Friday, October 12, 2018

माझं सुध्दा


काल पुन्हा ती स्वप्नात आली.

असंबध्द काहीतरी बरळत होती;  "एखादं सिनेमा / नाटक  आपलं निखळ मनोरंजन करतं ,  तर एखादं  आपल्याला खूप विचार करायला लावततं.  श्रेष्ठ कलाकृती कुठली जी निव्वळ मनोरंजन करते ती,  जी खूप हसवते ती,  जी खूप रडवते ती,  जी खूप घाबरवते ती,   कि जी खूप विचार करायला लावते ती.  आणि जर एखाद्य कलाकृतीनी या सगळ्या भावना आपल्या मनात एकाच वेळी जागृत केल्या तर... तर त्या कलाकृतीला काय म्हणायचं?"

वाटलं,  हिला काय झालं असलं विचित्र काहीतरी बडबडायला.  तिला विचारलं काय झालं तर ती एकदम रडायला लागली. ओक्सबोक्शी रडली, रड रड रडली बिचारी.  मी ही रडू दिलं.  दुसरं करणार तरी काय.  अधून  मधून येते ती स्वप्नात.  मनात काहीतरी सलत असेल तर मन मोकळं करायला येते.  वाटलं त्यातलाच काहीतरी प्रकार असावा. मी गप्प बसून राहिले.

थोडी शांत झाल्यावर नाक,  डोळे पुसत म्हणाली,  "इज्जत लुटली माझी,  बरबाद केलं मला".

"कोणी?"

"त्या नाटकानं."

"कुठलं नाटक?"

"तेच सध्या चालू आहे ते.  ब्युटी अँड द बीस्ट."

"म्हणजे"?

"एवढं सुद्धा इंग्रजी समजत नाही तुला?  ब्युटी अँड द बीस्ट म्हणजे सुंदरी आणि श्वापद.  प्रयोग चालू आहेत सध्या त्याचे माझ्या इथे?"

"पण त्यावरून तुला एवढं रडायला काय झालं"?

तिच्या आवाजात दुःख, वेदना, क्रोध, काळजी, भीती सगळंच होतं.   म्हणाली,  "त्या नाटकाचं काही नाही गं.  तुला माहित आहे मी पहिल्या पासून किती मोकळ्या मनाची आहे ते.  पण त्यावरून जे वादळ उठलंय ना त्याचा फार त्रास होतोय बघ.  पूर्वी कसं होतं,  एखादी गोष्ट आक्षेपार्ह वाटली की जा कोर्टात आणि मग कोर्टाला ठरवू दे कोणाला शिक्षा करायची कि नाही, कोणावर बंदी आणायची कि नाही ते.  आता कोर्ट राहिलं बाजूला आणि टीव्हीवाल्यांचाच आरडा ओरडा फार झालाय."

मला शांत झोपायचं होतं.  तिनं लवकर जावं म्हणून म्हंटलं,  "करू दे ना त्यांना किती आरडाओरडा करायचा ते.  तू कशाला तिकडे लक्ष देतेस.  तू आपली मजेत रहा.  नवरात्र सुरु झालंय . दसरा जवळ आलाय.  थोड्याच दिवसांनी दिवाळी येईल.  त्या नंतर नाताळ.  सणांचा काही तोटा नाही आपल्याकडे.  सगळे सण मस्त एन्जॉय कर.  काळजी सोड.  हल्लीची मुलं म्हणतात तसं, तू चील्ल मार ".

"चील्ल मारू म्हणतेस?   चिल्लम आणून दे त्यापेक्षा.  त्यानी तरी बरं वाटतं का बघते.  एकतर इथे गर्दीनी माझा उर फाटायची वेळ आलीय.  कुठूनही कोणीही येतं.  इथे झोपड्या काय बांधतं.  बंगले काय बांधतं.  आणि वरून असली घाणेरडी भाषा आणि आरडा ओरडा.  वैताग आलाय नुसता.  पूर्वी नव्हतं बाई असं.  तुम्ही लोकांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं म्हणून हे सगळं सहन करायची पाळी आली माझ्यावर. "



                                        



"आता उगीच आमच्यावर कशाला घसरतेस?  आम्ही काय केलं?" तिचा आरोप झटकून टाकायच्या आशेनी मी म्हंटलं.

"तुमच्यावर नाही तर मग कोणावर घसरू.   तुम्हीच जबाबदार आहात याला.  कसली ती रागीट, भांडखोर भाषा आणि तो आरडाओरडा.  कॅमेऱ्यासमोर असले शब्द वापरून बोलतात?   टीव्हीवाल्यांनी नियंत्रण नको का ठेवायला कोण त्यांच्या कार्यक्रमात येऊन काय,  कसं बोलतं त्यावर.  पण टीव्हीवाले स्वतःच जोरजोरात बोंबलत असतात आणि पाहुण्यांनाही ओरडायला लावतात.  तुम्ही चालवून घेता म्हणूनच चाललय ना सगळं.'

"जाऊ दे गं.  आजकाल प्रेक्षकांना सनसनाटी आरडाओरडा आवडतो त्याला आपण काय करणार.  प्रेक्षकांनी जर बघितला   नाही तर टीव्हीवाले आरडाओरडा करतील का?  प्रेक्षक मोठ्या संख्येने बघतात म्हणून टीव्हीवाले ओरडत रहातात.  कबूल कि गर्दीचा तुला नक्कीच त्रास होत असणार.  तो तर सगळ्यानांच होतोय. पण त्यावर उपाय काय?  आणि तुला खरंतर खूप अभिमान वाटायला पाहिजे कि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तुझ्या दारात येतात - आपली मोठमोठी स्वप्न घेऊन ती पुरी करायला."

तिनं एक दीर्घ उसासा टाकला आणि उदास वाणीने म्हणाली, "काटेरी मुगुट आहे बाई हा.  आता नाही झेपत मला.  भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी असे वागतात सगळे.  वर जाणिव नाही ठेवत कसलीच.  मीच किती दिवस सगळ्यांचा भार वाहू.  सुरवातीला वाटलं होतं गावोगावहून लोक येतील,  माझ्या इथली सुव्यवस्था बघून काहीतरी  शिकतील आणि आपापली गावं सुधारतील.  पण यांनी तर उलटच करायला घेतलंय.  या लोकांनी तर माझीच  दुर्दशा करायला घेतलीय त्यांच्या गावांप्रमाणे.  तुम्हा लोकांना ना काळजीच नाही कसली म्हणून आज माझी हि अवस्था झालीय. "

"परत आमच्यावर घसरलीस?"

"नाहीतर काय करू.  तुम्हीच म्हणत असाल सगळ्यांना, आओ जाओ घर तुम्हारा.  म्हणून येतात सगळे इथे गर्दी करायला. देशात इतर मोठी शहरंच नाहीत कि काय? तिथे का नाही जात कोणी?"

"जात असतील गं.  तिथे सुद्धा जात असतील.  आपल्याला काय माहित.  बरं मला सांग,  मगाशी बरळत का होतीस झोपेत बडबडल्या सारखी?"

"झोपेत मी नाही,  तू आहेस.  मी चांगली खडखडीत जागी आहे.  भविष्याच्या काळजीनी झोप उडाली आहे माझी.  जरा डोळा लागेल तर शप्पथ. "

"कोणाच्या भविष्याची काळजी करते आहेस एवढी - आमच्या कि तुझ्या स्वतःच्या?" मी सहज गमतीनं विचारलं.

पण ती गम्मत ऐकायच्या मूडमध्ये नसावी.  उखडून म्हणाली,  " हेच तर माझं दुर्दैव आहे.  तुम्हा लोकांना वाटतंय तूमचं  भवितव्य आणि माझं भवितव्य वेगळं आहे.  भ्रमात आहात तुम्ही सगळे.  माझं काहीही होऊ दे तुम्ही आपले कायम असहाय्य, हतबल, आम्ही काय करू शकतो,  आमच्या हातात काही उरलेलच नाही अशा प्रकारे वागणार.  मग माझी काळजी मलाच करायला हवी.

"तू पुन्हा पुन्हा सारखी आमच्यावर का घसरतेस?  एवढी काही परिस्थिती वाईट दिसत नाही.  तू उगीच अतिरेक करते आहेस."

हे ऐकून तर ती खवळलीच माझ्यावर,  "तुला इथे बसून बोलायला काय जातं.  मला तिथे काय ऐकून घ्यावं लागतं ते बघ जरा.  एकतर सगळे जोरजोरात इंग्रजीत बोलत असतात.  त्यातलं निम्म मला समजत नाही.   त्यांना तरी समजतं का कुणास ठाऊक. म्हणतात - बिल कॉस्बीला जशी शिक्षा झाली तशी इथे व्हायला हवी.  हार्वी वाईनस्टाईनला जे  केलं ते  इथे करायला हवं.   मी 2 ला भारतात आणायची वेळ आली आहे.  ह्यांचे सगळे संदर्भ परदेशी कसे ग?  हे इंग्रजीत भांडणारे लोक स्वतःहून विचार करायची कुवतच हरवून बसलेत कि मनानी कायम परदेशात रहात असतात?  यांना कायम सगळं मार्गदर्शन पाश्चात्य देशातूनच का लागतं.  तिथे नविन काय सुरु होतं आणि आम्ही कधी त्याचं इथे अनुकरण करतो त्यासाठी टपून बसलेले असतात जणू.

"ब्यूटी अँड द बीस्ट हे परदेशी नाटक आहे ना म्हणून बाहेरचे संदर्भ वापरत असतील."  त्या नावाचा ब्रॉडवे शो आहे असं ऐकल्याचं मला आठवत होतं.

"तुला हे सगळं हसण्यावारी न्यायचं असेल तर खुश्शाल ने.  पण सिनेमा आणि टीव्हीवाल्यांच्या या भागिदारीत मधल्या मध्ये मी  आणि माझी संस्कृती भरडली जातेय हे विसरू नकोस".

मला वरमल्यासारखं झालं.  सारवासारव करत तिला म्हंटल,  " तुझा आरोप मी मान्य करते.  आजच्या या परिस्थितीला आम्ही जबाबदार आहोत हे खरं.  तुझ्या इथे मराठीची किंमत कमी करायला,  मराठी माणसांची, संस्कृतीची तुझ्यावरची पकड ढिली करायला आम्हीच जबाबदार आहोत.  त्या अर्थानी म्हणत असशील तर तुझं म्हणणं खरं आहे.  आम्ही सोडलंय तुला वाऱ्यावर.

मी बघते ना मुंबईत रहाणारी कुटुंब - आईवडील मराठी बोलणारे;  मंत्रालय, पोलीस अशा कुठल्यातरी सरकारी खात्यात नोकरी करणारे.  सगळे नातेवाईक मराठी.  पण पोरं कोपऱ्यावरच्या इंग्रजी शाळेत शिकणार आणि म्हणणार, 'माझं मराठी फार खराब आहे.'   बरं या मुलांचं हिंदी आणि इंग्रजी फार उच्च दर्जाचं असतं असंही नाही.  त्या भाषा दामटून बोलतील.  पण मराठी खराब असल्याचाच अभिमान फार.  आणि गम्मत म्हणजे मराठी खराब नसतं त्यांचं.  चांगलं बोलतात.  पण ते कबूल करायला लाजतात.   त्यांना वाटतं कि मराठी येतं म्हंटल तर आपण फार बावळट  दिसू आणि मराठी येत नाही म्हंटलं कि सॉफिस्टिकेटेड - असंलं काहीतरी विचित्र त्रांगडं असतं बघ बिचाऱ्यांच्या डोक्यात.

