Tuesday, July 18, 2017

मुंबई पुराण                                     
जून मध्ये मुंबईत दोन नविन सिनेमा लागले. त्यांच्याविषयी वाचल्यावर दोन्ही बघावेसे वाटले. मुरांबा मिळाला बघायला - वांद्र्याच्या एका छोट्या थिएटर मध्ये - इंग्रजी सबटायटल सहीत. मुलालाही तो आवडला. चि. व चि. सौ. का. बघायचा राहिला. पण त्या निमित्तानं चि. म्हणजे काय आणि चि. सौ. कां. म्हणजे काय ह्याचा अर्थ तरी चिरंजीवांना जाणून घ्यावासा वाटला.   

जगात फक्त एकच ठिकाण आहे जिथला वडा-पाव मला आवडतो. दुसरीकडे कुठेही मी वडा-पाव खात नाही. अगदी मुंबईतही इतरत्र कुठेही नाही. पण त्या एका ठिकाणचा - खुप पूर्वी आम्ही दादरला किर्ती कॉलेजच्या जवळ राहायचो त्या गल्लीतला वडा-पाव मला आवडतो. मुंबईला गेल्यावर एकदा तरी मी तो खाते. तो वडेवालाही मला ओळखतो. म्हणजे मला नाही ओळखत. तेंव्हा मी कधी त्याच्या दुकानात जात नसे. कुठल्या दुकानात मुलींनी जायचं आणि कुठल्या दुकानात नाही ह्याविषयी आमच्या आईचे काही मालवणी/मराठा जुने -पुराणे, तिच्या बालपणापासून चालत आलेले कडक नियम होते. त्यानुसार संध्याकाळी कधीतरी वडा-पाव घरी घेऊन यायचं काम भावाचं होतं. तर त्याची बहीण म्हणून तो वडेवाला आजही इतक्या वर्षांनंतर मला ओळखतो आणि विचारतो,  "तू देशमुखची बहीण ना".  

हे आणि अशीच काही कारणं आहेत - नेमेचि येतो पावसाळा तशी नेमेचि मी मुंबईला जाण्याची. 

एप्रिल मधल्या "त्या" प्रकरणानंतर युनायटेड मध्ये अपण जरा भीतभीतच चढतो. आत काय वाढून ठेवलय कोण जाणे अशी धास्ती मनात असते. पण जातानाचं त्यांचं लॅम्ब रोगन जोश कुठल्याही चांगल्या भारतीय रेस्टोरंट मधल्या रोगन जोशच्या तोडीचं होतं. (येतानाचे लॅम्ब चॉप्स खास नव्हते). पूर्वी त्यांच मटण - मासे संपायला आले कि एखादी हवाई सुंदरी लगबगीनं येऊन मला विचारायची, "चिकन संपायला आलंय. त्या ऐवजी तु शाकाहारी घेतेस का?" (संपायला आलंय म्हणजे काय? अजून संपलं तर नाही ना - असा प्रश्न तेंव्हा माझ्या मनात यायचा). ह्यावेळी मला कोणी तसं विचारलं नाही. प्रवाशांशी थोडं सौजन्यानी वागायचं ठरवलंय कि काय त्यांनी कुणास ठाऊक. 

परत येताना विमानात ऐ दिल है मुश्किल बघितला. बघावासा वाटत नव्हता तरी बघितला. सिनेमा वाईट नाही. चांगला आहे असही नाही. पण हॅलो जिंदगी इतका बेकार तर नक्कीच नाही. हॅलो जिंदगी मध्ये अलिया भट्टला मुंबई कि दिल्लीतील सुपर मार्केट च्या शेल्फ वर रागू ह्या अमेरिकन ब्रॅण्डच्या पास्ता सॉसच्या बाटल्या बघून कामासाठी न्यूयॉर्कला गेलेला तिचा मित्र रघुची आठवण होते. आणि ती रागू रागू म्हणत रहाते. सुरवाती पासून तो सिनेमा जो घसरत जातो तो शाहरुख खान पडदयावर आल्यावर थेट गोव्यातल्या समुद्राच्या लाटांशी कबड्डी खेळायला जाऊन पोहोचतो. ऐ दिल है मुश्किलची परस्थिती तेवढी वाईट नाही. मी करणं जोहरचे सगळे सिनेमा बघितलेले नाहीत. पण त्याचे जे दोन -चार सिनेमे बघितलेत- कभी ख़ुशी कभी ग़म, कभी अलविदा ना कहना - त्यावरून त्याचा फॉर्म्युला माझ्या लक्षात आलाय असं वाटतं. 

