसाड रेल्वे लाईन होती. वीस वर्षांपूर्वी रेल्वे लाईन खाली तशीच ठेऊन त्याच्यावर इमारती बांधायला सुरवात झाली. आणि आज नागरिकांसाठी रहायला उत्तम, अनेक प्रकारच्या सुखसुविधांनी संपन्न असं ह्या भागाचं स्वरूप दिसतं. आमच्या डोळ्यासमोर हे घडलं.  डॉनल्ड ट्रम्पनी ते घडवून आणलं कि इतर कोणी ते माहित नाही पण ठळक अक्षरात नाव तर त्यांचंच आहे. म्हणून कदाचित त्यांच्या नावाची सांगड  काही लोकांच्या मनात तरी नकळत चांगल्या गोष्टींशी घातली जात असेल.

हिलरी क्लिंटन माझ्या नंतर न्यूयॉर्कला रहायला आल्या.  न्यूयॉर्क राज्यातून त्या दोनदा सेनेटर म्हणून निवंडून आल्या. त्याही अपरिचित वाटत नाहीत. अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा सन्मान आज त्यांना मिळू शकला नाही. पण  निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात ट्रम्प म्हणाले त्याप्रमाणे हिलरी क्लिंटननी हि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांचे प्रयत्न, चिकाटी, धडपड कित्येक लहान मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आणि कुणास ठाऊक त्यांच्या पासून स्फूर्ती घेऊन एखादी तरुण मुलगी नजीकच्या भविषयकाळात निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि स्वबळावर - वडील, नवरा, इत्यादी, इत्यादींच्या शिवाय  - अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान पटकावेल. तो हि एका अर्थानं हिलरी क्लिंटन यांचा विजय असेल.

No comments:

Post a Comment