Sunday, December 4, 2016

कोकण आणि दख्खन Dancing Girl, Golconda, late 17th century 


ताजनी त्यांच्या काही हॉटेलांचा विवांत (विव + अंत? ) केल्यापासुन आता तिथे जायला भीती वाटते. जावं कि न जावं असं होतं. उदाहरणार्थ गोव्याचं फोर्ट अग्वादा आणि मुंबईतलं प्रेसिडेंट. फोर्ट अग्वादा मध्ये जाणं टाळता येतं. त्याचा विवांत झाल्या पासून मी तिकडे गेले नाही. पण कुलाब्याच्या प्रेसिडेंटची गोष्ट वेगळी. तिथे कोकण कॅफे आहे. म्हणजे होता. म्हणजे अजूनही आहे. पण आता त्याचं रूप पालटलय जरी नांव तेच असलं तरी.

मराठी शब्दकोशात विवर्त हा शब्द सापडला. त्याचा अर्थ बदल, रूपांतर असा आहे. विवांता काही सापडला नाही. विवंचना ह्या शब्दाचा अर्थही सापडला. त्यावरुन समजलं कि विवांता मध्ये जायच्या आधी मी विवंचित होते किंवा मला विवंचना होते असं म्हणणं चूक होणार नाही.

कुठल्यातरी वेब साईट नुसार vivanta हे vividness, vivacity आणि फ्रेंच मधील bon vivant ह्या तीन शब्दांचं एकत्रीकरण आहे. असुदे. ज्यांनी बदल केला त्यांनाच खरं काय ते ठाऊक.

सध्याच्या कोकण कॅफेत प्रवेश करताच लक्षात येतं कि जेवणाच्या खोलीतली अंतर्गत सजावट बदलण्यात आलीय. सजावट बदलणं चांगलं. त्यात वाईट काहीच नाही. त्यानं ताजेपणा येतो.

वाढपी म्हणाले कि खोलीला कोकणातील घराचं रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. असेल. कोकणातील महालाचं रूप दयायचा प्रयत्न करण्यात आला असेल. कारण मी लहानपणी कोकणात बघितलेल्या घरांशी ती सजावट मिळती जुळती वाटली नाही. नाही म्हणायला खोट्या खोट्या खिडक्या आणि त्यांचे उभे लोखंडी गज बघितल्यावर मालवणच्या माझ्या आजोळच्या घरातल्या खऱ्या खऱ्या खिडक्या आठवल्या.  त्या जुन्या पध्द्तीच्या खिडक्यांना पडदे म्हणून रोमन शेड्स लावल्यात. हे म्हणजे अख्खा सिनेमा खेडवळ मराठी भाषेत आणि त्यातल्या गाण्याच्या सुरवातीला एकदम जोरदार पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत- तसला प्रकार झाला.

त्री-खंडातल्या भारतीय भोजनालयांचा बऱ्यापैकी अनुभव गाठीला असल्या मुळे कोकण कॅफेचा मेन्यू बघितल्याबरोबर माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती जेवणात पडू नये म्हणून जेवण ऑर्डर करायच्या आधी मी वाढप्याना विचारलं कि, "सरसकट सगळ्या मासे, कोंबडी, मटणाच्या रश्श्यामध्ये आता कढीपत्ता आणि मोहरी असणार का?"

तर त्यांनी मला उलट प्रश्न केला कि, "तुम्हाला कढीपत्ता आणि मोहरीची अलर्जी आहे का?"

मी हो म्हणायला हवं होतं. मासे, मटण, कोंबडीच्या रश्शात घातलेल्या कढीपत्ता आणि मोहरीची मला खरंच अलर्जी आहे. कोणाच्या स्वयंपाकाच्या पध्दतीला नावं ठेवायचा उद्देश नाही पण आमच्याकडे कढीपत्ता आणि मोहरी फक्त भाजी आणि आमटीच्या फोडणीला वापरतात किंवा फारतर कोशिंबिरीच्या फोडणीत. माशाला किंवा चिकन -मटणाला नाही.