एखादी म्हणते,  'येतं मला मराठी बोलता.  पण माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती.  बदलीच्या नोकरीत मराठी बोलून चालत नाही.  आणि माझ्या नवऱ्याला मराठी येत नाही.  आम्ही घरात त्याची भाषा बोलतो.  त्यामुळे मला मराठीचा सरावच उरलेला नाही.'  इतका उबग येतो कि नाही असल्या लोकांचा.  वाटतं तिला सांगावं, '' बाई,  मग इथे काय करतेयस?  नवरा- मुलांना घे आणि जाऊन रहा त्याच्या गावी आणि बोल त्याची भाषा किती बोलायची तेवढी.  त्याच्या सकट मुंबईला का चिकटून बसली आहेस'."


                                   
                                          



मी एवढं सगळं तिच्या बाजूनी बोलल्यामुळे ती खुष झालेली दिसली.  कानात बोलावं तसं हळूच म्हणाली, "पटलं ना आता मी काय म्हणते ते.   तुला म्हणून सांगते,  या दृकश्राव्य माध्यमांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करू नका.  पस्तावाल.  फार प्रभावी माध्यमं आहेत ही.  हिंदी सिनेमाची लोकप्रियता तर तुम्हांला आधीच माहीत आहे.  सगळे सिनेमा, त्यातली गाणी वाईट असतात असं मी म्हणत नाही पण मध्येच एखादं अश्लिल अंगविक्षेप असलेलं आयटेम सॉंग घुसडायचं,  परदेशातल्या पॉर्न स्टारला इथे हिरॉईन बनवायचं असले प्रकारही ह्या सिनेसृष्टीत चालतात.  त्याचा तुमच्या मुलांवर वाईट परिणाम होत नसेल असं गृहीत धरू नका.  सिनेसृष्टीचं एवढं स्तोम माजू देऊ नका.  तिथे कुठलीच संस्कृती नाही.  नटनट्यांना एवढं डोक्यावर चढवून ठेऊ नका.  हे असंच चालू राहिलं तर एक दिवस तुमचंच  शहर तुम्हांला परकं वाटायला लागेल.  परवा मराठी पेपरच्या वेब साईटवर बातमी काय होती माहित आहे?  कुठल्याशा द्वितीय- तृतीय श्रेणीच्या माजी सुंदरीचं म्हणे बेबी शॉवर झालं.  डोहाळे जेवण म्हणतात त्याला.   मराठी वर्तमानपत्रवाले सुध्दा डोहाळे जेवण म्हणायला लागले तर भाषेचं काय होणार?  आणि हि नविन परदेशी माध्यमं - त्यांचा प्रभाव तर सिनेमा पेक्षाही जास्त.  सगळी तरुण मंडळी कायम तिथेच वावरत असते.  तिथल्या इंग्रजी पोस्ट पलिकडे बहुतेकांचं वाचन नसेल.  प्रादेशिक भाषेतलं एक पान तरी त्यांना वाचता येईल का कुणास ठाऊक.  कधिकधी माझी फार काळजी वाटते  बघ.  काय होणार आहे माझं पुढे समजत नाही."

तिनं गाडी फिरवून परत स्वतःच्या काळजीवर आणली.  तिचं सांत्वन कसं करावं,  तिला दिलासा कसा द्यावा ते समजेना. स्वतःशीच बोलत असल्या सारखी ती बोलत राहिली,  " तुम्ही सगळे जाल गं एक ना एक दिवस निघून पण मला कायम इथेच रहायला हवं.  माझ्या पुढच्या पिढ्या कशा असतील?  फक्त इंग्रजी बोलणाऱ्या असतील?  जी भाषा मराठीची जागा घेईल ती आपली संस्कृती बरोबर घेऊन येईल.  महाराष्ट्राची इंग्रजी राजधानी अशी माझी अवस्था होईल का गं एक दिवस?"

हे फारच गंभीर होतं.  माझं डोकं काम करेनासं झालं.  सुन्न होऊन मी बसून राहिले.  तिला काय सांगावं काही सुचेना.  तिची काळजी मला समजत नव्हती असं नाही पण मी खूप विचारात पडले.  तशात माझी उठायची वेळ झाली होती.  ती आणखी बराच वेळ बोलत राहिली असती पण तिला मध्येच थांबवत मी म्हंटल,  "ये आता तू.  मला ऊठायला हवं.  माझ्या झोपेचं खोबरं केलंस आज."

मी जा म्हंटल्याचा तिला राग आला नाही आणि रागावून ती तडकाफडकी निघूनही गेली नाही.  उलट शांतपणे हसून म्हणाली, " ते तर कधितरी होणारच होतं - तुझ्या झोपेचं खोबरं गं.  तुझी वेळ झाली असेल तर ऊठ तू.  मी जाते.  पण सवड मिळेल तेंव्हा जरा माझं नाव टाक त्या मी 2 मध्ये."

"मी कसं तुझं नाव टाकू त्यात?

"ते मला काही माहीत नाही.  पण मी 2 जर भारतात येणार असेल तर त्यात पहिलं नाव माझं पाहिजे.  वर्षानुवर्षं लोक माझ्या इच्छे विरुध्द माझ्यावर बळजबरी, अत्याचार,  जबरदस्ती करतायत.  माझ्याशी गैरवर्तणूक, करतायत.  भारतातल्या मी 2 मध्ये पहिलं नाव माझंच हवं."

ती गेल्यावर मी उठले आणि सकाळचा पहिला चहा केला.  गरम चहाचे घुटके घेत कम्प्युटर उघडून बसले.  वाटलं बघावं तरी ती म्हणते त्यात काही तथ्य आहे का.  वेगवेगळ्या क्लिप्स बघितल्या.  त्यात बरच काही होतं.  आगीत तेल ओतू पहाणारा तो टीव्ही वरचा गोंधळ फारच लांच्छनास्पद  होता.  इतके वर्षात अमेरिकन टीव्हीवर मी इतकी असभ्य भाषा आणि आरडाओरडा कधीच पहिला नाही.  कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं आणि काय नाही ह्याच भान इथल्या टीव्हीवर पाळलं  जातं. कार्यक्रमातील वादविवादाचं संतुलन संचालक स्वतः पाळतात आणि पाहुणेही पाळतील याची दक्षता घेतली जाते.  इथे तर संचलक स्वतःच जोरजोरात एकतर्फी ओरडत होते.

वादळाच्या व्हिडीओज बघून डोकं गरगरायला लागलं म्हणून आणखी एक कप चहा केला. चहाचा दुसरा कप संपवत असताना, आजकाल मुंबईला गेल्यावर जे वाटतं ते आठवलं - हिंदी सिनेमा सृष्टीला मुंबई बाहेर हलवलं तर मुंबई स्वच्छ,  सुंदर आणि गर्दी विरहीत होऊ शकेल का?



Saturday, September 15, 2018

गोमातांचं गाऱ्हाणं


मागल्या रविवारी पोळा होता.  खरतर तो बैलांचा सण.  पण बैल नाही तर नाही निदान सणानिमित्त काही गोमातांशी तरी थोडा संवाद साधावा असं वाटलं.  फार दूर नाही जावं लागत त्यांना भेटायला.  देवळाच्या गल्लीत असतात त्या.  पुष्कळ वर्ष त्यांचा मुक्काम आहे तिथे.  माझ्या घरी जायच्या वाटेवर आहे ते ठिकाण. 

दुपारी घरी जाताना थांबले त्यांच्यापाशी घटकाभर.  त्या जेवत होत्या.  






थोडावेळ त्यांच्या जवळ घुटमळले.  त्यांचं जेवण कधी होतंय याची वाट पहात तिथे उभी राहिले.  पण समजेना कि त्या जेवतायत अजून कि त्यांच जेवून झालंय.  पुढ्यत वाढलेलं तसंच दिसत होतं - चपाती, भाजी, भात बरच काही होतं कागदावर ठेवलेलं. 

शेवटी हळूच विचारलं  - "जेवताय का? "

एकूण एक सगळया जणींनी माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि भात -भाजी हुंगत बसल्या.

पुन्हा हळूच म्हंटल - "जरा बोलायचं होतं. "

पुन्हा दुर्लक्ष.

आता मला जरा ऑकवर्ड वाटायला लागलं होतं.  किती वेळ तिथे नुसतं घुटमळत उभं रहायचं.  दरवेळी सिग्नल लाल झाला कि गाडयांची लांब रांग समोर थांबत होती.  त्यातल्या कोणी पाहिलं तर.. एखादी गाडी नेमकी आपल्या बिल्डिंग मधली निघाली तर.. उदया लगेच विचारतील  - काय करत होतीस तिकडे?

गोमातांशी बोलायचा नाद सोडून देऊन तिथून काढता पाय घ्यायचा विचार करत होते तेवढ्यात त्यातली एक बुजुर्ग माता मान खाली घालून तिरप्या नजरेनं माझ्याकडे बघतेय असं वाटलं.  तिचा विचार बदलायच्या आत पटकन तिच्या जवळ जात म्हंटल - "पोळ्यानिमित्त लोकांना काही सांगायचंय का?".

तिनं नाही अशी मान हलवली.

"काहीतरी सांग ना.  लोक एवढे तुझी पूजा करतात, तुझ्या रक्षणासाठी झटतात.  त्यांच्यासाठी आशिर्वादपर चार शब्द सांग. नाहीतर संदेश तरी दे.

तिनं परत मान हलवत नाही म्हंटलं.  एव्हाना बाकीच्या माता जरा चुळबुळ करायला लागल्या होत्या:  हिला कोणी कधी लिडर नेमलं.  हि एकटीच का म्हणून हो - नाही करत मान हलवत बसणार.  आम्हीहि बोलू शकतो - असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.

ती संधी साधून त्यांना म्हंटल,  "मग तुमच्या काही तक्रारी असतील तर सांगा.  तुमच्या रहाणीमानात सुधारणा हवी असेल, काही सुखसोयी हव्या असतील तर तसं सांगा."

परत सगळयांनी नकारार्थी मान हलवली.

"काहीच तक्रारी नाहीत?   सगळं छान चाललंय तुमचं?"

त्या होय म्हणाल्या.

"हे असं कागदावर जेवण वाढलेल चालतं तुम्हाला?   पावसाचे दिवस आहेत.   फुटपाथ ओला आहे.   चिखल आहे.   त्यातच कागद ठेवून त्यावर चपात्या वाढल्यात ते आवडतं?"

"मग आम्हांला काय रोज केळीच्या पानावर जेवायला वाढणार?" बुजुर्ग माता वैतागून म्हणाली.