एकदा कुठल्यातरी कार्यक्रमात फराह खान त्याला म्हणाली होती कि  - तू  एन आर आय लोकांसाठी- भारताबाहेर रहाणाऱ्या भारतीयांसाठी सिनेमा बनवतोस". ते अर्थातच त्यानं पूर्णपणे नाकारलं नाही. त्यात तो वेगळं काही करतोय असंही नाही. हिंदी सिनेमाला पुढच्या पिढीत नेतोय एवढंच. जुन्या हिंदी सिनेमात व्हिलन असायचे. सिनेमाच्या शेवटी इंपोर्टेड गाड्यांमधून व्हिलनचा पाठलाग व्हायचा. गावाबाहेर हिरो आणि व्हिलन मध्ये खोट खोट ढिश्यूम ढिश्यूम व्हायचं आणि शेवट गोड व्हायचा. हल्लीच्या सिनेमात व्हिलन नसतो. त्याऐवजी डी जे असतात. ते क्लब मध्ये गाणी लावतात. आणि ते डीजेवालेबाबू क्लबमध्ये गाणी लावत म्हणे जगभर फिरु शकतात. ते सगळं जगच आपल्याला अपिरिचित वाटतं. पूर्वीपासूनच हिंदी सिनेमात नेहमी सभोवतालच्या समाजाचं अवास्तव, काल्पनिक चित्रण असायचं. हिंदी सिनेमा बघितलेल्या एका तरुण आफ्रिकन टॅक्सी
ड्रायव्हरनी न्यूयॉर्कमध्ये एकदा मला विचारलं होतं -"सिनेमात दाखवतात तसं तुमच्याकडे छान छान कपडे घालून लोक सारखे नाचत असतात का? ज्या काळात आलिशान बंगले, लांबच्या लांब परदेशी गाड्या भारतातल्या सर्वसामान्य जनतेला स्वप्नातही बघण शक्य नव्हतं तेंव्हा हिंदी सिनेमावाले नियमितपणे त्यांना ते जग पडद्यावर दाखवायचे. भारतीय मंडळी मोठ्या प्रमाणात परदेशात जाऊन रहायला लागली तेंव्हा आता तोच फॉर्म्युला जोहर सारख्यांनी परदेशात नेलाय.                                        ऐ दिल है मुश्किल हा त्यापैकीच एक. चित्रपटाचं कथानक लंडन मध्ये घडतं. सुरवातीलाच स्पष्ट करण्यात येतं कि हिरो आणि हिरॉईन बऱ्यापैकी श्रीमंत घरातून आलेले आहेत. तू फर्स्ट क्लास श्रीमंत आहेस कि प्रायव्हेट जेट श्रीमंत असा प्रश्न अनुष्का शर्मा पहिल्या भेटीतच रणबीर कपूरला विचारते आणि तो म्हणतो कि प्रायव्हेट जेट श्रीमंत. त्यामुळे लंडन मध्ये ते दोघं काही काम धंदा न करता नुसतीच मजा कशी काय करू शकतात अशी शंका प्रेक्षकांच्या मनात यायच्या आधीच तिचं निरसन होतं. थोड्या वेळानी ऐश्वर्या राय पडद्यावर येते. ती व्हिएन्नात रहात असते. तिथे ती फॅशनेबल लांब /तोकडे कपडे आणि उंच बूट घालून उर्दू शायरी करते (जणू उमराव जानची करण जोहर आवृत्ती). तिच्या शायरीच्या वाचनाला खोली भरून तिच्या सारख्याच बायका उपस्थित असतात. मी कधी व्हिएन्नात शायरी वाचन ऐकायला गेले नाही त्यामुळे खरोखर तसं घडू शकतं का ह्याची मला कल्पना नाही. 

चित्रपटाचा शेवट दुसऱ्या कुठल्यातरी कादंबरीतून किंवा सिनेमातून आणून ह्या सिनेमाला जोडलाय असं वाटतं. कथानक कितीही अवास्तव वाटलं तरी ते पडद्यावर आकर्षक रित्या मांडण्यात जोहरची हातोटी आहे. त्याच्या सिनेमात बरेचदा गाणीही  चांगली असतात. सढळ बजेट मुळे हे संभव होत असेल.  

