Tuesday, April 10, 2018

रोझॅनच पुनरागमन


अमेरिकेन टीव्ही वरची ९०च्या दशकातील एक लोकप्रिय मालिका म्हणजे रोझॅन. इल्लनॉय राज्यातल्या लॅनफर्ड नावाच्या एका छोट्या काल्पनिक गावात रहाणाऱ्या कॉनर कुटुंबाच्या आयुष्यावरची सीटकॉम.

कॉनर कुटुंबात ५ सदस्य: रोझॅन, तिचा नवरा डॅन कॉनर आणि त्यांची शाळकरी वयाची तीन मुलं - सर्वात मोठी मुलगी रीबेक्का उर्फ बेक्की, नंतर डार्लिन आणि धाकटा मुलगा डी जे म्हणजे डेव्हिड जेकब. ह्या पाच सदस्यांव्यतिरिक्त आणखीही काही सदस्य कॉनर कुटुंबात आणि पर्यायानी मालिकेत होते.

गावातच रहाणारी रोझॅनची अविवाहित धाकटी बहीण जॅकी दररोज कॉनर घरात चक्कर मारायची. ती मालिकेतल्या प्रमुख पात्रांपैकी एक होती. कधी जवळपासच्या गावात रहाणारी रोझॅनची आई, डॅनचे वडील येऊन जायचे. रोझॅनची आज्जी, शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणींचा एखाद- दुसऱ्या एपिसोड मध्ये समावेष व्हायचा.

डॅन आणि रोझॅन दोधेही गावातल्या साध्या उद्योगधंद्यामध्ये मध्ये साध्याशा - ब्लू कॉलर - नोकऱ्या करायचे. सगळं जेमतेम सुरळीत चाललंय असं वाटत असताना दोघांपैकी एकाची कंपनी अचानक बंद व्हायची. नोकरी जायची. मग नविन 
नोकरी शोधायची धडपड. मालिकेच्या नऊ सीझन्स मध्ये त्या दोघांनी आणि जॅकीनी मिळून ज्या अनेक नोकऱ्या केल्या त्यात घर दुरुस्तीचं काम होतं, ब्युटी पार्लर मधल्या शॅम्पू गर्लची नोकरी होती आणि ट्रक ड्रायव्हरची सुद्धा. 

मधूनच कधीतरी डॅन आणि रोझॅनला धंदा करायची लहर यायची. मोटर सायकलवर भ्रमंती करत जगणाऱ्या एका स्वच्छंदी मित्राच्या नादी लागून, हातातली नोकरी सोडून देऊन, तीन मुलांची जबाबदारी असलेला डॅन जून्या मोटर सायकल नविन करून विकायचा उद्योग सुरु करायचा. तो नीट चालत नसे. मॉल मधलं कॉफी शॉप बंद झालं आणि त्यातली वेट्रेसची नोकरी गेली कि रोझॅन जॅकी बरोबर लंचबॉक्स नावाचं डायनर सुरु करायची.

दोघी बहिणीं मध्ये रोझॅन कुटुंबवत्सल. आपल्या शाळेतल्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न करून अवती भवतीच्या अनेक आर्थिक, सामाजिक, कौटूंबिक चढउतारांना आणि ओढाताणींना त्याच्या सोबतीनं निभावून नेत स्थिरावलेली. तर धाकटी जॅकी अस्थिर. कघी बहिणी बरोबर कंपनीत नोकरी करायची, ती सुटल्यावर मग पोलिसची नोकरी, तर कधी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचं. दर एक -दोन वर्षांनी बॉयफ्रेंड बदलायचे. मानसिक आधारासाठी ती मोठ्या बहिणीच्या कुटुंबावर अवलंबुन.

आणि जॅकी सकट घरातील सगळ्यांवर आपल्या खवचट विनोदानी राज्य करणारी राणी म्हणजे रोझॅन.


जुनी रोझॅन


रोझॅनच्या वेट्रेसच्या नोकरीवरून सहज आठवलं कि अमेरिकेत पुरुष वेटर्सच्या बरोबरीने महिला वेटर्स दिसतात. वेट्रेसिंग च्या कामात इथे महिलांचा सहभाग फार पूर्वीपासून आहे असं वाटतं.  मुंबईत मात्र मी आजपर्यंत एकही महिला वेट्रेस बघितलेली नाही. पंचतारांकित हॉटेलच्या रेस्टोरंट मध्ये किंवा पाश्चात्य धर्तीच्या कॉफि शॉप मध्ये चुकून एखादी दिसली असेल. पण इतर कुठल्याच रेस्टोरंट मध्ये नाही.