"तसं नाही.  पण माझे आज्जी - आजोबा आपल्या गुरांना कित्ती छान ठेवायचे.  त्यांच्यासाठी खळ्यात गोठा होता. गोठ्याजवळ चाऱ्यासाठी गवताचा मोठ्ठा टेकडीएवढा भारा रचलेला असायचा.   आम्ही लहान होतो तेंव्हा त्यावर चढुन खेळायला काय मजा यायची.   पौष्टिक खाद्य द्यायचं असेल तेंव्हा आज्जी ते घमेल्यात मिक्स करायची आणि ती घमेली गुरांच्या पुढ्यात ठेवायची.   हे असं चिखलात कागद ठेऊन त्यावर गुरांनां चपात्या घालायची पद्धत नव्हती बघितली मी."

"पुरे तुझ्या आज्जीच्या गोठया -  घमेल्यांचं कौतुक.  आलीय आम्हाला फुकटचा मोठेपणा सांगायला.  जा आता,"  घोळक्यातली एक मध्यम वयीन माता धुसफुसली.

माताच ती तिचं बोलणं काय मनावर घ्यायच म्हणून मी प्रश्न विचारणं चालू ठेवलं.

"ऊन -पावसात कायम उघड्यावर उभ्या असता.  उघड्यावरच जेवता.  डोकयावर छप्पर असावं असं नाही वाटत तुम्हांला?".

"तू काय चंद्रावरून टपकलीस का गं?  का मंगळावरून?  दिसत नाही तुला शहरात किती माणसं उघड्यावर रहातात, जेवतात, झोपतात ते.  आमचं काय मोठं घेऊन बसलीस.  जा आता".

मी त्यांना नको ते प्रश्न विचारत होते हे उघड होतं.  पण मला हि संधी दवडायची नव्हती.  कितीतरी वर्ष त्या माझ्या शेजारी रहातायत पण त्यांच्याशी गप्पा मारायचा योग कधी आला नव्हता.

"तरीपण, ह्या इमारतीत रहाणाऱ्या लॊकांनी, दुकानदारांनी त्यांच्या समोरचा फुटपाथ स्वच्छ ठेवायला हवा असं नाही वाटत तुम्हाला?

"ते का म्हणून फुटपाथ स्वच्छ करतील.  ते त्यांचं काम थोडंच आहे."

न्यूयॉर्क मध्ये असतं.  बिल्डिंग समोरचा फुटपाथ स्वच्छ ठेवणं हे त्या बिल्डिंगच काम असतं.  नाहीतर दंड भरावा लागतो -  हे मनात आलेलं मी मनातच ठेवलं.  मातांना बोलले असते तर त्या पुन्हा भडकल्या असत्या  - फुकटचा मोठेपणा सांगते म्हणून.

"बरं मग रस्ते, सिग्नल त्याबद्दल काही तक्रार?"

"त्याबद्दल काय तक्रार असणार आमची?"

"तुम्ही सिग्नल क्रॉस करून पलीकडे समुद्रावर जाता ते बघते मी.  रस्त्यावर खूप ट्रॅफीक असतो.   तुम्हाला रस्ता ओलांडताना भिती नाही वाटत?"

"अगं बाई,  शहरातले सिग्नल कधी चालू असतात, तर कधी बंद असतात.  रात्री तर नेहमीच बंद असतात.  रात्री गाड्या नसतात का रस्त्यावर?  तसही नाही.  पण सगळे सिग्नल मात्र बंद.   का ते ती मुंबादेवीच जाणे.   पण रस्ता क्रॉस करायची काळजी आमच्यापेक्षा तू जास्त कर.  आम्हांला रस्ता ओलांडताना बघून गाड्या आपला वेग तरी कमी करतात.  तुम्हां लोकांना बघून नाही कोणी वेग कमी करत.  जा आता.  उद्यापासून नीट धावत पळत रस्ता क्रॉस करायला शिक.  नाहीतर दोन्ही बाजूचा ट्रॅफिक चालू होईल आणि तू बसशील मध्येच अडकून".  एकीनं असं म्हणताच सगळ्या गोमाता फिदीफिदी हसल्या.

माझी चेष्टा करण्यात त्यांना आता गम्मत वाटतेय असं दिसत होतं.  पण त्यांच्या तोंडून एखादी तक्रार तरी ऐकायचीच असा मी चंग बांधला.

"बरं, त्या सबवेच्या कामाचं काय"?   सगळ्या मातांनी ऐकून न ऐकल्या सारखं केलं कि त्यांना खरंच ऐकू गेलं नाही कुणास ठाऊक.

मी पुन्हा विचारलं,  "ते मेट्रोचं काम चालू आहे त्याच काय"?

"काय त्याचं"?

"तुमचं रहाणीमान त्यामुळे सुधारेल असं तुम्हाला वाटतं का"?

"आमचं रहाणीमान कशाला सुधारेल मेट्रोमुळे?  आम्हांला थोडंच कोणी तिथे सोडणार आहे.  अगं, त्या बैलांना सी लिंक वर सोडत नाहीत.  ठळक अक्षरात पाटी लावली आहे सुरवातीलाच, वाचली नाहीस?  - बैलगाड्यांना प्रवेश नाही.   मग आम्हांला मेट्रोत जाऊ देतील होय?   मी सांगते बघ तुला, स्टेशनच्या बाहेर ठळक पाटी लावतील - गोमातांना प्रवेश नाही. "

"तेच तर म्हणते आहे ना मी.  ह्या शहराचे रहिवासी म्हणून तुम्हांला काही अधिकार आहेत कि नाही?  आणि ते तुम्हांला मिळतायत का ? "

"आमच्या अधिकारांच आंम्ही बघून घेऊ.  तुम्ही नका त्याची काळजी करू."  एक तरुणशी, यंगीश माता अधिकारवाणीने बोलली.

"ते ठिक आहे.  पण सगळीकडे बोर्ड लावलेत ना कि "मुंबई इज अपग्रेडींग',  म्हणून विचारलं कि शहरात चांगल्या सुधारणा होतायत असं तुम्हाला वाटतं का"?

"कुठे बोर्ड लावलेत"?

"जिथे जिथे मेट्रोचं काम चालू आहे ना, तिथे बोर्ड लावलेत - "मुंबई इज अपग्रेडींग'' असे.  तुम्ही नाही पाहिले? "






"अपग्रेडींग म्हणजे?   अगं आम्हाला मराठी धड वाचता येत नाही तर इंग्रजी काय कप्पाळ समजणार".

"बरं ते जाऊ दे.   ती थोडी लांबची गोष्ट झाली.  आपण तुमच्या सभोवताली म्हणजे इमिजिएट सराउंडिग मध्ये काय चाललंय त्या विषयी बोलूया.  इथे आता तुमच्या शेजारी गणेश उत्सवासाठी स्टेज उभारलय त्याचा तुम्हांला काही त्रास होतो का?"

"त्याचा आम्हाला कसला त्रास होणार?" गोमाता आता थोड्या आक्रमक होतायत असं वाटलं.  पण माझ्याकडेही कारणांची कमतरता नव्हती.

"म्हणजे एकतर रस्ता अरुंद आहे.  त्यावर सतत ट्रॅफिक चालू  असतो.  तुमच्या अवती भोवती किती गाड्या, स्कुटर पार्क केल्यात.  गिचमिड आहे नुसती.  त्यातच आता मांडव उभारलाय,  लाउड्स्पिकरचा आवाज,  झगमगीत लाईट  - कसलाच त्रास होत नाही तुम्हाला?"

"अगं,  त्रास कसला त्यात?   रोज आम्हांला उभ्या जागी दिवसभर गणरायाचं दर्शन होतं हे आम्ही आमचं मोठं भाग्य समजतो.   त्यासाठी दहा -पंधरा दिवस थोडा त्रास सहन करावा लागला तर त्यात काय मोठंसं.   शेवटी सगळ्यांनी आपसात मिळूनमिसळून नको का रहायला?  आणि तुला जिकडे तिकडे त्रासच कसा दिसतो गं?  म्हणे ह्याचा काही त्रास होतो का?  त्याविषयी काही तक्रार आहे का?  त्याची काही अडचण होते का ? - सारखा आपला एकच सूर.  तुझी हि नकारात्मक वृत्ती सोड आता आणि शहराकडे थोड्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला शिक."

"ते तर झालंच.  पण ते फेरीवाले.  ते तर कायमच असतात ना.  त्यांचा नाही त्रास होत"?

"कुठले फेरीवाले?"  माझ्या न संपणाऱ्या प्रश्नांनी  माता आता चिडू लागल्यात असं वाटलं.

"ते कोपऱ्यावर, सिग्नल जवळ असतात ते.  भेळपुरी, पाणीपुरी विकणारे.  ते तर कायमच असतात ना."  मी चाचरत म्हंटल.

"ते कायम कुठे असतात?  ते रोज दुपारी दोन - तीन नंतर येतात बिचारे.  आणि रात्री अकरा -बाराच्या सुमारास निघून जातात. आणि ते पाणीपुरी नाही काही विकत.  ते दाबेली विकतात".

"तीन - चार जण असतात ना.  त्यातला एक मला वाटतं भेळपुरी विकतो".

मी असं म्हंटल्यावर संभाषणाचा रोखच बदलला.  सगळ्या माता आवेशात बोलू लागल्या.  काहींच्या मते तिथे फक्त दाबेली विकली जाते.  काहींना माझ्याप्रमाणेच वाटत होतं कि भेळपुरी, पाणीपुरीही विकली जात असावी.

शेवटी ती पहिल्यांदा बोललेली जुनी -जाणती बुजुर्ग माता म्हणाली,  "थांब थोडावेळ इथे.  येतीलच ते इतक्यात.  मग आपल्याला दिसेलच ते दाबेली विकतात कि भेळपुरी ते.

पण मला तिथे थांबवेना.  हवा चांगली होती.  डोक्यावर ऊन रणरणत नव्हतं.  पण पायाखाली ओलं होतं - अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे आणि शेण - गोमूत्रामुळे झालेलं.  तिथेच मातांच जेवणही होतं रद्दी पेपरवर ठेवलेलं.  जास्त वेळ त्या ओल्यात थांबलं तर डास चावून उगीच डेंग्यू बिंग्यु व्हायची भीती.  तेवढ्यात एक माणूस आला आणि एका गोमातेच्या पायाशी बसून तिचं दूध काढू लागला.  मातांना त्याची सवय असावी - भर रहदारीच्या रस्त्यावर कोणीतरी येऊन त्यांचं दूध काढायची.  त्यांची त्याबद्दल काही हरकत दिसली नाही.  मलाच वाटलं त्यांना थोडी प्रायव्हसी द्यावी.  मी  निघाले तिथून.






yesheeandmommy@gmail.com


Sunday, July 22, 2018

Summer Fun - उन्हाळ्यातली गम्मत







आपली एखादी वस्तू हरवली की मला फार चुटपुट लागुन रहाते.  मग ती कितीही महत्वाची/ बिन महत्वाची, साधी, क्षुल्लक गोष्ट असो... ती शोधल्या शिवाय चैन पडत नाही.

एकदा माझी पर्स  ब्रॉडवे आणि ७० स्ट्रीटच्या कोपऱ्यावर विसरून राहिली होती ती कशी सापडली त्याचा किस्सा आधीच्या एका पोस्ट मध्ये मी सविस्तर लिहिलाय.