माझी शंका खरी ठरली. वाढपी स्वयंपाकघरात जाऊन आचाऱ्यांना विचारून आले आणि म्हणाले कि, "हो,  मालवणी रस्सा आणि कोंबडी -वडे मधली कोंबडी सोडली तर बाकी सगळ्या पदार्थाना कढीपत्ता -मोहरीची फोडणी असणार." त्यांनी मला आधीचाच प्रश्न परत विचारला, "तुम्हांला कढीपत्ता आणि मोहरीची अलर्जी आहे का?"

कोकण कॅफेचं जेवण चाखुन माझी पार निराशा झाली. एकतर स्थानिक मासे कुठलेच नव्हते. ताजे बोंबील आणि सुरमई तर नव्हतीच पण मला आठवतं त्याप्रमाणे पापलेटही नसावा. मग हलवा आणि बांगडे वगैरे तर सोडूनच दया. आम्हाला कोलंबीवर, अति-गोड पन्ह्यावर आणि सुमार सोलकढी वर समाधान मानावं लागलं.

पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी अस्सल कोकणी - मालवणी पद्धतीचा मेन्यू होता. छान जेवण असायचं. कोकणी जेवण हवं असेल पण प्रसंग विशेष असेल म्हणजे नेहमीच्या खाणावळीत जाण्या इतका साधा नसेल किंवा नेहमीच्या घरातल्या लोकांपेक्षा इतर कोणाला बाहेर जेवायला न्यायचं असेल तर अशा वेळी कोकण कॅफे हा छान पर्याय होता. त्याला कढीपत्ता -मोहरीची फोडणी दयायची गरज का भासली कुणास ठाऊक.  माशाला कढीपत्त्याची फोडणी दयायची साथ दादरच्या सचिन पर्यंतही पोहचलीय असं मला मागच्या वेळी वाटलं.

चूक कदाचित माझीच असेल. कोकण म्हणजे नक्की काय हे मला माहित नसावं. मुंबईच्या दक्षिणेकडचा महाराष्ट्राच्या किनार पट्टीचा प्रदेश म्हणजे कोकण अशी माझी संकुचित समजुत होती. कोकणात इतरही काही प्रदेश मोडत असतील ह्याकडे मी कधी फारसं लक्ष दिलं नाही. म्हणजे आजकालची मुलं आपण त्यांची चूक दाखवून दिल्यावर मनापासुन सॉरी म्हणायच्या ऐवजी निर्विकार चेहऱ्यांनी, खांदे उडवत आपल्याला सुनावतात तसं म्हणायचं तर, my bad!Lady Carrying A Peacock, probably Hyderabad, late 17th to early 18th centuryजसं कोकण म्हणजे काय हे मला नीट माहित नव्हतं तसंच डेक्कन म्हणजे काय हे हि हल्लीच समजलं. शाळेतल्या इभूनाला शाळेतच सोडून दिल्याचा हा परिणाम. (इभूना = तिहास +भूगोल +नागरीकशास्त्र). माझ्यासाठी डेक्कन म्हणजे पूण्यातला डेक्कन जिमखाना आणि मुंबई आणि पूण्याच्या मध्ये प्रवाशांची ने -आण करणारी डेक्कन क्वीन -एवढंच. त्यापलीकडे डेक्कन मध्ये आणखी बरच काही आहे हे मागच्या वर्षी कळलं.

न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियममध्ये मागल्या मे -जून मध्ये (२०१५) दख्खनच्या सुलतानांवर प्रदर्शन भरलं होतं.  Sultans of Deccan India, 1500-1700: Opulance and Fantasy नावाचं . प्रदर्शन खूप मोठठं नव्हतं. म्हणजे मेटचा अवाढव्य पसारा आणि मोठ्ठी दालनं बघितली तर त्यामानानं ह्या प्रदर्शनाचं दालन लहान होतं. पण देखणं प्रदर्शन होतं.