हे थोडंसं कोड्यात टाकणारं आहे. ज्या नोकरीसाठी फारशा प्रशिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नसते त्या क्षेत्रात आपल्याकडे मुलींचा सहभाग का नसावा.  

न्यूयॉर्क मध्ये नाटक, सिनेमा क्षेत्रातील उमेदवारीच्या काळात कितितरी तरुण मुलं /मुली तात्पुरती वेटरची नोकरी पत्करतात आणि उरलेल्या वेळात नाटक -सिनेमात काम मिळावं म्हणून ऑडिशन्स देतात. पण मुंबईत ती पद्धत दिसत नाही.

अमेरिकेतल्या भारतीय रेस्टोरंट मध्येही भारतीय महिला वेट्रेसेस नसतात. क्वचित एखादया रेस्टोरंट मध्ये असल्या तर. पण बहुतेक करून  नाहीच.
                                                                               
असो,  back to Roseanne:

रोझॅन बार नावाच्या विनोदीकेच्या स्टँडअप कॉमेडीवर आधारलेली रोझॅन ही मालिका ९०च्या दशकात नऊ वर्ष ABC चॅनल वर चालली आणि एका अतिशय सुंदर, चुटपुट लावणाऱ्या एपिसोडनी तिचा १९९७ मध्ये शेवट झाला. तिचे रीरन्स इतर चॅनल्स वर नंतर बघायला मिळायचे.

साईनफेल्ड आणि रोझॅन ह्या समकालिन मालिका होत्या. मला दोन्ही आवडायच्या. त्यातल्या त्यात  रोझॅन बहुदा जरा जास्त. पण साईनफेल्ड ही मालिका म्हणजे न्यूयॉर्क सिटीच्या अप्पर वेस्ट साईड भागात रहाणारा अविवाहित तरुण जेरी साईनफेल्ड आणि त्याच्या जॉर्ज, एलेन आणि क्रेमर ह्या तीन मित्रांच्या न्यूयॉर्क परिसरात घडणाऱ्या आयुष्याचं कथानक तर रोझॅन म्हणजे मोठ्या शहरांपासून लांब असलेल्या एका छोट्या गावातल्या सर्वसामान्य कुटुंबाची सर्वसामान्य गोष्ट - म्हणूनच कि काय साईनफेल्ड मालिकेला जितकी प्रतिष्ठा मिळाली तितकी रोझॅनला मिळाली नाही असं वाटतं. रोझॅन बारचं मालिके बाहेरचं अधून मधून बंडखोर वागणंही त्याला कारणीभूत होतं कि काय कुणास ठाऊक.

रोझॅन मालिकेचा शेवट होऊन २१ वर्ष झाली. रोझॅन बार आता ६५ वर्षांच्या आहेत आणि हवाई मध्ये आपल्या मॅकेडेमिया फार्म वर रहातात.

                                                                             
                                                                          ***

                                                                         
मुंबईत असताना विनोदाची ओळख झाली होती ती पुलंच्या लिखाणातुन आणि  यस मिनिस्टर आणि माईंड युवर लँग्वेज सारख्या दर्जेदार इंग्रजी मालिकांतून. लहानपणी शुध्द शाब्दिक आणि प्रासंगिक विनोदाचे संस्कार झाल्यामुळे पाचकट - चावट विधानं, अंगविक्षेप, ओव्हर ऍक्टिंग करत किंवा पुरुषांना बायकांचे कपडे घालून केलेले विनोद कधी आवडले नाहीत.  माईंड युवर लँग्वेज च्या ताजेपणाचं कौतुक असं वाटतं कि इतक्या वर्षानंतर न्यूयॉर्क मध्ये ती मालिका बघताना माझ्या मुलाला ती तितकीच आवडते जितकी कोणे एकेकाळी मुंबईत बघताना मला आवडली होती.

सुदैवानं अमेरिकेत पुलंची उणीव भरून काढायला त्यांची बुटकी, सडपातळ आयरिश - अमेरिकन आवृत्ती रिजीस फिलबिनच्या रूपात भेटली. पुलं सारखंच त्यांच व्यक्तिमत्व आणि विनोद मला सुसंकृत आणि निखळ वाटला. रोज सकाळी ABC टीव्हीच्या न्यूयॉर्क स्टुडिओ मधून देशभर लाईव्ह प्रसारित होणारा त्यांचा टॉक शो मला प्रथम दर्शनीच इतका आवडला कि नंतर जवळपास दोन दशकं - म्हणजे रिजीस निवृत्त होई पर्यंत मी तो नियमित पहात राहिले.