दुसरं म्हणजे मुलगा लहान होता तेंव्हा त्याचा एक सॅन्डल कुठे तरी पडला. मुंबईत. चालत्या गाडीतून तो कसा बाहेर पडला माहीत नाही. घरी पोहोचल्यावर गाडीतून उतरताना लक्षात आलं कि त्याच्या एकाच पायात सॅन्डल आहे.

खरतर हरवलेला सॅन्डल शोधायला जाण तसं  वेडेपणाचं होतं. पण मी गेले. आम्ही जिथून आलो होतो त्या रस्त्यावर परत चक्कर मारली तर प्रभादेवीत व्होडाफोनच ऑफिस आहे - जिथे आम्ही आमच्या घराकडे जायला वळतो - त्या ऑफिसच्या अगदी समोर भर रस्त्यात तो सॅन्डल मला दिसला. त्या रस्त्यावर सतत खूप ट्रॅफिक असतो. तरीही सॅन्डल सापडला खरा.

परवा नेहमी प्रमाणे कामवाली वॉशिंग मशिन मध्ये काहीतरी विसरली.  घरातलं मशिन बिघडलंय म्हणताना ती बेसमेंट मध्ये बिल्डिंगची लॉंड्री आहे तिथे कपडे धुवायला नेते.

मशिन मध्ये कपडे विसरायची तिची हि पहिली वेळ नाही. साफसफाईच्या कामत ती नीट आहे. कामाचा उरक चांगला आहे. मी स्वयंपाकाचा ओटा दहा वेळा पुसला तरी कोपऱ्यात कुठेतरी काही बारीक कचरा लपून बसतो, एखाद दोन डाग तसेच रहातात.  पण ती खूप कमी वेळात अख्ख स्वयंपाकघर लख्ख करते.

जेंव्हा धुणं खालती घेऊन जायची वेळ येते तेंव्हा मात्र तिची जरा गडबड होते. कधी कपडे परत घेऊन येताना एखादा सॉक बास्केट मधून पडतो. तिच्या ते लक्षातही येत नाही.  मी बाहेरून येते तेंव्हा मला लिफ्टच्या बाहेर पडलेला सॉक सापडतो.

तर कधी काही कपडे मशिन मध्येच विसरून येते. संध्याकाळी कपडे कपाटात ठेवताना माझ्या लक्षात आलं कि मी खालती जाऊन ते घेऊन येते. बिल्डिंगची लॉंड्री कोणी जास्त वापरत नाही - मोठी मशिन्स कम्फर्टर, ब्लँकेट्स धुण्यासाठी वापरतात. मागल्या वेळी माझे कपडे मला एका वॉशिंग मशिनच्या आतल्या भिंतीला ओल्या अवस्थेत चिकटलेले सापडले होते.

परवा माझा झोपताना घालायचा कुडता धुतलेल्या कपड्यात नव्हता.  घरभर शोधल्यावर आठवलं कि बाई बहुतेक मशिनमध्ये  विसरली असणार. रात्रीचे दहा -साडेदहा वाजले होते. तरी मी खालती गेले. लॉंड्री रूम मध्ये कोणी नव्हतं पण सगळी मशिन्स - बरेच वॉशर -ड्रायर्स आहेत - धडाधडा चालू होती.  कोणाचं तरी महिन्याचं नाहीतर काही आठवड्यांचं साठलेलं धुणं चालू असावं.

मी गेल्या पावली परत फिरले; उगीच दुसऱ्यांच्या लॉंड्रीत ढवळाढवळ नको.

घरी परत येताना लिफ्ट मध्ये स्वतःला बजावलं - कुडता सापडला नाही ह्या गोष्टीचा झोपेवर परिणाम होऊ द्यायचा नाही.  उशीर पर्यंत जागं राहून किंवा मध्यरात्री उठून कुडता शोधायला लॉंड्री रुम मध्ये पुन्हा चक्कर मारायची जरूर नाही. ज्यांची  लॉंड्री चालू आहे त्यांना कुडता सापडला तर ते तो तिथेच ठेवतील आणि सकाळी तो मला मिळेल. त्याची मला खात्री होती.



                 


दुसऱ्या दिवशी सकाळी लॉंड्रीरूम मध्ये जाऊन बघितलं तर समोर माझा कुडता होता.  ते अनपेक्षित नव्हतं. ज्या स्थितीत तो होता ते फार अनेपक्षित होतं.

मला वाटलं होतं कि लॉंड्री रूम मध्ये धुतलेल्या कपडयांच्या घड्या घालण्यासाठी जे मोठं टेबल आहे त्यावर चुरगळलेल्या स्थितीत कुडता मला सापडेल. त्याऐवजी ज्यांना तो सापडला त्यंनी चक्क झटकून बिटकून लॉंड्री बास्केटला हँगर अडकवण्यासाठी जी दांडी असते त्या दांडीवर तो ताठ वाळत घातला होता.

मी फार आश्चर्यचकीत झाले.  मागून पुढून तपासून खात्री करून घेतली कि नक्की माझाच आहे. कामवालीला दाखवण्यासाठी फोटो काढला. तिला विचारलं कि पहिल्यांदा ती नाहीच म्हणते - मी नाही कपडे विसरले,  मी नाही मायक्रोवेव्ह तारेनी घासुन त्यावर चरे पाडले. त्यातून तिचं इंग्रजी फार जुजबी आहे. कुडता कुठे, कसा सापडला हे मी सांगुन तिला समजलं नाही तर फोटोवरून जास्त चांगल कळेल असं वाटलं.

मनात आलं मला जर कोणाचे ओले कपडे मशिन मध्ये सापडले असते तर मी ते झटकून वाळत टाकायचे कष्ट घेतले असते? आता ह्यापुढे घेईन.  Pay it forward या न्यायानी ह्यापुढे नक्कीच घेईन. पण ह्या आधी बहुदा नसते घेतले. कोणाचे आहेत कुणास ठाऊक म्हणत बाजूला ठेऊन दिले असते. फारतर तात्पुरते बाहेर काढून माझं धुणं धुऊन झाल्यावर ज्या मशिन मध्ये सापडले त्याचं मशिन मध्ये पून्हा ठेऊन दिले असते. पण झटकून वाळत घातले असते असं वाटत नाही.

न्यूयॉर्क रहायला फार टफ, कठीण, कठोर शहर आहे असं म्हणतात. सगळे आपल्या महत्वाकांक्षेत इतके गुरफ़टलेले असतात कि चांगुलपणा हा ह्या शहराचा स्थायिभाव आहे असा आरोप करायला कोणी धजावणार नाही. तरीही असे- रँडम ऍक्ट ऑफ काईन्डनेस - कधितरी अनुभवास येतात.

एकदा आम्ही ७२ स्ट्रीट वर गाडी पार्क करत होतो तर एका बाईंनी खिडकीच्या काचेवर ठोठावलं. काच खाली केल्यावर तिचं पार्किंग तिकीट आम्हांला दिलं आणि म्हणाली, "माझं काम झालंय, मी चाललेय पण ह्या तिकिटात अजून तासाभराचं पार्किंग उरलंय. तुम्ही ते वापरू शकता".

मुलगा एकदा ट्रेननी कुठेतरी चालला होता तर डब्यात एका लहान मुलानी उलटी केली. म्हणताना त्या मुलाची आई ते पुसून घेऊ लागली. तिच्या जवळचे वाईप्स संपले तेंव्हा डब्यातल्या इतर प्रवाशांनी आपल्या जवळचे वाईप्स तिला देऊ केले.
 
जिनं आम्हाला तिचं पार्किंग तिकिट दिलं त्या बाईचे आम्ही लगेच तिथल्या तिथे आभार मानू शकलो . चुटपुट या गोष्टीची वाटते की ज्यांनी माझा कुडता इतका व्यवस्थित वाळत घातला ती व्यक्ती कोण होती ते मला माहित नाही. त्यांचे आभार मानणं तर दूरच राहिलं.
                                                                     
                                                                              ***
                 

                                             



न्यूयॉर्कच्या ट्रेन मध्ये एखादी कविता नेहमी असते. एकाच डब्यात दोन कविता त्यादिवशी पहिल्यांदा बघितल्या.

शेवटी संजू नाही बघितला. दोन - तीन वीकएंड बघायचा कि नाही बघायचा असं चालू होतं.  संजूबाबाची कहाणी पूर्ण परिचित असल्यामुळे फारशी इच्छा नव्हती. पण मुंबईतल्या माध्यमांत त्या सिनेमाचं भरपूर कौतुक होत होतं.  चित्रपटांनी किती कोटींचा बिझनेस केल, तो बॉक्स ऑफिस वर कसा यशस्वी झाला त्याच्या बातम्या येत होत्या. केवळ एक चांगलं मनोरंजन म्हणून बघावं कि काय असं वाटत होतं.

चित्रपट प्रदर्शनाच्या मागे जे अर्थकारण असतं ते मला माहीत नाही. नविन सिनेमा रिलीज होताना त्यामागे काय प्रणाली असते कल्पना नाही. मागे कुठलातरी हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा मी मुंबईत होते. बहुतेक सुलतान असावा. नक्की आठवत नाही.  कुठल्यातरी बड्या ताऱ्याचा होता. तो बघावसं वाटत नव्हतं. पण पेपरात बघितलं तर त्या वीकएंडला अख्ख्या मुंबईत एकूण एक सगळ्या चित्रपटगृहात सगळ्या पडदयावर फक्त तोच सिनेमा दाखवत होते. ज्यांना तो सिनेमा बघायचा नसेल त्यांच्या साठी दुसरा काही चॉईस नव्हता. म्हणजे ज्या लोकांचा त्या वीकएंडला चित्रपट बघायचा प्लॅन असेल त्यांना झक्कत तो सिनेमा बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. हि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेहमीच असं होतं का मला माहीत नाही.

न्यूयॉर्कमध्ये असं कधी होत नाही. चित्रपट कितीही मोठा असूदेत - मोठं बजेट, मोठ्या दिगदर्शकाचा. वीकएंडला सगळेच्या सगळे स्क्रीन एका सिनेमानी व्यापलेत असं होत नाही. दर्शकांनां दुसरे सिनेमा बघण्याचे ऑप्शन्स असतात.

न्यूयॉर्क मध्ये दुसरी एक चांगली पध्द्त आहे:  माझा मुलगा प्री स्कुल मध्ये होता तेंव्हा त्याच्या शाळेच्या समोर जी बाग आहे ती त्या खाजगी शाळेनी स्वतःच्या खर्चानी विकसित केलेली होती  - त्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनां खेळण्यायोग्य होईल या दृष्टीने.  पण ते प्लेग्राऊंड अर्थातच त्या भागात रहाणाऱ्या सर्व मुलांसाठी खुलं होतं  - मग ती  मुलं त्या शाळेत जाणारी असोत किँवा नसोत.