सोळा ते अठराव्या शतकातल्या दख्खनचं एक परिपूर्ण चित्र दर्शकांच्या डोळ्यासमोर उभारण्याचा प्रयत्न प्रदर्शनात करण्यात आला. सुलतान दख्खनला कुठून, कसे आले. त्यांनी आपल्या बरोबर काय /कोणाला आणलं. त्यांनी जे किंवा ज्यांना बरोबर आणलं त्याचा दख्खनच्या चित्रकला, शिल्पकला आणि वास्तू रचनेवर, संस्कृतीवर, समाज रचनेवर, तिथल्या व्यापारावर कसा परिणाम झाला ह्याचा सविस्तर आढावा प्रदर्शनात घेण्यात आला.

त्यानिमित्तानं त्याकाळातील मूळ दख्खनी चित्र, शिल्प, कारागिरीच्या वस्तू ज्या आता त्रिखंडात विखुरलेल्या आहेत त्यांना युरोप, भारत, अमेरिकेतील वेगवेगळया खाजगी किंवा इतर संग्रहातून न्यूयॉर्कला आणण्यात आलं. सोळा ते अठराव्या शतकाच्या दरम्यान दख्खनमध्ये निर्मिलेल्या जवळपास २०० मूळ कलाकृती प्रदर्शनात सादर करण्यात आल्या.

ऑक्सफर्ड मध्ये शिकलेल्या नवीना नजात हैदर ज्या मेटच्या इस्लामिक आर्ट विभागाच्या क्युरेटर आहेत त्यांनी आणि सॅन डिएगो म्युझियम ऑफ आर्टच्या मरिका सरदार ह्यांनी ते प्रदर्शन क्युरेट केलं होतं. हैदर यांचे आईवडील भारतीय. दिल्लीचे. म्युझियम मधली प्रदर्शन बघण्याचा मला फार अनुभव आहे अशातला भाग नाही पण अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर साकारलेलं हे प्रदर्शन खूप काळजीपूर्वक आणि प्रेमानी क्युरेट केलंय असं वाटलं.Tree on the Island of Waqwaq, Golconda, early 17th centuryमॅनहॅटन मधल्या फ़िफ्त ऍव्हेन्यूवर मेट्रोपॉलिटन म्युझियम आहे. राष्ट्राध्यक्ष केनडींच्या पत्नी जॅकी केनडी मेटच्या मोठया चाहत्या होत्या असं वाचल्याचं आठवतं. म्युझियमच्या अगदी जवळच त्या रहायच्या आणि त्यांच्या अपार्टमेंट मधून त्यांना टेंपल ऑफ डेंडुरच दर्शन व्हायचं म्हणे.

फ़िफ्त ऍव्हेन्यूच्या लोकांना टेंपल ऑफ डेंडुरच भारी कौतुक. त्या प्राचीन ईजिप्शियन मंदिराचे अवशेष १९७८ साला पासुन मेट मध्ये आहेत. पण माझी त्या मंदीराची आठवण थोडी वेगळी आहे. म्हणजे तिचा जॅकी ओ शी काही संबंध नाही.

मी अमेरिकेत तशी नविनच होते आणि आम्ही ते मंदिर बघायला गेलो. म्युझियमच्या शांत, काहीश्या अंधाऱ्या दालनातून फिरत जिथे मंदिराच्या अवशेषांची पुनर्रउभारणी केलेली आहे त्या दालनात शिरलो. ते मंदिर राहिलं एका बाजूला, आधी लक्ष वेधून घेतलं ते समोरच्या काचेच्या भिंतीनी. उन्हाळा असावा. बाहेर सूर्य तळपत होता आणि काचेपलीकडल्या हिरवळीवर असंख्य गोरी न्यूयॉर्कर मंडळी शक्य तितके कमी कपडे घालून आपापल्या चटया -ब्लँकेट्स पसरून त्यावर अंग शेकत पहुडली होती.