रिजीसचा पहिला शो बघितला त्याची आठवण गमतीदार आहे. रिजीसची को -होस्ट  (सह- यजमान) तेंव्हा कॅथी ली गिफर्ड होती. कार्यक्रमातील सुरवातीच्या गप्पांच्या दरम्यान - होस्ट चॅट मध्ये - तिच्याशी बोलताना मधूनच सहज रिजीसनी कॅथी ली च्या हाताला स्पर्श केला. कॅथी ली तेंव्हा गरोदर होती - तर त्यांनी तिच्या मोठया गोल गरगरीत पोटाला हात लावला. मध्येच तिचा हात धरून ते तिला स्टुडिओतल्या लॉबी मधला त्या दोघांचा मोठ्ठा फोटो दाखवायला घेऊन गेले.

न्यूयॉर्कला येऊन मला एक -दोन दिवसच झाले होते. परपुरुषांनी परस्त्रीच्या अंगाला हात लावणं तर सोडा, त्यांच्यापासून "योग्य" अंतर ठेऊन बसलं पाहिजे अशा प्रकारच्या सामानाचं बरंच मोठं गाठोडं बांधून मी मुंबईहून येताना विमानातून माझ्या बरोबर आणलं होतं. त्यानुसार ठरवून टाकलं कि एवढं सारखा स्पर्श करतोय म्हणजे नक्कीच ते दोघे नवरा -बायको असणार. लवकरच समजलं कि दोघांची वेगवेगळ्या लोकांशी लग्न झालेली आहेत आणि जी काही सलगी पडद्यावर दिसते ती त्या शो चा भाग आहे. नंतर हळूहळू ते बरोबर आणलेलं गाठोडं हलकं झालं. आता तर कोण कोणाला हात लावतंय त्याकडे लक्षही जात नाही.

रोझॅन आणि साईनफेल्ड च्या जोडीला इतरही काही छान हसवणऱ्या सिच्युएशन कॉमेडीज होत्या:

द गोल्डन गर्ल्स म्हणजे चार निवृत्त स्त्रियांची मालिका: मूळची न्यूयॉर्कची ताठ कडक डोरोथी, स्वतःच्याच प्रेमात असलेली टेक्ससची ब्लँच, जराशी भोळसट मूळची मिनिसोटाची रोझ, आणि अधून मधून मुलीला भेटायला येऊन टपकणारी डोरोथीची आई सोफिया पत्रील्लो -  अशा चौघी जणी निवृत्त झाल्यावर योगायोगानी मायामी मध्ये एका घरात एकत्र राहू लागतात आणि आपल्या आयुष्याच्या सोनेरी संध्याकाळी धम्माल करतात म्हणून त्या गोल्डन गर्ल्स.

तसंच चिअर्स - बॉस्टन मधला एक बार आणी तिथे टाईम पास करायला जमणाऱ्या नेहमीच्या गिर्हाईकांची मालिका.  त्या मालिकेचं वैशिष्ट्य असं कि मालिकेचं सगळं कथानक बार मध्ये घडत असलं तरी एखादयाला पिऊन तर्रर्र करून, झोकांड्या खात चालायला लावून, नशेत अडखळत बरळतोय असं दाखवून विनोद निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आलेला आहे असा एकही एपिसोड मला आठवत नाही. जणू बारला फक्त वेगवेगळ्या "पात्रांना" एकत्र आणण्यासाठी वापरलं होतं. पिणं तिथे गौण होतं.

आणि लास्ट बट नॉट लीस्ट म्हणतात तसं विनोदाच्या दुनियेत स्वतःच खास स्थान असलेला, टीकाकारांचा आवडता कडवट खवचट विनोदाचा बादशहा डेव्हिड लेटरमन आणि त्याची टॉप टेन लिस्ट जी बरेचदा न्यूयॉर्कच्या माध्यमात चर्चेचा विषय व्हायची.  लेटरमन शो रात्री उशिरा यायचा - दिवसाची सांगता करायला.

पुढे कधीतरी वाचलं की comedy is serious business. वर्षन वर्ष चालणाऱ्या गाजलेल्या विनोदी कार्यक्रमांच्या मागे एकच लेखक नसतो तर अनेक असतात आणि काही तर नावाजलेल्या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेले असतात. कोणाला महित होतं विनोद निर्मिती हा एवढा गांभिर्याने घेतला जाणारा व्यवसाय आहे.