बॉलिवूड मधील बड्या मंडळींनी अशा प्रकारची सामाजिक जाणीव ठेवायला हरकत नाही.  मुंबईत नवा सिनेमा रिलीज करताना सगळ्या मल्टिप्लेक्स मध्ये किमान एक स्क्रीन जुन्या/नव्या चांगल्या मराठी सिनेमासाठी राखून ठेवावा. त्या मराठी सिनेमाची फारशी तिकीट विक्री झाली नाही, तोटा झाला तर तो त्यांनी सहन करावा. महाराष्ट्रानी त्यांना भरभरून दिलंय. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी पूण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतलंय. व्यवसायासाठी वर्षन वर्ष मुंबईत रहातायत. महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं तेवढं देणं ते नक्कीच लागतात.

मुंबईच्या माध्यमात संजू जे कौतुक चाललय ते खरं आहे कि केवळ बॉलिवूडला खूष करण्यासाठी स्तुतिसुमने उधळली जातायत ते समजत नव्हतं. शेवटी एक अमेरिकन परिक्षण वाचून निर्णया पक्का केला. त्या परिक्षणाचा मथळा पुरेसा बोलका होता: संजु - अ ग्लोरिफाइड इन्फोमर्शियल अबाऊट अ बॉलिवूड बॅड बॉय.

मी इन्फोमर्शियल बघत नाही. एका बॅड बॉयच्या आयुष्याबद्दलच इन्फोमर्शियल बघाण्यात काही अर्थ नव्हता.






सध्या आमच्या नदीवर समर अवतरलाय. उन्हाळा म्हंटलं कि कसं रखरखित, घामट वाटतं.  तसं या उन्हळ्यात काही नसतं. ऑकटोबर ते एप्रिल नदीवर कोणी जास्त फिरकु शकत नाही. बोचरा वारा आणि थंडी असते. मे च्या मध्यावर किनाऱ्यावरचा कॅफे उघडला की नदीवरची वर्दळ वाढते. कि उलट होतं - वर्दळ वाढते म्हणून कॅफे उघडतो कि काय कुणास ठाऊक.  

संगीत, सिनेमा असे मनोरंजनाचे कार्यक्रम चालू होतात. लोकं जॉगिंग, सायकलिंग, योग करायला खाली उतरतातकिनाऱ्यावरच्या बाकावर बसलं कि नदीचा संथ प्रवाह बघताना मनही शांत होऊ शकतं.



                                             



ज्या आठवड्यात न्यूयॉर्क मध्ये अतिशय आल्हाददायक हवामान होतं तेंव्हा मुंबई पावसात झोडपून निघत होती.  पावसातल्या मुंबईचं जितकं छान चित्रण वरील गाण्यात आहे तसं दुसऱ्या कुठल्या गाण्यात मी पाहिलेलं नाही.




yesheeandmommy@gmail.com



Sunday, May 20, 2018

Poems and Songs



The Walrus and the Carpenter



                                           




The Snake



                                          




The Owl and the Pussycat




               




The Tyger



                                           





To a skylark



                 

                                                     वरील कवितेच्या शेवटी त्या अजरामर काव्यपंक्ती आहेत:

                                                         Our sweetest songs are those that tell of
                                                                               saddest thought
                         
                                                                     किंवा खालील गाण्यात म्हंटलंय तसं,

                                                                        है सबसे मधुर वो गीत जिन्हें
                                                                          हम  दर्द के सूर में गाते हैं



खरतर या दोन ओळीं सोडल्या तर वरील कवितेत आणि खालील गाण्यात इतर काहीच साम्य नाही. पण केवळ त्या दोन ओळीमुळे ह्या कवितेचं आणि गाण्याचं इतकं अतूट नातं जमलंय मनात कि एक ऐकलं कि दुसरं हमखास आठवतच. असं कधी होत नाही कि या इंग्रजी काव्यपंक्ती ऐकल्या आणि खालचं हिंदी गाणं आठवलं नाही किंवा खालील गाणं ऐकलं आणि वरील  इंग्रजी ओळी आठवल्या नाहीत. 



                
                                                           



तसंच आता घरकुल मधल्या गाण्याचं झालंय. पप्पा सांगा कुणाचे  हे गाणं एके काळी खूप लोकप्रिय होतं. त्याचं मूळ इंग्रजी गाणं हल्लीच पहिल्यांदा ऐकलं आणि आता एक आठवलं कि दुसरं हमखास आठवलं नाही असं होत  नाही.


पप्पा सांगा कुणाचे
                                   
           

                                           




Papa he loves Mama




               


                     
                                     
                            

Tuesday, April 10, 2018

रोझॅनच पुनरागमन


अमेरिकेन टीव्ही वरची ९०च्या दशकातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे रोझॅन. इल्लनॉय राज्यातल्या लॅनफर्ड नावाच्या एका छोट्या काल्पनिक गावात रहाणाऱ्या कॉनर कुटुंबाच्या आयुष्यावरची सीटकॉम.

कॉनर कुटुंबात ५ सदस्य: रोझॅन, तिचा नवरा डॅन कॉनर आणि त्यांची शाळकरी वयाची तीन मुलं - सर्वात मोठी मुलगी रीबेक्का उर्फ बेक्की, नंतर डार्लिन आणि धाकटा मुलगा डी जे म्हणजे डेव्हिड जेकब. ह्या पाच सदस्यांव्यतिरिक्त आणखीही काही सदस्य कॉनर कुटुंबात आणि पर्यायानी मालिकेत होते.

गावातच रहाणारी रोझॅनची अविवाहित धाकटी बहीण जॅकी दररोज कॉनर घरात चक्कर मारायची. ती मालिकेतल्या प्रमुख पात्रांपैकी एक होती. कधी जवळपासच्या गावात रहाणारी रोझॅनची आई, डॅनचे वडील येऊन जायचे. रोझॅनची आज्जी, शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणींचा एखाद- दुसऱ्या एपिसोड मध्ये समावेष व्हायचा.

डॅन आणि रोझॅन दोधेही गावातल्या साध्या उद्योगधंद्यामध्ये मध्ये साध्याशा - ब्लू कॉलर - नोकऱ्या करायचे. सगळं जेमतेम सुरळीत चाललंय असं वाटत असताना दोघांपैकी एकाची कंपनी अचानक बंद व्हायची. नोकरी जायची. मग नविन 
नोकरी शोधायची धडपड. मालिकेच्या नऊ सीझन्स मध्ये त्या दोघांनी आणि जॅकीनी मिळून ज्या अनेक नोकऱ्या केल्या त्यात घर दुरुस्तीचं काम होतं, ब्युटी पार्लर मधल्या शॅम्पू गर्लची नोकरी होती आणि ट्रक ड्रायव्हरची सुद्धा. 

मधूनच कधीतरी डॅन आणि रोझॅनला धंदा करायची लहर यायची. मोटर सायकलवर भ्रमंती करत जगणाऱ्या एका स्वच्छंदी मित्राच्या नादी लागून, हातातली नोकरी सोडून देऊन, तीन मुलांची जबाबदारी असलेला डॅन जून्या मोटर सायकल नविन करून विकायचा उद्योग सुरु करायचा. तो नीट चालत नसे. मॉल मधलं कॉफी शॉप बंद झालं आणि त्यातली वेट्रेसची नोकरी गेली कि रोझॅन जॅकी बरोबर लंचबॉक्स नावाचं डायनर सुरु करायची.

दोघी बहिणीं मध्ये रोझॅन कुटुंबवत्सल. आपल्या शाळेतल्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न करून अवती भवतीच्या अनेक आर्थिक, सामाजिक, कौटूंबिक चढउतारांना आणि ओढाताणींना त्याच्या सोबतीनं निभावून नेत स्थिरावलेली. तर धाकटी जॅकी अस्थिर. कघी बहिणी बरोबर कंपनीत नोकरी करायची, ती सुटल्यावर मग पोलिसची नोकरी, तर कधी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचं. दर एक -दोन वर्षांनी बॉयफ्रेंड बदलायचे. मानसिक आधारासाठी ती मोठ्या बहिणीच्या कुटुंबावर अवलंबुन.

आणि जॅकी सकट घरातील सगळ्यांवर आपल्या खवचट विनोदानी राज्य करणारी राणी म्हणजे रोझॅन.


जुनी रोझॅन


रोझॅनच्या वेट्रेसच्या नोकरीवरून सहज आठवलं कि अमेरिकेत पुरुष वेटर्सच्या बरोबरीने महिला वेटर्स दिसतात. वेट्रेसिंग च्या कामात इथे महिलांचा सहभाग फार पूर्वीपासून आहे असं वाटतं.  मुंबईत मात्र मी आजपर्यंत एकही महिला वेट्रेस बघितलेली नाही. पंचतारांकित हॉटेलच्या रेस्टोरंट मध्ये किंवा पाश्चात्य धर्तीच्या कॉफि शॉप मध्ये चुकून एखादी दिसली असेल. पण इतर कुठल्याच रेस्टोरंट मध्ये नाही.

हे थोडंसं कोड्यात टाकणारं आहे. ज्या नोकरीसाठी फारशा प्रशिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नसते त्या क्षेत्रात आपल्याकडे मुलींचा सहभाग का नसावा.  

न्यूयॉर्क मध्ये नाटक, सिनेमा क्षेत्रातील उमेदवारीच्या काळात कितितरी तरुण मुलं /मुली तात्पुरती वेटरची नोकरी पत्करतात आणि उरलेल्या वेळात नाटक -सिनेमात काम मिळावं म्हणून ऑडिशन्स देतात. पण मुंबईत ती पद्धत दिसत नाही.

अमेरिकेतल्या भारतीय रेस्टोरंट मध्येही भारतीय महिला वेट्रेसेस नसतात. क्वचित एखादया रेस्टोरंट मध्ये असल्या तर. पण बहुतेक करून  नाहीच.
                                                                               
असो,  back to Roseanne:

रोझॅन बार नावाच्या विनोदीकेच्या स्टँडअप कॉमेडीवर आधारलेली रोझॅन ही मालिका ९०च्या दशकात नऊ वर्ष ABC चॅनल वर चालली आणि एका अतिशय सुंदर, चुटपुट लावणाऱ्या एपिसोडनी तिचा १९९७ मध्ये शेवट झाला. तिचे रीरन्स इतर चॅनल्स वर नंतर बघायला मिळायचे.

साईनफेल्ड आणि रोझॅन ह्या समकालिन मालिका होत्या. मला दोन्ही आवडायच्या. त्यातल्या त्यात  रोझॅन बहुदा जरा जास्त. पण साईनफेल्ड ही मालिका म्हणजे न्यूयॉर्क सिटीच्या अप्पर वेस्ट साईड भागात रहाणारा अविवाहित तरुण जेरी साईनफेल्ड आणि त्याच्या जॉर्ज, एलेन आणि क्रेमर ह्या तीन मित्रांच्या न्यूयॉर्क परिसरात घडणाऱ्या आयुष्याचं कथानक तर रोझॅन म्हणजे मोठ्या शहरांपासून लांब असलेल्या एका छोट्या गावातल्या सर्वसामान्य कुटुंबाची सर्वसामान्य गोष्ट - म्हणूनच कि काय साईनफेल्ड मालिकेला जितकी प्रतिष्ठा मिळाली तितकी रोझॅनला मिळाली नाही असं वाटतं. रोझॅन बारचं मालिके बाहेरचं अधून मधून बंडखोर वागणंही त्याला कारणीभूत होतं कि काय कुणास ठाऊक.