प्राचीन मध्य आशियायी मंदिराच्या लगत अगदी अनपेक्षितपणे झालेलं आधुनिक न्यूयॉर्कच उघडं दर्शन तेंव्हा मला धक्कादायक वाटलं होतं. सिक्युरिटी कडक व्हायच्या आधीची हि गोष्ट आहे. आता काचेपलीकडे बहुदा दृश्य /अदृश्य कुंपण असेल.                                    Bidar and Surrounding 356 copy

 

त्यादिवशी म्युझियममध्ये शिरताना सुलतानांच्या प्रदर्शनात काय बघायला मिळेल ह्याची मला कल्पना नव्हती. थंडीचा मौसम संपला होता म्हणजे अर्थातच न्यूयॉर्कचा टुरिस्ट सिझन सुरु झाला होता. लॉबीत पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आधी त्यांच्या मधून वाट काढत, मग जागोजागी उभ्या असलेल्या धुवट रंगाच्या ग्रीक, रोमन पुतळ्यांना बाजूला ठेऊन प्रदर्शनाच्या दालनात प्रवेश केला तर नजरेत भरली ती रंगांची उधळण. स्वागताला दारात बिदर मधल्या महंमद गवानच्या मदरश्याच्या भींतीची उंच प्रतिकृती उभी होती -विटकरी पार्श्वभूमीवर गडद निळ्या रंगाचं नक्षीकाम असलेली .

तिला वळसा घालून आत गेले तर समोरच्या भिंतीवर एक मोठ्ठा फोटो होता: दक्खनमधील एका हिरव्यागार टेकडीचा. गर्द हिरव्या झाडीतुन पडझड झालेल्या किल्ल्याचे भग्न काळपट अवशेष डोकावत होते. आणि फोटोतल्या किल्ल्याच्या माथ्यावर  ठळक अक्षरात शीर्षक लिहलं होतं -  AHAMADNAGAR. 

घरातून निघताना आज म्युझियममध्ये अचानक आपलं महाराष्ट्रीय अहमदनगर समोर येईल असं वाटलं नव्हतं.

हे अशा तर्हेचे क्षण असतात ना ते काही वेगळेच असतात. म्हणजे माझ्यासाठी तरी. आपल्या भोवती गजबजलेलं अमेरिकन शहर असतं. त्याच्या मध्ये आपण असतो. आपली रोजची दिनचर्या, मानसिकता अर्थातच त्या वातावरणाशी आणि त्या शहराशी निगडीत असते. मध्येच कधीतरी एक पोस्टकार्ड येतं. म्युझियम तर्फे. अमुक एक प्रदर्शन आहे. बघायला या.

तरीही प्रदर्शनाचं नुसतं नांव वाचून मी धावत पळत ते बघायला गेले नसते. तेवढं काही सोळाव्या शतकातील सुलतानांच्याबद्दल मला कुतुहूल नव्हतं. पण त्या पोस्टकार्डवरच चित्र इतकं मोहक होतं कि नांवापेक्षाहि ते चित्र आणि त्यातले रंग बघून उत्सुकतेपोटी मी ज्या दिवशी प्रदर्शन सभासदांसाठी उघडलं त्या दिवशी सकाळीच तिथे जाऊन पोहोचले - फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणतात तसं.पोस्टकार्डवरचं हे चित्र आणि त्यातले रंग मला इतके आवडले कि चित्रकारानी पक्षी झाडाच्या आणि खाली बांधलेल्या मेंढ्याच्या मानानं मोठा का काढला असावा हा प्रश्न माझ्या मनात डोकावलाही नाही. पण प्रदर्शनात त्या प्रश्नाचं उत्तर दयायचा प्रयत्न करण्यात आला. जगदीश आणि कमला मित्तल म्युझियम ऑफ इंडियन आर्ट, हैद्राबाद मध्ये हे मूळ चित्र आहे.


त्या  प्रदर्शनाच्या निमित्ताने एक जाडजूड ग्रंथवजा कॅटलॉग म्युझियम तर्फे प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार दक्खनच्या सुलतानांची थोडक्यात पार्श्वभूमी अशी: तेरा ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान मध्य आशियावर झालेल्या मोंगोल सैन्याच्या आक्रमणामुळे तेथुन विस्थापित झालेले निर्वासित भारतात येऊन पोहोचले. दहा ते तेराव्या शतकाच्या दरम्यान मध्य अशिया आणि इराण मध्ये चालू असलेल्या सांकृतिक आणि साहित्यिक पुनरुथ्थानाच्या दरम्यान वाढलेल्या ह्या विस्थापितांनी त्या प्रभावाखाली फोफावलेली अतिशय विकसित आणि सर्वसमावेशक अशी पर्शियन संस्कृती आपल्या बरोबर आणली. ती संस्कृती उत्तर भारतात रुजली.