                                                                             
                                                                           ***


आणि आता नविन  रोझॅनच्या पुनरागमनाची बातमी देताना न्यूयॉर्क टाईम्स मध्ये असं म्हंटलं होतं कि २०१६च्या निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ABC टेलिव्हिजन कंपनीचे डझनभर वरिष्ठ अधिकारी बरबँक, कॅलिफोर्निया मधल्या कंपनीच्या मुख्य कार्यालयात एकत्र जमले - ट्रम्प विजयाचा त्यांच्या कपंनीच्या भविष्याच्या दृष्टीने काय अर्थ होतो ते ठरविण्यासाठी.

जणू निवडणुकीच्या निकालांनी सगळ्यांचेच डोळे खाड्कन उघडले होते. देशाचे पूर्व - पश्चिम किनारे आणि तिथल्या मोठया शहरात रहाणाऱ्या लोकांना, देशाच्या मध्यवर्ती भागात रहाणाऱ्या आम जनतेच्या आवडी/ निवडीं, इच्छा/आकांक्षा आपल्या पेक्षा खूप वेगळ्या असू शकतात हे जणू त्या निवडणुकीनी एक मोठा धक्का देऊन दाखवून दिलं.

बऱ्याच चर्चेनंतर त्या मिटींगच्या शेवटी आखण्यात आलेल्या काही योजनां नुसार मध्यंतरी दुर्लक्षित झालेल्या दर्शकां पर्यंत पुन्हा पोहोचण्यासाठी त्यांना पूर्वी आवडलेल्या काही जुन्या यशस्वी मालिकांचं पुरुज्जीवन करायचं ठरविण्यात आलं  - त्यातली एक मालिका मध्य अमेरिकेतील एका सर्वसाधारण कुटुंबाच्या आयुष्यावर आधारित होती - ज्यांच्या सारख्या लोकांनी ट्रम्पना राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी मत दिली होती.

२७ मार्चला नविन रोझॅनचा पहिला एपिसोड दाखवण्यात आला आणि त्याला ABC टीव्हीच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त दर्शक लाभले.  मुख्यत्वे करून ज्या राज्यातून ट्रम्प ना जास्त मतं मिळाली होती त्या राज्यांमध्ये हा पहिला एपिसोड लोकांनी जास्त बघितला -  जवळपस दोन कोटी दर्शकांनी. त्याबद्दल खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्पनी रोझॅन बारला फोन करून तिचं अभिनंदन केलं.

नव्या रोझॅन मालिकेत रोझॅन कॉनर ट्रम्प समर्थक आहे तर तिची बहीण जॅकी हिलरी समर्थक. मालिके बाहेरही रोझॅन बार स्वतः ट्रम्प समर्थक आहेत.

नव्या रोझॅन मध्ये जुनं बरंच काही शिल्लक आहे:  तेच घर, स्वयंपाकघर, लिव्हिंग रूम मधला तोच तो जुना मळकट रंगाचा सोफा, सोफ्याच्या पाठीवरची ती जुनी रजई. सगळया प्रमुख पात्रांच्या भूमिका करणारे अभिनेते/ अभिलेत्रीही तेच आहेत - फक्त रोझॅन बरोबर तिची मुलं, नवरा आणि बहीणही आता वयानी वाढलेत. आणि एपिसोड्सचे विषय अर्थातच तात्कालिक आहेत.

रोझॅन मला वाटतं सध्या उबर ड्रायव्हर म्हणून काम करतेय. आणि दुसऱ्या एपिसोड मधील उपकथानकात आजकालचे पालक मुलांच्या फार कलानं घेतात, त्यामुळे मुलं शेफारतात पण त्यांना जुन्या पद्धतीनं थोडा धाक दाखवला तर ती लाईनीत येऊ शकतात हे रोझॅन, तिची मुलगी डार्लिन आणि डार्लिनची मुलगी - हायस्कुल मध्ये शिकणारी रोझॅनची नात ह्यांच्यामधील प्रसंगातून दाखवलं होतं.

जुन्या रोझॅन मध्ये मालिका संपता संपता कॉनर कुटुंबात चवथ्या मुलाचं आगमन झालं होतं. मलिक संपली तेंव्हा ते मुलं लहान  बाळ होतं. नवीन रोझॅन मध्ये अजून तरी ते पात्र नाही. त्याचा ओझरता उल्लेख फक्त पहिल्या एपिसोड मध्ये होता.  तसंच जुन्या रोझॅनच्या शेवटच्या भागात डॅन हार्ट अटॅक नि गेला असं म्हंटलं होतं. मालिका परत आणताना ते "ऍडजस्ट" करून घेतलेलं दिसतं.

रोझॅनच हे तात्पुरतं पुनरागमन आहे. नऊ एपिसोड्स साठी. ते लांबवलं जातं कि तात्पुरतंच ठरतं ते कळेल लवकरच.No comments:

Post a Comment