रोझॅन मालिकेचा शेवट होऊन २१ वर्ष झाली. रोझॅन बार आता ६५ वर्षांच्या आहेत आणि हवाई मध्ये आपल्या मॅकेडेमिया फार्म वर रहातात.

                                                                             
                                                                          ***

                                                                         
मुंबईत असताना विनोदाची ओळख झाली होती ती पुलंच्या लिखाणातुन आणि  यस मिनिस्टर आणि माईंड युवर लँग्वेज सारख्या दर्जेदार इंग्रजी मालिकांतून. लहानपणी शुध्द शाब्दिक आणि प्रासंगिक विनोदाचे संस्कार झाल्यामुळे पाचकट - चावट विधानं, अंगविक्षेप, ओव्हर ऍक्टिंग करत किंवा पुरुषांना बायकांचे कपडे घालून केलेले विनोद कधी आवडले नाहीत.  माईंड युवर लँग्वेज च्या ताजेपणाचं कौतुक असं वाटतं कि इतक्या वर्षानंतर न्यूयॉर्क मध्ये ती मालिका बघताना माझ्या मुलाला ती तितकीच आवडते जितकी कोणे एकेकाळी मुंबईत बघताना मला आवडली होती.

सुदैवानं अमेरिकेत पुलंची उणीव भरून काढायला त्यांची बुटकी, सडपातळ आयरिश - अमेरिकन आवृत्ती रिजीस फिलबिनच्या रूपात भेटली. पुलं सारखंच त्यांच व्यक्तिमत्व आणि विनोद मला सुसंकृत आणि निखळ वाटला. रोज सकाळी ABC टीव्हीच्या न्यूयॉर्क स्टुडिओ मधून देशभर लाईव्ह प्रसारित होणारा त्यांचा टॉक शो मला प्रथम दर्शनीच इतका आवडला कि नंतर जवळपास दोन दशकं - म्हणजे रिजीस निवृत्त होई पर्यंत मी तो नियमित पहात राहिले.

रिजीसचा पहिला शो बघितला त्याची आठवण गमतीदार आहे. रिजीसची को -होस्ट  (सह- यजमान) तेंव्हा कॅथी ली गिफर्ड होती. कार्यक्रमातील सुरवातीच्या गप्पांच्या दरम्यान - होस्ट चॅट मध्ये - तिच्याशी बोलताना मधूनच सहज रिजीसनी कॅथी ली च्या हाताला स्पर्श केला. कॅथी ली तेंव्हा गरोदर होती - तर त्यांनी तिच्या मोठया गोल गरगरीत पोटाला हात लावला. मध्येच तिचा हात धरून ते तिला स्टुडिओतल्या लॉबी मधला त्या दोघांचा मोठ्ठा फोटो दाखवायला घेऊन गेले.

न्यूयॉर्कला येऊन मला एक -दोन दिवसच झाले होते. परपुरुषांनी परस्त्रीच्या अंगाला हात लावणं तर सोडा, त्यांच्यापासून "योग्य" अंतर ठेऊन बसलं पाहिजे अशा प्रकारच्या सामानाचं बरंच मोठं गाठोडं बांधून मी मुंबईहून येताना विमानातून माझ्या बरोबर आणलं होतं. त्यानुसार ठरवून टाकलं कि एवढं सारखा स्पर्श करतोय म्हणजे नक्कीच ते दोघे नवरा -बायको असणार. लवकरच समजलं कि दोघांची वेगवेगळ्या लोकांशी लग्न झालेली आहेत आणि जी काही सलगी पडद्यावर दिसते ती त्या शो चा भाग आहे. नंतर हळूहळू ते बरोबर आणलेलं गाठोडं हलकं झालं. आता तर कोण कोणाला हात लावतंय त्याकडे लक्षही जात नाही.

रोझॅन आणि साईनफेल्ड च्या जोडीला इतरही काही छान हसवणऱ्या सिच्युएशन कॉमेडीज होत्या:

द गोल्डन गर्ल्स म्हणजे चार निवृत्त स्त्रियांची मालिका: मूळची न्यूयॉर्कची ताठ कडक डोरोथी, स्वतःच्याच प्रेमात असलेली टेक्ससची ब्लँच, जराशी भोळसट मूळची मिनिसोटाची रोझ, आणि अधून मधून मुलीला भेटायला येऊन टपकणारी डोरोथीची आई सोफिया पत्रील्लो -  अशा चौघी जणी निवृत्त झाल्यावर योगायोगानी मायामी मध्ये एका घरात एकत्र राहू लागतात आणि आपल्या आयुष्याच्या सोनेरी संध्याकाळी धम्माल करतात म्हणून त्या गोल्डन गर्ल्स.

तसंच चिअर्स - बॉस्टन मधला एक बार आणी तिथे टाईम पास करायला जमणाऱ्या नेहमीच्या गिर्हाईकांची मालिका.  त्या मालिकेचं वैशिष्ट्य असं कि मालिकेचं सगळं कथानक बार मध्ये घडत असलं तरी एखादयाला पिऊन तर्रर्र करून, झोकांड्या खात चालायला लावून, नशेत अडखळत बरळतोय असं दाखवून विनोद निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आलेला आहे असा एकही एपिसोड मला आठवत नाही. जणू बारला फक्त वेगवेगळ्या "पात्रांना" एकत्र आणण्यासाठी वापरलं होतं. पिणं तिथे गौण होतं.

आणि लास्ट बट नॉट लीस्ट म्हणतात तसं विनोदाच्या दुनियेत स्वतःच खास स्थान असलेला, टीकाकारांचा आवडता कडवट खवचट विनोदाचा बादशहा डेव्हिड लेटरमन आणि त्याची टॉप टेन लिस्ट जी बरेचदा न्यूयॉर्कच्या माध्यमात चर्चेचा विषय व्हायची.  लेटरमन शो रात्री उशिरा यायचा - दिवसाची सांगता करायला.

पुढे कधीतरी वाचलं की comedy is serious business. वर्षन वर्ष चालणाऱ्या गाजलेल्या विनोदी कार्यक्रमांच्या मागे एकच लेखक नसतो तर अनेक असतात आणि काही तर नावाजलेल्या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेले असतात. कोणाला महित होतं विनोद निर्मिती हा एवढा गांभिर्याने घेतला जाणारा व्यवसाय आहे.

                                                                             
                                                                           ***


आणि आता नविन  



रोझॅनच्या पुनरागमनाची बातमी देताना न्यूयॉर्क टाईम्स मध्ये असं म्हंटलं होतं कि २०१६च्या निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ABC टेलिव्हिजन कंपनीचे डझनभर वरिष्ठ अधिकारी बरबँक, कॅलिफोर्निया मधल्या कंपनीच्या मुख्य कार्यालयात एकत्र जमले - ट्रम्प विजयाचा त्यांच्या कपंनीच्या भविष्याच्या दृष्टीने काय अर्थ होतो ते ठरविण्यासाठी.

जणू निवडणुकीच्या निकालांनी सगळ्यांचेच डोळे खाड्कन उघडले होते. देशाचे पूर्व - पश्चिम किनारे आणि तिथल्या मोठया शहरात रहाणाऱ्या लोकांना, देशाच्या मध्यवर्ती भागात रहाणाऱ्या आम जनतेच्या आवडी/ निवडीं, इच्छा/आकांक्षा आपल्या पेक्षा खूप वेगळ्या असू शकतात हे जणू त्या निवडणुकीनी एक मोठा धक्का देऊन दाखवून दिलं.

बऱ्याच चर्चेनंतर त्या मिटींगच्या शेवटी आखण्यात आलेल्या काही योजनां नुसार मध्यंतरी दुर्लक्षित झालेल्या दर्शकां पर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी त्यांना पूर्वी आवडलेल्या काही जुन्या यशस्वी मालिकांचं पुरुज्जीवन करायचं ठरविण्यात आलं  - त्यातली एक मालिका मध्य अमेरिकेतील एका सर्वसाधारण कुटुंबाच्या आयुष्यावर आधारित होती - ज्यांच्या सारख्या लोकांनी ट्रम्पना राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी मत दिली होती.

२७ मार्चला नविन रोझॅनचा पहिला एपिसोड दाखवण्यात आला आणि त्याला ABC टीव्हीच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त दर्शक लाभले.  मुख्यत्वे करून ज्या राज्यातून ट्रम्प ना जास्त मतं मिळाली होती त्या राज्यांमध्ये हा पहिला एपिसोड लोकांनी जास्त बघितला -  जवळपस दोन कोटी दर्शकांनी. त्याबद्दल खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी रोझॅन बारला फोन करून तिचं अभिनंदन केलं.

नव्या रोझॅन मालिकेत रोझॅन कॉनर ट्रम्प समर्थक आहे तर तिची बहीण जॅकी हिलरी समर्थक. मालिके बाहेरही रोझॅन बार स्वतः ट्रम्प समर्थक आहेत.

नव्या रोझॅन मध्ये जुनं बरंच काही शिल्लक आहे:  तेच घर, स्वयंपाकघर, लिव्हिंग रूम मधला तोच तो जुना मळकट रंगाचा सोफा, सोफ्याच्या पाठीवरची ती जुनी रजई. सगळया प्रमुख पात्रांच्या भूमिका करणारे अभिनेते/ अभिलेत्रीही तेच आहेत - फक्त रोझॅन बरोबर तिची मुलं, नवरा आणि बहीणही आता वयानी वाढलेत. आणि एपिसोड्सचे विषय अर्थातच तात्कालिक आहेत.

रोझॅन मला वाटतं सध्या उबर ड्रायव्हर म्हणून काम करतेय. आणि दुसऱ्या एपिसोड मधील उपकथानकात आजकालचे पालक मुलांच्या फार कलानं घेतात, त्यामुळे मुलं शेफारतात पण त्यांना जुन्या पद्धतीनं थोडा धाक दाखवला तर ती लाईनीत येऊ शकतात हे रोझॅन, तिची मुलगी डार्लिन आणि डार्लिनची मुलगी - हायस्कुल मध्ये शिकणारी रोझॅनची नात ह्यांच्यामधील प्रसंगातून दाखवलं होतं.

जुन्या रोझॅन मध्ये मालिका संपता संपता कॉनर कुटुंबात चवथ्या मुलाचं आगमन झालं होतं. मलिक संपली तेंव्हा ते मुलं लहान  बाळ होतं. नवीन रोझॅन मध्ये अजून तरी ते पात्र नाही. त्याचा ओझरता उल्लेख फक्त पहिल्या एपिसोड मध्ये होता.  तसंच जुन्या रोझॅनच्या शेवटच्या भागात डॅन हार्ट अटॅक नि गेला असं म्हंटलं होतं. मालिका परत आणताना ते "ऍडजस्ट" करून घेतलेलं दिसतं.

रोझॅनच हे तात्पुरतं पुनरागमन आहे. नऊ एपिसोड्स साठी. ते लांबवलं जातं कि तात्पुरतंच ठरतं ते कळेल लवकरच.