ऐ दिल है मुश्किल बघायची माझी फारशी इच्छा नव्हती कारण त्याच्या रिलीज वरून मुंबईत बरंच वादळ उठलं होतं. ते नंतर शमलं. पण शहरात खाली भासणाऱ्या शांतेतेच्या वरती वादळाचे अदृश्य ढग तर जमलेले नाहीत ना असं मला ह्यावेळी उगीचच वाटलं. पावसाळ्यात नैऋत्य मोसमी वारे घेऊन येतात त्या वादळाकडे माझा रोख अर्थातच नाही.  

एकतर मेट्रोचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी खोदून ठेवलंय. जरा पाय घसरला तर खड्ड्यात पडू हे रोजच्या दुकानात जातानाही सतत लक्षात ठेवावं लागतंय. अनेक प्रमुख रस्त्यांची एक लेन त्या कामासाठी बंद आहे. त्याचा ट्रॅफिकवर परिणाम नाही झाला तरच नवल. न्यूयॉर्क मधलं सेकंड ऍव्हेन्यूच्या सबवेचं काम ज्यांनी नुकतंच अनुभवलय त्यांना हि बांधकामाची अडचण किती वर्ष चालू शकते ह्याची कल्पना आहे. त्यात अनेक ठिकाणी उंचच उंच इमारती बांधायचं काम चालू आहे. त्यामुळे शहरातली मोकळी जागा आटली आहे आणि माणसांची गर्दी तेवढीच आहे किंवा कदाचित वाढते आहे. आणि ह्या आटलेल्या, आखडलेल्या जागेत मुंबईच्या मूळच्या आणि वाढत्या गर्दीची मग काळजी वाटायला लागते. 

तशी काही जुनी आश्रयस्थानं अजून टिकून आहेत. त्यातलच एक - शिवाजी पार्क. अजून तरी त्याची घडी विस्कटलेली नाही. जसं ते वीस वर्षांपूर्वी होतं त्याचीच सुधारलेली आवृत्ती आजही आहे. वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांचं संध्याकाळी जमण्याचं ते आवडीचं ठिकाणं आहे. तिथे नेहमी जमणारे ग्रुप पावसातही पार्क पासून लांब राहू शकत नाहीत. मुंबईचा पाऊस हातोडीनी खिळे ठोकावेत तसा धरतीला ठोकतो. पावसाळ्यात अचानक कधीही तो ठोकायला सुरुवात करतो. तरीही दोन सरींच्या मध्ये संधी साधून, छत्र्या बित्र्यांच्या तयारीनिशी नेहमीचे ग्रुप तिथे जमतच असतात. वयोगट काहीही असो बायकांचे ग्रुप वेगळे, पुरुषांचे वेगळे. त्यातही काही बदल नाही. फक्त गप्पांचे विषय बदलले असावेत. आपण जर पार्क भोवती फेऱ्या मारल्या तर - मी आत्ताच तिथून परत आले, मुलगा आता डिसेंबरमध्ये येईल, तुम्ही पुढच्या आठवड्यात चाललाय का असली वाक्य कानावर पडतात.  


प्रभादेवीत मात्र काय चाललंय समजत नाही. एकीकडे जुन्या चाळी पाडून नवीन उंच इमारती बांधण्याचं काम चालू आहे. तर नवीन येणाऱ्या अत्याधुनिक इमारतींच्या जवळच भर रस्त्यात मध्येच एखादा गोठा उभा आहे. आमच्या घराकडे जायच्या नेहमीच्या रस्त्यावर मध्येच भर रस्त्यातच पाच- दहा गायी आणि त्यांची बछडी बांधलेली असतात. शेणाची घाण असते, वास येत असतो. रस्त्यातल्या गोठयाजवळच थोड्याशा अंतरावर रोज दुपारी पाच- सात  फेरीवाले खाद्यपदार्थ विकायला जमतात. त्यांच्या भोवती ते चटक मटक पदार्थ आवडीनं खाणाऱ्या मंडळींची कोंडाळी उभी रहातात. ज्या ठिकाणी नगरपालिकेने किंवा स्थानिक उद्योजकांनी निगा राखून छोट्याशा त्रिकोणात सुंदर बाग करायला हवी, तो त्रिकोण ह्या अतिक्रमणामुळे कुरूप दिसू लागतो.  