चौदाव्या शतकाच्या सुरवातीला दिल्लीच्या सुलतानशाहिनी जेंव्हा दख्खनवर आक्रमण केलं तेंव्हा त्यांच्या सैन्याबरोबर आलेले स्थलांतरित दौलताबादला - दख्खनच्या वायव्य परिसरात स्थिरावले. दिल्लीच्या हुकूमशाही राजवटीला कंटाळलेल्या ह्या स्थलांतरितांनी १३४७मध्ये दिल्लीच्या तख्ताशी बंडखोरी केली आणि स्वतंत्र बहामनी राजवटीची (१३४७-१५३८) स्थापना केली.

सोळाव्या शतकाच्या मध्यावर बहामनी राजवटीचा ऱ्हास झाला आणि त्यातून पाच छोटी राज्ये उभी राहिली - बिदर, अहमदनगर, बेरार, विजापूर आणि गोळकोंडा. त्यातलं पहिलं म्हणजे अहमदनगरची निजामशाही. अहमदनगर पुढे सर्व प्रकारच्या कलांचं दख्खन मधील एक प्रमुख आश्रयस्थान बनलं.

हयापैकी काही ठळक नावं - आदिल शाही, निजाम शाही वगैरे शाळेत शिकलेल्या इतिहासात कानावरून गेली होती पण इतर बरीचशी माहिती मला नवीन होती. कॅटलॉगमधील एका लेखात म्हंटलंय कि सोळाव्या शतकाच्या सुरवातीचा अहमदनगरचा पंतप्रधान मलिक अंबर हा अफ्रिकन होता आणि त्याच्या सैन्यात पूर्व आफ्रिकेतून आणलेले दहा हजार इथिओपियन गुलाम -सैनिक (हबशी) होते ज्यांचा पुढे त्या राज्यातील कला आणि वास्तुशास्त्रावर प्रभाव पडला.

कॅटलॉग खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण आहे. त्यात प्रदर्शनातली चित्र, कारागिरीच्या वस्तूंचे फोटो आणि त्या अनुषंगाने सविस्तर लेख तर आहेतच पण दख्खनमध्ये दूरवर पसरलेल्या सुलतानकालीन वास्तूंचे अतिशय आकर्षक फोटोहि आहेत. सगळे फोटो बहुदा पावसाळ्यात काढलेले असावेत. इतर मोसमात दख्खन इतकं हिरवगार दिसत असेल असं वाटत नाही.
                                                                     Birds in a Silver River, probably Aurangabad, late 17th centuryपाश्चिमात्य देशात म्युझियम्सना फार महत्व दिलं जातं. इतिहास सुरक्षित, जतन करून ठेवला जातो. आपल्या काही ऐतिहासिक  वास्तूंची दुर्दशा बघितली कि वाटतं आपण इतिहासाला पायदळी तुडवतो.

११ सप्टेंबर २००१ ला मी न्यूयॉर्कमध्येच होते. त्यादिवशी सकाळी वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या दोन्ही इमारतींवर हल्ला झाला. पूढे कित्यके दिवस, आठवडे, महिने त्या घटनेचं सावट शहरावर पसरलय असं वाटलं.

एक तर दोन इमारतींचे मिळून दोनशे वीस मजले कोसळेल. बाजूच्या काही इमारतीही पडल्या. त्या धूर -धुरळयाचा जाड थर त्याभागात सगळीकडे पसरला. जवळपास तीन हजार मानवी देहांचे अवशेष त्या इमरतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

बातम्या वाचून असं वाटायचं कि अनेक आघाडयांवर मदत कार्य चालू आहे आणि सगळे त्याच कामात गुंतलेत. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले देहांचे अवशेष शोधायचे. त्यांची ओळख पटवून ते नातेवाईकांकडे सुपूर्द करायचे. इमारतींचे  उरलेले भाग तिथून हलवायचे. त्या परिसराची साफसफाई करायची. तिथे रहाणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांचं दैंनदिन आयुष्य लवकरात लवकर पूर्ववत सुरु करून दयायचं. ज्या लोंकाना त्यांच्या नातेवाईकांचा शोध लागला नसेल त्यांना मदत करायची. अशा अनेक कामात सरकारी यंत्रणा तेंव्हा व्यस्त वाटत होती.