Saturday, January 13, 2018

तिळगुळ घ्या नि गोडगोड बोला



                                    


नविन वर्षाची सुरवात चांगल्या विचारांनी व्हावी म्हणून ह्या पोस्टची सुरुवात ह्या गाण्यानी.

नाताळच्या सुट्टीत दोन पुस्तकं वाचली. क्झिट वेस्ट आणि ऍट द स्ट्रेंजर्स गेट - अरायव्हल्स ईन न्यूयॉर्क. खरं सांगायचं तर ही दोन पुस्तकं वाचायला घेतली. त्यातलं एक वाचून पूर्ण झालं दुसरं अजून व्हायचंय.

मोहसीन हमीद ह्यांचं एक्झिट वेस्ट हि कादंबरी आहे. न्यूयॉर्कच्या वर्तमान पत्रात त्या पुस्तकाची जी परिक्षण वाचली त्यात असं म्हंटलं होतं कि ती निर्वासितांची (refugees) कहाणी आहे. सईद आणि नादिया हे दोघे अस्थिरतेनं ग्रासलेल्या एका अनामिक शहरात रहात असतात. पुस्तकात त्या शहराचं नाव सांगितलं जात नाही. तिथे रहाणं असुरक्षित, अशक्यप्राय होतं तेंव्हा पैशाच्या मोबदल्यात एक गुप्त द्वार उघडून देणारा कोण तरी त्यांना भेटतो आणि त्यांचा पश्चिमेचा प्रवास सुरु होतो.

ग्रीस, लंडन मध्ये काही काळ घालवून टप्प्या टप्प्यानी ते दोघे कॅलिफोर्नियाला जाऊन पोहोचतात. त्यांचा प्रवास हा निर्वासितांचा प्रवास जरी असला - दर वेळी एका देशातून दुसऱ्या देशात जातात पैशाच्या मोबदल्यात गुप्त दरवाजे उघडून देणारं कोणतरी त्यांना भेटतं  -  तरी एक प्रकारे देशांतर करून परदेशी गमन करणाऱ्या कोणाचीही ती कहाणी होऊ शकते - मग देशाटन निर्वासित म्हणून केलेलं असो किंवा जास्त पैसे मिळवण्यासाठी.

सईद आणि नादिया ज्या शहरात जन्मलेले आणि वाढलेले असतात ते शहर सोडताना ते एकमेकांच्या सोबत असतात. पुढच्या प्रवासात हि सोबत काही काळ टिकते. पुढे मात्र दोघांच्या वाटा भिन्न होतात. पुस्तकातील शेवटचा परिच्छेद वाचताना आँधी ह्या जुन्या हिंदी सिनेमातील एका गाण्याची आणि दृश्याची आठवण झाली. लेखकानी तो सिनेमा बघितला नसेलही कदाचित पण त्या दोन दृश्यात खूप साम्य वाटलं.






आँधी मधलं जे खूप गाजलेलं गाणं आहे- तेरे बिना झिंदगी से कोई शिकवा तो नही, तेरे बिना झिंदगी भी लेकिन झिंदगी तो नही,  त्याच्या मध्ये जो संवाद आहे - संजीव कुमार आणि सुचित्रा सेन पुष्कळ वर्षांनी एकमेकांना भेटतात. दोघांचेही केस पांढरे झालेले असतात. दोघांचेही चेहरे थोडे थकलेले दिसतात. पडझड झालेल्या एका ऐतिहासिक वास्तूच्या भग्न अवशेषांमधून (जणू त्यांच्या दुभंगलेल्या लग्नाचं प्रतिक) फिरताना संजीव कुमार, सुचित्रा सेनला - सिनेमातल्या आरतीला सकाळच्या वेळी तो परिसर कसा दिसतो त्याचं वर्णन करत असतात. तेंव्हा ती म्हणते- का सांगतोयस मला हे सगळं. मी थोडीच कधी इथे सकाळच्या वेळी येऊ शकेन. त्यावेळी ते म्हणतात - हा चंद्र आहे ना त्याला रात्रीच बघायचं. तो सकाळी दिसत नाही.

एक्झिट वेस्ट मध्ये शहर सोडल्या नंतर पन्नास वर्षांनी नादिया आपल्या जन्मगावी येते. सईदला भेटते. तिच्या जुन्या घराजवळच्या एका कॉफी शॉप मध्ये ते भेटतात. बाकीचा सगळा परिसर बदलेला असतो. तिची जुनी इमारत अजून शाबूत असते. ते दोघे बराच वेळ गप्पा मारतात. निरोप घेताना ती सईदला विचारते - तुला चिले मधलं चांदणं बघायचं होतं ते तु बघितलंस का? तो म्हणतो कधी जमलं तर तिला तिकडे  घेऊन जायला त्याला खूप आवडेल. पण तो दिवस खरोखर कधी येईल कि नाही हे त्या दोघांनाही माहित नसतं.

एक्झिट वेस्ट चा सूर असा आहे कि शहरं उध्वस्त होतात, पुन्हा उभी रहातात. माणसं निर्वासित होतात. नवीन देशात, शहरात  प्रस्थापित होतात. हे चक्र असच चालू रहातं. ज्या शहरानी सईद -नादियाला निर्वासित केलेलं असत त्या शहरातली नविन पिढी पन्नास वर्षांनंतर बघितल तर त्यांच्या सभोवती मजेत वावरत असते. सईद -नादियाला ज्या घटनां मुळे शहर सोडाव लागल त्या घटना ह्या नविन पिढीच्या दृष्टींनी केवळ इतिहास असतात.

                                                                            *****

ऍडम गॉपनिक ह्यांचं ऍट द स्ट्रेंजर्स गेट हे आत्मकथन आहे. म्हंटल तर गॉपनिक आणि त्यांच्या पत्नीच्या कॅनडा ते न्यूयॉर्क ह्या प्रवासाची ती कहाणी आहे. एक्झिट वेस्ट मध्ये नादिया आणि सईद ह्या जोडप्याचा (बहुतेक) त्रिखंडातला - आशिया, युरोप आणि शेवटी अमेरिका - निर्वासित म्हणून दाखवेलला काल्पनिक प्रवास हा जितक्या सरळ सोप्या भाषेत, जास्त फाटे न फोडता एका दिशेने सांगितलेला आहे, गॉपनिक आणि त्यांच्या पत्नीचा मॉन्ट्रीअल ते न्यूयॉर्क सिटी हा खराखुरा, मुख्यत्वे करून न्यूयॉर्कच्या उच्चभ्रू कला आणि साहित्य जगतातील प्रवास तेवढ्या सरधोपट पणे सांगितलेला नाही. त्या पुस्तकात न्यूयॉर्क शहररासहित अनेक गोष्टींचं खूप सविस्तर विवेचन आहे. ते काळातही सारख मागे -पुढे जात रहात. एखादा छोटा चंचल पक्षी एका मोठ्या वृक्षाच्या एका फांदीवर थोडावेळ बसेल, लगेच पंख फडफडवत उडून वरच्या दुसऱ्या फांदीवर जाऊन बसेल, तिथे थोडावेळ विसावून मग परत खालच्या तिसऱ्याच एखादया फांदीवर जाऊन बसेल तसं फॅशन, स्वयंपाक, लेखन, चित्रकला अस वेगवेगळ्या विषयांवर थोडा थोडा वेळ विसावत ते पुस्तक पुढे चाललय. आणि अजून माझ एक चतुर्थांशही पुस्तक वाचून झालं नसेल. ते पुस्तक वाचून कधी पूर्ण होईल...पूर्ण होईल कि नाही ते सांगता येत नाही.

गॉपनिक ह्यांच पॅरिस वरच पुस्तक पॅरिस टू द मून मी काही वर्षांपूर्वी वाचायला घेतल होत. त्याचीही शेवटची काही पान अजून वाचून व्हायची आहेत. पुस्तकं वाचून पूर्ण होवोत किंवा न होवोत, शहरांवर लिहिलेली चांगली पुस्तकं नेहमीच एक वेगळा आनंद देतात. मग ते पुस्तक इंग्रजीत असो कि मराठीत, शहर न्यूयॉर्क असो कि मुंबई, कॅथरीन बूं च बिहाईंड द ब्युटीफुल फॉरेव्हर्स असो किंवा मधु मंगेश कर्णिकांच माहीमची खाडी.

                                                                             *****

परदेशात रहाणाऱ्या लोकांनी भारताची काळजी करू नये अस भारतात रहाणारे काही लोक म्हणतात. ते तस बरोबर आहे. पण कळल तरी वळ्त नाही तस काळजी तर वाटतच रहाते. म्हणजे मुलं लांब रहात असली कि आईला कशी त्यांची काळजी वाटते त्यातलाच थोडा प्रकार. मुलं लांब मौज करत असतात आणि आई मात्र घरात बसून त्यांची काळजी करत रहाते तसं मुंबईकर मुंबईत मस्त मजेत रहात असतील आणि मी न्यूयॉर्क मध्ये बसून नेहमी मुंबईची काळजी करते. आता तर पूण्याची सुद्धा. मधूनच मात्र अस काही घडतं कि माझी काळजी अनाठायी आहे असं वाटत नाही.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला जाऊन आल्या नंतर जुलै मध्ये मी एक पोस्ट लिहिली होती. त्यात असं म्हंटल होतं कि मुंबईच्या गर्दीची आता काळजी वाटायला लागलीय.

त्यानंतर दोन महिन्यातच - सप्टेंबरमध्ये प्रभादेवी जवळच्या रेल्वे स्टेशनवर चेंगरा चेंगरी झाली. त्यात २० च्या वर लोक मारले गेले. एक विधान, जे मी मराठी पत्रकार आणि सिनेमा सृष्टीतील व्यक्तींच्या कडून माध्यमांमध्ये ऐकलंय - मुंबईला कोणी वाली उरलेला नाही - त्या विधानाचा त्यावेळी प्रत्यय आला. (आमची मुंबई, आमची मुंबई म्हणणारी मराठी माणसंच मुंबईला कोणी वाली उरलेला नाही असं म्हणतात तेंव्हा बिचाऱ्या मुंबईनी कोणाकडे बघायच हा प्रश्नही इथे उपस्थित होतो).

स्टेशनवर घडलेल्या त्या दुर्घटनेची जबाबदारी कोणीच घेतली नाही. ज्या शहरात ते स्टेशन आहे त्या शहराचं प्रशासन म्हणे त्या घटनेला जबाबदार नाही. ज्या राज्यात ते शहर आहे ज्या शहरात ते स्टेशन आहे त्या राज्याचं प्रशासनही म्हणे त्या घटनेला जबाबदार नाही. मला वाटतं थोडा वेळ, अगदी तात्पुरतं रेल्वे प्रशासनाला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यानांही लगेच दोषमुक्त करण्यात आलं. मुंबईच्या वर्तमानपत्रात मी असं वाचलं कि शेवटी तीन गोष्टींवर त्या दुर्घटनेचं खापर फोडण्यात आलं माणसांची गर्दी, अचानक आलेला पाऊस, आणि मोठ्ठ्यानी झालेला आवाज. ह्या तीन गोष्टी तर मुंबईच्या कुठल्याही भागात कधीही एकत्र येऊ शकतात.