म्हणजे दीपिका पदुकोण जिथे राहते तो रस्ता चांगला रुंद, स्वच्छ. त्या ररस्त्यावर परदेशी गाड्यांच्या शोरूम्स, फुटपाथवर कोणाचं अतिक्रमण नाही. आणि त्या रस्त्यावरून थोडंसं उजवीकडे वळलं कि गल्लीत लगेच गोठा आणि फेरीवाले. असं का? पूर्वी आमच्या घराजवळ एखाद दुसरी गाय फिरताना दिसायची. पण भर रस्त्यात गोठा मी आत्ताच बघितला. शहरात ह्याविषयी काही नविन कायदे-कानून झालेत का? परवानगी मिळत असेल तर प्रभादेवीत आपापल्या दारात स्वतःच्या एक -दोन गायी  किंवा कोंबड्या पाळायला कोणाला आवडणार नाही. मलाही आवडेल.     


ऐ दिल है मुश्किल जितका अवास्तव आहे तितकाच मसाण वास्तववादी वाटला. त्यातलं रिचा छ्ड्डाचं काम चांगलं आहे. मसाण बघण्याआधी तिचं नावं मी बॉलिवूड संबंधी बातम्यांमध्ये वाचलं होतं. हिंदी सिनेमात ज्या अनेक शोभेच्या बाहुल्या आहेत त्यातलीच तीही एक असेल अशी माझी समजूत होती. पण मसाण मधल्या तिच्या कामात स्मिता पाटीलचा भास झाला. 

काही सिनेमा चांगले आहेत असं ऐकूनही घरी किंवा थिएटर मध्ये जाऊन बघावेसे वाटत नाहीत. त्यातल्या विषयाचं खूप ओझं होईल असं वाटतं. पण पंधरा तासांच्या प्रवासात, तीस हज्जार फूट उंचीवर, सहप्रवाशांच्या संगतीत- जेवत, झोपत बघताना ते ओझं तेवढं जाणवत नाही. मँचेस्टर बाय द सी मध्ये एका तरुण बापाचं घर आगीत जळून भस्मसात होतं. घराबरोबरच त्याची तीन लहान मुलंही. ती आग त्याच्या निष्काळजीपणा मुळे लागली असावी असं त्याला वाटतं. त्या अपराधी भावनेचं ओझं घेऊन जगण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या भावाचं निधन होतं आणि हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या पुतण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. २०१६ च्या सर्वोतृष्ट सिनेमात ह्या सिनेमाची गणना का झाली असावी हे सिनेमा बघितल्यावर कळतं. त्यातल्या मुख्य अभिनेत्याचा अभिनय आणि सिनेमाचं दिग्दर्शन कथेत एवढं दुःख भरलेलं असुनही सिनेमा दुःखी किंवा भडक होऊ देत नाही.  
  


                                          शिवाजी पार्क वीस -तीस वर्षांपूर्वी जसं होतं बहुतांशी तसंच आजही असलं तरी बाकीची मुंबई बरीच बदलेली आहे. न्यूयॉर्कला पहिल्यांदा आले तेंव्हा मला मुंबई आणि न्यूयॉर्क मध्ये खूप साम्य आहे असं वाटलं होतं. अनेक बाबतीत दोघांमध्ये जमिन- अस्मानाचा फरक असला तरी शेवटी दोन्ही शहरं आपापल्या देशांच्या आर्थिक राजधान्या आहेत. त्यांच्यातल्या ऊर्जेत काहीतरी साधर्म्य भासण तसं अपरिहार्य आहे. 

आता शहरात वाढलेली गर्दी आणि गडबड बघितली कि असं वाटतं - मुंबईला कधी प्रश्न पडत असेल का कि आपण कोण आहोत. देशातील दोन मोठ्या इंडस्ट्रीजनी - फायनॅन्स आणि फिल्म - तिच्या लहानशा बेटात घर केलंय. हे म्हणजे मॅनहॅटनच्या डाऊन टाऊन मध्ये वॉल स्ट्रीट आणि अपटाऊन मध्ये हॉलिवूड कोंबण्यासारखं झालं. सर्वसाधारणपणे सारख्याच महत्वाची असली तरी न्यूयॉर्क आणि लॉस अँजेलिस ह्या दोन शहरात काही साम्य आहे असा दावा कोणीच करणार नाही. हि दोन्ही शहरं एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत. मुंबईला कधी प्रश्न पडत असेल कि आपण न्यूयॉर्क आहोत कि लॉस अँजेलिस. आपली संस्कृती, शहराचे ethos हे उत्तरेला वर्चस्व असलेल्या मनोरंजनाच्या दुनियेचे आहेत कि दक्षिणेवर राज्य करणाऱ्या अर्थकारणाच्या दुनियेचे. कि झपाट्यानी बदलणाऱ्या ह्या दोन बलशाही टोकांच्या मध्ये नेटानी शहराचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्यम वर्गीय दादर -शिवाजी पार्कच्या दुनियेचे. 