त्या घटनेला आता पंधरा वर्ष झाली. पंधरा वर्षानंतर तिथे काय दिसतं?

जिथे त्या दोन मुख्य इमारती उभा होत्या त्यांच्या जागी आता पाण्याची मोठी कुंड आहेत. त्या प्रत्येकी ११० मजली इमारतींची आठवण म्हणून जवळच एक १०२ मजली मनोरा बांधलाय. त्या मनोऱ्याच्या तळघरात म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये ११ सप्टेंबर २००१ला वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या परिसरात जे काही घडलं ते लोकांच्या डोळ्यासमोर उभं कऱण्यात आलय.

प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंमध्ये नामशेष झालेल्या इमारतीचे अवशेष, पडलेल्या भिंतींचे तुकडे, लोखंडी तुळया आहेत. कुठल्या इमारतीच्या कुठल्या भिंतीचा तो भाग आहे ह्याची माहिती आहे. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विमानांचे अवशेषहि आहेत. आणि अर्थात त्या हल्ल्यात जे बळी पडले त्या लोकांचे फोटो आणि त्यांना श्रद्धांजली तर आहेच.

आमच्या सारखे जे त्यादिवशी न्यूयॉर्कमध्ये होते आणि ज्यांनी ते सगळं प्रत्यक्ष अनुभवलं त्यांची त्या दिवसाची आठवण अजून ताजी आहे. ते म्युझियम बघताना मला सारखं आश्चर्य वाटत होतं कि  ९/११ च्या त्या प्रचंड धक्कादायक आघाता नंतर लगेचच  ते सगळे अवशेष कसे काय नीट जतन करून ठेवण्यात आले असतील  - इतके नीट कि कुठल्या इमारतीच्या कुठल्या भिंतीचा हा भाग आहे आणि कुठल्या विमनाचं हे कुठलं चाक आहे हि सर्व माहिती त्या म्युझियमला भेट देणाऱ्या अनेक भावी पिढ्यांना  वर्षानुवर्षांनंतरहि समजू शकेल.

अर्थातच ते म्युझियम बघायला आणि टॉवरच्या १०२व्या मजल्यावर जायला भरपूर फी आकारण्यात येते. इतिहास फुकट बघायला मिळतो असं नाही. तो जतन करणंही स्वस्त नसावं. कारण अमेरिकेत कुठल्याच म्युझियमची तिकिटं स्वस्त नसतात. पण पुस्तकातला इतिहास जितका कंटाळवाणा वाटतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी तो अशा चांगल्या म्युझियम मध्ये जिवंत होऊन आपल्या समोर यतो.

आणि त्यापासून आपल्याला उपयुक्त माहिती मिळू शकते. केवळ आपल्या शहराबद्दल, राज्याबद्दल किंवा देशाबद्दलच नाही तर कधीकधी आपल्या स्वतःबद्दलही. जशी मला अचानक, ध्यानीमनी नसताना दख्खनवरील प्रदर्शनात मिळाली.Jahangir Shoots the Head of Malik Ambar, Mughal, ca. 1616सुलतानांवरील कॅटलॉगच्या अकराव्या पानावर रिचर्ड  इटन ह्यांच्या लेखात म्हंटलंय, ".... Another prominent group attracted to military service in the sultanates was that of the Marathas, the indigenous warrior clans of the western plateau. आणि त्यानंतर काही वाक्य सोडून... In a pattern stretching back to the Bahamani era, Maratha Deshmukhs, the hereditary territorial chiefs in the western countryside, not only collected revenue and adjudicated disputes, but they also raised troops and made them available to sultans, who in turn formalized the chief's rights to specified lands, indeed many Maratha clans rose to prominence in tandem with the sultanates."