वाढत्या गर्दी इतकीच मुंबईत मराठीचा दर्जा घसरत चाललाय हि माझी दुसरी मोठठी काळजीही अनाठायी आहे असं वाटत नाही.

पुस्तकांवरच्या चर्चा बघत असताना तू नलिकेवर एक मुलाखत दिसली. तसं त्या व्हिडीओ मधलं सगळं संभाषण बॉंबे, बॉंबे करत इंग्रजीत चालू आहे. त्यात साधारण बाविसाव्या मिनिटाला वरच्या क्लिप मधल्या मराठी लावणीचा उल्लेख येतो. त्यानंतर जी विधानं केली जातात त्या विधानांनी माझ्या मराठी भावना अंमळ दुखावल्या गेल्या.

वाजले कि बारा  हि लावणी माझ्या खूप आवडीची. नटरंग सिनेमातली. त्या चित्रपटातील सगळीच गाणी एकापेक्षा एक चांगली आहेत. तर वर उल्लेखलेल्या संभाषणात एक कॉमेडियन असं म्हणतो कि त्याला एका कंपनीनी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. तो स्टेज वर जायच्या आधी एका गायिकेनं वाजले कि बारा  हि लावणी सादर केली. त्यांनतर त्याच्या कॉमेडीचा कार्यक्रम होता. तो स्टेजवर गेल्यावर सुरवातीच्या नव्वद सेकंदात त्याच्या लक्षात आलं कि उपस्थितांना त्याच्या विनोदात काही रस नाहीय. (कि लावणी समोर त्याची कॉमेडी फिक्की पडली?) म्हणतांना तो तिथून सटकला आणि घरी गेला. आयोजकांनी सगळे पैसे त्याला आगाऊच दिले होते ते परत करायची म्हणे त्याची तयारी आहे जर ते वचन देतील कि ते पुन्हा कधीही लावणी आणि कॉमेडियनला एकत्र एका कार्यक्रमात बोलवणार नाहीत.

त्याच संभाषणातली दुसरी तापदायक गोष्ट म्हणजे तो कॉमेडियन मुंबईत रहाणाऱ्या ज्या लेखकाची मुलाखत घेतोय त्या लेखकाच सारख बॉंबे, बॉंबे चालू आहे. स्वतःच्या गावाला मात्र तो चेन्नाई म्हणतोय. मद्रास नाही. मुद्दाम करतोय कि काय कुणास ठाऊक. 

कोणावरही व्यक्तिगत टीका करायची ह्या ब्लॉगची ईच्छा नसते. उगीचच एकमेकांना नावं ठेवत बसायची असं ब्लॉगच स्वरूप असू नये असं वाटतं. पण जेंव्हा मुंबईचा आणि मुंबईच्या संस्कृतीचा प्रश्न येतो तेंव्हा रहावत नाही. भविष्य काळात मुंबईतील सगळ्या रहिवाशांना एकत्र आणणारी एखादी भाषा आणि संस्कृती असेल का, असायला हवी का हा प्रश्न नेहमी माझ्या मनात असतो. आणि जर अशी एक कॉमन भाषा आणि संस्कृती मुंबईत असावी तर ती कोणती. इंग्रजी भाषा आणि त्याच्या अनुषंगाने येणारी पाश्चात्य संस्कृती कि बॉलिवूड संस्कृती आणि तिच्या बरोबर येईल ती हिंदी भाषा. कि आणखी तिसरीच कुठलीतरी भाषा आणि संस्कृती.

काही पाश्च्यात्त्य कॉमेडियन फ पासून सुरु होणारा इंग्रजी अपशब्द सर्रास आपल्या स्टॅन्ड अप रुटीन मध्ये वापरतात तेंव्हा ते कानांना खटकतं. त्यांची नक्कल करत मुंबईतही एखादा विनोदकार फ चा शब्द सारखा वापरतो तेंव्हा ते जास्तच खटकतं. वर उल्लेख केलेल्या संभाषणा मध्ये ही फ ची फुगडी बराच वेळ ऐकू येते. म्हणून वैतागानी असं वाटतं कि त्या विनोदकाराला सांगावं - बाबारे, मुंबईत आता गर्दी फार वाढलीय. लावणी साठी वेगळा मंच, तुझ्या उभ्या उभ्या विनोदासाठी वेगळा मंच हि चैन जागेच्या दृष्टींनी आता परवडण्यासाखी राहिलेली नाही. मुंबईत टिकायचं असेल तर लावणी बरोबर नांदायला शिकावं लागेल.

वाजले कि बारा हि लावणी जुनी नाही. ती २०१० साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातली आहे. गुरु ठाकूर नावाच्या तरुण मराठी कवीनी लिहिलेली. पोस्टच्या सुरवातीला जे गाणं आहे ते हि त्यानीच लिहिलेलं. लावणीनी तर एकविसाव्या शतकात प्रवेश केलाय. तिच्याशी जमवून घेणं जमत नसेल तर चूक लावणीची नाही, लावणी आणि कॉमेडीला एकत्र आणू पहाणाऱ्या आयोजकांचीहि नाही, चूक फक्त आपल्या समोर बसलेल्या प्रेक्षकांना हसवू न शकणाऱ्या विनोदकाची असेल.

                                                                           *****

मी लहान असताना पूणे हे मराठी संस्कृतीच माहेरघर समजल जायच. आता पूण्यातही परप्रांतातून आलेले पुष्कळ लोक आहेत. त्यातले किती मराठी बोलू शकतात?  मुंबई इतकी गर्दी अजून तिथे झाली नसेल. तरीही आजही अनेक मंडळी अशी सापडतील जी म्हणतात  -  I was born and brought up in Puna ....cannot speak marathi.

तू नलिकेवर एखादी पाककृती शोधत असताना अनेक कुकींग चॅनल्स किंवा vlog समोर येतात. त्यातल्याच एका चॅनलवर एक हिंदी भाषिक महिला -  पूण्यात रहाणारी-  अळूवडीची पाककृती दाखवत होती. म्हणजे ती स्वतःच त्या एपिसोड मध्ये सुरवातीला म्हणतेय कि आज मी तुम्हांला महाराष्ट्रीयन पद्धतीच्या आलूवडीची रेसिपी दाखवते. मग पाककृती दाखवत असताना मध्येच म्हणते "पता नही इसको आलू वडी क्यूँ बोलते हैं. इसमे आलू तो बिल्कुल नहि है".  ते ऐकून मला हसावं कि रडावं तेच कळेना. महाराष्ट्रात, पूण्यात राहून एखादी पाककृती आपल्या वीस लाख चाहत्यांच्या पूढ्यात ठेवण्या आधी त्या पदार्थाचं नाव अळूवडी आहे कि आलूवडी ते हि लोकांना जाणून घ्यावस वाटत नाही?

मुंबईच्या श्रीमंत वस्तीत रहाणारी एखादी कोणतरी सहकुटुंब आपला मुक्काम पूण्याला हलवते. दक्षिण मुंबईत लहानाची मोठी झालेली. मराठी बोलता येत नाही. परदेशात काही वर्ष राहिलेली तिची बहीण भारतात परत जायचं ठरवते ते हि सरळ पूण्यालाच. आयुष्यभर मुंबईत राहून जे लोक कधी एक शब्द मराठी बोलायला शिकले नाहीत ते केवळ पूणे हे कधीकाळी मराठी संस्कृतीचं माहेर घर होतं हे लक्षात ठेऊन पूण्यात रहायला गेल्यावर लगेच फाड फाड अस्खलित मराठी बोलायला लागतील ह्यावर विश्वास बसत नाही. उद्या त्यांची मुलं जर म्हणाली I grew up in Puna ... cannot speak marathi तर दोष कोणाचा.

बॉलिवूड मधल्या नटनट्यांसकट मुंबईत रहाणाऱ्या कित्येक लोकांची आता महाराष्ट्रात इतरत्र दुसरी घरं आहेत. अलिबागला  बीच हाउस, पनवेलला फार्म हाउस, खंडाळा, पाचगणीत बंगले... अशी वेगवेगळ्या ठिकाणी. मनात नेहमी असा विचार येतो कि हि मंडळी जेंव्हा आपल्या दुसऱ्या घरी जातात तेंव्हा त्या मराठी -भाषिक गावात तरी ते मराठी बोलतात का? आणि मराठी बोलणाऱ्या गावात सेकंड होम्स असूनही ह्यांचं मराठीशी - भारतातल्याच एका भाषेशी एवढं वैर का. हे असच चालू राहिलं तर पूण्यासकट अलिबाग, पनवेल, खंडाळा, पाचगणी ही महाराष्ट्रातील गावं आहेत ह्याचा लोकांनां विसर पडायल वेळ लागणार नाही.

एक्झिट वेस्ट मध्ये एक परिच्छेद आहे. नादिया आणि सईद लंडन मध्ये रहात असतात तेंव्हा त्या गोष्टीत असं म्हंटलंय - A mutually agreed time tax had been enacted, such that a portion of the income and toil of those who had recently arrived on the island would go to those who had been there for decades, and this time tax was tapered in both directions, becoming a smaller and smaller sliver as one continued to reside, and then larger and larger subsidy thereafter. 

मला तो परिच्छेद नीट समजला नाही म्हणून मी त्याचा सोयिस्कर अर्थ असा लावला कि शहर कुठलंही असो बाहेरून जे लोक त्या शहरात रहायला येतात ते त्या शहरातल्या मूळ रहिवाशांचं, पिढ्यान पिढ्या, पिढ्यान पिढ्या त्या शहरात राहिलेल्या लोकांचं देणं लागतात. न्यूयॉर्क मध्ये रहात असताना मी कायम ह्या गोष्टीचं भान ठेवते. मी जरी  दोन दशकं इथे राहिले असले तरी हे शहर मी यायच्या आधी अस्तित्वात होतं आणि आज ते जे काही आहे ते पिढ्यान पिढ्या इथे रहात असलेल्या लोकांमुळे आहे. 

अशी आशा करूया कि देशाच्या इतर प्रांतातून मुंबई आणि पूण्याला येणारे लोकही हि जाणीव ठेवतील कि ते इथे यायच्या आधी हि दोन्ही शहरं अस्तित्वात होती - आपल्या भाषा आणि संस्कृतीसह. And the least they can do... the least they can do is respect that. त्या भाषेचं आणि संस्कृतीचं ते नक्कीच देणं लागतात. 

आणि जर समजा ती जाणीव त्यांनी ठेवली नाही, ठेवायची जरुर त्यांना वाटली नाही, मुंबई प्रमाणेच उद्या पूणंही मराठी माणसांच्या हातातून निसटत गेलं तर तो दोष कोणाचा - त्या बाहेरून आलेल्या लोकांचा नक्कीच नसेल. कुठेतरी आपल्या शहारांचं/ राज्याचं नेतृत्व करण्यात आपण - मराठी माणसं - वक्तृत्व आणि कर्तृत्व ह्या दोन्ही आघाड्यांवर कमी पडलो असा त्याचा अर्थ होईल का? 


     






yesheeandmommy@gmail.com