गेली काही दशकं - बहुदा फाळणी पासुन - ह्या दोन इंडस्ट्री ह्या शहरात एकत्र नांदल्यात तसंच भविष्यातही चालू राहू शकेल का? का बदलत्या मुंबईतला गोंधळ कमी करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतील. काही उपाय योजना करावी लागेल. बॉलीवूडला मुंबईच्या बाहेर हलवणे हा मुंबईतली वाढती गर्दी कमी करण्यावर तोडगा होऊ शकेल का? 

बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमे बनतात. तसं बघायला गेलं तर मुंबईत किती लोक चांगलं हिंदी बोलतात? गगनचुंबी इमारतीतले शेजारी, मॉल मधल्या दुकानातले विक्रेते, कोपऱ्यावरच्या कॉफी शॉप्स मधले कर्मचारी आणि ग्राहक आपसात इंग्रजी बोलताना ऐकले कि इंग्रजीच आता मुंबईची बोलीभाषा - lingua franca झालीय असं वाटू लागतं. काही ठिकाणी थोडंफार मराठी शिल्लक असेल तेवढच.  वांद्रा - जुहू ह्या बॉलिवूडच्या परिसरातहि हिंदी कितपत बोललं जातं कुणास ठाऊक. 

आपसात मिळून मिसळून रहाणं ही आपली परंपरा असेलही - मग ते माणसं आणि जनावरांचं एकाच ठिकाणी वावरणं असो, किंवा मर्यादित जागेत दोन मोठ्या इंडस्ट्रीज ना एकत्र ठेवणं असो - गर्दी, गडबड, गोंधळाची आपल्याला सवय होऊन बसलीय. पण मुंबईत आता जे बदल होतायत ते तर सगळे परदेशातून आलेले आहेत. चाळीस - पन्नास मजली इमारती, मोठ्ठे मॉल्स, त्यातली दुकानं - त्यात भारतीय काहीच नाही. त्या बदलांच्या अनुषंगाने शहरातील इतर जुन्या परंपरा पूर्वी सारख्याच चालू राहू शकतील? कि गर्दी, गोंधळ कमी करण्यासाठी काही बदल करावे लागण्याची शक्यता आहे. आज अनेक गोष्टींमध्ये मध्ये आपण सर्रास अमेरिकेचं अनुकरण करतो. अमेरिकेत हॉलिवूड देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लॉस अँजेलिस मध्ये आणि वॉल स्ट्रीट विरुद्ध दिशेला पूर्व किनाऱ्यावर न्यूयॉर्कमध्ये आहे. मग ह्या बाबतीत आपण त्यांचं अनुकरण का करू नये.

अर्थात हे बदल काही एक -दोन वर्षात घडून येऊ शकणार नाहीत. पण त्या दृष्टीने विचार करायला सुरवात करण्याची वेळ आली असेल का? उदाहरणार्थ शहरातील अर्थव्यवथा आणि नोकऱ्या किती प्रमाणात बॉलिवूडवर अवलंबून आहेत. समजा जर बॉलिवूड नसेल तर तिथून मिळणाऱ्या उत्पन्नाला आणि नोकऱ्यांना पर्याय म्हणून शहरात पर्यटनाचा विकास होऊ शकेल का. दरवर्षी साधारण ६० मिलियन पर्यटक न्यूयॉर्क शहराला भेट देतात - देशातून आणि परदेशातून. जगातील सगळ्या पर्यटकांच्या मध्ये एक गुण फार चांगला असतो तो म्हणजे ते येतात,मौज - मजा करतात, पैसे खर्च करतात आणि आपापल्या गावी परत जातात. शहरात कायमचं रहात नाहीत.   

आणि ज्या तऱ्हेने हिंदी सिनेमावाले हल्ली परदेशी जायला लागलेत (IIFA in NY?) कुणी सांगावं बॉलिवूडकर मंडळी खुषीत बॉलीवूडला मुंबईच्या बाहेर न्यायला तयार असतील. कुठे बरं जाऊ शकतील ते - How about कतार? किंवा दुबई. नावातही किती साम्य दोन्ही शहरांच्या. फक्त पहिलं अक्षरच तेवढं वेगळं. नावामुळे मुंबई -दुबई बहिणी बहिणीचं वाटतात.   
yesheeandmommy@gmail.com 
No comments:

Post a Comment