I am Maratha Deshmukh. माहेरची मी मराठा देशमुख. माझ्या माहितीतली मराठा देशमुख मंडळी म्युझियम्सच्या जवळपास फारशी फिरकत नाहीत. त्यामुळे मेट्रोपोलिटन म्युझियमच्या त्या अत्यंत आर्टसी, फॅन्सी कॅटलॉग मध्ये आमचा उल्लेख वाचून प्रथम आश्चर्य वाटलं. पण ती माहिती मोलाचीही वाटली.

मुंबई बाहेरच्या एका लहानशा खेडयात माझ्या आज्जी -आजोबांचं छान घर होतं. साधंसं पण प्रशस्त.  दोन मजली. खेड्यामधले घर कौलारू टाईप. घरापुढे अंगण. अंगणात शेवगा, आंब्याची झाडं. मागे ओसरी. तिथे पारिजातक होता.  खळ्यात गवताचे भारे रचलेले असायचे, तिथे जांभळाचं झाड होतं. खळ्याला लागून गोठा होता त्यात राजा, सरजा नावाचे बैल असायचे. बैलगाडी उभी असायची. जवळच खुराड्यात आज्जीच्या कोंबड्या बागडत असायच्या. खुरड्यावरून पुढे चालत गेलं कि मोठ्ठी हिरव्या पाण्याची विहीर होती. तिच्या भोवती चिकूची झाडं होती. कंट्री लीव्हिंग सारख्या डिझाईनच्या चकचकीत मासिकात शोभून दिसेल असा सगळा पसारा होता - अगदी घरातली टेराकोटाची लाल फरशी आणि माडीवरच्या लाकडी जमिनी सकट.

लहानपणी सुट्टीत गावी गेलं कि माझे आवडीचे उद्योग असायचे -  सकाळी उठल्यावर खुराड्यात जाऊन नाश्त्यासाठी अंडी गोळा करायची. भाताच्या कोंड्यात हात घालून अंडी शोधायला फार मजा यायची. पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. पूजेसाठी ती फुलं वेचून आणायची. दुपारी जेवण झालं कि दिवाणखान्याच्या मागच्या पेरूच्या झाडावर चढुन बसायचं.

दुपारी उशिरा पाणेरी यायची. तिचं नाव मला वाटतं पार्वती पण ती विहिरीवरून पाणी भरून आणायची म्हणून पाणेरी. ती धुणं धुवायला विहिरीवर घेऊन जायची. मी तिच्या मागे जाऊन जवळ दगडावर बसून तिचं कपडे धुणं न्याहाळत असे - आजची मुलं आयपॅडच्या स्क्रीनकडे बघतात त्याच तन्मयतेनी. आजोबांचं धोतर ती दोन -तीनदा निळाच्या पाण्यात बुचकळून काढायची. मग तितक्याच वेळा त्याच्या बारीक निऱ्या करून ते घट्ट पिळायची. ती अशिक्षित आदिवासी स्त्री होती, पण धोतर धुण्याची तिची एक ठरलेली पद्धत आहे आणि त्याला एक लय आहे असं मला ते बघताना वाटायचं.

आता ते घर तिथे नाही. त्या घराचा फोटोही माझ्याकडे नाही. आपण जसे आपल्या राष्ट्रीय वास्तू जतन करण्याच्या बाबतीत उदासीन तसेच बहुधा आपल्या कौटुंबिक वास्तूंच्या बाबतीतही. त्या घराच्या रम्य आठवणी भरपूर आहेत.

ते खेडं वडिलांच्या  पूर्वजांना इनाम म्हणून मिळालंय हे मला ऐकून माहित होतं. पण मी नेहमी असं धरून चालले कि एखादया मराठा राजाकडून मिळालेलं ते इनाम असावं. कॅटलॉग मधली माहित वाचल्यावर वाटलं -  ते गांव कुठल्यातरी सुलतानाकडून आमच्या पूर्वजांना इनाम मिळालं होतं? खरंच?All images of paintings in this post are from postcards I bought at the Metyesheeandmommy@gmail.com

No comments:

Post a Comment